आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १

Submitted by टीम गोवा on 14 January, 2013 - 07:17

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही

***

मराठी सत्तेच्या लयानंतर पोर्तुगीज सत्तेला पहिला प्रथम गोव्यातून जबरदस्त विरोध जर कुणी केला असेल तर तो सत्तरीच्या राणेंनी. सत्तरी गोव्याच्या ईशान्येलाआहे. लहान मोठ्या पर्वतांचा हा प्रदेश. सह्याद्रीच्या हाताची बोटे जणू या प्रदेशात विसावली आहेत.या डोंगर दर्‍यांत राहणारे लोक वाघासारखे शूर व सशासारखे चपळ आहेत. इमान हा त्यांचा स्थायीभाव. इमानापुढे इनाम कस्पटासमान मानणे ही यांची वृत्ती. विश्वासाला पात्र असे हे लोक दिलेल्या वचनाला जागतात, पण कोणी विश्वासघात केला तर हे लोक प्रक्षुब्ध होतात आणि प्रतिकाराला हात उंचावतात. आणि तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सडपातळ अंगलटीचे हे लोक दिसतात गरीब पण आहेत एखाद्या माडाप्रमाणे ताठ मानेने जगणारे. मोडेन पण वाकणार नाहीत वृत्तीचे. पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुद्ध यांनी कितीतरी वेळा बंडाचे निशाण उभारले. पोर्तुगीज सरकारने त्यांना बलप्रयोगाने झोडपले, कापून काढले. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सतीचे वाण घेतलेल्या सत्तरकर गोमंतकीयांनी ते व्रत निष्ठेने प्रत्येक पिढीत पाळले.

सत्तरी प्रदेशात राणे राजासरखे होते. सन १७४० मधे पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते. पण पुढे ते त्यांनी पाळले नाही.सन १७५५ मधे मोट्ठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १७५५ ते सन १८५५ ह्या कालखंडात एकुण २२ वेळा बंडे झाली. बडे नसुन खर तर ही युद्धेच होती. आणि ह्या एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या ४ पिढ्यांनी लढा निकराने चालु ठेवला. २२ वेळा युद्ध होउनही स्वातंत्र्य न मिळाल्याच कारण म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध.

सन १८५१ च्या जानेवारी मधे व्हिश्कोंदि द व्हील बॉव्ह द औरें हा विजरेई झाला. त्याने राणे सरदेसायंचे मोकाशे, इनामे खालसा करण्याचा प्रयत्न केला. काल्सोरियु नावाचा जाहिरनामा काढला गेला. त्या जाहिरनामे पुरुषांना विजार खालण्याची व स्त्रियांना चोळी घालण्याची सक्ती करण्यात आली. त्या काळात हिंदु पुरुष धोतर नेसत, सत्तरीतील गरीब लोक तर पंचा नेसत. आणि बायका लुगडी नेसत. ह्या जाहिरनाम्याने विजार न घालण्यार्‍या पुरुषांना व चोळी न घालणार्‍या स्त्रियांना कैद करण्याची मोकळीक दिली. हे कारण देउन पाखल्यांनी (युरोपियन लोक) स्त्रियांना पकडण्याचा व त्यांच्यावर बलात्कार करण्याचा सपाटा लावला. असल्या अत्त्याचारी, अन्यायी अमानुष राजवटीने रयत गांजली. व परिणामस्वरुप दीपाजी राणे सरदेसाई यांनी २६ जानेवारी १८५२ रोजी पोर्तुगीज सत्तेच्या प्रतिकाराला दंड थोपटले.

दीपाजीनी म्हादई नदीच्या किनार्‍यावरील नाणुसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्रांचा मोठा साठा होता. तो दीपाजींना मिळाला. त्यानी नाणुसच्या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे केले. तेथुन गनिमी काव्याने सरकारी कचेर्‍या, सैनिकांच्या चौक्या यांवर हल्ले करुन पोर्तुगीजांना सत्तरीतुन पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरु केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहुन सत्तरीतील व आजुबाजुच्या प्रदेशातील देसाई, गावकर वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येउन मिळाले. सत्तरीतील ही उलथापालथ शांत करण्यासाठी विजेरईने लियांव नावाच्या युरोपियन कॅप्टनला ४० युरोपियन सैनिक देउन पाठवले. त्याला परिस्थितीची योग्य जाण नसावी. पहिल्याच झटपटीत त्याचे १ आल्फेरीश, ४ सैनिक जखमी झाले व एक काव ठार झाला. मग लियांव ने माघार घेतली. व उरलेल्या सैन्यासह साखळीच्या कोटाचा आश्रय घेतला. फोंड्याहुन ३० सैनिकांची अजुन १ तुकडी साखळीला कॅप्टन लियांवच्या मदतीला चालली होती. दीपाजीनी तिच्यावर गांजे येथे हल्ला केले व त्यांचा पराभव केला. तिथल्या आसपासच्या गावांतील चौक्याही लुटल्या.

इतके झाल्यावर विरजेई चे डोळे उघडले फेब्रुवारीच्या सुरवातीला लेफ्ट. कर्नल ज्युअंव मेमंदेस्स याच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर ज्युआंव द सिल्व्ह ह्याच्या अधिकाराखाली तिरंदाजांची १ बटालियन व ५५० शिपई सत्तरीवर पाठविले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातुन अचुक गोळ्या येउन फिरंगी सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठेच दिसत नसत . नुसते हवेतुन बार मारल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल हाल झाले. मग विजेरेइ ने दीपाजींशी समेट करावयास त्याना निमंत्रण दिले. परंतु दीपाजींनी विजेरईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले.

दीपाजींच्या लोकांनी सरकारी सैन्याला चांगल्याच हुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे. पण त्या प्रदेशापासुन दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत . दीपाजींचे धारिष्ठ्य इतके की राजधानीवरुन अवघ्या ७ किमी वर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. इथे सुखवस्तु , श्रीमंत लोकांची वस्ती होती. केंकरे, धुमे,सरदेसाई, भांडारे, घोडेकर, खाजनिये यांचे मोठमोठे वाडे तिथे होते. कुंभारजुवे हे छोटे बेट राजधानीजवळ असल्याने बंडखोर इथे येणर नाहीत अशी त्यांची समजूत होती.

२६ मे ला दीपाजींनी कुभारजुव्यावर धाड घालुन तिथल्या धनिकांकडुन खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याने केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम (आताची डिचोली) या भागातुन पोर्तुगीजांस हाकलून लावले. पोर्तुगीज सरकार ने ७ जून ला डिचोली, फोंडें , सत्तरी व हेमाडबार्से इथे मार्शल लॉ पुकारला. जनतेची फूस व सहकार्य असल्याशिवाय दीपाजींना हे विजय मिळू शकत नव्हते. असे पोर्तुगीजांचे म्हणणे होते . व ते खरेही होते. दीपाजी पैशासाठी सरकारी तिजोर्‍या फोडीत व धनिकांकडून पैसे उकळीत, पण गरीबांना त्यांनी त्रास दिला नाही. त्यांच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबाचे पालन पोषण ते करीत. व त्यामुळे जनतेचे संपूर्ण सहकार्य त्यांना मिळत असे.

सरकारची तिजोरी या युद्धामुळे रिकामी झाली होती. दि. २ जुलै रोजी ३ टक्के व्याजदराने सहा लाख असुर्प्यांचे कर्जरोखे काढले पण कोणीही ते घेईना. दि १० सप्टें. ला सैन्याच्या धाकाने ते रोखे विकत घ्यायला लावले. ४ ऑक्टों. ला विजेरई स्वतः ३००० युरोपियन सैनिक व १००० शिपाई घेउन सत्तरीवर चालून गेला. त्याने नाणुसचा किल्ला ताब्यात घेतला. पण दीपाजीनी आधीच आपली माणसे, शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेउन तिथून पोबारा केल्याने त्याला काहीच मिळाले नाही. त्यांनी करझोळ या दुर्गम ठिकाणी आपला मुक्काम हलविला.

अश्या प्रकारे दोन अडीच वर्षे (सन १८५२-सन १८५४ ) गेली. पोर्तुगीजांना विजय मिळण्याचे चिन्ह दिसेना. मग विजेरईने पुन्हा एकदा समेटाचा प्रस्ताव मांडला. पोर्तुगीज सैन्यातील एक माजी अधिकारी जुझे पावलु द ओलिव्हैर पेगादु दीपाजींचा मित्र होता. सन १८५४ च्या मार्च महिन्याच्या सुरवातीला त्याला विजेरईने दीपाजींकडे पाठविले. त्याने विजेरईचा निरोप दीपाजींना पेश केला. विजेरई ने त्यांना पणजीच्या भूशिरावरील काबो राजप्रासादात भेटायला येण्याचे आमंत्रण दिले होते. दीपाजींनी आमंत्रण स्वीकारले. पण ते चांगलेच मुत्सद्दी होते. काबो राजनिवासात काही दगाफटका होऊ नये म्हणुन त्यांनी पेगादाचे ३ मुलगे गांजे येथे ओलीस ठेउन घेतले. त्यापैकी एक सैन्यात होता. . ४ मार्चला ते राजनिवासात जाणार होते. ११ पर्यंत पोचले नाहेत तर त्या तिघांनाही प्राण गमवावे लागले असते.

दीपाजी राणे सरदेसाई जेत्याच्या दिमाखाने पणजीत प्रवेश करते झाले. ते होडीतुन उतरताच त्यांच्या लोकांनी शिंग फुंकुन त्यांच्या आगमनाची वार्ता दिली .तेथुन ते काबो राजनिवासात गेले पण विजेरईने भेट घेतली नाही. दीपाजींनी आपल्या महत्वपूर्ण साथीदारांसकट यावे मगच मी भेट घेइन असा निरोप दिला. हा प्रसंग विजेरईचा हेतु निर्मळ नव्हता हेच सिद्ध करतो.

dipajirane.jpg
खाशे दीपाजी राणे

पण शेवटी २८ मे १८५५ रोजी पोर्तुगीज सरकारने जाहीर केलेल्या वटहुकुमावर सही करुन दीपाजींनी व त्यांच्या साथीदारांनी सरकारशी तह केला. या वटहुकुमाची भाषा 'पराभूत झालो तरी तंगडी वर.' अश्या पद्धतीची आहे. वटहुकुम म्हणतो की दीपाजी राणे व सत्तरीतील इतर वतनदार पोर्तुगीज सरकारकडे आपला गुन्हा कबुल करुन दयेची भीक मागत आहेत आणि दारिद्र्यात मरु नये म्हणुन थोडे तरी द्रव्यसाहाय्य मागत आहेत. पोर्तुगीज भाषा अवगत नसल्याने दीपाजींनी या वटहुकुमावर अंगठा उठवला नाहीतर.....

दीपाजींचे बंड तलवारीच्या धारेवर व बंदुकीच्या गोळ्यांनी थंड करण्याचे प्रयत्न सरकारने सतत ३ वर्षे केले. पण त्यात अपयश आले. दीपाजींच्या सैन्यात फंदफितूरी झाली नाही. जनतेने त्याना योग्य साथ दिली.यातच त्यांचे श्रेष्ठत्व. त्यांचे बंड हे जनतेच्या कैवारातुन व त्यांच्या स्वतःच्या हंकावर केलेल्या आघातातुन स्फुरले होते. ते सर्वार्थाने जनतेचे बंड होते.

आजही जनता राणे सरदेसाई व त्यांच्या वंशजांना मान देते. त्यांच्या घराण्याला खाशे ही मानाची पदवी देउन. सत्तरीतील क्षत्रीय देसाई, राणे यांना त्यांच्या नावाने कोणीच पुकारत नाही ते आमचे मानाचे खाशे आहेत !!!

दीपाजींच्या बंडानंतर गोव्यात स्थानिक पातळीवर लहान लहान उठाव झाले. पण एखादा नाव घेण्यासारखा प्रयत्न झाला नाही. या वेळेला इतर भारतातही इंग्रजांविरुद्ध लोक हळूहळू उठाव करत होते, आणि गोव्यातील जनता या सगळ्या प्रयत्नांकडे पाहत होती.

१८९५ साली शिपायांचे बंड झाले. सन १८९४ मधे पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतीतील निग्रो लोकांनी बंड केले होते. हे बंड शमविण्यासाठी गोव्यातील शिपायांच्या तुकड्या ३० सप्टें. १८९५ ला आफिकेत पाठवायचा पोर्तुगाल सरकारचा हुकुम २६ ऑगस्ट्ला सुटला. त्यात भर म्हणून शिपायांना नविन पद्धतीची काडतुसे देन्यात येत होती. ती दातांनी उघडावी लागत. त्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी अफवा पसरली. आपणाला आफ्रिकेत पाठवुन बाटवणार असा शिपायांचा समज झाला. वळवईच्या बंडाचा (सन १८७०) समेट करताना सरकारने वचन दिले होते की, सैनिकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भारताबाहेर पाठविण्यात येणार नाही. पण ते वचन मोडल जात होत. यामुळे हिंदु-मुसलमान सैनिक बिथरले. १३ सप्टेंबरच्या रात्री २ वाजता शिपाई आपापली शस्त्रे व दारुगोळा घेउन बाहेर पडले आणि त्यांनी सत्तरीची वाट धरली.गव्हर्नरला हे बंड शमविण्यासाठी शिपायांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

लोकशाहीचा उदय

विसावे शतक उगवले. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध ४ शतके गोमंतकीय जनता झुंजत होती.पण आक्रमणाशी मुकाबला करताना त्याच्या सामर्थ्याचा , आयुधांचा अभ्यास करावा लागतो. म्हणुन गोमंतकीय हिंदू पोर्तुगीज शिक्षणाकडे वळले. या शतकाच्या सुरवातीला गोमंतकातील उच्च शिक्षणाची शाळा 'लिसेव', यात शिक्षण घेणार्‍या हिंदुंची संख्या २०-२५ च्या आत होती व हा कोर्स पुरा केलेले विद्यार्थी तुरळकच. वकील, डॉक्टर ह्यांची संख्या १-२ पेक्षा जास्त नव्हती.

सन १९०७ मधे सरकारने प्राथमिक शिक्षणात "ख्रिश्चन डॉक्ट्रिन" हा विषय अंतर्भूत केला आणि हिंदूंना सरकारी शाळेत शिक्षक होण्यास बंदी घातली. तोपर्यंत गोव्यात सरकारी प्राथमिक शिक्षकांपैकी फार थोडे हिंदू होते. ही बंदी म्हणजे आपल्यावरील हक्कांवरचे आक्रमण याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी एकजूटीने आवाज उठविला गोमंतकीय जागृत होत असल्याची ती निशाणी होती. ही बंदी १९१० मधे पोर्तुगालात प्रजासत्ताक राज्य स्थापन होईपर्यंत चालू राहिली.

१९०८ मधे उर्वरित भारतात व गोव्यातही अनेक वैशिष्ट्यपुर्ण घटना घडल्या.

मुजफ्फराबाद येथे पहिला बाँब टाकण्यात आला, खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी जस्टिस किंग्ज्फॉर्डची गाडी समजून तीवर बाँब फेकला. पण तो त्यात नसल्याने बचावला. त्यातल्या २ गोर्‍या स्त्रिया ठार झाल्या. या बाँबफेकीची तरफदारी करुन लेख लिहिले म्हणुन लो. टिळकांना पकडुन त्यांना ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगायला मंडालेस पाठविण्यात आले.

याच वर्षी पोर्तुगालात फेब्रुवारी महिन्यात राजा दो कार्लुश, व युवराज दों फिलीप ह्यांना गोळ्या झाडुन ठार करण्यात आले. राजपुत्र दो मानुएल राजमातेमुळे थोडक्यात बचावला. व नंतर राजा बनला.

या घटनांचा परिणाम गोमंतकीय तरुणांवर झाला गोमंतकात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होऊ लागले. जिवबादादा केरकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य १३ सुद्धा साजरी केली जाऊ लागली. भारतात क्रांतीकारी संघटना निर्माण झाल्या. त्यांना ब्रिटीश सरकार पकडण्याची शर्थ करु लागले. त्यातील काही क्रांतीकारक भूमिगत होउन गोव्यात आले.. केरीचे रामचंद्र पांडुरंग वैद्य उर्फ दादा वैद्य यांनी शाळा उघडून त्यांना शिक्षक म्हणून नेमले. ही शाळा म्हणजे फोंड्यातले आजचे ए जे डी आल्मेदा हायस्कूल. २०१० मधे ह्या शाळेने आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा केला.

dada-vaidya_03.jpg

प्राणाचार्य दादा वैद्य.

एवढे सगळे होत असताना पोर्तुगीज सरकार झोपले नव्हते. भारतातील चळवळीचे लोण गोव्यात शिरु नये म्हणुन गोव्यातील कार्यकर्त्यांवर त्यांनी कडक नजर ठेवली होती. अशा पार्श्वभूमीवर १९१० साल उजाडले. ४ ओक्टोबरच्या मध्यरात्री क्रांतीकारकांनी दों मानुएल च्या राजवाड्यावर सैनीकांच्या मदतीने हल्ला केला. राजा व त्याचे कुटुंब कसेबसे निसटुन पळुन गेले. दुसर्‍या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी पोर्तुगाल प्रजासत्ताक राज्य झाल्याचे घोषित केले गेले. गोमंतकातील हिंदूंचे कैवारी म्हणुन ख्याती असलेले आंतानियु जुझे द आल्मैद मंत्रिमंडळात गेले. ते गृहमंत्री बनले.

220px-SMF_Manoel_II.jpg

दों मानुएल

गोमंतकात या घटनेचे उत्स्फुर्त स्वागत झाले. विशेषतः हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले. ४०० वर्ष राजकिय व सांस्कृतिक आक्रमणाचा प्रतिकार करीत जो छळ सोसला होता,त्याचा अंत होईल म्हणुन जनता आनंदित होती. हिंदुंन केवळ आनंदच झाला नाही तर त्यांनी आपली प्रगती करण्यासाठी कंबर कसली. या प्रयत्नांचे दृश्य स्वरुप ४ क्षेत्रांत प्रकर्षाने दिसुन आले.

१) नियतकालिके २) शैक्षणिक संस्था ३) सांस्कृतिक संस्था ४) राजकिय पक्ष

नियतकालिके

गोमंतकियांना जागृत करुन कार्यप्रवृत्त करण्यात नियतकालिकांचा सिंहाचा वाटा आहे. आत्माराम सुखटणकरांच्या देशसुधारणेच्छुने मराठी माध्यमातुन शिक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा व पोर्तुगीजांच्या राजकीय धोरणावर टीकासत्र आरंभ केले. गोवा-मित्र (संपादक- सुब्राय नायक-मडगांव), journal daa Novas Conquistaa (संपादक गोविंद भास्कर पार्सेकर- पेडणे) यासरखी मराठी-पोर्तुगीज नियतकालिके १८८० च्या सुमारास लोकजागृती करत असत. मराठीतुन हिंदुंना जागविणे व पोर्तुगीजमधुन हिंदुंच्या भावना स्थानिक ख्रिश्चन व युरोपियनांपर्यंत पोचविण्याचे काम ही नियतकालिके करत. गोवा-मित्र वर १८८३ मधे बंदी आणली. मग म्हापश्यातुन आर्यबंधु व गोवा पंच , मडगावातुन गोवात्माही नियतकालिके सुरु झाले ३-६ महिनेच टिकली. दरम्यान दादा वैद्य पथ्यबोध नावाचे आरोग्यविषयक नियतकालिक चालवत.

१८८९ पासुन अजुन भर पडतच गेली न्यायचक्षु, गोमंतक सुविचार्, अशी मराठी तर A voz do Povo (जनतेचा आवाज), Mandovy (मांडवी) सारखी पोर्तुगीज नियतकालिके सुरु झाली.१८९४ मधे अतिशय जहाल असे साप्ताहिक पणजी शहरात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे नाव O Brado Indiano. म्हणजे भारतियांनी मारलेली दु:खाची आरोळी.हे साप्ताहिक पोर्तुगीजांवर जहाल टीका करत असे. या साप्ताहिकाचे संस्थापक व प्रेरणाशक्ती फादर आल्व्हरिश होते. पाद्री आल्वारिश यांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती पुरी भिनली होती. स्वदेशीचा पुरस्कार करण्याची संकल्पना लाल-बाल-पाल त्रिमुर्तींनी देण्याआधी दहा वर्षे त्यांनी सुरु केली होती. ह्या साप्ताहिकाला केवळ १० महिन्याचे आयुष्य लाभले परंतु तेवढ्यात परक्या फिरंग्यांबदल जनतेच्या मनात क्षोभ निर्माण करण्यात ब्रादु इन्दियानु यशस्वी ठरला.

१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले. हे गोमंतकातील पहिले दैनिक त्याच्या संपादक मंडळात त्यावेळचे विचारवंत, तेजस्वी तरुण मंडळी होती. आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतुन वर काढण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. लोकजागृतीचे व समाजप्रभोधनाचे कार्य या दैनिकातुन मोठ्या तडफेने होऊ लागले. या तरुणांच्या धडपडीकडे सरकारचे लक्ष गेले नसते तरच नवल . येराल्डो हे संपादक डॉ. आंतानियु कुन्य(कुन्हा) यांना अटक झाली. व आग्वादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले.

सांस्कृतिक पुनरज्जीवनाच्या काळात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. हळदकुंकु व सौभाग्यसंभार नावाची मासिके बायका चालवत. याच्या संपादिका होत्या सौ. सरुबाई रामचंद्र वैद्य. (दादा वैद्यांच्या पत्नी)

शैक्षणिक संस्था

गोमंतकीयांमधे राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या, जोपासण्याच्या व वृद्धिंगत करण्याच्या कामात मराठी शाळांचा व शाळामास्तरांचा सिंहाचा वाटा आहे. गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले.पण हिंदुंनी जशी आपली दैवते जपुन ठेविली, तशी मराठी भाषा व संस्कृती जीवापाड जतन केली. देवळांच्या अग्रशाळांमधे व धनिकांच्या घरात पंतोजी मराठीचे वर्ग चालवित असत. शिक्षणाची संधी सार्वत्रिक नव्हती. औव्यवस्थित अभ्यासक्रम असलेली पहिली मराठी शाळा म्हापसा शहरात १८८५ साली रामचंद्र दत्ताजी आजरेकर यांनी स्थापन केली. आजुबाजुच्या गावांमधेही २०-२५ शाळा त्यांनी सुरु केल्या.

पणजीत त्याच सुमारास एक शाळा सुरु होती. तिला धेप्यांची शाळा म्हटले जाई कारण त्या शाळेचा खर्च श्रीमंत धेंपे करीत शाळेला संस्थेचे रुप देऊन तिचे नामकरण करण्याची प्रथा १९०५ नंतर सुरु झाली.५ ऑक्टोबर १९०८ रोजी पणजीत मुष्टीफंड संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक खांकेला झोळी लावुन दारोदार फिरत. प्रत्येक घरातुन मूठ-दोन मूठी तांदुळ त्यांच्या झोळीत पडे . या तांदळांच्या विक्रीतुन येणार्‍या पैशाने श्री महालक्ष्मी विद्यालय व सरस्वती विद्यालय या दोन मराठी शाळा संस्थेने सुरु केल्या. २००८ साली ह्या शाळेचा शतकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चर्चच्या आवारात पाद्रीही शाळा चालवत. को़कणी भाषेत, ज्या भाषेत गोव्याचे दैनंदिन व्यवहार चालत त्या भाषेत. फक्त त्यांनी कोकणीला रोमन भाषेचा साज चढविला.
musstifundold.gif

मुष्टीफंड संस्थेची जुनी इमारत.
mustifundnew.gif

मुष्टीफंड संस्थेची आत्ताची इमारत.

गोमंतकात मराठी पुनर्जीवित करण्यात जनतेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद व अभिमानास्पद आहेत. त्यांनी स्थापलेल्या विद्यालयांना अनुदान मिळत नसे.फीचे उत्पन्न तुटपुंजे असे. मासिक तीन आणे किंवा चार आणे. त्यातही गरिबांना सूट. केवळ देणग्यांवर त्या शाळा चालत. शिक्षकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारी गावातील सुखवस्तु लोक पत्करीत.पण शाळेच्या इमारतीसाठी, शैक्षणिक उपकरणांसाठी पैसा लागेच. तो भिक्षां देहि करुन मिळवायचा.

मुलींच्या शिक्षणासाठी मडगावला महिला व नुतन विद्यालय, आदर्श वनिता विद्यालय, कन्याशाळा पणजी इत्यादी शाळा स्थापल्या गेल्या.

सांस्कृतिक संस्थांचे कार्य

पुनरुज्जीवनाच्या काळात शैक्षणिक संस्थांसोबतच चर्चामंदिरे व वाचनमंदिरेही उघडण्यात आली.१९०० च्या सुमारास गोवा हिंदु पुस्तकालय पणजी, रामनाथ दामोदर वाचन मंदिर मडगाव, सरस्वती वाचनमंदिर पणजी, शारदा वाचनमंदिर कुंभारजुवे. अशी पेडणेपासुन काणकोणपर्यंतच्या गावागावात वाचनमंदिरे सुरु केली गेली. अनेक राष्ट्रीय नियतकालिके तिथे वाचण्यास मिळत व राष्ट्रीय विचारांचा प्रसार तेथुन होत असे.

१९१० मधे लोकशाही प्रस्थापित झाल्याने हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य मिळाले देवालयांत जाहिररीत्या भजने, कीर्तने होऊ लागली. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकारांना आग्रहाने आमंत्रण करुन काणण्यात येऊ लागले. ही कीर्तने धार्मिक स्वरुपासोबत राष्ट्रीय स्वरूपाचीदेखील होती. ज्यांना लिहितावाचता येत नव्हते अश्या लोकांना ही कीर्तने राष्ट्रीय धारेस जोडीत.

गोमंतकीयांचे नाट्यप्रेमही हिंदुंची राष्ट्रभक्ती उद्दीपीत करण्यात उपयोगी पडले. ज्या गावात वर्षातुन किमान ३-४ नाटके होत नाही असे गाव गोव्यात विरळच. गोमंतकात दर वर्षी सुमारे दोन हजार मराठी नाटकांचे प्रयोग होतात. पुर्वीही होत असत. पुर्वी ती ऐतिहासिक व पौराणिक असत. त्या नाटकांनी तरुणांचे देशप्रेम बळकट केले.त्यांचे मानसिक दौर्बल्य नष्ट करुन त्यंना धीरोदात्त बनविले.

हुकुमशहाचा उदय

पोर्तुगालातील पर्यायाने गोवा, दमण दीव मधली लोकशाही सन १९१० ते सन १९२६ अशी सोळा वर्षे टिकली. या १६ वर्षात स्थिर सरकार नव्हते. आर्थिक स्थिती खालावत होती. मंत्रीमंडळे गडगडत होती. दि. ९-६-१९२६ रोजी पार्लमेंट बरखास्त करण्यात आले. जनरल कार्मोना ह्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. व ऑलीव्हैर सालाझार पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. सैन्यावर हुकुमत गाजवण्यासाठी सेनाधिपती नेमला गेला पण खरे सर्वाधिकारी डॉ. सालाझार होते. कट्टर धर्मनिष्ठ, साधी राहणी,दुसर्‍यावर छाप पाडणारे व्यक्तीमत्व, उत्तम वक्तृत्व ,वाक्पटुता, कावेबाजपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. युरोपातील इतर हुकुमशहाप्रमाणेच त्यांची एकपक्षीय हुकुमशाही होती. पण इतर हुकुमशहांप्रमाणे त्यांनी आपल्या विरोधकांचे शिरकाण केले नाही. पोर्तुगीज कायद्यात देहांताची शिक्षा नाही. देहांत शिक्षेचा कायदा करुन वा इतर मार्गाने विरोधकांस ठार केल्यास आपले राजकारण जागतिक चर्चेचा विषय बनेल ह्याची त्यांना जाणीव होती.विरोधकांना नेस्तनाबुत करण्याचे त्यांचे तंत्र वेगळॅ होते. विरोधकांना राष्ट्रविघातक ठरवुन न्यायालयातर्फे त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. अश्या या विरोधकांना पश्चिम आफ्रिकेतील व आसोरीशमधील तुरुंगात जन्मभर खितपत टाकले होते.
220px-Antonio_Salazar-1.jpg

सालाझार

गोवा कोंग्रेस कमीटी

सन १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य (कुन्हा) [टी. बी. कुन्हा] या गोमंतकाच्या सुपुत्राने 'गोवा कोंग्रेस कमिटी' स्थापन केली. व ती भारतीय काँग्रेसला जोडली. भारतातील पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करुन गोचा, दमण ,दीव या प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या कमिटीचे उद्दिष्ट होते. म. गांधींच्या आदेशाप्रमाणे वागून राष्ट्रीय काँग्रेस मार्फतच स्वातंत्र्य मिळेल ही टी. बी. कुन्हांची धारणा होती. ही कमिटी गोव्यात गुप्तपणे काम करु लागली.
tbcunha.jpg

डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा

१९३५ च्या अधिवेशनात काँग्रेसने ठरविले की आपले कार्यक्षेत्र ब्रिटीश हिंदुस्थानापुरतेच मर्यादित ठेवावे. म्हणुन गोवा काँग्रेस बंद करण्यात आली. याच सुमारास पोर्तुगीजांनाही या संघटनेची माहिती मिळाली. व त्यांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र आरंभले.

गोवा काँग्रेस बंद पडली म्हणुन कुन्हा डगमगले नाहीत. ते मुंबईला गेले व तिथुन आपले कार्य सुरुच ठेवले.

क्रमशः
**
विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (ज्योति_कामत, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९०० मध O Heraldo नामक पोर्तुगिज दैनिक पणजीत निघु लागले
होय. पुढे गोवा-मुक्तीनंतर येणारी पिढी पोर्तुगीज भाषा जाणणारी नव्हती. साहजिकच पोर्तुगीज दैनिक बंद पडून त्याच नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले.

आणि आता तर दोनेक महिन्यांपूर्वी त्यांचेच एक मराठी दैनिक दैनिक-हेराल्ड या नावाने सुरू झाले आहे!

गोमंतकातील मराठी नष्ट करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज सरकारने केले
हे तितकेसे खरे नाही. पोर्तुगीज राजवटीचा खरा फटका कोंकणीलाच बसला. पोथ्या-कीर्तनातून का होईना पण मराठी राहिली. कोंकणी मात्र लिप्यंतरामुळे दुभागली गेली, ती कायमचीच!

@सुनील

>>होय. पुढे गोवा-मुक्तीनंतर येणारी पिढी पोर्तुगीज भाषा जाणणारी नव्हती. साहजिकच पोर्तुगीज दैनिक बंद पडून त्याच नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले.

>>आणि आता तर दोनेक महिन्यांपूर्वी त्यांचेच एक मराठी दैनिक दैनिक-हेराल्ड या नावाने सुरू झाले आहे!

+११११

>>हे तितकेसे खरे नाही. पोर्तुगीज राजवटीचा खरा फटका कोंकणीलाच बसला. पोथ्या-कीर्तनातून का होईना पण मराठी राहिली. कोंकणी मात्र लिप्यंतरामुळे दुभागली गेली, ती कायमचीच

कोकणी बोली भाषा होतीच अन आहेच की!!!! त्यामुळे घरा-घरात बोलली जाणारी, दैनंदिन व्यवहाराची भाषा नष्ट करणे अशक्यप्रायच होते. हां, आता रोमन लिपी च्या आगमनामुळे जनतेची एकी दुभागण्यात त्यांना यश आले असे म्हणता येईल.मराठी मात्र तुम्ही म्हणता तसे पोथ्या, कीर्तने, नियतकालिके , शाळामास्तर यांच्यामुळे थोडाफार तग धरु शकली.

१९३५ पर्यंतचा हा इतिहास फारसा किंबहुना मुळीच माहीत नव्हता.. हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचाच लढा माहीत आहे.. त्यामुळे पुढील भागांची उत्कंठेने वाट पाहत आहे..

रोहन, चितळेसाहेब, सुनील आणि सतीश, आवर्जून प्रतिक्रियांसाठी धन्यवाद! गोव्याचा इतिहास फार उपलब्ध नसल्यामुळे शक्य तेवढा शोधून संकलित करायचा प्रयत्न केला आहे. ही मालिका काही कारणाने थांबली होती, पण आता यापुढचे भाग दर आठवड्याला एकेक करून नक्कीच देऊ! Happy

पोर्तूगेजानि गोव्यात उच्च शिक्शणासाठि जास्त काहि केलेल नाही. कारकुनाच्या गरजा भागवण्यासाठि फक्त लिसावो च्या शाळा चालवल्या. पण गोवा वेय्द्यकिय महाविद्यालय (Goa Mediacal Collage) हे आशिया खन्डातिल सर्वात जुने Medical School आहे.

graceful माहितीसाठी आणि प्रतिसादासाठी धन्यवाद! म्हणजे इंग्रजांनी जसे कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली तसाच प्रकार पोर्तुगीजांनी केला.

हो दिनेशदा, सॉरी! काही ना काही कारणाने मालिका मागे राहिली! पण आता लेख आधी तयार केलेत. आणि पुढे दर आठवड्याला नक्की देऊ!

मस्तच! .. खूप छान माहिती आहे या मालिकेत!! पुढे सरकल्याबद्दल आभार व अभिनंदन.. आता खंड नको, मालिकेचे खंड येऊदेत... Happy

सहीच