माझा पहिला परदेश प्रवास : ४ (आज मैं उपर ... !!!)

Submitted by ललिता-प्रीति on 7 October, 2008 - 00:03

आज मैं उपर ...

सकाळी ७ वाजता गजर होणार होता. सहा-सव्वासहालाच माझी झोप पूर्ण झाली आणि जाग आली. (घरी पण रोज अशी जाग आली तर किती बरं होईल!!) क्षणभर काही उलगडेना - आपण नक्की कुठे आहोत, ही खोली कुठली - काही कळेना! अचानक ट्यूब पेटली आणि झोप उडाली. उठून बाल्कनीत गेले. बाहेर खूप दमट हवा होती. समोर तळमजल्यावरचा निळाशार पोहण्याचा तलाव मस्त दिसत होता. त्यात थोडा वेळ डुंबायचा खूप मोह झाला. पण आज आम्ही तेच तर करणार होतो आणि ते सुध्दा समुद्रावर, म्हणजे सर्वात मोठ्या नैसर्गिक तलावात!!!
तेवढ्यात उजवीकडच्या बाल्कनीत आई दिसली. गजराच्याआधी जाग आली म्हणून मी स्वतःवर खूष होते तर इथे आई आंघोळ वगैरे उरकून तयार हो‍ऊन बसली होती. पण एकंदरच, आमची तीनही म्हातारी मंडळी फारच उत्साही होती. आधीच्या जागरणभरल्या दोन दिवसांत सुध्दा त्यांचा कंटाळलेला, थकलेला चेहेरा मी पाहिला नाही. आईशी थोडा वेळ बोलेपर्यंत डावीकडच्या बाल्कनीतून बाबांचं 'गुड मॉर्निंग' ऐकू आलं. बॅटऱ्या पुन्हा चार्ज झालेल्या होत्या!!!
आज अजून एका गोष्टीची उत्सुकता होती. आज आमच्या सासूबाईंना आम्ही प्रथमच पंजाबी ड्रेसमध्ये पाहणार होतो. सौ. शिन्देंच्या विनंतीवरून त्या ड्रेस घालायला तयार झाल्या होत्या. ड्रेसमध्ये त्या ७-८ वर्षांनी लहान दिसत होत्या. ट्रीपला त्यांना आणून आम्ही बिलकुल चूक केलेली नव्हती. कारण नाहीतर आम्हाला त्यांना ड्रेसमध्ये कधीच पाहता आलं नसतं!! त्या दिवशी बोटीत चढ-उतर बरीच होती दिवसभर म्हणून साडीपेक्षा ड्रेस बरा असा शिंदेंचा सगळ्या आज्यांना सल्ला होता आणि आश्चर्य म्हणजे झाडून सगळ्या आज्या त्या दिवशी पंजाबी ड्रेसेस घालून आल्या होत्या!!! एकेकीला ओळखणं अवघड गेलं आम्हाला.
तर, सगळे तयार हो‍ऊन साडेआठ वाजता खाली आलो. नाश्त्याला मऊ-मऊ, गरमा-गरम उपमा होता. वा! याहून जास्त काय हवं होतं!!! मस्त उपमा चापला, नंतर छान कॉफ़ी होतीच. निघाल्यापासून प्रथमच त्या दिवशी अजयने व्यवस्थित नाश्ता केला. पुरेशी झोप झाल्यामुळे आज त्याचा चेहेरा जरा ताजातवाना वाटत होता.
हॉटेलतर्फेच सगळ्यांना टॉवेल्स देण्यात आले होते. ते घेतले आणि साडेनऊला बस आणि व्हॅन निघाली. पाच मिनिटांतच उतरायचं होतं. फ़ूटपाथ पार केला की लगेच समुद्र. दोन स्पीड मोटर बोट्स उभ्याच होत्या. पाण्यातून बोटीत चढलो. चांगलं गुडघाभर पाणी होतं. बोटी निघाल्या.
एकंदर वेग आणि लाटांवरचे हेलकावे बघता अजयचं - आणि माझंही - काही खरं नव्हतं पुन्हा एकदा. लांबवर इतर बोटी, पॅरासेलिंगची उडणारी पॅराशूट्स दिसत होती. थोड्याच वेळात त्या लटकणाऱ्या पॅराशूट्सपैकी एक माझंही असणार होतं!!!
पट्टायाचा किनारा हळुहळू मागे पडत होता. १५-२० मिनिटांनंतर एका मोठ्या तराफ्यापाशी बोट थांबली. तिथे पॅरासेलिंगसाठी सगळे उतरलो. मी तिकिट काढलं आणि रांगेत उभी राहिले. एक तिकिट - ३५० बाथ. बाप-रे!! आपल्या देशात इतके पैसे देऊन मला नाही वाटत मी अर्ध्या-एक मिनिटाच्या पॅरासेलिंगच्या नादाला लागले असते म्हणून. पण ते सहलीचं, मजा करायचं वातावरण वेगळंच असतं आणि त्यात मी तर वापीतच ठरवलं होतं की पॅरासेलिंग करायचं. थोडा वेळ हो-नाही करताकरता बाबापण रांगेत येऊन उभे राहिले. उत्साह असावा तर असा! आदित्यने मात्र विशेष उत्सुकता दाखवली नाही. मी पण त्याला जास्त आग्रह केला नाही. अजयला पुन्हा बोटीमुळे त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे तो बाद होता. अनुक्रमे, गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आणि रक्तदाबाचा त्रास यामुळे दोन्ही आज्या पण बाद होत्या. म्हणजे आमच्यातले दोनच गडी मैदानात उतरले होते.
जरा वेळाने लाईफ़-जॅकेट्स अंगावर चढली. तो सगळा प्रकार भलताच बोजड होता. ह्या असल्या सगळ्या वजनदार वस्तू अंगावर चढवून लोकं रिव्हर-राफ़्टींग, पॅरासेलिंग, ग्लायडींग कशी काय करतात कोण जाणे. कदाचित त्यातला थरार त्यांना जास्त भावत असेल.
रांगेतले पुढचे लोक टेकऑफ़ करताना, खाली उतरताना मी निरीक्षण करत होते. तिथले मदतनीस फारच चपळाईने हालचाली करत होते. एका माणसाला पॅराशूटपासून सोडवायचं आणि त्याच हूक्सना पुढच्या माणसाला अडकवायचं आणि हे सगळं काही सेकंदांच्या आत, वारा जोरात वाहत असताना, पॅराशूटमध्ये पूर्ण हवा भरलेली असताना ... खायचं काम नव्हतं!!! सगळे घामेघूम झाले होते. ओरडून सूचना देऊन सगळ्यांचे घसे बसलेले होते. एक व्यक्ती उतरत-उतरत आली की ४-५ जण लगेच धावत त्याला पकडायचे आणि अलगद त्याचे पाय खाली टेकवायचे, पॅराशूटपासून सोडवून त्याला तिथून हाताला धरून अक्षरशः हाकलायचे. तोपर्यंत अजून दोनजण पुढच्या माणसाला पकडून त्या जागी उभे करायचे, सोडवलेले हूक्स त्या माणसाच्या जॅकेटच्या हूक्समध्ये अडकवायचे, की मोटरबोटवाला सुसाट निघायचा. पॅराशूटची दोरी त्या बोटीला बांधलेली ... बोटीने वेग घेतला की पॅराशूट वर, वेग कमी झाला की पॅराशूटची उंची कमी-कमी व्हायला लागायची. या एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त ४-५ सेकंदांत पार पडायच्या. एक माणूस उडतोय न उडतोय तोपर्यंत आधी उडलेला एखादा उतरायचा - हे असं अविरत चाललेलं होतं.
रांगेत मी पुढेपुढे सरकत होते ... पण मला भीती वगैरे बिलकुल वाटत नव्हती. घाबरायचं केव्हा, जेव्हा ताबा ठेवण्याचं काम आपल्या हातात असेल. तिथे माझ्या हातात काहीच नव्हतं. सगळी भिस्त मला लटकवणाऱ्या त्या दोन हूक्सवर. पाण्याची भीती तर मला कधीच नव्हती शिवाय लाईफ़-जॅकेट्स होतीच. माझ्या आधीचा माणूस उडला, तो वर जाताना पाहत होते तेवढ्यात डावीकडून एक उतरला. खस्सकन मला ३-४ जणांनी ओढलं, हूक्स अडकवले. त्यांनी सांगितलं त्यापेक्षा भलतीकडेच मी दोर पकडले हाताने तर त्यांतला एक माझ्यावर जाम भडकला. बिच्चारे! ते तरी काय करणार. काही अपघात झाला तर लोक आधी त्यांनाच धरणार ना. त्यामुळे मला त्या माणसाचा राग नाही आला. आधीच त्यांचं मोडकंतोडकं थाई उच्चारांचं इंग्रजी, त्यात डोळ्यांशिवाय त्या सगळ्यांचे चेहेरे रुमालाने झाकलेले. त्यामुळे ते काय सांगताहेत ते काहीही कळत नव्हतं. त्याने चिडून 'माझ्या डोळ्यांकडे बघ' अशी खूण केली. मग माझ्या डोक्यात शिरलं की तो मला कुठले दोर धरायला सांगत होता ते. जरा 'सॉरी' वगैरे म्हणायचा विचार करत होते पण वेळ निघून गेली होती ... मी केव्हाच वर उडालेली होते ...
त्या क्षणी जे वाटलं त्याचं शब्दांत वर्णन करणं केवळ अशक्य!! १-२ सेकंद मी श्वास घ्यायचा विसरले. पक्ष्यांसारखे पंख नसल्यामुळे मनुष्यप्राणी कुठल्या आनंदाला मुकतो त्याची कल्पना ना जमिनीवरून येत ना विमानात बसून!! बोटीला ब्रेक लागला की लटकणारे पाय पुढेमागे झुलायला लागायचे आणि पॅराशूट हळुहळू खाली-खाली यायला लागायचं. वेग वाढला की पुन्हा वर, की पुन्हा श्वास घ्यायचा विसर पडायचा. बोटीने त्या मोठ्या तराफ्याला एक फेरी मारली. उंची आणि वेग जरा अंगवळणी पडे-पडेपर्यंत उतरायची वेळ आली सुध्दा!! तोपर्यंत एक हात सोडायचा धीर पण आला होता. अजय खाली कॅमेरा घेऊन तयार होता. मी चक्क त्याला एक 'पोझ' वगैरे दिली हात हलवून.

4029-12.jpg

खरं म्हणजे, टेक ऑफ़ करताना सुध्दा हाताने दोर धरले नसते तरी चाललं असतं हे नंतर लक्षात आलं. पण त्यासाठी पुन्हा ३५० बाथ कोण खर्च करणार!!!
... जसं टेक ऑफ़ कधी झालं ते कळलं नाही तसंच खाली उतरून अंगावरचं लाईफ़-जॅकेट कधी निघालं तेही कळलं नाही. पण माझ्या चेहेऱ्यावर आता 'लई मोटं मैदान' मारून आल्याचे भाव होते. आमच्यापैकी बरेचजण रांगेत उभे होते पण उड्डाण सर्वप्रथम मी केलं होतं!! त्यामुळे आपला भाव आता एकदम वधारला होता. सगळ्यांनी मला पकडून नाना प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी पण अगदी जग जिंकल्याच्या थाटात त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, काही आज्यांना धीरही दिला!! जरा पाणीबिणी पिऊन इतरांची मजा बघायला पुन्हा पुढे जाऊन उभी राहीले. आता बाबांची उडायची वेळ आली होती. पुन्हा तेच ना, आपल्या हातात काहीच नसतं करण्यासारखं .. त्यामुळे बाबा नीट जातील ना, त्यांना काही अडचण नाही ना येणार या शंकांना काही अर्थ नव्हता. त्यांनी पण मस्त मजा घेतली. मग इतरांचं होईपर्यंत पुन्हापुन्हा तो क्षण आठवत राहिले. पूर्ण १५ दिवसांच्या सहलीत कोलंबो-बॅंकॉक प्रवासापाठोपाठ हा अनुभव मनावर कायमचा कोरला गेला होता. २४ ऑक्टोबर २००६ हा दिवस आता मी कधीही विसरणार नाही.

अर्ध्यापाऊण तासाने तिथून सगळे निघालो. आता कॉरल आयलंडला जायचं होतं. पुन्हा एकदा हेलकावे खाणारी बोट ... नको वाटत होतं. ३०-४० मिनिटांचा प्रवास होता. वाटेत पुन्हा एक मोठा तराफा लागला. २-४ इच्छुक मंडळी तिथे 'स्कूबा डायव्हिंग' साठी उतरली आणि आमची बोट पुढे निघाली. का कोण जाणे, पण स्कूबा डायव्हिंग मला नाही करावसं वाटलं. पाण्याखालचं विश्व मला म्हणावं तेवढं आकर्षित करत नाही कधी. 'डिस्कवरी'वरचे त्या प्रकारचे कार्यक्रम पण मला कंटाळवाणे वाटतात कधीकधी. मला खरंच त्याचं कारण माहीत नाही!!!
कॉरल आयलंडवर उतरलो. किनाऱ्यावर बसायला आरामखुर्च्या आणि वर मोठ्ठ्या छत्र्या - अश्या लांबच्यालांब रांगा होत्या. खुर्च्या दिसल्यावर आमची इकडची स्वारी पुन्हा एकदा खुर्चीत सांडली ... मान खाली घालून, डोळे मिटून बसून राहिली!!
पाणी एकदम स्वच्छ, निळं-हिरवं होतं. वाळू पांढरी. समुद्राचा तळ अगदी स्पष्ट दिसत होता. काही अंतरापर्यंत पोहण्यासाठी वगैरे पाणी सुरक्षित होतं. तिथपर्यंत दोर लावून ठेवलेले होते. त्यापुढे जायला बंदी होती. आदित्यला स्कूटरबोटवर बसायचं होतं. त्याचं तिकीट काढलं. रांग होतीच. पण फार वेळ उभं रहावं लागलं नाही. स्कूटरबोटवर पुढे लाईफ़-जॅकेटसकट आदित्य आणि मागे एक मदतनीस - असे निघाले. बोट निघाल्याक्षणी पुढून पाण्याचा मोठा फ़वारा त्याच्या अंगावर उडला. त्याला तेच हवं होतं. थोड्याच वेळात तो दिसेनासा झाला. ५-१० मिनिटांनी परत आला तेव्हा तो पूर्ण भिजलेला होता आणि चेहेरा मात्र आनंदाने फुललेला होता. पैसे (की बाथ??) वसूल झालेले होते.
आता त्याला माझ्याबरोबर पाण्यात खेळायचं होतं. बाबा पण आले आमच्याबरोबर. पाण्यात कितीही वेळ घालवता येतो. अर्धा-एक तास, दोन तास - कमीच वाटतात. किती वेळ पाण्यात होतो माहीत नाही. पण निघायची वेळ आली तेव्हा नेहेमीप्रमाणे आदित्यला बाहेर यायचं नव्हतं ... खरं म्हणजे मला सुध्दा!!! पण पट्टायाला परत जाऊन जेवायचं होतं.
पाण्यात खेळायला मजा येते पण नंतर भूकही लागते फार. अजय बसला होता तिथे एक माणूस मक्याची उकडलेली, गरमागरम कणसं विकत होता. त्यातल्या चार कणसांच्या दाण्यांवर आमची नावं लिहिलेली होती त्यामुळे आम्हाला ती खाणं क्रमप्राप्त होतं!!! पण किंमत ऐकून ती लिहिलेली नावं पुसून टाकावीत या निर्णयापर्यंत मी आले होते कारण किंमत खूपच जास्त होती आणि 'भाव करणे' हा माझा प्रांत कधीच नव्हता. शेवटी सासूबाईंचं प्रॉंप्टिंग, त्या माणसाला कळतील असे ४-२ इंग्रजी शब्द आणि भरपूर हातवारे आणि खाणाखुणा - एवढं सगळं झाल्यावर दोन्ही गटांचं समाधान होईल असा सौदा पक्का झाला आणि ती चार कणसं इप्सीत स्थळी जाऊन पोचली. त्या मेजवानीची मजा काय वर्णावी!!!
तिथून 'तला-तला' झाल्यावर सौ. शिंदेंनी सांगितलं की आता काचेचा तळ असलेल्या बोटीतून एक फेरी आहे ज्यात पाण्याखालची कॉरल्स पहायला मिळतील. अरे वा! अजून एक नवा अनुभव! उत्साहात सगळे त्या काचेचा तळ असलेल्या बोटीत बसलो. तर कुठलं काय, तो काचेचा तळ की काय - तो कुठेच दिसेना. मग लक्षात आलं की बोटीत तळाशी लांब फळ्या असतात त्यांपैकी एक फळी पारदर्शक ऍक्रिलिकची बनलेली होती. रुंदी जेमतेम ८-१० इंच!!! अमोरासमोर आम्ही बसलो होतो ... 'खाली वाकून डोक्यावर पूर्ण टॉवेल्स पांघरून घ्या' अशी सूचना आली. ते थाई मिश्रित इंग्रजी समजायला आम्हाला पाच मिनिटं लागली. वरच्या उन्हामुळे पाण्याचा तळ दिसत नव्हता, तो टॉवेल्सची सावली धरल्यावर एकदम दिसायला लागला आणि त्यातली कॉरल्स पण. जरा त्याला नजर सरावते न सरावते तोच ती फेरी संपली!!! 'हात्तिच्या- एवढंच?' असं झालं सगळ्यांना. ती फेरी अजून ५-१० मिनिटं तरी जास्त हवी होती असं वाटलं. कारण तेवढ्या वेळात सुध्दा जी काय ४-२ कॉरल्स पाहिली ती अप्रतिम होती. कदाचित स्कूबा डायव्हिंग केलं असतं तर ती जास्त चांगल्या रितीने पाहता आली असती. पण आता 'जर-तर'ला थारा नव्हता; ती बोट सोडून आम्ही पुन्हा स्पीड मोटर बोटीत चढलो होतो आणि परतीच्या वाटेला लागलो होतो.

वाटेत पुन्हा मगाचचा पॅरासेलिंगचा तराफा दिसला. तशीच रांग होती, तशीच माणसं उडत होती, उतरत होती; तशीच त्या मदतनिसांची धावपळ सुरू होती. आम्ही पॅरासेलिंगचा अनुभव कधीही विसरणार नव्हतो पण तिथे काम करणाऱ्या त्या लोकांना लक्षात ठेवण्यासारखं काही विशेष होतं का? त्यांच्या दृष्टीने दोन वेळची भ्रांत मिटवण्याचं ते केवळ एक साधन होतं. दृष्टिकोन बदलला की एकाच गोष्टीचं किती वेगळं रूप समोर येतं!!

परतताना बोट जरा जास्तच हेलकावे खात होती. त्यामुळे मला पण त्रास व्हायला लागला. 'कधी पोचतोय' असं झालं होतं. शेवटी एकदाचा किनारा गाठला. उतरून रस्त्यावर आलो तर तिथे आमचेच पॅरासेलिंगचे फ़ोटो मांडून ठेवलेले होते विक्रीसाठी!!! एक फ़ोटो - १०० बाथ. पैसे कमवायचे किती मार्ग शोधून काढतो माणूस!!! त्या फ़ोटोंचं ते नंतर काय करत असतील असा मला प्रश्न पडला.
बसमध्ये बसायचं तर बस कुठे दिसेना. त्या ऐवजी ऍनाने आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका नळापाशी नेलं आणि तिथे पाय धुवायला सांगितलं. माझे पाय काही फारसे खराब नव्हते म्हणून मी तशीच पुढे चालायला लागले तर तिने मला परत बोलावलं. पायांची सगळी वाळू धुवून काढल्याशिवाय बसमध्ये कुणालाही प्रवेश नव्हता असं कळलं. मी निमूटपणे पाय धुतले. त्या इमारतीच्या पलिकडे आमची बस उभी होती. तिथून निघून हॉटेलवर परत आलो.

जेवणानंतर विश्रांतीसाठी थोडा वेळ होता. त्यानंतर 'जेम्स गॅलरी' ला भेट द्यायची होती. हॉटेलवर आल्यावर आमच्या सासूबाईंनी पहिली गोष्ट काय केली असेल तर पंजाबी ड्रेस बदलून पुन्हा साडी नेसली!!! 'जेम्स गॅलरी'ला अजय आलाच नाही. काहीही न खातापिता तो तसाच खोलीत झोपून राहिला. 'ह्याला ट्रीपला आणून चूक केली' असं आता मला वाटायला लागलं होतं!!!!!!

एका मोठ्या दिमाखदार, दुमजली इमारतीत ती खाजगी 'जेम्स गॅलरी' आणि दुकान आहे. आत शिरल्याशिरल्या एक छोटी 'ट्रेन राईड' होती सर्वांसाठी. लहान मुलांच्या बागेत असते तशी एक चार डब्यांची छोटी गाडी होती. ती १५-२० मिनिटांत आपल्याला फिरवून आणते एका अंधाऱ्या गुहेतल्या मार्गावरून. मौल्यवान रत्नं कशी बनतात, पुरातन काळापासून जडजवाहिऱ्यांचा व्यवसाय कसाकसा बदलत आला इ. वर्णन करणारे देखावे वाटेत ठिकठिकाणी उभे केलेले होते आणि एकीकडे ध्वनिमुद्रित समालोचन सुरू होतं. मजा आली ते पहायला आणि ऐकायला!! कंटाळवाणी ठरणारी माहिती लोकांनी आवडीने ऐकावी यासाठी केलेला तो एक छानच प्रयत्न होता. त्यानंतर आम्ही रत्नांना पैलू पाडण्याचं काम चालू होतं तिथे गेलो. ते अतिशय जिकीरीचं काम असतं हे माहीत होतं पण प्रत्यक्ष तेव्हा पहायला मिळालं. तिथून मग मुख्य दुकानात गेलो. ते फारच भव्य आणि प्रचंड होतं. लोकांच्या जिभांवर लगेच - पु. लं. च्या भाषेत - सरस्वतीने क्लास उघडला - 'गाडगीळांची १० दुकानं मावतील यात, एक जेम्स गॅलरी पौड रोडवर सुरू केली तर त्याची त्यांनी केवढी जाहिरातबाजी केली, इथे येऊन पहा म्हणावं. याची सर तरी आहे का त्या दुकानाला ...' वगैरे, वगैरे!! आता, ते दुकान भव्य होतं हे खरंच, गाडगीळांची १० दुकानं खरंचंच तिथे मावली असती पण म्हणून गाडगीळांना खुन्नस द्यायची काही गरज होती का!!! आणि गाडगीळांना 'इथे येऊन पहा' म्हणायला त्यांनी काय ती पाहिली नसेल का!!! पण अश्या गप्पा नाही झाल्या तर आपलं मनोरंजन तरी होणार कसं, नाही का!! त्यामुळे मी त्या सगळ्या गप्पांची मस्त मजा घेतली. कारण नाहीतर त्या दागदागिन्यांत मला विशेष रस नव्हता. अर्थात, अनेक अनमोल रत्नं, ज्यांचे आजवर फक्त फ़ोटोच पाहिले होते, ती सगळी तिथे प्रत्यक्ष पाहिली - विविध आकार-प्रकारांत. हौशी मंडळी किमती विचारत होती, अव्वाच्यासव्वा किमती ऐकून, चेहेरे पाडून पुढे सरकत होती. काहींनी थोडीफार खरेदी पण केली. आम्ही पाचजण सगळीकडे एक चक्कर मारून बाहेर पडलो.

सहा-सव्वासहाला तिथून निघालो. त्या दिवसाचं शेवटचं आकर्षण होतं - थाई मसाज. अर्थात ते ऐच्छिक होतं. आदल्या दिवशीच बॅंकॉकहून येताना ऍनाने त्याबद्दल सांगितलं होतं. थाई मसाजचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा असं सौ. शिंदेंचं पण मत होतं. आधी मी फारशी उत्सुक नव्हते. तर अजयने मला आग्रह करुन माझं पण नाव दिलं होतं यादीत आणि आज तो स्वतःच झोपला होता खोलीत. मग मी, आदित्य आणि माझी आई - असे तिघेजण गेलो. इतरही बरेचजण होते. थाई मसाज केंद्र आमच्या हॉटेलला लागूनच होतं. ७ ते ९ आम्ही तिथे होतो. थाई मसाज म्हणजे एका विशिष्ट शास्त्रोक्त पद्धतीने हात-पाय-डोकं चेपणे. 'मसाज' या शब्दाने अनेकांचा गैरसमज होतो, माझा पण झाला होता. पण त्याने खरंच शरीर आणि मन हलकं झालं. इथे वापीत रोज असे कुणी हातपाय चेपून दिले तर किती बरं होईल असं वाटलं.

९ वाजता परत हॉटेलवर आलो. आई-बाबा जेवतच होते. अजय दिसला नाही कुठे. तो जेवायलाही खाली यायला तयार नव्हता. आता मात्र हद्द झाली. मी जेवले, वर गेले आणि अक्षरशः त्याला झापलं. जरा चिडूनच, जबरदस्तीने खाली घेऊन आले. थोडा हलकं जेवण आणि नंतर औषध घ्यायला लावलं. अजयची आता मला जरा काळजीच वाटायला लागली होती. विमान प्रवास, बस प्रवास आता १५ दिवस असणारच होता अधूनमधून. मग त्याचं हे असंच सुरू राहणार की काय ... काही कळेना. थोडा हलका आहार आणि योग्य औषधं - हाच एक उपाय होता त्यावर.
त्यादिवशी त्याने घेतलेल्या औषधांचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसणार होता. आमचं पट्टाया वास्तव्य संपलं होतं. दुसऱ्या दिवशी बॅंकॉकला जायचं होतं. बॅंकॉकला अजयचा कुठला चेहेरा दिसणार होता???

गुलमोहर: 

हे वर्णन दुर्लक्षित का राहिलंय इतके वर्ष? Uhoh
मजा येतेय वाचायला. तुमच्या इकडच्या स्वारीला झालं काय होतं?