मॅजेस्टिक प्रकाशन व एव्हरेस्ट एण्ट. पुरस्कृत मायबोली गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ - निकाल

Submitted by Admin-team on 1 November, 2012 - 11:22

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि. यांच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२ या कालावधीत ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं आयोजन केलं होतं.

स्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते, व एकूण ६३ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.

वीणा जामकर यांनी पहिल्या, गणेश मतकरी यांनी दुसर्‍या व गिरीश कुलकर्णी यांनी तिसर्‍या विषयासाठी परीक्षक म्हणून काम केलं.

गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

विषय पहिला - माझी आवड / आठवण.
प्रथम क्रमांक - "आप्पाचा सिनेमा... १६ एम एम" - -शाम
दुसरा क्रमांक - "अय स्साला...कोइ शक्क ?" - विशाल कुलकर्णी
तिसरा क्रमांक - निवडक दहा ! - मंजिरी सोमण
तिसरा क्रमांक - चित्रपट, मी आणि आठवणींचा कोलाज - रुणुझुणू
तिसरा क्रमांक - रुपेरी पडद्यावरील शेवटची कृष्णधवल ललितकृती- 'सरस्वतीचंद्र ' - भारती बिर्जे डिग्गीकर

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

तिसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे एक पुस्तक आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटाची एक सीडी / डीव्हीडी

***

विषय दुसरा - गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल

प्रथम क्रमांक - भारतीय सिनेमातील बदलती स्त्री-प्रतिमा - अश्विनीमामी
दुसरा क्रमांक - नायक नहीं खलनायक हूं मैं! प्राण ते विद्युत जमवाल - वर्षु नील

या विषयासाठी फक्त दोन विजेते परीक्षकांनी निवडले आहेत.

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

***

विषय तिसरा - माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

विषय तिसरा - माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट
प्रथम क्रमांक - माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट, मागणं लै नाही लै नाही - शोभनाताई
दुसरा क्रमांक - प्रभात फिल्म्सनिर्मित 'माणसाच्या पाठीवर' - pradyumnasantu

या विषयासाठी फक्त दोन विजेते परीक्षकांनी निवडले आहेत.

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

***

विजेत्यांनी त्यांची बक्षिसं मायबोलीच्या पुणे येथील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी, ही विनंती. सर्व विजेत्यांशी मायबोलीच्या संपर्कसुविधेतून येत्या आठवडाभरात आम्ही संपर्क साधू.

***

वीणा जामकर यांचं मनोगत -

गाथाचित्रशती लेखनस्पर्धेत मला लेखांच्या स्वरूपात भेटलेल्या आणि चित्रपटांवर विलक्षण प्रेम करणार्‍या रसिकांना माझा नमस्कार!

ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही लिहिलेले सगळे लेख मी वाचले. वाचताना जाणवत होतं ते सिनेमाचं तुमच्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्त्व! जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा घटनेत सिनेमानं किती सहजपणे आपली स्वतःची ठोस जागा तुमच्या आयुष्यात निर्माण केली आहे, आयुष्यातल्या कित्येक सुखद, बर्‍यावाईट, अविस्मरणीय आठवणी या सिनेमाशी निगडीत आहेत, आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सर्वांनी इतकं मनापासून केलेलं लेखन वाचून मी अभिनेत्री असल्याचा मला अतिशय आनंद झाला.

तुमच्या चित्रपटप्रेमाचं मोजमाप होऊच शकत नाही. तुमचा आवडता नट, सिनेमा, गाणं, व्यक्तिरेखा यांच्यात तुलना होणं शक्य नाही. पण स्पर्धा म्हटल्यावर काही निकष असतात आणि त्यांचा आधार घेऊन क्रमांक द्यावेच लागतात. म्हणून ४९ लेखांपैकी ५ लेखांना मी बक्षीस द्यायचे ठरवलं. यात - १) विषयाची मांडणी २) शब्दरचना / शब्दशैली ३) विषयाचं निरीक्षण व आवाका या तीन मुद्द्यांना धरून मी गुण दिलेले आहेत. बक्षिसपात्र लेख या निकषांवर उत्कृष्ट ठरले, निर्विवादपणे!

चित्रपटांविषयी तुमच्या भावना जरी खूप प्रामाणिक असल्या तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते, की लेखनाला फार गांभीर्यानं न घेतल्यामुळे बरेच लेख हे अपूर्ण किंवा कमअस्सल वाटले. स्पर्धेसाठीचं लेखन हे पुरेशा गांभीर्यानं केलं गेलं असतं, तर ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता उत्तम लेखमाला झाली असती! लोक सिनेमा पाहत नाहीत असा ओरडा सुरू असताना प्रेक्षक सिनेमाला किती गंभीरपणे घेतात, हे अधिक ठळकपणे दिसून आलं असतं. विषयांचं, शीर्षकांचं वैविध्य (शीर्षकातून लिहिणार्‍याचा दृष्टिकोन कळत होता) ही अनोखी बाजू होती, पण निवडलेला विषय खोलात जाऊन मांडणं आवश्यक होतं. आवडत्या नटनटीबद्दल लिहिताना ती का आवडतात, याचा अनेक अंगांनी विचार करता आला असता. एखाद्या चित्रपटाबद्दल लिहिताना त्याची कथा सांगणं, हा लेखाचा हेतू नसून ती कथा तुम्हांला सुंदर का वाटली, कथा पडद्यावर कशी उतरली, कथेतलं, चित्रपटातलं तुम्हांला काय भावलं, हे लिहिणं अपेक्षित होतं.

समांतर सिनेमा, तद्दन व्यावसायिक सिनेमा यांबद्दलचे तुमच्यापैकी काहीजणांचे दृष्टिकोन मला अतिशय आवडले. दांभिक न होता तुम्ही व्यक्त केलेली स्पष्ट मतं अतिशय बोलकी आहेत! पण हे सगळं अजून खोलात जाऊन जास्त छान मांडता आलं असतं, ही चूटपूट सरतेशेवटी लागून राहते.

अर्थात तुम्ही कोणीही लिखाण कृपया थांबवू नका. किंबहुना या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू झालेलं चित्रपटांबद्दलचं हे लेखन नियमितपणे मायबोली.कॉमवर सुरू राहावं, आणि लेखमालेच्या स्वरूपात कायमस्वरूपी जतन व्हावं, असं मला वाटतं. त्यातून खूप मोठा दस्तऐवज भविष्यात तयार होईल, ही खात्री आहे.

पुन्हा एकदा सांगावसं वाटतं की, तुमच्या चित्रपटप्रेमाला कुठल्याही क्रमांकाची गरज नाही. तुमच्या चित्रपटाबद्दलच्या भावनांना क्रमांक देणं अशक्य आहे. त्यामुळे तुमचं लेखन असंच सुरू राहिलं तरच या स्पर्धेचा हेतू साध्य झाला, असं मी म्हणेन.

***

गणेश मतकरी यांचं मनोगत -

या स्पर्धेतील माझ्या विषयाच्या प्रवेशिका वाचणं, हा आनंददायी अनुभव होता.

स्पर्धेचं परीक्षण करताना लेखात समावेश असलेली माहिती, त्यासाठीचं संशोधन, विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन, काढलेले निष्कर्ष, अनुमानं, विषयाचं नावीन्य, लेखनकौशल्य आणि लेखकाची विचारप्रक्रिया या बाबींचा मी विचार केला. गुणांकन करताना श्रेणी देणं, किंवा अमुक एका विषयाला इतके मार्क देणं मला पटत नसल्यानं या सर्व निकषांचा मी एकत्रित विचार केला. लेखाद्वारे मला मिळालेला वाचनानुभव मला महत्त्वाचा वाटला.

'भारतीय सिनेमातील बदलती स्त्री-प्रतिमा' या लेखाला मी प्रथम क्रमांक दिला आहे. वर उल्लेख केलेल्या अनेक गोष्टी उत्तमप्रकारे या लेखात आल्या आहेत. लेखाची मांडणी अधिक चांगल्या प्रकारे करता आली असती, असं मला वाटतं. मात्र लेखकाने / लेखिकेने हा लेख लिहिण्यासाठी घेतलेले परिश्रम दिसून येतात.

'नायक नहीं खलनायक हूं मैं! प्राण ते विद्युत जमवाल' या लेखाला मी दुसरा क्रमांक दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायकांचा आढावा घेणं मला रोचक वाटतं. लेख वाचताना विचारांची स्पष्टता जाणवते. खलनायकांच्या पडद्यावरच्या प्रतिमांची उत्तम जाण, ही या लेखाची जमेची बाजू. लेखातील काही भाग मांडणीच्या दृष्टीने मात्र कमकुवत वाटतो.

माझ्याकडे आलेल्या प्रवेशिकांपैकी 'माझे बालपण ते आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीच्या तंत्रात झालेले बदल’ हा लेखही मला रोचक वाटला. चित्रपटांतील बदलांबद्दल हा लेख नसून चित्रपट बघण्यात झालेला बदल, हा लेखाचा विषय आहे, आणि हा विषय मला अतिशय आवडला. लेखाची मांडणी, भाषा उत्तम आहेत. कुठलाही आव न आणता हा लेख लिहिला आहे. या लेखाला बक्षीस द्यायला मला आवडलं असतं, पण लेखाच्या शेवटी या स्पर्धेच्या एका परीक्षकांचा उल्लेख आल्याने नाइलाजानं मला या लेखाला क्रमांक देता आलेला नाही.

माझ्याकडे आलेले लेख वाचल्यावर जाणवलं की, सर्व स्पर्धकांनी चित्रपटांबद्दल अतिशय प्रेमानं लिहिलं असलं, त्यातून ते चित्रपटांवर किती प्रेम करतात, हे कळलं, तरी त्यांच्या लेखांमधून (स्पर्धेचा विषय लक्षात घेता) हाती फारसं काही लागत नाही. संशोधनाचा अभाव, अपूर्ण माहिती हे महत्त्वाचे दोष बहुतेक लेखांमध्ये आहेत. विचारांचा गोधळही जाणवतो. या स्पर्धेत भाग घेतलेले सगळे हौशी लेखक आहेत, चित्रपटांबद्दलच्या निखळ प्रेमापोटी त्यांनी लेख लिहिले, हे लक्षात घेतलं, तरी लेखाची मांडणी आणि विषय लक्षात घेऊन माहितीचा आढावा हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. काही लेख तर अतिशय वरवर, आणि केवळ लिहायचं म्हणून लिहिलेले आहेत.

मायबोली.कॉमने आयोजित केलेल्या स्पर्धेचं परीक्षण करण्याची मला संधी दिल्याबद्दल आभार.

***

गिरीश कुलकर्णी यांचं मनोगत -

या स्पर्धेचं परीक्षण करताना मी संपूर्ण वाचनानुभव, तसंच लेखातली विचारप्रक्रिया यांचा प्रामुख्यानं विचार केला.

लेखनासाठी विषय दिला होता ’माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट’. माझ्यासारख्या काही प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांवर रोष होता, आणि आमच्या अपेक्षेतला मराठी चित्रपट तयार होत नव्हता म्हणून मी आणि उमेशने ’वळू’ तयार केला. त्यामुळे या स्पर्धेतील लेख वाचताना माझी दृष्टी ही परीक्षकापेक्षा एका प्रेक्षकाची अधिक होती. या मंडळींच्या काय अपेक्षा आहेत मराठी चित्रपटांकडून, हे जाणून घेण्याचं मला कुतूहल होतं. चित्रपट या माध्यमाचं, आजच्या काळाचं, भवतालाचं आणि होणार्‍या बदलांचं, स्पर्धकांचं स्वत:चं असं काहीएक आकलन या लेखांत असेल, अशी माझी अपेक्षा होती. कारण आपल्या अवतीभवती काय सुरू आहे, याचा प्रभाव कलेवर पडतोच. दुसरं म्हणजे माणूसही बदलतोय. त्याच्या जाणिवा, त्याच्या आवडीनिवडी बदलत आहेत. माध्यमांच्या विस्फोटामुळेही त्याच्यात अनेक बदल, क्वचित सुधारणा, होत आहेत. हे बदल आजच्या प्रेक्षकातही दिसून येतील, अशी माझी अटकळ होती. आज मराठी चित्रपटांमध्ये थोडेफार वेगळे प्रयोग होत आहेत. या प्रयोगांबद्दल विचक्षणपणे कोणी लिहावं, अशी माझी अपेक्षा होती. पण माझ्या सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्यात, असं नाही.

हल्ली प्रत्येकचजण मराठी चित्रपटकर्त्यांना काहीतरी शिकवू पाहतो. तसा काहीसा सूर स्पर्धेत आलेल्या बहुतेक सर्व प्रवेशिकांमध्ये होता. हा सूर मला खटकला, कारण कोणाला शिकवणं हा स्पर्धेचा हेतू आणि विषय नव्हता. ’मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा’ हा स्पर्धेचा विषय नव्हता, ’माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट’ असा स्पर्धेचा विषय होता, आणि हा चित्रपट मीच, म्हणजे, स्पर्धकच, तयार करणार, हे ओघानं आलंच, कारण माझ्या अपेक्षा मी जेव्हा लिहितो, तेव्हाच एका अर्थी त्या चित्रपटाची आभासी निर्मिती मी करत असतो. त्यामुळे चुका दाखवून देणं, किंवा ऐकिव माहितीवर काहीतरी निष्कर्ष काढणं, किंवा पुरेशी माहिती नसताना दिग्दर्शकांवर, कलाकारांवर शाहजोगपणे टिप्पणी करणं, हे मला अपेक्षित नव्हतं. मी जेव्हा चित्रपटनिर्माता नव्हतो, तेव्हा मीही अशा टिप्पण्या करायचो. मात्र चित्रपट तयार करायला घेतल्यावर खरी परिस्थिती समोर आली. त्यामुळे अनुभूती घेतल्याशिवाय पक्की मतं बनवू नयेत, हे बरं. तुम्ही शक्यता व्यक्त करू शकता, पण जोरकसपणे ठाशीव विधान करणं, हे जरा वावदूकपणाचं वाटतं.

मात्र मला सगळ्यांत खटकलं ते स्मरणरंजनात रममाण होणं. स्मरणरंजनात रमलेला समाज निर्मितीक्षम राहत नाही. आजचा प्रेक्षकच असा स्मरणरंजनाच्या बेड्यांनी जखडला असेल, तर त्याला नवीन प्रयोग बघायला मिळतीलच कसे? नवं काही करू पाहणार्‍यांना या बेड्यांचा काच जाणवत राहणार. ते नवं काही करू शकणार नाहीत. त्यातच तांत्रिकदृष्ट्या उत्तम, चकचकीत चित्रपट हेच चांगले चित्रपट, असा विचित्र समजही अनेक लेखांमध्ये वाचायला मिळाला. या लेखांमध्येही पुन्हा हिंदी विरुद्ध मराठी चित्रपट, जुने चित्रपट विरुद्ध मराठी चित्रपट अशी तुलना होतीच. जुने मराठी दिग्दर्शक, त्यांनी केलेले चित्रपट ते आजचे दिग्दर्शक व आजचे चित्रपट, त्यांत असलेला चकचकीतपणाचा अभाव हा काही लेखनाचा, स्पर्धेचा विषय नव्हता.

मला असं वाटतं की, जगभरात जेव्हा कलेच्या क्षेत्रात नवनिर्मिती होत असते, तेव्हा काळाचे संकेत, चिन्हं, प्रभाव हे दिसत असतात. त्या अनुषंगानं आजच्या काळाशी सुंसंगत कथानकाची कोणी मागणी करेल का, कथानकविरहित, केवळ दृश्यात्मकतेवर आधारलेला चित्रपट कोणाला पाहावासा वाटेल का, याबद्दल मला उत्कंठा होती. पण तसं काही झालेलं मला दिसलं नाही. वर्षानुवर्षं ’लोकप्रिय’ असं जे काही तयार होत होतं, तेच आम्हांला आजही द्यावं, असंच बहुतेकांचं म्हणणं दिसलं. पण मग मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे, कारण प्रेक्षकांनाच नवीन काही नको आहे. मी जेव्हा चित्रपट तयार करतो, तेव्हा व्यावसायिक गणितं माझ्या डोक्यात नसतात. चित्रपट हे माध्यम मला नवनवीन प्रयोग करण्याची संधी देतं, आणि या प्रक्रियेतून मला स्वत:चा शोध घेता येतो. मला असं वाटत होतं की, या शोधाच्या प्रक्रियेचा ऊहापोह एखाद्यातरी लेखात असेल. तसंच आजच्या तुफान गर्दीच्या माध्यमविश्वात मराठी चित्रपटांचं स्थान, आणि महत्त्व काय, याबद्दलही कोणी लिहावं, अशी माझी अपेक्षा होती.

माझा सूर अनेकांना नकारात्मक वाटेल, पण मूलत: आज मराठी चित्रपट ही महाराष्टाची सांस्कृतिक गरजच नाही, असं माझं मत बनत चाललं आहे. दूरचित्रवाणीमुळे होणार्‍या मनोरंजनामुळे आजचा प्रेक्षक कुपोषित झाला आहे, आणि उत्तम अभिरुची निर्माण होण्यासाठी जी ऊर्मी लागते, जो रेटा आवश्यक असतो, तो हल्लीच्या प्रेक्षकांमध्ये दिसत नाही. जास्तीत जास्त चांगल्या, सकस कलाकृती पाहायच्या असतील, तर प्रेक्षकांनी चित्रपटमाध्यमाची आपली समजूत वाढवली पाहिजे. प्रेक्षकांनी जर चित्रपटमाध्यमाला गंभीरपणे घेतलं, तर महाराष्ट्रात जसा प्रायोगिक रंगभूमीला थोडाफार आधार मिळाला, तसा आधार मराठी चित्रपटांना मिळून त्यांचा दर्जा नक्कीच उंचावेल. आज झालंय काय, की प्रेक्षकांना दोन मिनिटांचं मनोरंजन हवं असतं. इतर सर्व गोष्टींप्रमाणे मनोरंजनही तात्कालिक झालं आहे. चित्रपट सोपा हवा, कादंबरीही लगेच वाचून संपणारी असावी. त्यामुळे प्रेक्षक हा आस्वादक झालेला नाही. उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी उत्तम आस्वादकांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रेक्षकानं स्वत:ला चांगला आस्वादक बनवत राहणं, ही प्रक्रिया सुरू राहिली, तर चित्रपटक्षेत्रात वावरणार्‍यांवर एक चांगलं दडपण येईल, आणि चांगल्या कलाकृती तयार होतील.

***

अतिशय व्यग्र असूनही या स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल वीणा जामकर, गणेश मतकरी आणि गिरीश कुलकर्णी यांचे मन:पूर्वक आभार.

स्पर्धेच्या विजेत्यांची बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) व संजय छाब्रिया (एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रा. लि., मुंबई) यांचे आम्ही आभारी आहोत.

या स्पर्धेसाठी लेखन करणार्‍या आणि या लेखांवर भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. केवळ लेखांद्वारेच नव्हे, तर उत्स्फूर्तपणे कविता आणि प्रकाशचित्रांद्वारे चित्रपटांविषयीचं प्रेम व्यक्त करून या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व मायबोलीकरांना धन्यवाद.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

धन्यवाद.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

congrats all.... hatts off to sham..vish--all...:)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
तसेच लेख लिहिणार्‍यांचेही अभिनंदन कारण त्या निमित्ताने खूप चांगले लेख वाचायला मिळाले.

अरे लागले का निकाल?
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. Happy
नानबाला+१
मी ए आर रेहमानची इतकी मोठी फॅन आहे की त्याच्याविषयी काही लिहिण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने बरेच मॅड फॅन्स गोळा झाले ही माझ्यासाठी खुपच आनंदाची गोष्ट झाली. मजा आली. त्यासाठी संयोजकांचे आभार. Happy

प्रत्येक परीक्षक एकाच विषयाचं परीक्षण करणार आहे, हे अगोदर जाहीर करायला हवं होतं, हे बरोबर आहे. ते आधी जाहीर न केल्याबद्दल दिलगीर आहोत. पुढील स्पर्धांमध्ये अशी वेळ आली तर नक्की लक्षात ठेवू.
पण एका विषयासाठी तिघांनीही परीक्षण करणं, हे अवघड काम आहे. लेखांना शब्दमर्यादा नव्हती, आणि लेखांची संख्याही खूप होती. तिन्ही परीक्षकांनी सगळे लेख वाचणं, गुणांची सरासरी काढणं आणि मग निकाल जाहीर करणं हे परीक्षकांसाठी आणि संयोजकांसाठीही वेळखाऊ व किचकट झालं असतं.

गिरीश कुलकर्णी हा अत्यंत आवडता कलाकार आहे. (एकेरी उल्लेख त्यामुळेच). त्याच्या मनोगतावर विचार केल्यानंतर असं वाटून गेलं कि त्याला असं म्हणायचं होतं कि हो मी ही असाच कमेण्ट्स पास करायचो, नावं ठेवायचो. पण आम्ही तिथे थांबलो नाही. बदल घडवून आणावासा वाटला आणि आम्ही तो बदल घडवला.

वळूने नक्कीच हा बदल घडवला आहे. माझ्या लेखात त्याचा आढावा घेतला होता मी. दादबाईंचं म्हणणं शंभर टक्के पटलं. गेल्या वेळी मराठी सिनेमाच्या प्रमोशन्सला जाहिराती देताना काही ओळखी झालेल्या. गिरीशच्या पुढच्या सिनेमाला असा योग आला तर हळूच हा विषय काढून गप्पा मारता येतील :). माझा लेख दाखवून तो नतद्रष्ट मीच ही कबुलीपण देता येईल Lol खरंच अजून जाणून घ्यावंसं वाटतंय.

भाग घेतलेल्या सर्वांचं आणि विजेत्यांचं अभिनंदन अनेकवार.
निकाल बरोबरच वाटले.
सर्वांनी स्पर्धाभावनेच्या पलिकडे जाऊन मुक्त विचार मांडले होते. हे कोलाज मनोहारी तर होतंच, पण कित्येकदा अंतर्मुख करणारे विचार त्यातून सापडले.
अभ्यास थोडा कमी पडला असेल, आनंद खूप मिळाला.
परीक्षकांचे आभार या प्रक्रियेची बलस्थानं आणि दुर्बलस्थानं अचूकतेने दाखवल्याबद्दल.
मायबोलीचे पुन; आभार या छानशा उपक्रमाबद्दल, ज्यातून रुपेरी शतकमहोत्सवाबद्दल एक आपलेपण आपोआप जागे झाले.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!मायबोली अ‍ॅडमिन टिम,परीक्षक वाचक आणि अभिनंदन करणारे सर्व ,सर्वांचे आभार.या निमित्याने विविध स्पर्धकांच्या लेखानी जुन्या काळात नेल.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.मजा आली.समानधर्मा मित्रमैत्रीणी मिळाल्या.
सर्वांचे पुन्हः एकदा आभार.

गिरीश कुलकर्णींचे मत पटले.

<विजेते जाहीर झाल्यानंतर आणि स्पर्धेची सांगता झाल्यानंतर, तसेच सगळे गोड झाल्यानंतर 'पटले नाही' टोनची मते या धाग्यावर दिली जाऊ नयेत असे आपले मला वाटते. >> अनुमोदन. निदान ह्या विषयाच्या बाबतीत तरी द्राक्षे आंबट असे करु नये असे वाटते. हेमावैम.

द्राक्षे आंबटचा प्रश्न नाही सामोपचार. मायबोलीवरील सदस्य अश्या वृत्तीचे आहेत असे तुम्हाला का वाटावे की बक्षीस मिळाले नाही की लगेच फुरंगटून काहीतरी आरोप करतील. हा धागा निव्वळ विजेते जाहीर करण्याचा आहे म्हणून मी तसे म्हणालो.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

सर्व परिक्षकांची मनोगतेही आवडली.

एकूणात तिन्ही बाजूंना (स्पर्धक, परिक्षक, वाचक) यातून बरेच काही घेण्या, शिकण्या सारखे (मिळाले)आहे हे या ऊपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल.

श्री गिरिश कुलकर्णी यांच्या लेखावर तर मला अधिकच लिहायचे होते. मुद्दाम टाळले, पण आता लिहितोच.

१ ) हल्ली प्रत्येकच जण शिकवू पाहतो... ( हे शब्द नंतर बदलले आहेत का ? )

इथे प्रत्येकजण म्हणजे कोण हो.. अगदी प्रत्येक मराठी माणूसही असू शकत नाही. मराठी चित्रपट म्हणजे काही दिवाळीतले उटणे नाही. ज्याच्याशी आमच्या घराच्या, कुटूंबाच्या आठवणी निगडीत असाव्यात. जे स्थान दिवाळी अंकाना आहे ते सुद्धा चित्रपटांना, राखता आलेले नाही.

चित्रपट उद्योग म्हणताय ना ? मग तूम्ही एक उत्पादन बाजारात विकायला ठेवताय. पैसे देऊन ते ग्राहकांनी
विकत घ्यावे, अशी अपेक्षा ठेवताय. मग जर प्रेक्षकांना ते पसंत पडले नाही, पैश्याचा मोबदला मिळाला नाही,
असे वाटले, तर ते आपली पसंती / नापसंती व्यक्त करणारच. उत्पादकांना ग्राहकांच्या मताचा, मान
राखावाच लागतो.
केवळ स्वांतसुखाय, पुरस्कारांच्या स्पर्धेसाठीच बनवत असाल तर गोष्ट वेगळी.

२) आज मराठी चित्रपट ही महाराष्टाची सांस्कृतिक गरजच नाही, असं माझं मत बनत चाललं आहे. दूरचित्रवाणीमुळे होणार्‍या मनोरंजनामुळे आजचा प्रेक्षक कुपोषित झाला आहे, आणि उत्तम अभिरुची निर्माण होण्यासाठी जी ऊर्मी लागते, जो रेटा आवश्यक असतो, तो हल्लीच्या प्रेक्षकांमध्ये दिसत नाही.

मी वरच लिहिल्याप्रमाणे, हो तशी गरजच नाही, कारण मधल्या फार मोठ्या काळात, कोंडके / पिळगांवकर /
कोठारे आदी निर्मात्यांनी, प्रेक्षकांना, अगदी बालबुद्धीचे समजून, अत्यंत बालीश चित्रपट आणि तेही सातत्याने
सादर केले.

द्दूरचित्रवाणीवरचे कलाकार काय परदेशातून आलेत कि काय ? रोहिणी हत्तंगडी / इला भाटे / विक्रम गोखले /
विनय आपटे आदी रंगभूमी गाजवलेली मंडळीच आहेत ना, त्यात ? आता म्हणाल, पैश्यासाठी करतात ते.
करु देत कि, पण अभिनयाची भूक भागवेल, अशी सकस कलाकृती का नाही देऊ शकत तूम्ही त्यांना ?

रेटा हवाय ना, तोच या स्पर्धेतल्या लेखनाने मिळाला असे समजा. प्रेक्षकांना दोष देऊ नका, आधी आपण
काय सादर करतो आहोत, तेच जरा परत परत तपासून बघा..

आज जगातील उत्तम चित्रपट आमच्यासाठी उपलब्ध आहेत. भाषेचाही अडसर दूर सारून, ते आमच्या मनाला भिडताहेत. आणि अर्थातच, मराठी चित्रपटांबाबत, आणखी निराश व्हायला होते.

आणि आता २/४ उदाहरणे दिल्याशिवाय रहावतच नाही..

सुबोध भावेचा फोटो बघून एक सिडी विकत घेतली. सोबत उदय टिकेकर, मोहन जोशी वगैरे. कथानक काय
तर तो ड्र्ग अ‍ॅडीक्ट, सिरियल किलर.. संगीत म्हणाल तर कर्कश. अभिनय बेतास बात.. काय म्हणून आम्ही
या नावांना भूलावे. या चित्रपटाची सिडी तर मी कचर्‍यात फेकून दिली. नावसुद्धा लक्षात राहिले नाही.

वाडा चिरेबंदी उत्कृष्ट नाटक, मग त्यालाच आणखी दोन नाटकांची जोड देऊन, त्रिनाट्यधारा सादर झाले,
आणि अनेक वर्षांनी, तेच कथानक वास्तुपुरुष मधे आले !

गंध, एक नवीन प्रयोग म्हणून इथेच सर्वांनी त्याचे कौतूक केले, पण हिंदीत संधी मिळाली तर मात्र
त्यातली, त्यातल्या त्यात वाईट कथा निवडली. मग त्यात पाणी घालून पातळ केली, पाणी कसले तर
दाक्षिणात्य, उत्तान नाचांचे ! राणी मुखर्जी सारखी चांगली अभिनेत्री असताना, तिला "बाजूला बसलेली बाई"
मधली नायिका, सादर करणे जास्त आव्हानात्मक वाटले असते. पण काय कमी पडले, निर्मात्याचा आत्मविश्वास का ?

अधांतर, एक उत्तम नाटक. सर्वांनी वाखाणलेले. त्याचा चित्रपट (लालबाग परळ ) करताना भयंकर रक्तपात, हिंसाचार / उत्तान दृष्ये याचा आधार का घ्यावा लागला ? मुळ नाटकातला, अगदी शेवटच्या प्रसंगात दिसणारा, रक्ताळलेला शर्ट जास्त परीणामकारक होता हो.
मूळ नाट्कात, अगदी ओझरत्या, त्याही दारामागे घडणार्‍या प्रसंगात, सविता मालपेकरची मामी, नेमकी
ऊभी रहात असे. चित्रपटात उत्तान काश्मिरा शहाचे आणखी उत्तान दर्शन घडवून, काय साधलेत ?

अग्निपथच्या संगीताची संधी मिळाली, तर तीच जूनी चाल वापरलीत. चाली संपल्या कि नवे काही
करायची उर्मी ? आणि जर त्या चित्रपटात तूमचा सहभाग होता, ( तूमचा म्हणजे, मराठी माणसाचा हो )
तर आई, बाबा असे शब्द वापरात असणार्‍या घरातल्या मूलीचे नाव, शिक्षाच काय सुशिक्षा सुद्धा, असू शकत
नाही, हे का नाही सूचवलेत ?

म्हणजे मराठीत तर नाहीच करायचे, हिंदीत संधी मिळाली तरी, उजेड !
त्यापेक्षा कधी कधी हिंदी चित्रपटात, उत्तम मराठी वातावरण सादर झाले, त्यांचे कौतूकच करायला पाहिजे.
वातावरणच कशाला, मराठी पात्रे सादर झाली, गीता बाली ( बावरे नैन ), वहिदा रेहमान ( फागुन ) तब्बू ( हू तू तू ) परेश रावल ( हेरा फेरी ) , त्यावर समाधान मानू !

मराठी चित्रपटांचा प्रेक्षकच दूरावलाय असे नाही, तर निर्मातेही प्रेक्षकांपासून दूरावलेत.. असे वाटायला लागले, या मनोगतावरून !

दिनेश, तुमच्याकडून इतक्या संतप्त प्रतिक्रिया येऊ शकतात याची कल्पना नव्हती. हा अजिबातच आरोप नाही, मला फक्त नवल वाटले कारण मी तुम्ही असे काही लिहिलेले प्रथमच वाचले. पण तुम्हाला असे का वाटत नाही आहे की 'गिरीश कुलकर्णींचे मनोगत' असा तुम्ही एक बाफ काढून ते चक्क कॉपी पेस्ट करून खाली हे लिहावेत किंवा हेच मूळ बाफमध्ये लिहावेत?

तुम्ही ट्रिगर केलेल्या किंवा जोर दिलेल्या या चर्चेतून शेवटी 'जिंकलेली नांवे निवडली गेली हे काहीसे चुकलेच' असा सूर नाही का निघू शकणार? (तुम्ही किंवा कोणी उत्तम जुने सदस्य काढतील असे नाही म्हणत आहे मी, पण काही डुप्लिकेट आय डी किंवा काही असंतुष्ट आय डी वगैरे)

निकाल लागले आहेत. ते काही बदलणार नाही. ही स्पर्धा स्पर्धकांनी अत्यंत खेळीमेळीने घेतलेली दिसते. या स्पर्धेत क्रमांक मिळाल्याने पद्मश्री वगैरे किताब मिळणार नाही याची जाणिव प्रत्येकाला आहे. मात्र कुणी असंतुष्ट असावेत असं स्पर्धेत भाग न घेतलेले वाचाळ आणि उर्मट आयडी म्हणू शकतील ही शक्यता उद्भवते. कदाचित विजेत्यांना पारितोषिक मिळण्यापेक्षा एखाद्याला मिळाले नाही याचा विकृत आनंद ? एखाद्या वैफल्यग्रस्त व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य असल्याने ती निकालाच्या बाफवर कुणी लिहू नये म्हणत स्वतःच ठाण मांडून बसू शकते. नैराश्यग्रस्त व्यक्तीकडून दुस-याला शिकवण्याचे शहाणपण हे स्वत्:वर बंधनकारक असू शकते का ? Lol

माझे म्हणणे निकालाबाबत नाहीच आहे, त्या सर्वांचे अभिनंदन तर मी केलेलेच आहे.

आणि त्या सर्वांनी, किती कष्टपूर्वक लेख लिहिले आहेत, त्याचीही मला कल्पना आहे. ( ज्या देशांत ते स्पर्धक आहेत, तिथे त्यांना हि माहीती आणि संदर्भ मिळवताना, किती त्रास झाला असेल, याचीही कल्पना आहे. )

पण आम्हाला शिकवू नका ? आम्हाला सर्व येते, ( मुकाट्याने आम्ही बनवतो ते चित्रपट बघा.. ) हा पवित्रा मला अजिबातच आवडलेला आणि पटलेला नाही.

चाचा, स्पर्धेत मी भाग घेतला नव्हता ( तसा मी कुठल्याच स्पर्धेत भाग घेत नाही, एक तत्व म्हणून ) शिवाय सर्वच विजेते नव्हेत तर स्पर्धकच माझे, मित्र मैत्रिणी आहेत. त्यामूळे तूमची मते, मला निश्चितच लागू होत नाहीत.

दिनेशदा,

>> पण आम्हाला शिकवू नका ? आम्हाला सर्व येते, ( मुकाट्याने आम्ही बनवतो ते चित्रपट बघा.. )
>> हा पवित्रा मला अजिबातच आवडलेला आणि पटलेला नाही.

आपल्याला अनुमोदन. श्री. गिरीश कुलकर्णी यांच्या मनोगतात विसंगती दिसतात. याचं आजून एक ढळढळीत उदाहरण म्हणजे देऊळ चित्रपट निर्मितीमागील प्रेरणा. त्यांनी 'आजचा सवाल' या लोकमत वाहिनीवरील कार्यक्रमात आम्ही दत्तभक्त आहोत असा म्हंटलं. तर दुसर्‍या परिसंवादात 'देव विसर्जित करा हा संदेश देण्यासाठीच चित्रपटाची निर्मिती केली' अशी भूमिका घेतली.

गिरीश कुलकर्णी यांची वैचारिक भूमिका स्पष्ट नसल्याने मनोगतात विसंगत्या येणं साहजिकच आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages