हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं... पण!

Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2012 - 02:17

हे सगळं बोलायचं होतं तुझ्याशी! पण बोलताना गहिवरून येतं आणि दुसरं म्हणजे भावना नीट पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत, वक्तृत्वाची उत्कृष्ट पातळी गाठूनही कदाचित तुझंच नीट लक्ष नसलं तर त्या संवादाला फाटे फुटतात असाही एक अनुभव आहे गाठीशी! मग ते पोहोचतं पार पहिल्यापासूनच्या संदर्भांपर्यंत आणि हिशोब करत करत आत्तापर्यंत पुढे यायचं आणि शेवटी पर्याय नसल्याने पुन्हा जुळवून घ्यायचं या नेहमीच्या पायर्‍या चढल्या की नवीन असमाधानांना जागा मिळण्यासाठी मन मोकळे होते, इतकेच फक्त मिळते त्यातून. पण मला तितकेच नको आहे आज.

काल तुझ्या धाकट्या भावाच्या फ्लॅटवर राहायला गेलो आपण. त्याचा साडे तीन वर्षाचा मुलगा तनिष, म्हणजे तुझा भाचा, दुपारी शाळेतून आजीच्या, म्हणजे आपण राहत आहोत त्या घरी आला आणि तू त्याच्याशी खेळत राहिलीस. मी झोपलो, चालून आलो, इंटरनेटवर वेळ घालवला आणि हे सगळे करत असताना मी तुझे त्या मुलावर प्रेम उधळणे पाहात राहिलो. तुमचा दोघांचा आरडाओरडा, दंगा, लटकी रागवारागवी, खाऊ, बाहेर जाऊन येणे, कसली कसली आमीषे आणि शेवटी आपण तिघांनी तुझ्या भावाच्या, म्हणजे तनिषच्याच घरी ठरल्यानुसार राहायला जाणे!

तिथे पोचल्यावर तर तनिषचे बाबा म्हणजे तुझा धाकटा भाऊ, तू आणि तनिष यांच्या धिंगाण्याला सीमा राहिली नाही. इतका आवाज, इतकी धावपळ! या सगळ्यात उठून दिसणारं तुझं 'नैमित्तिक आईपण'! लोभसवाणं होतं ते. तेव्हाच माझ्या मनात यायला लागलं होतं की तू इतकी आनंदात दिसत होतीस की हा आनंद तुझ्यासारख्या हासर्‍या, उत्फुल्ल, प्रेमळ आणि कर्तबगार स्त्रीला कायम मिळायला हवा खरे तर. तुझे ते रूप मी आपला साठवून ठेवत होतो मनात. मला त्या आवाजाने कलकल झाली तरीही तुला आणखी बरे वाटावे म्हणून मी तुमच्या तिघांच्या खेळात स्वतःहून सामील होऊन इतर कोणापेक्षाही तुला अधिक समाधानी वाटावे म्हणून दंगा करत होतो.

मग त्याची आई ऑफीसमधून आली. तिने स्वयंपाक हाती घेतला. तू एकीकडे तनिष, तनिष असा घोष करत आणि तनीषचा अधिकाधिक सहवास मिळेल याचा अविरत प्रयत्न करत तब्बल अकरा वर्षांनी लहान असलेल्या तुझ्या वहिनीला मदतही करू लागलीस. तू तनिषसाठी आणलेले हेलिकॉप्टर त्याच्या हातून एका तासात मोडलेले पाहून 'आपण दुसरे आणू हां' म्हणालीस. तू त्याच्यासाठी आणलेल्या बीनबॅगवरून तो हालेना हे पाहून कौतुकाने त्याला खोटेखोटेच तेथून ओढायचा प्रयत्न करत हासत राहिलीस. कोणाला काही मिळो न मिळो, मला तुझ्यातील आईपणाचा धबधबा दिसत होता. मी तो मनाच्या डोहात सामावून घेऊनही तो ओसंडून इकडे तिकडे वाहातच राहिला.

सगळ्यांनी जेवायला बसण्यापूर्वी तनिषचे जेवण आवश्यक होते. तुझ्याच मांडीत बसून त्याला जेवायचे होते. जेवलाही. कोण कौतुक होते तुझ्या चेहर्‍यावर. 'माझ्याच हातून घास घेतोय तो' म्हणत माझ्याकडे बघत होतीस. मनाने खूप चांगले असलेल्या पण 'माझ्याच संमिश्र व त्यामुळे विश्वासार्हता गमावलेल्या व्यक्तीमत्वामुळे माझ्यावर टीका करणार्‍या' सदस्यांची मते वाचत मी इंटरनेटचे बिल वाढवत बसलो असताना तुमच्या दोघांच्या त्या गोंधळाचा मला व्यत्यय होत होता. तरीही, तुझा इतका आनंदी चेहरा पाहणे तसे दुर्मीळच असल्याने मी डोके बाहेर काढून तुझ्या हासण्याला हसून प्रत्युत्तर देत होतो.

तो जेवत असतानाच तू आत्मविश्वासाने त्याला विचारलेसः

"तन्या तू कोणाकडे झोपणार? आत्याकडे का आईबाबांकडे?"

साडे तीन वर्षाच्या त्या जिवाच्या चेहर्‍यावर तीन चार क्षण आलेला गोंधळ आपले चारही चेहरे स्तब्धपणे पाहात राहिले आणि शेवटी तनिष म्हणाला:

"तुझ्याबरोबर"

हासलो चौघेही, पण प्रत्येक हासण्याचे कारण निराळे होते. त्याचे आई बाबा हासले कारण आपल्या मुलाला आत्या इतक्या दिवसांनी भेटूनही तिचा लळा आहे याचे समाधान त्यांच्या मनात होते. तू हासलीस कारण एक संपूर्ण रात्र 'आपल्याही कुशीत एक बाळ असावे' हे स्वप्न पूर्ण होणार होते तुझे! आणि मी हासलो कारण तू त्या कारणासाठी हासत होतीस.

जेवणे झाली, आवराआवर झाली, गप्पा झाल्या तरी तनिषचा दंगा चालूच होता. शेवटी एकदा त्याने आईसक्रीम खाल्ले आणि मग मात्र तो पेंगुळला. त्याला त्याच्या बाबांनी उचलून बेडरूममध्ये नेले. दुसर्‍या बेडरूममध्ये त्याचे बाबा एकटे झोपणार होते. तू, तनिष आणि तनिषची आई त्यांच्या बेडरूममध्ये आणि मी हॉलमध्ये! तू तनिषला कुशीत घेऊन त्याच्याशी गप्पा मारत त्याला थोपटू लागलीस. त्याची आईही शेजारी पडून ते कौतुक बघत राहिली. सामसूम व्हायची वेळ झाली आणि तनिषचे बाबा खोलीच्या दारात उभे राहून कौतुकाने म्हणाले:

"गुड नाईट तनिष"

तनिषने बाबांकडे पाहात विचारले:

"तुम्ही कुठे झोपणार आहात?"

"मी इकडे झोपतोय, तू आई आणि आत्याच्यामधे झोप"

तेवढ्यात तनिषच्या आईने तनिषला पुन्हा विचारले.

"तुला कोण हवंय? आत्या का बाबा?"

मी हॉलमध्ये लवंडलेलो होतो. पुन्हा चारजणांचे आठ कान त्या उत्तरासाठी अधीर झालेले असताना तनिष त्याच्या बाबांकडे पाहात म्हणाला

"बाबा"

खरंच सांगतो, त्या क्षणी तुझ्या आणि त्याच्या नात्यातला जो फोलपणा तुला जाणवला असेल, तोच इकडे मलाही जाणवला. खरंच डोळे भरून आले. तू त्याला बहुतेक थोपटून बाहेर आलीस आणि आतल्या खोलीकडे एकटी निजायला वळलीस. मी लगेच उठलो आणि तुझ्या खोलीत आलो. तुझा चेहरा मला बघवतच नव्हता. किती साधीसाधी सुखे असतात, जी दूर होतात क्षणार्धात! त्या चिमण्या जिवाला त्याचे काय आकलन होणार! तुला त्या रात्रीने दिलेले 'उधारीच्या आईपणाचे' आश्वासन त्या रात्रीने नाही पाळले. मी तुझ्याशी जुजबी संवाद करून हॉलमध्ये येऊन आडवा झालो.

तू गाढ झोपली असशील, मी इंटरनेटवर एक वाजेपर्यंत वेळ घालवला असेल, पण प्रामाणिकपणे सांगतो, माझे डोळे वाहात होते.

आणि आज सकाळी?

आज सकाळी आपण दोघे नेहमीप्रमाणेच सहा साडेसहाला जागे होऊनही आपापल्या बेडवर पहुडलेले होतो. तनिषचे आई बाबा थोड्या वेळाने उठताच तूही तुझ्या खोलीतून उठून बाहेर आलीस. ब्रश करून कॉफी घेण्यात तू जेमतेम अर्धा तास कसाबसा घालवलास आणि तुझ्या मनातला प्रश्न तुझ्या तोंडून बाहेर आलाच. तनिषलाही उठवावे लागणार होते. शाळा होती सकाळचीच. त्याचे सगळे आवरावे लागणार होते. बाळाला निजवण्याचे नाही तर निदान जागवण्याचे सुख आपल्यापासून हिरावले घेतले जाऊ नये म्हणून तू दोघांना उद्देशून विचारलेसः

"त्याला आता उठवावेच लागेल ना?"

दोघेही त्या प्रश्नातील खरा अर्थ न कळून सहजपणे "हो, आता साडे सात वाजतच आलेत" म्हणाले. तू लगबगीने तनिषच्या खोलीत जाऊन त्याच्याशेजारी झोपलीस. त्यांच्या बेडरूममधील झोपून उठल्यानंतरची अस्ताव्यस्तता, पांघरुणांचा गदारोळ, कशाचीच तुला चिंता नव्हती. तनिषला कुशीत घेऊन त्याला थोपटत थोपटत आणि लाडेलाडे बोलत तू त्याला जागे केलेस. त्याची नेहमीप्रमाणे अखंड बडबड सुरू झाली. तुला आनंद हा, की त्याची आज सकाळची बडबड तुझ्या कुशीत आणि तू जागे केल्यामुळे सुरू झाली. पुन्हा खरं सांगतो, मला तुझी सुखाची व्याख्या पाहूनच भरून आले गं!

मग तू त्याला दूध दिलेस, आंघोळ घातलीस, शाळेचा चिमुकला युनिफॉर्म त्याच्या अंगावर चढवलास. जणू तुझा मुलगा पहिल्यांदाच शाळेत जात असावा तसे कौतुक केलेस. आणि नऊ वाजता तनिष त्याच्या बाबांच्या गाडीत बसून शाळेत निघून गेला.

त्याच्या आईशी जुजबी बोलून आपणही दोघे निघालो. मी तुझ्या नकळत सहज तुझ्याकडे पाहिले तर तो उधारीचा आनंद त्याचे उरलेसुरले अवशेष अजूनही तसेच ठेवून तुझ्या नेहमीच्याच चेहर्‍याला मातृत्वाची एक उसनी झळाळी देत वार्‍यावर उडत होता.

आजचा दिवस निराळा! आजची प्राधान्ये निराळी!

पण...... यशःश्री.... खरं सांगतो.... तुला ती कालची रात्र पूर्ण आईपणाची मिळायला हवी होती गं!

पण प्रश्न असा आहे की हे सगळं मला जाणवतं हेही तुला सांगणे मला जिकीरीचे वाटते. कारण त्याने तू अधिकच दु:खी व्हायचीस.

हे सगळं तुझ्याशी बोलायचं होतं गं! .... पण.... !!!!!!

ते तुझ्याशी बोलून तुला खट्टू करण्याचे धाडस नाही आहे माझ्यात!

==================================

-'भूषण'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, खरंच बागु ने सुचवलंय ना तसं करून बघच..
तिच्या भावना या तुम्हा दोघांच्या भावना आहेत हे कळून यशःश्री च्या चेहर्‍यावर जो आनंद दिसेल ना
तो अवर्णनीय असेल..

सहवेदना यशःश्रीशी, पुनःपुनः हरणार्‍या त्या उधारीच्या मातृत्वातही आनंद मानणार्‍या.
सहवेदना भूषणशी, साक्षीत्वाने दु:ख सोसत त्याला अक्षरत्व बहाल करणार्‍या.

भूषण, अतिशय हृद्य अनुभवकथन.

ललित म्हणून लिहिला असलात तरी अनुभव वैयक्तिक आहे हे तर उघड आहे. त्या अनुषंगाने मनात आलेलं लिहू का?
१. वर अनेकांनी सुचवल्याप्रमाणे दत्तकाचा विचार खरंच करून पहा. आणि तुमचं वय लक्षात घेता तो लवकर करा. कारण त्यालाही प्रोसीजर असते आणि मुलाचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत काही कालावधी जाऊ शकतो.
२. या लेखाच्या निमित्ताने यशःश्री यांच्या काही अतिशय व्यक्तिगत आणि नाजुक अशा भावना प्रकट केल्या गेल्या आहेत. हे त्यांना मान्य आहे, असे लेख/पोस्ट्स लिहिताना तुम्ही अगदी प्रत्येक वेळी नाही तरी कधीतरी एकंदर त्या बाबतीत त्यांचा कल/मर्जी विचारली आहे असं गृहित धरते.
नसाल तर एकदा हा विचार करून पहा. कोणासमोर काय भावना उघड होऊ द्यायच्या याबाबत प्रत्येकाची कम्फर्ट लेव्हल निराळी असू शकते आणि तिचा आपण आदर केला पाहिजे.

बेफिकीर, फिकीर न ठेवता आतली फिकीर मांडलीये. पण फार अंगावर येतं हो हे! मोकिमी म्हणतात तसं एव्हढं दु:खी नका होऊ! बाळ दत्तक घ्यावं की नाही हे मात्र नाही सांगता येत मला.
आ.न.,
-गा.पै.

सुंदर लिहीले आहे. पण तुमचे कौतुक अशासाठी वाटते कि, तुम्ही तिचे मन पूर्णपणे जाणुन घेतलेत. असे किती जण असतात??? हजारात एक जण! तुमचे नाव मात्र आता नक्की बदला.

अतिशय नाजूक, खाजगी अनुभव तितक्याच उत्कटपणे लेखणीतून उतरला आहे.
मला पण 'स्वाती_आंबोळे' ने दुसर्‍या मुद्द्यात लिहिल्याप्रमाणे विचार मनात आले. यशःश्री यांची हा अनुभव ऑनलाइन तिर्‍हाइतांबरोबर शेयर केला जायला हरकत नाही हे विचारून घेतलं असेल ही आशा करते.

सिग्नेचर बदललीत बेफि ह्या लिखाणासाठी.. Happy

बागेश्रीचे वाक्य पटले. कदाचीत हे लिखाण तुमच्या पत्नीने वाचलेही असेल आतापर्यंत. स्वतीच्या मुद्द्यालाही अनुमोदन आहे. Happy

ह्म्म

स्वाती_आंबोळे++

अनेकदा समोर. चा न बोलणही वाईट असतं - when u share it u r one team.. u r sharing that space - good or bad feelings doesnt matter.. as a spouse u can get a lot closer...

अनेक्दा पुरुष न बोलून चुकतात, हेमावैम

हे मनात चाललेलं सर्व लिहिण्याचं कौशल्य आहेच तुमच्याकडे.
ललित म्हणुन छानच पण हे वास्तव असल्याने छानही म्हणवत नाहिये.

हम्म... न बोललेच बरं. उगाच भळभळेल .... किंवा वेगळ्या रितीने त्या आनंदात सामिल होवून तिच्या भावना तुम्ही जाणता हे दाखवलेत न बोलता ते चांगले राहिल. किंवा तुम्हालाच माहित असेल की तिला कस आवडेल.. व्यक्त करणं ते केलेलं बरं.

काही निर्णय आपण एकदा घेतो.. पण परीस्थिती तेव्हा वेगळी असते... व नंतर वेगळी होते.. हे जाणवते.
एवढेच म्हणायचेय, वरती दत्तक घेण्याविषयी लिहिलेय.. पण तो खाजगी निर्णय कुठल्याही प्रभावाने नको व्हायला... किंवा तो सुचवून हळवे करणे पटत नाही. (हे. मा. वै. म) Happy

बेफी.
लेखाच्या खाली लिहलेलं '-भुषण' हे वाचून स्तब्ध झालो. हा लेख ललित नाही ते अधोरेखित करतय ते...
लवकरात लवकर दत्तक घेण्याचा निर्णय घ्या. उशीर केल्यास वय आड येईल.
राहिला प्रश्न 'जी आपली निर्मीती नाही तिला आपली म्हणून मिरविण्याचा' तुमच्या सौना पटवून द्या दत्तक म्हणजे निर्मिती मिरविण्याचा प्रश्न नसून वात्सल्याची तहान मिटविणे होय. अन खरं सांगा बेफी तुम्ही एवढे शब्दावर हुकूमत असलेले महान व्यक्ती असुन बायकोला नाही पटवू शकत... विश्वासच बसत नाही राव.
मी काय म्हणतो... जिवाची एवढी घालमेल करत जगण्यापेक्षा होउन जाउदया. दुनिया भरच्या बायकाना पटवता. आता बायकोला पटवा बघू... तुमच्या पटविण़्याच्या कलेची कसोटी समजा हवं तर.

नाना फडणवीस << I am visiting India next week.....दारू सोडली का? If that is the case I have missed a life time opportunity....आणि नसेल तर मस्स्स्स्त बसू ....please oblige me.....>>>

नाना.... आम्ही पण येऊ की.

नाना फडणवीस << I am visiting India next week.....दारू सोडली का? If that is the case I have missed a life time opportunity....आणि नसेल तर मस्स्स्स्त बसू ....please oblige me.....>>>

नाना.... आम्ही पण येऊ की.

खूपच छान. तुमची सहवेदना मन हेलावून गेली. का कोण जाणे पण तुमच्या 'बेफिकीरी'मधे 'फिकीर' नक्कीच आहे हे जाणवून समाधान वाटले.>>>>>>++++++++++१११११११११

vinayakparanjpe>>>नाना.... आम्ही पण येऊ >>>>>>>अहो साहेब याच राव्.....खरच !!

दुनिया भरच्या बायकाना पटवता. आता बायकोला पटवा बघू... तुमच्या पटविण़्याच्या कलेची कसोटी समजा हवं तर.>>>>>>>१०००००+ - अनुमोदन :)....बेफी we all care for you.....really....एक मित्रत्त्वाचं नातं निर्माण झालय्...म्हणून हि आगाऊगिरि खपवून घ्या म्हणजे झालं!!

भूषण (बेफि नाही भूषणच)... अत्ता पर्यंत बोलला नसाल तर लगेच बोला.. मनातलं सगळ सांगा सौं ना.. त्याचिच फार गरज आहे .. त्यांना ही आणि तुम्हाला ही ...

"-'भूषण'!" - यातच सारं आलं.!

अप्रतिम लिहलय. !>> +१

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असं स्पष्ट लिहिणं सोपं नाही. माबोकरांनी सुचविलेल्या गोष्टींचा जरूर विचार करा. शुभेच्छा...

मूर्त जन्मते पाषाणांतुन
कौसल्या का हीन शिळेहुन ?
विचारें मस्तक या व्यपिले
पाहुनी वेलीवरची फुले......।

गगन अम्हांहुनि वृद्ध नाहि का ?
त्यांत जन्मती किती तारका !
अकारण जीवन हें वाटलें
पाहुनी वेलीवरची फुले......।।
- गदिमा

मी मायबोलीवर आत्तापर्यंत वाचलेला सर्वात सुंदर लेख !!! मुल नसलेल्या स्त्रीची व्यथा युगानुयुगे लिहिली गेली आहे, मुल नसण्याने पुरुष पण दुःखी असतात हे सर्वांना कळेल. ह्या लेखा चे शीर्षक ' होऊ न शकलेल्या बाबाची कहाणी' असे पण म्हणता येईल.

दुसरं म्हणजे भावना नीट पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत, वक्तृत्वाची उत्कृष्ट पातळी गाठूनही कदाचित तुझंच नीट लक्ष नसलं तर त्या संवादाला फाटे फुटतात असाही एक अनुभव आहे गाठीशी!>> हे अगदी बरोबर बोललात.

काय होतं, बऱ्याचदा आपण उगीचच प्रस्तावना, पार्श्वभूमी वगैरे सविस्तर तेल नमनाला घालत बसतो (त्याशिवाय आपल्या भावना तंतोतंत पोहोचणार नाहीत अशा समजुतीनं). खरं तर भावना या नेहेमीच शब्दात आणि त्याही ‘अहवाल’ स्वरुपात व्यक्त होऊ शकत नाहीत हे आपल्याला समजतच नाही. कधी-कधी नुसता हात हातात घेतला तरी अगदी मिलीसेकंदात सर्किट कम्प्लीट होतं बघा. आणि कुणास ठाऊक, हेही न करता, झाल्या प्रसंगाची तुमच्या मनात उमटलेली प्रतिक्रिया सौ.ना केंव्हाच पोहोचती झाली असेलही. आपल्याला ना, उगाच सही-शिक्क्यासह पोच-पावत्या मिळाल्याशिवाय चैन पडत नाही.

माबोवर मन मोकळं केलंत, करावसं वाटलं हे देखील छान झालं. आजकाल हे करायला देखील कुणी उपलब्ध नसतं आणि असलंच तर त्याचा attention-span अगदीच कमी असतो किंवा आपली जीभ लायटर वर कार्बन साठावा तशी कुठलीच ठिणगी न पाडता नुसतीच गालात पुटपुटत असते. 

इथे कळवळून मनापासून सांगितलेले उपाय कराल अथवा न कराल (कारण बऱ्याचदा या सगळ्याचा विचार झालेलाच असतो आणि तरीही घोडं कुठेतरी पेंड खात असतं जे ज्याचं त्यालाच ठाऊक असतं). आणि समजा नाही करता आले तरी शेवटी जे आहे त्याचा ‘स्वीकार’ याच्यासारखं दुसरं औषध नाही म्हणतात. कदाचित इतरांकडे जे आहे ते न देता त्यानिमित्ताने आपल्याला अधिक संवेदनशील बनवणं हे देखील विधात्याचं गणित असू शकतं - केवळ मुलांमुळेच जोडपी जवळ येतात आणि राहतात असं नाही. पण काहीही असो, मनाचं पोतं सरासर शिवण उसवून इथे हक्कानं रिकामं केलंत, नक्कीच हलकं वाटत असेल. शेवटी वैयक्तिक असं काहीही नसतं आणि वाचणारे तिऱ्हाईत असले तरीही शेवटी आपलं-परकं असं जगात कुणीच नसतं हे दु:ख वाटल्यानीच कळतं.

बाकी तुमचे माबोवरचे आधीचे प्रतिसाद आणि लौकिक की काय म्हणालात ते मला फारसं ठाऊक नाही, पण मला वाटतं नाव-बिव बदलायची गरज नाही. तुमचा ‘बेफिकीर’पणा हेच तुमचं ‘भूषण’ आहे. त्याशिवाय का तुम्ही हा हृदयस्पर्शी अनुभव इतक्या बिनधास्त इथे मांडू शकला?

Pages