माबोवरचं माझं हे पहिलंच लिखाण. जुनाच एक लेख टाकून सुरुवात करतो.
साधारणपणे ऑगस्ट एन्डचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस.
'कुमार विद्यामंदीर,हुपरी-शाळा नं. 1' मधील तिसरी-ब चा वर्ग. मुलांना "प्रश्नोत्तरे लिहा रे", असं सांगून अलाटकर गुरुजी निवांत पान खात बसले होते. त्याच वर्गात एका कोप-यात अस्मादिक मित्रांबरोबर 'चिंचोके' खेळण्यात गुंतले होते.
इतक्यात वर्गात 'ऊSSSSSSS' अशी आरोळी उठली. पाहातो तर शिपाईमामा नोटीस घेऊन आल्याचा तो आनंद होता. त्या काळात नोटीस येणे म्हणजे 'शाळेला सुट्टी' एवढंच माहिती होतं. पण, ही नोटीस जरा वेगळी होती. गुरुजींनी नोटीस वाचून दाखविली - "सालाबादप्रमाणे यंदाही चांदी असोसिएशन, हुपरी यांच्यातर्फे दिनांक 5 सप्टेबर रोजी 'गुरुपौर्णिमे'निमित्त खुल्या वक्तॄत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, इच्छुकांनी आपली नावे वर्गशिक्षकांकडे उद्या संध्याकाळपर्यंत द्यावी."
पूर्ण वर्ग शांत. हा बाऊन्सर होता. मराठी भाषेमध्ये 'वक्तॄत्व' असा काही शब्द आहे,याची कुणालाही कल्पना असणं शक्य नव्हतं. शिपाईमामा निघून गेले. गुरुजींनी सगळ्या वर्गावरून एक नजर फिरवली. खिडकीतून बाहेर एक पिचकारी मारली आणि अचानक -
"चिर्कुट, उभा रहा!!!"
इकडे-तिकडे बघत, चिंचोके खिशात लपवत मी उभा राहिलो. :S
"स्पर्धेला तुझं नाव देतो." - गुरुजी
मी अजून बावचळलेलोच होतो. मी विचारलं,
"क्..कसल्या स्पर्धेला, गुरुजी??"
"अरे 'वक्तॄत्व' स्पर्धेला. 'आई माझा गुरु' या विषयावर भाषण करायचं." - गुरुजी.
आत्ता माझी ट्यूब पेटली. 'वक्तॄत्व' म्हणजे भाषण!! याबद्दल मी ऐकलं होतं. त्याचबरोबर 'मलाच का घेतलं' याचा पण उलगडा झाला. तेव्हां वर्गात सगळ्यात हुशार(?? ) आणि उपद्व्यापी कारटा मीच होतो.
त्या उत्साहात मी स्पर्धेत भाग घ्यायचं कबूल केलं खरं, पण संभाव्य धोक्याची कल्पनाही मला आली नाही.
त्यानंतर मोठ्या उत्साहाने सुरु झाली भाषणाची तयारी!! घरी आल्या आल्या मी भाषण करणार असल्याचं जाहीर केलं. यावर सर्वांनी 'आणखी एक नवीन खूळ' असा लूक दिला. पण एवढ्याशा गोष्टीनं मी डगमगणार नव्हतो. त्या दिवशी पप्पांना रात्रभर बसून भाषण लिहायला लावलं आणि दुस-या दिवसापासून पाठांतर सुरु केलं. दोन-तीन दिवसांतच मी ते भाषण घडाघडा 'म्हणून दाखवू' लागलो. घरी येणा-या प्रत्येकाला 'मी भाषण करणार असल्या'ची बातमी कळाली आणि सर्वांनी 'पहिलं बक्षीस तुलाच मिळणार' अशी सहानुभूती सुद्धा दर्शविली. (ती सहानुभूती प्रेक्षक व परीक्षक यांच्यासाठी होती, हे मला नंतर कळलं. असो.)
अखेर 'तो' दिवस उजाडला. सर्व शाळांना सुट्टी होती. मी, माझे आई-वडील, आजी, दोन-तीन शेजारी आणि काही मित्रांना घेऊन (की ते मला घेऊन??) स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो. स्पर्धा सुरु झाली. माझं नाव बरंच उशीरा होतं. जशी जशी इतरांची भाषणं ऐकत होतो, तसा तसा माझा आत्मविश्वास ढासळू लागला. आणखी एक गोष्ट, जी आधी लक्षात आली नव्हती, ती म्हणजे ही खुल्या गटाची स्पर्धा होती. सगळे स्पर्धक सातवीच्या पुढचे होते. मी सर्वात लहान स्पर्धक होतो.
अखेर माझं नाव पुकारलं गेलं. पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि गांधी टोपी अशा अवतारात घाबरत घाबरत मी स्टेजवर गेलो. समोर 100 -150 लोक पाहूनच मी गार झालो. पाय लटपटू लागले. डोळ्यांसमोर अंधारी आली. काहीजण हसू लागले. पण मला पहिली ओळ पक्की पाठ होती. मी सुरुवात केली –
"अध्यक्ष महोदय, (कुंईंSSSSSSSSS - माईकने दगा दिला.)" सर्वजण हसले. मी जास्तच घाबरलो. माईक पूर्ववत करण्यात आला. मी पुन्हा सुरुवात केली –
"अध्यक्ष महोदय (खर्रर्रर्र), पूज्य गुरुजन वर्ग (खर्रर्रर्र) आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो (खर्रर्रर्र),मी आज तुम्हाला (खर्रर्रर्र)'आई माझा गुरु' (खर्रर्रर्र) या विषयावर चार शब्द (खर्रर्रर्र)ऐकवणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने (खर्रर्रर्र) ऐकून घ्यावे ही नम्र विनंती."
"अरे तो माईक सोड!!" परीक्षक महोदय मागून म्हणाले.
टी.व्ही. वर 'मिले सूर मेरा तुम्हारा' मध्ये अन्नू कपूर यांना माईक हातात पकडून बोलताना मी पाहिलं होतं. अगदी हुबेहूब तसाच माईक मी पकडला होता. पण त्यामुळे तो "खर्रर्रर्र" असा आवाज काढत होता, हे काही अस्मादिकांच्या लक्षात येईना. परीक्षकांची सूचना आणि माझी भीती, या गोंधळात माझी लिंक तुटली आणि पाठ केलेलं भाषण मी साफ विसरलो. त्यानंतर मी जे भाषण केलं, ते खरोखर संस्मरणीय होतं. मी खरंच ते आजही विसरु शकत नाही. ते असं होतं -
(मध्ये मध्ये खर्रर्रर्र आवाज चालूच आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.)
" माझ्या आईचे नाव स्मिता असे आहे. मी तिला 'मम्मी' म्हणतो. माझी आई मला खूप आवडते. (अंSSSS) पण कधी कधी आवडतही नाही.
ती मला रोज सकाळी सहा वाजता उठवते. दात घासायला लावते (दात घासल्याचा अभिनय). (अंSSSS) त्यानंतर आंघोळ घालते. मग नाश्ता देते आणि अभ्यासाला बसवते(अभ्यासाचा अभिनय). (अंSSSS) साडे अकरा वाजता ती मला जेवायला देते आणि मग शाळेत पाठवते. शाळेतून घरी आल्यावर ती मला हात-पाय धुवायला लावते. नंतर दूध प्यायला लावते (दूध पिण्याचा आणि तोंड वाकडं करण्याचा अभिनय) आणि परत अभ्यासाला बसवते. मग आठ वाजता जेवायला देते आणि नंतर झोपवते.(अंSSSSSSSSS) परत सकाळी सहा वाजता उठवते. "
आधीच इतकं सुंदर भाषण आणि त्यात माईकची खरखर त्यामुळे एवढं होईपर्यंत प्रेक्षक आणि परीक्षकच नव्हे तर मी स्वतः सुद्धा कंटाळलो होतो. शेवटी मलाच इतरांची दया आली आणि मी भाषण आवरतं घेतलं.
“ म्हणून 'आई माझा गुरु' आहे. माझी आई मला खूप खूप आवडते. कारण कुणीतरी म्हटलेलंच आहे, ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी '.. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद!! जय महाराष्ट्र !! " :
यानंतर तेथे अभूतपूर्व असा हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मला मात्र भाषण 'एकदाचं संपलं' याचा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यासारखा आनंद झाला होता.
बक्षीस समारंभात मला 'सर्वात लहान स्पर्धक' म्हणून 'पारले-जी' चाँकलेट देण्यात आलं. पण मला खात्री आहे, की ते 'सर्वात करमणूकप्रधान भाषणा' बद्दल मिळालं होतं.
त्यानंतरच्या शालेय जीवनात मी अनेक वक्तॄत्व स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळवली, अगदी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा!!! पण, तो हशा, त्या टाळ्या आणि ते चार आण्याचं लाल 'पारले-जी' मी आजही विसरू शकलो नाही..
अस्मादिकांनी गांधी जयंतीला
अस्मादिकांनी गांधी जयंतीला 'मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' असे बाणेदार भाषण ठोकले होते त्याची आठवण झाली!
सातवीहून लहान वयोगटातल्या
सातवीहून लहान वयोगटातल्या मुलाकडून असे भाषण ऐकल्यावर मी तरी मोठ्ठं डेअरी मिल्क दिलं असतं.
वत्सला, गांधी जयंतीला शेंगा खाल्ल्या नाहीत हे फार भारी आहे.
>>> गांधी जयंतीला 'मी शेंगा
>>> गांधी जयंतीला 'मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही'
वत्सला आणि साती, पहिल्या लेखाच्या पहिल्या प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद
तिसरीतल्या मुलाचे मस्तच भाषण
तिसरीतल्या मुलाचे मस्तच भाषण