खोटी/ फेक/ भाकड, hoax विपत्रे, समस, दुवे इ.

Submitted by निंबुडा on 9 November, 2012 - 04:17

कॉर्पोरेट क्षेत्रात नव्यानेच आल्यानंतर इंटरनेट ची कायमवेळ सुविधा (अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्स वगळून) आणि नवनवीन मेल्स ह्यांचे प्रचंड आकर्षण/ कुतूहल वाटत असे. आपल्याला आलेले प्रत्येक ढकलपत्र (forwarded email) आपल्या असंख्य मित्र-मैत्रिणींना त्याच पद्धतीने पुढे पाठविण्यात फार धन्यता वाटत असे.

कामाच्या क्षेत्रात बराच काळ स्थिरावल्यानंतर लक्षात आले की तेव्हा आपल्याला नवीन/ फ्रेश वाटणारी जी विपत्रे आपण अशी पुढे ढकलत होतो, तीच आपल्या ज्युनियर्स कडून पुन्हा नव्याने आपल्याला मिळत आहेत. उदा. नॅशनल गीओग्राफिक चॅनेल ने अमुक एका वर्षी बेस्ट ठरविलेले वाईल्ड लाईफ ह्या विषयावरील फोटो हा मेल जवळपास प्रत्येक वर्षी सब्जेक्ट लाईन मधील फक्त साल बदलून नव्याने येतो. Proud आता तर संबंधित मेल करणार्या/री ला उलट टपाली उत्तर देणाचाही ही कंटाळा केला जातो की "जुना झाला हा मेल आता!" किंवा "शिळी झाली ही बातमी आता!"

तीच गत अजून अनेक प्रकारच्या मेल्स ची उदा:
१) एक मेल असा आहे की ज्यात नवर्‍याच्या, बाळाच्या इ. ऑपरेशन साठी मदत म्हणून अमुक एक संस्था आर्थिक मदत करणार असल्याचा उल्लेख केलेला असतो. आणि हा मेल जमेल तितक्यांना फॉरवर्ड करा म्हणून कळकळीची विनंती केली असते. हॉस्पिटलच्या शय्येवरील बाळाचा/ संबंधित व्यक्तीचा हृदयद्रावक फोटो वगैरे सोबत दिलेला असतो. बर्‍याच जणांना वाटते की आपल्या पाकिटातले काही जातेय का? मग काय हरकत आहे, हा मेल नुसता फॉरवर्ड करायला? असे लोक मग भारंभार लोकांना तो इ-मेल फॉर्वर्ड करतात. (बरेच जण तर सर्व मेल आयडीज् ना मेलच्या बीसीसी (bcc) टाकण्याचीही दक्षता घेत नाहीत. Sad ). मग एकाने तरी "रीप्लाय ऑल" केले तरी संवादाचा, प्रश्नोत्तरांचा अखंड ओघ चालू होतो - कुणीतरी एका-दोघांनी सांगेस्तोवर की "रीप्लाय ऑल" करू नका किंवा निदान "मला ह्यातून वगळा"!

२) दुसरा एक मेल/समस असतो ज्यात अमुक मेल अमुक इतक्या लोकांना किंवा त्या पेक्षा जास्त लोकांना पाठविला की अमुक दिवसांत अमुक लाभ निश्चितपणे होणार ह्याची हमी दिलेली असते. न केल्यास वाईट घडेल म्हणून धमकी दिलेली असते. अगदी मॅनेजर लेव्हलच्या लोकांनाही हे असले मेल्स/ समस फॉरवर्ड करताना मी अनुभवले आहे. Sad इतक्या भाकडकथांवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो?

३) अजून एका प्रकारात प्रमुख बँक्स च्या नावाने फेक साईट्स बनवून त्या द्वारे मेल पाठवून पर्सनल माहिती मागवलेली असते.

४) कुरकुरे, मॅगी ह्या व इतर कित्येक प्रकारच्या प्रॉडकट्स मध्ये घातक घटक असल्याचा दावा करणारे मेल्स, भारतातील बरीचशी औषधे अमेरिकेने बॅन ठरवलेली आहेत तरी भारतात वापरली जात आहेत, अशा अर्थाचे मेल्स अशा कितीतरी मेल्स च्या बाबतीत खरे-खोटे ठरविणेही अवघड होऊन बसते.

५) एका मेल मध्ये तर चक्क र्‍हीस व्हिदरस्पूओन ह्या हॉलिवूडच्या नटीचे फोटो देऊन हे सोनिया गांधीचे तरुणपणाचे फोटो आहेत अशी चक्क भलामण करण्यात आली होती. आता बोला! :फीदी:

६) एका मेल मध्ये एका प्रसिद्ध लॅपटॉपच्या कंपनी चे नाव देऊन त्यांची एक ऑनलाईन स्कीम चालू असल्याचे लिहिलेले असते. व हा मेल जितके लोक अमुक इतक्या संख्येला फॉरवर्ड करतील तितक्यांना लकी ड्रॉ साठी कंसिडर केले जाईल व लकी ड्रॉ लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप मिळेल अशा थापा मारलेल्या असतात. बरं अश्या मेल्स मध्ये त्या व्यक्तीचे काही डीटेल्स (पत्ता, फोन नंबर इ.) काहीच मागितलेले नसते किंवा संबंधित कंपनीचे चे ही काही डीटेल्स दिलेले नसतात. नुसतेच आपले "मेल फॉरवर्ड करा" ही विनंती!

वर नमूद केलेल्या १ नं च्या प्रकारचा एका स्त्रीच्या नावाने पाठविलेला मेल मला गेली ८ वर्षे नित्यनेमाने वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळालेला आहे. अजून ही स्त्री ऑपरेशन साठी पैसेच गोळा करत बसली आहे? Uhoh तोच प्रकार नं. ६ मध्ये नमूद केलेल्या मेलचाही. त्या अमुक लॅपटॉप च्या कंपनीची तीच स्कीम अजूनही चालू आहे?

इथे एक मजेदार किस्सा आठवतोय. ट्रेन मध्ये २ स्त्रियांचा संवाद चालू होता. माझ्याच वयाच्या असाव्यात! त्यातली एक दुसरीला सांगत होती की नं. ६ च्या प्रकारचा एक मेल तिला आला आहे व अमुक एका कंपनीची अशी स्कीम चालू आहे. लकी ड्रॉ मध्ये आपला नंबर लागला तर फ्री मध्ये लॅपटॉप लागेल! दुसरी स्त्री ही कमालीची खुश व आश्चर्यचकित होऊन ऐकत होती व 'मलाही तो मेल फॉरवर्ड कर' म्हणून तिने २-३ दा पहिलीला सांगितले. मी न राहवून त्यांच्या संभाषणामध्ये भाग घेतला आणि विनंती केली की कृपया असले फेक मेल्स पुढे पाठवू नका. मी त्यांना पुढील प्रश्न विचारले -

१. त्या अमुक एका कंपनीला कसे कळणार आहे की अमुक इतक्या व्यक्तींकडे हा मेल फॉरवर्ड करण्यात आलेला आहे?

२. तुम्हाला आलेल्या मूळ मेल मध्ये त्या कंपनीच्या वेब साईटचा उल्लेख किंवा कुणा कंपनीच्या कुणा रीप्रेझेन्टेटिव्ह चा संपर्क क्रमांक इ. नमूद केले होते का? की जेणेकरून ह्या स्कीम ची/ बातमीची शहानिशा करून घेता येईल? किंवा निदान असा एखादा मेल आयडी की जो तुम्ही असले मेल्स फॉरवर्ड करताना सीसी (cc) मध्ये ठेवण्याची विनंती केलेली असते की जेणेकरून किती वेळा व कुणाकुणाकडून तो मेल फॉरवर्ड झाला ह्याचा ट्रॅक त्या कंपनीला ठेवता येईल?

३. जर एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या मेल्स आयडीने वेगवेगळ्या लोकांना तोच मेल फॉरवर्ड केला तर त्या व्यक्तीला तितक्यांदा ग्राह्य धरणार का तुमची ही तथाकथित कंपनी?

तर ह्यावर त्यांच्याकडे काहीही उत्तरे नव्हती. पहिल्या स्त्रीने "हे सर्व मी काही वाचले नाही. मला मेल आला. स्कीम बघून मी लगेच फॉरवर्ड केला. फुकट कुणी काही देणार असेल, तर नुसते एका क्लिक ने फॉरवर्ड करायला काय प्रॉब्लेम आहे?" असे उत्तर दिले. नंतर दोघी आपापसांत हळू आवाजात खुसपुसत होत्या व एकंदरीत "कुणाला फुकट काही मिळण्याची शक्यता दिसली की काही जणांच्या पोटात दुखते!" अशा आशयाचा त्यांना एकंदरीत सूर व नूर दिसला! Uhoh

अनुभानंतर अश्या मेल्स मधला फेकपणा समजत जातो. आपल्याला माहीत असलेल्या/कळलेल्या फेक विपत्रांचा/ साईट्स/ मेसेजेस चा इथे उल्लेख करुया! त्याचप्रमाणे ह्याला आळा घालण्यासाठी करता येणार्‍या उपायांचीही चर्चा करुया.
(मी वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या परीने मी जागरुकतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी फरक होणार नाही. पण कालांतराने तर त्या स्त्रीला समजलेच असेल की तिने फॉरवर्ड केल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची पोचपावती मिळालेली नाही किंवा तिला/ वा तिच्या ओळखीत कुणालाही असला फेक लकी ड्रॉ लागलेला नाही!)

तळटीपः कृपया आंतर्जालावरील कुठल्याही फेक/ फिशींग साईट च्या लिंक्स इथे देऊया नको. नुसता उल्लेख करू या. कुणी ह्या धाग्यावरून चुकून तिकडे रीडायरेक्ट व्हायला नको.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख कळकळीने लिहीला आहे. हे असे इमेल, ढकलपत्रे वाचायची एन्जॉय करुन त्यांना कचर्‍याची टोपली दाखवायची हाच मार्ग सोपा. गामपै यांनी जो स्पॅम बेटिंग प्रकार सांगीतला आहे तोही आहे भन्नाट पण त्याकरता वेळ हवा.

मी clg मध्ये असताना email अली होती, तुमचं tata मध्ये secetion झालं आहे, 11 हजार पाठवा, अमुक लाखांचं पॅकेज वगैरे
मला तेव्हा माहीत नव्हतं हे स्पॅम असत, आनंदाने दादाला कॉल लावून सांगितलं, तो म्हणे पूर्ण mail वाचून दाखव.
मजकूर ऐकून त्याने हे कसं खोटं असतं हे समजावून सांगितलं

खोट्या sms पायी मी 10 rs गमावले आहेत, nokia1010 वापरताना

Pages