सूड (संपूर्ण)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.

पाचेक मिनिटानी त्यांनी टीव्ही बंद केला. सुधीररावांच्या बडबडण्याचा आवाज आता येत नव्हता. बहुतेक बोलून बोलून दमले असावेत. सुमतीबाईंनी डोळ्यात आलेले पाणी पदराने पुसले आणि उठून किचनमधे गेल्या. किचनमधल्या कपाटांमधे खाण्यासारखं कीही नव्हतं. मागच्या आठवड्यात दुबईवरून त्यांचा मुलगा श्रीधर आला होता तेव्हा सगळी कपाटं, डबे रिकामे करून गेला. चक्क नेऊन सगळं बाहेर रोहिणीला देऊन टाकलं. आपल्या आईने जास्त खाऊ नये ही त्यामागची काळजी की आईला जास्तीत जास्त त्रास कसा व्हावा म्हणून केलेले प्रयत्न? सुमतीबाईना पुन्हा एकदा भरून आलं. डॉक्टरांचं काय? ते सांगायचं तसं सांगतात, या वयात आहाराची काळजी घ्या म्हणून. पण त्यासाठी जराही खायला नको? अधेमधे तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवंच. आजच संध्याकाळी बेकरीमधे जाऊन थोडाफार खाऊ घेऊन येऊ या असं त्यांनी मनाशी ठरवलं. फ्रीझ उघडून बघितला तर त्यामधे चीज स्लाईसेस होते. त्यातले दोन स्लाईसेस त्यानी गबागबा खाल्ले. मग पेलाभर पाणी प्यायल्या. आता त्यांना जरा बरं वाटलं.. घड्याळात बघितलं सकाळचे आठच वाजत होते. अजून आजचा अख्खा दिवस जायचा होता.

सुमतीबाईंनी फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि समोरच्या फ्लॅटची बेल वाजवली.

बेलचा आवाज झाल्याबरोबर आतमधून एका अडीच वर्षाच्या आवाजाने "आन्नी आन्नी आन्नी"चा गजर चालू केला. चला, कुणालातरी आपली आठवण आहे म्हणायचं, त्या आवाजानेच त्यांचा सकाळपासून खराब झालेला मूड सुधारल्यासारखं वाटलं. सायलीने दरवाजा उघडला, त्याबरोबर तिची छोटी लेक राही धावत आली.

"या" सायली म्हणाली.

"आवरलं का सर्व" सुमतीबाई आत येऊन रोजच्या सवयीप्रमाणे खुर्चीवर बसत म्हणाल्या. राही लगेच उडी मारून त्यांच्या मांडीवर चढून बसली.

"कुठे काय? अजून आवरतंच आहे. ही महामाया लवकर आटपेल तर ना." सायलीने मोर्चा राहीकडे वळवला. "हे बघ. आंटी आल्या आहेत ना. चल आता वरणभात संपव पटकन." सायली एकीकडे राहीचं दप्तर भरत होती आणि दुसरीकडे तिला भरवत होती.

सुमतीबाईंनी तिथेच टेबलावर ठेवलेला वरणभात घेतला आणि तिला भरवायला सुरूवात केली. एक घास खाल्ला आणि लगेच इकडे तिकडे पळायला सुरूवात. या लहान मुलांना इतकी एनर्जी तरी कुठून येते कुणास ठाऊक? आपण जरा जिने चढलो की दमतो असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.

"काल काय शिकवलं मग शाळेत?" सुमतीबाईंनी राहीला विचारले.

राही तिच्या बोबड्या भाषेत कुठलंतरी नर्सरी र्‍हाईम म्हणायला लागली. सोबत छान हातवारे.

"ब्रेकफास्ट झाला?" सायलीने विचारलं. कुणी बघत असू दे अथवा नसू दे, राहीचं करमणूक स्टेशन चालूच राहिलं.

"हो. अगं आज घारगे केले होते. तुला द्यायचेच राहिले. थांब राहीला शाळेत सोडून आलं की तुला आणून देते. "

"अहो, राहू देत हो आंटी. तुमच्या आधीच्याच कितीतरी प्लेट्स आहेत माझ्याकडे. मी काही खास करत नाही आणि तुम्हाला कधीच काही देत नाही. तसंही मला तुमच्याइतके प्रकार कुठे करता येतात?"

"का ग? तुझ्यासारखे केक आणि ते पास्ताफिस्ता कुठलं जमतय आम्हाला"

सायली हसली. सुमतीबाईनी राहीला पुन्हा एकदा घास भरवला.

"रेसिपी वाचून वाचून करते. तुमच्याइतकी एक्स्पर्ट नाही कशातच."

"सवयीचा प्रश्न असतो गं. माझ्या वयाची होशील तेव्हा तू पण एक्स्पर्टच होशील."

सायली परत हसली. आपल्याला पण एखादी मुलगी असती तर किती बरं झालं असतं. मनातलं काहीबाही लेकीला सांगता येतं. एकुलत्या एका लेकाला काही सांगायला गेलं की त्याची "तुला काही कमी आहे का?" इथेच सुरूवार. कधी कधी काही कमी आहे म्हणून नाही तर जास्त आहे म्हणून पण मनाला त्रास होत असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही, त्याला कोण काय करणार?

सायलीने सुधीररावांचा आवाज ऐकलाच असेल. त्यांचा चिडलेला आवाज म्हणजे अख्ख्या बिल्डिंगला ऐकू जाणारा. पण सायलीने एका शब्दाने कधी त्यांना विचारलं नव्हतं.. बिल्डिंगमधे इथे रहायला आली तेव्हाच सुधीरराव आपले शेजारी आहेत हे ऐकून तिला किती आनंद झाला होता. तशी सुधीररावांची पुस्तकं तिने वाचली होती अशातला पण भाग नाही.

"माझं वाचन थोडं कमीच आहे. पण आम्हाला शाळेत सुधीररावांचा एक धडा होता. मराठीच्या पुस्तकात" तिने आल्याआल्या दुसर्‍या दिवशी सुमतीबाईंना ऐकवून टाकलं होतं. सायलीच्या नवर्‍याचं साहिलचं वाचन मात्र अफाट होतं. सुधीररावांची कितीतरी पुस्तकं त्यानं वाचली होती, पण इथे रहायला आल्यावर सुधीररावांना भेटायची वगैरे काही तसदी घेतली नव्हती. एकदोनदा सहज पार्किंग लॉटमधे वगैरे दिसल्यावर मान हलवून हॅलो म्हटलं असेल तेव्हढंच. सुमतीबाईंना मनोमन वाटायचं की कदाचित, पुस्तकांमधून दिसणारा सुधीर रावांचा खोटा चेहरा साहिलने ओळखला असावा.

सुधीर राव फार मोठे लेखक होते. कित्येक पुरस्कार मानसन्मान त्यांनी मिळवलेले होते. काही पुस्तकांच्या निमित्ताने देशापरदेशात फिरून आलेले होते. पण सुमतीबाई मात्र याच गावात आणि याच फ्लॅटमधे कायम. कित्येकदा सपत्निक आमंत्रण असूनदेखील सुधीरराव तिला कुठे नेत नसत. "मला तुला कुठे न्यायची लाज वाटते" हे त्यांनी कित्येकदा बोलून दाखवलं होतं. त्यामागे नक्की कारण काय असावं हे सुमतीबाईंना कधीच समजलं नव्हतं. लग्न झालं तेव्हा त्या अगदी बारीक सडपातळ होत्या, नंतर काही वर्षांनी वजन वाढलं तसं सुधीर रावांनी "ही असली जाडी बायको घेऊन लोकांमधे वावरायला शरम वाटते" हे तुणतुणं चालू केलं. सुमतीबाई किचनमधे येऊन भराभरा तोंडात काहीतरी कोंबून अपमान गिळून टाकायच्या, वजन वाढतंच राहिलं. त्याचबरोबर अपमानाचे डोसदेखील.

राहीचं सर्व आवरून सायली आणि सुमतीबाई बाहेर पडल्या. तिला प्लेस्कूलमधे सोडून दोघींनी रोजच्या क्रमाने भाजीखरेदी केली. घरी परत येत असताना सुमतीबाईंचा खाऊ आणायची आठवण आली.

"संध्याकाळी आज टेकडीवर नको गं जाऊस, जरा त्या शिवम बेकरीमधे जाऊ या" जिना चढताना त्यांनी सायलीला सांगितलं. अवघे दोन जिने चढताना पण त्यांना दम लागायचा. सायली मात्र त्यांची आणि स्वतःची भाजीची पिशवी घेऊन चटचट चढून जायची. शिवाय रोज संध्याकाळी साहिल घरी आला की बिल्डिन्गजवळच्या टेकडीवर वॉकसाठी म्हणून ट्रॅक सूट घालून, शूज घालून एकटी जायची. राहीला खुशाल साहिलसोबत सोडून. मला मेलं इतकं स्वतःसाठी कधी काही करताच आलं नाही... सतत नवरा आणि मुलगा यांच्याच व्यापात राहिले, पुन्हा एकदा सुमती बाईंच्या मनामधे कडवट विचार येऊन गेला. "कशाला नसती नाटकं वजन कमी करायची? त्यापेक्षा खाणं कमी करा, चार माणसांचं जेवण तुला एकटीला लागतं" असं सुधीर रावांनी ऐकवल्यावर मग कशाला उत्साह राहतोय चालण्याचा?

फ्लॅटचा दरवाजा उघडून आत आल्याची चाहूल सुधीररावांना लागली असावी पण त्यांचा काही आवाज आला नाही. सुमतीबाईंनी ते जागे आहेत का हे बेडरूमच्या दारापर्यंत जाऊन बघितलं, ते बेडवरती शांत बसून होते... पण आत्ता सुधीरराव काहीच बोलले नाहीत.. सुमतीबाईंकडे पाहून त्यांनी न पाहिल्यासारखं केलं. सकाळच्या एवढ्या तमाशानंतर आता काय बोलायला शिल्लक राहिलं असेल- असं मनातच म्हणत सुमतीबाईंनी आणलेली सगळी भाजी निवडून फ्रीझमधे ठेवली. त्यातला पालक अगदी ताजा आणि कोवळा होता म्हणून निवडायला बाजूला ठेवला. भाताचा कूकर लावला. काल मळून ठेवलेली कणिक बाहेर काढून ठेवली.

सुमतीबाई बेडरूममच्या दाराशी जाऊन पुन्हा उभ्या राहिल्या. सुधीरराव टीव्हीचे चॅनल बदलत राहिले.
"चहा घेणार का?" त्यांनी हळू आवाजात विचारलं होतं.

सुमारे तीन तासापूर्वी त्यांनी हाच प्रश्न विचारला तेव्हा सुधीरराव उसळून म्हणाले होते. "चहा कशाला? विष घेऊन ये थोडं. ते पितो आणि उलथतो एकदाचा" त्यानंतरची त्यांनी बडबड अखंड चालू होती. सुधीर रावांची बडबड चालू होण्यासाठी आपण काही चूक केलेली असायलाच हवी असं नाही हे सुमतीबाईंच्या केव्हाच लक्षात आलं होतं, अगदी लग्नानंतर दहापंधरा दिवसांतच.

आता मात्र शांतपणे "दे" इतकंच म्हणाले.

गेल्या वर्षी जीपमधे बसताना ड्रायव्हरने अचानक जीप चालू केल्याने सुधीर रावंचा अपघात झालेल होता. तेव्हापासून दोनदा त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं होतं. पण या सर्जरीनंतर सुधीर राव आधीसारखे चालू फिरू शकत नव्हते. घरातल्या घरातच वॉकर घेऊन चालणं जमत होतं. पण हा अपघात झाल्यापासून सुमतीबाईंची साडेसाती मात्र चालू झाली होती. सुधीर रावांचं सगळं चिडणं, ओरडणं आता चोवीस तास घरी बसूनच. कारण, एरवी सुधीर राव दिवसभर घराबाहेर जात, कधी बाहेरगावी दौर्‍यावर जात पण या आजारपणामुळे त्यांचं बाहेर जाणंच थांबलं होतं. दुबईला असणारा श्रीधर आणि त्याची बायको एक दोनदा येऊन गेले होते. पण त्यांच्या येण्या अथवा जाण्याने सुमतीबाईंना फारसा फरक कधीच पडायचा नाही.

सुमतीबाई किचनमधे आल्या. चहाचं पातेलं गॅसवर चढवलं होतं. तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली. वैजू आली असणार. आल्या आल्या लगेच तिच्या तोंडाचा पट्टा चालूच झाला. वैजू आली की सगळ्या बिल्डिंगच्या बातम्या घेऊन येणार. बिल्डिंगच्या खालीच असलेल्या छोट्याशा खोलीत वैजू आणि तिची आई रोहिणी रहायच्या. बिल्डिंगमधल्या बारा फ्लॅटपैकी दहा फ्लॅटमधे दोघी घरकाम करायच्या. रोहिणी आली की गुपचुप काम करून निघून जायची. तोंडातून एक अक्षरदेखील न काढता. वैजू मात्र जणू रेडीओ. अख्ख्या बिल्डिंगची माहिती तिच्याकडे असायची. सुमतीबाई पण टाईमपास म्हणून तिच्याकडून गॉसिप ऐकून घ्यायच्या.

वैजूने झाडू मारायला घेतलं आणि सुमतीबाईंनी तिला घासायची भांडी बाजूला काढून ठेवली. चहाच्या आधणात अजून थोडं पाणी घालून वाढवलं.

"काकी, तुम्हाला माहिताय समोरचे आहेत ना, ते रोज सकाळी चहा करतात" सुमतीबाईंना हसूच आलं. वैजूचा हा सगळ्यात कुतूहलाचा विषय होता. वैजू जवळजवळ पस्तीशीला आली होती. लग्नानंतर तीन की चार दिवसांत नवर्‍याचा खून झाला, तेव्हापासून ही बिल्डिंगच तिचं घर झालं होतं.

पण वैजूला सायलीच्या घराचं कसलंतरी जबरदस्त आकर्षण होतं, कदाचित थोडाफार हेवादेखील वाटत असेल. सायलीचा नवरा मराठी नव्हता, उत्तरप्रदेशकडचा होता. पण चांगलं मराठी बोलायचा, सायली त्याला नावाने हाक मारते, तो घरामधे सगळी कामं करतो. स्वयंपाक करतो. सकाळी उठून चहा करतो, सायली लेकीला त्याच्याकडे ठेवून स्वत: बिनधास्त फिरायला जाते, अशा अनेक गोष्टींचं वैजूला आश्चर्य वाटायचं आणि हे सगळं ती मनमोकळेपणाने सुमतीबाईंना ऐकवत असायची. तिने तर कुठल्याच संसाराचा अनुभव घेतला नाही, म्हणून तिला हेवा वाटत असेल. पण आपलं काय? कळत नकळत का होईना, आपण पण मनातल्या मनात कधीतरी सायलीची आणि आपल्या संसाराची तुलना करतोच की. सुखाचा संसार, प्रेमाचा संसार कसा असतो याचं जणू ते जोडपं आदर्श रूप होतं. आपल्या संसारासारखं नाही, एकाने सांगायचं आणि दुसर्‍याने कायमच ऐकायचं... त्यांच्यात पण कुरबुरी होत असतील, भांडणं होत असतील पण तरी किमान बायकोच्या मताला काहीतरी किंमत द्यायचा मोठेपणा तरी त्या साहिलजवळ आहे. सुमतीबाई स्वतःशीच हसल्या, कारण मनातच त्यांनी साहिल बायकोचं ऐकू शकतो याला "मोठेपणा" बहाल केला होता.

वैजूची बडबड ऐकत सुमतीबाई सोफ्यावर बसून राहिल्या. बोलण्याइतकाच वैजूचा हात कामामधे पण चालत होता. तिचं झाडून झाल्यावर सुमतीबाईंनी तिला कपभर चहा दिला. सुधीरराव टीव्ही बघत बसले होते, सुमतीबाई ट्रेमधे चहाचा कप घेऊन त्यांच्या रूममधे गेल्या. सुमतीबाईंनी चहा त्यांच्या हातात देण्याआधीच सुधीरराव करवादले.

"आताच फोन आला होता, आज दुपारी ते भावे येणार आहेत. तेव्हा खायला काहीतरी ताजं बनव. मागच्या वेळेसारखं ट्रेमधे बिस्कीटं आणून ठेवून लोकाच्या घरात जाऊन बसू नकोस." आता सुधीररावांनी परत नेहमीचा आवाज चढवला होता. सुमतीबाई वैजूला किंवा रोहिणीला काम सांगताना याहून अधिक मवाळपणे सांगायच्या. त्या महिन्याच्या रोजंदारीवर काम करायच्या, आपल्यासारखं मंगळसूत्राच्या मजूरदारीवर नव्हे, आता हे भावे नक्कीच पुस्तकांच्या कामासाठी येणार असतील. मागच्यावेळेला पंधरावीस दिवसांपूर्वी आले होते तेव्हा सुधीररावांची आणि त्यांची काहीतरी वादावादी झाली होती. सुमतीबाई नेमक्या सायलीकडे जाऊन बसल्या होत्या, अचानक एकाएकी सुधीर रावांचा चढलेला आवाज ऐकू आला आणि भावे ताडताड घराबाहेर निघून गेले होते. नंतर सुधीर रावांना एक दोनदा त्यानी विचारलं या भांडणाबद्दल, तर सुधीररावांनी काहीही उत्तर दिलं नव्हतं. नक्की काय घडलं असावं यांचा त्यांना थोडातरी अंदाज आला होता... भाव्यांनी मागे एकदा सुमतीबाईंनाच विचारलं होतं. "तुम्ही सुधीररावांवर एखादं पुस्तक लिहाल का म्हणून... सध्या अशा पुस्तकांना फार मागणी आहे..." सुधीररावांनी सुमतीबाईंना बोलायचादेखील चान्स न देता परस्पर "तिला वाचनाची आवडसुद्धा नाही.. लिखाण काय करणारे ती?"

त्या क्षणाला सुमतीबाईंना जो अपमान वाटलेला, तितक्या तोडीचा अपमान सुधीर रावांनी गेल्या कित्येक वर्षात केला नव्हता. त्या अपमानाने सुमतीबाईंच्या मनामधली जानकी जिवंत झाली. त्या एका वाक्याने सुमतीबाईंच्या मनामधे आठवणींच्या अनेक धाग्यांचा गुंता सुटून एक एक प्रसंग डोळ्यासमोर यायला लागला. कॉलेजमधे खूप हुशार म्हणून एमए पर्यंत शिकायचंच ही जिद्द ठेवलेली जानकी. त्यानंतर वर्गातल्याच सुधीर नावाच्या शांत, हुशार आणि मितभाषी मुलाशी ओळख झाली. खूपशा आवडीनिवडी सारख्या. दोघांनाही वाचनाची आवड, लिखाणाची आवड, जानकीच्या एक दोन कविता तेव्हा मसिकातून छापून आल्या होत्या. सुधीरचं बहुतेक लक्ष कथाकादंबरीकडे असायचं. जानकी बोलता बोलता बर्‍याचदा त्याला कथेमधे सुधारणा सुचवायची. सुधीर तेव्हा तिला "इतकं छान सुचतं तुला, तू पण लिहीत जा की" म्हणायचा. जानकी तेव्हा नुसती हसायची. तिचा खरा ओढा कवितेकडेच होता. तिला कवयित्री व्हायचं होतं. दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात वगैरे व्हायच्या आधीच घरच्यांना यांच्याबद्दल समजलं. त्याचदरम्यान सुधीरला बँकेमधे नोकरीदेखील लागली होतीच. जातपात, शिक्षण, रंगरूप या कशावरूनही काहीही अंतर येत नसल्याने दोघांच्या घरच्यांनी लग्नाचं ठरवून टाकलं. जानकीने त्यावेळेला शिक्षणापेक्षा लग्न महत्त्वाचं मानलं. नाहीतरी आजनाउद्या लग्न करायचंच होतं की. कुणातरी अनोळखी माणसासोबत संसार करण्यापेक्षा मित्रासारखा असलेला सुधीर चांगला असा तेव्हा तिने विचार केला.

त्या वेळेला सुमतीला यामधे चूक काही वाटलंच नाही. सुधीरवर तिचं प्रेम होतं का? तिलाही माहित नव्हतं. सुधीरचं तिच्यावर प्रेम होतं का? त्यालाही माहित नव्हतं. पण आपल्या आवडीनिवडी इतक्या सारख्या आहेत तर दोघांचंही आयुष्य खूप सुखाचंच जाईल असं तिला वाटलं होतं हे मात्र निश्चित. पण ज्या दिवशी तांदळाच्या दाण्यांमधे जानकी पुसून गेली, आणि सुमती सुधीर राव जन्माला आली तेव्हाच तिचं स्वतःसाठी जगणं संपून गेलं होतं. सुमतीबाईंचा संसार सुखाचा झाला हे मात्र खरं. पण त्यातलं किती सुख त्यांच्या वाट्याला आलं याचा हिशोब फक्त त्यांनाच माहिती होता.

लग्नानंतर हळूहळू सुधीर रावांचे कथासंग्रह, कादंबर्‍या गाजू लागल्या. 'स्त्रियांचं दु:ख आणि वेदना नेमकेपणाने शब्दांत मांडणारे लेखक' अशी त्यांची ओळख बनत गेली आणि घरामधे सुमती एक गृहकृत्यदक्ष गृहिणी बनत गेली. श्रीधरचा जन्म झाला, घराण्याला वंशज मिळाला आणि तिच्या आयुष्याचं कृतकृत्य झालं. अर्थात लग्नानंतर तिनेदेखील अधूनमधून कविता केल्या, पण त्या प्रसिद्धीला पाठवायच्या आधीच सुधीररावांकडून "काहीही लिहितेस तू, हे असलं भिकारडं कुणी वाचणार आहे का?" ही टिप्पणी ऐकून फाडून फेकल्या. त्यानंतरच्या कित्येक कविता मनातच विरत गेल्या, नंतर नंतर कागदपेनाचा उपयोग वाण-सामानाच्या याद्या लिहिण्यापुरताच राहून गेला.

नक्की कशानं झालं आपलं आयुष्य असं? सुमतीबाई विचार करत होत्या. काय चुकत गेलं? जगाच्या दृष्टीने आपण कायम "नवर्‍याची खंबीर साथ देणारी, घरसंसार व्यवस्थित टुकीने करणारी" राहिलो. पण मनाच्या दृष्टीने? मनाच्या दृष्टीने आपण कायम पराभूत राहिलो. आश्रीत राहिलो. स्वतःला विसरून दुसर्‍याच कुणाच्या तरी सावलीमधे बांडगूळ बनून जगत राहिलो. असं जगताना इकडे तिकडे थोडासा विरंगुळा शोधायचा. त्या विरंगुळ्यालाच जगण्याचं कारण मानत जगायचं. अख्खं आयुष्य सरून गेलं आता काय... विचार करायचा? कशाचा विचार करायचा आणि किती विचार करायचा?

कधीकाळी वाचनाची-लिखाणाची आवड होती, नंतर नंतर फक्त वाचनाची आवड राहिली, आणि गेल्या वीस वर्षामधे तर तीपण आवड राहिली नाही.. सुधीर रावांचं म्हणणं काही चूक नव्हतं. सुमती बाई हल्ली काही वाचतच नव्हत्या, पण ही आवड नक्की कशामुळे राहिली नव्हती हे सुधीर रावांना माहित नव्हतं अशातला भाग नाही.

सतत अपमान.. अपमान.. अपमान..

दरवेळेला आयुष्यामधल्या त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेसोबत हा अपमान कायमचा होताच. अगदी लग्न झाल्यापासूनच. किंबहुना लग्नातल्या मांडवात असल्यापासूनच, तेव्हा जानकी अजून सुमती झाली नव्हती.

सुमतीबाईंना आजही तो प्रसंग आठवला की लाजिरवाणं वाटायचं. जानकीचा मात्र संताप संताप व्हायचा.
सकाळीच देवक बसवलं होतं. दुपारी मंगलाष्टका झाल्या होत्या, त्यानंतर बाकीचे विधी वगैरे चालूच होतं. जेवायला वाजले होते दुपारचे चार.

चारवाजता नवरा-नवरी आणि इतर पाहुणे जेवायला बसले तेव्हा चेष्टामस्करीला ऊत आला होता. जानकीच्या घरच्यांकडून सर्व काही रीतीभातीप्रमाणे व्यवस्थित लग्न झाल्याने सुधीरकडचे लोक पण आनंदात होते. एकूणात कुणालाच नावं ठेवायला काही जागा नव्हती. पंगत बसली आणि सर्वांनी "नाव घ्या नाव घ्या" असा आग्रह सुरू केला. जानकीने एक छानसा सुंदरसा उखाणा स्वतःच रचून ठेवला होता या प्रसंगासाठी. सुधीरने जानकीला एक जिलेबीचा तुकडा भरवला. नाव वगैरे काही घेतलं नाहीच. पण त्याला भरवायला म्हणून जानकीने जिलेबी उचलली तेव्हा सुधीरने सर्वांच्या समोर "मला कुणाचं उष्टं खाल्लेलं चालत नाही," असं सांगितलं. उपस्थितांपैकी कुणीतरी "अरे त्यात काय? ती काय उष्टं थोडीच भरवतेय. ताटातलं तर आहे तिच्या, पद्धतचे आहे ती" असं म्हटलं.

"मला आवडत नाही, दुसर्‍याच्या ताटातलं खायला" एवढं म्हणून सुधीरने सरळ त्याच्या ताटातला वरण भात कालवून जेवायला सुरूवात केली. जानकीच्या हातातली जिलेबी तशीच राहिली. आणि मनातला तो खास त्याच्यासाठी रचलेला उखाणदेखील. त्याच दिवशी संध्याकाळी जानकीची सुमती बनून गेली; आणि ही आठवण मनामधे कुठेतरी विरून गेली. अगदी मागच्या महिन्यापर्यंत सुमतीबाईंना हा प्रसंग कधीच आठवला नव्हता. एकदा असंच कधीतरी सायलीच्या घरामधे त्या अळूवड्या घेऊन गेल्या होत्या. तेव्हा तिने "साहिल, काय ऑस्सम झाल्यात बघ या वड्या" म्हणत ती खात असलेली वडी त्याला भरवली, तेव्हा सुमतीबाईंना हा मांडवातला प्रसंग लख्खपणे आठवून गेला होता.

'मला कुणाचं उष्टं खाल्लेलं चालत नाही' असं म्हणाला होता ना सुधीर तेव्हा. मग आता? आता कसं काय चालतं?

सुमतीबाई स्वतःशीच हसल्या. अगदी मनापासून आनंदाने हसल्या.

त्यांच्या हातामधे सुधीर रावांसाठी बनवलेला चहा होता. आणि मघाशी स्वयंपाकघरातून बेडरूममधे आणण्याआधी सुमतीबाई त्या चहामधे पच्चकन थुंकल्या होत्या.

समाप्त

प्रकार: 
शब्दखुणा: 

ह्या अजिबात जमली नाहीये...
केवळ एकदा चहात थूंकून काय फरक पडणार आहे...त्यांना तर असेही कळणार नाहीच्चे...
त्याउलट इथे एकच वाक्य हवे होते...
तुम्हाला उष्टे खाल्लेले आवडत नाही ना...म्हणून तुमचा चहा रोज तुम्हाला उष्टा करूनच द्यायचे....
आणि आता जर आरडाओरडा केलात किंवा आणखीन अपमान केलात तर चहात थूंकून मग देईन...प्या नाहीतर बसा तसेच...

इथे काहीतरी सूड उगवल्याचा परिणाम दिसेल. असेही त्यांच्या आयुष्यात आता अजून काही सहन करायचे बाकी राहीलेले नाही त्यामुळे अजून किती सुधीरराव आकांडतांडव करतील. मुलाला बोलावून सगळे सांगतील..पण त्याने फरक काय पडणार...त्यांच्या मनाला ही भावना आयुष्यभर जाळत राहील की आपण रोज उष्टा चहा पित होतो. काहीही न करता परफेक्ट सूड

मी वाचताना मला एकदा अपमान = एकदाच थुंकून सूड अशी वाटली नाही.
बेसिकली आयुष्यभराच्या अपमानाचा सूड आता नवरा डिसेबल होउन हातात सापडल्यावर त्या बाई अशा प्रकारे घेतायत हे लेखिका सुचवते आहे (फक्त एकदा थुंकून नव्हे तर जमेल तेव्हा असेच काहेतरी लपून छपून का होईना करून समाधान मिळवतायत . ) चहात थुंकणे हे मला तरी फक्त एक उदाहरण वाटले. बाकी वाचकांनी कल्पनाशक्ती वापरावी ना Happy

(पण क्लियरली बरेच वाचक छापील ओळींपेक्षा जास्त "वाचू" शकले नाहियेत Happy )

बेसिकली आयुष्यभराच्या अपमानाचा सूड आता नवरा डिसेबल होउन हातात सापडल्यावर त्या बाई अशा प्रकारे घेतायत हे लेखिका सुचवते आहे (फक्त एकदा थुंकून नव्हे तर जमेल तेव्हा असेच काहेतरी लपून छपून का होईना करून समाधान मिळवतायत . ) चहात थुंकणे हे मला तरी फक्त एक उदाहरण वाटले. बाकी वाचकांनी कल्पनाशक्ती वापरावी ना>>> मैत्रेयी, +१.

चहात थुंकणे ये तो सिर्फ शुरूआत है.

(पण क्लियरली बरेच वाचक छापील ओळींपेक्षा जास्त "वाचू" शकले नाहियेत स्मित )

ताई...इथे जे छापील आहे तेच वाचतायत हे काय कमी आहे का....
आणि असते काही जणांकडे कला बिट्वीन द लाईन्स वाचायची..काही जणांकडे नसते

कथा आवडली, नंदिनी.
सूड घेणारी स्त्री एक वयस्कर बाई आहे. अगदी लेखनकलेतही एकेकाळी काहीतरी करण्याची जिद्दं अन कदाचित कुवत असलेल्या ह्या स्त्रीला आयुष्याच्या सायंसमयापर्यंत फक्तं अपमान(च) मिळालाय.
सूड उगवायचा तर तो ही आपल्याला जमेल, परवडेल इतकाच... इतक्या लहान, क्षुल्लकतेपर्यंत आणून पोचवलय तिच्या अगतिकतेनं तिला. आपण सूड घेतोय हे ही त्याला कळू नये ... इतका हा आनंद छोटा ठेवलाय तिनं. थोड्या अपंग झालेल्या नवर्‍याला ताडताड बोलून, मानसिकतरी घाव घालण्याइतकीही हिची समर्थता/त्राण उरली नाही.
मला तरी सुमतीविषयी अपार कीव दाटून आली. असंही एक मानसिकतेचं दर्शन

दादच्या पुर्ण पोस्टला अनुमोदन!

पाहिलीय अशी उदाहरणं. सतत बायकोला, 'तुला काय अक्कल?' असे म्हणणारे महाभाग पाहिलेत. आमच्या माहितीतले एक काका असेच होते, शेवटी त्यांनापॅरालिसीस झाल्यावर त्यांची बायको त्यांना सांभाळायची "मात्र" , ते पण इतके की त्यांची शी-शू सगळे काढायची. पण इतकं एकवत बसवायची त्यांना एकेक गोष्ट करताना(ह्या म्हातार्‍याने कसे छळले मला वगैरे..). आम्ही भेटायला गेलो तेव्हा मला ते एकून वाटले , काय बाई आहे, नवरा इतका आजारी असताना शिव्या घालतेय.. मग कळले आईकडून त्यांची वागणूक कशी होती ती. तुझी लायकी नसताना मी लग्न कसे केले तुझ्याशी अश्या गोष्टी ते एकवत असत तिला सतत. असो.
---------------------------
आता गोष्टीबद्दल,

वरचे लिहिलेले उदाहरण माहीत असल्याने गोष्ट एकदम पटली.

नको तेवढे अपमान सहन करत, आयुष्याच्या सरतेशेवटी,आत्मविश्वास गमवलेल्या, मानसिक शक्ती संपलेल्या स्त्रीला हि छोटीशी गोष्ट नक्कीच एक अचिवमेंट वाटू शकते. तिच्यासाठी हि 'सुरुवात' असते कारण कुठेतरी मनाला पटले असते की हा माणूस आता आपल्यावर कसातरी का होइना अवलंबून आहे. व नवर्‍याचे अपंगत्व आता तिची एक बहुधा शक्ती असु शकते. त्यामुळे 'सुरुवात' हि आताच होते कसातरी प्रतिकार/धिक्कार करायची.. सरळ सरळ नाही जमला तरी आडून.

>>इतका हायजिन माणूस<<<
हायजिन असावे पण इतके की दुसर्‍यांच्या भावनांची कदर असू नये? ते हि कुठल्या प्रसंगात? आणि चावलेले तर दिलेले न्हवते ना?
असो. हे काहींना कळणे कठिणच असते.

पुर्वीच्या काळात बरेचसे(सगळेच नाही) असे संसार असावेत बहुधा.

मी वाचताना मला एकदा अपमान = एकदाच थुंकून सूड अशी वाटली नाही.
चहात थुंकणे हे मला तरी फक्त एक उदाहरण वाटले. <<<
+ १००

दादला अनुमोदन.

मला नाही आवडली कथा.

कथेतले प्रसंग चांगले रंगवलेत. पण शेवट अगदी धाडकन केल्यासारखा वाटला.
म्हणजे एखाद्या प्रसिद्ध, कुशल ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवासाला निघावं, आरामशीर वाहनातून सुंदर रस्ता कापत, वाटेत गवसणार्‍या सौंदर्यस्थळांचा आस्वाद घेत निवांतपणे प्रवास करता करता एखाद्या साधारण ठिकाणी कचकन गाडी थांबवून 'हे तुमचं इप्सित ठिकाण' असं कोरड्या स्वरात टूर गाईडने सांगावं आणि ठिकाण बघून आपला भ्रमनिरास व्हावा तसं वाटलं ही कथा वाचून.

सुमतीबाईंनी जन्मभर अपमान सोसलाय, पण त्या अपमानाचा बदला त्या इतक्या टोकाच्या कृतीने घेतील हे पटत नाही. म्हणजे त्यांचा स्वभावच तसा नाहीये.
किंवा उलट, शेवट असा करायचा हे डोक्यात ठेवून कथा लिहिली असेल तर सुमतीबाईंचा स्वभाव सुरुवातीपासून तसा रंगवायला हवा होता. त्यांचा मूळ स्वभाव तसा नसेलही, मग कथेत घडणार्‍या विविध प्रसंगात त्यांची बदलत जाणारी मानसिकता आणि स्वभाव रंगवायला हवा होता Happy

मला वाटते अजूनही पॉइन्ट मिस होतोय , असं पहा ना, तिने "आज" सूड घेतला अशी ही कथा नाहीच आहे! आज अचानक असे घडले नाहिये, त्यांनी तसे सुरु केलेय आल्रेडी. फक्त त्यांचा एक दिवस दाखवला लेखिकेने.
सो आज फक्त एक दिवसात त्यांची मानसिकता बदलेली नाहीच आहे Happy

नंदिनी, कथा मस्त आहे, खूप छान खुलवलीयेस. आवडली. हे असं नक्कीच घडू शकतं. फक्त शेवट जरा पटकन येतो. सायली आणि तिचा नवरा यांच्यातलं मैत्रीचं नातं पाहून सुमतीबाई मनात त्यांच्या नात्याबद्दल विचार करायला लागतात आणि मग टप्प्याटप्प्यानं त्यांच्या मनात सूडाची भावना निर्माण होते. पण आता आहे त्या परिस्थितीत त्यांना इतपतच सूड घेणं शक्य होतं. मात्र या सूडामुळे त्यांना आपला आत्मविश्वास परत मिळायला सुरुवात होते असा प्रवास आला असता तर अधिक खुलली असती. असं मला वाटतं. कृपया, फाजिल सल्ला वाटला तर माफ कर दो.

तसंच सायलीचा नवरा जर उत्तरप्रदेशीय आहे तर त्याने सुधीररावांची सगळी पुस्तकं वाचण्याची शक्यता कितपत असेल असं वाटून गेलं. ही शक्यता असू शकते पण मग तो मराठी चांगलं बोलायचा हे लिहिण्याची गरज नसेल.

कथेचा शेवट अ‍ॅबरप्ट आला असं मलाही वाटलं नंदिनी. सुरूवातीला पात्र एकदम खुलवत नेली आहेस. पण शेवट अचानक येतो. हळूहळू जशी सुरूवात खुलते, तशी शेवटाकडेही गेली असती तर अजून परिणामकारक झाली असती असं माझं मत.

तेवढाच एक प्रसंग नाहीय दाखवलेला अपमानाचा! >> प्रिसाईजली. नायिका ही अत्यंत सोशीक दाखवली आहे. नवर्‍याकडून पदोपदी होणारे अपमान ती सहन करत आली आहे. अशा व्यक्तीला सूड घ्यायला उद्युक्त करणारा प्रसंग पण टोकाचाच हवा होता असे मला वाटले.

माझ्याकरता अपमान = अस्मितेला लागलेला धक्का. दुसर्‍या व्यक्तीला घास भरवणे ही कधीही कोणाची अस्मिता होऊच शकत नाही. तो कमालीचा रुक्षपणा नक्कीच आहे. पण त्याकरता नायिकेसारखी सोसतच रहाणारी व्यक्ती सूड घ्यायला तयार होइल असे नाही वाटले.

इतका हायजीन फ्रीक माणुस बायकोला किस करत नसेल का? मग तिच्या ताटातल्या जिलेबीचे काय?

(फारच बोल्ड जस्टिफिकेशन झाले का? Sad )

कथा मला आवडली. छान खुलवली आहेस आणि धाडकन संपवली आहेस. ते संपवणं इफेक्टिव्ह वाटलं मला तरी.
आयुष्यभर स्वत्व गमावलेल्या स्त्रीला नकळत घेतलेला सूड मग तो साधा चहात थुंकून का असेना हा समाधान देणारा असू शकतो.
झंपी + १

कथा मला आवडली.

त्यांच्या हातामधे सुधीर रावांसाठी बनवलेला चहा होता. आणि मघाशी स्वयंपाकघरातून बेडरूममधे आणण्याआधी सुमतीबाई त्या चहामधे पच्चकन थुंकल्या होत्या.>>>>>>>>>. जबर्दस्त....अशांसाठी असंच....

आवडली. झंपी, दाद + १

इतका हायजीन फ्रीक माणुस बायकोला किस करत नसेल का? मग तिच्या ताटातल्या जिलेबीचे काय?>>> Happy

Pages