माझा पहिला परदेश प्रवास : ६ (दाती हू मे, दल्दी हे क्या ...)

Submitted by ललिता-प्रीति on 7 October, 2008 - 23:51

दाती हू मे, दल्दी हे क्या ...

आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार त्यादिवशी आमची 'बॅंकॉक सिटी टूर' होती. पण त्याऐवजी आम्ही 'सफ़ारी वर्ल्ड'ला भेट देणार होतो. तसा आमच्या दृष्टीने काही फ़रक पडत नव्हता म्हणा! आधी तिथे मजा करायची त्याऐवजी ती इथे ... शिवाय दुसऱ्या दिवशी तिथे जायचंच होतं ना!!
त्यामुळे त्यादिवशीच्या दिल्या गेलेल्या पहिल्या वेळेला उठलो, दुसऱ्या वेळेला नाश्ता केला आणि तिसऱ्या वेळेच्या आधीच बसमध्ये जाऊन बसलो.

रोज सकाळी हॉटेल वरून निघताना किंवा एकूणच कुठूनही निघताना मंडळी बसमधे चढली की ऍनाची मोजदाद सुरू व्हायची - मनातल्या मनातच. आम्ही ४९ जण आणि ती ५० वी - आकडा जुळला की ती सुटकेचा निःश्वास टाकायची. माझी फार इच्छा होती की एकदा तरी तिला मोठया आवाजात मोजायला सांगायचं. १ ते ५० ला थाई भाषेत काय म्हणतात ते तरी कळलं असतं.
आमच्या गृपमध्ये बरेच गायक होते - हौशी पण, रीतसर शिकलेले पण. बस निघाली की रोज कुणीतरी एखादं स्तोत्र किंवा श्लोक असं काहीतरी म्हणायचं. ते झालं की मग इतर काहीजण भावगीत, भजन, अभंग म्हणायचे. मी ऍनाला ती पण विनंती करून पाहिली. तिला म्हटलं - बाकी काही नाही तर निदान थायलंडचं राष्ट्रगीत तरी म्हण. त्यामागे केवळ 'एक वेगळी भाषा ऐकणे' हाच उद्देश्य होता. पण तिने नकार दिला. (नंतर वाटलं - तिनं नाही म्हटलं तेच बरं झालं. त्या राष्ट्रगीताला बस मध्येच उभे राहून सर्वांनी मान दिला असता का?)
सहज गप्पा मारता-मारता तिनं सांगितलं की तिला २ हिंदी गाणी माहीत होती - 'तू चीज़ बडी है मस्त मस्त' आणि 'जाती हूँ मैं, जल्दी है क्या' आणि ते कसं - 'तू तीद बदी हे मत्त मत्त' आणि 'दाती हू मे दल्दी हे क्या'!!! काही वर्षांपूर्वी अश्याच कुठल्यातरी भारतीय गृपमधल्या एका लहान मुलीनं तिला ती शिकवली होती. तिच्या तोंडून त्या ओळी ऐकायला फार मजा यायची.
तो संपूर्ण दिवस आम्ही सफ़ारी वर्ल्ड मध्येच घालवणार होतो. त्या दिवशी विशेषकरून आदित्यच्या आकर्षणाच्या जास्त गोष्टी पहायच्या होत्या. सर्वात पहिलं आकर्षण होतं - सफ़ारी ड्राईव्ह. नैसर्गिक वातावरणात वावरणारे जंगली प्राणी आम्ही बंद गाडीत बसून पाहिले. त्या वनातल्या छोट्या रस्त्यावरून १०-१५ च्या वेगाने बस चालवत ड्रायव्हरने आम्हाला सगळीकडे फिरवून आणले. आपल्याला प्राणी नेहेमीच पिंजऱ्यात पहायची सवय, त्यामुळे तो अनुभव खरंच छान होता. वाघ-सिंह आठ-आठ, दहा-दहाच्या कळपानं बसलेले होते. तेव्हा ती त्यांची न्याहारीची वेळ होती. थोड्याच वेळात त्यांच्या रोजच्या परिचयाची एक 'ट्रेलर व्हॅन' तिथे आली. त्या ट्रेलरवर एका बंदिस्त पिंजऱ्यात एक विशीची मुलगी उभी होती. तिच्या शेजारीच एका मोठ्या बादलीत मांसाचे मोठे-मोठे तुकडे ठेवलेले होते. पिंजऱ्यातून ती नुसता एक तुकडा बाहेर काढायची की एखादा सिंह झडप घालून तो पकडायचा. बघता-बघता ७-८ सिंह चहूबाजूंनी त्या पिंजऱ्यावर चढले.

MALESIA__085.jpg

'सगळ्यांना मिळणार आहे, घाई करू नका' अश्या थाटात ती त्या हिंस्त्र श्वापदांना शांतपणे भरवत होती. आम्ही बंद बसमध्ये बसलेलो असूनसुध्दा ते पाहून अंगावर अक्षरश: काटा आला.
अर्ध्या तासाच्या त्या फेरीत जिराफ, झेब्रा, एमू पक्षी यांसारख्या आपल्याकडे न दिसणाऱ्या मंडळींनी जास्त लक्ष वेधून घेतले आणि तेवढ्या वेळातच आदित्य तुडुंब खूष झालेला होता.

त्यानंतर, प्राण्यांचे काही खेळ पहायचे होते - 'द सी-लायन शो' आणि 'द डॉल्फिन शो'. आदल्या दिवशी 'नॉंग-नूच व्हिलेज' मध्ये आणि त्यादिवशी तिथेपण आत शिरल्यावर सगळ्यांच्या कपड्यांवर एक-एक छोटा प्रवेश-परवाना चिकटवला गेला. एकाच तिकीटावर अनेक गोष्टी पहायच्या असतील तेव्हा तिथे ही पद्धत पहायला मिळाली. याच्यामुळे खूपच वेळ वाचायचा. एक म्हणजे - दिवसभर तिकीट सांभाळून ठेवायची कटकट नाही आणि प्रत्येकवेळी प्रवेशद्वारापाशी तिकीट दाखवा, परत घ्या ही भानगड नाही.
प्रत्येक शो पाऊण तासाचा आणि मध्ये एक-एक तासाचा वेळ. त्या मधल्या वेळात एका प्रेक्षागृहापासून पासून दुसऱ्या प्रेक्षागृहापर्यंत चालत जायचं. 'या चालत जायच्या वेळेला उन्हाचा थोडा त्रास होईल' असं ऍनाने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो - म्हणजे टोप्या, रूमाल, गॉगल, पाण्याच्या भरपूर बाटल्या ... पण तसा विशेष त्रास झाला नाही .... (उलट त्या बाटल्यांचं ओझंच झालं जास्त. पण त्याची चिंता नव्हती कारण आता ते वजन उचलायला आमचा खंदा वीर एकदम 'फ़िट ऍन्ड फ़ाईन' होता !!!)
तो रस्ता झाडांनी आणि हिरवाईने इतका नटलेला होता की आजूबाजूला पाहूनच गाऽऽर वाटायचं. वाटेत पक्ष्यांचे मोठे-मोठे पिंजरे होते. असंख्य रंगांचे आणि आकाराचे पक्षी त्यांत होते. प्रत्येक पिंजऱ्याच्या डोक्यावर पाण्याचा छोटासा फवारा उडत होता. पक्षी वाटेल तितक्या वेळेला ते पाणी प्यायचे, त्यात आंघोळ करायचे. कुठेही घाण नव्हती की अश्याठिकाणी जो एक विशिष्ट डोक्यात जाणारा वास असतो तो नव्हता. मग कसला त्रास आणि काय!! ते सगळे खेळ पाहताना आदित्यला जितकी मजा आली तितकीच मजा मला त्या पायवाटांवरून चालताना आली.
पहिला शो होता - 'द सी लायन शो'. तीन-चारशे माणसं बसू शकतील असं एक अर्धवर्तुळाकार छोटं खुलं प्रेक्षागृह आणि समोर रंगमंच. तिथेसुध्दा अर्ध्या भागात मोठा पाण्याचा तलाव होता. सी-लायन हा प्राणी त्याआधी केवळ टी.व्ही. वरच पाहिलेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पहायला मजा आली.

4043-08.jpg

खेळ करवून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कमरेला सी-लायनच्या खाद्याची एक पिशवी लटकवलेली होती. एखादी करामत दाखवून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच सगळे सी-लायन्स त्या माणसांजवळ 'आ' करून उभे रहायचे. मग ती माणसं त्यातलं खाद्य त्यांना भरवायची. हे म्हणजे 'गाणं म्हणून दाखव, मग बिस्कीट देणारे हं' अश्यातलाच प्रकार होता. पण एकंदर शो मस्त होता. तमाम बच्चेकंपनी उड्या मारत होती, खुषीने टाळ्या पिटत होती.
त्यानंतर होता - 'द डॉल्फिन शो'. स्वरूप साधारण तसंच; ती 'गाणं म्हटलं तरच बिस्किट' ची अट पण तशीच. डॉल्फिन हा प्राणी पण आधी कधी प्रत्यक्ष पाहिलेला नसल्यामुळे मजा आली.
त्यानंतर होता - 'द काऊबॉय स्टंट शो'. रंगमंचाच्या जागी एखाद्या काऊबॉयच्या सिनेमात शोभेल असा सेट उभा केलेला होता. काऊबॉयच्या वेषातले कलाकार 'स्टंट' च्या नावाखाली एकमेकांना नुसते धोपटत होते. हा शो मात्र खरंच 'केवळ लहान मुलांसाठी' होता. कारण मला तरी ५ मिनिटांतच त्या हाणामारीचा कंटाळा आला. आदित्यचा खिदळणारा चेहेरा त्यापेक्षा जास्त प्रेक्षणीय होता. हा शो संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली.

एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. तिथे एकाच वेळी हजार-दीड हजार माणसं जेवू शकत होती. तो आकडा आणि तिथली प्रत्यक्ष गर्दी पाहून जेवणाचं जे चित्रं डोळ्यासमोर आलं त्याच्या एकदम उलटं दृश्य तिथे होतं. अतिशय उत्तम व्यवस्था, कुठेही गडबड-गोंधळ नाही; खोळंबलेली, जागेअभावी उभ्याने जेवणारी माणसं नाहीत की काही नाही.

MALESIA__095.jpg

तिथे थाई, जपानी, चिनी पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स होते. आधी व्यवस्थित पोट भरून जेवल्यावर मग मी त्या दिशेला मोहरा वळवला. चिनी पदार्थांचं विशेष आकर्षण नव्हतं, जपानी पदार्थांचा कसातरीच वास येत होता आणि नावावरून काय पदार्थ आहे ते पण कळत नव्हतं. राहता राहिले थाई पदार्थ .... त्यातल्यात्यात दोन पदार्थ जरा बरे वाटले म्हणून चाखून पहायचं ठरवलं. नावं आता विसरले - त्यातला एक छान होता चवीला पण दुसरा जो खाल्ला त्याची चव मात्र 'अशक्य भयंकर' होती. तो तोंडात घातल्याक्षणी माझा इतका विचित्र चेहेरा झाला की मी लगेच चपापून आपल्याकडे आपल्या गृपमधलं कुणी पाहत नाहीये ना याची खात्री करून घेतली. तर माझी ती फजिती नेमकी आईनंच पाहिली होती!!! आता पुन्हा म्हणून असल्या कुठल्याही पदार्थांच्या वाटेला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं.

जेवणानंतर होता चौथा शो - 'द स्पाय वॉर शो'. जेम्स बॉन्डच्या सिनेमातला एक सेट उभा केलेला होता. पाऊण तासात वेगवेगळे स्पेश्यल इफ़ेक्ट्स आणि निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक करामती वापरून एक जेम्स बॉन्डची गोष्टच सादर केली गेली. अगदी रोप-वे वरची साहसदृष्यं आणि मिसाईल्सचा स्फोट सुध्दा!!! हा शो मात्र त्यातल्या नाविन्यामुळे मला आवडला.

चार खेळ आणि सोबतची भटकंती यांत दिवस कसा संपला ते कळलंही नाही. परतायची वेळ झाली. ऍनाचं 'तला-तला' कानावर पडलं आणि आम्ही बसच्या दिशेनं चालायला सुरूवात केली.
परतताना एका मोठ्या 'ड्यूटी-फ़्री शॉप' ला भेट द्यायची होती. (शुध्द मराठीत - एक अत्यंत महागडं दुकान !!) 'विंडो शॉपिंग' ला पैसे पडत नाहीत ते बरंय! तिथे तासभर वेळ घालवला. थाई चॉकोलेट्स विकत घेतली. बाहेर पडता-पडता कुठूनतरी कॉफ़ीचा वास दरवळत आला. नकळत पावलं तिकडे वळली. मी आणि अजय तिथली ८०-८० बाथ ची कॉफ़ी प्यायलो. आपल्या देशात 'एका कपाला ८० रुपये घेतात' म्हणून मी 'बरिस्ता कॉफ़ी' ला नेहेमी नावं ठेवते याचा मला तिथे चक्क विसर पडला!!

सात-साडेसातला हॉटेलवर परत आलो. जेवायला पुन्हा (ऍनाच्या भाषेत) 'कली पॉत' ला जायचं होतं. थाई भाषेत लहानग्यांचे बोबडे बोल आणि मोठ्यांचे साधे बोल असा फरकच नसावा बहुतेक!

थायलंडमधला चौथा दिवस संपत आला होता. 'चार दिवस झाले या देशात येऊन ??' खरं वाटेना ... तसंही, स्वप्नवतच चाललेलं होतं सगळं म्हणा!!!

गुलमोहर: 

चांगल लिहीलय Happy
बँकॉक ला जाउन यायला हव खरच Happy