अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ४ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)

Submitted by निंबुडा on 30 November, 2012 - 06:59

अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ३

तिने कुठल्याही प्रकारे तिच्या माजी मालकाबद्दल तिला असलेला राग व तिटकारा लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

"हो, श्रीयुत, हे खरे आहे की सर ह्युस्टस ह्यांनी मला काचेचा जग फेकून मारला.... इथून पुढे चालू -

"हो, श्रीयुत, हे खरे आहे की सर ह्युस्टस ह्यांनी मला काचेचा जग फेकून मारला. मी एकदा त्यांना माझ्या बाईसाहेबांना नावे ठेवताना ऐकले. 'बाईसाहेबांचे बंधू ह्या क्षणी इथे असते तर तुमची असे बोलण्याची हिंमत झाली नसती' हा माझा शेरा ऐकून रागाने त्यांनी मला तो काचेचा जग फेकून मारला होता. त्यांनी मला असे डझनभर काचेचे जग फेकून मारले असते तरी मला पर्वा नव्हती, पण माझ्या बिचार्‍या बाईसाहेबांना त्यांनी दिलेला त्रास मला सहन होत नसे. ते तिच्याशी कायम बेपर्वाईने वागत असत. त्या मला त्यांना होणार्‍या त्रासाबद्दल अवाक्षरही सांगत नसत. आज सकाळी तुम्ही त्यांच्या हातावर पाहिलेल्या जखमांबद्दल मलाही आजच समजले. पण मला बघूनच समजले की मालकांनी बाईसाहेबांना त्यांची टोपी फेकून मारली असणार. त्या टोपीला असलेल्या पिनेमुळेच त्या जखमा झालेल्या असणार हे निश्चित! क्रूर राक्षसच होता तो! आता ते मृत पावले आहेत तरीही मी त्यांच्याबद्दल असे उद्गार काढत असल्याबद्दल मला क्षमा करा. परंतु ह्या पृथ्वीवर जन्मास आलेला तो एकमेव नराधम होता. आम्ही साधारण १८ महिन्यांपूर्वी पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांचे बोलणे किती मधाळ होते! आता असे वाटते ह्या घटनेला अठरा महिने नाही तर अठरा वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा माझ्या बाईसाहेब नुकत्याच लंडन मध्ये पहिल्यांदा आल्या होत्या. हा त्यांचा ऑस्ट्रेलियातून बाहेर असा पहिलाच मोठा प्रवास होता व त्यापूर्वी त्या कधीही घरापासून दूर राहिलेल्या नव्हत्या. तेव्हा ह्या माणसाने स्वतःचे पद, प्रतिष्ठा व पैसा आणि ह्या देशातल्या लोकांच्या कृत्रिम औचित्यपूर्ण वर्तनाने त्यांचे मन जिंकून घेतले. तिने केलेल्या चुकीचे पायश्चित्तच जणु तिला मिळाले. आम्ही कोणत्या बरे महिन्यात त्यांना भेटलो? मला वाटते, आम्ही लंडन मध्ये पाऊल ठेवल्यानंतर लगेचच ही घटना घडली. आम्ही जून मध्ये इथे आलो. म्हणजे आम्ही सर ह्युस्टस ह्यांना पहिल्यांदा भेटलो तो जुलै महिना होता. त्यानंतर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ती दोघं विवाहबद्ध झाली. मला वाटते, बाईसाहेब परत दिवाणखान्यात आल्या आहेत आणि त्या तुमची भेट नक्कीच घेतील. कृपा करून त्यांना अधिक प्रश्न विचारू नका. त्यांनी आधीच खूप मनस्ताप सहन केला आहे."

श्रीमती ब्रॅकनस्टॉल त्याच सकाळच्या कोचावर येऊन बसल्या. पण आता त्या सकाळच्यापेक्षा बर्‍याच सावरलेल्या आणि तजेलदार दिसत होत्या. दाईनेही आमच्याच बरोबर दालनात प्रवेश केला आणि ती परत त्यांच्या भुवईवरील जखमेवर मलमपट्टी करू लागली.

"मी आशा करते, की तुम्ही माझी उलटतपासणी करणार नाही." - इति श्रीमती ब्रॅकनस्टॉल.

"नाही, " होम्स सौदार्हपूर्ण स्वरात म्हणाला, "माझी तुम्हाला विनाकारण त्रास देण्याची यत्किंचितही इच्छा नाही. उलट तुमचा त्रास कमी व्हावा असाच हेतू आहे. कारण आधीच तुम्ही फार कठिण प्रसंगातून गेला आहात, ह्याची मला कल्पना आहे. जर तुम्ही माझ्याकडे एका सच्चा आणि विश्वासू मित्र म्हणून बघाल तर मी तुमच्या विश्वासास पात्र ठरेन ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो."

"तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे?"

"कृपया मला सत्य काय आहे ते सांगा!"

"श्रीयुत, होम्स!"

"नाही नाही, श्रीमती ब्रॅकनस्टॉल. आता त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही माझ्याबद्दल ऐकले असेलच! मी खात्रीपूर्वक हे सांगू शकतो की तुम्ही सांगितलेली कथा ही रचलेली आहे."

बाईसाहेब आणि त्यांची दाई - दोघी होम्स कडे भयभीत नजरेने पाहू लागल्या. दोघींचा चेहरा भीतीने फिकट पडला होता.

"तुमच्या हिंमतीची दाद द्यावयास हवी!", ती दाई उद्गारली, "म्हणजे तुम्हाला असा आरोप करायचा आहे का की बाईसाहेब खोटे बोलत आहेत?"

होम्स त्याच्या खुर्चीतून उठला.

"तुमच्याकडे मला सांगण्यासारखे नक्की काहीच नाही?" - होम्स

"मी तुम्हाला सर्व काही आधीच सांगितलेले आहे." - श्रीमती ब्रॅकनस्टॉल

"पुन्हा एकदा विचार करा, श्रीमती ब्रॅकनस्टॉल! सत्य काय आहे ते सांगणे कधीही श्रेयस्कर!"

एक क्षणाकरीता त्या सुंदर स्त्रीच्या चेहर्‍यावर चलबिचल दिसली. परंतु लगेचच तिने पुन्हा एकदा गंभीर मुखवटा धारण केला.

"मला माहीत होते ते सर्व मी तुम्हाला सांगितले आहे."

होम्सने त्याची टोपी उचलली व खांदे उडवले.

"मला माफ करा" इतकेच बोलून त्याउप्पर एक शब्दही न बोलता तो दालनाबाहेर पडला - पाठोपाठ मीही. बाहेरील बगीच्यात एक तलाव होता. होम्स त्याच्या बाजुने चालला होता. त्याचे पाणी पूर्णपणे गोठलेले होते. पण त्यात एक भोक होते. बहुदा तळ्यातील एकमेव हंसाच्या सोयीसाठी ते होते. होम्स ने एक क्षण तिकडे निरखून पाहिले आणि मग तो फाटकाच्या दिशेने चालू लागला. त्याने एक लहानशी चिठ्ठी खरडली व स्टॅनले हॉपकिन्स ला देण्यासाठी म्हणून तिथे दाराशी उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाकडे दिली.

"ही युक्ती कितपत कामी येईल माहीत नाही, पण प्रिय हॉपकिन्स ला आपल्या ह्या पुनर्भेटीचे पटेलसे कारण दिले पाहिजे. मी अजूनही त्याला आपल्या विश्वासात घेऊ शकत नाही. मला वाटते आपल्या शोधकार्याचा पुढील टप्पा अ‍ॅडलेड-साऊदम्पटन ह्या मार्गाच्या नौपरिवहन कार्यालयापासून सुरु होतो. माझ्या आठवणीप्रमाणे ते पॉल मॉल विभागाच्या टोकास आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांना जोडणारा अजूनही एक सागरी मार्ग आहे, पण मला वाटते आपण सर्वात मोठा भाग व्यापणार्‍या पहिल्या मार्गावर आपले लक्ष केंद्रीत करू या.

नौपरिवहन कार्यालयात गेल्या गेल्या होम्स ने आपले ओळखपत्र तेथील व्यवस्थापकास पाठविले. त्या क्षणापासून अगदी थोड्याच वेळात होम्स त्याला हवी ती माहिती मिळवण्यात यशस्वी ठरला होता. जून'९५ मध्ये त्यांच्याकडील फक्त एकाच जहाजाने त्या मार्गावर प्रवास करून ते येथल्या बंदराला लागले होते. त्या जहाजाचे नाव 'रॉक ऑफ जिब्राल्टर' असे असून त्यांच्या ताफ्यातली ते सर्वात मोठे आणि उत्तम असे जहाज होते. आम्ही त्या जहाजातून त्या प्रवासात सामील झालेल्या प्रवाश्यांची यादी मिळवून चाळली. त्यात अ‍ॅडलेड च्या कुमारी फ्रेझर व त्यांच्या दाईचा उल्लेख होता. आता ह्या क्षणी ते जहाज ऑस्ट्रेलियाकडे जाणार्‍या सागरी मार्गावर प्रवास करीत होते व त्यावर अजूनही तेच अधिकारी कार्यरत होते जे जुन'९५ मध्ये त्या जहाजावर काम करत होते. फक्त एकच अधिकारी ज्याचे नाव श्री. जॅक क्रॉकर होते त्याची बढती होऊन तो कप्तान बनला होता व दुसर्‍या एका साऊदम्प्टन येथून मार्गस्थ होऊ घातलेल्या जहाजावर - ज्याचे नाव बाझ रॉक होते - त्याला येत्या दोन दिवसांत रुजू व्हायचे होते. तो सिडनहॅम येथे राहत होता व आम्ही त्याच्यासाठी इथे थांबलो तरीही त्याची भेट होण्याची शक्यता जवळपास नव्हतीच.

तसेही होम्सला त्याला भेटण्यात जराही रुची असेल असे मला वाटत नव्हते. त्याला फक्त जॅकबद्दल त्या नौपरिवहन कार्यालयात असलेल्या नोंदी आणि त्याचे चारित्र्य जाणून घ्यायचे होते.

त्याच्याविषयी उपलब्ध असलेल्या नोंदी विलक्षण होत्या. त्याच्या योग्यतेच्या जवळपासही पोचू शकेल असा एकही अधिकारी तेथे नव्हता. त्याच्या चारित्र्याविषयी बोलायचे झाले तर तो एक विश्वासार्ह, कामात तरबेज, सहृदयी, इमानदार पण उतावीळ व थोडा निरंकुश, तापट डोक्याचा तसेच अतिउत्साही इसम होता. ही माहिती मिळवून आम्ही स्कॉटलंड यार्ड ला आलो. पण घोडागाडीतून उतरण्याऐवजी होम्स काही आळ कपाळावर आठ्यांचे जाळे घेऊन विलक्षण विचारमग्न अवस्थेत तसाच बसून राहिला. सरते शेवटी त्याने गाडीवानाला गाडी चॅरिंग क्रॉस तार-कार्यालयाकडे घेण्यास सांगितले, तिथून कुणालातरी एक तार पाठवली आणि मग आम्ही बेकर स्ट्रीट कडे परत आलो.

"नाही वॉटसन, मी तसे नाही करू शकलो!", होम्स घरात प्रवेश करत म्हणाला, "एकदा का त्याच्या नावे पोलिसांनी फर्मान काढले की अटक होण्यापासून ह्या पृथ्वीतलावरचा कुणीच त्याला वाचवू शकणार नाही. माझ्या संपूर्ण कार्यकाळात एकदा का दोनदा मी अशी चूक केली आहे. आणि त्या वेळी त्या गुन्हेगाराने तो गुन्हा करून जितका मोठा अपराध केला नसेल त्याहीपेक्षा मोठा अपराध मी त्या गुन्हेगाराला पकडून देऊन केला आहे. त्यातून मी धडा शिकलो आहे व आता जरा जपून मी माझ्या खेळी खेळतो. त्या गुन्हेगाराचे नाव उघड करण्यापेक्षा इंग्लंडच्या कायद्याला शह देणे आता मी श्रेयस्कर समजतो. आता पुढील डाव मांडण्याआधी ह्या केसबद्दल अजून तपशीलात मी तुला सांगतो."

संध्याकाळच्या आत स्टॅनले हॉपकिन्स ने आमच्या खोलीत हजेरी लावली होती.

"श्रीयुत होम्स, मला वाटते तुम्ही जादूगार आहात. कधी कधी वाटते तुमच्याकडे काहीतरी अमानवी शक्ती असल्या पाहिजेत. मला राहून राहून ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की त्या चांदीच्या ताटल्या त्या तलावाच्या तळाशी असल्याचे तुम्हाला कसे समजले?"

"मलाही माहीत नव्हते."

"पण तुम्हीच तर मला तिथे शोधण्यास सांगितलेत!"

"मग? मिळाल्या का तुम्हाला त्या तिथे?"

"हो! तिथेच सापडल्या त्या!"

"मग मला आनंद आहे की मी तुमच्या उपयोगी पडू शकलो."

"पण उलट तुमच्या ह्या मदतीमुळे ह्या केसचा गुंता अजूनच वाढला आहे. असले कसले चोर आहेत हे? जे आधी चोरी करून चांदीचे सामान पळवतात आणि जाता जाता हवेलीत समोरच्याच तळ्यात टाकून पोबारा करतात?"

"खरंच! हे वेडगळपणाचेच लक्षण आहे खरे. मी अश्या दिशेने विचार करत होतो की असे लोक ज्यांनी त्या वस्तु तिथून उचलल्या तर आहेत, पण त्यांना खरे म्हणजे त्या वस्तुंची काहीच गरज नाही व केवळ इतरांच्या डोळ्यांत धूळफेक करणे एव्हढाच त्यांच्या ह्या कृतीमागचा उद्देश आहे, तर मग त्या लोकांना त्या वस्तुंचा निकाल लावणेही नक्कीच क्रमप्राप्त असणार!"

"पण अशी शक्यता असू शकेल हे तुमच्या मनात आले तरी कसे?"

"कसे ते माहीत नाही, पण सहज शक्यता म्हणून मी ह्या बाबीचा विचार केला. जेव्हा त्यांनी हवेलीत त्या फ्रेंच धाटणीच्या खिडकीतून प्रवेश केला तेव्हा त्या तळ्यावरूनच ते आले असणार. त्या तळ्यात गोठलेल्या पाण्याला एक भोक पडले आहे. त्याच खिडकीतून बाहेर पडताना ते तळे व त्यातले ते भोक ह्या गोष्टी सरळ समोर दिसत होत्या. मग त्या ताटल्या लपवण्यासाठी अजून कुठली चांगली जागा त्यांना सापडू शकणार होती?"

"तुम्हाला मानलं पाहिजे, श्री. होम्स!", हॉपकिन्स अत्यानदांने ओरडत होता, "आता मला एक एक घटनेची साखळी लागते आहे. ते रस्त्यावरचे भुरटे चोर होते व त्या चांदीच्या ताटल्यांसह ते बाहेर कुणाला दिसू नयेत म्हणून त्यांनी तळ्यात त्या ताटल्या लपवल्या. कदाचित हे प्रकरण शांत झाल्यानंतर परत येऊन त्या ताटल्या घेऊन जाण्याचा त्यांचा बेत असावा. तुम्ही म्हणता ते 'डोळ्यात धूळफेक' वगैरे पेक्षा ही माझी शक्यता मला जास्त योग्य वाटते."

"तसेही असू शकेल. तुमची कारणमीमांसाही योग्य वाटते. माझ्या स्वतःच्या कल्पना काही वेगळ्याच व जराश्या अतार्किक होत्या. पण आपण सर्वांनी हे मान्य करायला हवे ही केस तुम्ही चांदीच्या ताटल्या परत मिळवण्यासकट यशस्वीरीत्या पार पाडली आहे."

"नक्कीच! पण ह्यात तुमचीही मोलाची मदत मिळाली आहे. पण एक विरोधाभास निर्माण करणार्‍या घटनेची खबर मला मिळाली आहे."

"कसली खबर?"

"त्या रँडॉल त्रिकूटाला आजच सकाळी अमेरीकेत अटक झाल्याची बातमी आली आहे."

"असे असेल तर मग त्यांनी काल रात्री केंट मध्ये हा खून केल्याच्या तू वर्तवलेल्या शक्यतेलाच सुरुंग लागतोय!"

"नशीबाचा भाग आहे! माझे दुर्दैव! पण ह्या भागात अश्या दरोडेखोरांच्या अजूनही काही टोळ्या आहेत. किंवा मग एखादी नवीन टोळी जन्माला आली असेल जिचा आम्हा पोलिसांना अजून पत्ताच नाही."

"तसे असण्याची शक्यता नाकारता येत नाही! हे काय तुम्ही निघालात लगेच?"

"हो, श्रीमान! ह्या केसच्या मुळाशी जाईस्तोवर मला झोप लागणार नाही. मला वाटते ह्या केसबद्द्दल
मला सांगण्यासारखे तुमच्याकडे आता अजून काही शिल्लक नाही."

"मी तुम्हाला आधीच एक बाब सुचवली आहे की!"

"आणि ती कोणती?"

"ते मी मघाशी धूळफेकीबद्दल म्हणालो ते!"

"का पण, श्री. होम्स? का कुणी इतरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी ताटल्या चोरून नेईल?"

"आह्ह! हाच तर प्रश्न आहे! पण मी तुला कल्पना दिली आहे, त्या उप्पर त्या दिशेने संशोधन करण्याचे व ह्या कल्पनेत कितपत तथ्य आहे हे शोधून काढण्याचे काम तुमचे आहे. अरे, तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी थांबणार नाही का? ठिक आहे तर मग! शुभरात्री! आणि तुमची प्रगती कुठवर होतेय ते कळवत रहा!"

रात्रीची जेवणे झाल्यानंतर होम्स आणि मी पुन्हा ह्या केससंदर्भात बोललो. होम्स ने त्याचा पाईप शिलगावला आणि सपाता घातलेले पाय भट्टीच्या दिशेने ठेवून त्या आनंददायी ऊबेचा आस्वाद घेत तो स्वस्थ बसला. अचानक होम्स ने त्याच्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिले.

"मला आपल्या केसचा पुढचा टप्पा चालू होण्याची लक्षणे दिसत आहेत, वॉटसन!"

"केव्हा?" मी गोंधळून विचारले.

"आत्ता! थोड्याच्य मिनिटांमध्ये! मला खात्री आहे, तुला असे वाटले असेल की आज मी हॉपकिन्स बरोबर जरा चुकीचेच वागलो."

"माझ्या तुझ्या न्यायपद्धतीवर आणि निर्णयावर विश्वास आहे, होम्स!"

"खूप हुशारीने उत्तर दिलेस, वॉटसन! ह्या गोष्टीकडे अश्या कोनातून पहा - जी माहिती मी जाणतो ती अवैध आहे. आणि हॉपकिन्स कडे वैध माहिती आहे. मला खाजगी न्यायदानाचा अधिकार आहे. पण हॉपकिन्स हा सरकारी नोकर असल्याने त्याच्याकडे ती अखत्यारी नाही. त्याच्याकडे असलेली सगळीच्या सगळी माहिती त्याला उघड करावीच लागेल, अन्यथा त्याच्या नोकरीवरही गदा येऊ शकते. तेव्हा मी स्वतःच काही बाबतींत साशंक असताना त्याला बिचार्‍याला ती माहिती सागून अडचणीत आणण्यापेक्षा ती माहिती माझ्याजवळच बाळगणे मी इष्ट समजतो - निदान जोपर्यंत माझ्या शंका दूर होत नाहीत तोपर्यंत!"

"आणि कधी होणार आहे तुझे हे शंका निरसन?"

"ती वेळ आलेली आहे, मित्रा. लवकरच ह्या लक्षणीय नाटकाचा शेवटचा अंक चालू होणार आहे आणि तू ह्या खेळाचा साक्षीदार असणार आहेस."

इतक्यात खाली जिन्यावर पावलांचा आवाज ऐकू आला....

क्रमशः

"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा Lol

छान चालले आहे, असेच पटापट येउदेत पुढचे भाग

>>>हो, श्रीयुत, हे खरे आहे >>>>
फक्त मिस्टर, मिसेसचा अनुवाद "श्रीयुत" सगळीकडेच करायचे टाळा. आपल्या बोली भाषे प्रमाणे लिहा.

छान Happy

फक्त मिस्टर, मिसेसचा अनुवाद "श्रीयुत" सगळीकडेच करायचे टाळा. आपल्या बोली भाषे प्रमाणे लिहा.
>>>
धन्यवाद, सूचनेबद्दल. दिनेशदांनीही हीच सूचवणी केली आहे. आणि मला पटले. आताच्या कथेत सरसकट सगळीकडेच श्रीयुत, श्रीमान वापरले असल्याने शेवटच्या भागापर्यंत तेच कायम ठेवेन. पुढची कथा अनुवादीत करताना हा सूचना लक्षात ठेवेन. Happy

मालकांनी बाईसाहेबांनी त्यांची टोपी फेकून मारली असणार.>>>>>> बाईसाहेबांना कर
>>>
धन्यवाद, सस्मित Happy बदल केला आहे. Happy

संशोधनाच्या जागी शोधकार्य किंवा तपास, कसे वाटेल ?>>>
दिनेशदा, मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. योग्य शब्द सूचत नव्हता. तेव्हा संशोधन शब्द वापरला.

अनुवाद करताना एक मात्र लक्षात येतेय की किती सहज आपण बरेचसे इंग्रजी शब्द रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यात वापरतो. पण प्रत्यक्षात त्या शब्दांना मराठी प्रतिशब्द पटापट सूचतच नाहीत. ह्या अनुवादाच्या प्रयोगामुळे फायदा होतोय. Happy मजा येतेय.

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचेच हुरूप वाढविल्याबद्दल धन्यवाद.

लवकरच पाचवा म्हणजेच शेवटचा भाग प्रकाशित करेन. आज किंवा उद्या नक्की!