देवाची बायको हरवली !

Submitted by दिनेश. on 2 January, 2013 - 03:29

बायबलची सुरवात बहुदा अशा अर्थाच्या वाक्याने होते, आणि देव म्हणाला प्रकाश असो, आणि प्रकाश पडला.
मुसलमान लोकांची रोजची प्रार्थना, ला ईलाह ईल्लिलाह, ने सुरु होते. याचा अर्थच अल्लाशिवाय कुणीच नाही, ( नन टू बी वर्शिप्ड ) ज्यू धर्मदेखील असा एकच देव मानतो.

हा एकेश्वरवाद त्यांच्या अभिमानाचा / अस्मितेचा विषय आहे. आणि त्यावरुनच ते इतर धर्मियांची हेटाळणी
करत असतात. पण हा एकेश्वर वाद अगदी मूळापासून त्यांच्याकडे होता का ? या प्रश्नाचा शोध, बीबीसीच्या

BBC. Bibles Buried Secrets 2. Did God Have a Wife?

http://www.youtube.com/watch?v=jYD0LzmilE8

या माहितीपटात घेतलेला आहे. तो बघायचे निमित्त झाले आणि काही विचार मनात आले. यातले काही
विचार या माहितीपटातले तर काही माझे.

निर्मिती, खास करुन प्रजानिर्मिती हि एकाच व्यक्तीला कशी शक्य आहे ? अमिबा/ गांडूळ सारखे काही जीव सोडले तर त्यापेक्षा वेगळ्या ( वरच्या म्हणवत नाही ) पातळीवरच्या किंवा वेगळ्या तर्‍हेने विकसीत झालेल्या
जींवांच्या बाबतीत तर लैंगिक प्रजननच शक्य आहे. क्लोन, टिश्यू कल्चर, कलम वगैरे तंत्रे सध्या बाजूला ठेवू.
त्यामूळे देव झाला म्हणून काय झाले, त्याला नवनिर्मितीसाठी जोडीदार हवाच ना ?

मग एक मुद्दा पुढे येतो, कि देव हा देव असल्याने, लिंगनिरपेक्ष आहे. त्याला निर्मितीसाठी अशा जोडीदाराची
गरज नाही. अर्थातच ही नंतरची मखलाशी.

त्यामूळे मूळात अशी एक स्त्री होतीच. आणि ती स्त्री म्हणजे अशराह. आणि तिचेच नव्हे तर तिच्या प्रतिमेचेही
कसे दमन झाले, यावर हा माहितीपट काही भाष्य करतो.

अगदी पहिल्यांदा प्रजा निर्माण करण्यात नराचा काही सहभाग असतो, हेच मानवाला माहीत नव्हते. हि अदभूत क्षमता केवळ स्त्रीकडेच आहे असाच समज होता. त्याकाळात समूह हेच बळ असल्याने नवे जीव
निर्माण होणे अत्यावश्यक होते आणि अर्थातच अशी क्षमता असलेली स्त्री, पूजनीय होती.

तिच्या या निर्मितीत आणि नंतरच्या पालपोषणात हातभार लावणारे अवयव तर स्वतंत्रपणे प्रतीकाच्या
रुपात तर पूजले गेलेच पण स्त्री प्रतिमांमधेदेखील हे अवयव ठळकपणे दाखवले गेले.
पुढे भिन्न्वर्णांच्या संकरातून भिन्न्वर्णीय प्रजा निर्माण होतेय असे लक्षात आल्यावर प्रजानिर्मितीतला नराचा सहभाग कळला. आणि त्यानंतरच बहुदा हे प्रतिमेचे दमन झाले.

आपल्यापेक्षा आणखी कुणी, सर्वोच्चस्थानी असू नये असे त्या मानवनिर्मित प्रतिमेला, म्हणजेच देवाला
वाटल्याने, पद्धतशीरपणे बाकीचे संदर्भ मिटवण्यात आले. मुख्य पर्तिस्पर्धी तर अत्यंत ताज्य ठरला.
( त्याचाच पुढे सैतान झाला असेल का ? ) देव असला तरी सर्व तो एकट्याने कसे करेल, त्याला सहकारी,
मदतनीस लागणारच ना ? पण त्यांचा दर्जा कमी करण्यात आला आणि आता ते केवळ देवदूतांच्या रुपात
शिल्लक आहेत.

पण बायकोचे काय ? ती तर देवाच्या सर्वात निकटची. इतर देव आणि सहकारी यांच्यातला दुवा ती होती.
देवाच्या बरोबरीचे स्थान होते तिचे. तिच्या प्रतिमेचे पूजन होत होते. ( असे पुरावे थेट इस्राईल मधेच
सापडले आहेत.) पण ती प्रतिमा मागे पडली.

कदाचित प्रतिमेतील काही अवयवांचे ठळकपण, समाजाला अमान्य ठरले असेल आणि मग ती प्रतीकात्मक
रित्या, एका झाडाच्या रुपात दाखवली जाऊ लागली. आणि नंतर तेही मागे पडले.

सगळ्यात नवलाचे म्हणजे, अशराह या शब्दाला वेगळाच म्हणजे काठी असा अर्थ जोडण्यात आला.
आता काठीच ठरवली तर ती पुरता येते, मोडता येते आणि जाळताही येते.

असे करत करत सर्व प्रतिस्पर्धी नष्ट केल्यावर देव एकटाच सर्वोच्च स्थानी राहिला. देव = श्रेष्ठ आणि देव = पुरुष, अशी समीकरणे झाल्यावर, पुरुष = श्रेष्ठ असे समीकरण तयार होणे, अगदी नैसर्गिकच होते.

पण जननी / आईचे विस्मरण कसे होऊ शकेल ? मग ती उरली मेरीच्या रुपात. कधी ती बाळ येशूला जोजवताना दिसते तर कधी मरणासन्न येशूला मांडीवर घेऊन शोक करताना. पण तिच्या प्रतिमेला पण
किती बंधनात जखडून टाकले आहे बघा. ती कायम नखशिखांत कपड्यात असते. इतकेच नव्हे तर ती "व्हर्जिन" आहे असे मानले जाते. एकदा देवाचे मातृत्व दिल्यावर तिने व्हर्जिन असावे असा आग्रह का ?
तिचे देवत्व केवळ त्या एका गोष्टीने हिन दर्ज्याचे ठरते का ? आणि तिचे प्रतिक असलेले झाड, ते तर
ज्यू धर्मात आजही मान्य आहेच.

इतक्या पद्धतशीरपणे केलेले प्रतिमेचे दमन, पुरुषी ( मानवी, म्हणवत नाही ) मानसिकतेमधूनच आले असे
नाही वाटत ?

दुसर्‍या एका माहितीपटात मी असे बघितलेय, ( इब्लिस, साती वाचत असाल आणि चुकीचे असेल तर जरुर सांगा ) कि स्त्री आणि पुरुष असा काही भेद मूळात नसतोच. स्त्री शरीर हेच मूळ, तोच मूळ साचा. केवळ
एका बदलाने गर्भाचे लिंग ठरते. म्हणजे जर XX आणि XO असे ठळक फरक जर निसर्गात घडले नाहीत, तर
असा अपवादात्मक देह, स्त्रीचाच असेल. ( हा बीबीसीचाच माहितीपट सिक्रेटस ऑफ सेक्स या नावाने उपलब्ध आहे. अगदी लहान मुलांनी बघण्यासारखा नाही. पण अर्थातच दर्जेदार आहे.)

हाच विचार पुढे न्यायचा तर प्रत्येक पुरुष हा मूळात स्त्री असतो, पण केवळ काही बदलाने तो पुरुष म्हणून
जन्माला येतो. आणि याच कारणाने, कुठलेही कार्य नसलेले, स्तनाग्र त्याला असतात.

मग स्त्रीचा असा दुस्वास करणे कुठून आले ? मला हा संदर्भ टाळायचा होता पण राहवत नाही, श्रीकृष्णाला म्हणे स्तनाग्रे नव्हती, का तर तो केवळ एकमेव, पूर्ण पुरुष. मग असाही भक्तीभाव दिसला, कि देव म्हणजे पुर्ण पुरुष आणि सर्व भक्त म्हणजे ( पुरुष असले तरी ) स्त्रियाच. पण हा विचार तितकासा दृढ नाही.

सर्व देवं नमस्कारं, केशवं प्रति गच्छति किंवा देवोंके देव महादेव असल्या वाक्यातून कधी कधी आपल्याकडेही एकेश्वरवाद डोकावतोच. पण त्याचवेळी शक्तीपिठे / दूर्गापूजन असल्या गोष्टींनी दिलासाही
मिळतो.

पण तरीही सद्यस्थिती बघता आपणही त्याच दिशेने जात आहोत का, अशी शंका वाटते.

वरचे माहितीपट जरुर बघा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरिहर, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसायला.
लिंग गर्भधारणेच्या वेळीसच ठरलेले असते पण जोपर्यंत पुरूष हॉर्मोन कार्यरत होत नाहीत तोपर्यंत गर्भ स्त्रीसारखाच भासतो.
एखाद्या मुलग्याचे समजा टेस्टिज सर्जिकली किंवा कसे काढून टाकले तर तो पुरुषी न दिसता होता बायकी होतो. स्त्रीच्या ओवरी काढून टाकल्या तर ती पुरूषी होत नाही. Happy

Pages