हे सगळं बोलायचं होतं तुझ्याशी! पण बोलताना गहिवरून येतं आणि दुसरं म्हणजे भावना नीट पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत, वक्तृत्वाची उत्कृष्ट पातळी गाठूनही कदाचित तुझंच नीट लक्ष नसलं तर त्या संवादाला फाटे फुटतात असाही एक अनुभव आहे गाठीशी! मग ते पोहोचतं पार पहिल्यापासूनच्या संदर्भांपर्यंत आणि हिशोब करत करत आत्तापर्यंत पुढे यायचं आणि शेवटी पर्याय नसल्याने पुन्हा जुळवून घ्यायचं या नेहमीच्या पायर्या चढल्या की नवीन असमाधानांना जागा मिळण्यासाठी मन मोकळे होते, इतकेच फक्त मिळते त्यातून. पण मला तितकेच नको आहे आज.
काल तुझ्या धाकट्या भावाच्या फ्लॅटवर राहायला गेलो आपण. त्याचा साडे तीन वर्षाचा मुलगा तनिष, म्हणजे तुझा भाचा, दुपारी शाळेतून आजीच्या, म्हणजे आपण राहत आहोत त्या घरी आला आणि तू त्याच्याशी खेळत राहिलीस. मी झोपलो, चालून आलो, इंटरनेटवर वेळ घालवला आणि हे सगळे करत असताना मी तुझे त्या मुलावर प्रेम उधळणे पाहात राहिलो. तुमचा दोघांचा आरडाओरडा, दंगा, लटकी रागवारागवी, खाऊ, बाहेर जाऊन येणे, कसली कसली आमीषे आणि शेवटी आपण तिघांनी तुझ्या भावाच्या, म्हणजे तनिषच्याच घरी ठरल्यानुसार राहायला जाणे!
तिथे पोचल्यावर तर तनिषचे बाबा म्हणजे तुझा धाकटा भाऊ, तू आणि तनिष यांच्या धिंगाण्याला सीमा राहिली नाही. इतका आवाज, इतकी धावपळ! या सगळ्यात उठून दिसणारं तुझं 'नैमित्तिक आईपण'! लोभसवाणं होतं ते. तेव्हाच माझ्या मनात यायला लागलं होतं की तू इतकी आनंदात दिसत होतीस की हा आनंद तुझ्यासारख्या हासर्या, उत्फुल्ल, प्रेमळ आणि कर्तबगार स्त्रीला कायम मिळायला हवा खरे तर. तुझे ते रूप मी आपला साठवून ठेवत होतो मनात. मला त्या आवाजाने कलकल झाली तरीही तुला आणखी बरे वाटावे म्हणून मी तुमच्या तिघांच्या खेळात स्वतःहून सामील होऊन इतर कोणापेक्षाही तुला अधिक समाधानी वाटावे म्हणून दंगा करत होतो.
मग त्याची आई ऑफीसमधून आली. तिने स्वयंपाक हाती घेतला. तू एकीकडे तनिष, तनिष असा घोष करत आणि तनीषचा अधिकाधिक सहवास मिळेल याचा अविरत प्रयत्न करत तब्बल अकरा वर्षांनी लहान असलेल्या तुझ्या वहिनीला मदतही करू लागलीस. तू तनिषसाठी आणलेले हेलिकॉप्टर त्याच्या हातून एका तासात मोडलेले पाहून 'आपण दुसरे आणू हां' म्हणालीस. तू त्याच्यासाठी आणलेल्या बीनबॅगवरून तो हालेना हे पाहून कौतुकाने त्याला खोटेखोटेच तेथून ओढायचा प्रयत्न करत हासत राहिलीस. कोणाला काही मिळो न मिळो, मला तुझ्यातील आईपणाचा धबधबा दिसत होता. मी तो मनाच्या डोहात सामावून घेऊनही तो ओसंडून इकडे तिकडे वाहातच राहिला.
सगळ्यांनी जेवायला बसण्यापूर्वी तनिषचे जेवण आवश्यक होते. तुझ्याच मांडीत बसून त्याला जेवायचे होते. जेवलाही. कोण कौतुक होते तुझ्या चेहर्यावर. 'माझ्याच हातून घास घेतोय तो' म्हणत माझ्याकडे बघत होतीस. मनाने खूप चांगले असलेल्या पण 'माझ्याच संमिश्र व त्यामुळे विश्वासार्हता गमावलेल्या व्यक्तीमत्वामुळे माझ्यावर टीका करणार्या' सदस्यांची मते वाचत मी इंटरनेटचे बिल वाढवत बसलो असताना तुमच्या दोघांच्या त्या गोंधळाचा मला व्यत्यय होत होता. तरीही, तुझा इतका आनंदी चेहरा पाहणे तसे दुर्मीळच असल्याने मी डोके बाहेर काढून तुझ्या हासण्याला हसून प्रत्युत्तर देत होतो.
तो जेवत असतानाच तू आत्मविश्वासाने त्याला विचारलेसः
"तन्या तू कोणाकडे झोपणार? आत्याकडे का आईबाबांकडे?"
साडे तीन वर्षाच्या त्या जिवाच्या चेहर्यावर तीन चार क्षण आलेला गोंधळ आपले चारही चेहरे स्तब्धपणे पाहात राहिले आणि शेवटी तनिष म्हणाला:
"तुझ्याबरोबर"
हासलो चौघेही, पण प्रत्येक हासण्याचे कारण निराळे होते. त्याचे आई बाबा हासले कारण आपल्या मुलाला आत्या इतक्या दिवसांनी भेटूनही तिचा लळा आहे याचे समाधान त्यांच्या मनात होते. तू हासलीस कारण एक संपूर्ण रात्र 'आपल्याही कुशीत एक बाळ असावे' हे स्वप्न पूर्ण होणार होते तुझे! आणि मी हासलो कारण तू त्या कारणासाठी हासत होतीस.
जेवणे झाली, आवराआवर झाली, गप्पा झाल्या तरी तनिषचा दंगा चालूच होता. शेवटी एकदा त्याने आईसक्रीम खाल्ले आणि मग मात्र तो पेंगुळला. त्याला त्याच्या बाबांनी उचलून बेडरूममध्ये नेले. दुसर्या बेडरूममध्ये त्याचे बाबा एकटे झोपणार होते. तू, तनिष आणि तनिषची आई त्यांच्या बेडरूममध्ये आणि मी हॉलमध्ये! तू तनिषला कुशीत घेऊन त्याच्याशी गप्पा मारत त्याला थोपटू लागलीस. त्याची आईही शेजारी पडून ते कौतुक बघत राहिली. सामसूम व्हायची वेळ झाली आणि तनिषचे बाबा खोलीच्या दारात उभे राहून कौतुकाने म्हणाले:
"गुड नाईट तनिष"
तनिषने बाबांकडे पाहात विचारले:
"तुम्ही कुठे झोपणार आहात?"
"मी इकडे झोपतोय, तू आई आणि आत्याच्यामधे झोप"
तेवढ्यात तनिषच्या आईने तनिषला पुन्हा विचारले.
"तुला कोण हवंय? आत्या का बाबा?"
मी हॉलमध्ये लवंडलेलो होतो. पुन्हा चारजणांचे आठ कान त्या उत्तरासाठी अधीर झालेले असताना तनिष त्याच्या बाबांकडे पाहात म्हणाला
"बाबा"
खरंच सांगतो, त्या क्षणी तुझ्या आणि त्याच्या नात्यातला जो फोलपणा तुला जाणवला असेल, तोच इकडे मलाही जाणवला. खरंच डोळे भरून आले. तू त्याला बहुतेक थोपटून बाहेर आलीस आणि आतल्या खोलीकडे एकटी निजायला वळलीस. मी लगेच उठलो आणि तुझ्या खोलीत आलो. तुझा चेहरा मला बघवतच नव्हता. किती साधीसाधी सुखे असतात, जी दूर होतात क्षणार्धात! त्या चिमण्या जिवाला त्याचे काय आकलन होणार! तुला त्या रात्रीने दिलेले 'उधारीच्या आईपणाचे' आश्वासन त्या रात्रीने नाही पाळले. मी तुझ्याशी जुजबी संवाद करून हॉलमध्ये येऊन आडवा झालो.
तू गाढ झोपली असशील, मी इंटरनेटवर एक वाजेपर्यंत वेळ घालवला असेल, पण प्रामाणिकपणे सांगतो, माझे डोळे वाहात होते.
आणि आज सकाळी?
आज सकाळी आपण दोघे नेहमीप्रमाणेच सहा साडेसहाला जागे होऊनही आपापल्या बेडवर पहुडलेले होतो. तनिषचे आई बाबा थोड्या वेळाने उठताच तूही तुझ्या खोलीतून उठून बाहेर आलीस. ब्रश करून कॉफी घेण्यात तू जेमतेम अर्धा तास कसाबसा घालवलास आणि तुझ्या मनातला प्रश्न तुझ्या तोंडून बाहेर आलाच. तनिषलाही उठवावे लागणार होते. शाळा होती सकाळचीच. त्याचे सगळे आवरावे लागणार होते. बाळाला निजवण्याचे नाही तर निदान जागवण्याचे सुख आपल्यापासून हिरावले घेतले जाऊ नये म्हणून तू दोघांना उद्देशून विचारलेसः
"त्याला आता उठवावेच लागेल ना?"
दोघेही त्या प्रश्नातील खरा अर्थ न कळून सहजपणे "हो, आता साडे सात वाजतच आलेत" म्हणाले. तू लगबगीने तनिषच्या खोलीत जाऊन त्याच्याशेजारी झोपलीस. त्यांच्या बेडरूममधील झोपून उठल्यानंतरची अस्ताव्यस्तता, पांघरुणांचा गदारोळ, कशाचीच तुला चिंता नव्हती. तनिषला कुशीत घेऊन त्याला थोपटत थोपटत आणि लाडेलाडे बोलत तू त्याला जागे केलेस. त्याची नेहमीप्रमाणे अखंड बडबड सुरू झाली. तुला आनंद हा, की त्याची आज सकाळची बडबड तुझ्या कुशीत आणि तू जागे केल्यामुळे सुरू झाली. पुन्हा खरं सांगतो, मला तुझी सुखाची व्याख्या पाहूनच भरून आले गं!
मग तू त्याला दूध दिलेस, आंघोळ घातलीस, शाळेचा चिमुकला युनिफॉर्म त्याच्या अंगावर चढवलास. जणू तुझा मुलगा पहिल्यांदाच शाळेत जात असावा तसे कौतुक केलेस. आणि नऊ वाजता तनिष त्याच्या बाबांच्या गाडीत बसून शाळेत निघून गेला.
त्याच्या आईशी जुजबी बोलून आपणही दोघे निघालो. मी तुझ्या नकळत सहज तुझ्याकडे पाहिले तर तो उधारीचा आनंद त्याचे उरलेसुरले अवशेष अजूनही तसेच ठेवून तुझ्या नेहमीच्याच चेहर्याला मातृत्वाची एक उसनी झळाळी देत वार्यावर उडत होता.
आजचा दिवस निराळा! आजची प्राधान्ये निराळी!
पण...... यशःश्री.... खरं सांगतो.... तुला ती कालची रात्र पूर्ण आईपणाची मिळायला हवी होती गं!
पण प्रश्न असा आहे की हे सगळं मला जाणवतं हेही तुला सांगणे मला जिकीरीचे वाटते. कारण त्याने तू अधिकच दु:खी व्हायचीस.
हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं! .... पण.... !!!!!!
ते तुझ्याशी बोलून तुला खट्टू करण्याचे धाडस नाही आहे माझ्यात!
==================================
-'भूषण'!
डोळे पाणावले
डोळे पाणावले वाचतावाचता.......
मी नेहमी बेफिचं लेख वाचल्यावर
मी नेहमी बेफिचं लेख वाचल्यावर खालील प्रतिसाद वाचतेय आणि सगळ्यांचा टीका, प्रशंसेंवर बेफिंचे उत्तर पाहते. पण आज ही ईच्छा अपुर्ण राहीली. त्यानी स्वःताच्या दु:खावर, वेदनेवर एकही प्रतिसाद नाही दिलाय. त्यांचा हा अबोलाचं सर्व काही सांगुन जातोय.
आणि मित्रहो दत्तक घ्यायचं म्हणार तर तो निर्णय खुप अवघड असतो दोघांसाठी. हा अनुभव मात्र नक्कीच सुखद असतो एक गोंड्स जीवाच्या पालन-पोषण करण्याचा.
जेव्हा एका दांपत्यांना मुलं हवं असतं ना तेव्हा एक पुरुष त्या बाळामध्ये स्वःताचा अंश शोधत असतो, आणि एका स्त्री साठी तो स्व:ताचा हाडां-मासाचा गोळा असावा लागतो. दत्तक घेतलेले कितीतरी उदाहरण मी पाहीली आहेत आणि८० ते ९० ट्क्के ते सक्सेसफुलही असतात. पण प्लिझ तुम्ही दोघांनीही एकामेंकांच्या सहमतीने आणि संमतीनेच हा निर्णय घ्यावा हीच प्रेमळ ईच्छा आहे.
नांदा सौख्य भरो.
प्रतिसाद वाचून विषय समजला
प्रतिसाद वाचून विषय समजला होता.. वाचावेसे वाटत नव्हते पण... शेवटी रडवलेतच..
लहान आहे, सल्ला काय देणार, पण कधी दत्तक घेतलेच तर त्या मुलाचे आपल्या घरात लाईफ बनेल यात शंका नाही...
तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा..
बेफिकीर, डोळ्यातून पाणी
बेफिकीर,
डोळ्यातून पाणी काढलेत. आधीच ती दिल्लीची मुलगी गेल्याचे वृत्त वाचले, पाठोपाठ हा लेख.
तुमच्या लेखणीला काहीतरी वरदान आहे.
मायभूमीवर फार चांगली लोकांशी ओळख होत आहे. जोडल्याचे सार्थक झाले.
तुम्ही नुसत्याच प्रतिक्रिया लिहू नयेत असे वाटते. तुमच्यात काहीतरी विशेष आहे.
बेफिकीर, माझा आपला परिचय
बेफिकीर,
माझा आपला परिचय नाही. पण असे आग्रहाने सांगावेसे वाटते - दत्तक घ्या. मी माझ्या जवळच्या नातलगांना त्या
procedure मधून जातांना पहिले आहे. फार मानसिक त्रास होतो. पण नंतर खूप आनंद वाटतो.
Inaction is a SIN.
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः || (सिंह झोपून राहीला तर त्याच्या मुखात हरीण स्वतःच प्रवेश करत नाहीत)
तुम्हास आणि तुमच्या पत्नीस शुभेच्छा.
_____________________________
______________________________________
मला पाहून तू का त्याक्षणी हसलीस डोळ्यातुन
मला माहीत आहे..... हे तुला माहीत आहे ना ?
तुझी आईपणाची रात्र अन् मी बाप होण्याची
तुझ्यातच पाहिले, माझ्या मुला .....माहीत आहे ना ?
______________________________________
कधी कधी ससमोरच्यास आणि स्वतःसही इतकेही भावुक करण्यात अर्थ नसतो म्हणून थांबतो
चुक भूल द्यावी घ्यावी
अतिशय सुरेख .मोकिमी ला
अतिशय सुरेख .मोकिमी ला अनुमोदन.
खरच एक बाळ दत्तक घ्या
नि:शब्द!
नि:शब्द!
सुंदर लिहीलंत! थेट काळजाला
सुंदर लिहीलंत! थेट काळजाला भिडलं.
खुप सुंदर लिहिलतं बेफिकिर
खुप सुंदर लिहिलतं बेफिकिर जी.. आज ब-याच दिवसांनी माबो वर आले आणि तुमचा इतका ह्र्दयस्पर्शी लेख वाचला.. डोळे ओलावले ............
वाचून अस्वस्थ झालो आहे...
वाचून अस्वस्थ झालो आहे... बाकी फोन वर बोलूत..
हे मनात चाललेलं सर्व
हे मनात चाललेलं सर्व लिहिण्याचं कौशल्य आहेच तुमच्याकडे.
ललित म्हणुन छानच पण हे वास्तव असल्याने छानही म्हणवत नाहिये.
<<< झकासला अनुमोदन.. आणि स्वातीलाही.
खुप छान....
खुप छान....
हा लेख अनेकदा वाचलाय. कधीच
हा लेख अनेकदा वाचलाय. कधीच प्रतिक्रिया दिली नाही. द्याविशी वाटली नाही. या लेखाच्या आधीच स्त्रियांच्या ड्रेसकोड आणि नंतर इतर काही धाग्यांवरची तुमची आक्रमक मतं वाचून तिथेही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण आता हा लेख एका वेगळ्या संदर्भात वाचला. म्हणून ही थोडीशी स्पष्ट प्रतिक्रिया.
लेख अतिशय भावनांत ओलावलेल्या शब्दांतला असला तरी पण खूपच वैयक्तिक पातळीवरचा आहे. हा विषय फक्त त्या दोघांतला असायला हवा आणि याचे भान प्रत्येकाला असते. ज्याच्याबद्दल आपण लेख लिहीतो, त्याची संमती आपण घेतलेली असावी अशी अपेक्षा असते. अशा प्रकारच्या लेखासाठी कुणीही स्त्री परवानगी देईल का ही शंका सर्वप्रथम मनात आली. या सर्व भावना बोलून दाखवणे हेच सर्वात योग्य ठरलं असतं. जर बोलून दाखवायचे नव्हते तर ते सार्वजनिक करणे आणि ते ही नावानिशी यात नेमकं काय साध्य करायचंय ?
प्रत्येकाला काही न काही दु:खं असतं. त्यातून काही जणांना व्यक्त व्हावंसं वाटतं. त्याचं प्रकटीकरण खा़जगी अनुभव म्हणून न होता एक साहीत्यिक कलाकृती म्हणून झाल्यास अप्रत्यक्षरित्या भावनांना मोकळी वाट तर मिळतेच मिळते, शिवाय वाचकालाही लेखकाच्या खाजगी आयुष्यात न डोकावता त्या दु:खाची / भावनेची अनुभूती मिळते. वाचक जर अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेला असल्यास त्याला त्या चित्रात स्वतः दिसणे ही स्वाभाविक गोष्ट घडते. भावनेवर लिहीलं जावं, त्या भावना कुणाच्या आहेत याचे नामोल्लेख टाळले जावेत.
एखाद्याला सिनेमा पाहताना एखाद्याने भान हरपून तो पाहणे आणि उद्या ब्लॉगवर काय लिहीता येईल या विचारातून त्याने तो पाहणे, समुद्रकिनारी त्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटणे आणि उद्या कुठले फोटो अपलोड करता येतील या विचारातून त्या क्षणांचा विनियोग करणे यातला फरक आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात राहू नये ही प्रामाणिक भावना इथे बोलून दाखवाविशी वाटते आहे. तुम्ही ती समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. त्यात दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.
( अवांतर : दुर्दैवाने अशा प्रकारच्या अॅब्स्ट्रॅक्ट कविता, साहीत्यरचना यावर तुम्ही सडकून टीका केलेल्या आहेत. अशा साहीत्याला अतिशय हीन लेखणारे तुमचे प्रतिसाद वाचनात आल्याने त्यावर चर्चा केली नाही. कुणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्याला दुखावणारे तुमचे प्रतिसाद पुढे चर्चा करू देत नाहीत. त्यामागे तुमचा विचार असेल. पण जे अशा पद्धतीने विचार करतात, त्यांचाही व्यक्त होण्याचा अधिकार असतो ज्याचा आदर राखला जात नाही. तुम्हाला जे पटतं त्याचप्रमाणे सर्वांनी व्यक्त व्हावं या पद्धतीची तुमची आक्रमक मतं अनाकलनीय आहेत. या निमित्ताने हे अवांतर थोडंसं स्पष्ट पण गरजेचं वाटलं ).
खुप सुंदर लिहिलतं बेफिकीर !
खुप सुंदर लिहिलतं बेफिकीर ! मनाला भिडलं !
अरे... हे कस काय मिसल बर मी
अरे... हे कस काय मिसल बर मी एवढे दिवस?
बर झाले आज तरी मिळले वाचयला. आता पर्यन्त तुमच्या वाचलेल्या सगळ्या लेखनात सर्वात जास्त
भावलेले आहे हे लिखाण....अगदी भिडलं मनाला....
तुमची तगमग समजेली... अगदी रीलेट पण झाली..... कारण जवळ्ची व्यक्ती ह्या मधून गेली होती काही काळ आणी आता ती आई झाली आहे बरयाच ट्रिट्मेन्ट्स नन्तर...
मनातलं साथीदारापर्यंत पोहोचवा पण नककी... यशश्री ना वाचायला दयाच...त्याना खूप बरे वाटेल की तुम्ही जाणता त्यान्च्या भावना...
आज दुसर्यांदा वाचल आणि धीर
आज दुसर्यांदा वाचल आणि धीर एकवटुन लिहितेय, खुपच छान! नि:शब्द!! जखम भळभळली....
वाचुन डोळ्यात पाणी आलं.
वाचुन डोळ्यात पाणी आलं.
बेफि आताच वाचलं अपूर्णता आतून
बेफि आताच वाचलं
अपूर्णता आतून हलवून गेली
Pages