पोह्याचे पॅटिस

Submitted by नंदिनी on 21 December, 2012 - 04:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पोहे: दोन वाटी (कांदापोह्याला वापरतात ते पोहे)
२. कांदा - १ ते २.
३. हिरवी मिरची- २ ते ३ (तिखटपणावर अवलंबून)
४. लसूण - ५ ते ६ पाकळ्या.
५. आलं- एक छोटा तुकडा
६. कोथिंबीर - आवडेल तशी.
७. मीठ- चवीनुसार
८. तळायला तेल. .
९. एक ते दीड चमचा बेसन अथवा बारीक रवा.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम पोहे पाण्यात भिजवून घ्या. आपण कांदेपोहे करताना घेतो त्याच्यापेक्षा॑ थोडं जास्त पाणी घालून भिजवा. पोहे पूर्ण मऊ झाल्यावर निथळून घ्या.

२. कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथंबीर मिक्सरला वाटून घ्या. पेस्ट फार गुळगुळीत नको. पण अगदी दातात येइल इतपत सरबरीत देखील नको.

३. पोह्यमधे ही पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं कालवून घ्या. फार मळायची आवश्यकता नाही. थोडासा लिंबू पिळू शकता. आवडत असल्यास चाट मसाला देखील घालू शकता.

४. आता हाताने याचे छोटे छोटे पॅटिस बनवा. मिश्रण अगदीच मिळून येत नसेल तर एखादा चमचा बेसन अथवा रवा घाला. पॅटीस फार जाड नकोत. पण अगदीच पातळदेखील करू नका.

५. नॉनस्टिक पॅनवर एखादा चमचा तेल घाला. तेलावरती हे पॅटिस दोन्ही बाजूनी भाजून घ्या. इच्छा असल्यास डीप फ्राय पण करता येतील. पण पोहे खूप तेल पितात.

५. सॉस अथवा एखाद्या चटणीबरोबर खायला द्या.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. वाटपामधे थोडासा पुदिना घातल्यास वेगळी आणि छान चव येते.
२. हवं असल्यास, यामधे थोडे किसलेले गाजर अथवा ठेचलेले मटार देखील घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई, रूचिरा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त होईल असं वाटतंय.
जाड्या पोह्यांऐवजी पातळ पोहे वापरले तर काय फरक पडेल (माझ्याकडे सध्या पातळ पोहे संपवणे महोत्सव चालू आहे Happy )

मी कधी वापरले नाहीत. तू करून बघ आणि मला सांग. Happy म्हणजे माझ्याकडचे पातळ पोहे पण जरा संपतील.

चिन्नू, बटाटा घालून मी कधी केले नाहीत. त्यामुळे शॅलो फ्रायला तेल जास्त लागेल का?

मस्त.. पुर्वी वाचलं होतं एका मासिकात. Happy पण करायचा धीर झाला नव्हता.
पॅटीस तेलात टाकल्यावर विरघळतील की काय असं वाटायचं. पण आता करुन बघेन.

आर्या. तेलात टाकूच नकोस. तेलावर अगदी परतून घेतल्यासारखे घे. कमीतकमी तेल वापरून होतात हे पॅटिस.

पातळ पोहे वापरले तर काय फरक पडेल
>>
पोह्यांचा पीठाचा असतो तसा गच्च गोळा होईल. (स्वानुभव Proud )

मस्त वाटतायत. बनवुन बघायला हवेत.

पोह्यांचा पीठाचा असतो तसा गच्च गोळा होईल. <<<
अरेरे म्हणजे दडपे पोहे आणि दहीपोहे खेरीज महोत्सवात कुणालाच स्थान नाही की काय Happy

ही जुन्या मायबोलीवर लिहिली होतीस ना? मस्त होतात पॅटिस एकदम.
पातळ पोहे पण चालतात, एकदा अपघाताने वापरले होते, पोहे धुवून टाकल्यावर लक्षात आले. मग ते निथळायला भरपूर वेळ जाऊ दिला. पण पातळ पोह्यांचेच पॅटीस जास्त चांगले लागले Wink

ही जुन्या मायबोलीवर लिहिली होतीस ना????>> मी? खरंच आठवत नाही. हे पॅटिस मी बर्‍याच वर्षापासून करतेय पण जुन्या माबोवर रेसिपी लिहिल्याचे आठवत नाही. Happy

अवल, आज कर आणि फोटो टाक.

हायला. Happy संपदा, धन्यवाद.

बस्कूची कमेंट वाचून तर अजूनच मजा वाटली. वो भी क्या दिन थे.. Happy

मी पोह्याचे थालीपीठ ही रेसिपी टाकली होती. थोड्याफार फरकाने अशीच कृती आहे. तिथेच कुणीतरी कटलेट्स ची आयडीया ही सुचविली होती. Happy आता थालीपीठाऐवजी कटलेट / पॅटिसही करून पाहीन.

मागील वेळेस ह्याच सारणात पोह्यांबरोबर थोडे ओट्स ही टाकले होते. छान खरपूस थालीपीठे झाली होती. पॅटिसच्या बाबतीतही असे ट्राय करता येईल.

अरे वा! सही आहे क्रुति!

नी! पातळ पोह्या.न्चे "काकडि पोहे" कर सही होतात..कुती फार काही नाही काकडी चिरुन/ कोचवुन त्याला मीठ ,साखर लावायचे. सुटलेल्या पाण्यातच पोहे भिज्वायचे वरुन मिर्चिची फोडणि आणी कोथि.न्बिर मस्ट्च असल्यास ओल खोबर टाकायचे.फार कोरडे वाटले तर चमचा भर दही मिसळायचे.

छान रेसिपी.
पेस्टबरोबरच थोडं आलं, लसूण व कांदा अगदीं बारीक चिरून कच्चंच पोह्यात मिसळलं, तर अधिकच लज्जत येईल असं वाटतं. करून बघतों व सांगतो .

नंदु, जर बटाटा कच्चा खिसल्यास तेल लागेल जास्त, पण उकडलेल्या बटाट्याला नाही लागणार जास्त तेल, शिवाय पीठ मिळून येइल.