सोड्याची खिचडी

Submitted by अवल on 7 November, 2012 - 00:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सोडे एक मूठ ( सोडे म्हणजे वाळवलेल्या मोठ्या कोलंब्या. मुरुड, अलिबाग, म्हसाळ इथले सोडे प्रसिद्ध आहेत. मला म्हसाळ इथले जास्त आवडतात. )
बासमती तुकडा ( किंवा जो आवडत असेल तो सुटा होणारा तांदूळ ) दोन वाट्या
सुके खोबरे किसलेले एक मूठ
कांदे उभे चिरून दोन
लसून ८ ते १० पाकळ्या
एक हिरवी मिरची
५-६ लवंगा , दोन दालचिनीचे तुकडे
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
तेल
ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू वरून
तळलेले पोह्याचे पापड अन गव्हाच्या कुरडया सोबतीसाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम सोडे पाण्यात भिजत घालावेत. ५-१० मिनिटांनी सोडे जरा भिजतात. मग त्याचे कात्रीने/सुरीने दोन तुकडे करावेत. पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत.
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
चिरलेला उभा कांदा कढईत दोन चमचे तेलावर; तपकिरी होई पर्यंत परतून घ्यावा. तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावा.
पुन्हा एक चमचा तेल कढईत घेऊन त्यात किसलेले सुके खोबरे, लवंगा, दालाचीनीचा एक तुकडा, ६-७ लसून पाकळ्या हे सगळे लालसर रंगावर परतून घ्यावे. आता हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावे. हे वाटण छान गुळगुळीत वाटून घ्यावे.
सोडे पाण्यातून काढून निथळत ठेवा.
आता एका भांड्यात अधाणासाठी चार वाट्या पाणी गरम करत ठेवा.
दुसरीकडे लगडीत (जाड बुडाच्या पसरटत भांड्यात) ५-६ चमचे तेल घेऊन ती आचेवर ठेवा. आच बारीक ठेवा. तेल गरम झाले कि त्यात उरलेल्या लसणाच्या पाकळ्या चेमटून टाका. लसून छान काळा झाला की त्यात एक दालाचीनिचा तुकडा टाका. आता लगेच सोडे फोडणीत टाका. आच मध्यम ठेवा. २-४ मिनिटं परता. सोड्याचा घमघमाट पसरेल. काहींना हा वास सहन होत नाही, आमच्या पोटात मात्र भुकेने खड्डा पडू लागतो Happy
सोडे छान परतले कि त्यात तांदूळ टाका. पुन्हा ५-७ मिनिटं परता.
आता त्यात हळद, तिखट टाका. पुन्हा २ मिनिटं परतावा.
आता त्यात वाटण टाका. ७-८ मिनिटं परता. सगळ्याला तेल सुटायला हवे.
आता आधाणाचे पाणी यात टाका. लागले तर अजून पाणी घाला. एक उकळी आली कि त्यात चवीपुरते मीठ टाका. आच मंद करा. खिचडीला भोकं पडू लागली कि झाकण ठेवा. ८-१० मिनिटं छान शिजू द्या.
वाढताना खिचडीची मूड, त्यावर ओलं खोबरं, त्यावर कोथिंबीर अन त्यावर साजूक तूप वाढा, सोबत लिंबाची फोड ठेवा. सोबत तळलेले पोह्याचे पापड, गव्हाच्या कुरडया, वा ! मनसोक्त खा सोड्याची खिचडी.

(फोटो उद्या टाकते )

वाढणी/प्रमाण: 
चौघांना पुरावी
अधिक टिपा: 

ज्यांना सुक्या माशांची सवय नाही. त्यांनी सोडे परतत असताना इतर दारं, खिडक्या उघडी ठेवावीत. एक्झॉस्ट चालू ठेवावा. मुख्य दार मात्र आवर्जून बंद ठेवा. कारण न खाणा-यांना हा असा भयाण वास तुमच्या घरातून येतो हे कळणार नाही अन खाणारे लोक तुमच्याकडे जेवायला टपकणार नाहीत Happy भरपेट जेवणं झाल्यावर निवांत दुपारच्या गप्पांत " काय भयाण वास पसरला होता ना सकाळी" यावर सुखाने चर्चा करा Wink
खास नंदनच्या फर्माईशी वरून

माहितीचा स्रोत: 
खास सी. के. पी. पदार्थ
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यप्प Happy येतेस?
बापरे, कित्ती माबोकर येतील आता :घाबरलेली बाहुली : Proud
श्री, सोड्याची खिचडी रे, उपास सोडायची खिचडी नव्हे Biggrin

यम्म. मस्तच रेसीपी. Happy
वासाबद्दल अनुमोदन. Happy
कालच सुकी मच्छी आणलीये. सोडे पण. खिचडी करणार.

सुपर्ब मला सोड्याचे कालवण वांगी-बटाटे घालुन केलेलं फार आवडतं.
आता हे ट्राय करेन बहुतेक. आम्ही सातपाटी-उसरणी आणि डहाणुहुन सुकी मच्छी आणतो.

सोडे आहेत आणि करायला आईपण आली आहे.
प्रि दिवाळी धमाका करूनच टाकते.

तृष्णा, कालच कोलिम, वांगं बटाटा खाऊन झालंय. अगदी फेवरिट आहे माझं.

वा........... सोडे माझे खास आवडीचे आणि त्याची खिचडी तर स्वर्गच.. मी आपली नेहमीची साधी खिचडी करायचे, आता कायस्थी स्पेशल करुन पाहिन.

रेसिपी मस्त लिहिलीय. वाचताना मला मीच खिचडी बनवतेय असा भास होत होता, शेवटी सुखाने खा म्हटल्यावर भानावर आले... पोटात भुक लागली असताना असले भास होणे किती भयाण आहे हे ज्याचे त्यालाच माहित Happy

झ का स!
सवय नसेल तर सोड्यांचा वास सहन होत नाही, पण एकदा का नाक (आणि जीभ) त्याला सरावले की ही खिचडी शिजताना जो घमघमाट सुटतो तो अगदी 'आमोद सुनासि आले'च्या जातकुळीतला Happy

>>> वाढताना खिचडीची मूड, त्यावर ओलं खोबरं, त्यावर कोथिंबीर अन त्यावर साजूक तूप वाढा, सोबत लिंबाची फोड ठेवा. सोबत तळलेले पोह्याचे पापड, गव्हाच्या कुरडया, वा ! मनसोक्त खा सोड्याची खिचडी.
---- क्या बात है!

अवल,
रेसिपी फार सुरेख लिहिली आहेस तू.
पण फोटो तितका इंप्रेसिव्ह नाही वाटला. मूद का केलिस ती? Uhoh
सोडे का काय ते दिसत नाहियेत त्यात. निदान पाहिले तरी असते कसे दिसतात ते. असो... Happy

ताजी कोलंबी आणि सोड्याच्या चवीत काय फरक असतो ? सोड्याची खिचडी खाल्ली नाहीये पण वर्णनं खूप वाचलीयंत. कृती तोंपासु आहे Happy

अवलच्या मांसाहारी/ मत्स्याहारी कृती नेहेमीच जागुसारख्याच फर्मास असतात. ( पण मी फकस्त वाचते, कारण शाकाहारी ).:फिदी:

अवांतरः लपंडाव मधला प्रसंग आठवला.:फिदी:

विक्रम गोखले शेजारी वंदना गुप्तेकडे ही खिचडी खाऊन येतो. नवर्‍याला खूश पाहुन सविता प्रभुणे ( बायको) विचारते, तिकडे जेवायला काय होते? हा म्हणतो सोड्याची खिचडी ! तर ती म्हणजे कशी बनवली? त्यात पाण्या ऐवजी सोडा घातला का प्यायचा ? मग ती फसफसली कशी नाही? हा वैतागतो जाम.:फिदी:

इन्ना, ये Happy
हे भिजत घातलेले सोडे
1352271918438.jpg

कोलंबी पेक्षा जरा स्ट्राँग असतात सोडे. कोलंबीची खिचडी तळल्या मसाल्याची नसते. ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची एव्हढच असतं वाटणात. करते तीपण अन टाकते रेसिपी. रविवारपर्यंत थांबा Happy

दक्षिणा, अगं माझ्या लेकाला ओलं खोबरं अन कोथिंबीर आवडत नाही Sad त्यामुळे इंप्रेसिव्ह नाही आला फोटो . पण सोड्याच्या खिचडीची मूदच हवी Happy अन खाल्याशिवाय सोडे कसे लागतील?
रच्याकने काही जण अख्खे सोडे टाकतात. मग ते नीट दिसतात. पण मग ते जरा वातड लागतात. म्हणून मी दोन तुकडे करते. मूद घातल्यावर नाही दिसणार. सोप्प आहे जेवायला बसा, पहिल्या घासासाठी मूद मोडलीत की दिसेलच ना Wink
धन्यवाद टुनटुन Happy फसफसली कशी नाही Lol

>>काहींना हा वास सहन होत नाही, आमच्या पोटात मात्र भुकेने खड्डा पडू लागतो >> +१

अवल, तुझी पाकृ लिहायची स्टाइल आवडली!

अहाहा, नाव वाचून पोटात भुकेने खड्डा पडला.
खोबरं / कोथिंबीर , पोह्याचे पापड वाचताना तर इतकं पाणी सुटलं तोंडाला.

आता लगेच करायला हवी

अहाहा....पण आता सोडे कुठून आणायचे Uhoh
सोडे हा एकच सुका माशाचा प्रकार मला मनापासून आवडतो...सो ही खिचडी अतिप्रिय.....सोड्याचं आंबोशी घालून केलेलं आईच्या हातचं कालवण आणि फडफडीत भात....स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्र्प्प्प्प्प....

अवल आमच्या पोटात खड्डा पडतो ... ++++++

अवल, काय ग कसली आठवण करुन देतेस? खरच पोटात खड्डा पडला. गेल्या वर्षीपासुन सोडे खाल्ले नाहीत ग. आजकाल आमच्या इथे सोडे मिळणे बंद झाले आहेत. सर्व चायनीज, कोरिअन दुकाने पालथी घातली, पण नाही मिळाले सोडे. शेवटी सुकट घालुन वांगी केली. पण सोडे+वांगीची चव नाही आली. आणि आता ही सोड्याची खिचडी.... काय झाले असेल तुच विचार कर. नको ग इतके छळु आम्हांला...

एक्स्पिरिमेंट म्हणून करावी का? असा एक विचार मनात घोळतोय. पण तेव्हढ्यासाठी मुठभर सोडे (ते ही खात्रीने चांगले) कोण बरं देईल ते शोधायला हवं आधी.

Pages