लग्नाआधीची खबरदारी

Submitted by नंदिनी on 7 January, 2013 - 04:57

गेल्या काही दिवसांमधे मायबोलीवर काही धागे वाचले, काही मित्र-मैत्रीणींचे किस्से ऐकले.

लग्नानंतर माझा कसा आणि किती अपेक्षाभंग झाला, हे या किश्शांमागचं सूत्र. मग त्यांना बरेच सल्ले मिळतात, असं कर, असं करू नकोस. किंवा अजून बरंच काही.

पण माझ्या मनात एक विचार राहून राहून येत राहतो तो म्हणजे "या सर्वांचा विचार लग्नाआधीच का केला नाही??" हा प्रश्न विचारता येत नाही, कारण लग्न ऑलरेडी झालेलं असतं. अशावेळेला काय करायला हवं त्याचा विचार इथे नको.

हा धागा लग्नाळू मुलामुलींसाठी. ज्यांची लग्ने अजून व्हायची आहेत अथवा ठरत आहेत अशा तरूणतरूणींना इथे काही मार्गदर्शनपर टिप्स देता आल्या तर उत्तम.

आपल्याकडे सर्वसामान्य घरांमधे एक वय उलटून गेलं की मुलींच्या लग्नाची घाई झालेली असते. अशावेळेला जुजबी इंटरव्ह्युज होऊन मग लग्न करायचे की नाही ते "ठरवले जाते". बर्‍याचदा मुलींचा होकार अथवा नकार विचारात घेतला जात नाही. ही परिस्थिती थोडीफार बदलत असली तरी अजून हे घडत आहेच. याउलट "लग्न हेच आयुश्याचे परमध्येय असल्याचे" काही मुलींचें मत असतं की "कधी एकदा लग्न होतय" अशी त्यांची अवस्था असते, अशा वेळेला मागचापुढचा काहीही विचार न करता लग्नाला होकार देऊन बसलेल्या आणि नंतर रडत असलेल्या मुली आजूबाजूला दिसतील.

मुलग्यांच्या बाबतीत तर परिस्थिती अजूनच बिकट. ठराविक वय झालं की लग्नाचा लकडा त्यांच्यामागे पण लागतोच. त्याचबरोबर "अपेक्षा" काय आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित आहे की नाही हेहे लक्षात घेतलं जात नाही. मग "तुला काय समजतं? तू फक्त आवडली की नाही ते सांग" अशी दरडावणी!!! बरं हे आवडणं/नावडणं बर्‍याचदा असतं ते रंगरूपावर. विचार्/सामाजिक्/भावनिक्/मानसिक अशा कुठल्याच गोषटींचा यामधे विचार केला जात नाही. पत्रिका-ज्योतिश वगैरे बाबींवर जास्त खल करण्यापेक्षा एकमेकांची अनुरूपता पाहून निर्नय घेणे जास्त हितकर.

लग्नापूर्वीच आपल्या अपेक्षा काय आहेत? आपली वागणूक कशी आहे त्यावरून दुसर्‍या घरामधे आपण किती अ‍ॅडजस्ट होऊ शकू याचा लग्नाआधी विचार करणे खूप गरजेचे. मुलींना लग्न करून दुसर्या घरी जायचे असल्याने त्यांनी आपल्य मनातील शांका कुशंका नीट विचारून घ्याव्यात. आपण त्या घरात राहू शकतो का? सेपरेट बेडरूम, कमोड, वॉशबेसिन, चोवीस तास पाणी यांची सवय असलेल्या मुलीने चाळीमधे दिवस काढता येतील का हा र्पश्न स्वतःला विचारायला हवा. आपण कुठवर तडजोड करू शकतो याची चाचपणी करून घ्यावी, त्याचबरोबर नि:शंकपणे भावी नवर्‍याला "दुसरी रूम घेण्याच्या शक्याशक्यतेबद्दल" देखील बोलावे.

माय्बोलीकरांकडून अजून काही पोईंट्सची अपेक्षा आहेच

(कृपया: इथे स्त्री-पुरूष, लग्न करावे की नको?, हुंडा पद्धती, बायकोचा पगार अशा विषयांवर वादावादी करू नये. धन्यवाद!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा..चर्चा वाचायला आवडेल.
घरातलाच अनुभव... अनेक विवाह-इच्छुकाना सतत लोक ऐकवत आहेत... अरे सगळ हव तस मिळत नाहीत.. शिक्षण कमी असल म्हणुन काय अथवा तत्सम काहीस.
मला वाटत प्रत्येक मुलगा वा मुलीने प्रथम स्वता:च्या बायडेटा बनवावा.. त्यात आपण स्वता: कोठे आहोत तसेच आपल्या जोडीदाराकडुन काय आहेत अपेक्षा ( मग अगदी शिक्षणापासुन ते देवावर विश्वास आहे, कर्मकांडा करण्यात रस आहे/ नाही पर्यंत) लिहाव्यात.. तसेच कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला आवडेल हे सुद्धा लिहावे.
बाकी अनुभवी/ जाणकार प्रकाश टाकतीलच..

नंदिनी फोनवर टाईप केलंस की काय?
किती त्या चुका? Happy

ता. क. (तळटीपेत व्याकरणाच्या चुका शोधू नका असे लिहिलेले नाही Wink )

शक्यतोवर मेडिकल हिस्ट्री असल्यास आधीच दोन्ही बाजुनी एकमेकाना सांगावे.
नंतर कोणीच कोणाची फसवणुक केल्याची भावना नको.
ह्याच शनिवारी एक लेख वाचलाय चतुरंग मध्ये. अर्थात त्याचा विषय थोडा वेगळा होता. पण लग्नाआधी मुलीच्या अपॅन्डिक्सचं ऑपरेशन नको म्हणणारी आई असा एक किस्सा त्यात होता.

लग्नाच्या आधी एच आय व्ही टेस्ट करावी मुलगी आणि मुलगा दोघांचीची.
अर्थात ह्यातुन आपण कोणावरही अविश्वास दाखवत नसुन समंजसपणा दाखवतोय.
कारण एच आय व्ही हा फक्त आणि फक्त एकाच कारणाने होत नाही.
नियोजित वधु वर ह्याना एकमेकाना भेटता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे असं वातावरण हवं.
हल्ली मोबाइलने काम थोडं सुकर केलय.

ईट्स जस्ट ईम्पॉसिबल.
धाग्याचा हेतू चांगला आहे, पण स्वतःच्या अपेक्षा आणि तडजोडीबाहेरच्या गोष्टी याची लिस्ट बनवणं अशक्य आहे. स्वतःपुरता प्रयत्न करुन पहा....

माझ्या ऑफिसात एकदा कसल्याश्या निमित्ताने एक कौन्सेलर बाई आलेल्या. इतर सगळ्या गोष्टी बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांच्याकडे एक लग्नाळू जोडपे आलेले. लग्नाआधी थोडे दिवस लिव्-इन केले तर पुढच्या रिलेशनसाठी फायदेशीर होईल का याबद्दल कौन्सेलिंग घेण्यासाठी ते आलेले.

बाईंनी त्यांना सांगितले की लिव-इन तर कराच पण ते एकमेकांच्या, जास्त करुन त्याच्या फॅमिलीबरोबर करा. त्याच्या आई-बाबांसोबत तुमचे कसे जमतेय आणि त्याचेही त्याच्याआईबाबांशी कसे जमतेय ह्या सगळ्या गोष्टी पुढे कसे होईल याच्या दिशादर्शक आहेत.

मला हे खुप पटले. अर्थात हे कितपत आचरणात आणता येईल माहित नाही. पण हल्ली लग्न ठरल्यावर दोघेही सर्रास एकत्र फिरायला जातात. बाहेर फिरण्याएवढाच वेळ एकमेकांच्या घरात घालवला, (जसे दर आठवड्याचा एखादा पुर्ण दिवस वगैरे ) तरीही आपण ज्या कुटूंबाला स्विकारणार आहोत त्यांच्या एकुण विचारधारेबद्दल, त्यांच्या अपेक्षांबद्दल खुप माहिती मिळू शकेल.

लग्न करताना घ्यावयाची काळजी असा अतीविशाल धागा आधीच झालेला आहे. आता या धाग्यावर आणखी वेगळं काय अपेक्षित आहे?

>>ईट्स जस्ट ईम्पॉसिबल.
>>धाग्याचा हेतू चांगला आहे, पण स्वतःच्या अपेक्षा आणि तडजोडीबाहेरच्या गोष्टी याची लिस्ट बनवणं अशक्य आहे.
ईट्स पॉसिबल. उलट असे नाही केले तर पुढे अशक्य होऊ शकते जगणे.
>>स्वतःपुरता प्रयत्न करुन पहा....
करून पाहिला आहे आणि यशस्वीपण झालो आहे.

चांगला धागा नंदिनी!

काही संस्था आहेत ज्या तरुण-तरुणींना विवाहपूर्व कौन्सेलिंग देतात, त्यात या बर्‍याचशा मुद्द्यांचा अंतर्भाव असतो.

तसेच काही विवाह जुळवणार्‍या संस्थाही माझ्या परिचयात आहेत, जिथे तुमचा अर्ज भरून देतानाच तुमच्या वैयक्तिक व पारिवारिक माहितीचे तपशील भरणे अनिवार्य असते. तुम्ही त्या संस्थेचे सदस्य झाल्यावर संस्थेतर्फे वेगवेगळ्या (संसाराला उपयोगी) विषयांवर मार्गदर्शक शिबिरे, कार्यशाळा, संवाद यांचे आयोजन केले जाते, ज्यांतून तुमचे या सर्व गोष्टींबद्दलचे विचार, मते विकसित होण्यास, तसेच इतरांचे दृष्टिकोन कळण्यास मदत होते.
फक्त नवरा-बायकोचे नाते कसे असावे, वैद्यकीय खबरदारी, सहचराबद्दलच्या अपेक्षा एवढेच नव्हे तर इतरही अनेक विषयांवर तिथे साधक-बाधक चर्चा होत असते.

अगदी उदाहरण द्यायचे झाले तर देवाधर्मावर अतिशय विश्वास असणार्‍या घरात एखादी देवाधर्मावर विश्वास नसलेली मुलगी सून म्हणून जाते तेव्हा संघर्ष अटळ असतो. आणि व्हाईस व्हर्सा. नवरा व नवरी स्वत:च्या वेगळ्या घरात राहणार असतील तर प्रश्नच नाही! तरी तिथे दोघांच्या विचारधारणा, श्रद्धा/अश्रद्धा, जीवनशैली, राहणीमान, काटकसरीच्या व खर्चाच्या संकल्पना, बचतीच्या / गुंतवणुकीच्या संकल्पना, आर्थिक स्वायत्तता, आर्थिक नियोजनाच्या कल्पना, घरखर्च, आईवडिलांच्या जबाबदारीबद्दलचे विचार, सासूसासर्‍यांच्या जबाबदारीबद्दलचे विचार, घरकामाबद्दलचे विचार व तयारी, मूल हवे-नको-किती-कधी याबद्दलचे विचार, सासूसासरे/आईवडील / सासर-माहेरचे नातेवाईक यांबरोबर राहणे - न राहणे याची तयारी, परदेशी जावे लागल्यास/ परगावी बदली झाल्यास त्याबद्दल, नोकरी-व्यवसाय जे करत असाल त्याबद्दलचे विचार या गोष्टी भावी वर वधू/ नवरा बायकोंकडून चर्चिल्या जाणे अपेक्षित आहे. अगोदर कधी त्यावर विचार केला नसेल तर तसा विचार करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर व्यसन, आहार (व्हेज/नॉनव्हेज), संयुक्त / एकत्र कुटुंबपद्धती, घरी माणसांचा राबता असणे/ नसणे याबद्दलही स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. लग्नाअगोदर कुणाशी संबंध असतील तर ते सांगावेत / नाहीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे - परंतु त्यातून गैरसमज होणार नाहीत यासाठी अवश्य पावले उचलणे अनिवार्य आहे.

मुला/मुलीच्या मित्रपरिवाराबद्दलही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. संगती कशा प्रकारची आहे, कोणाबरोबर ऊठबस आहे हे पाहणेही दोघांसाठी महत्त्वाचे आहे.

सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय मुलंमुली २३-२४ वयानंतर लग्नाचा विचार करतात असे धरले तर वरील गोष्टींचा त्यांनी विचार केला असणे, आपल्या भावी वधू/वराशी या गोष्टी लग्नाअगोदर चर्चिणे, तसेच जिथे मतभेद आहेत तिथे मध्यममार्ग स्वीकारायचा प्रयत्न करणे या गोष्टी तर नक्कीच हातात असतात. सध्या तरी एवढेच आठवत आहे. आणखी आठवल्यास अजून लिहीन.

आणखी आठवल्यास अजून लिहीन.>> नक्की लिही. माझ्या कीबोर्डने संप पुकारलाय. त्यामुळे मी जास्त लिहू शकत नाहीये. तुझी पोस्ट खरंच खूप चांगली आहे.

मस्त धागा आहे ....

एकमेकाना लग्ना आधी समजुन घ्यावे . कारण हल्लिची मुले लग्नाच्या वेळे पर्यन्त ' समजदार' असतात. (मला माहीत आहे की माझ्या प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ निघु शकतो. क्रुपया तसे करु नये) मुलानी लग्ना अधी भेटुन आपले वीचार, पुढचे प्लान्स , ई ई अधिच समजुन घ्यावेत. बारिक सारिक सर्प्रिझेस तर रहातीलच पण ति आनद वाटाणारी करावीत.

मेडिकल चेकप जरुर करावा. अगदी डीटेल तपसणी केली तर उत्तमच.

अजन पुढे कोण काय लिहितय ह्यावर परत लिहिनच...... खुप लिहिण्या सारखे आहे .

आपण कोणकोणत्या बाबतीत आणि किती मर्यादेपर्यंत तडजोड करु शकतो हे स्वत:ला माहित असते का ? हा माझा मुद्दा आहे. जेव्हा आपण म्हणतो तडजोड करणार नाही तेव्हा आपण सर्व परीस्थितींच्या संदर्भाने विचार करतो का ?

आपल्या सगळ्या अपेक्षा आपल्या स्वतःला नक्की ठाऊक असतात का ? की त्या स्थल काल सापेक्ष असतात ?

हॅवन्ट यू सरप्राईज्ड युअरसेल्फ एव्हर ?

महेश, सॉरी टू से, पण मला आपलं उत्तर खरच अपुर्‍या विचाराने लिह्ल्यासारखं वाटतय. उदाहरण देऊन स्पष्ट करु शकल्यास आभारी राहीन.

आपण कोणकोणत्या बाबतीत आणि किती मर्यादेपर्यंत तडजोड करु शकतो हे स्वत:ला माहित असते का ?>>किमान आपण त्याची चाचपणी तरी करू शकतोच ना? "हे मी करू शकते अथवा हे मी करूच शकत नाही" हे मी करण्याचा प्रयत्न करू शकते यापैकी कुठल्या मुद्द्याला किती महत्त्व द्यायचं हे ज्याने त्यने ठरवायला हवं. शिवाय ही तडजोड स्वत: ठरवलेली असली पाहिजे. इतरांच्या दबावाखाली येऊन नव्हे.

अत्यंत उपयुक्त लेख आणि विचार.

लग्नाआधी एकच खबरदारी घ्या. सगळ्या खबरदार्‍या घेउन झाल्या आहेत याची पक्की खात्री झाल्याशिवाय लग्न करु नका.

परिवारात / फॅमिली हिस्ट्रीत एखादा वांशिक आजार असेल तर त्याबद्दलही भावी जोडीदाराला स्पष्ट कल्पना दिलेली बरी असते.

पेट्स (पाळीव प्राणी) बद्दल आवड-निवड, मर्यादा, त्यांचे करायची तयारी हेही आजकाल राहण्याची जागा मर्यादित असल्यामुळे चर्चिले जाणे उत्तम.

वधू/वरावर काही कोर्ट केस दाखल असेल किंवा कोणत्या केसमध्ये ते इन्व्हॉल्व असतील तर तसे, किंवा नोकरी-व्यवसायात काही कोर्ट कारवाई चालू असेल तर त्याची कल्पनाही स्पष्टपणे जोडीदारास देणे आवश्यक. तसेच कोणती कर्जे घेतली असल्यास, किंवा नावी जमा झाली असल्यास त्यांबद्दलही स्पष्ट कल्पना देणे आवश्यक. मोघम शब्द नकोत. नक्की रक्कम, तिची परतफेड करायला लागणारा शक्य कालावधी, त्यानुसार आर्थिक तडजोडी इ. इ. कल्पना देणे आवश्यक. राहते घर जर गहाण टाकले असेल, कर्जात असेल किंवा स्वतःची / कुटुंबाची प्रॉपर्टी म्हणून जे जे दाखवले आहे त्यांवर कर्ज असेल तर ते न सांगणे म्हणजे फसवणूक केल्यासारखेच आहे हे लक्षात असू द्यावे.

परस्परांवर अनुरक्त झाल्यामुळे लग्नाला होकार दिला व त्या आवेगात कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी बेहत्तर असे वाटत असले तरी तो आवेग नंतर कितीकाळ टिकेल याची शाश्वती नसते व त्या तडजोडी कित्येकदा डोईजड होऊन बसतात. मग राहती जागा अपुरी वाटू लागते, उत्पन्न कमी आहे हे जाणवू लागते, माणसांचा त्रास होऊ लागतो - ज्या गोष्टी अगोदर हसत स्वीकारलेल्या असतात त्या नंतर डाचू लागतात. अर्थातच जर अगोदर पासून त्यांबद्दल स्वतःचे व जोडीदाराचे विचार माहीत असतील, परस्परांच्या अपेक्षा जाणून घेतलेल्या असतील तर मार्ग निघू शकतो. पण लग्नासारख्या गोष्टीत तडजोड करायला लागणे हे गृहित आहे. ती किती व कशी करायची याचे परिमाणही ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

आंबा३, तुम्हाला काही वेगळं अपेक्षित नसेल तर इथे लिहिलं नाहीत तरी चालेल.

वेगळं काय लिहिणार? आधी सगळं लिहून झालेलं आहेच. ( आणि इथे जोडेही खाऊन झालेले आहेत.)

खबरदारी कशी घ्यावी, काय घ्यावी, कायदे काय आहेत, पुरुष्हानी यावर वेळ आणि पैसा बर्बाद करण्यापेक्षा १०० रु चा स्टँप पेपर करुन मुसलमान व्हावे आणि मग बिन्धास्त लग्न करावे. अन्यथा,या खबरदार्‍या वगैरे तशाही कुचकामीच ठरतील.

-- पस्तावलेला भगवा आंबा.

>>महेश, सॉरी टू से, पण मला आपलं उत्तर खरच अपुर्‍या विचाराने लिह्ल्यासारखं वाटतय. उदाहरण देऊन स्पष्ट करु शकल्यास आभारी राहीन.

साधी गोष्ट आहे, वर अनेकांनी लिहिले आहेच. त्याप्रमाणे स्वतःच्या अपेक्षा काय काय आहेत याचा एक साधारण आराखडा मनाशी ठरवायचा आणि त्यामधल्या कोणत्या अपेक्षांमधे आपण तडजोड करू शकतो हे पण ठरवून ठेवायचे. हे तसे सोपे नाहीये पण खुप अवघडही नाहीये.
असे करताना स्वतःच्या मर्यादा, आवडी निवडी हे पण लक्षात घ्यावे. आणि मुख्य भर स्वभाव, घरातले लोक त्यांचे एकमेकांशी वर्तन, इ. वर द्यावा.

एक उदाहरण, मुलांच्या अपेक्षांचे ---

शिक्षण : १२ वीच्या पुढे असलेच पाहिजे. कोणत्याही शाखेचे चालेल.
नोकरी : घराकडे पुर्णपणे लक्ष देऊन करता येणार असेल तरच, नाही तर नाही.
घर : आई वडिलांना सोडून वेगळे रहाणार नाही, त्यामुळे ते मान्य असलेच पाहिजे.
अन्य : नविन काही शिकण्याची तयारी असावी (काहीही तिच्या आवडीचे)
स्वभाव : सर्वांना सांभाळून घेणारा असावा.
आहार : फक्त शाकाहारी

यामधे अजुन बर्‍याच गोष्टी वाढविता येतील. अशी सरळ सरळ एक यादी करून त्यामधे आपण कोणत्या गोष्टींबाबत तडजोड करू शकतो आणि कोणत्या नाही ते पक्के ठरवावे.
हे व्यक्ती प्रमाणे बदलणारे कोष्टक आहे.

अपेक्षा आणि तडजोडीच्या गोष्टी या मेजरेबल असाव्यात, व्हेग नकोत.

उदाहरणादाखल : ' नोकरी : घराकडे पुर्णपणे लक्ष देऊन करता येणार असेल तरच, नाही तर नाही.'
यांत घराकडे पूर्ण लक्ष म्हण्जे काय याबद्दल चे कंसेप्ट्स क्लिअर हवेत. घरांत राहणारे बाकीचे लोक इकडची काडी तिकडेही करणार नाहीत /आहेत इ. इ.

महेश यांच्या प्रतिसादातील वरील पॉइंट फक्त उदाहरणादाखल घेतलेला आहे, वैयक्तिक काही भाष्य करण्यासाठी नाही

बरं हे आवडणं/नावडणं बर्‍याचदा असतं ते रंगरूपावर. विचार्/सामाजिक्/भावनिक्/मानसिक अशा कुठल्याच गोषटींचा यामधे विचार केला जात नाही. >>
माझ्या एका लग्नाळु मित्राला मी विचार्लेल, कशी हवी मुलगी? उत्तर आल- कुरळे केस नकोत फक्त, बाकि कशी पण चालेल. :ड

लग्नाच्या आधी एच आय व्ही टेस्ट करावी मुलगी आणि मुलगा दोघांचीची.
अर्थात ह्यातुन आपण कोणावरही अविश्वास दाखवत नसुन समंजसपणा दाखवतोय. >> १००% सम्मत्ति.

महेश,

<<यामधे अजुन बर्‍याच गोष्टी वाढविता येती<<>>

मी नेमकं हेच म्हणतोय. <<पण स्वतःच्या अपेक्षा आणि तडजोडीबाहेरच्या गोष्टी याची लिस्ट बनवणं अशक्य आहे. स्वतःपुरता प्रयत्न करुन पहा..>>

तुम्हीच वर लिहिल्याप्रमाणे...<<करून पाहिला आहे आणि यशस्वीपण झालो आहे.>> तुमची लिस्ट परिपूर्ण आहे का ? तुम्ही यशस्वी झालो आहे असं लिहिल्यामुळे हा प्रश्न विचारतोय. मला तुमच्या लिस्टमध्ये खालील मुद्द्यांना स्पर्शही न झालेला जाणवत आहे.

स्वभाव (ईन्ट्रोव्हर्ट / एक्स्ट्रोव्हर्ट), पाळीव प्राणी, मुलं, शिक्षणाचं मिडीयम, पगाराची हाताळणी, घर स्वतःचे / भाड्याचे, नोकरीतली बदली, व्यवसायात उतरण्याची आवड, पुढलं शिक्षण, छंद, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, व्यसन.........

लिस्ट कधीही न संपणारी आहे.

आणि समजा एक संपूर्ण कोष्टक बनवलंच आणि त्यात बसणारा जोडीदार मिळालाच, तर त्याच्याबरोबर संसार सुरळीत होईल याची किती जणांना खात्री वाटते ?

माझं मत सांगतो....

१. माणसाच्या गरजा, अपेक्षा हा तो स्वत: परीस्थितीनुरुप बनवत असतो.
२. कोणताही निर्णय हा त्या काळाचं प्राडक्ट असतो. त्याचं बरोबर / चूक असणं हे त्या काळाशीच संबंधित असतं.
३. निर्णय हा बरोबर किंवा चूक असण्यापेक्षा तो योग्य आणि पूर्ण माहितीवर विसंबून घेतला आहे का हे जास्त महत्वाचं.
४. संसार हा फक्त दोन गोष्टीवर चालतो; विश्वास आणि तडजोड. ह्या गोष्टीची तयारी नसेल तर लिस्टला अर्थ नाही. तयारी असेल तर लिस्टला किती अर्थ आहे ते ज्याने त्याने स्वतःच ठरवावं.
५. सुखी, समाधानी असणं ह्या फक्त मनाच्या अवस्था आहेत.

>>मला तुमच्या लिस्टमध्ये खालील मुद्द्यांना स्पर्शही न झालेला जाणवत आहे.

मी कुठे म्हणलय की ती यादी परिपुर्ण आहे. उदाहरणादाखल दिले आहे. आणि व्यक्तीगणिक बदलेल असेही सांगितले आहे.

माझ्या बाबतीत माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्यामधे अगदी १००% नाही पण ८० ते ९०% जमेल अशी व्यक्ती भेटली आणि काही गोष्टी ज्यांची अपेक्षा असुनही पुर्ण होऊ शकल्या नाहीत तिथे मी (त्याच वेळी बायकोने देखील) तडजोड केली आणि आम्ही यशस्वी आहोत असे म्हणु शकतो. पब्लिक फोरम असल्याने मी येथे वैयक्तिक माहिती याहुन जास्त देणार नाही.

नंदिनी धागा छान काढलास, सर्वांचे विचार वाचायला आवडतील.

@ बागुलबुवा

माझं मत सांगतो....

१. माणसाच्या गरजा, अपेक्षा हा तो स्वत: परीस्थितीनुरुप बनवत असतो.
२. कोणताही निर्णय हा त्या काळाचं प्राडक्ट असतो. त्याचं बरोबर / चूक असणं हे त्या काळाशीच संबंधित असतं.
३. निर्णय हा बरोबर किंवा चूक असण्यापेक्षा तो योग्य आणि पूर्ण माहितीवर विसंबून घेतला आहे का हे जास्त महत्वाचं.
४. संसार हा फक्त दोन गोष्टीवर चालतो; विश्वास आणि तडजोड. ह्या गोष्टीची तयारी नसेल तर लिस्टला अर्थ नाही. तयारी असेल तर लिस्टला किती अर्थ आहे ते ज्याने त्याने स्वतःच ठरवावं.
५. सुखी, समाधानी असणं ह्या फक्त मनाच्या अवस्था आहे.
<<<<<<<<<<<

+ १००००००%

बाबु .... ब्येस्ट.

आजकाल तुझ्या पोस्ट तुझी वाटचाल हिमालयाच्या दिशेने असल्याचं दाखवतायत..... आता काय हिमालयात पण बर्फ विकणार Proud Wink

Pages