बाकर वडी

Submitted by अवल on 21 December, 2012 - 00:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाकर (सारण) :
निवडून चिरलेली कोथिंबीर ४ वाट्या
आलं, लसूण वाटण एक चमचा
हिरवी मिरची वाटण २ चमचे
दोन कांदे उभे चिरून खरपूस तळून
एक वाटी किसलेले सुके खोबरे, भाजून
तीळ एक चमचा, भाजून
खसखस एक चमचा, भाजून
हळद अर्धा चमचा
तिखट एक चमचा
मीठ चवीप्रमाणे
बेसन एक चमचा
पारी साठी :
बेसन दोन वाट्या
कणीक ४ चमचे
मीठ चवीपुरते
तेल एक चमचा
पाणी आवश्यकते प्रमाणे
तळणासाठी :
तेल आवश्यकते नुसार
एक चमचा मैदा अर्धा वाटी पाण्यात भिजवून

क्रमवार पाककृती: 

"आई" ची सांबारवडी वाचून आठवण झाली कामतकाकींच्या बाकर वडीची. म्हणून तिची रेसिपी. फोटो नंतर.
सारणाचे सर्व साहित्य एकजिव करावे. हे सारण कोरडेच असल्याने थोडे मोकळे राहते.
पारीसाठीचे साहित्य एकत्र करून पु-यांसाठी भिजवतो तेव्हढे घट्ट भिजवून घ्या.
पोळीसाठी घेतो तेव्हढा गोळा घेऊन लाटा. फुलक्यांसाठी लाटतो तेव्हढे पांतळ लाटा. त्याला तेलाचा हात लावा. आता सारण एक यावर पसरा. सारणाचा थर साधारण एक इंच उंचीचा हवा. आता या सर्वाचा सारण दाबत दाबत रोल करा. शक्य तेव्हढा घट्ट रोल करा. धारधार सुरीला तेल लावून या रोलच्या ७-८ वड्या कापून घ्या.
अशा सर्व वड्या तयार करून घ्या.
तेल तापवत ठेवा. तेल तापले की या वड्यांना मैदा भिजवलेल्या पाण्याचे एक बोट मोकळ्या बाजूंवर फिरवा. आता आच मंद करून ह्या वड्या खरपूस तळून घ्या.
ह्या वड्या थंडीत ४-५ दिवसात संपवाव्या लागतात. ( खरं तर इतक्या चटपटीत लागतात की चार दिवस उरतच नाहीत Happy ) दिवाळीत फराळाचे बरेच गोड होते. त्यावर या बाकर वड्यांचा उपाय जरूर करून बघा.

वाढणी/प्रमाण: 
३०-३२ बाकर वड्या होतील.
अधिक टिपा: 

तळणाच्या तेलात ब-यापैकी सारण उतरते. त्यामुळे तळणीला तेल घालताना जरा जपून . राहिलेल्या तेलात मसाले भात करावा फर्मास होतो.

माहितीचा स्रोत: 
बालपणी शेजारी राहणा-या कामत काकी, अन त्यांच्याकडून शिकलेली आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे हिच पद्धत. ( आणि म्हणे चितळ्यांच्या "खर्‍या" )

सारणाचा थर एक इंच नसणार, एक सेमी असणार.

दिनेशदा >>> आणि म्हणे चितळ्यांच्या "खर्‍या" <<< Proud
नाही एक इंचच, कोथिंबीर कोरडी असल्याने ती फुगते ना Happy जितके सारण जास्ती तितक्या वड्या मस्त Happy

फोटो हवा होता. आई मोठी पातळ पोळी लाटते आणि अळुवडीसारखा रोल करते. मग या वड्या ती किंचीत वाफवून पण घेते. आमच्याकडे थोडी चिंच वापरतात त्यामूळे जरा जास्त दिवस टिकतात.

त्या तेलात मग बटाट्याची भाजी केली जाते !

चितळ्यांच्या वड्यात बहुतेक कांदा-लसुंण नसतो.पण मला तरी त्या खरपुस/खुसखुशीत ऐवजी कडकडीत लागतात.
वाफवुन मग तळल्याने खुसखुशीत व टिकाऊ होतील .गुजरात मधे वरच्या पारीला मैदा व अगदी थोडेसे बेसन,,चिंच -गुळ वापरतात तर म.प्र. ला आमचुर चा वापर करतात.बाकी मसाला "सेम".आणि तळलेल्याच असतात.

मी बाकरवड्या घरी कधी केल्या नाहीयेत, पण कव्हराचं साहित्य वाचून एक प्रश्न पडला. एव्हढं बेसन घालून कव्हर मऊ होणार नाही का? मला वाटलं होतं की मैद्यात थोडा रवा घालत असावेत आणि घट्ट मळून नंतर कुटून लाटत असावेत.

ही पुडाची वडी नं? अगदी टिपीकल सीकेपी पाकृ Happy ताजी ताजी खायला एकदम भारी लागते.

चितळ्यांच्या बाकरवडीत कांदा-लसूण नसतो आणि एवढी कोथिंबीरही नसते ना? त्या बाकरवड्या टिकतात भरपूर. आणि हाताशी असल्या की भरपूर खाल्ल्याही जातात Sad

राहिलेल्या तेलात मसाले भात करावा फर्मास होतो.>>
त्या तेलात मग बटाट्याची भाजी केली जाते !>> तळणीचं तेल पुन्हा वापरू नये असे आहे ना?

तळणीचे तेल पुन्हा तळण्यासाठी वापरू नये ! Happy

चितळ्यांकडे उरलेली शेव वापरुन करतात वड्या. त्यात कोथिंबीर / खोबरे काहीसुद्धा नसते.
पण अशा वड्या आता बाहेर फारश्या मिळत नाहीत. कोल्हापुरात दिवाळीच्या सुमारास मात्र नक्की मिळतात.

अवल , भारीच.
पुर्यांसारखे घट्ट, पोळी एवढा गोळा नी फुलक्याईतकी पातळ वाचून मज्जा आली.

कुणी काहिही म्हणो मात्र , मला चितळ्यांची बाकरवडी आवडते.

मंजूडी, त्यादिवशीच तळणीचं तेल वापरलं तरी चालतं.

धन्यवाद सर्वांना.
मंजुडी पुडाची वडी वेगळी. टाकेन त्याची रेसिपी. ही बाकर वडी, खास मराठा रेसिपी आहे Happy
साती, तू पण माझी सख्खी मैत्रिण, लिहिताना मला ही गंमत जाणवली होती Happy
केदार, तुमच्याकडचे हरभ-याचे झाड पोहोचले Wink धन्यवाद !
शोभना, तुला नाही चालणार, भारी तिख्ट लागते ही Wink तुझ्यासाठी वेगळं काही करेन Happy

अवल अगं तू पुर्‍या, पोळ्या, फुलके असं सगळं करून (सवरून), वर आणखी इथे एकाच पाककृतीत त्यांचा उल्लेख्करून... पूर्णं झालीयेस म्हणून अन्नपूर्णा म्हणतोय केदार तुला (बहुतेक)
Happy

अवल, मस्तच पाकृ. करून बघणार. माझ्या सासुबाई कोथिंबीर थोडी वाळवून घेतात... पुडाची वडीच. बाकी तू म्हणतेय्स तस्सच.
तळणीचं म्हणाल तर्...मलाही तळण करायला एव्हढ्यासाठीच आवडत नाही की, तेल पुन्हा वापरता येत नाही. मग?
तळण करण्यापूर्वी ते तेल ज्या कशात गरम असतानाच लग्गेच वापरता येईल त्याची तयारी करून ठेवायची. तळण झालंकी तेल गरम असतानाच दुसर्‍या पदार्थात वापरायचं उदा. अवल म्हणतेय तसा मसालेभात, किंवा शॅलो फ्राय करायच्या वस्तू उदा. अळूवडी इ.
मी अनेकवेळा कांदा तळून ठेवणे केलय. तसच तळण होत आलं की एकीकडे बाजूला कमी तेलात फोडणी करून भाजीसाठीचा कांदा घालायचा. मग जास्तीचं तेल हे तापलेल्यातलं लग्गेच वापरायला हरकत नाही.
(हे युक्ती-बिक्तीत टाकायला हवंका काय?)

दाद, युक्ती वरही टाक.
अवल, तोंडाला पाणी सुटलं. मला नेहमी अवघड आणि किचकट वाटायच्या, तितक्या दिसत नाहीयेत, प्रयत्न केल्यास जमेल असं वाटतंय. की तू सोप्या पद्धतीने लिहिलंयस?? जे असेल ते, पण करून बघेन एकदा.

दिनेश, कोल्हापूरला शाहूपुरीत 'वहिनी' मध्ये बारा महिने मिळतात आणि चविष्ट असतात. अलिकडे ब-यापैकी प्रसिद्धि पावलेल्या आहेत.

मस्त! आई ़करते अशाच!, फ्क्त ती पोळिला आतुन चि.न्चेच पाणि लावते त्यावर सारण ...मलाही चितळ्याच्य सुद्धा आवडतात..
जुन्या हितगुजवर लालुची रेसिपि वाचल्याच आथवत..

छान आहे पाक्रु. चिंचेचे पाणी वापरायचे नाही....चिंचेत तेल घालून मिक्सरमधे फिरवून बारीक करून ते मिश्रण वापरावे. पाण्याने मउ होतात वड्या.
कोणाला हल्ली राजस्थानी दुकानात मिळतात त्या मिनि बाकरवड्यांची कृती माहीत आहे का? त्या पण भारी लागतात.