दाल-बाफले ,रविवारचा "स्पेशल"मेनू

Submitted by सुलेखा on 16 December, 2012 - 10:33
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हिंवाळ्याची चाहुल लागताच "दाल-बाफल्या"ची आठवण येते..आणि हा मेनू केला जातो..बाटी थोडी कडक म्हणुन बाफले जास्त आवडतात..बाफले भाजायला स्पेशल बाटी ओव्हन/तंदूर असल्याने भाजणे सोप्पे व्ह्यायचे..आता मावे.वापरायला लागल्यापासुन त्यात भाजायला सुरवात केली..चुकत-माकत आता त्याचे तंत्र छान जमले आहे..पहिल्यांदा केले तर खरपुस,गुलवट रंग आणण्याच्या नादात बाफले इतके जास्त भाजले गेले कि ओव्हन मधे भाजायचे तसा रंग तर आलाच नाही पण गरम बाफले बत्त्याने फोडावे लागले.आता कळले कि बाफल्याला तसा रंग येत नाही तरी तो आतुन भाजला जातो.तर अशी ही अनुभवलेली बाफले कथा..
बाफले चुरुन दाल बरोबर खातात तसेच बाफले चुरुन त्याबरोबर पिठीसाखर वरुन भरपूर तूपाची धार सोडुन खातात .त्यासोबत इतर पदार्थ म्हणजे बटाटा भाजी,हि. चटणी,कढी,पुलाव ही करतात..
DAL BATI--16---12----12 004.JPG
बाफले जाडसर कणकेचे करतात.जाडसर कणिक नसल्यास १ भाग जाड रवा व ३ भाग कणिक घ्यावी.
३ वाट्या बाफल्याची जाडसर कणिक,
२ टेबलस्पून तेल मोहनासाठी,
१/२ टी स्पून मीठ.
पाव टी स्पून खाण्याचा सोडा,
१/२ टी स्पून हळद,
१ टी स्पून साखर,
कणिक भिजवायला पाणी,
एक मोठे पातेले बाफले उकडण्यासाठी,
बाफले डुबतील इतके म्हणजे एक तांब्याभर पाणी,
१ टीस्पुन तेल,
तूप-तयार बाफल्यांसाठी

क्रमवार पाककृती: 

कणिक, मोहनाचे तेल व मीठ,खा.सोडा,हळद,साखर घालुन एकत्र करुन घ्यावे..लागेल तसे पाणी घालुन , पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशी भिजवुन व थोडी मळुन घ्यावी.फु.प्रो .वापरला तरी चालेल.
भिजवलेल्या कणकेचे लहान चपटे गोळे करुन प्रत्येक गोळ्याला मधे अंगठ्याने थोडा दाब देवुन खळगा तयार करुन घ्यावा.
गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे.पाणी उकळले कि त्यात १ टी स्पून तेल टाकावे.आता त्यात बाफल्याचे चपटे गोळे सोडुन पातेल्यावर झाकण ठेवुन मध्यम आचेवर ७ ते ८ मिनिटे ठेवावे..
त्यानंतर झाकण उघडुन पहावे..सर्व गोळे पाण्यावर तरंगताना दिसतील..गोळे तरंगले कि शिजले आहेत असे समजायचे.
आता एका कापडावर हे गोळे झार्‍याने पाण्यातुन बाहेर काढुन थंड करायला ठेवावेत..या गोळ्यांवरील पाणी कापडावर टिपले जाईल..
मावे ला मावे+कन्वेक्शन मोड -६००* वर सेट करुन २ मिनिटे प्री-हीट करावा.
बेकिंग ट्रे ला तूपाचा हात फिरवुन त्यावर हे बाफल्याचे गोळे मांडुन मावेत ठेवावे.
DAL BATI--16---12----12 002.JPG
याच मोड वर २-२-२ मिनिटे बेक करावे.त्यानंतर गोळे उलटवुन पुन्हा ३-३ -३ मिनिटे बेक करावे.
आता तळहातावर कापड घेवुन त्यात प्रत्येक गोळा ठेवावा .बाफल्याच्या रुंदीच्या बाजुने दाबावा म्हणजे त्याला मधुन तड पडुन तो उघडेल त्याच्यामधली वाफ बाहेर निघेल..असे सर्व बाफले करुन घ्यावे व पुन्हा २ मिनिटे ठेवावे.
एका लहान पातेलीत तूप पातळ करुन घ्यावे.त्यात हा प्रत्येक बाफला डुबवुन काढावा.त्यातील फटींमधे चमच्याने तूप सोडावे व हे बाफले एका पसरट डब्यात ठेवावेत.
मस्त मऊसर बाफले तयार आहेत.
DAL BATI--16---12----12 001.JPG
असे हे भरलेले ताट समोर आले कि भूक जागृत होते..आस्वाद घेतला कि मस्त तृप्ति होते.

अधिक टिपा: 

बटाटे मावे.त भाजुन नेहमीच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या,बादयान/चक्री फूल ,मोठी वेलची,दालचिनी घातली .बटाट्यांच्या फोडी घालुन त्यावर तिखट,मीठ धणे-जिरे-बडीशोप -लवंग भरडुन घातली.परतलेल्या भाजीवर कसुरी मेथी हातावर चुरुन घातली.
मावेत बटाटे भाजुन घेतल्याची चव ही नेहमीच्या बटाटे उकडुन केलेल्या भाजीपेक्षा जास्त छान लागली..
दाल च्या फोडणीत तेल व एक चमचा तूप घेतले तसेच हिंग,हळद्,जिरे-मोहोरी,मेथीदाणा व खडा मसाला,टोमॅटो ,आमसुले,लाल सुकी मिरची ,तिखट धनेजिरे पुड व मीठ घातले.

माहितीचा स्रोत: 
नेहमीचा पारंपारिक आणि काही स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे, फार जळाऊ फोटो आहेत. Happy
येत्या सुट्टीमधे हा प्रयोग करण्यात येईल. सुलेखा, कणीक भिजवताना जास्त साखर नाही लागत का? म्हणजे दशमीच्या पिठासारखी?

ह्याचा अजुन एक प्रकार म्हणजे बाफळे वाफवुन गार झाले कि चार भाग करुन तुपात फ्राय करायचे पुर्ण वाफलेले असल्याने आतप्र्यत तळले जावुन फार मस्त होत्तात ..अजिबात तुपट होत नाहित हे बाफले मग ३-४ दिवस सहज टिकतात..
दाल-बाफल्याचा बेत सहसा दुपारी केला जातो कारण त्यान.न्तर वामकुक्षीची निता.न्त गरज असते.smiley2.gif

धनश्री.साखरेची चव येत नाही.पण साखरेमुळे आतुन मऊसर [मॉइस्ट] रहातात.
प्राजक्ता.त्याला कढईतले /तळलेले बाफले म्हणतात्..जिथे गवर्‍या/ओव्हन/तंदुर्/मावे नसेल किंवा तो पसारा नको असेल पटकन होईल असे करायचे असते तेव्हा ही पद्धत.
अजुन एक प्रकार मक्याचे पिठ किंवा कणिक+रवा,ओवा,तिखट,मीठ,मोहन तेल,किंचित साखर+खा सोडा घालुन भिजवुन त्याचे पेढे करुन थोड्या तूपात/तेलात तळायचे/फ्राय करायचे चहाशी गरम्/गार/प्रवासासाठी खुप छान !!

वाव .......यम्मी.......लाळ गळु लागली माझी ऑफिस मधे बसल्या बसल्या........ आणि तुझे ते बाफले मला बघुन उड्या मारु लागले आहेत ...आम्हाला खा..आम्हाला खा...

वाव .......यम्मी.......लाळ गळु लागली माझी ऑफिस मधे बसल्या बसल्या........ आणि तुझे ते बाफले मला बघुन उड्या मारु लागले आहेत ...आम्हाला खा..आम्हाला खा...

सुलेखा! मी पाण्यात उकळायच्या एवजी ईडली-कुकरला वाफवले( मसाला बाटी केली होती त्यामुळे जिरे,हि.न्ङ हळद मिठ टाकले) वाफ जायला म्हणुन वर सुरीने चिरा दिल्यात.

bati.jpg

ओव्हन्मधे ब्रॉईल सेटी.न्ग ठेवुन तेल लावुन भाजले, मस्त होतात. शिवाय पाण्यात उकळा निथळा भानगड नसल्याने पट्कन होत..मसाला घातल्याने त्या वाफवल्यावर नुसत्या खायला सुद्धा भारी लागतात.
( हि ईडलि कुकरला वाफवायची आयडिया आईची आहे)

काल केले हे बाफले. मी नेहमी कणिक+रवा वापरून बाट्या करते. काल पहिल्यांदाच रवाळ गव्हाचे पीठ वापरून केले. बाफल्यांसाठी प्रमाण तुम्ही दिलेत तेच वापरले. तीन वाट्या पिठाचे १०-१२ छोटे बाफले झाले. आतून छान पोरस आणि बाहेरून क्रिस्पी झाले होते.

मी अवन ३५० ला प्रीहीट करून १०+१०+१० असे बेक केले. पहिल्या १० मिनिटांनंतर तूप सोडले सगळ्या बाफल्यांत. बेक झाल्यावर मग वाफ काढून पुन्हा थोडे तूप घातले.

सिंडरेला
,खूपच छान फक्त मक्याचे पीठ वापरुन असेच बाफले करायचे..ते ही खुसखुशीत व हलके होतात.

या दाल-बाफल्यामधली दाल कशी करायची?

रात्रीच्या जेवणात खायचे असल्यास हे बाफले दुपारी करून ठेवले तर चालतील का?

मंजुडी,
तूर डाळ, तूर्+मुगाची पिवळी डाळ, तूर्+मुग+चणाडाळ असे काहीही घेतले तरी चालेल.काही लोक थोडीशी उडदाची डाळही घालतात. दाल [आमटी]आपण नेहमी करतो तशीच करायची पण अगदी पातळ नको.फोडणीला जिरे-मोहोरी-मेथीदाणा-बडीशोप-हिंग,चक्री फुल,मोठी वेलची ,थोडासाच गरम मसाला ,टोमॅटो ,तिखट-मीठ घालायचे हळद डाळ शिजताना घालायची .फोडणी तेल व तुप [सम]घालुन करायची.
दाल व बाफले दोन्हीही आधी करुन ठेवले तरी चालतात.बाफले आयत्यावेळी मावेत काचेच्या बाऊलवर झाकण ठेवुन गरम कर.तुपात भिजलेले असल्याने छान गरम होतात

ओके! म्हणजे ती पंचमेळ दाल केली तरीही चालेल ना?
आमच्याकडे उद्या रात्री एका मुंजीचं केळवण आहे. बटूने गोडाचा शिरा आणि आंब्याच्या लोणच्याची फर्माईश केली आहे Uhoh Wink त्याला साजेसा मेनू बघत होते.
धन्यवाद!!

Pages