अंडंबिर्यानी

Submitted by मृण्मयी on 28 November, 2012 - 17:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-६ अंडी
३ वाट्या बासमती तांदूळ
४ लवंगा
१ पेरभर दालचिनीचा तुकडा
६-७ मिरंदाणे
४ वेलदोडे
२ तमालपत्रं
१ काळा वेलदोडा
१ मोठा चमचा धनेपूड
भाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठ
एक वाटी घट्टं दही
चमचाभर टोमॅटोपेस्ट
४ हिरव्या मिरच्या
३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून
७-८ पानं पुदिना, चिरलेला
पळीभर साजुक तूप
पाव कप दुधात १०-१२ तंतू केशर
दोन पळ्या तेल
२ मोठे चमचे एव्हरेस्ट बटरचिकन मसाला
चवीनुसार तिखट

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ २-३दा धुवून, पाण्यात तासभर भिजवून ठेवावे. निथळून घ्यावे.
-अंडी उकडून (हार्ड बॉइल), सोलून बाजूला ठेवावी.
-७-८ वाट्या पाण्याला, त्यात लवंगा, वेलदोडे, मीठ आणि चमचाभर तेल घालून उकळी आणावी.
- निथळलेले तांदूळ घालावे.
- तांदूळ शिजत आले की चाळणीत ओतून, पाणी काढून टाकून, लागलीच ताटात भात मोकळा करावा. ताटाखाली स्टँडचं कोस्टर असल्यास उत्तम.

-मोठ्या, जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेल्या कांद्यातला अर्धा भाग खरपूस तळून बाजूला ठेवावा.
-त्याच तेलात आता उरलेला कांदा परतून घ्यावा.
-मिरच्या घालाव्या.
-तमालपत्र, मिरं, मोठा वेलदोडा (सगळे अख्खे मसाले) घालून परतावं.
-धनेपूड, तिखट आणि बटरचिकन मसाला घालून जरासं परतलं की टोमॅटोपेस्ट घालावी.
- दही घालून एकत्र करून घ्यावं.
-या मिश्रणात अंडी अख्खी किंवा काप करून घालावी.
-वरून भात घालावा.
-भातात तूप सोडावं
-भातात, भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून, त्यात केशर+दूध घालावं.
-चिरलेली पुदिन्याची पानं घालून, घट्टं झाकण लावून १० मिनिटं मंद आचेवर शिजवावं.
-वरून खमंग तळलेला कांदा घालावा.

egg birayani-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ माणसांसाठी, एक वेळ पोटभर.
अधिक टिपा: 

-घटकपदार्थ भरपूर दिसत असले, आणि कृतीतल्या पायर्‍याही बर्‍याच दिसल्या तरी लवकर होणारा पदार्थ आहे.

-भात पूर्ण शिजवून घेतलेला असल्यामुळे वेळ लागत नाही.

-मटण, चिकन किंवा भाज्यांची बिर्यानी करताना जसा मांसाचा किंवा भाज्यांचा फ्लेवर भातात उतरतो, तसा अंड्याचा उतरत नाही.

-पानात घेताना नीट मिसळून घ्यावा, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थीत लागेल.

-अंडी अख्खी ठेवली तर ज्यांना बलक नको त्यांना काढून टाकता येतो. काप केले की सगळं भातात मिसळल्या जातं.

-आलं-लसूण ऐच्छिक. मी घातलंय. पण वाटण्यापेक्षा किसणीच्या बारिक भागातून किसून. यामुळे कमी उग्र लागतं.

-आलं लसूण घातलंच तर ते अख्खा मसाला घालण्यापूर्वी कांद्याबरोबर, उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यावं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages