"आनंद मना ... "

Submitted by अवल on 6 December, 2012 - 00:46

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

अन मग एक क्षण आला, बुद्धीला समजलं, काहीतरी हुकतय, मन अवखळ, चिडचिडं, वाभरं, लहान मूल झालय.

त्याला ताळ्यावर आणायचं तर कुमारांशिवाय कोणता उपाय?

एकीकडे कामं करतानाच एक क्षण मोकळा काढला अन कुमार लावले. अन कुमार वेगळेच भिडले आज...

जणु बाबा पुन्हा भेटले....

चिज होती मालकंस मधली "आनंद मना..."

मनातले सगळे नैराश्याचे तांडव हळूहळू शांतावत गेले.
मनातला राग, उद्वैग, निराशा सगळं सगळं जणू त्यांना कळलं होतं.
ये गं बायो, किती खंतावशील? बस जरा जवळ. शांत हो बायो. नाराज नको होउस, होतं असं कधी कधी...

ये, ये,... " बैस जरा. जाउ दे सगळं... ठेव डोकं मांडीवर. थोपटत म्हणाले, हो गं, कळतं मला तुझं दु:ख, चिडचिड, उद्वेद....

"आ sssss, दे... " दे, तुझी सारी अशांतता मला दे....,

"ये ना,..., दे ना..." मला सारी तुझी दु:ख! अन थोपटत मला समजावत राहिले..... मला शांत करत राहिले,....

"हां..." समजतय मला....

"ना...." ही गं, तुझं नाही काही चुकलं.... बरोबर आहे गं, होतं असं,....

"ये ही...." रित है दुनियाकी....

" ना..ना...." रडू नको,.... जाऊ दे सारं............ जाऊ दे सारं.....

"हं,..." बास आता....उठ,...., शांत हो, स्वतःला सावर,....

"नैन न ना,..." चल डोळे पूस... आवर बाई तुझं दु:ख,...
"ये ही,..." ये जवळ ये.

हळूवार गोंजारून समजावत राहिले, अगं बाई जरा आनंद मनव ग सगळ्याचा.
आर्जवं करत राहिले, "आनंद मना, मना,..."
समजावत राहिले, "आनंद मना..."

जवळ घेऊन माझ्या मनातल्या सगळ्या उद्वेगाला आपल्या एका कवेत घेऊन दुस-या कवेत मला घेऊन म्हणाले, "हं,..." अगं हेही सगळे तुझेच आहेत, त्यांना घे जवळ, स्विकार. झिडकारू नकोस. स्विकार. स्विकार सारं, अगदी दु:खही....

जसं सुख आपलं तसच दु:खही आपलच गं. यांच्यामुळेच तर तू सुखाला जास्त चांगलं समजू शकलीस ना? हे सगळे तुझेच, तुलाच मिळाले याचाही आनंद मनव बायो! त्यांना आपलं मान, ते आपल्याच घरी आले हे मान्,त्याचा आनंद मान; "मोरा जो पिया घर आया, आनंद मना... "

त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले, बघ ते सगळे हळुहळू सुसह्य झालेत, अन दुसरीकडे लक्ष वेधत म्हणाले, ते बघ सगळा आनंद, समाधान आहेच की तुझ्या आयुष्यात, बघ "चहु दिस सब चमकत", सा-या दु:खांच्या पुढे बघ, या इथे सगळा आनंद तर फुललाय " रतिया खिल गयो बगिया"

सारीकडे आनंद, समाधान, सुख पसरलय त्याकडे बघ गं, दु:ख तर असतच ना? पण त्यामुळे तर आनंद लखलखून दिसतो ना, बघ "चहु दिस सब चमकत" जीवनातल्या काट्यांसाठी वाटच चालायची थांबवलीस तर "रतिया खिल गयो बगिया" कशी पहायला मिळाली असती सांग बरं!

अन मग अतिशय प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, शांत हो बया, अगं असच असतं सारं आयुष्य! उद्वैग, राग, निराशा या सा-याला अगदी तांडव करून निपटलस ना? मग आता कशाला हताशा?

मान्य हे तांडव करताना थकली, दमली, हळवी झालीस. हे स्वाभाविकच ना? पण आता शांत हो, आयुष्याला भीड, जग, "आनंद मना ... "

http://www.youtube.com/watch?v=lSIRPrdUJbw

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है, अवल !

मनातील नैराश्येचे तांडव [जे कारणास्तवही येत असेल वा विनाकारणही] कुमार जादूने थंडावत होत असेल तर निदान ती थंडाई भोगण्यासाठी का होईना अशी तांडवे मग नित्यनेमाने यावीत असे म्हणण्याचा मोह होतो.

वास्तविक वरील चिंतन हे तुमच्या एकटीचे आणि एकटीसाठीचे आहे....असावे... असे मी म्हणतो इतके ते खाजगी आहे. अन् खाजगी असूनही त्यातून मिळालेला अपूर्व आनंद तुम्ही तितक्याच तन्मयतेने शब्दबद्ध करून इथे मांडला त्याबद्दल 'कुमार' पुढेच मी नतमस्तक.

[उत्तर भारताच्या सहलीत जवळपास मध्यरात्री एकदा तुडूंब भरून वाहणारी यमुना नदी पाहायला मिळाली होती.....तिचे ते रुप वेडावून टाकणारे होते आणि त्या प्रवाहाकडे भान हरपून पाहात असताना माझ्या मनी रुंजी घालू लागली होती प्रभा अत्रेची 'खमाज' मधील ती अशीच खुळी करून टाकणारी रचना.....

".....जमुना किनारे मोरा गाव.....सावरे आ जई यो....!!"]

"...आनंद मना" ~ किती सार्थ आहे हे सारे गारुड, अवल !!

अशोक पाटील

अशोकमामा, इथे टाकू, नको टाकू ? अशा द्विधेत टाकलं. अनेकदा अशी अकारण नैराश्य अनेकांना येतं. मला मिळालेला आश्वासक सूर इतरांनाही मिळाला तर किती छान म्हणून इथे शेअर केले Happy
मनापासून धन्यवाद!
>>>जमुना किनारे मोरा गाव.....सावरे आ जई यो....!! <<< अहाहा, अजून एक अविस्मरणीय चिज !

काही सूर, काही शब्द, काही चित्रं, काही निसर्गदृश्ये, काही गंध - असे विलक्षण असतात की माणसाची मन:स्थिती संपूर्णपणे बदलूनच जाते.
असा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप धन्स, अवल....

अवल - कधी कधी आपली मनस्थिती आणि गाणे यांचे असे काही नाते बनून जाते कि तुम्ही कोणत्याही परीस्थितीत असा, कुठेही असा, वाऱ्याच्या झुळकी बरोबर आलेली गाण्याची हलकीशी धून सगळा मळभ दूर करते.
अर्थात मळभ येण्या मागे असणारा उद्वेग समजून घेणारे कोणी भेटत नाही, हि खरी खंत असते. 'स्व' ला सिद्ध करण्याची संधी असून आपण ती इतर कोण्याच्या सांगण्याने अथवा इतर कोणासाठी त्यावेळी अव्हेरलेली असते, पण प्राप्त परीस्थितीत,जगाची समजूत आता वेगळीच होवून बसलेली असते जी आपण कोणत्याच शब्दात व्यक्तच करू शकत नाही,किंवा त्यावर काही खुलासा करणे हे हि व्यर्थ ठरणार असते,तेंव्हा ज्याने धीर मिळतो ते म्हणजेच "आनंद मना .."
@अशोकजी -खरेतर आपण प्रतिक्रियेत देखील त्या त्या लेखाच्या विषयी लिहताना त्यातील मतीतार्थाचा उलगडा इतक्या सहजतेने करता कि त्यामुळे आपली प्रतिक्रिया अंतर्मुख करते
@विनार्च - मोजक्या शब्दात खूप काही सांगितलाय
आपणा सर्व प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक आभार.

अवल.....खूप खूप मनातल लिहील आहेस. फार आवडल. आणि कुमारांबद्दल काय बोलावं....
नितान्त सुरेख चीज आहे ही मालकंसातली. मनावर आदळणारे विचार, अस्वस्थता सगळं काही निवून जातं ही चीज ऐकली की.

- धन्यवाद!

खूपच सुरेख लिहिले आहेत विचार.
कुमारांचं गाणंच असं आहे ना की खरोखरीच एखादे आजोबा आपल्या नातवाला एखादी रमणीय गोष्ट सांगतात असंच वाटावं. गोष्ट रमणीय आहे, पण लहान मुलांच्या पातळीवरची नाही, आहे मोठ्यांच्याच पातळीवरची. तरीसुद्धा ते लहान मूल गुंगून जातं गोष्ट ऐकताना. सगळंच समजतं त्याला असं नाही, पण एखादाच शब्द, गोष्टीतला एखादाच हावभाव असा काही भिडतो की त्या मुलालाही वाटतं की मीही आता मोठा झालोय, मोठ्यांच्या पातळीवरची असलेली गोष्ट आता मलाही उमगू लागलीय.
त्यात जे समाधान असेल ना, तेच समाधान 'आनंद मना' ऐकायला सुरुवात केल्यानंतरचे जे विचार आहेत, त्यांत उतरलंय.
अवल, जियो, जियो!!
असेच अजून सुंदर विचार येऊ देत.

अवांतरः ह्याच चिजेत कुमारांनी मालकंसाला वर्ज्य असलेला पंचम स्वरही लावला आहे असे ऐकले आहे.

अवल... एक अप्रतिमपणे उतरलेलं चिंतन... अनुभव.
मनाची तगमग, तलखी... ती नक्की कोणत्या प्रकारची अन कशी थंडावत जाते... "कुमारांचा मालकंस" ऐकताना... केवळ सुरेख.
<<कुमारांचं गाणंच असं आहे ना की खरोखरीच एखादे आजोबा आपल्या नातवाला एखादी रमणीय गोष्ट सांगतात असंच वाटावं. गोष्ट रमणीय आहे, पण लहान मुलांच्या पातळीवरची नाही, आहे मोठ्यांच्याच पातळीवरची. तरीसुद्धा ते लहान मूल गुंगून जातं गोष्ट ऐकताना....>>
चैतन्य, तुला दहा गावं इनाम!
आणि हो... ह्यात मालकंसात पंचम लावलाय कुमारांनी.
माझ्याकडल्या एका मैफिलीच्या रेकॉडिंगमधे कुमारांनी मालकंस ...विलंबित खयाल, द्रुत बंदिश, मध्यलय बंदिश, पुन्हा द्रुत बंदिश असा खेळवलाय. कुमार हे एक असं कोडं आहे की, धरवत नाही सोडवत नाही... खूप अवघड करून ठेवतात कुमार.

आज पुन्हा एकदा, आनंद मना सकाळी सकाळी ऐकलं. मालकंस आणि सकाळी? असा
त्रासिक चेहर्‍याने नवरा विचारता झाला. त्याला मालकंस आणी सकाळ ह्या गणिताचं काही नाहीये... मीच कधीतरी पूर्वी त्याने सकाळीच लावलेल्या मालकंसाला दिलेली "दाद" त्यानं आज सव्याज परत केली.

पण गणित 'मालकंस आणि सकाळ' नसून.... 'मी आणि कुमार' आहे... हे कुमारांना अन मला ठाऊक आहे.
आणि आठवलं... अरे, आपल्या अवललाही ठाऊक आहे की
Happy

ह्या लेखाची आठवण झालीच.

सर्वात प्रथम दाद यांचे आभार इतके उत्कट, तरल लेखन त्यांच्यामुळे वर आले.

अवल, काय लिहू, सकाळ सोनेरी झाली या कवडशामुळे. आयुष्यातील अनेक घटनांशी संबंधित एखादे गाणे असतेच असते. ते गाणे कधीही लागले तरी रस, गंध, भावांच्या उत्कट स्मृती जाग्या होतात. हे इतर कुणाला सांगून उमजेलच असे नाही.

हा लेख वाचून अश्या संगीतातून वेळोवेळी मिळणार्‍या अनुभूतीची सुखद पुनर्जाणीव करून दिली. आज लाँग ड्राईव्ह आहे, कुमारांना काही करून साथ घेतलेच पाहिजे.

>>पण गणित 'मालकंस आणि सकाळ' नसून.... 'मी आणि कुमार' आहे... हे कुमारांना अन मला ठाऊक आहे.

अगदी अगदी.. हे असं गणित कुमार, भीमसेन, वसंतराव यांच्या अशा अनेक रागांसाठी आहे.
वाह... सकाळी सकाळी "आनंद मना" ची नुसती आठवण जरी आली तरी मन प्रफुल्लित होतंय.

कुमारांबद्दलचा लेख वाचुन नुकताच घडलेला प्रसंग आठवला.
परवा इथे एक बंगाली शास्त्रीय गायकाची मैफल होती. मी आणि थॉमस (माझा सितार टिचर) दोघे गेलो होतो तिथे.
त्या गायकाशी बोलताना कुमारांचा विषय निघाला. मी म्हटल की कुमारांची गायकी कित्ती वेगळ्या धाटणीची. लगेच तो म्हटला "फारच वेगळी". त्याच तोंड बघुन लगेच कळलं की याला कुमार आवडत नाहीत. मी आणि थॉमस एकमेकांकडे बघुन हसलो. "अरेरे याला कुमारांच गाण आवडत नाही, आता या बिचर्याच पुढे काय होणार?" असे expressions माझ्या आणि थॉमस च्या चेहेर्यावर. Proud पुढे किशोरीबाईंचा वगैरे विषय काढला तेव्हा पण त्याच उत्तर तेच!. एकंदर त्याच्या द्रुष्टीने महाराष्ट्रातलं गायन "फारच वेगळं". कदाचित त्याच गाणं सोडुन बाकिच्यांच्याच गाण्याची तरीफ आम्ही करतोय याचा त्याला मनस्ताप होत असावा. कारण नंतर त्याची formal स्तुती केल्यावर, त्याला अचानक पं. भीमसेन जोशींच गाणं आवडु लागलं. (ते सुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत हे सांगायची माझी फार ईच्छा झाली :डोमा:)

ट्युबीवर आजुन एक मालकंस आहे कुमारांचा. त्यात "छ्ब तोरी" बंदिश आहे. पण शब्द कळत नाहेयेत. कुणाला माहित असतील तर सांगावे!

कुलु,
त्याचे शब्द असे आहेत-
छब तेरी छब तेरी | आँखन मे आँखन मे |
तरसायो मन | निसदिन निसदिन |
इत तूही, उत तूही | भर जो गइ दसो-दिस |
तरसायो मन | निसदिन निसदिन |

कुमार, मालकंस, द्रुत एकताल आणि हे शब्द- सगळं मिळून जे रसायन होतं ना...त्याने पछाडला गेला नाही असा माणूस विरळाच !!

चैतन्य धन्यवाद. "इत तुही उत तुही" हे मस्त म्हटलय त्यात. खर तर त्यासाठीच मला बंदिशीचे शब्द हवे होते. आत्त कळल की तो जोर देउन म्ह्टलेला पार्ट म्हणजे "इत तुही उत तुही"!

कुमार, मालकंस, द्रुत एकताल आणि हे शब्द- सगळं मिळून जे रसायन होतं ना...त्याने पछाडला गेला नाही असा माणूस विरळाच !!>>>>>>>अगदी, तो नाद डोक्यात भरुन राहतो!

Pages