'रतनगड' :सह्याद्रीचे आभुषण !

Submitted by Yo.Rocks on 5 November, 2012 - 21:32

पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता.. गणेशोत्सव, नवरात्री झाली.. नि आम्हाला वेध लागले पुढच्या ट्रेकचे.. खरे तर ऑक्टोबर हिट मध्ये ट्रेक करण्यासाठी नाक मुरडतोच.. पण संध्याकाळची थंड हवा जाणवू लागली नि साहाजिकच गडावरची रात्र आठवू लागली.. ही ओढ वाढत असतानाच विन्याने 'हरिश्चंद्रगड नाळीच्या वाटेने' या ट्रेकचा नारा सुरु केला.. नि मागे- पुढे करता करता दिवस ठरला.. २७-२८ ऑक्टोबर.. नेहमीच्या येणार्‍या मायबोलीकरांना कळवले.. Proud सगळे राजी झाले.. पण दोन दिवसातच 'ट्रेकमेटस इंडीया' ग्रुपने तिथे ट्रेकला जाण्याचा प्लॅन केल्याचे कळले.. नि असल्या वाटेत गर्दीमुळे खोळंबा नको म्हणत ट्रेकर्सचे पंढरपुर असलेल्या हरिश्चंद्रगड'चा ट्रेक रद्द केला.. आता कुठे ? खरेतर शुक्रवारची ईदची सुट्टी व मोठा विकेंड त्यामुळे सगळ्याच गडांवर कुठला ना कुठलातरी ग्रुप असणारच होता.. त्यातल्या त्यात कमी गर्दी असेल अश्याठिकाणी जायचे ठरले.. नि वासोटा, नागेश्वर करता करता 'रतनगड' ठरले ! मायबोली गँगची संख्या तब्बल ११ होती.. प्रत्यक्षात दौडले फक्त सातजण.. विन्या, इंद्रा, गिरिविहार, डेवील, नविन, रो.मा. व यो !

रोमाला शुक्रवारी ऑफीसला रात्रपाळी करणे आवश्यक असल्याने निघण्याची वेळ शनिवारी पहाटे ढकलली.. अगदी पहाटेपण त्याला निघता येणे शक्य नसल्याने नाईलाजास्तव सकाळची वेळ धरली.. ठरले एकदाचे.. कसार्‍याला ९.२० वाजता पोहोचणार्‍या ट्रेनने निघायचे.. कसार्‍याहून पुढील प्रवासासाठी सुन्याने वडाप आधीच ठरवून दिलेली.. स्वतःने वडाप ठरवली, पुण्याहून येणार होता खरा पण त्याच्या आजीचे नेमके त्याचदिवशी निधन झाले नि त्याने कर्जतवरूनच परतीचा मार्ग धरला.. Sad

यावेळच्या ट्रेकच्या वैशिष्ट्य असे होते की इंद्रा-गिरीच्या आज्ञेवरून सगळ्यांच्या सॅकला मॅटरुपी रॉकेट लावण्यात येणार होते..ह्या स्लिपिंग मॅटचे रॉकेट सॅकला लावताना सगळ्यांची पंचाईत झाली.. दमछाक झाली नि अजुन एक सांभाळण्याची जबाबदारी आली खरी.. पण झोपेचा बंदोबस्त झाला होता.. आता असली रॉकेट्स पाठीवर घेउन फिरणार म्हणजे जल्ला गर्दीमध्ये पण आमचा ग्रुप आकर्षणबिंदूच !

सो अशाच गर्दीतून आम्ही कसारा रेल्वेस्थानकातून बाहेर पडलो नि आधी बुक करुन ठेवलेल्या वडापवाल्याने आम्हाला सहज गाठले.. तीन चार जण टांगारु झाले नि वडापमध्ये पहिल्यांदाच अगदी सुटसुटीतपणे बसण्याची संधी मिळाली.. तरीपण भाडे-नुकसान भरपाई म्हणून गिरी, डेवील 'घोटी-घोटी' ओरडत होते.. Proud

गप्पाटप्पा चालू झाल्या.. पण अजुन पोटात काही ढकलले नव्हते.. नि काय खायचे यावर 'ऑमलेटपाव' हे एकमताने ठरले.. गाडी थेट रतनवाडीपर्यंत बुक केलेली पण मध्ये ठरल्याप्रमाणे शेंडीला नाश्त्यासाठी गाडी थांबली नि आम्हा भुक्कडलोकांची ताव मारण्याची शर्यत सुरु झाली..! रतनवाडीला जायचे तर शेंडीवरुन भंडारदरामार्गे बोटीने जाता येते.. पण आम्हाला शक्यतो तितके लवकर पोचायचे असल्याने बोटवाल्याची वाट बघा, भाडे ठरवा या झंझटीमध्ये न पडता थेट रतनवाडी गाठायचे होते..

रतनवाडीला दुपारी सुमारे बाराच्या टोळ्यास आमची मायबोली- टोळी पोहोचली.. नि एकदम धक्कादायक नजारा पहायला मिळाला.. काय तर पार्कींग जागा, प्रसाधन गृहे, सिमेंटच्या कमानी इति इति.. अगदी पर्यटनस्थळ.. हे सगळे ठिक पण त्यामुळे रतनवाडीचे मुख्य आकर्षण असलेले पुष्करणी तलाव कोमेजुन गेल्यागत भासत होते.. आतापर्यंत नेटवर पाहिलेल्या फोटोंमध्ये उठून दिसणारे अमृतेश्वर मंदीर व पुष्करणी तलाव सध्याच्या आधुनिकीकरणामध्ये लपले जात आहेत असे वाटत होते.. आमच्या टोळीतले इंद्रा, गिरी व रो.मा हे इथे आधी येउन गेलेले.. पण असा बदल बघून चाटच पडले.. आम्ही आलो तेव्हा बर्‍याच गाडयांची ये-जा सुरु होती.. नि कळून चुकले की आता हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध करण्यासाठी खटाटोप आहे.. पण असो येथील गावकर्‍यांना तेवढेच उपजिवीकेचे साधन..

रतनगड म्हटले की रतनवाडी हे पायथ्याचे गाव आलेच.. नि रतनवाडी म्हटले की हेमाडपंत बांधणीचे अतिशय प्राचीन असे 'अमृतेश्वर मंदीर' व जवळच असलेले सुंदर कोरीव कामाच्या बांधणीतले 'पुष्करणी तलाव' यांचा उल्लेख आलाच !

पुष्करणी तलाव.. इथे कोना-कोनांमध्ये भगवान विष्णूच्या मुर्ती आहेत.. शिवाय श्रीगणेश व शेषनागावरील विष्णू व लक्ष्मी यांच्या मुर्तीदेखील दिसतात.. सुबक कोरीवकाम.. आम्ही पोचलो तेव्हा पाणीही भरपुर होते.. पण स्वच्छ नव्हते..

प्रचि १: पुष्करणी तलाव

अमृतेश्वर मंदीर : पुष्करणी तलाव पाहून झाले नि साहाजिकच अमृतेश्वर मंदीराकडे वळालो.. अनेक शिल्पाकृतींचा मिलाफ व प्राचीन हेमाडपंती बांधणी बघायची असेल तर हे अमृतेश्वर मंदीर चुकवू नये असेच.. या मंदीराचा मुख्य दरवाजा हा मागच्या बाजूने आहे.. तेथून आत शिरले असता छोटेसे सभागृह नजरेस पडते.. तिथेच कोरीव खांब नजरेस पडतात.. मंदीराच्या समोरच्या बाजूने दोन पाषाणी नंदीच्या मुर्ती व एक त्रिशुळ ठेवलेले आहे.. गाभार्‍यात खालच्या बाजूस असलेले शिवलिंग पावसाळ्यात पाण्याखाली जाते..

प्रचि २: अमृतेश्वर मंदीर :

प्रचि ३: हेमाडपंती बांधणीचा नमुना

प्रचि ४: उत्कृष्ट शिल्पाकृती

भर उनात फोटो काढून झाले.. नि तिथेच एका धाब्यावर थोडक्यात जेवण उरकायचे ठरले.. इथे तीन चार ठिकाणी तंबू/गाडी टाकून खाण्याचे स्टॉल्स झाले आहेत.. मग चहा काय मिळेल.. भजी काय मिळेल.. नि पिठला भाकर काय मिळेल.. आम्ही तीसरा पर्याय निवडला.. नावाला दोनच प्लेट ऑर्डर झाल्या पण 'आणखीन एक' काय मात्र संपेना.. ट्रेक राहीला बाजूला नि सुरु होता पोटोबा..शेवटी मनावर ताबा ठेवत कसेबसे ते थोडक्यात जेवण थांबवले... तंबूच्या सावलीत बसून सुस्ती यायला वेळ लागला नाही..त्यात ते बाहेर चकाकणारे ऊन पाहून इथेच वामकुक्षी घेण्याचा मोह मात्र आवरेना..पण नाही 'आता आवरा' म्हणत पटापट सॅक चढवल्या नि ट्रेकारंभ झाला.. दुपारचे दिड वाजत आले होते.. जल्ला इतक्या उशीराने ट्रेक सुरु करण्याची पहिलीच वेळ... नि तळपते उन पाहून कसोटी लागणार वाटत होते..

रतनगडावर जाणार्‍या वाटेची सुरवात ही प्रवरा नदीच्या बाजूनेच होते.. प्रवरा नदीचा उगम ह्या रतनगडावरच म्हणे.. अगदी पाचेक मिनीटे चाललो असू नि क्षणात ढगाळ वातावरण झाले.. उनाचा त्रासच मिटला.. ! रतनगडाची कृपा म्हणायची.. उनच नाही मग उत्साह वाढणारच.. हाच फायदा उठवून शक्य तितके पटापट मार्गाक्रमण करु लागलो..

प्रचि ५: रतनगडावर उगम असणारी प्रवरा नदी व पार्श्वभूमीवर असणार्‍या रतनगडाचा पसारा.. नि एक टेमकाड डोकावतेय ते रतनगडाचा खुटा म्हणून ओळखले जाते.....

प्रचि ६: ढगाळलेले वातावरण व त्यात रतनगडाच्या मागे जाणारा सूर्यदेव.. त्यामुळे रतनगड आणि त्याचा खुटा यांची आकृती छानच उमटली होती..

नदीला ओलांडताना..
प्रचि ७:

बाजूला कात्राबाईच्या डोंगररांगची छबी पण खत्रीच वाटत होती..

प्रचि ८:

वाटले होते रतनगडची वाट म्हणजे नेहमीची ट्रेकींगची वाट असेल.. चढताना झाडाझुडूपांशी झटापटी करावी लागेल.. पण सगळे अंदाज फोल ठरले.. सुरवातीला नदीच्या बाजूने जाणारी वाट सोडली तर पुढे अगदी राजमार्ग.. अशीच वाट वासोटयाला जाताना आहे.. वाटेत जागोजागी दिशादर्शक बाण आढळतात..त्यामुळे हरवलात तर तुमचीच चुकी वा निष्काळजीपणा समजा.. एकदा चढाई सुरु झाली की दम काढणारे जेमतेम दोन तीन चढ आहेत.. तिथूनच एका छोटया मोकळ्या पठारावर आलो.. नि क्षणभर विश्रांती..

प्रचि ९:

इथून आतापर्यंतची केलेली चढाई लक्षात आली.. शिवाय समोर भंडारदराचा विस्तार नजरेला छोटाच दिसत होता.. सभोवतालचा परिसर तसा धुरकटच दिसत होता.. थंडीची जणू चाहूलच होती.. हिंवाळ्यात ट्रेक करायचे तर हीच मोठी अडचण असते.. दुरवरचा परिसर अस्पष्टच दिसतो.. पण ऑक्टोबरमध्ये असे वातावरण अनुभवत होतो.. त्यात अचानक रतनगडाच्या माथ्यावर ढगांची तातडीने सभा भरली... त्यांच्यातील चर्चाचे पडसाद ऐकू येउ लागले.. नि क्षणात टपोरे थेंब नभातून अगदी आरामात बरसू लागले... !! सभा चांगलीच पेटली असणार कारण एक-दोनदा लखलखाट सुद्धा झाला.. ! आमच्यासाठी सारे अनपेक्षितच घडत होते.. मध्यान्हानंतर ट्रेक सुरु करुनसुद्धा कडक ऊन लागलेच नव्हते.. नि आता चढाई करुन थोडा काय घाम फुटला तर टपोर्‍या गार थेंबांचा टिंब टिंब वर्षाव ! हे सगळे अनुकूल होते.. नि ही सभा फक्त रतनगडाच्या माथ्यावरच सुरु होती.. तरीपण मनात धाकधुक वाढली.. मोठी सर आली तर सारी पंचाईत होणार होती.. कुणाकडेच पावसाला सामोरे जाण्याची तयारी नव्हती.. तेव्हा लवकरात लवकर गुहा गाठण्याचे उद्दीष्ट ठेवले..

पण आज नशीब आमच्या बाजूनेच होते.. ढगांनी सभेचे ठिकाण बदलले नि अलंग-मदन-कुलंग-कळसुबाई या डोंगररांगेकडे सरकले.. तर इथे रतनगडचा खुटा नि बाजूची डोंगररांग पुन्हा सुर्यकिरणांनी उजाळून गेली..

प्रचि १०:

एव्हाना आम्ही जवळपास रतनगडाच्या माथ्याला टेकलो होतो.. नि त्याचे कारण अगदी वरती असणार्या लोखंडी शिडया.. पुर्वी इथेच बसवलेली शिडी तिच्या दुरावस्थेमुळे ट्रेकर्सलोकांमध्ये खूप प्रसिद्ध होती.. त्या शिडीमुळे म्हणे थ्रिलींग अनुभव घेता येत होता.. खासकरुन भर पावसात.. ! आता मात्र त्या जुन्या शिडीवरच नव्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे.. मार्ग अगदी सुकर करुन ठेवला आहे..

प्रचि ११ :डेविल, इंद्रा व सर्वात वरती विन्या..

प्रचि १२: पण काही म्हटले तरी शिडी खासच आहे.. आहे की नाही ते बघाच..

(जल्ला हा नविन जणू तोफच उचलून वरती चढतोय.. Proud )

ही शिडी चढून झाली लगेच दुसरी शिडी डोंगराच्या चिमणीत (अरुंद घळ ??) बसवलेली.. इथे मात्र आमच्यातील काहींनी प्राचीन कोरलेल्या दगडी पायर्यांचाच वापर केला.. कुठेतरी थोडेतरी थ्रिलचा आनंद मिळूदे.. Happy

प्रचि १२:

ह्या शिडीने वा पायर्यांनी वरती आलो की समोरच छोटा गणेश दरवाजा लागतो.. जिथे एका बाजूस लंबोदराची मुर्ती कोरलेली दिसते..

प्रचि १३:

इथून पुढे आलो की एका कडयाला रेलिंग लावले आहेत.. नि अगदी सहज चढून जाउ शकतो तिथेही अगदी दोन छोटया लोखंडी शिडया बसवलेल्या आहेत.. या शिडयांमुळे आता पर्यटक पण जरा थोडा घाम गाळून वरती आले तर सहज चढून जातील अशी सोय करण्यात आली आहे..

प्रचि १४: मायबोलीवरचा रोहीत एक मावळा.. गणेश दरवाज्याच्या बुरुजावर उभा..

प्रचि १५: शिडी पे शिडी !

या टप्यात आलो नि आपले पुर्वज स्वागतासाठी हजर झाले...

प्रचि १६:

शिडया पार करुन वरती आलो की एक वाट उजवीकडे हनुमान दरवाज्याकडे वळते तर दुसरी डावीकडे गुहेकडे जाते.. आधीच एक ट्रेकक्षितीजचा अठरा जणांचा ग्रुप आल्याचे कळले असल्याने जागा बुक करण्यासाठी गुहेच्या दिशेने गेलो.. इथे मात्र पदरी निराशा पडली.. ट्रेकक्षितीजचा ग्रुप नि अजुन एक सहाजणांचा वेगळा ग्रुप सो जागा हाउसफुल ! रहाण्यासाठी इकडची गुहा प्रशस्त आहे.. अगदी दरवाज्याला लोखंडी ग्रिल्स आहेत तेव्हा माकडांपासून सुरक्षित.. आधी इथे खाण्यासाठी काही मिळत नव्हते पण एका गावकर्‍याने (नाथु) ह्या गुहेतच एका कोनाडयात खाण्या-पिण्याची सोय केली आहे..मग मॅगी-चहा-भजी अगदी पिठला भाकरसुद्धा मिळू शकेल..

प्रचि १७:मुख्य गुहेतून
>

याच गुहेच्या अगोदर अगदी जवळच छोटी गुहा लागते.. जिथे रत्नादेवीची शेंदुर लावलेली पाषाणमुर्ती आहे.. नि बाजूलाच अगदी छोटया आकारात श्रीगणेशांची देखील पाषाण-मुर्ती आहे..

प्रचि १८:

दोन्ही गुहा पाउलवाटेच्या डाव्या बाजूस कातळामध्ये खोदलेल्या.. तर उजव्या बाजूस भला मोठा मोकळा पडदा...मग गुहेतच बसून निसर्गाची चलचित्रे न्याहाळत बसायचे... किती मस्त जागा..! मी पाहिलेल्या गुहांपैंकी ही एक आवडीची ! दोन्ही गुहांच्या समोरीला कडयावर रेलिंग बसवले आहेत नि चक्क सौरउर्जेवर चालणारे दिव्याचे थांब.. ! म्हणजे अश्या प्रकाशात रात्रीच्या वेळी गडावर राहण्याची पहिलीच वेळ !! राहून राहून वाटत होते हे दिवे तरी नको होते.. कारण दिव्याच्या प्रकाशामुळे गुहेच्या तोंडाशीच बसून रात्री आकाशातील तारकांचा खेळ मात्र दिसणार नव्हता..

असो.. मुख्य गुहा हाउसफुल असल्याने साहाजिकच आम्ही देवीच्या गुहेत रहायचे ठरवले.. त्याच गावकर्‍याने तात्पुरते मुख्य गुहेत सॅक ठेवा नि मग रात्री त्या छोट्या गुहेतच मुक्काम करण्याचे सुचवले.. अर्थात रत्नादेवीची गुहासुद्धा फार काही छोटी नाही.. आठजण सहज झोपू शकतील अशी जागा.. तो गावकरी त्याच्या लहानग्यासोबत तिथेच झोपणार होता..

त्याचे सांगणे ऐकून आम्ही सॅक्स त्याच्या जवळ मोठया गुहेत सोपवल्या नि मोर्चा हनुमान दरवाज्याजवळ वळवला.. हा दरवाजा ओलांडला की तुम्ही खर्‍या अर्थाने रतनगडाच्या माथ्यावर येता.. गुहेच्या रांगेतच थोडा वरती पण अगदी जवळ हा दरवाजा लागतो.. इथेही बाहेरून हनुमान आणि बाजूस रिद्धी सिद्धी असलेला गणपती यांची शिल्पे आहेत... तर आतल्या बाजूने अजुन दोन शिल्पे आहेत..

प्रचि १९:

प्रचि२०:

प्रचि २१: दरवाजा आतल्याबाजूने.. नि गुहेकडे जाणारा रस्ता

ह्या दरवाज्यातून वरती आलो की समोरच अवाढव्या रांगडा पहाड नजरेस पडतो.. नि त्याला लागूनच कात्राबाईची खत्री डोंगररांग.. नि शेवटाला ह्यांच्यामध्ये मीच सर्वात उंच म्हणत अभिमानाने उभा असणारा आज्या पर्वत..म्हणजेच आजोबा !

ह्या दरवाज्यातून डावीकडच्या वाटेने खाली उतरलो की तिथे कडेलोट करण्याजोगी जागा आहे.. आम्ही मायबोलीकर मग तिथेच बसून थोडावेळ चकाटया पिटत बसलो...

प्रचि २२:

प्रचि २३: गरगरले की नाही ?? Happy कडेलोट करण्यासाठी बेस्ट Proud

प्रचि २४: मायबोली कटटा

(फोटो इंद्राकडून)

त्या हनुमान दरवाज्यातून उजवीकडे वळलो तर राणीचा हुडा (भग्न बुरुज) स्वागतासाठी उभा..
प्रचि २५:

इथे फिरताना पायाखाली बघावे लागत होते.. भिती साप/विंचू यांची नव्हती.. तर लोकांनी वाटेतच करुन ठेवलेल्या घाणीची होती.. राणीच्या हुडाजवळ तर कोंबडयाच्या पिसाचा कचरा तसाच पडला होता.. राणीच्या हुडाच्या अगदी मागे एक छोटे पाण्याचे टाके लागते.. पण पिण्यास योग्य अश्या पाण्याच्या टाक्यासाठी अजून थोडे पुढे गेले की तीन खोदलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात.. त्यात सर्वात वरच्या टाकीतले पाणी पिण्यास योग्य वाटले..

प्रचि २६: इंद्रदेव पाण्याचे निरीक्षण करताना..

इथेच मग गारेगार पाण्याने फ्रेश झालो नि मग एक ग्रुप फोटो झाला... सध्या आमच्या ट्रेकमध्ये ग्रुप फोटो ही सर्वात मोठ्ठी धम्माल ठरतेय.. त्यातली गंम्मत प्रत्यक्षातच अनुभवली तर बरे..

प्रचि २७:

एव्हाना साडेचार वाजून गेले होते.. नि आमचा जठाराग्नी चांगलाच भडकला होता.. तेव्हा पेटपूजेची सुरवात चहापानाने करण्याचे ठरले.. एकीकडे राणीच्या हुडाच्या पुर्वेकडे ढगांचे महाकाय हिमनग नभात प्रकट झाले होते...
प्रचि २७:

- - -

चहापाण्याच्या तयारीसाठी अर्धी टोळी पाणी भरण्यासाठी गेली तर अर्धी टोळी चुलीसाठी सुक्या लाकडाच्या शोधात.. तासभरापुर्वीच पाउस पडला असल्याने कितपत यश मिळेल हे ठाउक नव्हते.. पण नविनला चक्क एक छोटे सुकलेले झाडच पडलेले मिळाले..त्यातील किती काटक्या पेट घेतील याचा अंदाज नव्हता .. शिवाय चहा, जेवण आणि सकाळचा नाश्ता एवढेच पकडले तरी खूप वाटत होते म्हणून पुन्हा ये जा टाळण्यासाठी सगळेच उचलले..

प्रचि २८:

ह्या काटक्या घेउन गुहेजवळ गेलो तेव्हा विन्याने फटकारलेच.. 'अरे काय होळी करायचीय का ?' Lol

आता सर्वात मोठे भव्यदिव्य काम ते म्हणजे चूल पेटवणे.. जोपर्यंत चूल पेटत नाही तोपर्यंत चैन नाही.. टिमवर्कच असते.. कोण फुंकर मारतो.. कोण काटक्या तोडून देतो.. तर कोणी वरचे पातेले बघतो.. सुरवातीला न पेटणार्‍या लाकडांमुळे धूराची नळकांडी फुटते..नि साहाजिकच डोळे-नाकातून एकाच वेळी पाणी वाहण्यास सुरवात होते मग अर्थातच आलटून पालटून जबाबदारी घेतली जाते.. आजही तेच सुरु होते.. पण संध्याकाळचा वारा सुटला होता.. शिवाय त्या गावकर्‍याने पटकन पेट घेतील अशी काही लाकडं आणून ठेवलीच होती.. सो चुलीने आम्हाला जास्त थकवले नाही..

प्रचि २९:

एकदाचे पाणी उकळत ठेवले गेले नि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. पहिली कामगिरी पार पाडली होती.. आता पाणी उकळेल तेव्हा उकळेल.. म्हटले आता सुर्यास्ताची वेळ.. सोहळा बघायला हवा.. पण सगळेच चहाविना सुस्त पडले होते.. आधी चहा मग बाकीचे काय ते.. पण माझ्यासाठी ट्रेकमध्ये सुर्यास्त व सुर्योद्य पाहण्याला जास्त महत्त्व.. दिवसभरात हेच तर दोन क्षण असतात जेव्हा त्याला अगदी नजरेला नजर देता येते.. गडावरून हे क्षण अनुभवण्याची मजा काही औरच असते.. आताही पश्चिमेला केशरी रंगाची उधळण झाली होती.. सुर्यदेवांनी नेहमीप्रमाणे आपल्या प्रखर किरणांची वस्त्रे उतरवून आता नेहमीचे टिपीकल तांबडे वस्त्र धारण केली होती.. डोंगराची एक उतरण. त्यावर एकच झाड नि त्या उतरणावरुन जणू घरंगळत जाणारा हा तांबडा गोळा हे या गडावर अनुभवलेल्या सुर्यास्त सोहळ्याचे वैशिष्टय !

प्रचि ३०: सुर्यास्त सोहळा

फोटोसेशन होईस्तोवर चहाची आठवण झाली नि एक कप तरी चहा उरेल या आशेने गुहेकडे धूम ठोकली.. नशिबाने चहा खूपच शिल्लक होती.. आमची चहा होईस्तोवर आणखीन एक चार-पाच जणांचा ग्रुप गड चढून आला.. इथे तिथे जागा शोधल्यानंतर त्यांनी आमच्या चूलीच्या बाजूला त्यांच्या चुलीचा बंदोबस्त करु लागले.. आम्ही लाकडं आणली होतीच सो त्यांना देउ केली.. एकमेकां सहाय्य करू हे तर झालेच.. पण झोपण्यासाठी त्यांना पर्यायच नव्हता.. !

चहा पिउन झाला न झाला तोच अचानक झोंबणारे वारे वाहू लागले.. अंधाराने आपले जाळे एव्हाना फेकायला सुरवात केलीच होती... त्या बोचर्‍या हवेपुढे चहातून मिळालेली उर्जा कधीच लुप्त झाली होती.. तेव्हा लगेच पेटपुजेचा पुढचा कार्यक्रम सुरु केला.. वेज सूपचे पडघम वाजले.. ! जल्ला बाकी काम तरी काय होते.. एकंदर स़काळपासून ट्रेक कमी नि खादाडीच जास्त सुरु होती.. इतके खाउनही पोट हलकेच वाटत होते..! असो, अश्या वातावरणात गरमागरम सूप आणि सोबतीला निखार्‍यांवर भाजलेला पापड.. आहाहा.. काय ते सुख ! याचसाठी तर गडावर एक रात्र राहण्याची कायम ओढ राहते.. Wink सूपदेखील एका फटक्यात गट्टम झाले..

कोजागिरी पौर्णिमा अवघ्या दोन दिवसांवर येउन ठेपली असल्याने आकाशात चांदणे खुलण्यास सुरवात झाली होती.. पण तोच आमच्या गुहेबाहेरील सौरउर्जेचा दिवा सातच्या सुमारास पेटला नि हिरमोड झाला.. एकीकडे बघितले तर फायदा पण होता.. टॉर्च घेउन जेवण करण्याची भानगड उरलीच नव्हती.. प्रकाश म्हणा फारसा नव्हता.. अगदी आमच्या गुहेसमोरच्या भागापुरतीच सिमित.. सो उठता बसता टॉर्चची गरजच पडली नाही.. गुहेतच काय तो अंधार.. ! बरं त्या मोठ्या गुहेकडील दिवा पेटलाच गेला नाही.. ! म्हणजे इथे पण आम्ही नशिबवान ठरलो..

प्रचि ३१ :

(फोटो इंद्राकडून)

देवीची गुहा असल्याने पादत्राणे बाहेरच काढली होती.. तिथेच मग दिव्याखाली अंथरले नि मस्त झोकून दिले.. जल्ला बाकी काम तरी काय होते.. Proud सुपचे ढेकर देउन पाच मिनीटं नाही झाली तर विन्या म्हणत होता 'चला आता जेवून पण घेउ' !

म्हटले रात्री आठच्या सुमारास करू.. जल्ला काम नाय म्हणून काय खातच बसायचे.. सो लोळत बसलो Proud त्या गावकरी मामा आणि त्यांचा मुलगा (नाव शिवलिंग !!) यांना पण जेवणाचे आमंत्रण देउन ठेवले.. 'आज आमच्या हातचे खा' असे सांगितले.. नाही बजावले.. असल्या गोष्टी आमच्या ग्रुपचा मुकादम मिस्टर गिरीविहारच करतो.. हा पठठा गुहेच्या दाराशी बुड टेकवून जो काय बसला तो हलतच नव्हता.. जसा काय सिंहासनावरच बसलाय !! पण ह्याच्या सूचना मात्र चालू.. शिवाय ह्याच्या कॅमेर्‍यातून दुसर्‍यांनाच जास्त फोटो काढायला लावतो.. ! कोणाला DSLR हाताळायचा असेल तर त्याने जरुर गिरिबरोबर ट्रेक करावा असा माझा आगाउ सल्ला.. Wink पण आम्ही लोळतोय बघून ह्याने पण सिंहासन सोडले.. नि दिले ताणून..

प्रचि ३२ :

( फोटो इंद्राकडून)

तिकडे बाजूच्या चुलीवर खिचडीचा बेत रंगला होता.. स्वयंपाकात त्या ग्रुपने गुंतवून घेतले होते.. कोण कांदा कापतोय.. कोण डाळ बघतोय.. इति इति... नि आम्ही इकडे जणू आमचे जेवण तेच बनवत आहेत अश्या गुर्मीत लोळत पडले होतो.. शेवटी त्यांच्या खिचडीचा खमंग वास दरवळला नि नविनची भूक चाळवली... मोठयाने म्हणायला लागला की इथे गडावर जेवण बनवले की देवीच्या पुढे नैवेद्य ठेवावाच लागतो... Lol

अगदीच राहवले नाही म्हणून आम्ही पण जेवणाच्या तयारीला लागलो... रेडी टू इट असल्यावर तयारी कसली.. चूल पेटवण्याचे काय ते कष्ट.. अगदी पाणी चांगले गरम होईपर्यंत..

प्रचि ३३ : आमचा मेनू - राजमा मसाला, दाल मखनी आणि टोमॅटो राईस.. आणि ही पाकीटे हेच जेवणाचे साहीत्य.. Proud

(फोटो इंद्राकडून)

बरीचशी लाकडं ओली असल्याने चुल पेटवण्याचेच काय ते कष्ट पडत होते.. बाकी आपले सोप्पे... पॅकेट उचलायचे.. तसेच गरम पाण्यात ढकलायचे.. पाच मिनीटांनी काढायचे.. मग ते कापून ताटात वाढायचे नि लगेच गटटम !! जास्त शॉट करुन घ्यायचा नाही.. रांगेत बसून आमचा हाच उद्योग चालू होता.. जल्ला ते खिचडीवाले पण यांचे चालले तरी काय म्हणत बघत राहीले.. जेव्हा कळले तेव्हा मात्र पुढच्यावेळी आपण पण असलेच काय ते करु म्हणू लागले.. Lol

जेवणं आटपून झोपायची तयारी.. आता झाले असे की जागा कमी नि मॅट जास्त !! गुहा छोटेखानी असली तरी देवीचे स्थान असल्यामुळे आतून खूपच स्वच्छ ठेवली आहे.. शेवटी कशेतरी मॅट अंथरल्या नि देवीच्या चरणी डोके ठेवून झोपी गेलो.. थंडगार सुटलेला वारा जसा गुहेत शिरु लागला तशी झोप उडू लागली नि मोबाईलचा गजर होण्याअगोदर उठावे लागले.. आजचा दिवस महत्त्वाचा होता.. रतनगड उरकून जमल्यास करोली घाट करण्याचा आमचा मानस होता.. गिरिविहार तर 'उतरायचे तर करोली घाट करूनच' असा निश्चय करुन बसला होता.. दुसरीकडे विन्या 'कशाला उगीच जीवाला त्रास आलो तसे जाउ' करत होता.. अर्थात सगळे पुढे वाट कशी मिळते नि कितक्या लवकर रतनगड आटपतोय यावर अवलंबून होते..

पुर्वेकडे लालगुलाबी रंग उधळले गेले.. दुरवर धुक्याचे साम्राज्य होते सो उगवतीचा तेजोगोल कितपत स्पष्ट दिसेल याबाबत साशंक होतो..

प्रचि ३४ : मंदधुंद पहाट

तिथे सुर्यदेव आपले डोके वर काढेस्तोवर आम्ही नाश्त्याची मॅगी करु लागलो..

प्रचि ३५ :

मी जेव्हा जेवणाचे व मॅगीचे साहीत्य घेतले होते ते अकरा बारा जणांच्या हिशोबाने.. म्हटले उरले तर परत घेउन येऊ.. पण हा ट्रेक जणू खादाडी ट्रेक असल्यागत सातजणांनी सगळे फस्त केले.. !!! त्या गावकरी मामांकडून आम्ही काहीच घेतले नव्हते सो सकाळचा चहा त्यांच्याकडूनच घेतला.. नि आम्ही पुढे मार्गस्थ झालो.. पुन्हा त्या पाण्याच्या टाकीजवळ ब्रेक घेउन पाणी भरुन घेतले.. भांडीधुणी झाली.. नि सरळ नेढयाकडे जाणारी वाट धरली.. ह्या वाटेला कमरेइतके वाढलेल्या हिरव्या पाती.. त्यातून डो़कावणारी विविध रानफुले वार्‍यावर अगदी मनमुराद डोलत होती...ह्यांच्याशीच झटापटी करत आम्ही पुढे जाउ लागलो..

प्रचि ३६ :

या मार्गाने जाताना डाव्या बाजूस चोरदरवाजा लागतो..

प्रचि ३७ :

प्रचि ३८:

काही अंतरावर पाण्याच्या अजुन काही टाक्या लागतात.. इथले पाणीदेखील पिण्यायोग्य होते..

प्रचि ३९: पाण्याच्या टाक्या नि अगदी मागे नेढयाचा डोंगर

जसजसे नेढयाच्या दिशेने सरकू लागले तसतशे डावीकडे दरीचा विस्तार वाढत जातो.. तिथेच मग सांधण दरी व साम्रद गावातून दिसणारा कोकणकडा दिसला.. मागे वळून पाहिले तर आपला आज्या पर्वत कात्राबाईला खेटून उभा.. रतनगडावरचे नेढे ही जागा गडावरील सर्वात उंचावर.. साहाजिकच नेढयापर्यंत पोचण्यासाठी दम काढावा लागतोच.. पण एकदा नेढयात पोहोचलो की सगळा दम भरुन येतो.. इथे पाहू की तिथे असे होउन जाते.. समोरचा नजारा व बेधुंद वाहणारा वारा यामध्ये आपली बोलती बंदच !! ह्या नेढयात ऐसपैस जागा असल्याने ट्रेकर्सलोकांमध्ये सर्वात आवडते !

प्रचि ४० : नेढयात पोहोचलो एकदाचा..

प्रचि ४१ : मग आले आमचे फोटोसेशन

नुसते नेढयात बसून समाधान झाले नाही तर अगदी नेढयाच्या वरती जाण्यास पण एक वाट आहे.. किंचित घसरणीची आहे.. तिथे रोमा, इंद्रा व मी गेलोच.. इथून खुटा नि त्र्यंबक दरवाजाच्या पायर्‍या दिसून येतात.. इतकेच काय चारही बाजूचा दुरवरचा परिसर डोळ्यात भरतो.. पण वातावरण इतके धुसर होते की साधे अलंग-मदन-कुलंगचे त्रिकुट पण दिसत नव्हते... साम्रद गाव, सांधण दरी व करोली घाट ते डेहणे हा सारा परिसर बघितल्यावर कळून चुकले खूप लांबलचक पटटा आहे.. अवघड आहे पण अशक्यदेखील वाटत नव्हते..

प्रचि ४२:

क्षणभर विश्रांतीनंतर लगेच उतरायला घेतले.. नि थेट त्र्यंबक दरवाजा गाठला.. खूपच सुंदर नि भरभक्कम असा दरवाजा.. रतनगडावर आलात तर हा दरवाजा बघणे मस्टच..

प्रचि ४३ :

दरवाज्यातून खाली उतरल्यावर नेहमीच्या देवडया नि मोठी भिंत लागते.. जिच्यामधूनच बाहेर पडण्यास दरवाजा लागतो व पुढे उतरण्यासाठी मोठया उंचीच्या दगडात कोरलेल्या पायर्‍या.. बहुतांशी तुटलेल्या अवस्थेत आहेत.. ब्रिटीशांची अवकृपा असावी बहुदा..

प्रचि ४४:

प्रचि ४५:

अगदी समोरच दरी डोळ्यात दिसत असल्याने या पायर्‍या उतरताना खबरदारी घेउनच सगळे उतरु लागले.. पायर्‍या संपल्या की पुन्हा पाउलवाट सुरु होते.. अगदी डोंगराच्या कपारीतून जाणारी वाट.. तीच पुढे अगदी खुटा आणि रतनगड यांना जोडणार्‍या घळीत येउन थांबते.. इथून रतनगडचा खुटा अगदीच रांगडा दिसतो..

प्रचि ४६ :

आमची वाटचाल इथेच थबकली.. कारण करोली घाट करायचे तर डावीकडे उतरायचे होते.. नि रतनवाडीसाठी उजवीकडे.. पण डावीकडे नजर थेट दरीतील बाणलिंगी सुळक्याकडे जात होती..

प्रचि ४७ :

शिवाय इथून उतरणे खूपच अवघड भासत होते.. मी थोडी वाट उतरुनदेखील पाहिली.. पण खालच्या वाटेचा अंदाज येत नव्हता.. एकवेळ उतरुन जाउ पण पुढे अडकलो तर चढणे जिकरीचे.. इथली वाट ज्याला माहिती होती तो सुन्या नेमका आला नव्हता.. ती वाट बघूनच बहुतेकांचे डोळे भिरभिरले नि उजवीकडून जाउ म्हणत उतरु लागले.. गिरीचा करोली घाटाने उतरण्याचा निश्चय इथेच मोडला गेला.. सुन्याशी फोनाफोनी केल्यावर कळले सुरवातीची उतरणीची वाट अवघड.. मग पुढे जंगलातील वाट.. तिथेच एक उजवीकडे फाटा फुटतो.. तो चुकला तर मग हरवण्याची भिती जास्त.. इति इति माहिती मिळाली.. हातात वेळ पुरेसा नसल्याने उजवीकडूनच उतरलो.. ही वाट मात्र अगदी पायाखालची.. इथेपण पुढे राजमार्ग लागला.. डावीकडे वळलो तर साम्रद गावाकडे नि उजवीकडे रतनवाडीची वाट.. इथेच मग कुठल्या मार्गाने जायचे याची बरीच मोठी गहन वादग्रस्त चर्चा झाली.. सळसळत्या रक्ताचा रो.मा साम्रदच्या वाटेनेच जाउ म्हणत हटटाला पेटलेला.. तर थकलेले जीव कशाला उगीच जीवाला त्रास म्हणत रतनवाडीनेच जाउ म्हणू लागला.. 'करोली, करोली' करणारा गिरीपण रोमाचा हटट बघून संभ्रमात अडकलेला.. तर एकीकडे 'एकदा नको तर एकदा हो' करत डबलढोलकी वाजवणारा नविन.. विन्याला तर सोप्पा मार्ग तो बरा म्हणत रतनवाडीला चला करत होता.. डेविल व मी 'तुमचे काय ते ठरवा.. जल्ला आम्ही कुठेपण' अश्या भूमिकेत.. शेवटी इंद्राने फासा टाकला..' वेळ भरपुर आहे.. मस्त प्रवरा नदीत अंघोळ उरकू नि लाँचने शेंडीला जाउ'.. झाले अंघोळीचे नाव काढले नि रो. मा एकटा पडला.. तो पण नरमला.. तरीपण इथूनच चला, शॉर्टकट शोधत जाउ म्हणू लागला.. हे ऐकताच नको रे बाबा करत सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला.. Lol शेवटी रो.मा ची समजूत काढत त्याला आमच्यासोबत घेउन आलो.. तरीपण तो बराच वेळ पुटपुटत होता..

तासभरातच आम्ही मुख्य वाटेला येउन मिळालो.. जिथे तीन फाटे फुटतात.. एक हरिश्चंद्रगडाकडे.. एक वरती रतनगडाकडे.. नि ही तिसरी जिथून आम्ही आलो होतो.. साम्रद गावासाठी पण इथूनच वाट आहे.. पुढेच मग जंगलात एक ब्रेक घेतला..

प्रचि ४८ :

(फोटो इंद्राकडून)

शेवटी एकदाचे आम्हीए खाली उतरलो.. नि तिथेच नदीच्या पात्रात चांगली जागा निवडून पाण्यात मनसोक्त डुंबून घेतले.. अशा अंघोळीने जी काय तरतरी येते त्याला तोड नाही.. प्रत्येक ट्रेकचा शेवट जर असा पाण्यात डुंबून होत असेल तर त्यापेक्षा अजुन सुख नाही..

प्रचि ४९ :

(फोटो इंद्राकडून)

इथेच मग शेवटची खादाडी सुरु केली.. त्यात पाण्यात डुंबून घेतल्यावर सपाटून भूक लागली.. साहाजिकच पोटं भरली नि पाठीवरच्या सॅक्स रिकाम्या झाल्या.. तासभरातच परतीचा मार्ग धरला.. आता लक्ष्य होते शेंडीकडे जाणारी लाँच पकडण्याचे.. रतनवाडीहून शेंडीपर्यंत जायचे तर गाडी मिळणे फार कठीण.. मिळालीच तर फारच वाजवी दरात.. एसटी पण दिवसातून एकदाच येते.. स्वत:ची गाडी असेल तर इथे येणे जास्त सोयीस्कर.. आता तर पर्यटनस्थळ बनत चाललेय.. साहाजिकच भंडारदराच्या जलाशयातून बोटीप्रवास करणे महाग नसेल तर नवलच.. प्रत्येकी तब्बल दिडशेचे भाडे सांगितले गेले.. तो सांगेल नि आम्ही लगेच ऐकू असे होईल तर ना.. घासाघीस सुरु झाली.. पण प्रत्येकी केवळ पन्नास रुपयेच वाचवता आले.. काय करणार दुसरा पर्यायदेखील नव्हता.. हा बोटीचा प्रवासदेखील मस्तच.. पण दुपारची वेळ नि त्यात सभोवताली अगदीच धुसर वातावरण त्यामुळे थोडी निराशाच झाली.. प्रभातकाळी हा प्रवास नक्कीच बघेबल असावा.. अंदाजे पंचेचाळीस मिनिटांचा बोट प्रवास संपवून आम्ही शेंडीच्या मार्केट मध्ये आलो.. इथे रविवारचा बाजार भरत असल्याने तोबा गर्दी...

इथूनच मग कसार्‍यापर्यंत गाडीची विचारपुस करता करता सरळ शेअरींगची काळीपिळी टॅक्सी पकडली.. म्हणजेच शेंडी ते घोटी.. नि पुढे घोटी ते कसारा असा प्रवास करण्याचे ठरवले.. पण इथली शेअरिंग म्हणजे अक्षरक्ष: कोंबाकोंबी.. ! गाडीत कोंबली जाणारी नक्की माणसं की मेंढरं असा प्रश्ण पडेल.. आमच्यातले काहीजण टपावरच जाउन बसले.. सगळ्या गाडया आतून वरतून पाठून पुर्ण भरल्याखेरीज सुटतच नव्हत्या..
आमचा ड्रायवर पण याला ना त्याला घुसवू पाहत होता..पण गिरी, नविन हे वजनदार पठ्ठे स्वत:ला कोंबुन घेण्यास काही तयार नव्हते.. Proud गाडीवाला वैताग राग राग करू लागला.. पण हे पठठे कसले ऐकताहेत.. बराच अवधी लोटला नि गाडीवाला नरमला.. त्याने पण शेवटी हार न पत्करता मागच्या बाजुस नि टपावर प्रवाश्यांना चढवलेच.. !!

तासभरातच आम्ही घोटी गाठले.. इथून तात्काळ कसार्‍यासाठी शेअरिंग गाडी पकडायचे ठरले.. कारण कसार्‍याहून सीएसटीला जाणारी ४.५० वाजताची ट्रेन होती.. मग थेट सव्वातासाने.. सो घाईघाई चालली होती.. पण एक वडापाव गाडीचा स्टॉल आडवा आला.. नि नेहमीप्रमाणे एकेक खाउन घेउ म्हणत चार चार वडे अक्षरक्ष हादडले.. सोबतीला चहा व कोल्ड्रींक पण गटागट ! अक्षरक्ष: खाखाट्रेकच सुरु होता.. !! हे कमी म्हणून की काय पार्सल पण घेतले.. नाही नाही म्हणता पंधरा मिनिटे फुकट गेली.. घोटीचा शेअरींग टॅक्सी स्टँड मार्केटपासून पाच दहा मिनीटावर आहे.. इकडून हायवेने गाडी जाणार म्हटल्यावर टपावर बसण्यास परवानगी नव्हतीच.. इथेपण कोंबाकोंबी.. त्यात आमच्या सॅक्स.. तरीदेखील आम्ही सातजण आमच्या सॅकसकट व एक बाहेरचा असे आठजण बसलो.. तरी गाडीवाला म्हणे अजुन दोनजण बसतील.. !! अगदी कहर होता.. गिरी तर म्हणू लागला दोन काय चार आणा.. नि आम्हाला आत सरकवत होता.. पण मुंगीला शिरायला जागा नव्हती तिथे आम्ही कसले हलतोय.. शेवटी आडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणत दोन प्रवाश्यांचे भाडे देण्याची मंजूरी दिली नि रवाना झालो.. ही अक्षरक्ष लुट होती.. पण पर्याय नव्हता.. इथेच मग पुढच्यावेळी आपल्याच गाडया घेउन यायचे असे शिक्के मारले गेले..

अगदी पाचेक मिनिटे शिल्लक असताना आम्हाला ट्रेन मिळाली.. अगदी बसायलादेखील मिळाले.. इथे पण नशिबवान.. शिवाय घरीपण आठच्या घरात पोचणे म्हणजे खूपच मिळवले.. ट्रेन सुटली.. हिशोबाच खेळ सुरु झाला.. वाटले होते हजाराच्या घरात खर्च होईल.. पण आठशेपर्यंतच आकडा थांबला.. अगदी खाखाट्रेक होउनसुद्धा.. त्यातच नेहमीप्रमाणे पुढचा ट्रेक कधी कुठे याचे आखाडे बांधण्यास सुरवात झाली.. ऑक्टोबर हिट ट्रेक झाला.. आता वेध हिंवाळी ट्रेकचे.. बघू कधी.. कुठे जायचे ते..

समाप्त नि धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो!

रतनगडाच्या पायथ्याला भोज्जा करून आम्ही कात्राबाईकडे गेलो होतो. पुरा रतनगड करनेक्का है अभी! Happy

फटू काय दिसले नाहीत.. पण "यो" चा वृतांत वाचणे हि सुद्धा एक चैनच असते ..
साला आमच्या बॉस ने आयत्या वेळी खो घातला नाहीतर ....
असो ,जामच धमाल केलेली दिसतेय .
फोटो पाहून वेगळी प्रतिक्रिया देईनच, तूर्तास इतकेच Happy

धन्य धन्य तो सह्याद्री
धन्य तयाची मंदिर-लेणी
धन्य पद भ्रमर ते ज्यांनी
ते चित्रण पोहोचविले इथे

वा! यो, सुरेख प्रकाशचित्रे आणि सुंदर वर्णन. आवडले.

पोटभर ट्रेक Happy

मस्तच लिहिलयं...

शिडया पार करुन वरती आलो की एक वाट उजवीकडे हनुमान दरवाज्याकडे वळते तर दुसरी डावीकडे गुहेकडे जाते.. > एक बदल कर.. उजवीकडची वाट गुहेकडे तर डावीकडची वाट हनुमान दरवाज्या कडे जाते.

यो, सुंदर लेख अन प्रचि...:-)

पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता>>> मोठा ब्रेक कुठे होता.. आपली कोकण सफर झाली ना...

आज आमच्या हातचे खा' असे सांगितले.. नाही बजावले.. >>> तुमच्या पैकी कोणीतरी आमंत्रण दिले. मी नाही...

जसा काय सिंहासनावरच बसलाय>>> मी काय बसुन नव्हतो, तुम्हाला गुहेतुन सामान कोन आणुन देत होतं.. तुमचं सारख पापड दे, सुप दे, सुरी दे, ताट दे, साखर दे, पेपर दे, चमचा दे, चालु होत. जल्ला दोन मिनीटे देखील स्वस्थ बसु दिले नाहीत....:-(

मस्त!

अमृतेश्वराच्या शिवपिंडीची पूजाअर्चा कधी पासून व्हायला लागली? अमृतेश्वराच्या आसपासची बरीच जागा सुळे बाईंनी शाळेच्या नावाखाली हस्तगत केलेली आहे. मग हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होणारच!

सहीच. Wink रतनगड म्हणजे मस्तच ट्रेक. नव्या शिड्या पाहून बरे वाटले.

बर तुम्ही सर्व एक MSR घेउनच टाका रे. मला ते खुप सारी लाकडे जाळणे फार योग्य वाटत नाही. Happy

पक्या.. तेच घेणे बाकी आहे..

मी काय बसुन नव्हतो, तुम्हाला गुहेतुन सामान कोन आणुन देत होतं >> अरे हो रे.. विसरलोच.. Wink Lol

झक्या .. उडीबाबा होता ना.. रोहीत मावळ्याने टाकले आहेत ते फोटो.. ही बघ लिंक...

http://www.maayboli.com/node/38908

जल्ला कसला खादाडी ट्रेक रे हा...च्यामारी सगळ वर्णन वाचून काय काय खाल्ला हेच लक्षात राहीला....
बाकी प्रचि तर एकच नंबर
सगळ्यात आवडला तो म्हणजे घसरगुंडीवर बसलेला तांबडा गोळा...शॉलीड...
नेढ्यातला, माकडांचा फोटो (मध्ये स्वल्पविराम आहे, वाचताना गोंधळ करु नये Happy ) पण ब्येष्ट
बाकी तिथे माकडांचा त्रास जाम आहे...मागच्या वेळी एक पिल्लू माकडाने आमचे लक्ष नसताना बिस्कीटांचा एक जंबो पॅकच पळवला होता. ते लोखंडी गेट फारच आवश्यक होते....

भटक्याला अनुमोदन इतके जळण आणि ते जाळण्याचा त्रास पण वाचेल

अगदी दिनेशदा म्हणतात तसं पोटभर वर्णन! प्रचिपण खास आलीयेत. ८०० रुपयांचा ट्रेक ऐकून लाज वाटली. आमच्या वेळेस पन्नासेक रुपये लागले तरी खूप वाटायचे! Proud

-गा.पै.

८०० रुपयांचा ट्रेक ऐकून लाज वाटली. > हाच ट्रेक आम्ही २००७ मधे फक्त अडीचशे रुपयांत केला होता. जल्ला या महागाईच्या जमान्यात ट्रेक परवडत नाहीत.

ट्रेन, वडाप करूनही ८०० लागले याचे कारण प्रचि ३३ तर नाहिये ना? Wink Proud

शेंडी वरून रतनवाडीत जायला जीपवाले आता पर सीट किती पैसे घेतात?

आज जुन्या ट्रेकच्या हिशोबाच्या वह्या काढून बघतो.. Wink कमीत कमी ३२ रुपये लागल्याची नोंद लक्ष्यात आहे मला. Happy

Pages