मासे ४०) कान्टा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 November, 2012 - 13:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कान्टांचे २ वाटे
लसूण पाकळ्या १५-२०
२ चमचे मसाला
अर्धा चमचा हळद
लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२ मिरच्या
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

क्रमवार पाककृती: 

कान्टांची खवले, शेपुट व पोटातील घाण काढुन टाकावी व कान्टा तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
भांडे तापवून त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर लगेच हळद, मसाला व चिंचेचा कोळ घालायचा. मग त्यात साफ केलेल्या कांन्टा व मिठ घालायचे. शिजू लागले की एकदा हलक्या हाताने ढवळायचे. जोरात ढवळल्याने त्या तुटतात. ५-७ मिनिटे शिजले की त्यावर मोडलेल्या २ मिरच्या व चिरलेली कोथिंबीर कालून १ मिनिट ठेवून गॅस बंद करायचा. चविला अप्रतिम लागतात.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

कान्टां हे समुद्रातील मासे. आकाराने साधारण बोटाएवढेच असतात. ह्यांचा सिझन असतो. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये भरपूर प्रमाणात हे मासे मिळतात. हे मासे काही प्रमाणात काटेरीच असतात पण खुप चविष्ट असतात.

ह्यांचे वरील प्रमाणे सुकेच जास्त चांगल्या लागतात.

मसाल्या ऐवजी १ चमचा तिखट वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काटेवाले मासे खायला भ्या वाटतं Happy जागू, तुझ्याकडून केवढी माहिती मिळतेय. नाहीतर आमची धाव पापलेट, कोलंबी, सुरमई, रावसपर्यंतच !

हे "बोय" सारखे दिसतात का गं? पण बोय खाडीचे असतात नं?

अवांतर तुझी आणि माझ्या आईची करणी एकच दिसतेय.....तिची बोयची पद्धत अशीच आहे...
माझा प्रोब्लेम म्हणजे मी हे असे मासे आणु कुठून.. आता खरं तर मला प्रचंड मांदेली खाविशी वाटताहेत पण असो...ती लिस्टमध्येच ठेवते....
जागू मस्त रेसिपी Happy

मस्त रेसिपी ! दिवाळीच्या गोड गोड पदार्थांनंतर असे काहीतरी हवेच.....खायला मिळाले नाही तरी वाचायला...वेका सारखाच माझा प्रोब्लेम.......मासे कुठुन आणायचे??? कोरिअन वाल्याकडे जाणारच या आठवड्यात.

बाबु साध्या पण नाय मिळत हे लिहिलंच पाहिजेल का? जले पे नमक छिडको ...प्लिज आता कुणी कुठल्याही माशाचा फोर्‍टो बिटो टाकू नका Wink

जागू, मस्तच. माझ्या सासरी गावी गेल्यावर हे मासे खाणे म्हणजे एक उत्सव असतो. गेल्या शिम्ग्याला गावावरून खास घरच्यान्साठी हे मासे शिजवून पाठवले होते....माझ्या घरातल्या सीनीअर्स चा 'कान्टे मासा' हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

अहाहा .. माझा सर्वात आवडता मासा. याचे काटे काढत बसणे अक्षरशः मुर्खपणाचे ठरते त्यामुळे सरळ संपूर्ण खावेत. घासाला एक व अधे-मधे व शेवटी थोडे असे एका वेळी ५० वगैरे सुद्धा खाउन होतात.. खुपच चविष्ट ....

छानच रेसिपी !
सिंधुदुर्गात या माशाला 'पेडवे' म्हणतात. जरा मोठे असतील तर 'तारल्या'. << ह्यांचे वरील प्रमाणे सुकेच जास्त चांगल्या लागतात. >> १००% सहमत. गरम भाकरीबरोबर अफलातून काँबिनेशन ! [ सिंधुदुर्गात यात 'त्रिफळं' किंवा ' हळदीचीं पानं'ही कांहीं घरांत वापरतात.] रत्नागिरीतही मोसमात मस्त कांटं मिळतात. हा मासा फारच नाजूक असल्याने लांबून ट्रकने आल्यास ताजेपणा टीकत नाही व त्याची गंमतही चाखता नाही येत .
<< मी पण काटेरी मासे फार खात नाही. >> आजच इंग्लंडचा यशस्वी फलंदाज कूक [ ह्या धाग्यावर समर्पक नांव !] याने फिरकी गोलंदाजी खेळण्याबाबत इंग्लीश फलंदाजांच्या असहायतेबद्दल जें विधान केलंय तें बदल करून इथंही लागू पडतं - [ फिरकी खेळण्यासारखंच ] कांटेरी मासे खाण्यासाठीचं तंत्र मर्यादित असणं ही दुय्यम बाब आहे; त्याविषयीच्या भितीचा पगडा मनावर असणं हा खरा अडथळा आहे ! Wink
जागूजी, धन्यवाद.

जागू!
कांटा बघायचे तरी सुख दिल्याबद्दल धन्यवाद.
ह्या माशातले काटे अतिनाजुक असतात. मधला ़काटा क्वचित काढायचा नाहितर बाकी सरळ चावत जायचं.
अप्रतिम चव. स्वस्तात मस्त..

अगो, सेनापती, विद्या, बागुलबुवा, श्री, रचनाशिल्प, अवल, सामी, सोनू, साती धन्यवाद.

वेका बोय वेगळे.

झंपी भाऊ म्हणतात त्याप्रमाणे ही तारलीच असावीत. पण आमच्याकडे तारली मोठी येतात आणि ह्या कान्टा अगदी बोटाच्या आकाराएवढ्या.

भाग्यश्री उद्याच टाकते तुमच्यासाठी सुकी करंदी किंवा तेंडली. Happy

भाऊ छान माहीती दिलीत.

तारली काय ही?? मी तारली आणि पेडवे दोघांचेही भरपुर कौतुक ऐकलेय, हे मासे खाल्लेत देखिल पण स्वतः कधी बनवले नसल्याने मला हे मासे ओळखता येत नाहीत. पण नेहमी अख्खेच पाहिलेत त्यामुळे हेच असावेत.

खरे तर फोटो पाहिल्यावर मला गावातल्या नदीत मिळणा-या माशांची आठवण झाली. तेही बोटाएवढेच असतात आणि वर फोटोत आहेत तसेच दिसतात. त्यांचीही चव अफलातुन असते. पण अर्थात ती डेवलप करावी लागते. मुंबईतल्या फक्त हलवा आणि पापलेटची ओळख असण-यांना त्याची चव लगेच कळणार नाही.

जागूबै, एवढ्या धामधुमीतही बरा वेळ मिळतो तुम्हाला... Happy

हे पेडवेच दिसतंत. तारले जरा फुगिर आसतंत आणी पेडये (हा कोकणातील उच्चार) चपटे. रविवारी गांवले, भरपूर आणि स्वस्त!!!

मी मालवणला, पेडवे हेच नाव ऐकलय.. जागू माशाचा आकार, सेमी मधे दिलास तर जास्त छान. किंवा फोटोत तूलनेसाठी, एखादी वस्तू ठेवत जा !

हो मालवणला गावी याला पेडवे च म्हणतात..कांटा हे नाव मी लग्नानंतर रत्नागीरी ला गावी पहिल्यांदा ऐकले. आई ला विचारल्यावर ती म्हणाली की आपल्याकडे याला पेडवे म्हणतात.

साधना पेडवे पण छान नाव आहे ना माश्याचे.

अखी, सारीका, भ्रमर, झंपी, धन्स.

सामी कदाचीत नेरूळ, बेलापुरला मिळतील.

दिनेशदा ह्यापुढे करेनच. ह्या फोटोचाही प्रयत्न करते.

नुतन तू चौकशी कर. अलिबाग मध्ये मिळत असतील.

जागू, कांटा माझ्या फेवरीटमध्ये आहेत. किती वर्ष झाली खाऊन. ह्यात मध्ये एक काटा असतो. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा जशा दातात धरून खाता येतात तसे हे मासे खाता येतात. खायला अगदी सोप्पे!

आमच्याकडे कोणतीही मच्छी करताना आलं लसणाचं वाटण असतच. बाकी तुझी रेसिपी.

मी बोर्ली -दिवेआगरमधली. त्यामुळे तुझ्या बर्‍याचशा पोस्ट मला माझ्या लहानपणच्या आठवणी करून देतात.

जागु आज काण्टा मासा खाल्ला ग ...
कोळीणिला विचारले कूठला मासा आहे तिने सांगितल कांटा .. लगेच तु दिलेल्या रेसिपिची आठवण झाली ... अगदी तोर्‍आत सांगितल मला माहित आहे हा मासा आणि रेसीपी पण ..
काण्टा मासा मला बांगडे सारखा वाटला .. थोडासा तुपकट लागत होता धुतांना ..
चव व मास बांगडे सारखा वाटला...

कान्टा हा माझा सर्वात आवडता तर बांगडा हा सर्वात नावडता मासा आहे. दोन्ही सारखे लागतात असे वाचून वाईट वाटले . .... असो .. 

मला मासे बद्दल इतकी माहिती नाही ... मी प्रथमच कान्टा खाल्ला .. कोळीण पण म्हणत होती की बांगडा सारखा आहे ... कदाचीत खाउन खाउन मला फरक जास्त समजेल ..

Pages