प्रवेशिका - १६ ( swaatee_ambole - कशाची टोचणी नाही ... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:55

कशाची टोचणी नाही, कुणाचा जाच नाही
चला! मेलोच असलो पाहिजे! शंकाच नाही!!

तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात अपुल्या मामला उरलाच नाही!

अचानक कारणावाचून विस्कटतात स्वप्ने
असे रात्रीसही होते मला, दिवसाच नाही!

तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!

मलाही द्यायची होतीच कबुली पातकांची!
कुठे निष्पाप न्यायाधीश सापडलाच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! निश्चितच अत्तापर्यंतची सर्वात सुंदर गझल!
गिरी, धन्यवाद. तुझी प्रतिक्रिया वाचेपर्यंत दिवस आणि रात्र उलट का वाटताहेत असा विचार करत होतो.. पण तीच मेख आहे हे झेपलं नव्हतं!
-सौरभ

वाह! निश्चितच अत्तापर्यंतची सर्वात सुंदर गझल!
-सौरभ

>>तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!

मलाही द्यायची होतीच कबुली पातकांची!
कुठे निष्पाप न्यायाधीश सापडलाच नाही!>>

सहीच! ८ गुण

अचानक कारणावाचून विस्कटतात स्वप्ने
असे रात्रीसही होते मला, दिवसाच नाही!

हा शेर आठवणीत राहिला आहे. वाह !!!

एक शंका आहे,

जर ही गझल (लगागागा*३ लगागा) वॄत्तात असेल तर


तुझ्यासाठीच जे होते, तुला देऊन झाले
कसे सांगू तुला - आयुष्य म्हणजे लाच नाही!

हा शेर या वॄत्तात कसा बसतो?
का.शा. संयोजक सांगाल का जरा !

कार्यशाळेत भाग न घेतलेले देऊ शकतात का गुण? तर माझे १०..
आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त आवडलेली गझल! प्रचंड खुष..!

बो-विश
छान पैकी बसतोय की वृत्तात. तुम्हाला का वाटतेय बसत नाहीये असे?

bsk - हो मायबोलीवरचे कोणीही गुण देऊ शकतात... बाकीच्या गझलना पण द्या गुण

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

नाही नाही, त्या शेराच्या वॄत्तात असण्याबद्दल मला काहीच शंका नाहीये.

माझा, 'तुझ्या' आणि 'म्हणजे' या दोन शब्दांच्या लघु-गुरू चा क्रम लावतांना जरा संभ्रम झाला, तो कसा लावला आहे अशी शंका होती.
तेवढेच जाणुन घ्यायचे होते !

वा वा वा!! क्या बात है.
सगळेच्या सगळे शेर खणखणीत!!
माझे गुण - ९. (माझंही सतीशसारखंच झालं.. याहून एखादी चांगली आली तर...)

पहिला शेर आणि शेवटचा शेर यांचा अर्थ बाकीच्या दोन शेरांशी विसंगत वाटतो आहे.
रचना सुंदर..

गुण - ४

प्राजु

मला सगळ्यात आवडलेली गझल ... जियो !
एकूण गुण -- ९
(अवांतर -- ही गझल माझी आहे किंवा नाही ! ह्यापैकी काहीच ठामपणे सांगून मी उत्सुकता कमी करणार नाही Happy )
-----------------------
'तुझ्या' आणि 'म्हणजे' -- ’लगा’ आणि ’ललगा’
कारण ’तुझ्या’ म्हणताना ’तु’चा उच्चार ऱ्हस्व आहे आणि ’म्ह’ हे कानामात्रा नसलेले जोडाक्षर आहे.
का.शा.चालक -- बरोबर आहे ना?

वा क्या बात है! माझ्या कडुन ९ गुण

सारंग आणि मित्रा, 'अपुल्या' मध्ये मला तरी 'आपल्याला नाही माहीत बुवा' किंवा 'आपण नाय कुणाला भीक घालत' मधला बोली भाषेतला लहेजा जाणवतोय... अर्थ 'माझ्या' असाच असला तरी! अगदी 'चला' या मतल्यातल्या शब्दानेही गझलेला अगदी व्याख्येप्रमाणे 'दोघांमधली बातचीत किंवा हितगुज' या लेव्हल ला आणून ठेवले आहे!
भाई म्हणतात तसेच 'मंझा हुआ' कलाकारच असपोअपाहीजे हे लिहिणारा!
एखादा बीबी काढून त्यावर कोणती गझल कोणाची असेल असा कार्यशाळार्संबंधित खेळ खेळायला हरकत नाही! Happy
माझा वाईल्ड गेस... प्रमो!! Happy
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

बोविश, संदीप यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? काही शंका असेल तर जरूर विचारा.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

छान आहे गजल. खरं तर शेरातील कल्पना मुळीच नविन नाहीत पण सादरीकरण चांगले आहे. गुण ७

वा ! फार सुरेख सगळी गझल अतिशय आवडली! मतला अप्रतिम!

आत्तापर्यन्तच्या १६ प्रवेशिका वरवर पाहिल्या तरी लक्षात येते की सर्वच्या सर्व गझलांच्या सर्व शेरांचा शेवटचा शब्द 'नाही' हाच आहे. कार्यशाळेचा हा अलिखित नियम तर नाही?
कविवर्य मोरोपंतांच्या पवित्र स्मृतीस हे [अदमासे] ८० शेर समर्पित करण्याचा कार्यशाळा-चालकांच इरादा तर नाही ?
का सर्व शायरांची प्रतिभा नकारघंटा वाजवल्याशिवय फुलत नाही?

अयोध्येत तो नाही
तो लंकेतही नाही
मायबोलीच्या शाळेत
राम राहिला नाही!

बापू करन्दिकर

'नाही' हा रदीफ दिला होता, म्हणून नकारघंटा वाजवल्या सर्वांनी Happy

कार्यशाळेचा हा अलिखित नियम तर नाही? >>>> अलिखित नाही हो. अगदी लिखित नियम आहे. खालच्या लिंक वर लिहिलाय पहा. Happy

http://www.maayboli.com/node/3629

गझल एक्दम झकास!
मतला आणि शेवट तर खासच!
माझे ९ गुण

क्षमस्व!
कार्यशाळेचे नियम मी बारकाईने वाचले नव्हते.
चूक माझीच होती!
भाग घेणार्‍या बिचार्‍यांनी तरी काय करावे?

बापू करन्दिकर

बापू,

तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे कळलं नाही. तुम्हाला कार्यशाळेत - आणि मुळात गझल या विषयात - रस आहे की नाही?
की केवळ 'यात काही अर्थ कसा नाही' हे हिरिरीने मांडण्यापुरताच रस आहे?

तुम्हाला गझल बद्दल काही प्रश्न/शंका असतील तर जरूर विचारा. आम्ही ६५ सहभागींचं शंकासमाधान करत आहोत. त्यात तुमचं ६६वं करू.
काही विधायक सूचना असेल तर करा. त्यावरही अगत्याने विचार केला जाईल, आणि योग्य वाटल्यास कार्यवाहीसुद्धा केली जाईल.

पण चार लोक मिळून निरपेक्षपणे एक उपक्रम चालवतायत; ६५ लोक मनापासून शिकतायत.. (तुमच्या मते हा उपक्रम निरर्थक असेल, पण त्यात कोणाचं काही वाईट तर होणार नाहीये?) असं असताना उपक्रमाचं कौतुक / त्याला मदत करायचं सोडाच (नाही, ते करू शकण्याला फार वेगळी मनोभूमिका असावी लागते), इथे येऊन नुसती बेजबाबदार विधानं करणं हे तुम्हाला (विशेषत: तुमचं वय लक्षात घेता) शोभत नाही.

'गझल म्हणजे काव्यच नव्हे, तो नुसताच नियम पाळण्याचा खटाटोप आहे' - अश्या प्रकारचं मत तुम्ही या आधी व्यक्त केलं होतंत.
तसं तुमचं ठाम मत असेल, तर ते मांडून झाल्यावर पुन्हा कार्यशाळेत डोकावण्याची इच्छा तुम्हाला का झाली? सोडून द्या ना.

बाकी इथला रदीफ जाऊ द्या, तुमच्या या एकूण भूमिकेलाही 'नकारात्मक' असंच विशेषण लावता येईल. 'नाही' रदीफ चा इतका बाऊ वाटत असेल, तर एक संपूर्ण आठवडा 'नाही' हा शब्द न उच्चारता राहून बघा, जमतं का?

एकदा आम्ही तुमच्या "प्रश्नांना" सौजन्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पण तुम्ही केवळ कार्यशाळेत बाधाच आणायच्या भूमिकेतून इथे लिहीणार असाल, तर हे सौजन्य पाळलं जाणार नाही.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

वा! भयानक सुंदर!!!
माझे गुणः ८

[१] मला काही प्रॉब्लेम आहे आणि तो मायबोलीच्या कार्यशाळेने सोडवावा यासाठी मी इथे येत नाही. त्यामुळे माझा [नसलेला] प्रॉब्लेम चालकांना कळला नाही तर ते क्रमप्राप्तच आहे.

[२] कार्यशाळेचा उपक्रम नक्कीच विधायक आणि स्तुत्य आहे. पण या कार्यशाळेतल्या प्रवेशिका प्रकाशित केल्या जातात तेंव्हा त्यावर बर्‍या- वाईट प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित असणार. सर्वच वाचकांनी सर्वच कवितांवर स्तुतीसुमने उधळावीत ही अपेक्षा मात्र गैरवाजवी ठरेल. कार्यशाळेचीहि अशी अपेक्षा नसणार असं मी धरून चालतो.

[३] 'नाही' हा रदीफ कार्यशाळेनेच दिलेला होता हे मला माहीत नसल्याने माझा गैर समज झाला होता, हे माझ्या लक्षात आल्यावर मी क्षमस्व म्हटलं होतं. 'नाही' या शब्दाला माझाच काय कुणाचाच विरोध कसा काय असणार? 'समस्या-पूर्ती' च्या धर्तीवर कोणी एखादं सदर चालवलं तर समस्येची पहिली ओळ अमुकच का निवडली असं विचारणं अयोग्य आहे, हे उघड आहे.

[४] कोणत्याही काव्यप्रकाराचा मी विरोधक नाही. पण काव्यगुणाबाबत, एक वाचक म्हणून, माझ्या काही आवडी-निवडी, काही मते असणार हे ओघानेच आलं. माझ्या मतप्रदर्शनामुळे कार्यशाळेला 'बाधा' येऊ शकते हे मला आधी समजतं तर मी नक्कीच प्रतिक्रिया दिल्या नसत्या. शेवटी, त्या एका अनभिज्ञ आणि सामान्य वाचकाच्या प्रतिक्रिया आहेत. नाही पटल्या तर द्या की खुशाल सोडून? मला कार्यशाळेकडून कसल्याही उत्तराची किंवा खुलाशाची अजिबात अपेक्षा नव्हती. तरीहि, चालकांनी उत्तरं देण्याचा मोठेपणा दाखवला याबद्दल मी आभारी आहे पण मी कार्यशाळेचा किंवा गझलचाच विरोधक आहे असा गैरसमज मात्र कृपया नसावा.

[५] वृत्त-छंदामधे कविता रचताना कवीवर काही बंधने येतातच. तरीहि त्यांवर मात करून उच्च दर्जाच्या आणि काव्यगुणाच्या कविता लिहील्या जातात तेंव्हा त्याचं मला अधिक कौतुक वाटतं. पण हेहि तितकंच खरं की एक सामान्य वाचक, कवीने व्याकरणाचे नियम पाळले किंवा नाही एव्हढंच पहात नसतो. किंबहुना, त्याला ते नियम आणि कायदे-कानू बर्‍याचदा माहीतहि नसतात. त्याचं लक्ष फक्त रसनिष्पत्तिकडे असतं. ती झाली नाही असं त्याला वाटलं तर तो ' ह्या कवितेत काही राम नव्हता' असं मानायला मोकळा असतो. आता हे आपलं मत त्यानं व्यक्त करावं किंवा नाही ह्याबद्दल काही मतभेद असू शकतात. मी माझी मतं जरा रोखठोक भाषेत व्यक्त केली, ती तशी [किंवा अजिबातच] व्यक्त नसती केली तर बरं असं आता मला वाटतंय पण खूप उशीरा.

[६] हस्ताक्षर सुधारण्यासाठी आधी ठराविक अक्षरं, नंतर शब्द, त्यानंतर सम्पूर्ण वाक्यं, गिरवून, गिरवून, घोटायला लावतात. त्या लिखाणातून काही अर्थ लागला पाहीजे असं कोणी म्हणत नाही. मला आता असं वाटतंय की गझल कार्यशाळेबाबतसुद्धा तेव्हढ्याच माफक अपेक्षा मी ठेवायला हव्या होत्या म्हणजे मग काव्यगुणांबाबत काही मतप्रदर्शन करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि कुणाचं मनहि दुखावलं नसतं. अर्थात हे कळायलाहि खूप उशीर झालाय हे मला मान्य आहे.

एकंदरीत काय? 'ओय, छड ये यार!'

-बापू करन्दिकर

एका चांगल्या गझलच्या प्रतिसादामध्ये हे बापू विरुद्ध संयोजक जे तुंबळ युद्ध चालू आहेत, त्याबरून काही शक्यता -
१. ही गझल बापूंचीच तर नाही? Happy
२. त्या रिआलिटी शोज सारखा याने इथला टीआरपी किंवा हिट रेट वाढेल असे काही आहे का?

वरच्या दोन्ही विधानांसाठी सर्बानी दिवे घ्यावेत ही विनंती..

कृपया ही चर्चा दुसरीकडे घेऊन गेलात तर या गझलेवर सर्वांना व्यवस्थित प्रतिक्रिया देता येतील.

सगळेच शेर सुंदर. शेवटचे दोन तर अप्रतिम... माझे ८ गुण

Pages