कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम) (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 12 December, 2012 - 06:09

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग २
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ३
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४

"मी इतकी गर्भगळित झाले होते की मला आठवतही नाही की त्यानंतर मी नक्की काय केले... इथून पुढे चालू -

"मी इतकी गर्भगळित झाले होते की मला आठवतही नाही की त्यानंतर मी नक्की काय केले. मला वाटते मी त्यांना बाजूला सारून तडक माझ्या खोलीत निघून आले. मला फक्त इतकेच आठवतेय की पलंगावर अंग झोकून देऊन मी बराच वेळ सुन्न होऊन निजले होते. मग मला अचानक तुमचे नाव आठवले. तुमच्या सल्ल्याशिवाय तिथे एक दिवसही राहणे मला नको वाटले. मला आता त्या बंगल्याची, तिथल्या माणसांची, त्या नोकरांची, इतकेच काय त्या लहान मुलाचीही भीती वाटू लागली होती. ते सगळेच माझ्यासाठी भयंकर होते. जर तुम्ही इथे येऊ शकलात तरच गोष्टी मार्गावर येतील असा विचार माझ्या मनात येऊ लागला. अर्थात मला कुणी तिथे कैदेत टाकले नव्हते. त्यामुळे मला हवे तेव्हा मी तेथून पळून येऊ शकत होते. पण माझी उत्सुकता माझ्या भीतीवर मात करत होती. मग मी मनाचा निश्चय केला की तुम्हाला तार पाठवून इथे येण्याचे निमंत्रण देईन. त्यानुसार लगेच मी बाहेर जाण्याचे कपडे केले, डोक्यावर हॅट घातली आणि घरापासून सुमारे मैलभर अंतरावर असलेल्या तार कार्यालयात जाऊन तुम्हाला तार पाठवली. हे सर्व करून घरी आल्यानंतर माझी भीती बर्‍यापैकी ओसरली होती. तरीही मनात कुठेतरी त्या राक्षसी कुत्र्याची भीती डोके वर काढत होती. तो कुत्रा आत्ता ह्या क्षणी मोकळा तर नसेल असे वाटून जीव खालीवर होत होता. पण टोलर त्या संध्याकाळी पिऊन जवळपास बेशुद्धावस्थेत होता हे आठवल्यामुळे मी निर्धास्त झाले. कारण त्याच्याखेरीज त्या कुत्र्याला मोकळे करण्याचे काम कुणीच करत नसे. 'तुम्ही इथे याल' ह्या खुशीत मी जवळपास अर्धी रात्र जागीच राहिले. आज सकाळी इथे विंचेस्टरला येण्यासाठी सकाळची थोड्या वेळाची रजा काढायला मला काहीच अडचण आली नाही. पण दुपारनंतर दोघे पती-पत्नी बाहेर जाणार असल्यामुळे आणि सबंध संध्याकाळभर बाहेर राहणार असल्यामुळे एडवर्डला सांभाळण्यासाठी मला वेळेत घरी जावे लागेल. आता माझे सर्व साहसी कारनामे तुम्हाला सांगून झाले आहेत. तेव्हा ह्या सर्वांचा अर्थ काय आणि मी ह्यापुढे काय करावे ह्याबद्दल कृपया मला मार्गदर्शन करा."

ही अचाट गोष्ट ऐकून मी आणि होम्स अवाक झालो होतो. होम्स जागेवरून उठून, त्याच्या कोटाच्या खिशात हात घालून येरझारा घालू लागला. आता त्याच्या चेहर्‍यावर विचारांत गढल्याचे भाव होते.

"तो टोलर अजूनही मद्यधुंद अवस्थेत असेल का?" अचानक त्याने येरझारा घालणे थांबवत विचारले.

"होय. मी आजच त्याच्या बायकोला मिसेस रुकास्टलकडे त्याच्या नशेत पडून राहण्याबाबत तक्रार करताना ऐकले."

"मग ठिक आहे. आणि तुम्ही म्हणालात की रुकास्टल जोडपे आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत घराबाहेर असेल."

"होय."

"त्या बंगल्यात एखादे सुरक्षित तळघर किंवा कोठार आहे का?"

"होय आहे ना. दारूचा साठा करण्यासाठी असते तसले एक गोदाम आहे."

"मिस हंटर, ह्या सर्व घडामोडींमध्ये तुम्ही खरोखर एक शहाण्या व शूर शिपायाप्रमाणे धाडसी काम केले आहे. तुम्ही अजून एक कामगिरी पार पाडू शकाल का? तुम्ही असामान्य स्त्री आहात ह्याबद्दल माझी खात्री पटली आहे, म्हणूनच हे काम मी तुमच्यावर सोपवू शकतो."

"मी नक्की प्रयत्न करेन. काय करावे लागेल?"

"मी आणि माझा हा मित्र - वॉटसन - कॉपर बीचेस येथे रात्री सात वाजता पोचतो. रुकास्टल पती-पत्नी तोपर्यंत बाहेर गेलेले असतील आणि टोलर अजूनही बेशुद्धावस्थेत असेल अशी आशा करुया. बंगल्यात फक्त टोलरची बायको जागी असेल. तिने आरडाओरडा केला तर आपला खेळ उधळू शकतो. जर का तुम्ही तिला त्या दारूच्या कोठारात काही कामासाठी धाडून त्याचे दार बंद करून तिला आत कोंडून ठेवू शकलात तर माझे पुढील काम बरेच सोपे होऊ शकेल."

"मी हे करू शकेन."

"छानच! आम्ही ह्या प्रकरणाचा छडा लावायला फारच उत्सुक आहोत. आता तुम्ही सांगितलेल्या विस्कळीत घटनांचा परस्परसंबंध मी तुम्हाला सांगतो. ह्या सर्व घटना एकाच गोष्टीकडे निर्देश करतात व ती ही की तुम्हाला येथे एखाद्या व्यक्तीची भुमिका वठविण्यासाठी आणण्यात आले होते व ती खरी व्यक्ती त्या बंद दरवाजाआड कोंडून ठेवण्यात आलेली आहे. ती कैदेत ठेवण्यात आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्या रुकास्टल ची पहिली कन्या अ‍ॅलिसच आहे ह्यात शंकाच नाही. माझ्या आठवणीप्रमाणे ती मुलगी अमेरिकेला निघून गेल्याचे तुम्हाला सांगितले गेले, बरोबर? तुम्ही त्या अ‍ॅलिसबरोबर ऊंची, देहयष्टी आणि केसांचा रंग ह्या बाबतीत मेळ खात असल्याने तुम्हाला तिच्या तोतयाची भुमिका साकारण्यासाठी निवडले गेले. तिचे केस एखाद्या आजारपणात कापून कमी करण्यात आले असावेत आणि त्यामुळे तुम्हालाही तुमच्या लांब केशसंभाराचा त्याग करणे भाग पडले. तुमच्या उत्सुकतेमुळे तिच्या बंगल्यातल्या अस्तित्वाचा तुम्हाला अनाहूतपणे पत्ता लागला. तो रस्त्यात उभा राहून बंगल्याकडे पाहणारा इसम हा नक्कीच त्या मुलीचा चाहता किंवा प्रियकर असला पाहिजे. कदाचित तिच्या ह्या तरुणाशी साखरपुडा झालेला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला अ‍ॅलिसच्या पेहरावात पाहून आणि तुमच्या हसण्यावरून तसेच तुम्ही त्याला निघून जाण्याच्या दिलेल्या इशार्‍याला फसून त्याला वाटले असणार की मिस अ‍ॅलिस तिच्या आई-वडीलांसोबत खुश आहे आणि त्याच्या सोबतीची किंवा त्याने तिच्याकडे लक्ष देण्याची तिला आता गरज नाही. रात्री त्या भयंकर कुत्र्याला मोकळे सोडण्याचे कारणही हेच असणार की त्या तरुणाला अंधाराचा फायदा घेऊन तिच्याबरोबर - म्हणजेच पर्यायाने तुमच्याबरोबर - लपतछपत भेटीगाठी करण्याची संधी मिळू नये. इथपर्यंत सर्व साधे - सरळ आहे आणि सहज समजण्यासारखे आहे. त्या लहानग्याचा हिंसक स्वभाव ही मात्र गंभीर बाब आहे."

"त्याच्या स्वभावाचा ह्या संपूर्ण घटनाक्रमाशी काय संबंध?" मी चक्रावून जात विचारले.

"माझ्या परमप्रिय मित्रा, तुम्ही वैद्यकिय क्षेत्रातील माणसे पालकांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करून त्याचा त्यांच्या पाल्यांच्या स्वभावावर कसा प्रभाव पडतो ह्यासंबंधी निरीक्षणे नोंदवत असता. ह्याचाच अर्थ उलटही काढता येऊ शकतो व ती शक्यता तितकीच वैध आहे आणि ती ही की लहान मुलांचे स्वभाव विशेष त्यांच्या पालकांच्या मनोवृत्तीचे निदर्शक आहेत. माझ्या केसेस च्या संदर्भात बर्‍याचदा मला पाल्यांच्या वर्तनावरून त्यांच्या पालकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे पहिले व खरे दर्शन घडले आहे. आता ह्या मुलाचे विचित्र हिंसक वर्तन हे त्याच्याकडे त्याच्या वरवर शांत व हसर्‍या दिसणार्‍या पित्याकडून आले आहे - जी शक्यता मला सर्वात जास्त वाटते - की त्याच्या आईकडून हा मुद्दा गौण आहे. पण त्यांच्या कैदेत असणार्‍या त्या बिचार्‍या मुलीसाठी हे फार घातक आहे."

"माझी खात्री आहे, की तुम्ही योग्य मुद्द्यावर बोट ठेवले आहे, मि. होम्स," आमची अशील अत्यानंदाने ओरडली, "मला हजारवेळा तरी असे संकेत आले आहेत की तुम्ही अगदी योग्य दिशेने वाटचाल करत आहात. चला! आता त्या दुर्दैवी मुलीची जमेल तितक्या लवकर सुटका करू या!"

"आपण धोका पत्करणे योग्य नाही. कारण आपली गाठ एका चतुर व दुष्ट इसमाशी आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या आधी आपण काहीच हालचाल करणे इष्ट नाही. त्या वेळेनंतर मात्र आम्ही तुमच्यासोबत असू आणि लवकरच आपण ह्या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलेला असेल."

आम्ही शब्द दिल्याप्रमाणे सात वाजताच्या आसपास कॉपर बीचेस ला पोचलो. कलत्या सूर्याच्या संधिप्रकाशात धातूचा मुलामा दिल्याप्रमाणे चकाकणारी पाने असणार्‍या बीच वृक्षांचा समूह पाहून कुणीही तो बंगला सहज ओळखला असता - मिस हंटर दाराशी आमचे हसर्‍या चेहर्‍याने स्वागत करायला उभ्या नसत्या तरीही!

"तुम्हाला मी दिलेली कामगिरी पार पाडता आली का?" होम्स ने विचारले.

खालून कुठूनतरी दरवाजावर कुणीतरी थापा मारत असल्यासारखा आवाज आला.

"ती टोलरची बायको आहे. दारूच्या गोदामात मी तिला बाहेरून कडी घालून बंद करून ठेवले आहे. तिचा नवरा स्वयंपाकघरात चटईवर घोरत पडला आहे. आणि ह्या टोलरकडच्या बनावट चाव्या! मि. रुकास्टल ह्यांच्याकडील मुख्य चाव्यांची नक्कल करून हा जुडगा टोलरसाठी बनवण्यात आला होता."

"तुम्ही खरेच खूप छान काम केले आहे," होम्स च्या अंगात उत्साह संचारला होता, "चला आता आम्हाला रस्ता दाखवा. लवकरच ह्या काळ्या धंद्याचा सोक्षमोक्ष लावूया!"

आम्ही जिना चढून वर गेलो. तो दरवाजा चावीने उघडून बोळकांड पार करून मिस हंटर ने वर्णन केलेल्या लोखंडी कुलूप घालून बंद केलेल्या दारासमोर आम्ही उभे राहिलो. होम्सने वेगवेगेळ्या किल्ल्या वापरून कुलूप उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आतून काहीच आवाज येत नव्हता. होम्सचा चेहरा प्रश्नांकित झाला.

"मी आशा करतो की आपल्याला उशीर झालेला नसावा." तो म्हणाला, "मिस हंटर, मला वाटते आम्ही तुम्हाला न घेता आत जावे. वॉटसन, जरा धक्का मार बघू ह्या दरवाजाला आणि पाहूया आपल्याला तो उघडता येतो का ते!"

तो एक अतिशय जुना आणि खिळखिळा झालेला दरवाजा होता. आमच्या एका जोरदार धक्क्यानिशी तो धाडकन खाली पडला. आम्ही दोघेही जोरात धावत आत गेलो. ती खोली रिकामी होती. एक लहानसा पलंग, एक लहान मेज आणि कपड्यांची पिशवी ह्याव्यतिरिक्त त्या खोलीत काहीही सामन नव्हते. छताला असलेली सूर्यप्रकाश आत येण्यासाठीची खिडकी सताड उघडी होती. त्यातून सूर्यप्रकाश आत येत होता आणि आतला कैदी पसार झाला होता.

"इथे काहीतरी काळेबेरे घडलेले आहे," होम्स म्हणाला, "त्या महानालायक इसमाने मिस हंटरचा उद्देश ओळखून आपल्या कैद्याला स्वतःच पळवून नेले आहे."

"पण ते कसे?"

"ह्या छताला असलेल्या लहानशा खिडकीतून! आपण पत्ता लावूया की त्याने हे कसे घडवून आणले." त्याने त्या खिडकीतून स्वतःचे अंग बाहेर झोकत आजूबाजूला एक नजर फिरवली. "अरे, हे बघ," तो ओरडला, "इथे भिंतीला टेकून ठेवलेली एक ऊंच शिडी दिसतेय. आता कळले की कैद्याला कसे पळविण्यात आले ते?"

"पण हे शक्यच नाही. रुकास्टल पती-पत्नी घराबाहेर पडले तेव्हा ही शिडी येथे नव्हती." मिस हंटर उद्गारल्या.

"त्याने परत येऊन हे कृत्य केले असणार. मी तुम्हाला सांगितले होते ना की तो एक अतिशय धूर्त आणि घातक मनुष्य आहे. आता बाहेर जिन्यावर वाजत असलेल्या पावलांचा आवाजही त्याचाच असणार ह्यात मला जराही शंका नाही. मला वाटते, वॉटसन, आपण दोघांनी आपापली पिस्तुले तयारीत ठेवलेली बरी."

होम्सचे बोलणे संपते ना संपते तोच एक माणूस दरवाजाशी येऊन उभा राहिला होता. तो एक अतिशय दणकट व जाडा मनुष्य होता. त्याच्या हातात एक जाडी छडी होती. त्याला पाहताच मिस हंटर किंचाळत मागे सरकल्या. पण शेरलॉक चपळाईने उडी मारून त्याच्या समोर पोचला व त्याचे बकोट धरले.

"दुष्ट माणसा!" तो ओरडला, "तुझी मुलगी कोठे आहे?"

त्या जाड्या माणसाने खोलीत चहुकडे नजर फिरवली व शेवटी वर छताकडे पाहिले.

"हा प्रश्न मीच तुम्हाला विचारला पाहिजे." शरीराला हिसका देऊन तो होम्सच्या हातातून त्याचे बकोट सोडवत ओरडला, "चोरट्यांनो, आता मी तुम्हाला पकडले आहे. तुम्ही माझ्या कचाट्यात आहात. मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवीन." असे म्हणून मागे वळून जितक्या वेगाने त्याला दूर जाता येईल तितक्या वेगाने धाडधाड पावले टाकत तो जिना उतरून गेला.

"तो नक्कीच त्याच्या शिकारी कुत्र्याच्या पिंजर्‍याकडे गेला असणार!" मिस हंटर ओरडल्या.

"माझ्याकडे माझे पिस्तूल आहे." मी म्हणालो.

"आपण ते पुढचे दार बंद करून घेऊया." होम्स ओरडला.

आम्ही सर्वजण खाली धावत आलो. आम्ही दिवाणखान्यात पोचतो न पोचतो तोच आम्हाला एका पशूच्या डरकाळीचा आवाज ऐकू आला. त्या पाठोपाठ एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू आली. एक मधमवयीन मनुष्य रक्ताने भरलेला चेहरा घेऊन लटपटत्या पायांनी धडपडत बाजूच्या दरवाजातून बाहेर पळत येत होता.

"अरे देवा!" तो किंचाळत होता, "कुणीतरी त्या कुत्र्याला मोकळे केलेले दिसते. त्याला दोन दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. घाई करा. नाहीतर फार उशीर होईल!"

होम्स आणि मी घराबाहेर पडलो व घराला वळसा घालून मागील बाजूस आलो. टोलर आमच्या मागे पळत होता. समोरचे दृश्य पाहून आम्ही सर्वच जण जागीच खिळून उभे राहिलो. त्या हिस्त्र पशूने मि. रुकास्टलच्या नरड्यात आपले दात रुतवले होते. ते खाली पडून विव्हळत होते.

मि. रुकास्टवलवर कुत्र्याने केलेला जीवघेणा हल्ला:
The dog fight.jpg

मी पुढे होत त्या श्वापदाच्या डोक्याचा नेम धरत पिस्तुलाचा चाप ओढला आणि पुढच्याच सेकंदाला ते प्रचंड धूड खाली मि. रुकास्टलच्या अंगावर कोसळले. त्याने रुतवलेला दात अजूनही मि. रुकास्टल च्या गळ्यात तसाच होता. आम्ही मोठ्या मुश्कीलीने त्या महाकाय प्राण्याला त्यांच्या अंगावरून बाजूला केले. जखमी आणि भीतीने अर्धमेल्या झालेल्या मि. रुकास्टलना आम्ही उचलून घरात आणले. दिवाणखान्यातील एका कोचावर त्यांना आडवे केले. बर्‍यापैकी भानावर आलेल्या टोलरला त्याच्या बायकोची सुटका करण्यासाठी धाडून दिले. मी मि. रुकास्टलांच्या बाजूला बसून त्यांना आराम पडावा म्हणून प्रयत्न करू लागलो. तितक्यात दार उघडून एक करारी स्त्री आत आली.

"ही टोलरची बायको." मिस हंटर म्हणाल्या.

"मला मि. रुकास्टलनी तुमच्या कडे येण्यापूर्वी कडी काढून गोदामाबाहेर काढले. मिस, तुम्ही हे जे उद्योग केले आहेत त्याची तुम्ही मला पूर्वकल्पना द्यायला हवी होती. कारण मी तुम्हाला तेव्हाच सांगितले असते की तुमची मेहनत पाण्यात जाणार आहे."

"हा!" होम्सचे सर्व लक्ष आता ह्या नवीन स्त्रीवर केंद्रीत झाले होते, "असे दिसते की इथल्या कुणाही पेक्षा ह्या मिसेस टोलरना ह्या प्रकरणाबद्दल जास्त माहिती दिसते."

"हो सर! मला सर्व काही माहीत आहे आणि मी ते तुम्हाला सांगू इच्छिते."

"कृपया इथे बसा, मिसेस टोलर आणि आम्हाला सर्व सांगा. कारण अजूनही असे काही मुद्दे आहेत ज्यांच्या बाबतीत मी अजूनही अंधारात आहे."

"मी लवकरच त्या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकेन. मला त्या गोदामात बंद करण्यात आले नसते तर ह्या आधीच मी ते केले असते. जर का ह्या प्रकरणात पोलिस केस झाली किंवा हा मामला न्यायालयात गेला तरीही मी तुमच्या बाजूने उभी राहीन ह्याची खात्री बाळगा. कारण माझे मिस अ‍ॅलिस बरोबर जिवाभावाचे व मैत्रीचे नाते होते."

"ती ह्या घरात कधीच समाधानी नव्हती. तिच्या पित्याचे दुसरे लग्न झाल्या क्षणापासून ती दु:खी होती. तिचा कायम अपमान केला जात असे आणि तिच्या मताला कुणी किंमत देत नसे. तिच्या एका स्नेह्याच्या घरी ती एकदा मिस्टर फॉवलरना भेटली व त्यांच्या प्रेमात पडली. तेव्हापासून रुकास्टलनी तिच्या आयुष्याची अधिकच वाईट दशा सुरू केली. माझ्या माहितीप्रमाणे अ‍ॅलिसला वारसाहक्कपत्रानुसार स्वतःच्या संपत्तीविषयी काही स्वतःचे अधिकार होते. पण ती इतकी शांत व सहनशील होती की तिने कधी त्या अधिकारांचा उच्चारही केला नाही आणि सर्व काही मि. रुकास्टलच्या हवाली केले. तिच्या पित्याला हे ठाऊक होते की तिचे लग्न होईपर्यंत काळजी करण्याचे कारण नव्हते कारण सर्व सत्ता व संपत्तीचा तोच मालक होता. परंतु तिच्या लग्नाचे वारे वाहू लागल्यानंतर होणार्‍या जावयाला कायद्याच्या मान्यतेने जो काही वाटा द्यावा लागेल त्यामुळे मि. रुकास्टल ह्यांचे चित्त बिथरले होते व हे प्रकरण संपवण्याचा त्यांनी घाट घातला. त्यांना एका कागदपत्रावर अ‍ॅलिसच्या स्वाक्षर्‍या हव्या होत्या ज्यात हे नमूद केले होते की ती अविवाहित राहिली किंवा तिने लग्न केले तरी तिच्या संपत्तीचा मालकी हक्क मि. रुकास्टल ह्यांच्याकडेच राहील. जेव्हा तिने सही करण्यास नकार दिला तेव्हा त्या नराधमाने तिला तापाने फणफणून आजारी पडेस्तोवर धमकावले. ती बिचारी सहा आठवड्यांपर्यंत मेंदूज्वराशी झुज देत होती. त्यानंतर ती मृत्युशय्येवरून तर परत आली पण तिचे सुंदर लांब केस गळून गेले होते व ती कमालीची अशक्त झाली होती. पण ह्या सर्वांचा तिच्या प्रियकरावर काहीच फरक पडला नाही. तो एका जिवलगाप्रमाणे कायम तिच्या बाजूने राहिला व तिच्याच साठी झुरत राहिला."

"आहह!", होम्स मध्येच म्हणाला,"आता मला बर्‍याच गोष्टींची संगती लागते आहे. आता उर्वरीत मुद्दे मी सांगू शकतो. म्हणूनच मग रुकास्टलनी ही कैदखान्याची शक्कल लढवली, होय ना?"

"हो, सर!"

"आणि इथे वारंवार रेंगाळणार्‍या मि. फॉवलर पासून सुटका मिळवण्यासाठी ह्या मिस हंटरना इथे आणले."

"हेही बरोबर आहे, सर! मि फॉवलर हे एक दयाळू हृदयाचे, मृदूभाषिक मनुष्य आहेत. मिस अ‍ॅलिसला रुकास्टलनी कैदेत टाकल्यानंतर त्यांनी माझी गाठ घेऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आमचे खटके उडाले. परंतु अखेरीस त्यांना आणि मला अपेक्षित असलेली गोष्ट एकच असल्याचे त्यांनी मला पटवून दिले. अ‍ॅलिसची सुटका हा आमचा दोघांचाही समान उद्देश होता."

"आणि म्हणूनच त्यांनी तुमच्याशी संगनमत करून टोलर मद्यपान करून तर्र होईल ह्याची दक्षता घेतली आणि रुकास्टल पती-पत्नी बाहेर जाताच शिडीची व्यवस्था केली."

"तुमचे अंदाज अचूक आहेत."

"तुमच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो, मिसेस टोलर." होम्स म्हणाला, "तुम्ही ह्या रहस्याची बर्‍यापैकी उकल केली आहे. आणि आता मिसेस रुकास्टल इथल्या स्थानिक डॉक्टरला घेऊन आल्या आहेत, तेव्हा वॉतसन, आपण मिस हंटरना विंचेस्टर स्थानकापर्यंत सोडून यायला हवे. तसे पण ह्यापुढे इथे आपली गरज लागेल असे वाटत नाही."

तर अश्या प्रकारे आम्ही त्या भयाण कॉपर बीच बंगल्याचे रहस्य शोधून काढले. मि. रुकास्टल जिवंत आहेत. पण ह्या प्रकरणानंतर त्यांनी कायमचाच धसका घेतला. त्यांच्या सेवाभावी पत्नीच्या सेवेवरच त्यांचा जीव तगत राहिला आहे. ते उभयता अजूनही त्याच जुन्या नोकरांसोबत त्याच बंगल्यात राहतात. कदाचित त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल त्या नोकरांना सर्वच माहित असल्याने त्यांना आपल्यापासून दूर करणे त्यांना प्रशस्त वाटत नसावे. मिस अ‍ॅलिस पळून गेल्याच्या दुसर्‍याच दिवशी तिच्या प्रियकराशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिच्या पतीस मॉरिशस बेटावर एका सरकारी कार्यालयात नोकरीची संधी चालून आली. माझ्या परमप्रिय मित्राने नंतर मिस हंटरकडे ढुंकूनही पाहिले नाही ह्याचे मला अतीव दु:ख झाले. आता ती तो काम करत असलेल्या केसच्या केंद्रस्थानी नव्हती ना! ती आता वॉलसल येथील एका खाजगी शाळेची मुख्याध्यापक आहे व बर्‍यापैकी यशस्वी आयुष्य जगते आहे.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. Happy
दारूचा साठी करण्यासाठी असते तसले एक गोदाम आहे.>>> तेवढं साठा कर Happy

अप्रतिम.

"When you have excluded the impossible, whatever remains, however improbable, must be the truth"

माझ्या आठवणीप्रमाणे ही ओळ "The Adventure of the Beryl Coronet" या कथेतील आहे. पुढील अनुवादासाठी एक सुचवण.

सर्व प्रतिसादकांचे आभार. Happy

हर्षल खगोल,
सुचवणीसाठी पेशल धन्यवाद. जमले तर आणि प्रताधिकाराच्या कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर नक्की प्रयत्न करेन. Happy

निंबुडा.. आता एक स्वनिर्मित रहस्यकथा आलीच पाहिजे !
>>>
२ वर्षांमागे एक कथा लिहायला सुरुवात केली होती. एक भाग होऊन तशीच पडली आहे अजूनही!
बघू मुहूर्त कधी लागतो ते! Happy

दारूचा साठी करण्यासाठी असते तसले एक गोदाम आहे.>>> तेवढं साठा कर >>>
सस्मित, धन्यवाद. बदल करत आहे.

वा...मजा आली.

शेरलॉक होम्सच्या
सगळ्या गोष्टी मी अनेकदा वाचल्यात, तरीही आता परत मराठीतुन वाचताना परत एकदा तोच थरार अनुभवायला मिळाला. Happy

निंबुडा वॉटसन
>>>
Happy

ब्लश करणारी बाहुली! Happy

निंबुडा दाद >>>
हा काय प्रकार आहे? Uhoh
निंबुडा आणि दाद हे दोन वेगवेगळे आयडी आणि व्यक्तिमत्त्वे आहेत! Wink

शेरलॉक हा सर्वान्च्याच आवडीचा ! मराठी मधे वाचायला मिळ्णे म्हणजे श्रीखण्डाचा आस्वाद !
निम्बुडा मनापासून धन्यवाद ! आणि पुढील अनुवादासाठी शुभेछा !!

नवीन प्रतिसाद देणार्‍यांना आभार! Happy

Adventure of speckled band >>>
ह्या कथेचा मराठी अनुवाद मला वाटते मनोगतावर आधीच प्रसिद्ध आहे. हवी असल्यास शोधून लिंक देऊ शकेन. मराठी आंतर्जालावर जे अनुवाद आधीच प्रसिद्ध आहेत ते टाळण्याकडे माझा कल राहिल. Happy

nice story

निंबुडा, जमलं तर The problem of Thor Bridge या कथेचा अनुवाद टाक. हा मराठी अनुवाद कोणी केल्याचे किंवा कुठे प्रकाशित झाल्याचे आठवत नाही. फारशा लोकांना ही कथा माहितीही नसेल पण कथेतलं रहस्य आणि त्याची उकल खरंच छान आहे.

छान .....

मस्त जमलाय दोन्ही कथांचा अनुवाद... तुम्ही अनुवाद करण थांबवलयत का...? कारण दोनच सापडल्या.. इतर शेरलॉक होम्स कथा वाचायला आवडेल....

माबोवर निंबुडा ह्यानी लिहिल्या अनुवादित शेरलोक कथा प्रतिलिपीवर मला अनिल चव्हाण ह्या नावाने दिसल्य आहेत, २०१८ मध्ये पोस्ट झाल्या आहेत, माझ्याकडे त्याचा स्नॅपशॉट आहे

अनिल चव्हाण उर्फ आबा ह्यानावाचे कोणी माबोवर आहेत का? त्यान्चा आणि निंबुडा ह्या आयडीचा काही संबन्ध आहे आहे?

माझ्या मते निंबुडा ह्यान्चे लिखाण चोरीला गेले आहे..

Pages