मॅजेस्टिक प्रकाशन व एव्हरेस्ट एण्ट. पुरस्कृत मायबोली गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ - निकाल

Submitted by Admin-team on 1 November, 2012 - 11:22

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि. यांच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२ या कालावधीत ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं आयोजन केलं होतं.

स्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते, व एकूण ६३ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.

वीणा जामकर यांनी पहिल्या, गणेश मतकरी यांनी दुसर्‍या व गिरीश कुलकर्णी यांनी तिसर्‍या विषयासाठी परीक्षक म्हणून काम केलं.

गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

विषय पहिला - माझी आवड / आठवण.
प्रथम क्रमांक - "आप्पाचा सिनेमा... १६ एम एम" - -शाम
दुसरा क्रमांक - "अय स्साला...कोइ शक्क ?" - विशाल कुलकर्णी
तिसरा क्रमांक - निवडक दहा ! - मंजिरी सोमण
तिसरा क्रमांक - चित्रपट, मी आणि आठवणींचा कोलाज - रुणुझुणू
तिसरा क्रमांक - रुपेरी पडद्यावरील शेवटची कृष्णधवल ललितकृती- 'सरस्वतीचंद्र ' - भारती बिर्जे डिग्गीकर

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

तिसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे एक पुस्तक आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटाची एक सीडी / डीव्हीडी

***

विषय दुसरा - गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल

प्रथम क्रमांक - भारतीय सिनेमातील बदलती स्त्री-प्रतिमा - अश्विनीमामी
दुसरा क्रमांक - नायक नहीं खलनायक हूं मैं! प्राण ते विद्युत जमवाल - वर्षु नील

या विषयासाठी फक्त दोन विजेते परीक्षकांनी निवडले आहेत.

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

***

विषय तिसरा - माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

विषय तिसरा - माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट
प्रथम क्रमांक - माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट, मागणं लै नाही लै नाही - शोभनाताई
दुसरा क्रमांक - प्रभात फिल्म्सनिर्मित 'माणसाच्या पाठीवर' - pradyumnasantu

या विषयासाठी फक्त दोन विजेते परीक्षकांनी निवडले आहेत.

या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे चित्रपटविषयक पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांच्यातर्फे 'बाधा', 'तुकाराम' आणि 'खेळ मांडला' या दर्जेदार मराठी चित्रपटांच्या सीडी / डीव्हीडी.

पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी

***

विजेत्यांनी त्यांची बक्षिसं मायबोलीच्या पुणे येथील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी, ही विनंती. सर्व विजेत्यांशी मायबोलीच्या संपर्कसुविधेतून येत्या आठवडाभरात आम्ही संपर्क साधू.

***

वीणा जामकर यांचं मनोगत -

गाथाचित्रशती लेखनस्पर्धेत मला लेखांच्या स्वरूपात भेटलेल्या आणि चित्रपटांवर विलक्षण प्रेम करणार्‍या रसिकांना माझा नमस्कार!

ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही लिहिलेले सगळे लेख मी वाचले. वाचताना जाणवत होतं ते सिनेमाचं तुमच्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्त्व! जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा घटनेत सिनेमानं किती सहजपणे आपली स्वतःची ठोस जागा तुमच्या आयुष्यात निर्माण केली आहे, आयुष्यातल्या कित्येक सुखद, बर्‍यावाईट, अविस्मरणीय आठवणी या सिनेमाशी निगडीत आहेत, आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सर्वांनी इतकं मनापासून केलेलं लेखन वाचून मी अभिनेत्री असल्याचा मला अतिशय आनंद झाला.

तुमच्या चित्रपटप्रेमाचं मोजमाप होऊच शकत नाही. तुमचा आवडता नट, सिनेमा, गाणं, व्यक्तिरेखा यांच्यात तुलना होणं शक्य नाही. पण स्पर्धा म्हटल्यावर काही निकष असतात आणि त्यांचा आधार घेऊन क्रमांक द्यावेच लागतात. म्हणून ४९ लेखांपैकी ५ लेखांना मी बक्षीस द्यायचे ठरवलं. यात - १) विषयाची मांडणी २) शब्दरचना / शब्दशैली ३) विषयाचं निरीक्षण व आवाका या तीन मुद्द्यांना धरून मी गुण दिलेले आहेत. बक्षिसपात्र लेख या निकषांवर उत्कृष्ट ठरले, निर्विवादपणे!

चित्रपटांविषयी तुमच्या भावना जरी खूप प्रामाणिक असल्या तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते, की लेखनाला फार गांभीर्यानं न घेतल्यामुळे बरेच लेख हे अपूर्ण किंवा कमअस्सल वाटले. स्पर्धेसाठीचं लेखन हे पुरेशा गांभीर्यानं केलं गेलं असतं, तर ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता उत्तम लेखमाला झाली असती! लोक सिनेमा पाहत नाहीत असा ओरडा सुरू असताना प्रेक्षक सिनेमाला किती गंभीरपणे घेतात, हे अधिक ठळकपणे दिसून आलं असतं. विषयांचं, शीर्षकांचं वैविध्य (शीर्षकातून लिहिणार्‍याचा दृष्टिकोन कळत होता) ही अनोखी बाजू होती, पण निवडलेला विषय खोलात जाऊन मांडणं आवश्यक होतं. आवडत्या नटनटीबद्दल लिहिताना ती का आवडतात, याचा अनेक अंगांनी विचार करता आला असता. एखाद्या चित्रपटाबद्दल लिहिताना त्याची कथा सांगणं, हा लेखाचा हेतू नसून ती कथा तुम्हांला सुंदर का वाटली, कथा पडद्यावर कशी उतरली, कथेतलं, चित्रपटातलं तुम्हांला काय भावलं, हे लिहिणं अपेक्षित होतं.

समांतर सिनेमा, तद्दन व्यावसायिक सिनेमा यांबद्दलचे तुमच्यापैकी काहीजणांचे दृष्टिकोन मला अतिशय आवडले. दांभिक न होता तुम्ही व्यक्त केलेली स्पष्ट मतं अतिशय बोलकी आहेत! पण हे सगळं अजून खोलात जाऊन जास्त छान मांडता आलं असतं, ही चूटपूट सरतेशेवटी लागून राहते.

अर्थात तुम्ही कोणीही लिखाण कृपया थांबवू नका. किंबहुना या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू झालेलं चित्रपटांबद्दलचं हे लेखन नियमितपणे मायबोली.कॉमवर सुरू राहावं, आणि लेखमालेच्या स्वरूपात कायमस्वरूपी जतन व्हावं, असं मला वाटतं. त्यातून खूप मोठा दस्तऐवज भविष्यात तयार होईल, ही खात्री आहे.

पुन्हा एकदा सांगावसं वाटतं की, तुमच्या चित्रपटप्रेमाला कुठल्याही क्रमांकाची गरज नाही. तुमच्या चित्रपटाबद्दलच्या भावनांना क्रमांक देणं अशक्य आहे. त्यामुळे तुमचं लेखन असंच सुरू राहिलं तरच या स्पर्धेचा हेतू साध्य झाला, असं मी म्हणेन.

***

गणेश मतकरी यांचं मनोगत -

या स्पर्धेतील माझ्या विषयाच्या प्रवेशिका वाचणं, हा आनंददायी अनुभव होता.

स्पर्धेचं परीक्षण करताना लेखात समावेश असलेली माहिती, त्यासाठीचं संशोधन, विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन, काढलेले निष्कर्ष, अनुमानं, विषयाचं नावीन्य, लेखनकौशल्य आणि लेखकाची विचारप्रक्रिया या बाबींचा मी विचार केला. गुणांकन करताना श्रेणी देणं, किंवा अमुक एका विषयाला इतके मार्क देणं मला पटत नसल्यानं या सर्व निकषांचा मी एकत्रित विचार केला. लेखाद्वारे मला मिळालेला वाचनानुभव मला महत्त्वाचा वाटला.

'भारतीय सिनेमातील बदलती स्त्री-प्रतिमा' या लेखाला मी प्रथम क्रमांक दिला आहे. वर उल्लेख केलेल्या अनेक गोष्टी उत्तमप्रकारे या लेखात आल्या आहेत. लेखाची मांडणी अधिक चांगल्या प्रकारे करता आली असती, असं मला वाटतं. मात्र लेखकाने / लेखिकेने हा लेख लिहिण्यासाठी घेतलेले परिश्रम दिसून येतात.

'नायक नहीं खलनायक हूं मैं! प्राण ते विद्युत जमवाल' या लेखाला मी दुसरा क्रमांक दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायकांचा आढावा घेणं मला रोचक वाटतं. लेख वाचताना विचारांची स्पष्टता जाणवते. खलनायकांच्या पडद्यावरच्या प्रतिमांची उत्तम जाण, ही या लेखाची जमेची बाजू. लेखातील काही भाग मांडणीच्या दृष्टीने मात्र कमकुवत वाटतो.

माझ्याकडे आलेल्या प्रवेशिकांपैकी 'माझे बालपण ते आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीच्या तंत्रात झालेले बदल’ हा लेखही मला रोचक वाटला. चित्रपटांतील बदलांबद्दल हा लेख नसून चित्रपट बघण्यात झालेला बदल, हा लेखाचा विषय आहे, आणि हा विषय मला अतिशय आवडला. लेखाची मांडणी, भाषा उत्तम आहेत. कुठलाही आव न आणता हा लेख लिहिला आहे. या लेखाला बक्षीस द्यायला मला आवडलं असतं, पण लेखाच्या शेवटी या स्पर्धेच्या एका परीक्षकांचा उल्लेख आल्याने नाइलाजानं मला या लेखाला क्रमांक देता आलेला नाही.

माझ्याकडे आलेले लेख वाचल्यावर जाणवलं की, सर्व स्पर्धकांनी चित्रपटांबद्दल अतिशय प्रेमानं लिहिलं असलं, त्यातून ते चित्रपटांवर किती प्रेम करतात, हे कळलं, तरी त्यांच्या लेखांमधून (स्पर्धेचा विषय लक्षात घेता) हाती फारसं काही लागत नाही. संशोधनाचा अभाव, अपूर्ण माहिती हे महत्त्वाचे दोष बहुतेक लेखांमध्ये आहेत. विचारांचा गोधळही जाणवतो. या स्पर्धेत भाग घेतलेले सगळे हौशी लेखक आहेत, चित्रपटांबद्दलच्या निखळ प्रेमापोटी त्यांनी लेख लिहिले, हे लक्षात घेतलं, तरी लेखाची मांडणी आणि विषय लक्षात घेऊन माहितीचा आढावा हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. काही लेख तर अतिशय वरवर, आणि केवळ लिहायचं म्हणून लिहिलेले आहेत.

मायबोली.कॉमने आयोजित केलेल्या स्पर्धेचं परीक्षण करण्याची मला संधी दिल्याबद्दल आभार.

***

गिरीश कुलकर्णी यांचं मनोगत -

या स्पर्धेचं परीक्षण करताना मी संपूर्ण वाचनानुभव, तसंच लेखातली विचारप्रक्रिया यांचा प्रामुख्यानं विचार केला.

लेखनासाठी विषय दिला होता ’माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट’. माझ्यासारख्या काही प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांवर रोष होता, आणि आमच्या अपेक्षेतला मराठी चित्रपट तयार होत नव्हता म्हणून मी आणि उमेशने ’वळू’ तयार केला. त्यामुळे या स्पर्धेतील लेख वाचताना माझी दृष्टी ही परीक्षकापेक्षा एका प्रेक्षकाची अधिक होती. या मंडळींच्या काय अपेक्षा आहेत मराठी चित्रपटांकडून, हे जाणून घेण्याचं मला कुतूहल होतं. चित्रपट या माध्यमाचं, आजच्या काळाचं, भवतालाचं आणि होणार्‍या बदलांचं, स्पर्धकांचं स्वत:चं असं काहीएक आकलन या लेखांत असेल, अशी माझी अपेक्षा होती. कारण आपल्या अवतीभवती काय सुरू आहे, याचा प्रभाव कलेवर पडतोच. दुसरं म्हणजे माणूसही बदलतोय. त्याच्या जाणिवा, त्याच्या आवडीनिवडी बदलत आहेत. माध्यमांच्या विस्फोटामुळेही त्याच्यात अनेक बदल, क्वचित सुधारणा, होत आहेत. हे बदल आजच्या प्रेक्षकातही दिसून येतील, अशी माझी अटकळ होती. आज मराठी चित्रपटांमध्ये थोडेफार वेगळे प्रयोग होत आहेत. या प्रयोगांबद्दल विचक्षणपणे कोणी लिहावं, अशी माझी अपेक्षा होती. पण माझ्या सर्वच अपेक्षा पूर्ण झाल्यात, असं नाही.

हल्ली प्रत्येकचजण मराठी चित्रपटकर्त्यांना काहीतरी शिकवू पाहतो. तसा काहीसा सूर स्पर्धेत आलेल्या बहुतेक सर्व प्रवेशिकांमध्ये होता. हा सूर मला खटकला, कारण कोणाला शिकवणं हा स्पर्धेचा हेतू आणि विषय नव्हता. ’मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा’ हा स्पर्धेचा विषय नव्हता, ’माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट’ असा स्पर्धेचा विषय होता, आणि हा चित्रपट मीच, म्हणजे, स्पर्धकच, तयार करणार, हे ओघानं आलंच, कारण माझ्या अपेक्षा मी जेव्हा लिहितो, तेव्हाच एका अर्थी त्या चित्रपटाची आभासी निर्मिती मी करत असतो. त्यामुळे चुका दाखवून देणं, किंवा ऐकिव माहितीवर काहीतरी निष्कर्ष काढणं, किंवा पुरेशी माहिती नसताना दिग्दर्शकांवर, कलाकारांवर शाहजोगपणे टिप्पणी करणं, हे मला अपेक्षित नव्हतं. मी जेव्हा चित्रपटनिर्माता नव्हतो, तेव्हा मीही अशा टिप्पण्या करायचो. मात्र चित्रपट तयार करायला घेतल्यावर खरी परिस्थिती समोर आली. त्यामुळे अनुभूती घेतल्याशिवाय पक्की मतं बनवू नयेत, हे बरं. तुम्ही शक्यता व्यक्त करू शकता, पण जोरकसपणे ठाशीव विधान करणं, हे जरा वावदूकपणाचं वाटतं.

मात्र मला सगळ्यांत खटकलं ते स्मरणरंजनात रममाण होणं. स्मरणरंजनात रमलेला समाज निर्मितीक्षम राहत नाही. आजचा प्रेक्षकच असा स्मरणरंजनाच्या बेड्यांनी जखडला असेल, तर त्याला नवीन प्रयोग बघायला मिळतीलच कसे? नवं काही करू पाहणार्‍यांना या बेड्यांचा काच जाणवत राहणार. ते नवं काही करू शकणार नाहीत. त्यातच तांत्रिकदृष्ट्या उत्तम, चकचकीत चित्रपट हेच चांगले चित्रपट, असा विचित्र समजही अनेक लेखांमध्ये वाचायला मिळाला. या लेखांमध्येही पुन्हा हिंदी विरुद्ध मराठी चित्रपट, जुने चित्रपट विरुद्ध मराठी चित्रपट अशी तुलना होतीच. जुने मराठी दिग्दर्शक, त्यांनी केलेले चित्रपट ते आजचे दिग्दर्शक व आजचे चित्रपट, त्यांत असलेला चकचकीतपणाचा अभाव हा काही लेखनाचा, स्पर्धेचा विषय नव्हता.

मला असं वाटतं की, जगभरात जेव्हा कलेच्या क्षेत्रात नवनिर्मिती होत असते, तेव्हा काळाचे संकेत, चिन्हं, प्रभाव हे दिसत असतात. त्या अनुषंगानं आजच्या काळाशी सुंसंगत कथानकाची कोणी मागणी करेल का, कथानकविरहित, केवळ दृश्यात्मकतेवर आधारलेला चित्रपट कोणाला पाहावासा वाटेल का, याबद्दल मला उत्कंठा होती. पण तसं काही झालेलं मला दिसलं नाही. वर्षानुवर्षं ’लोकप्रिय’ असं जे काही तयार होत होतं, तेच आम्हांला आजही द्यावं, असंच बहुतेकांचं म्हणणं दिसलं. पण मग मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे, कारण प्रेक्षकांनाच नवीन काही नको आहे. मी जेव्हा चित्रपट तयार करतो, तेव्हा व्यावसायिक गणितं माझ्या डोक्यात नसतात. चित्रपट हे माध्यम मला नवनवीन प्रयोग करण्याची संधी देतं, आणि या प्रक्रियेतून मला स्वत:चा शोध घेता येतो. मला असं वाटत होतं की, या शोधाच्या प्रक्रियेचा ऊहापोह एखाद्यातरी लेखात असेल. तसंच आजच्या तुफान गर्दीच्या माध्यमविश्वात मराठी चित्रपटांचं स्थान, आणि महत्त्व काय, याबद्दलही कोणी लिहावं, अशी माझी अपेक्षा होती.

माझा सूर अनेकांना नकारात्मक वाटेल, पण मूलत: आज मराठी चित्रपट ही महाराष्टाची सांस्कृतिक गरजच नाही, असं माझं मत बनत चाललं आहे. दूरचित्रवाणीमुळे होणार्‍या मनोरंजनामुळे आजचा प्रेक्षक कुपोषित झाला आहे, आणि उत्तम अभिरुची निर्माण होण्यासाठी जी ऊर्मी लागते, जो रेटा आवश्यक असतो, तो हल्लीच्या प्रेक्षकांमध्ये दिसत नाही. जास्तीत जास्त चांगल्या, सकस कलाकृती पाहायच्या असतील, तर प्रेक्षकांनी चित्रपटमाध्यमाची आपली समजूत वाढवली पाहिजे. प्रेक्षकांनी जर चित्रपटमाध्यमाला गंभीरपणे घेतलं, तर महाराष्ट्रात जसा प्रायोगिक रंगभूमीला थोडाफार आधार मिळाला, तसा आधार मराठी चित्रपटांना मिळून त्यांचा दर्जा नक्कीच उंचावेल. आज झालंय काय, की प्रेक्षकांना दोन मिनिटांचं मनोरंजन हवं असतं. इतर सर्व गोष्टींप्रमाणे मनोरंजनही तात्कालिक झालं आहे. चित्रपट सोपा हवा, कादंबरीही लगेच वाचून संपणारी असावी. त्यामुळे प्रेक्षक हा आस्वादक झालेला नाही. उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी उत्तम आस्वादकांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रेक्षकानं स्वत:ला चांगला आस्वादक बनवत राहणं, ही प्रक्रिया सुरू राहिली, तर चित्रपटक्षेत्रात वावरणार्‍यांवर एक चांगलं दडपण येईल, आणि चांगल्या कलाकृती तयार होतील.

***

अतिशय व्यग्र असूनही या स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल वीणा जामकर, गणेश मतकरी आणि गिरीश कुलकर्णी यांचे मन:पूर्वक आभार.

स्पर्धेच्या विजेत्यांची बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) व संजय छाब्रिया (एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रा. लि., मुंबई) यांचे आम्ही आभारी आहोत.

या स्पर्धेसाठी लेखन करणार्‍या आणि या लेखांवर भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. केवळ लेखांद्वारेच नव्हे, तर उत्स्फूर्तपणे कविता आणि प्रकाशचित्रांद्वारे चित्रपटांविषयीचं प्रेम व्यक्त करून या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व मायबोलीकरांना धन्यवाद.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

धन्यवाद.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!! आणि त्याच बरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्यांचे.
खुप छान छान लेख वाचायला मिळाले त्या निमित्ताने.

सशल +१. दिनेशदा+१, बिनाआयडीचे खाते +१
गिरीश कुलकर्णींचे मनोगत पटले नाही. पुर्वग्रहदुषित वाटले थोडेसे. कुलकर्णींकडुन ही अपेक्षा नव्हती. एक प्रेक्षक म्हणुन पूर्वी त्यांचा रोष होता, हे कबुल केले आहे ना सुरवातीलाच, मग इतर प्रेक्षकांचा असला तर त्याला आक्षेप का?
तसेच एकही लेख आला नाही त्यांना अभिप्रेत होता त्या दृष्टीकोनाचा हेही पटले नाही.
तसेच दृश्यात्मक चित्रपटांची गोडी गायला, मराठीत आलेत कुठले दृश्यात्मक चित्रपट?

माझ्या लक्षात आले नव्हते की त्यांच्याकडे फक्त ३ क्रमांकाच्या प्रवेशिका गेल्या.
इन दॅट केस- आगाऊ +१.

जामकरबाईंचे मनोगत आवडले.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. पार्टी पायजे. Happy
संयोजकांचे आभार. Happy

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन, विशालचे पेशल अभिनंदन (त्याच्या लेखात माझेही चाराणे आहेत)! Proud
एका परिक्षकाकडे एकाच विषयावरचे लेख परिक्षणासाठी होते हे मला फार खटकले. स्पर्धेची घोषणा झाली तेंव्हा तसे स्पष्ट केलेले नव्हते. दुसरे असे की अशा प्रकारच्या स्पर्धेत एकाच व्यक्तीच्या नजरेतून मूल्यमापन होणार असेल तर ही परिक्षणाची फार चांगली पद्धत नाही.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

सर्वे परीक्षकांना आणि आयोजकांना धन्यवाद.

मला गिरीश कुलकर्णी यांचे विचार आवडले आणि पटलेही.

विजेते जाहीर झाल्यानंतर आणि स्पर्धेची सांगता झाल्यानंतर, तसेच सगळे गोड झाल्यानंतर 'पटले नाही' टोनची मते या धाग्यावर दिली जाऊ नयेत असे आपले मला वाटते.

त्यासाठी चर्चेचा स्वतंत्र धागा काढता येऊ शकतो.

विशालचे पेशल अभिनंदन (त्याच्या लेखात माझेही चाराणे आहेत)! फिदीफिदी>>>>>

त्याप्रित्यर्थ तुला चाराणे+चाराणे अशे आठ आण्याचे चणे चारण्यात येतील आगावा Wink
रच्याक धन्स, त्या दिवशी तुझ्याशी बोलण्यातून बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या, त्यामुळे मला लेखाची पक्की दिशा ठरवता आली. Happy

विजेते जाहीर झाल्यानंतर आणि स्पर्धेची सांगता झाल्यानंतर, तसेच सगळे गोड झाल्यानंतर 'पटले नाही' टोनची मते या धाग्यावर दिली जाऊ नयेत असे आपले मला वाटते.

त्यासाठी चर्चेचा स्वतंत्र धागा काढता येऊ शकतो. >>>>

हम्म

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन

सर्व परीक्षकांना आणि आयोजकांना धन्यवाद.

सर्व वाचकांचे आभार....

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही अभिनंदन...... Happy
संपूर्ण स्पर्धेतला प्रत्येक लेख मी वाचलाय.. निकालात अपेक्षित नावे पाहुन समाधान वाटले!

परिक्षकांची मनोगतेही छान!

दिनेशदा, आगाऊ >> +१

दाद - गिरिश कुलकर्णींच्या मतांमधे कळकळ जाणवते पण विरोधाभासही. असो... लिखित माध्यम नेहमीच योग्य असेल असं नाही... गप्पांच्या रुपात त्यांची मतं जाणून घेणं अधिक उपयुक्तं झालं अस्तं नै?) -- अगदी सहमत!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन (माझ्यासहीत ) Proud

मायबोली व्यवस्थापन आणि सर्व वाचक , तसेच तिन्ही परीक्षकांचे मनःपूर्वक आभार !

स्पर्धेची घोषणा झाली तेंव्हा तसे स्पष्ट केलेले नव्हते. दुसरे असे की अशा प्रकारच्या स्पर्धेत एकाच व्यक्तीच्या नजरेतून मूल्यमापन होणार असेल तर ही परिक्षणाची फार चांगली पद्धत नाही.>> आगाऊ ++

आणि पहिल्या विषयाचा आवाका खूप मोठा होता, ज्यात "मला भावलेलं गाणं", "मला भावलेला प्रसंग", "चित्रपटातलं कॅरेक्टर" ही अभिप्रेत होतं, पण बक्षिसं मिळालेल्यात असं एकच निवडलेलं कुणीच नाहिये, हे दिलेल्या विषयाला मॅच होत नाहिये असं मला वाटलं.. (परिक्षकाला त्यातले कुठलेच लेख आवडले नाहित ह्याची शक्यता आहेच, पण तिथे आगाऊचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो)

(माझ्या लेखाच्या मी प्रेमात असल्यानं बाहेरच्या "अ‍ॅप्रूवलची" गरज माझ्याकरता उरली नाहीये Proud , त्यामुळे निकाल लागले का, का लागले नाहित, ह्याची चौकशीही मी लेख टाकल्यापासून आजपर्यंत केली नाही.
त्यामुळे मला मिळालं नाही म्हणून असं लिहितीये, असं कुणाला वाटल्यास ते खरं नव्हे. कारण प्रामाणिकपणे तसं वाटलं :). आणि पुढच्या स्पर्धेकरता हे inputs मिळावेत असं वाटल्यानं इथे टाकतेय.)

ह्या स्पर्धेच्या निमित्तानं आवडत्या कॅरेक्टरवर, मनाजोगतं लिहितं गेलं, ह्याकरता संयोजकांचे आभार आणि सगळ्या विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन!

Pages