अंडंबिर्यानी

Submitted by मृण्मयी on 28 November, 2012 - 17:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-६ अंडी
३ वाट्या बासमती तांदूळ
४ लवंगा
१ पेरभर दालचिनीचा तुकडा
६-७ मिरंदाणे
४ वेलदोडे
२ तमालपत्रं
१ काळा वेलदोडा
१ मोठा चमचा धनेपूड
भाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठ
एक वाटी घट्टं दही
चमचाभर टोमॅटोपेस्ट
४ हिरव्या मिरच्या
३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून
७-८ पानं पुदिना, चिरलेला
पळीभर साजुक तूप
पाव कप दुधात १०-१२ तंतू केशर
दोन पळ्या तेल
२ मोठे चमचे एव्हरेस्ट बटरचिकन मसाला
चवीनुसार तिखट

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ २-३दा धुवून, पाण्यात तासभर भिजवून ठेवावे. निथळून घ्यावे.
-अंडी उकडून (हार्ड बॉइल), सोलून बाजूला ठेवावी.
-७-८ वाट्या पाण्याला, त्यात लवंगा, वेलदोडे, मीठ आणि चमचाभर तेल घालून उकळी आणावी.
- निथळलेले तांदूळ घालावे.
- तांदूळ शिजत आले की चाळणीत ओतून, पाणी काढून टाकून, लागलीच ताटात भात मोकळा करावा. ताटाखाली स्टँडचं कोस्टर असल्यास उत्तम.

-मोठ्या, जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेल्या कांद्यातला अर्धा भाग खरपूस तळून बाजूला ठेवावा.
-त्याच तेलात आता उरलेला कांदा परतून घ्यावा.
-मिरच्या घालाव्या.
-तमालपत्र, मिरं, मोठा वेलदोडा (सगळे अख्खे मसाले) घालून परतावं.
-धनेपूड, तिखट आणि बटरचिकन मसाला घालून जरासं परतलं की टोमॅटोपेस्ट घालावी.
- दही घालून एकत्र करून घ्यावं.
-या मिश्रणात अंडी अख्खी किंवा काप करून घालावी.
-वरून भात घालावा.
-भातात तूप सोडावं
-भातात, भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून, त्यात केशर+दूध घालावं.
-चिरलेली पुदिन्याची पानं घालून, घट्टं झाकण लावून १० मिनिटं मंद आचेवर शिजवावं.
-वरून खमंग तळलेला कांदा घालावा.

egg birayani-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ माणसांसाठी, एक वेळ पोटभर.
अधिक टिपा: 

-घटकपदार्थ भरपूर दिसत असले, आणि कृतीतल्या पायर्‍याही बर्‍याच दिसल्या तरी लवकर होणारा पदार्थ आहे.

-भात पूर्ण शिजवून घेतलेला असल्यामुळे वेळ लागत नाही.

-मटण, चिकन किंवा भाज्यांची बिर्यानी करताना जसा मांसाचा किंवा भाज्यांचा फ्लेवर भातात उतरतो, तसा अंड्याचा उतरत नाही.

-पानात घेताना नीट मिसळून घ्यावा, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थीत लागेल.

-अंडी अख्खी ठेवली तर ज्यांना बलक नको त्यांना काढून टाकता येतो. काप केले की सगळं भातात मिसळल्या जातं.

-आलं-लसूण ऐच्छिक. मी घातलंय. पण वाटण्यापेक्षा किसणीच्या बारिक भागातून किसून. यामुळे कमी उग्र लागतं.

-आलं लसूण घातलंच तर ते अख्खा मसाला घालण्यापूर्वी कांद्याबरोबर, उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यावं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, जिन्नसांच्या यादीत लिहिते. अंडी ४-६ पुरतात.

सायो, Lol
>>अंडं काढल्यास काय राहील?
..वैतागलेली कोंबडी! Proud

तोंपासु दिसतेय अगदी.
रच्याकने, आम्ही अंडाबिर्याणी म्हणतो.

छान रेसिपी.
मी बनवते कधी कधी अंड बिर्यानी. अंडा करी काय सुरेख लागते सांगु. टीपीकल मालवणी पद्धतीने बनवलेली.
अंडा हा एक असा पदार्थ आहे की ज्याचे आपण कधीही, कुठेही आणि चक्क काहीही हेल्थी बनवुन खावु शकतो.
पु.ले.शु.

मी अशीच पण थर लावून करते. मस्त होते.

गाढवाला अंडं बिर्यानी म्हणून त्रास होतो की नाही माहित नाही Happy मला मात्र वाचताना लई विचित्र वाटलं.
आम्ही अंडाबिर्यानी म्हणतो.

मॅक्स Happy

सही फोटो. योग्य मुहुर्तावर करुन बघणेत येइल Happy

मी एकदा व्हेज बिर्यानी कृतीनेच अंड बिर्याणी करुन बघितली होती. भाज्यांच्या ऐवजी अंड्याच्या चकत्या करुन घातल्या. चांगली लागली.

फोटो भारीच तोंपासु Happy साधारण ह्याच पद्धतीने करते मी पण भात मागे तू साधा पुलाव ज्या पद्धतीने सांगितला होतास त्या पद्धतीने शिजवून घेते, पाणी काढून टाकायची पद्धत वापरत नाही.

लय भारी ! भारी म्हणजे भारीच. आवडली.. एकदम आवडलीच कृती. साजूक तूप, केशर, दूध हे शिर्‍यातले घटक घातल्याने सात्विक होत असणार बिर्याणी. वा !

धन्यवाद!

अगो, पास्ता शिजवतो तसा भात शिजवला बिर्यानीसाठी तर जास्त आवडला. एरवी तू म्हणतेस तीच पध्दत.

साजूक तूप, केशर, दूध हे शिर्‍यातले घटक घातल्याने सात्विक होत असणार बिर्याणी. वा !<<

सात्विक बिर्याणी

दूध, तूप, केशर असल्याने पदार्थ सात्विक आहेच असं म्हणता येत नाही, त्याकरता लसूण असण्याची गरज पडतेच. मूळ रेसिपीत लसूण नाही म्हणून सात्विक म्हणवत नाही Wink

बाकी कृती हीच ठेवून, फक्त भाताच्या जागी नुडल्स वापरुन, माझ्या मुलीने नुडल्-एग बिर्याणि बनवली. मस्त झालेली...

फक्त खाताना माझ्या मनात 'नुडल्स जागी भात अस्ता तर अजुन बहार आली असती' हा विचार वारंवार येत होता. Happy

Pages