बार्ली चे आप्पे..

Submitted by सुलेखा on 25 October, 2012 - 13:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बार्ली.
२ टेबलस्पून उडदाची डाळ.
२ टेबलस्पून दही.
१ हिरवी मिरची.
१/२ इंच आले.
२ लसणीच्या कळ्या.
१/२ टी स्पून हळद.
१ टेबलस्पून तीळ.
मीठ चवीप्रमाणे .
१ लहान गाजर अगदी बारीक चिरुन .
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
अंदाजे ३ टेबलस्पून तेल.
१ इनो चा पाऊच्.[यातला १/२ चमचा इनो वापरायचा आहे.
हिरवी मिरची व आले ,हे आपल्याला तिखट किती प्रमाणात हवे त्या प्रमाणात घ्यावे.

हे आप्पे पात्र--Aappe 004.JPG

क्रमवार पाककृती: 

बार्ली साधारण गव्हाच्या लहान दाण्याप्रमाणे ,थोडीशी पांढरट दिसते.
वाटीभर बार्ली व उडदाची डाळ एकत्र करुन पाण्याने धुवुन घ्यावी.बार्ली बुडेल इतक्या पाण्यात ४ ते ५ तास भिजवुन ठेवावी.
बार्ली व भिजलेली बार्ली अशी दिसते.
Aappe 001.JPG
आता भिजलेली बार्ली + उडदाची डाळ +लसुण पाकळी चिरुन घ्यावी + हिरवी मिरची चिरुन घ्यावी+ आले किसुन घ्यावे + दही असे एकत्र वाटुन घ्यावे.हे मिश्रण अगदी बारीक न वाटता थोडेसे रवेदार /जाडसर वाटायचे आहे.
गाजर व कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी.वाटलेल्या मिश्रणात हळद ,गाजर व कोथिंबीर घालुन चमच्याने कालवुन घ्यावे.
Aappe 003_0.JPG
त्यानंतर आता या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ व १ टेबल स्पून तेल व १ टीस्पून इनो घालुन चमच्याने कालवुन घ्यावे.
आप्पे पात्राच्या प्रत्येक खळग्याला आतुन छान तेल लावुन ते गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
त्यात एक्-एक चिमुट तीळ घालावे.लगेचच त्या खळग्यात १-१ चमचा मिश्रण घालावे व वरुन पुन्हा १-१ चिमुट तीळ घालावे .
आता आप्पे पात्रावर एक झाकणी ठेवावी..
साधारण ३ ते ४ मिनिटाने झाकण काढुन आप्पे एका बाजुने खरपूस भाजले गेले आहेत का ते पहावेत.
सुरी चे टोक किंवा गोलाकार चमच्याने सर्व आप्पे उलटवुन घ्यावे व आता झाकण न ठेवता दुसरी बाजु भाजुन घ्यावी.
सर्व मिश्रणाचे असे आप्पे करावे. टोमॅटो सॉस , चटणी बरोबर आस्वाद घ्यावा..
Aappe 008.JPG

अधिक टिपा: 

तांदूळ व उडदाची डाळ तसेच जाड रव्याचे आप्पे आपण नेहमी करतो.यावरुन हे बार्लीचे आप्पे करण्याची कल्पना सुचली. लसूण अगदी थोडा वापरला आहे तरी त्याची चव जाणवते आहे.हे आप्पे बाहेरुन कुरकुरीत तर आतुन मऊसर लागतात.
मिश्रण वाटले कि लगेच त्याचे आप्पे करता येतात.मिश्रणाला खमीर आणण्याची आवश्यकता नाही.
बार्ली मधे फायबर व प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.
बार्ली,किराणा दुकानातुन ४८ रुपये किलो या भावाने आणली..ज्वारी /बाजरी /डाळी जशी सुटी आणतो तशीच ही बार्ली आहे.पॅक /डब्यात पॅक केलेली नाही..मेडिकल स्टोर मधे मिळणारी फार महाग असते.[सांज्यापेक्षा थोडा मोठा दाणा असतो व पांढरी असते.]पण सुटी आणलेली नैसर्गिक स्वरुपातली असते.

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्तच आहे हा प्रकार.
तुम्ही नेहमी अगदी 'हटके' पदार्थ करता.

एकदम स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प....
माझ्याकडे आप्पे पात्रच नाहीये....मी नेहमी उधारीचे आप्पे खाते सौथी फ्रेंड्स कडून....
रेसिपी मस्त आहे....आणि क्रमवार फोटोमुळे चुकायचे चान्सेस पण कमी आहेत....इडली पात्रात पण होतात का हे?

तुम्ही नेहमी अगदी 'हटके' पदार्थ करता. >>> रुनी + १
मस्तच आहेत हे आप्पे. फोटो पण तोंपासु. मला आप्पे खूप आवडतात पण सध्या नाहीये आप्पेपात्र माझ्याकडे. मायबोलीवर मला आप्पेपात्रात कोफ्ते करायची सॉलिड टीप मिळाली होती त्यासाठीही आप्पेपात्राचा उपयोग व्हायचा Sad

मस्त पाकृ.
बार्ली मधे फायबर व प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.>>>> लेकीला डब्यात द्यायला चांगले आहेत.
पण गार झाल्यावर चांगले लागतील का? आणि बार्ली कुठे मिळते?

नक्की करुन खाणार हे आप्पे.

पण गार झाल्यावर चांगले लागतील का? >>> निसान वगैरेचे थर्मॉस लंच बॉक्स मिळतात. त्यात छान राहातात आप्पे दुपारपर्यंत.

आप्पे पात्र नसल्यास ,लहान फ्राय पॅन वापरता येईल्.एकच मोठा ''आप्पा''करुन त्याचे सुरीने चौकोनी तुकडे करायचे.वरील प्रमाणाच्या
साहित्याचे २ आप्पे करावे लागतील.
तांदुळ+ उडदाची डाळ तसेच २ किंवा ३ डाळी व पोहे भिजवुन वाटुन करता येतात. तसेच नुसता जाड रवा दही व पाण्यात भिजवुन लगेच करता येतात.थंड झाले तरी छान लागतात.

अगदी कल्पक प्रकार.

दक्षे, बार्ली वॉटर ऐकले नाहीस ? आपल्याकडे सहज मिळते. उन्हाळ्यात पितात. मस्त चव असते आणि तोंडालाही छान चव येते.

एकच मोठा ''आप्पा''करुन >>
मग त्याला "आप्पासाहेब" म्हणावे लागेल Wink

रेसिपी छान आहे. मधुमेह का किडनी स्टोन ते आठवत नाही पण ह्या दोघांपैकी एका कुठल्यातरी विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना बार्ली वॉटर प्यायला सांगतात डॉ.

पण नुसती बार्ली मिळते हे माहीत नव्हते. आपल्याकडे फूड मॉल / जनरल स्टोर मध्ये मिळेल का ते पाहिले पाहिजे.

निंबुडा,
आपल्याकडे बार्ली किराणासामानाच्या दुकानात मिळते.मी तिथुनच आणली आहे.बार्ली मधुमेहावर चांगली आहे.आजारातुन उठलेल्या व्यक्तिला बार्ली सुप देतात्.म्हणजे ते शक्तिवर्धक व सुपाच्य आहे.
सुनिधी,
खरे म्हणजे खा.सोडा च वापरायचा आहे .पण मला घशाला त्रास होतो म्हणुन मी त्या ऐवजी इनो वापरते.
वेका,
इडली पात्रात उकडले जाईल,भाजले जाणार नाही.म्हणुनच लहान फ्राय पॅन मधे केले तर अगदी चालेल.

फ्राय pan सरळ gas वर ठेवायचा का? मधे लेयर वगैरे नको नं? म्हणजे खाली लागेल बिगेल म्हणून..

दक्शी, अगं मुंबईतलहानपणपासून बार्ली वॉटर ऐकलंय ...तुमच्याइथे वापरात नसेल Proud

छान आहे कल्पना .. रूनी +१ Happy

मलाही प्रश्न आहे की नेहेमीच्या आप्प्यांत सोडा घालत नाहीत तर मग ह्यामध्ये कशा साठी घालायचा?

Pages