"आनंद मना ... "

Submitted by अवल on 6 December, 2012 - 00:46

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

अन मग एक क्षण आला, बुद्धीला समजलं, काहीतरी हुकतय, मन अवखळ, चिडचिडं, वाभरं, लहान मूल झालय.

त्याला ताळ्यावर आणायचं तर कुमारांशिवाय कोणता उपाय?

एकीकडे कामं करतानाच एक क्षण मोकळा काढला अन कुमार लावले. अन कुमार वेगळेच भिडले आज...

जणु बाबा पुन्हा भेटले....

चिज होती मालकंस मधली "आनंद मना..."

मनातले सगळे नैराश्याचे तांडव हळूहळू शांतावत गेले.
मनातला राग, उद्वैग, निराशा सगळं सगळं जणू त्यांना कळलं होतं.
ये गं बायो, किती खंतावशील? बस जरा जवळ. शांत हो बायो. नाराज नको होउस, होतं असं कधी कधी...

ये, ये,... " बैस जरा. जाउ दे सगळं... ठेव डोकं मांडीवर. थोपटत म्हणाले, हो गं, कळतं मला तुझं दु:ख, चिडचिड, उद्वेद....

"आ sssss, दे... " दे, तुझी सारी अशांतता मला दे....,

"ये ना,..., दे ना..." मला सारी तुझी दु:ख! अन थोपटत मला समजावत राहिले..... मला शांत करत राहिले,....

"हां..." समजतय मला....

"ना...." ही गं, तुझं नाही काही चुकलं.... बरोबर आहे गं, होतं असं,....

"ये ही...." रित है दुनियाकी....

" ना..ना...." रडू नको,.... जाऊ दे सारं............ जाऊ दे सारं.....

"हं,..." बास आता....उठ,...., शांत हो, स्वतःला सावर,....

"नैन न ना,..." चल डोळे पूस... आवर बाई तुझं दु:ख,...
"ये ही,..." ये जवळ ये.

हळूवार गोंजारून समजावत राहिले, अगं बाई जरा आनंद मनव ग सगळ्याचा.
आर्जवं करत राहिले, "आनंद मना, मना,..."
समजावत राहिले, "आनंद मना..."

जवळ घेऊन माझ्या मनातल्या सगळ्या उद्वेगाला आपल्या एका कवेत घेऊन दुस-या कवेत मला घेऊन म्हणाले, "हं,..." अगं हेही सगळे तुझेच आहेत, त्यांना घे जवळ, स्विकार. झिडकारू नकोस. स्विकार. स्विकार सारं, अगदी दु:खही....

जसं सुख आपलं तसच दु:खही आपलच गं. यांच्यामुळेच तर तू सुखाला जास्त चांगलं समजू शकलीस ना? हे सगळे तुझेच, तुलाच मिळाले याचाही आनंद मनव बायो! त्यांना आपलं मान, ते आपल्याच घरी आले हे मान्,त्याचा आनंद मान; "मोरा जो पिया घर आया, आनंद मना... "

त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, बघ ते सगळे हळुहळू सुसह्य झालेत, अन दुसरीकडे लक्ष वेधत म्हणाले, ते बघ सगळा आनंद, समाधान आहेच की तुझ्या आयुष्यात, बघ "चहु दिस सब चमकत", सा-या दु:खांच्या पुढे बघ, या इथे सगळा आनंद तर फुललाय " रतिया खिल गयो बगिया"

सारीकडे आनंद, समाधान, सुख पसरलय त्याकडे बघ गं, दु:ख तर असतच ना? पण त्यामुळे तर आनंद लखलखून दिसतो ना, बघ "चहु दिस सब चमकत" जीवनातल्या काट्यांसाठी वाटच चालायची थांबवलीस तर "रतिया खिल गयो बगिया" कशी पहायला मिळाली असती सांग बरं!

अन मग अतिशय प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, शांत हो बया, अगं असच असतं सारं आयुष्य! उद्वैग, राग, निराशा या सा-याला अगदी तांडव करून निपटलस ना? मग आता कशाला हताशा?

मान्य हे तांडव करताना थकली, दमली, हळवी झालीस. हे स्वाभाविकच ना? पण आता शांत हो, आयुष्याला भीड, जग, "आनंद मना ... "

http://www.youtube.com/watch?v=lSIRPrdUJbw

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, किती सुरेख मनोगत आहे. मी आज वाचलं हे.
दाद, खुप खुप धन्यवाद हा लेख वर काढल्याबद्दल.. Happy

कुमार नेहमीच थेट इतके काळजाला हात घालतात काही कळत नाही. कुणा एकाच्या/एकीच्या नाही, सर्वांच्याच. कुमारांबद्दलची प्रत्येक भावना कायम समानुभूती असते, कुणा एकट्याची ती उरतच नाही.. नेहमीच प्रत्येकाचं असंही असतंच की कधी एकदा हे कुणाशी तरी बोलतोय, त्या उत्कटतेचा सहानुभव घेतोय.. हे सगळं किती सामायिक असतं.. कुमार ऐकणा-या कुणाचंही Happy अजब आहे खरंच!

>कुमारांबद्दलची प्रत्येक भावना कायम समानुभूती असते, कुणा एकट्याची ती उरतच नाही.. नेहमीच प्रत्येकाचं असंही >असतंच की कधी एकदा हे कुणाशी तरी बोलतोय, त्या उत्कटतेचा सहानुभव घेतोय..

अगदी अगदी सई.

माधव,
आनंद मनाची लिंक आहे चिजांच्या पहिल्या धाग्यावर.

Pages