हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं... पण!

Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2012 - 02:17

हे सगळं बोलायचं होतं तुझ्याशी! पण बोलताना गहिवरून येतं आणि दुसरं म्हणजे भावना नीट पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत, वक्तृत्वाची उत्कृष्ट पातळी गाठूनही कदाचित तुझंच नीट लक्ष नसलं तर त्या संवादाला फाटे फुटतात असाही एक अनुभव आहे गाठीशी! मग ते पोहोचतं पार पहिल्यापासूनच्या संदर्भांपर्यंत आणि हिशोब करत करत आत्तापर्यंत पुढे यायचं आणि शेवटी पर्याय नसल्याने पुन्हा जुळवून घ्यायचं या नेहमीच्या पायर्‍या चढल्या की नवीन असमाधानांना जागा मिळण्यासाठी मन मोकळे होते, इतकेच फक्त मिळते त्यातून. पण मला तितकेच नको आहे आज.

काल तुझ्या धाकट्या भावाच्या फ्लॅटवर राहायला गेलो आपण. त्याचा साडे तीन वर्षाचा मुलगा तनिष, म्हणजे तुझा भाचा, दुपारी शाळेतून आजीच्या, म्हणजे आपण राहत आहोत त्या घरी आला आणि तू त्याच्याशी खेळत राहिलीस. मी झोपलो, चालून आलो, इंटरनेटवर वेळ घालवला आणि हे सगळे करत असताना मी तुझे त्या मुलावर प्रेम उधळणे पाहात राहिलो. तुमचा दोघांचा आरडाओरडा, दंगा, लटकी रागवारागवी, खाऊ, बाहेर जाऊन येणे, कसली कसली आमीषे आणि शेवटी आपण तिघांनी तुझ्या भावाच्या, म्हणजे तनिषच्याच घरी ठरल्यानुसार राहायला जाणे!

तिथे पोचल्यावर तर तनिषचे बाबा म्हणजे तुझा धाकटा भाऊ, तू आणि तनिष यांच्या धिंगाण्याला सीमा राहिली नाही. इतका आवाज, इतकी धावपळ! या सगळ्यात उठून दिसणारं तुझं 'नैमित्तिक आईपण'! लोभसवाणं होतं ते. तेव्हाच माझ्या मनात यायला लागलं होतं की तू इतकी आनंदात दिसत होतीस की हा आनंद तुझ्यासारख्या हासर्‍या, उत्फुल्ल, प्रेमळ आणि कर्तबगार स्त्रीला कायम मिळायला हवा खरे तर. तुझे ते रूप मी आपला साठवून ठेवत होतो मनात. मला त्या आवाजाने कलकल झाली तरीही तुला आणखी बरे वाटावे म्हणून मी तुमच्या तिघांच्या खेळात स्वतःहून सामील होऊन इतर कोणापेक्षाही तुला अधिक समाधानी वाटावे म्हणून दंगा करत होतो.

मग त्याची आई ऑफीसमधून आली. तिने स्वयंपाक हाती घेतला. तू एकीकडे तनिष, तनिष असा घोष करत आणि तनीषचा अधिकाधिक सहवास मिळेल याचा अविरत प्रयत्न करत तब्बल अकरा वर्षांनी लहान असलेल्या तुझ्या वहिनीला मदतही करू लागलीस. तू तनिषसाठी आणलेले हेलिकॉप्टर त्याच्या हातून एका तासात मोडलेले पाहून 'आपण दुसरे आणू हां' म्हणालीस. तू त्याच्यासाठी आणलेल्या बीनबॅगवरून तो हालेना हे पाहून कौतुकाने त्याला खोटेखोटेच तेथून ओढायचा प्रयत्न करत हासत राहिलीस. कोणाला काही मिळो न मिळो, मला तुझ्यातील आईपणाचा धबधबा दिसत होता. मी तो मनाच्या डोहात सामावून घेऊनही तो ओसंडून इकडे तिकडे वाहातच राहिला.

सगळ्यांनी जेवायला बसण्यापूर्वी तनिषचे जेवण आवश्यक होते. तुझ्याच मांडीत बसून त्याला जेवायचे होते. जेवलाही. कोण कौतुक होते तुझ्या चेहर्‍यावर. 'माझ्याच हातून घास घेतोय तो' म्हणत माझ्याकडे बघत होतीस. मनाने खूप चांगले असलेल्या पण 'माझ्याच संमिश्र व त्यामुळे विश्वासार्हता गमावलेल्या व्यक्तीमत्वामुळे माझ्यावर टीका करणार्‍या' सदस्यांची मते वाचत मी इंटरनेटचे बिल वाढवत बसलो असताना तुमच्या दोघांच्या त्या गोंधळाचा मला व्यत्यय होत होता. तरीही, तुझा इतका आनंदी चेहरा पाहणे तसे दुर्मीळच असल्याने मी डोके बाहेर काढून तुझ्या हासण्याला हसून प्रत्युत्तर देत होतो.

तो जेवत असतानाच तू आत्मविश्वासाने त्याला विचारलेसः

"तन्या तू कोणाकडे झोपणार? आत्याकडे का आईबाबांकडे?"

साडे तीन वर्षाच्या त्या जिवाच्या चेहर्‍यावर तीन चार क्षण आलेला गोंधळ आपले चारही चेहरे स्तब्धपणे पाहात राहिले आणि शेवटी तनिष म्हणाला:

"तुझ्याबरोबर"

हासलो चौघेही, पण प्रत्येक हासण्याचे कारण निराळे होते. त्याचे आई बाबा हासले कारण आपल्या मुलाला आत्या इतक्या दिवसांनी भेटूनही तिचा लळा आहे याचे समाधान त्यांच्या मनात होते. तू हासलीस कारण एक संपूर्ण रात्र 'आपल्याही कुशीत एक बाळ असावे' हे स्वप्न पूर्ण होणार होते तुझे! आणि मी हासलो कारण तू त्या कारणासाठी हासत होतीस.

जेवणे झाली, आवराआवर झाली, गप्पा झाल्या तरी तनिषचा दंगा चालूच होता. शेवटी एकदा त्याने आईसक्रीम खाल्ले आणि मग मात्र तो पेंगुळला. त्याला त्याच्या बाबांनी उचलून बेडरूममध्ये नेले. दुसर्‍या बेडरूममध्ये त्याचे बाबा एकटे झोपणार होते. तू, तनिष आणि तनिषची आई त्यांच्या बेडरूममध्ये आणि मी हॉलमध्ये! तू तनिषला कुशीत घेऊन त्याच्याशी गप्पा मारत त्याला थोपटू लागलीस. त्याची आईही शेजारी पडून ते कौतुक बघत राहिली. सामसूम व्हायची वेळ झाली आणि तनिषचे बाबा खोलीच्या दारात उभे राहून कौतुकाने म्हणाले:

"गुड नाईट तनिष"

तनिषने बाबांकडे पाहात विचारले:

"तुम्ही कुठे झोपणार आहात?"

"मी इकडे झोपतोय, तू आई आणि आत्याच्यामधे झोप"

तेवढ्यात तनिषच्या आईने तनिषला पुन्हा विचारले.

"तुला कोण हवंय? आत्या का बाबा?"

मी हॉलमध्ये लवंडलेलो होतो. पुन्हा चारजणांचे आठ कान त्या उत्तरासाठी अधीर झालेले असताना तनिष त्याच्या बाबांकडे पाहात म्हणाला

"बाबा"

खरंच सांगतो, त्या क्षणी तुझ्या आणि त्याच्या नात्यातला जो फोलपणा तुला जाणवला असेल, तोच इकडे मलाही जाणवला. खरंच डोळे भरून आले. तू त्याला बहुतेक थोपटून बाहेर आलीस आणि आतल्या खोलीकडे एकटी निजायला वळलीस. मी लगेच उठलो आणि तुझ्या खोलीत आलो. तुझा चेहरा मला बघवतच नव्हता. किती साधीसाधी सुखे असतात, जी दूर होतात क्षणार्धात! त्या चिमण्या जिवाला त्याचे काय आकलन होणार! तुला त्या रात्रीने दिलेले 'उधारीच्या आईपणाचे' आश्वासन त्या रात्रीने नाही पाळले. मी तुझ्याशी जुजबी संवाद करून हॉलमध्ये येऊन आडवा झालो.

तू गाढ झोपली असशील, मी इंटरनेटवर एक वाजेपर्यंत वेळ घालवला असेल, पण प्रामाणिकपणे सांगतो, माझे डोळे वाहात होते.

आणि आज सकाळी?

आज सकाळी आपण दोघे नेहमीप्रमाणेच सहा साडेसहाला जागे होऊनही आपापल्या बेडवर पहुडलेले होतो. तनिषचे आई बाबा थोड्या वेळाने उठताच तूही तुझ्या खोलीतून उठून बाहेर आलीस. ब्रश करून कॉफी घेण्यात तू जेमतेम अर्धा तास कसाबसा घालवलास आणि तुझ्या मनातला प्रश्न तुझ्या तोंडून बाहेर आलाच. तनिषलाही उठवावे लागणार होते. शाळा होती सकाळचीच. त्याचे सगळे आवरावे लागणार होते. बाळाला निजवण्याचे नाही तर निदान जागवण्याचे सुख आपल्यापासून हिरावले घेतले जाऊ नये म्हणून तू दोघांना उद्देशून विचारलेसः

"त्याला आता उठवावेच लागेल ना?"

दोघेही त्या प्रश्नातील खरा अर्थ न कळून सहजपणे "हो, आता साडे सात वाजतच आलेत" म्हणाले. तू लगबगीने तनिषच्या खोलीत जाऊन त्याच्याशेजारी झोपलीस. त्यांच्या बेडरूममधील झोपून उठल्यानंतरची अस्ताव्यस्तता, पांघरुणांचा गदारोळ, कशाचीच तुला चिंता नव्हती. तनिषला कुशीत घेऊन त्याला थोपटत थोपटत आणि लाडेलाडे बोलत तू त्याला जागे केलेस. त्याची नेहमीप्रमाणे अखंड बडबड सुरू झाली. तुला आनंद हा, की त्याची आज सकाळची बडबड तुझ्या कुशीत आणि तू जागे केल्यामुळे सुरू झाली. पुन्हा खरं सांगतो, मला तुझी सुखाची व्याख्या पाहूनच भरून आले गं!

मग तू त्याला दूध दिलेस, आंघोळ घातलीस, शाळेचा चिमुकला युनिफॉर्म त्याच्या अंगावर चढवलास. जणू तुझा मुलगा पहिल्यांदाच शाळेत जात असावा तसे कौतुक केलेस. आणि नऊ वाजता तनिष त्याच्या बाबांच्या गाडीत बसून शाळेत निघून गेला.

त्याच्या आईशी जुजबी बोलून आपणही दोघे निघालो. मी तुझ्या नकळत सहज तुझ्याकडे पाहिले तर तो उधारीचा आनंद त्याचे उरलेसुरले अवशेष अजूनही तसेच ठेवून तुझ्या नेहमीच्याच चेहर्‍याला मातृत्वाची एक उसनी झळाळी देत वार्‍यावर उडत होता.

आजचा दिवस निराळा! आजची प्राधान्ये निराळी!

पण...... यशःश्री.... खरं सांगतो.... तुला ती कालची रात्र पूर्ण आईपणाची मिळायला हवी होती गं!

पण प्रश्न असा आहे की हे सगळं मला जाणवतं हेही तुला सांगणे मला जिकीरीचे वाटते. कारण त्याने तू अधिकच दु:खी व्हायचीस.

हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं! .... पण.... !!!!!!

ते तुझ्याशी बोलून तुला खट्टू करण्याचे धाडस नाही आहे माझ्यात!

==================================

-'भूषण'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलू?
सहीच लिहिलेत.
म्हणूनच मागच्या त्या अ‍ॅडॉप्शनच्या धाग्यावर आणि मी तिथे दिलेल्या प्रतिसादावर परत एकदा सिरीयसली विचार करा असे सूचवावेसे वाटते. असो.

खूपच छान. तुमची सहवेदना मन हेलावून गेली. का कोण जाणे पण तुमच्या 'बेफिकीरी'मधे 'फिकीर' नक्कीच आहे हे जाणवून समाधान वाटले.

त्या क्षणी तुझ्या आणि त्याच्या नात्यातला जो फोलपणा तुला जाणवला असेल, तोच इकडे मलाही जाणवला>> ह्यातच सगळ येतं, नाही? हळवे भाव आलेत सारे..
लिहीलंच आहे तर द्याच यशःश्रींना वाचायला... कधी कधी, आपला साथीदार आपली प्रत्येक भावना त्याच्यापरीने पुरेपूर जगलाय हे जाणून घेण्यातही वेगळं समाधान आहे.

लिहीलंच आहे तर द्याच यशःश्रींना वाचायला... कधी कधी, आपला साथीदार आपली प्रत्येक भावना त्याच्यापरीने पुरेपूर जगलाय हे जाणून घेण्यातही वेगळं समाधान आहे.>>>+१

मनातलं साथीदारापर्यंत तरी पोहोचवा .

बेफि

येवढी वेदना बाळगत नका हो जगु.... एक छोटं चिमणं दत्तक घ्या... आमच्या शेजारच्यांनी अत्ताच घेतलय... कित्ती खुश आहेत ते....

एक छोटं बाळ तुम्हा दोघांचं आयुष्य बदलुन टाकु शकत....

बेफी, तुमच्या नावातला तो 'बे' काढून टाका......आर्तता पोचली बेफी! >>>>+१००००००००
मी तुम्हाला कधी भेटलो नाही पण I regard you as one of the best souls I have ever seen or met........अनाहूत सल्ला देतो...रागावू नका...adapt a child and lead a full life....बाकी I am visiting India next week.....दारू सोडली का? If that is the case I have missed a life time opportunity....आणि नसेल तर मस्स्स्स्त बसू :)....please oblige me.....

बेफ़िकीर,
पहिल्यांदाच तुमचं लिखाण पुर्णपणे आवडलं.
बाहेरून कितीही खंबीरतेचा आव आणला आणि रोजचे रुटीन पार पाडत असलो तरी आपण
लहान मुलाबद्दल हळवे होतोच.
निर्णय तुम्ही घ्यालच , पण १ लहान मुल घरात खूप आनंद आणतं एवढं नक्की.

Pages