माझा पहिला परदेश प्रवास : ५ (आमचं पहिलं भांडण ...)

Submitted by ललिता-प्रीति on 7 October, 2008 - 00:16

आमचं पहिलं भांडण ...

रोज संध्याकाळी 'बाय-बाय' म्हणायची वेळ झाली की ऍना आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या तीन वेळा सांगायची - म्हणजे ७.००, ७.४५, ८.४५ किंवा ६.००, ७.००, ८.०० अश्या. त्या तीन वेळांपैकी, पहिली वेळ जेव्हा ६ पेक्षा जास्त असायची (जे फार क्वचित व्हायचं ...) तेव्हा सर्वात पहिला मला आनंद व्हायचा कारण त्या वेळा अनुक्रमे गजर, नाश्ता आणि हॉटेलमधून निघण्याच्या असायच्या!!!
त्यादिवशी पट्टाया सोडायचं होतं, साहजिकच चेक-आऊट असल्यामुळे सहा वाजता गजर होणार होता. काय करणार ... बॅंकॉक पहायचंय ? मग उठा लवकर ... !!! दोन दिवसांपासून त्या हॉटेलची एक लिफ़्ट बिघडली होती. मग एकतर एकाच लिफ़्टची वाट पाहत रहा उभं १०-१५ मिनिटं किंवा जिने चढा. बहुतेक वेळेला जिनेच चढावे लागायचे. त्यामुळे गुडघेदुखीवाली मंडळी जरा वैतागलीच होती. तरी बरं, खोल्या तिसऱ्या मजल्यावरच होत्या. त्यामुळे त्यादिवशी खाली येताना सर्वांच्या चेहेऱ्यावर जरा समाधान होतं की 'चला, आता इथून पुढे जिने चढावे लागणार नाहीत.'

काउंटरवर 'चेक‍आऊट' असं सांगून ज्याने-त्याने किल्ल्या 'ड्रॉप बॉक्स' मध्ये टाकायच्या होत्या. आदल्या दिवशी आमच्या रूमची किल्ली रिसेप्शनवाल्यांच्या हातूनच गहाळ झाली होती कुठेतरी. (नंतर ती सापडली म्हणे.) सकाळी कॉरल आयलंडला निघताना मी व्यवस्थित ड्रॉप बॉक्समध्ये टाकली होती. रात्री परत आल्यावर ती सापडेना म्हटल्यावर सगळेजण उगीचच माझ्याकडे संशयित नजरेने पहायला लागले होते. ती रिसेप्शनिस्ट तर काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. तावातावाने बोलताना थाई माणसं आपले डोळे मिटून घेतात आणि वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढत बोलतात. तिची भाषा कळली नाही पण 'डोकं भडकलंय' हे तर समजलंच लगेच. शेवटी, मास्टर-की ने आमची खोली उघडावी लागली होती. ते करणारी रूम-सर्विसवाली मुलगी पण 'एक साधी किल्ली नाही सांभाळता येत' असा चेहेरा करून आमच्याकडे पाहतपाहत निघून गेली होती. थोडक्यात काय, त्या दिवशी चेक‍आऊट करतानासुध्दा मी रिसेप्शन काउंटरवरच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हातवारे करून आणि मगच ड्रॉप बॉक्स मध्ये किल्ली टाकली. बाद में खालीपीली झंझट नहीं मंगता था अपुन को !!!
८.००-८.३० ला चेक‍आऊट करून, सामानासकट आम्ही निघालो. अर्धा दिवस पट्टाया परिसरातच रहणार होतो आम्ही पण पुन्हा हॉटेलवर यायचं नव्हतं. आज आमचा दौरा होता 'नॉंगनूच व्हिलेज'ला. (नॉंगनॉश व्हिलाश - इती ऍना); किंवा कदाचित तोच खरा थाई उच्चार होता त्या शब्दांचा. ३०-४० मिनिटं होती तिथे पोहोचायला. असा वेळ मिळाला की ऍना आमच्याशी गप्पा मारायची. थाई लोक, त्यांची संस्कृती, कुटुंब व्यवस्था, शिक्षणपध्दती याबद्दल बोलायची. तिथे लग्नाच्या वेळी नवऱ्याला हुंडा द्यावा लागतो आणि मोठ्यांची काळजी घेण्याचं वचन द्यावं लागतं असं कळलं. 'थाई लोक कुटुंबात रमणारे आहेत' असं तिने सांगितलं. तिथे शाळा-कॉलेजमध्ये दुय्यम भाषा शिकवत नाहीत. पूर्ण देशभर एकच भाषा शिकवली जाते, बोलली जाते. आपल्याला इंग्रजी येत नाही याचा त्या लोकांना सतत एक न्यूनगंड वाटतो. ऍना म्हणाली - 'तुम्ही भारतीय लोक जगभर कुठेही फिरा, इंग्रजी येत असल्यामुळे तुमचं कुठेही अडत नाही पण आम्हाला बाहेर गेलं की खूप अवघड जातं.' ते ऐकून तमाम पब्लिक खूष झालं ... मनातल्या मनात. पण चेहेऱ्यावर कुणी काही दाखवलं नाही. आपली 'इंग्रजी ज्ञानाची सव्वा लाखाची झाकली मूठ' कोण कशाला विनाकारण उघडेल !!! म्हणजे बघा, तिथे ते चित्र आणि इथे आपल्याकडे 'इंग्रजीचा अतिरेक, फाजिल लाड' म्हणून आरडाओरड चाललेली असते. लोकांना जिथे जे सहजासहजी मिळतं तिथे ते त्यांना नकोसं झालेलं असतं हेच खरं. दरम्यान, नॉंगनूच व्हिलेजच्या परिसरात बस शिरत होती त्यामुळे त्या गप्पा तिथेच थांबल्या.

एक ६०-७० वर्षांची थाई म्हातारी, तिच्या नावावर शेकडो एकरांची जमीन होती. कुठल्याही उद्योगधंद्याला किंवा गृहनिर्माण योजनेला ती जागा न विकता तिने ती तशीच मोकळी ठेवली, तिथे बागा बनवल्या, मोठमोठाली तळी खोदली, जगभरातली निरनिराळी झाडं, फुलझाडं तिथे आणून लावली आणि त्या जमिनीचं अक्षरशः सोनं करून टाकलं - ते हे 'नॉंगनूच व्हिलेज'.

4029-25_1.jpg

त्याचा पसारा सांभाळता यावा म्हणून तिनं लग्न देखील केलं नाही. ती झाडं इतकी कलात्मक रीतीनं लावली होती की काय-काय बघावं आणि नजरेत साठवावं असा प्रश्न पडला. आदल्यादिवशीच्या त्या गाडगीळांच्या दसपट असलेल्या जेम्स गॅलरीपेक्षा निसर्गाचं हे वैभव पहायला मला केव्हाही जास्त आवडलं असतं.

तासभर त्या बागेत घालवल्यावर पुढचा कार्यक्रम होता 'थाई कल्चरल शो'. नॉंगनूच व्हिलेजमध्ये झाडांचं प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी एका विशिष्ट मर्यादेनंतर कुठल्याही वाहनांना जायची परवानगी नाहीये. त्यामुळे पुढच्या त्या 'शो'च्या ठिकाणी चालतच जावं लागतं.विविध जमातींचे नृत्यप्रकार, थाई 'किक-बॉक्सिंग'चे प्रात्यक्षिक असा तो अर्ध्या-पाऊण तासाचा शो होता. कलाकारांची वेषभूषा, केशभूषा इ. आधी कधीही पाहिलेलं नसल्यामुळे बघायला छान वाटलं. बरेचसे प्रेक्षक परदेशीच होते .... आपण तरी कुठे आपल्या देशातली आदिवासी नृत्यं वगैरे पहायला जातो? पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.
त्या शो नंतर होता The Elephant Show. सर्कसमध्ये असतात तश्या हत्तींच्या करामती, गमतीजमती होत्या. त्यामुळे विशेषतः आदित्यला खूप मजा आली. शोच्या शेवटी एका हत्तीनं त्याला आपल्या सोंडेत उचलून पण घेतलं.
ते खेळ संपल्यावर लोकांची बाहेर पडताना खूप गर्दी होते म्हणून ऍनाने आम्हाला एक भेटण्याची जागा दाखवून ठेवली होती. शिवाय तिची 'नीदी छत्ली' होतीच. मी बाहेर आले तर अजय आधीच तिथे पोचलेला होता. मला शंका आली. जवळ जाऊन त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला - त्याच्या अंगात ताप होता. मला जोरात ओरडावंसं वाटलं - 'अरेऽऽऽ! काय चाललंय काय?!! कशाला आलो आपण इथे?' घरी त्याला कधीही आजारी पडलेला मी पाहिलेला नाही. आणि इथे त्याचं हे काय झालं होतं. मला हसावं की रडावं ते कळेना!! ... मुलांच्या मदतीला आली नाही तर ती आई कसली !! सासूबाईंकडे क्रोसिन होती. ती त्यांनी अजयला दिली. त्या क्रोसिनवर हवाला ठेवून आम्ही तिथून निघालो. पट्टाया शहराबाहेरच्या एका हॉटेलमध्ये जेवण होतं. जेवायला जायचं असलं की ऍना आधी त्या हॉटेलमध्ये फ़ोन करून दुसरा कुठला भारतीय गृप तिथे जेवायला आलेला नाहीये ना ते विचारायची. कारण आम्ही जाऊ त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय हॉटेल्स होती पण लहानलहान होती आणि 'केसरी-सचिन' वगैरे सगळेजण तिथेच यायचे जेवायला आणि मग तिथे अशी गर्दी व्हायची की विचारायची सोय नाही. त्या गर्दीचा अनुभव आम्हाला अल्काझार शो नंतर आलेला होता. त्यादिवशी 'रेस्तरॉं मोकळं आहे' असं कळल्यावर तिनं आम्हाला घाई करून तिथून बाहेर काढलं आणि बस त्या दिशेने निघाली.
जय क्रोसिन!!! जेवायच्या ठिकाणी पोचेपर्यंत अजयचा ताप उतरलेला होता. तिथे जेवलो. आमचं जेवण संपतासंपता सचिन ट्रॅव्हल्सचा गृप आलाच तिथे. मग आम्ही विजयी मुद्रेने तिथून बाहेर पडलो.

'चोनबुरी राज्य महामार्गा'वरून आमची बस निघाली. बॅंकॉक आणि पट्टाया दोन्ही 'चोनबुरी' जिल्ह्यात येतात हे रस्त्यांवरच्या एकदोन इंग्रजी पाट्या वाचून कळलं. फक्त महामार्गांवरच इंग्रजी आणि थाई - दोन्ही भाषेत पाट्या होत्या. इतर सगळीकडे निरक्षराची गत होती. वाटेत 'लोटस शॉपिंग मार्केट' मध्ये थोडा वेळ थांबायचं होतं. शॉपिंग मार्केट कसलं, तो तर एक भलाथोरला मॉल वाटला मला तरी. कदाचित २-३ मजलीच होता म्हणून त्याला मॉल म्हणत नसावेत. आम्ही त्या मोठ्याच्यामोठ्या मार्केटमध्ये सर्वप्रथम काय शोधलं असेल ?? ... तर डोक्याला लावायचं तेल!!! प्रवासासाठी सामानाची बांधाबांध करत असताना दहा जणांच्या दहा सूचना रोज ऐकायला मिळत. अशीच कुठलीतरी सूचना ऐकून आम्ही सामानातली तेलाची बाटली काढून ठेवली होती. पण आम्हाला सगळ्यांनाच नियमित तेल वापरायची सवय आहे - अजय सोडून. त्यामुळे ३-४ दिवसांनी त्याच्याविना चैन पडेनासं झालं होतं. साधं तेल कुठेच दिसलं नाही. सेल्स गर्ल्सना विचारून काहीही उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही चक्क 'बेबी ऑईल' विकत घेतलं. साठी-सत्तरीच्या घरातल्या तीन, पस्तिशीच्या एका आणि ११ वर्षांच्या एका - अश्या पाच 'बेबीज'नी मग ते तेल वापरलं पुढचे ८-१० दिवस!!! आम्ही त्या मार्केटमध्ये इकडेतिकडे फिरेपर्यंत आदित्य दुसऱ्या मजल्यावरच्या काही व्हिडियोगेम्स खेळून आला. सरकते जिने आणि व्हिडियोगेम्स अशी दुहेरी मेजवानी मिळाली त्याला. थोडीफार खाद्यपदार्थांची पण खरेदी केली आणि तासाभराने तिथून निघालो. बाहेर खूप ऊन होतं. आता बॅंकॉक गाठायचं होतं.

बॅंकॉकमध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं ही नित्याचीच बाब आहे याचं सूतोवाच ऍनानं आधीच करून ठेवलं होतं आणि त्याचा प्रत्यय बॅंकॉकमध्ये शिरल्यावर लगेच आलाच. पण त्या दिवशी आम्ही बसमध्ये सर्वात पुढच्या सीटवर बसलो होतो. त्यामुळे समोरच्या काचेतून रस्त्यांवरच्या पाट्या बघण्यात, त्यांवरच्या थाई अक्षरांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात तो खोळंबा कंटाळवाणा नाही झाला.
आपला देश सोडून आता आम्हाला ३-४ दिवस झाले होते. इतक्या दिवसात बसमधून जाता-येता कुठेही शाळा किंवा शाळेला जाणारी मुलं दिसली नव्हती रस्त्यांवर. ऍनाला तसं विचारल्यावर तिनं सांगितलं की सुट्ट्यांनंतर शाळा सुरु व्हायला अजून १-२ दिवस अवकाश होता.

बॅंकॉकमध्ये भर गर्दीच्या रस्त्यावर आमचं 'फ़र्स्ट हॉटेल' होतं.

MALESIA__106.jpg

खरेदीची सर्व प्रमुख ठिकाणं जवळपासच होती. भर रस्त्यावर हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी बस उभी करायला परवानगी नव्हती. शेजारच्या एका अरुंद गल्लीत बस वळवायची होती. एक तर ती भलीथोरली 'व्हॉल्वो' बस, वळवायला जागा अगदी कमी आणि वाहता रस्ता ... पण आमच्या ड्रायव्हरनं इतक्या शिताफीनं ते सगळं केलं की मान लिया उसको. २-३ वेळा पुढेमागे करावं लागलं पण तेवढंच. मागून येणाऱ्या गाड्या तोपर्यंत शांतपणे रस्ता मिळण्याची वाट पाहत थांबल्या. कुठेही घुसवाघुसवी नाही की कर्णकर्कश्श हॉर्न्स नाहीत. खरं तर, त्यामुळेच २-३ प्रयत्नांत ती बस आत वळू शकली. तसंही, १५ दिवसांत गाड्यांचे जोरजोरात वाजणारे हॉर्न्स आम्ही कुठेही ऐकले नाहीत.
कोलंबो, पट्टायाच्या तुलनेत या हॉटेलच्या खोल्या जरा लहान होत्या. कोलंबोला आमचा पोहण्याचा बेत पावसामुळे फसला, पट्टायाला तेवढा रिकामा वेळच नव्हता मिळाला. इथे खोल्या ताब्यात मिळून सामान टाकल्यावर मात्र आदित्यनं भुणभूण सुरु केली. माझा त्या वेळी पोहण्याचा बिलकुल मानस नव्हता कारण जेमतेम तासाभरात आम्हाला जेवणासाठी बाहेर पडायचं होतं. त्यापूर्वी जरा मस्त चहा-कॉफ़ी प्यायचा आमचा विचार होता. पण आदित्यची समजूत कशी काय काढायची? शेवटी आमच्या गृपमधले एक काका पोहायला चालले होते, त्यांच्याबरोबर त्याला पाठवलं. त्या परांजपे काकांशी आदित्यची नंतर चांगलीच गट्टी जमली.
रात्री 'करी पॉट' नावाच्या भारतीय रेस्तरॉमध्ये जेवण होतं. आमच्या हॉटेलपासून ते अगदी जवळ होतं, पण गृपमध्ये आजी-आजोबा बरेच असल्याने आम्ही बसनंच गेलो तिथे. हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. कुठलातरी गुज्जू गृप होता. 'आता १५ दिवस कानावर 'आगड-पाछड' पडणार नाही' असं वाटलं होतं घरातून निघताना. पण सहलीच्या पाचव्या दिवशीच तो समज चुकीचा ठरला. गुज्जूंपासून आता आम्हाला सुटका नाही हेच खरं.
तिथे जवळच 'बिग-सी शॉपिंग मॉल' होता. जेवणानंतर त्या शॉपिंग मॉलमध्ये एक चक्कर टाकायची टूम निघाली. आमच्याबरोबर जोशी म्हणून एक कुटुंब होतं. त्यांची मुलगी पूर्वा आणि आई - दोघी मिळून एक खोली वापरायच्या. त्यामुळे त्यांच्याशी पण आमची आता चांगली ओळख झाली होती. प्रथम, मी, आदित्य, बाबा आणि ते तिघं जोशी असे जमलो. शिंदेंची परवानगी घेतली. हळुहळू इतर काहीजण सुध्दा आम्हाला येऊन मिळाले आणि शेवटी आम्ही १६-१७ जण तिथून निघालो चालत. इतर लोकांना घेऊन बस हॉटेलवर परत गेली. संध्याकाळी आदित्य जेव्हा पोहायला गेला होता तेव्हा त्या जोशींनी आसपासच्या भागात एक चक्कर मारलेली होती. त्यामुळे त्यांच्या भरवश्यावर आम्ही सगळे त्यांच्या मागेमागे निघालो होतो ... बॅंकॉकच्या पूर्णपणे अनोळखी रस्त्यांवरून आम्ही असे भटकत होतो की जणू तो डेक्कन जिमखाना असावा आणि ते सुध्दा रात्री ९.३० वाजता. 'बिग-सी' रात्री ११ वाजेपर्यंत उघडं असतं असं कळलं होतं. म्हणजे भरपूर वेळ होता. पदपथावर विक्रेत्यांची आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांची प्रचंड गर्दी होती. दादर परिसरातून फिरत असल्यासारखं वाटत होतं. फरक एवढाच की आपल्याकडे वडापाव किंवा पावभाजीच्या गाड्या असतात, तिथे केवळ मांसाहारी पदार्थांच्या होत्या. त्या गाड्यांवर जे काही शिजत होतं ना त्याची अक्षरशः शिसारी आली. तो वास अजूनही माझ्या नाकात बसलाय. हेच का ते जगप्रसिध्द 'थाई फ़ूड'?? बॅंकॉकमध्ये शक्य झालं तर कुठेतरी 'थाई फ़ूड' चाखून पहायचं मी ठरवलं होतं आधी. पण आता या असल्या वासानं त्याचा पुनर्विचार करण्याची गरज भासायला लागली होती. रस्ता पक्का माहीत नसल्यामुळे थोडा लांबचा वळसा घेऊन, अधेमधे कुणाकुणाला विचारत १० नंतर मॉलपाशी पोचलो. ८-१० मजली शॉपिंग मॉल मी प्रथमच पाहत होते. आत शिरल्यावर समोर मोठ्या फलकावर कुठल्या मजल्यावर काय आहे त्याची माहिती दिसत होती. अर्धीअधिक जागा चित्रपटगृहं आणि उपहारगृहं यांनीच व्यापलेली होती. आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तिसऱ्या मजल्यावर होत्या. 'एस्कलेटर्स ... !!!' आदित्यचे डोळे लगेच चमकले. तिसऱ्या मजल्यावर एस्कलेट झालो ...

... ११ कधी वाजले कळलंही नाही. परत चालतचालत हॉटेलवर आलो. जरा पायपीट केल्यामुळे बरं वाटलं. आमच्याबरोबर मॉलमध्ये एक आजी-आजोबा आले होते ते शिंदेंना न सांगताच! आम्हाला त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तिकडे हॉटेलमध्ये ते कुठे दिसेनात म्हटल्यावर साहजिकच सगळ्यांना काळजी वाटायला लागली होती. शिंदेंनी अंदाज बांधला की ते आमच्याबरोबर असतील. पण कळणार कसं? म्हणून, आम्ही परत आलोय की नाही ते विचारण्यासाठी त्यांनी ३-४ वेळा अजयला फ़ोन केला. अजयला वाटलं आम्हीच न सांगता गेलोय म्हणून ते सारखा फ़ोन करताहेत. तो आमच्यावर जाम भडकला. आम्ही परत आलो तेव्हा तो जोरदार भांडणाच्या पावित्र्यात होता. 'मी सांगून गेले होते' हे तो ऐकून घ्यायलाच तयार होईना. अश्यावेळी मात्र ताप-मळमळ काही आड येत नाही!!! मलाही कळेना की व्यवस्थित परवानगी घेऊनसुध्दा शिंदेंनी ३-४ वेळा चौकशी का करावी? पण रात्री ११.३० वाजता, आदित्यसमोर वाद नको म्हणून मी काही जास्त बोलले नाही. या सगळ्या प्रकाराचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी झाला.

कुठेही प्रवासाला निघायचं की नवरा-बायकोचं सामान भरताना पहिलं भांडण होतं. नंतर प्रवासातपण साध्यासाध्या कारणानं भांडणं, वादावादी होते. निघाल्यापासून आमच्यात एकही वाद झाला नव्हता - जरा आश्चर्याचीच गोष्ट होती पण कदाचित निघाल्यापासून अजयची तब्ब्येत बरी नव्हती त्यामुळे असेल ... पण, जर तसं होतं तर मग आता मला निवांत झोपायला हरकत नव्हती कारण आम्ही भांडलो याचा अर्थ आमचा नवरा ठणठणीत बरा झाला होता ...आणि याहून दुसरं काय हवं होतं !!!!!!!!!

गुलमोहर: 

वर्णन वाचून खूप मजा वाटली, मुख्यत। भांडण वगैरे म्हणजे सर्वांचच असं होतं हे वाचून जरा बरं वाटलं.
आम्हीपण मलेशिया, थायलंड असा नाताळच्या सुट्टीत जायचा बेत करतोय. आम्ही कुठल्या टूर कंपनी बरोबर जाणार नाही आमचे आम्हीच जायचा बेत आहे. कृपया काही मार्गदर्शन करू शकाल का? म्हणजे तिथल्या तिथे फिरायला कशी व्यवस्था करायची, गाईड वगैरे घ्यावा का? मिळतो का? कुठे किती वेळ द्यावा लागतो वगैरे
प्लीज मला इमेल करा. धन्यवाद.