निसर्गाचीये 'कास' धरोनी..
जणु निसर्गाचीये 'कास' धरोनी
लिवले मथळ्यांवर मथळे भरोनी
प्रसारमाध्यमे राहिली अतिरेक करोनी
पुरे करा आता ही प्रसिद्धी थांबवोनी
'' अहो या शनिवार-रविवार सुट्टीचे काय नियोजन आहे !?'' ''थोडं गुगलून काही नवीन पिकनिक स्पॉट हुडकून ठेवा.''
''अरे विन्या, या विकेंडला सॉलिड धुमाकूळ घालूया., तु, मी, तुष्या, अभ्या आणि आपल्या गेंग बरोबर राडा करू तिकडे...
सगळ्यांनी बाईक काढायच्या की पक्याची XUV काढायला लावायची !? ठीके ठरलं मग.. ओल्या सुक्याच पण बघा रे लेको ..''
'' शोभाताई कधी सुरु होतोय सिझन !? या वेळची भिशी तिकडेच घेवू जवळच्या resort मध्ये,
किंवा देसाई काकू आल्या तर बरंच, त्यांच्याच फार्महौस वर 'हौस' करू. xo करोडला घेतलीये म्हणे त्यांच्या मिस्टरांनी ती जागा.. ''
'' लोणावळा, महाबळेश्वरचा कंटाळा आला आता., नुकतीच web site launch झालीये 'त्या' नवीन स्पॉटची,
पेपरात आणि TV वर दररोज बातमी आहे कि, xyz फिल्मचं शूटिंगही तिथे चालूये त्यामुळे yyy खान आणि xxx कपूरही दिसतील. जाऊया..
शहरांमधल्या नवमध्यमवर्गीय घराघरातले हे आजचे संवाद...
हे संवाद आहेत, टीव्ही आणि पेपरात वाचून नवीन ' वीकएंड देष्टीनेशन ' प्लान करणाऱ्या लोकांचे...
अनेक नवीन स्थळांची सध्या प्रसारमाध्यमांनी, इंटरनेट, सोशल मेडियानी दखल घेऊन त्याचे आकर्षक सादरीकरण केले आहे..
इतिहास, भूगोल, पुरातत्व, बोली, जैव-वैविध्य, दुर्मिळ प्रजाती याकरिता नोंदल्या गेलेल्या या स्थळांचे कुतूहल आता CLASSES कडून MASSES कडे सरकत चालले आहे. बरे ही स्थळे काही निसर्गाने नुकतीच प्रसवली आहेत असे नव्हे, शेकडो वर्षापासून निसर्ग वैभव जसे आहे तसेच दिमाखात उभे आहे. या आधीपासून निसर्गछंदी, त्याचे आस्वादक, अभ्यासक स्वतःच्या वाचनातून, जाणकारांकडून माहिती घेत योग्य वेळी तिथे भेट देतंच असत. कर्णोपकर्णे आणि शनैः शनैः म्हणजे नैसर्गीक वेगाने त्यांस प्रसिद्धी मिळतच होती. पण गेल्या काही वर्षात माध्यमांनी ज्याप्रकारे त्याची NEWS करून प्रतिसाद मिळवणे सुरु केलेय ते अनाकलनीय आहे. हे जर का नियंत्रित झाले नाही, तर अनैसर्गिक वेगाने झालेला प्रचार, प्रसार हे विनाशाचे कारण ठरू शकते. शहरातील लोकांची करमणुकीची गरज आणि खेड्यातील लोकांची पैशाची गरज ओळखून, माध्यमे ' नाही त्या उद्योगाला ' तर नाही न लागलेली अशी भीती वाटतीये.. यामधील उद्दिष्टच संशयास्पद वाटते आहे. यात काय साधले जातेय नक्की ? पर्यटनस्थळ विकास कि पर्यटनस्थळ विक्री ?
'' सायेब त्ये समोर वावर दिसतंय न.. त्ये आक्ख्ख परवा ना.श्री.अण्णासाहेबांनी घेतलं. अन ह्येतर कायबी न्हाई, अप्पासाय्बांनी तर पल्याडच समदा डोंगुरच घेवून ठेवलाय गेल्यावरिला.. नुसता व्हुव्हच व्हुव्ह ... नादच नै करायचा... आता 'लेवल' करून कायतरी 'शिटी' करनार म्हनत व्हते, पन न्येम्का त्यो फारीष्ट आणि चार गोरं लोक बगून गेल्यामुळे जरा लाम्ब्नीवर पडलंय या बारीला.... लोक म्हनत होतं चावडीवर....त्ये पर्यावरणवालेपन मदे मदे करतात.'' पन तुमी काळजी करू नका सायेब, आज ना उद्या व्हनारच आता... पुढल्या सोमवारी कचेरीत कागद करू, सौदा पक्का करू अन हा तुकडा तुमचा.. '' असे संवाद आता पर्यटक आणि स्थानिकांमध्ये ऐकू येतायेत..
माध्यमातली प्रसिद्धी आणि तिचा वेग अनाकालानीय आहे. अनेकदा त्यात PAID -NEWS असल्याचा वास येतोय. 'देऊळ' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एखाद्या उजाड डोंगराचे हितसंबंधी लोकांकडून जसे धार्मिक स्थळात रुपांतर होते, तशाशीच साधर्म्य साधत दुर्लक्षित पठारांचे, ऐतिहासिक किल्यांचे 'हिलस्टेशन' होवू घातले जात आहे. माध्यमांना यापुढे त्यांच्या प्रसिद्धीचे SECONDARY आणि TERTIARY EFFECTS ओळखून, यापुढे भान ठेवून काम करायला हवं. गेल्या काही वर्षात वृत्तपत्रांमध्ये अशा स्थळांविषयी मथळे भरून बातम्या छापून आणि विषय चर्चेत ठेऊन curiosity value टिकवली जातीये. आणि विशिष्ट वर्गाकडून नवें पिकनिक ठिकाण 'सेल' करण्याचा घाट घातला जातोय. खरंतर डोंगराचा ओबडधोबडपणा, गावाचे गावपण हीच त्याची ओळख आहे, वैशिष्ट्य आहे. गावाची 'सिटी' करण्यात त्याचे 'गावपण' निघून जात आहे. माणसाकडून निसर्गाचा कौमार्यभंग होवून त्याचे सामान्यीकरण होत आहे.. खासगी कुंपणा-आडून निसर्ग दर्शन करायची वेळ येणे यासारखे सामाजिक दुर्दैव नाही. विकासाची कास भकासाच्या वाटेवर तर नाही न जात हे तपासून पहायची वेळ आली आहे...
परदेशातही अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत आणि ती पाहायला त्या त्या देशातूनच नव्हे, तर जगभरातून दरवर्षी लाखोनी पर्यटक येत असतात. पण सामाजिक भान आणि नागरी जाणीवा टिकवून तिथे माणसं मौज करतात आणि सौंदर्य अबाधित ठेवतात. स्वच्छता आणि नैसर्गिकता कसोशीने जपली जाते. राजकीय आणि वैयक्तिक हितसंबंध निसर्गाच्या मूळावर येवू दिले जात नाहीत. तिथली धोरणे आणि अनुशासन त्या बाबतीत कोणतीही कसूर सोडत नाही. उठसूट, अस्ताव्यस्त, ओंगळवाणी जत्रा भरवून धिंगाणा घातलेला नाही दिसत तिथे..
इथे झपाट्याने सुधारणारे रस्ते, नव्याने आलेली सुबत्ता, वाहनसौख्य आणि वीकएंड सेलेब्रेशनची नवी कन्सेप्ट यामुळे लोक कुठेतरी उधळताना दिसतायेत. ज्या त्या भागाचा 'इ.भू.ना.शा.' माहित करून घेण्यापूर्वीच केवळ सगळे जातायेत म्हणून नुसतं सुटायचं; मग तिथं जाऊन खायचं, प्यायचं, फुकायचं आणि मग भूकायचं.... हे भंपक स्वरूप येतंय. हे नको आहे.
अनेक लोक स्वतंत्रपणे आणि सहल आयोजकांसोबत सुट्टीचे चार क्षण शहराबाहेर घालवायला बाहेर पडतात, मग सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्थानिक व्यवस्थेवर ताण येतो, अरुंद रस्त्यांवर वाहतूकही कोलमडताना दिसते. अशा वेळी मस्तीच्या धुंदीत आलेल्या लोंढ्यांचा हैदोस उत्पन्न होवू शकतो, वादावादी आणि गोंगाट होवू शकतो, अपघात होऊ शकतात. मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. आणि या सर्वातून निसर्गाचीच हानी होत असते. हे सर्वस्वी अपेक्षित नाही.
निसर्गाला आपलं काही दायित्व आहे या भावनेने लोकांचा तिथे वावर असलं पाहिजे.. निसर्गरक्षणाचे भान अन वृद्धीचे काही चांगले उपक्रम घेवून जाणे अपेक्षित आहे. तिथल्या स्थानिकांना आपल्यामुळे त्रास होवू नये, झालेच तर मदत होईल अशा भावनेने गेले पाहिजे.
अधिकृत संकेतस्थळावर नोंद करून येणे आणि गर्दीचा आकड्याचा अंदाज वर्तवणे आणि एका मर्यादेनंतर परवाने वितरण थांबून गर्दी नियंत्रित करणे यासारख्या उपाययोजना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येतील. सुरूही झाल्या आहेत... असेही दिसून येते कि शनिवार आणि रविवारी पर्यटकांची हजारो-लाखोनी उपस्थिती आणि इतर दिवशी तिथे शुकशुकाट.. हे विरोधाभासात्मक पण वास्तव आहे.. यावर शक्य झाल्यास विशिष्ट मोसमात नोकरदारवर्गाच्या सुट्ट्यांच्या वारात लवचिकता आणण्याचा विचार करून पहिला पाहिजे. यातून आठवड्याच्या सातही वारांवर गर्दी विभागता येईल. आणि एकंदर उत्तम नियोजन करता येईल...
सहल आयोजकाची किंवा व्यवस्था पाहणाऱ्या खासगी कंपन्यांनीही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, की आपल्या सह-यात्रीकडून कोणतेही अनुचित कृत्य घडणार नाही. त्यासाठी आवश्यक सोयींचे, उपाययोजनांचे त्यांनी नियोजन आणि प्रवासादरम्यान मौज-मस्तीबरोबर निसर्ग प्रबोधनही करण्याची गरज आहे. अशी काळजी घेण्याची घट्ट मानसिकता करून मगच बुटाच्या नाड्या घट्ट करत निघणे उचित ठरेल.
अनेक क्षेत्रातले मान्यवर, कलावंत, उद्योजक, राजकारणी, उच्च-पदस्थ नोकरदार हे पर्यटक म्हणून बाहेर पडत असतात.
पण पर्यटकाच्या भूमिकेत उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, जात-पात, पद-अधिकार, मान-मरातब हे अभिनिवेश बाजूला ठेवून येणे अपेक्षित आहे..
पर्यटक म्हणून खरोखरच जायचे असेल तर आवर्जून जाऊया. पण निसर्गाला चुकूनही इजा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेत.
बरोबरच्या खाद्यपदार्थाची वेष्टने आणि टरफले, आपल्यासोबत पिशवीत गोळा करत..
जाऊया., गाड्या शिस्तीत चालवत., हॉर्नचा वापर कटाक्षाने टाळत... सह-यात्रींविषयी मनात बंधुत्व आणि आदर बाळगत..
आपण तिथून निघून गेल्यावर तिथे निष्णात कुत्र्यालाही कळू नये की इथे कोणी येवून गेले होते, इतक्या हलक्या पावली..
कोणतीही चाहूल न लागता पोहोचुया आणि कोणताही मागमूस न सोडता निघून जाऊया...
निसर्गाने त्याचे अपरिमित वैभव आपल्यावर उधळून टाकले आहे. ते वेचायला जाऊया..
आपल्या उन्मादाचे खरकटे निसर्गावर फेकायला नव्हे...
सटासट फोटो काढून ते फेसबुकावर ओतण्यापेक्षा, निसर्गसौंदर्य फक्त डोळ्यांनी लुटायला जाऊया.
निसर्गाची गूंज कानामध्ये साठवायला जाऊया. निसर्गाचा श्वास मनमुराद घ्यायला जाऊया.
प्राणी-पक्षांचे आवाज कानात साठवायला जाऊया. चुकून कधी कविता स्फुरतेय का ते पाहायला जावूया.
जाऊया.. पण सगळेच जातायत म्हणून आणि टीव्ही आणि पेपरात दररोज छापतायेत म्हणून नव्हे,
twitter वर त्याविषयी सगळेच टिवटिवतायेत म्हणून किंवा कसातरी वीकएंडचा रकाना भरायचाय म्हणून नव्हे.,
नवीन चारचाकी उडवायला नव्हे आणि निव्वळ पार्ट्या करण्यासाठी तर नव्हेच नव्हे..
जाऊया तेव्हाच जेव्हा तुम्हाला निसर्गाची साद ऐकू येतीये, जाऊया तेव्हाच जेव्हा 'तुम्हाला' वाटते आहे....
पहा, निसर्गाशी तितकीच सहवेदना असेल तर तुम्ही नक्की बाहेर पडाल.,
आणि तेही सिझन, वीकएंड, NEWS आणि फेस्बुकी गप्पांची वाट न बघता...
पर्यटक म्हणून खरोखरच जायचे
पर्यटक म्हणून खरोखरच जायचे असेल तर आवर्जून जाऊया. पण निसर्गाला चुकूनही इजा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेत. >>>> अग्दी अग्दी...
या वाक्याखालील सगळेच मुद्दे महत्वाचे आणि आचरणात आणले गेले पाहिजेत.....
छान लिहिलंय. इथे झपाट्याने
छान लिहिलंय.
इथे झपाट्याने सुधारणारे रस्ते, नव्याने आलेली सुबत्ता, वाहनसौख्य आणि वीकएंड सेलेब्रेशनची नवी कन्सेप्ट यामुळे लोक कुठेतरी उधळताना दिसतायेत. ज्या त्या भागाचा 'इ.भू.ना.शा.' माहित करून घेण्यापूर्वीच केवळ सगळे जातायेत म्हणून नुसतं सुटायचं; मग तिथं जाऊन खायचं, प्यायचं, फुकायचं आणि मग भूकायचं.... हे भंपक स्वरूप येतंय. हे नको आहे.>>>>>अगदी अगदी.
मस्त लेख. आख्खे एक वर्ष सरले
मस्त लेख.
आख्खे एक वर्ष सरले पण लेखातले मुद्दे अजूनही महत्वाचे ठरताहेत.
शशांक - कसा बुवा लक्षात आला हा लेख
वरुण- लेख आवडला, विचार पटले.
वरुण- लेख आवडला, विचार पटले. केवळ अशाच विचारांमुळे सेकण्ड होम घ्यायचा विचार बाजूला टाकला. सध्या तरी ठरवलय हिमालयात आणि अभयारण्यात कुठेही फिरायला जायचं नाही. सायकल सुद्धा चालवायला सुरुवात केलिये, जेणे करून जवळपास जिथे जायला रिक्षा लागत होती तिथे सायकलने जाता यावं. हिरव्या कचर्याचं व्यवस्थापन सुरू केलय. बाकी फेबु, WA, आंतर्जाल हे मात्र कमी होत नाहीये. आता मुंबईच्या बाहेर शेतजमीन विकत घ्यायचा विचार आहे. किंवा इतर कोणाच्या शेतजमिनीत काम करता आलं तर तसं करेन. महिन्यातून एकदा.
निसर्गासाठी माझ्याकडून अणुइतका प्रयत्न.