शेवग्याच्या शेंगांची आमटी / पप्पुचारु

Submitted by चिन्नु on 25 December, 2012 - 11:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०-१२ शेवग्याच्या शेंगा-जरासे तासून व १-२ इंच लांबीचे तुकडे करून
२ लिंबांएवढी चिंच,
१ कांदा - लांब चिरून
१ मूठभर पुदिन्याची पाने
४/५ हिरव्या मिरच्या - लांब चिरून
१/२ वाटी तूरडाळ + १ मूठ हरबराडाळ - एकत्र शिजवून घेणे
१-२ चमचे डाळीचे पीठ
हळद चिमूट, मीठ चवीनुसार, मेथी-जिर्‍याची पूड - १ टी.स्पू., साखर - ३ मोठे चमचे
फोडणीसाठीचे साहीत्य व तेल.
कोथींबीर, कडीपत्ता
४ ते ५ ग्लास पाणी

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात फोडणीसाठी तेल तापवा. तापल्यावर जिरे-मोहरी, लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करा. कडीपत्ता व कोथींबीर तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परता. चिंचेचा कोळ घाला व उकाळी येऊ द्या. उकळी फुटण्याच्या आतच जिरे-मेथीपूड घाला. नंतर याच्या गुठळ्या होउ शकतात. आता शेंगा, कांदा, पुदिन्याची पाने घाला. ४/५ ग्लास पाणी घाला. हळद, मीठ घाला आणि थोडे शिजू द्या. साखर घालून आणखी उकळी काढा. आता डाळ घालून आमटी सारखी करावी. थोड्याश्या पाण्यात डाळीच्या पीठाची पेस्ट करून ती आमटीत घालावी. एखाद्या उकळीनंतर गॅस बंद करावा. आमटी उर्फ पप्पुचारु तयार आहे. गरम भात+ तूप+ ही आमटी आणि एखादे लोणचे+पापड हा थंडीतला जिव्हाळ्याचा डिनर मेनू. Happy

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांना भरपूर
अधिक टिपा: 

या आमटीत सांबार किंवा रसम पावडर घालता येइल. पण त्याने ओरीजीनल चव मारली जाते.
यात सांबारमध्ये घातल्या जाणार्‍या भाज्या घालता येतील. ओरिजीनल पप्पुचारूमध्ये फार भाज्या नसतात.
साखर घातल्यावर आमटीकडे लक्ष ठेवावे लागते, नाहीतर उतू जाण्याचा संभव असतो.
ही आमटी फुलक्यांबरोबरही छान लागते.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users