कथा अमक्या-तमक्याची.

Submitted by मुग्धमानसी on 28 November, 2012 - 03:06

कथा अमक्या-तमक्याची....

आटपाट नगर होतं... एकविसाव्या शतकातलं. तिथं एक मध्यमवर्गीय ब्राम्हण रहात होता... कुठल्या शतकातला ते तुम्ही ठरवा. त्याचं नाव होतं अमुक-तमुक. त्याची बायको अमकी-तमकी. आणि त्याची मुले... वगैरे वगैरे.

अमुक-तमुक रोज सकाळी निवांत उठायचा. अमकी-तमकीने दिलेला चहा चवी-चवीने प्यायचा. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना नियमितपणे न विसरता चुकचुकायचा आणि चेहरा विषण्ण करायचा. मग तो ’शुचिर्भूत’ व्हायचा. म्हणजे स्नान करायचा... वगैरे वगैरे.

आणि मग सुरू व्हायची त्याची देवपूजा!!

देव्हार्‍यातले डझनभर देव एक-एक करून तो खाली घ्यायचा. चांदीच्या तबकात दाटिवाटीने बसवायचा. ताम्हणातले सोवळ्यातले ’जल’ चांदीच्या फुलपात्रात घेऊन हळुहळू (कधी भरभर) एकेका देवाला स्नान घालायचा. कोरड्या ’वस्त्राने’ देव पुसायचा. आणि पुन्हा देव्हारा हाऊसफुल्ल करायचा. मग न्हालेल्या देवांना अष्टगंध माखायचा. हळद-कुंकू चोपडायचा. फुलांनी झाकायचा. दिव्यांनी ओवाळायचा, उदबत्त्या फिरवायचा, नैवेद्य दाखवायचा, मंत्र म्हणायचा, आरत्या गायचा... वगैरे वगैरे.

मग तो हात जोडायचा, डोळे मिटायचा आणि देवाला विनवणी करायचा - ’देवा मला सुखी कर, माझ्या कुटुंबाला आनंदात ठेव, माझ्या मुलांना सुख दे, उत्तम आरोग्य दे, समृद्धी दे. माझ्या घरदारात आनंद आणि वैभव नांदु देत!!!’... वगैरे वगैरे.

वर्षानुवर्ष हाच दिनक्रम सुरु होता. पूजा-अर्चा आटोपून अमुक-तमुक ऑफिसला जायचा. खर्डेघाशी करायचा. व्यवहारातल्या सर्व जवाबदार्‍या बिनबोभाट पार पाडायचा. ते करताना कधी खोटे बोलावे लागले, कधी कुणाला फसवावे लागले, कुणाला दुखवावे लागले तर तेहि करायचा... पण मनातल्या मनात देवाची हात जोडून, डोळे मिटुन क्षमा मागायचा आणि म्हणायचा - ’भगवंता, कलियुगात असे वागावेच लागते रे. माझी पापे पदरात घे. मला क्षमा कर.’

अमुक-तमुक आणि अमकी-तमकीचा संसार तसा नेटका सुरू होता. अमुक-तमुक देवाचे सर्व न चुकता करायचा. अमकी-तमकी सुद्धा सर्व कुलाचार यथसांग पार पाडायची. सोवळे ओवळे पाळले जायचे. अधुन मधुन घरी सवाष्ण आणि ब्राम्हण पोटभर जेऊन जायचे. पुरणावरणाचा स्वयंपाक, देवाचा नैवेद्य, गाईचा गोग्रास... सगळे काही अमकी-तमकी एकहाती व्यवस्थित सांभाळायची. मुले सुद्धा गुणी निपजली. आई-वडिलांना मान द्यायची. येता जाता वाकून दोघांच्या पाया पडून आशिर्वाद घ्यायची. अमुक-तमुक हात जोडुन, डोळे मिटुन म्हणायचा - ’भगवंता, तुझ्यामुळे!!!’

सर्व काहि ठिक होते. घरात पैसा-अडका फार नाहि तरी पुरेसा होता. शांतता होती. घरातले सर्वजण समाधानी होते. मुले शिकत होती. उत्तम यश मिळवत होती. अमुक-तमुक जोडुन, डोळे मिटुन म्हणत होता - ’भगवंता, तुझ्यामुळे!!!’
__________________

एकदा काय झाले, शंकर आणि पार्वती आकाशातुन पृथ्विचे निरिक्षण करत असताना त्यांची नजर अमुक-तमुकच्या संसारावर खिळली. भगवंतच ते.... अमुक-तमुकचा कित्येक वर्षांचा संसार त्यांनी काही क्षणांत पाहिला. पार्वती शंकरांना म्हणाली, ’भगवन्, या कलियुगात पृथ्विकडे खरेतर पहावेसेही वाटत नाहि. जिथे पहावे तिथे भ्रष्टाचार, खोटेपणा आणि ढोंगीपणाचा चिखल दिसतो नुसता. माणसाने नितिमत्ता सोडली. माणुसपण सोडले. माणसाचा पशु झाला. माणुस स्वतःला विसरला. तुम्हाला... विधात्याला विसरला! तुमच्या भक्तिचेही फक्त निर्लज्ज ढोंग करु लागला. अशावेळी या सामान्य ब्राम्हणाच्या संसाराकडे पाहिले की डोळे जरा निवतात. समाधान वाटते की अजुनही तुम्हाला मनापासून माननारा, भजणारा एखादा माणुस या पृथ्वीवर शिल्लक आहे. तुम्हाला नाही असे वाटत?’

भगवन् फक्त मंद हसले... त्यांच्या नेहमीच्या अंदाजात!!! आणि पार्वती समजली... हे काही खरे नाही. ’यांच्या’ मनात काही वेगळेच आहेसे दिसते!! साक्षात भगवंताची असली तरी शेवटी बायकोच ती... फणकार्‍याने नवर्‍याला म्हणाली - ’कलियुगात माणुस बिघडला असे म्हणतात... पण देवही बिघडले की काय? चांगल्या वाईट भक्ताची ओळख देवालाही पटू नये? आजकाल पाहतिये मी... लायकी नसलेल्या, निर्ढावलेल्या, निर्लज्ज माणसांचे कसले कसले फाजिल लाड पुरवता तुम्ही. त्यांना गाडी काय... बंगला काय... पैसा काय... श्रीमंती काय... तुमचं म्हणजे अगदी पापं धुवायचं मशिन करुन टाकलंय या हलकट माणसांनी. आणि तरिही तुम्ही त्यांना शिक्षा करित नाही. त्यांना त्यांच्या कर्मांसाठी दंडित करीत नाही. उलट त्यांच्या प्रार्थना ऎकता. त्यांना हवं ते देता. आणि या ब्राम्हणासारख्या साध्याभोळ्या माणसांना मात्र लहान लहान गरजांसाठि तिष्ठवता... झगडायला लावता. त्यांच्याकडे तुमचे लक्ष वेधले तर असे फक्त हसता. मी कधी तुमच्या कामात ढवळाढवळ करते का? पण आज तुम्हाला या सगळ्याचा जाब मला द्यावाच लागेल.’

भगवन् म्हणाले - ’अगं हो हो बये... किती चिडतेस? सगळं जग तुला सौम्यतेचं, सात्विकतेचं, शांततेचं प्रतिक म्हणुन ओळखतं. मी आग तु पाणी!!! माझ्या क्रोधाच्या प्रखर धगीपासुन या विश्वाला तुच तर संरक्षित ठेवलंस आजवर... आणि आज तुच मला या विश्वाला भस्म करा म्हणुन सांगतेस?’

पार्वती म्हणाली - ’अहो मग करु काय मी? तुम्हाला नसेल येत पण मला मात्र हल्ली या ढोंगी माणसाचा संताप येऊ लागलाय. मला एकीकडे देव्हार्‍यात बसवुन पुजतो आणि एकीकडे माझ्याच असंख्य रुपांवर अन्याय करतो तरी कींवा होत असलेला अन्याय नुस्ता बघतो तरी.’

भगवन् म्हणाले - ’ठिक आहे, ठिक आहे. पण मला हे समजत नाही असे का समजतेस? मला या माणसांचं ढोंग कळत नाही असे वाटते तुला? तुलाही वाटतं कि ही माणसं इतक्या सहज फसवतात मला?’

पार्वती म्हणाली - ’तसं नसेल तर मग सिद्ध करा!!!’

भगवन् म्हणाले - ’अस्सं? ठिक आहे. कसं करु सांग. बायकोला घाबरण्याची प्रथा देवांनीच सुरु केली म्हणायची. चल माझं देवपण तुझ्यापुढेही सिद्ध करतो. तु म्हणशिल तसं करतो. बोल.’

पार्वती म्हणाली - ’या बिचार्‍या ब्राम्हणाला सुखी करा.’

भगवन् म्हणाले - ’अगं पण तो सुखीच आहे की... त्याशिवाय का माझे पुन्हा पुन्हा आभार मागतोय? आणि बिचारा का? पापं तर तोहि करतोच आहे की...’

पार्वती म्हणाली - ’अहो पण त्याला किमान ती ’पापं’ असल्याची जाणीव आहे. त्यासाठी तो विनम्रपणे तुमची क्षमा मागतो आहे. आणि त्याला सुखी करा म्हणजे ते सर्व त्याला द्या जे तुम्ही लायकी नसणार्‍यांना देता. असं करा... या ब्राम्हणाच्या सगळ्या इच्छा पुर्ण करा. तो जे जे मागेल ते सर्व त्याला द्या. त्याचा तुमच्यावरील विश्वास आणखिन पक्का व्हावा असं वागा!’

भगवन् हसून म्हणाले - ’ठिक आहे! तथास्तु!!’
_______________

इथे अमुक-तमुक आणि अमकि-तमकीच्या संसारात दिवस भराभर पालटु लागले. अमुक-तमुक ला नोकरित अचानक बढती मिळाली. मुले परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवू लागली. घरात लक्ष्मी नांदू लागली. घरादाराने आनंद साजरा केला. देवाला रोज गोडाचा नैवेद्य झाला. डोळे मिटुन अमुक-तमुक पुन्हा म्हणाला - ’भगवंता तुझ्यामुळे!!’

दिवस सरत गेले. अमुक-तमुकला जाणवत होते की आपल्या सगळ्या इच्छा पुर्ण होत आहेत. आले गेले त्याच्या भाग्याचा हेवा करु लागले. अमुक-तमुक आतुन मोहरुन गेला - ’हे तर माझ्या इतक्या वर्षांच्या साधनेचे फळ!!! मी देवाचे सारे नीट केले.... तो मला माझ्या पुण्याईचे फळ देतो आहे!!’

मुले मोठी झाली. मोठ्या मुलाची एक महत्त्वाची परिक्षा जवळ आली तेव्हा अमुक-तमुक देवासमोर हात जोडुन उभा राहिला आणि म्हणाला - ’माझ्या लेकाला या परिक्षेत अभुतपुर्व यश दे. मी तुझी पुजा घालीन. ब्राम्हण-सवाष्ण जेऊ घालीन.’ अन् तसेच झाले. अमुक-तमुकचा मुलगा उत्तम गुण मिळवुन परिक्षेत उत्तीर्ण झाला. अमुक-तमुकला आकाश ठेंगणे झाले. त्याने यथासांग पुजा घातली. नात्यागोत्यातले सारे बोलावले. पक्वान्नांचे जेवण केले. सवाष्ण-ब्राम्हण पोटभर जेवले. अमुक-तमुकने सर्वांना लेकाचे तोंडभर कौतुक सांगितले. कुणीतरी म्हणाले - ’काही म्हणा अमुक-तमुकराव... हे सर्व तुमच्या पुण्याईचे फळ!!’ अभिमानाने फुलून अमुक-तमुक म्हणाला - ’अहो तुम्हीही माझ्याप्रमाणे देवाचे सर्व यथासांग करा... देव तरच तुमचे सर्व काही नीट करील!’

अमुक-तमुक देवाला म्हणाला मुलाला चांगली नोकरी लागु देत... तुला चांदीचा मुकुट वाहीन. - तसे झाले.

अमकी-तमकी देवाला म्हणाली मुलीला चांगले स्थळ मिळु देत. तिचे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. मी मिठाच्या निर्जळी कडक संकष्ट्या करीन. - तसे झाले.

मुलीचे पहीले बाळंतपण निर्विघ्न पार पडले. मुलगा स्थिरस्थावर झाला.

अमुक-तमुक मागत गेला आणि भगवंत त्याला ते सर्व काही देत गेले. बंगला झाला, गाडी झाली... श्रीमंत घरातली सर्वगुणसंपन्न सुशिक्षित सुन लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. घरदार वैभवात न्हाऊन निघाले. अमुक-तमुक आणि अमकी-तमकी भरुन पावले. आले गेले विचारु लागले - ’तुम्ही असे काय हो करता? तुमचे सगळे कसे चांगले होते? मलाही सांगा. माझा हा-हा पश्न काही केल्या सुटत नाही.’ अमुक-तमुक आणि अमकी-तमकी सांगायचे - ’अहो हे-हे, असे-असे व्रत करा; किंवा ही-ही, अशी-अशी पुजा घाला; किंवा हा-हा उपास धरा; किंवा ही-ही पोथी वाचा, पारायण करा. दान करा... वगैरे वगैरे.’

अमुक-तमुक आणि अमकी-तमकीच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती पाणी भरु लागल्या. अमुक-तमुक म्हणाला - ’हे सर्व माझ्यामुळे!! माझ्या श्रद्धा अन् साधनेमुळे!!’
________________

भगवंत अजुनही पार्वतीच्या गोर्‍यामोर्‍या चेहर्‍याकडे पाहुन मंद हासत होते. पार्वतीने गोंधळुन भगवंतांना विचारले - ’अहो हे काय झाले? हा ब्राम्हण तुमचे आभार आता पुर्वीसारखे मागेनासा झाला. त्याच्या प्रार्थनेतली विनम्रता नष्ट झाली. विनम्रतेची जागा अहंकाराने घेतली. त्याला प्राप्त झालेल्या या वैभवाचे सगळे श्रेय आता तो स्वतःकडे घेतो आहे. असे कसे झाले?’

भगवंत मोकळेपणे खळाळुन हासले. म्हणाले - ’अगं हे तर व्हायचेच होते!! मी माणसांना फळ देतो ते त्यांच्या कष्टांचे, कर्तुत्वाचे. कर्म करताना त्याने फक्त माझे स्मरण ठेवावे एवढेच पुरेसे!! लायकीपेक्षा कमी किंवा योग्यतेपेक्षा जास्त मी कुणालाही काहिही कधीही देत नसतो. मग त्यांनी माझी कितीही आर्जवे केली, करुणा भाकली कींवा अमिषे दाखवली तरिही! अगं मी जर माणसावर छोटे छोटे नवस पुर्ण केले नाहित म्हणुन राग धरुन बसलो असतो, छोट्या छोट्या अमिषांनी प्रसन्न झालो असतो, ’असं कर नाहीतर मी जेवणार नाही... झोपणार नाही...’ अशा धमक्यांना घाबरलो असतो तर माझ्यात आणि या माणसांत फरक काय? पण कलियुगातला हा माणुस चंचलच फार! स्वत:च्या श्रद्धेशीही फार काळ प्रामाणिक राहणे याला जमत नाही. म्हणुनच याच्याशी वागताना जरा वेगळी पद्धत अवलंबावी लागते.’

पार्वती ओशाळुन म्हणाली - ’पटले मला तुमचे!! हा ब्राम्हण एवढा कृतघ्न निघेल असे वाटले नव्हते. पण मग तरीही एक प्रश्न उरतोच. लायकी नसणार्‍या अशा कित्येकांना तुम्ही भरभरुन दिल्याची उदाहरणे आहेत. तुमच्या नावाचा बाजार करुनही माणुस श्रीमंत होतो. पैशाने मिळणारे सर्व वैभव निःसंकोचपणे उपभोगतो. चुकिच्या मार्गाने घरात घेतलेली लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असल्यासारखी दिसते. ज्यांच्या उरावर पाय देउन हे मोठे होतात त्यांचे तळतळाटही जणु यांना लागत नाहीत. ते राजकारणी पहा... ते सावकार पहा... ते कारखानदार पहा... या सर्वांची काय लायकी? तरी हे किती सुखात दिसतात! तुम्ही म्हणता - लायकीपेक्षा कमी किंवा योग्यतेपेक्षा जास्त तुम्ही कुणालाही काहिही कधीही देत नाही. पण मग हे कसे?’

भगवंत गंभीर होउन पार्वतीला म्हणाले - ’अगं सुखाची व्याख्या तुही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच कराविस? तु म्हटल्याप्रमाणे मी या ब्राम्हणाला सुखी केले आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरे आता हा ब्राम्हणच देईल. हा खेळ आता आपण असाच चालु ठेऊ. बघ तुच आता पुढे काय घडते ते.’
______________________

इथे अमुक-तमुक नोकरीतुन स्वेच्छानिवृत्ती घेउन, अमकी-तमकी अन् मुला-सुनेसोबत मुलाच्याच बंगल्यात सुखासीन आयुष्य उपभोगत होता. हे सर्व वैभव माझ्यामुळे! माझ्यामुळे मुले शिकली. माझ्यामुळे त्यांना उत्तम जोडीदार मिळाले. माझ्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले. माझ्यामुळे घराने हे वैभवाचे, समृद्धीचे दिवस पाहिले... असे म्हणत तो स्वतःचीच पाठ थोपटत राहीला. अमकी-तमकीच्या मनावरही हिच समज कोरली गेली. मुलांनाही वाटु लागले - ’हे सर्व आई-बाबांनी देवाचे इतकी वर्ष जे केले, अजुनही जे करत आहेत... त्याचे फळ. हे कुळाचार, ही व्रते, ही उपासना हे सर्व जर बंद झाले तर आपले काही खरे नाही!’ अमुक-तमुक जणु त्या घराचा उद्धारकर्ता झाला!

हळु हळु भक्तीचे रुपांतर भीतीत कधी झाले ते कुणालाच कळले नाही. देवाचे असेच सर्व केले नाही तर हे वैभव नष्ट होईल याची भीती. एखादा नवस फेडला नाही तर काहितरी वाईट घडेल याची भीती. एखादा उपास मोडला तर घरावर अरिष्ट येईल याची भीती... हळु हळु ’भक्ती’ संपली... फक्त ’भीती’ उरली!!!

श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत झाले. साधनेचे रुपांतर थोतांडात झाले. कृतञतेचे रुपांतर अहंकारात झाले. आणि परिणामतः घरातल्या शांततेचे रुपांतर धुमसत्या असंतोषात, असुरक्षिततेत झाले. घरात सर्वकाही होते. पण ते कायम तसेच राहील का? हे वैभव अजुन वृद्धिंगत होईल का? - या चिंतेत घरातले सर्वजण दिवसरात्र वावरु लागले. घरी नव्याने आलेली सुन नव्या-आधुनिक विचारांची! तिला घरातले हे कर्म-कांड खपेना. नव्या जमान्यात वावरणार्‍या आपल्या पतीनेही याच समजुतींना मान्यता द्यावी हे तीला रुचेना. पतीची समजुत पटेना तशी ती आतल्या आत घुसमटू लागली. घरापासुन, नवर्‍यापासुन तुटू लागली. आपल्या घरातल्या रुढी-परंपरांना आपली बायको मान देत नाही असे वाटुन मुलालाही असुक्षित वाटू लागले. पत्नीचा त्याला राग येऊ लागला. पती-पत्नीत असंतोषाची एक अभेद्य भिंत उभी रहात गेली.

सततच्या उपास-तापासांनी, व्रत-वैकल्यांनी अमकी-तमकीची तब्येत ढासळत गेली. औषध-पाण्यावर, डॉक्टर-वैद्यांवर पैसे खर्च होऊ लागले. आधी उपवासांमुळे खाता येत नव्हते तेच अन्न आता पथ्य-पाण्यामुळे खाता येईना. भोवती सुखाच्या राशी होत्या पण त्याचा उपभोग घेता येईना. नोकरी सोडुन अमुक-तमुकही रिकामा झाला. देव-देव सोडुन त्याला इतर काहीच सुचेना. आपल्यानंतर हे कुळाचार कोण पाळील हि चिंता त्याला ग्रासू लागली. नोकरी करुन कमावण्यार्‍या सुनेवर त्याला रितीरिवाज लादता येईना. वयानुरूप त्याच्याच्यानेही सारे काही होईना तेव्हा हे श्रेय आपल्या हातुन जाते की काय या विचाराने तो मनोमन अस्वस्थ होऊ लागला. हतबल दिसू लागला.

येणारे जाणारे अजुनही घराचे पालटलेले दिवस आणि वृद्धिंगत होत जाणारे वैभव पाहुन हेवा करायचे. अमुक-तमुकला सुखी होण्यासाठी काय करावे असा सल्ला विचारयचे. आणि अमुक-तमुकही ताठ मानेने आपले कर्तुत्व सांगायचा. निरनिराळ्या व्रतांचे वगैरे महत्त्व कथन करायचा. म्हणायचा - ’तुम्हीही माझ्यासारखे देवाचे सर्व करा. देव तुम्हाला माझ्यासारखेच सुखी करील!!’

पण प्रत्यक्षात त्या घरात कुणीही सुखी नव्हते हे त्या वास्तुपुरुषाला सोडुन इतर कुणालाही ठाऊक नव्हते!!
___________________________

आता हसणारी देवी पार्वती होती. शंकरांनी विचारले - ’का हसलीस?’

पार्वती मंद स्मित करीत उद्गारली - ’भगवन्, सुखाची खरी व्याख्या उमगली मला. मी तुमच्याकडे या ब्राम्हणासाठी सुख मागितले. पण सुख म्हणजे काय तेही मीच ठरवले. तेही माणसाच्या चालीवर! हे जग मला आदिशक्ती, आदिमाया म्हणुन ओळखतं. पण माझेही विचार स्थानभ्रष्ट होऊ शकतात हे उमजुन गंमत वाटली. मला क्षमा करावी.’

भगवंत म्हणाले - ’देवी, तु जगन्माता आहेस. या विश्वातल्या प्रत्येकाविषयी तुला मातेप्रमाणे कणव वाटणे साहजिक आहे. पण आता लक्षात आले न तुझ्या? तु ज्यांना मगाशी लायकी नसलेले, निर्ढावलेले, निर्लज्ज म्हणालीस; ती माणसे अशीच घडतात. आणि मी त्यांच्या इच्छा पुर्ण करतो ते त्यांचे फाजिल लाड पुरवण्यासाठी नाही! त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देण्याची ती माझी पद्धत आहे. बसल्या जागी सर्व देउन मी त्यांना पंगु करतो. चुकीच्या मार्गाने आलेले धन त्यांच्यासाठी कधीही न सुटणारे विटाळ घेऊन येते. त्यांच्याही नकळत ही माणसे स्वतःच स्वतःच्या अधःपतनाचे कारण बनतात!! स्वतःचा विनाश स्वतःच ओढवून घेतात. माझे काम सोपे करतात.’

पार्वती नतमस्तक होऊन म्हणाली, ’मानले तुमच्या देवपणाला. पुन्हा तुम्हाला जाब विचारताना विचार करिन. पण आता या ब्राम्हणाचे काय करायचे? माझ्या हट्टापायी या बिचार्‍याच्या सुखांचा बळी गेला.’

भगवंत हसुन बोलले - ’त्याची काळजी करु नकोस देवी. ते त्याचेही प्राक्तनच होते. आपण आता निघु. पुढची कामे करायला हवीत ना?’

एक्मेकांचा हात हाती घेउन शंकर-पार्वती मार्गस्थ झाले तेव्हा त्यांच्यासाठी फक्त काही क्षणांचा विरंगुळा झाला होता. पृथ्वीवर मात्र कित्येक वर्ष उलटुन गेली होती....
________________________________

अमुक-तमुक आणि अमकी-तमकी अजुनही जमेल तसे देवा-धर्माचे करत असतात. अपरिहार्य असे बरेच बदल त्यांनीही स्वीकारले आहेत. स्वतःच्या विचारांशी मात्र तडजोड करायला अजुनही त्यांची तयारी नाही.

अमुक-तमुकचा मुलगा आता रोज सकाळी निवांत उठतो. बायकोने दिलेला चहा चवी-चवीने पितो. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना नियमितपणे न विसरता चुकचुकतो आणि चेहरा विषण्ण करतो. मग तो ’शुचिर्भूत’ होतो. म्हणजे स्नान करतो... वगैरे वगैरे.

आणि मग सुरू होते त्याची देवपूजा!!

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ(?) संपुर्ण!!!
_________________________________________

- मुग्धमानसी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना!!!

मयुरा, तुमची कृपा आहे.... Happy

Happy

हळु हळु भक्तीचे रुपांतर भीतीत कधी झाले ते कुणालाच कळले नाही.>>>>> मस्त लिहिलंय...

"ओ माय गॉड" चित्रपटात हेच नेमकं सांगितलंय - दीज आर ऑल गॉड फिअरिंग पीपल, नॉट गॉड लव्हिंग.... Happy

Pages