उद्योजक आपल्या भेटीला - समीर करंडे

Submitted by साजिरा on 23 October, 2012 - 01:46

mSauda (एम-सौदा) हे इंटरनेटवर खरेदी-विक्रीच्या उलाढालीसाठीचं (ई-कॉमर्स) आणि ग्राहकांना एकत्र येण्यासाठी बनवलं गेलेलं व्यासपीठ- असं म्हणता येईल. समीर करंडे हे mSauda चे सह-संस्थापक. समीर यांना जवळजवळ १६ वर्षांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा अनुभव आहे. सुरुवातीला 'पर्सिस्टंट सिस्टिम्स'ची 'टेलेकॉम बिझिनेस' शाखा सांभाळत होते, ज्यात संपूर्ण जगभरातून जवळजवळ १००० लोक काम करत होते. यानंतर त्यांनी 'मोबाईल आणि वायरलेस बिझिनेस युनिट'ही सांभाळून त्याची उलाढाल अनेक पटींनी वाढवली. MobiPrimo या कंपनीचेही संस्थापक तेच होते. अमेरिकेतलं वातावरण जवळून बघितलेले समीर नंतर एक महत्वाकांक्षा ऊराशी जपत भारतात परतले. यानंतरचा त्यांचा आणि एकंदरच 'ई-कॉमर्स' व्यवसायाचा प्रवास त्यांच्याच शब्दांत..

***
या क्षेत्रातलं करियर तुम्ही केव्हा, कसं सुरू केलं? सुरूवातीच्या दिवसांत या प्रवासाला वळण देणार्‍या, वळण लावणार्‍या घटना कोणत्या?

samir2.jpg

'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युकिशन इंजिनियरिंग' ची पदवी घेतल्यानंतर माझं करियर सुरू झालं १९९५ साली. संगणक शास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीत मी गेलो आणि त्याच वेळी 'ओपनमार्केट' या कंपनीतही काम करण्यास सुरूवात केली. इथं आम्ही सर्वात पहिला 'बी-टू-बी ई-कॉमर्स ट्रन्झॅक्शन सर्व्हर' बनवला. त्यानंतर मी Lernout & Hauspie या कंपनीत गेलो, जी त्यावेळी 'speech and natural language processing' (NLP) मधली सर्वात मोठी कंपनी होती. आज आपण जो 'गुगल ट्रान्सलेटर' बघतो तशाच पद्धतीचं 'ऑनलाईन मशिन ट्रान्सलेटर प्रॉडक्ट' १२ वर्षांपुर्वीच आम्ही बनवलं होतं.

Lernout & Hauspie नंतर मी Comverse जॉईन केली. इथं आम्ही जगातल्या मोठ्यात मोठ्या आणि आघाडीच्या 'टियर-१ कॅरियर्स' सोबत काम करत होतो. २०००-०१ च्या सुमारास आमची टीम VoiceXML स्पेसिफिकेशन्स प्रमाणीत करण्याचं काम करत होती, जे आता आयव्हीआर अ‍ॅप्लिकेशन्ससाठी 'डी-फॅक्टो स्टँडर्ड' म्हणता येईल, असं आहे.

बाजारातल्या मोठ्या, आघाडीच्या आणि यशस्वी कंपन्यांबरोबर काम करण्याचा फायदा मला करियरच्या सुरूवातीलाच मिळाला. याबाबतीत मी सुदैवी ठरलो, असंच म्हटलं पाहिजे. नवीन गोष्टी शोधत राहणे आणि आधुनिकतेसोबत वाटचाल करत राहणे हाच या कंपन्यांचा मुख्य फोकस होता, आणि यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यामुळे मिळणार्‍या अनुभवासोबतच मिळणारा आनंद आणि समाधान हेही तितकंच महत्वाचं होतं. नवीन गोष्टी शोधण्यासाठी, तयार करण्यासाठी लागणारी मानसिकता इथं तयार झाली, आणि या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत काम करताना तिला खतपाणी मिळालं.

भारतात कधी परत आलात? आता मागे वळून बघताना तो निर्णय बरोबर होता, असं वाटतं का?

बोस्टनहून पुण्यात मी २००४ ला परत आलो. आता वाटतं की तो माझ्या करियरमधला योग्य वेळेला घेतलेला, सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय होता. टेलेकॉम, मोबाईल आणि ई-कॉमर्स क्षेत्रांत यानंतरच्या सात-आठ वर्षांत प्रचंड घडामोडी प्रचंड वेगाने कशा झाल्या, त्याला आपण सारेच साक्षीदार आहोत..!

यानंतरच्या तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासाबद्दल सांगा.

माहिती-तंत्रज्ञान / संगणक क्षेत्रातल्या जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी उद्योजक होण्याचं स्वप्न बघितलं असावं. प्रत्यक्षात स्थिरस्थावर जगणं सोडून उसळी घेऊन धकाधकीचं आयुष्य पत्करणं हे फारच कमी ठिकाणी होताना दिसतं. ज्ञान आणी इच्छाशक्ती तर हवीच, पण त्यासोबत लागणारा 'थ्रेशहोल्ड' हा सार्‍यांना मिळत नसावा. याबाबतीतही मी सुदैवी ठरलो. हे सारं आव्हानात्मक असूनही उत्साहवर्धक आणि समाधानकारक होतं. MobiPrimo ही आशियातल्या आघडीच्या १०० कंपन्यांपैकी एक झाली आणि नंतर तिला बे एरियाच्या PubMatic Inc. या मोठ्या कंपनीने विकत घेतलं.

mSauda.com बद्दल सांगा. या नावाचा जन्म कसा झाला?

आम्ही आजूबाजूला अनेक ई-कॉमर्स कंपन्या बघत होतो, ज्या त्यांच्या कार्यप्रणालीतल्या कार्यक्षमता आणि एका 'ट्रान्झॅक्शन'साठी लागणारा खर्च यासारख्या मुद्द्यांवर वेळ खर्च करत होत्या, लढत होत्या. या 'कार्यप्रणालीची कार्यक्षमता' आणि पारदर्शकता यांसारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करून शेवटी आम्ही धोरण ठरवलं, ज्याद्वारे बाजारात टिकू शकणार्‍या आणि नफा कमवू शकणारी एखादी कंपनी सुरू करू शकणार होतो. अर्थातच हे सारं- आमच्या होऊ घातलेल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी.

mSauda मधल्या 'm'चा अर्थ ‘masses on mobile’ आणि 'mSauda' म्हणजे सामान्यातल्या सामान्यासाठी 'बेस्ट बार्गेन' किंवा 'अत्त्युत्तम सौदा'!

mSauda हे एक साधं 'बिझिनेस मॉडेल' आहे ज्यात आम्ही जागतिक दर्जाचे ब्रँडस तयार करणार्‍या सॅमसंग, कॅनॉन, पॅनासॉनिक, निकॉन इ. सारख्या उत्पादकांकडून थेट खरेदी करतो, आणि वितरणसाखळीतल्या डीलर्स, सबडीलर्स, स्टॉकिस्टसारख्या एजंट्सना टाळून होणारा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो. अशा रीतीने बाजारातल्या किंमतीवर भरघोस सूट त्या त्या उत्पादनावर मिळू शकते.

mSauda हा एकच असा 'ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म' आहे, ज्यात ग्राहक छोट्या-मोठ्या संख्येने एकत्र येऊन स्वतःची एक फळी उभारू शकतात आणि एकाच प्रकारच्या वस्तुचं जास्तीत जास्त बुकिंग किंवा खरेदी करून त्या त्या वेळी जाहीर केलेल्या सूट योजनेंतर्गत जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतात.

ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या वेळी 'पेमेंट गेटवे कॉस्ट' भागवण्यासाठी आम्ही ग्राहकांना क्रेडिट किंवा डेब्निट कार्ड पेमेंटची सुविधा देतो. चेकने किंवा 'डॉटनेट ट्रान्झॅक्शन' करणार्‍या ग्राहकांपर्यंतही आम्ही बचतीचा त्या त्या वेळी होणारा फायदा आम्ही पोचवतो.

आणखी एक म्हणजे खिशातून जास्त पैसे आणि रोजच्या रूटीनमधला जास्तीत जास्त वेळ निर्णयप्रक्रियेत खर्ची पडणार्‍या, म्हणजे थोडाक्यात जास्त किंमतीच्या वस्तू, अशाच आम्ही विकतो. शांपू किंवा डायपर्ससारख्या वस्तू अर्थातच यात येत नाहीत.

mSauda.com च्या नजीकच्या भविष्यातल्या योजना काय आहेत?

mSauda.com चं ('लिमिटेड लाँच' म्हणता येईल, असं) लाँच आम्ही जुलै २०१२ मध्ये केलं, आणि फक्त पुणे शहर आणि विभागासाठी आम्ही सुरूवातीला सेवा देऊ केली. याला प्रतिसाद अतिशय उत्तम आणि आमचा उत्साह वाढवणारा होता. मग याच महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर २०१२ मध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र तसेच दिल्लीसाठीही या सेवेची व्याप्ती वाढवली. दरम्यान 'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स' मधल्या सॅमसंग, पॅनासॉनिक, फिलिप्स, सोनी; संगणक उत्पादनांसाठी एचपी, लेनोव्हो, एसर; मोबाईल आणि स्मार्टफोन्ससाठी सॅमसंग, एचटीसी, नोकिया, ब्लॅकबेरी; कॅमेरा/डीएसएलआरसाठी निकॉन, कॅनॉन इत्यादी अनेक कंपन्यांसोबत या सेवेसाठी भागीदारी केली.

सध्याही वेगवेगळ्या राज्ये, शहरे, विभागांसाठी सेवा वाढवणं आणि त्याचवेळी व्यावसायिक भागीदार कंपन्या / ब्रँड्स वाढवत राहणं हे सतत चालूच आहे. आता या क्षेत्रातल्या आधुनिकतम आणि नव्या गोष्टी करताना आणि आपली सेवा अगदी तळागाळापर्यंत देताना तुम्ही लवकरच mSauda ला बघाल. mSauda ही एक पाय रोवून उभं राहण्यासाठी योग्य तो नफा कमवून बाजारात भक्कमपणे आपलं अस्तित्व दाखवणारी आणि त्याचवेळी ग्राहकांना त्यांच्या पैशांचा सर्वोत्तम मोबदला मिळवून देणारी कंपनी आहे हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो.

या एका दशकातल्या भारतीय 'ई-कॉमर्स' उद्योगाच्या वाटचालीबद्दल तुम्ही काय म्हणाल?

इंडियन ई-कॉमर्स इंडस्ट्री ही 'लेट बुमर' म्हणता येईल. अमेरिका किंवा चीनमधलं याबाबतचं प्रगल्भ वातावरण बघता आपल्या इथं अजुन 'डेव्हलपमेंट स्टेज' आहे, असं म्हणायला हवं. याला अर्थातच आजवर अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. इंटरनेट वापरणारा वर्ग संख्येने कमी होता. जो होता त्यांच्यासाठीही पुरेशी 'ऑनलाईन पेमेंट गेटवे' नव्हती. हे सारं जिथं होतं, वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवणारं तत्पर माध्यम नव्हतं (लॉजिस्टिक्स). आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कायद्यांतल्या अडचणीच्या आणि किचकट तरतुदी. एखादं उदाहरणच द्यायचं झालं, तर 'फ्लिपकार्ट'ला आपल्या सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि वेळेचं तत्व काटेकोरपणे पाळण्यासाठी स्वतःची वितरण व्यवस्था उभारावी लागली. ती उभारण्यासाठी लागलेला खर्च आणि मनुष्यबळ ते इतर आवश्यक ठिकाणी वापरून जास्त वेगाने प्रगती सहज करू शकले असते.

मात्र आता भारतात हा उद्योग भरभराटीला येऊ घातला आहे. ठाम योजना, धोरणे आणि बाजारात जास्त काळ टिकून काहीतरी ठोस आणि भव्यदिव्य करून दाखवण्याच्या महत्वाकांक्षा बाळगुन अनेक मोठ्या कंपन्या यात कार्यरत आहेत. याशिवाय 'आम्ही का नाही?' असं म्हणत इतरही छोट्यामोठ्या कंपन्या त्यांना जमेल तसं काम करत आहेत. पोषक वातावरण नाही मिळालं किंवा काही गोष्टी कमी पडल्या तर यातल्या काही कंपन्या स्पर्धेतून बाहेरही पडतील, पण हे होणारच आणि व्हावंच. कुठच्याही उद्योगाच्या वाढीसाठी आणि एकंदरीतच निकोप वातावरण तयार होण्यासाठी हे सारं आवश्यक असतंच. या उद्योगात भांडवली गुंतवणुक करणार्‍या कंपन्या आता जास्त गांभीर्याने अभ्यास करू लागल्या आहेत. जास्त काळ भक्कमपणे टिकू शकणारे व्यावसायिक आकृतीबंध कसे राबवता येतील याचा विचार ते करू लागले आहेत.

इतक्या वर्षांत काय शिकायला मिळालं असं तुम्हाला वाटतं?

'एखाद्या उद्योगाची बांधणी म्हणजे भरपूर काम, वचनबद्धता, धोका पत्करण्याची वृत्ती, योग्य वेळ साधण्याची धडपड आणि थोडंफार नशीब यांचा संगम असतो'- हे! मात्र एक प्रचंड मोठी आणि यशस्वी कंपनी उभारणं यासाठी आधुनिकतेचा ध्यास, सतत नवीन शोधण्याची वृत्ती, नवंकोरं विकायला ठेवण्याचा ध्यास आणि सर्व योजना राबवण्याच्या पद्धतीत कुठेही चूक नसणं (फ्लॉलेस एक्झिक्युशन) यासारख्याही गोष्टींची जोड लागते.

नव्याने उद्योगव्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांना काय सांगाल?

'आताच आणि लगेच करा, पटकन पावलं उचला!' हे.
फक्त, धोका पत्करण्याची वृत्ती ही कितीही आवश्यक असली तरी देखील तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या कुटुंबाचं अस्तित्वच धोक्यात येईल असं काही करू नका.

तुम्ही जेव्हा स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचं उत्पादन सुरू करता, तेव्हा एखाद्या यशस्वी 'बिझिनेस मॉडेल'ची थेट कॉपी करण्याऐवजी नवीन आणि वेगळं असं काय देता येईल, याचा विचार करा. कधीकधी ग्राहकाला नक्की काय हवं, हे ओळखण्यात तुम्ही कमी पडू शकता. पण बर्‍याच वेळेला असंही होतं, की तुम्ही स्वतः सांगेपर्यंत किंवा मार्ग दाखवेपर्यंत त्यांना नक्की काय पाहिजे हे त्यांनाही कळत नाही- हे लक्षात ठेवा. आणि इथेच अनेक मार्ग, अनेक संधी दिसू, असू शकतात!

***

mSaudaच्या कामाबद्दल, ई-कॉमर्स व्यवसायाबद्दल आणि एकंदरीतच समीर करंडे यांच्यासाठी प्रतिसादांत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचं स्वागत आहे.

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाखतीसाठी धन्यवाद साजिरा Happy समीर करंडे आणि mSauda टीमला शुभेच्छा. नव्याने उद्योगव्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांनासाठी दिलेला सल्ला महत्वाचा वाटला.

एक प्रश्न : भारतात अजूनही घरगुती उपकरणे दुकानातूनच खरेदी केली जातात, जसे की फ्रिज/ वॉशिंग मशिन. या वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीसाठी कसा प्रतिसाद आहे?

अ‍ॅमेझॉन बरीच वर्ष प्रॉफिट मध्ये नव्हती. असं वाचनात आलं आहे.
सामान्य (इतर) व्यवसायांपेक्षा ह्या (ई-कॉमर्स) व्यवसायात नफा कमाविण्यासाठी जास्त कालावधी लागतो का?
का लागतो?

मुलाखत छानच.
साजिरा धन्यवाद !!!
समीर करंडे यांचेही धन्यवाद, व्यवसायातील प्रगतीसाठी शुभेच्छा.

छान मुलाखत.

mSauda पूर्ण भारतभर वस्तू पुरवू शकते का? तसे असल्यास, त्यांची वितरणप्रणाली कशी आहे?
तसेच, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटजी जाणून घ्यायला आवडेल.

चांगली मुलाखत.
उमदे आणि इंम्प्रेसिव्ह व्यक्तीमत्व...
यात MobiPrimo चा उल्लेख आला आहे. ती त्यांनी अमेरीकेत असताना सुरू करून इथेच विकली होती का? त्या कंपनीच्या प्रणालीविषयीही थोडी माहिती इथे प्रतिसादात दिलीत तर वाचायला आवडेल.

मस्त मुलाखत. समीर यांचे कौतुक!
भारतातले किचकट लॉजिस्टिक्स एमसौदा कसे सांभाळते हे जाणून घ्यायला आवडेल.

छान मुलाखत. समीरना अनेक शुभेच्छा.
काही प्रश्न:
एम्-सौदाची स्वतःची वितरणप्रणाली आहे का ते काम आउटसोर्स केलंय?

इ-कॉमर्स मध्ये अनेकानेक नवीन कंपन्या येत असतात. बरेचदा बिझिनेस मॉडेल्सही सेम असतात. तेव्हा रोज मशरुम होणार्‍या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी काय करता?

धन्यवाद. तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न ...

आत्ता पर्यन्त भारता मध्ये travel related eCommerce क्षेत्र यशस्वी होते, पण आता मात्र ग्राहक कपडे , electronics वस्तू, sports gear इ. online घेतात. ह्यातले बडे खिलाडी आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
ई- कॉमर्स मध्ये सध्या बर्याच कम्पनीज येतात आहेत. पण केवळ काहीच अश्या आहेत ज्यांनी आपले differentiation, business processes, per transaction economics ह्याचे गणित केले आहे.

होय, भारतातील बर्याच e-commerce कम्पनीज तोट्यात आहेत, त्यात काही मोठी नावे ही आहेत. eCommerce व्यवसायात फ़ार थोडी मार्जीन असते. जो पर्यंत कम्पनीज business processes, operating plans and algorithms ह्याचे योग्य ते गणित मांडत नाही, तोवर त्या ह्या उद्योगात टिकू शकत नाहीत.

eCommerce मध्ये दोन models म्हणता येतील, पहिले म्हणजे, inventory carrying model , अमॅझॉन, फ़्लिपकार्ट सारखे. या साठी मोठा cash flow तसेच forecasting accuracy ची आवश्यकता भासते. आपल्या processes या मॉडेल मध्ये fine tune करायला कम्पनी ला वेळ लागतो.

दुसरे म्हणजे, स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी करून . वस्तू deliver करणे. ह्यात inventory नसते, व जास्त cash flow ची गरज नसते.परन्तु विविध geohraphies मध्ये व्यवसाय वाढविण्या साठी प्रचंड मेहनत लागते. आणि योग्य तो दर ही मिळत नाही.

या पलिकडे जाऊन, mSauda ने असे मॉडेल विकसित केले आहे, ज्यात दोन्ही कडचे फ़ायदे उचलले आहेत.

ज्या area मध्ये आम्हाला लक्ष्य केन्द्रित करयचे होते, त्यातील top brands सह अम्ही partnership केली. आम्ही सरळ manufacturer कडून खरेदी करतो, inventory ठेवत नाही. ह्यात मोठ्या brands जसे की Samsung, Panasonic, Canon, Dell, Sony इ. सामिल आहेत. inventory cost नसल्यामुळे आमच्या ग्राहकांना आम्हाला जास्तीत जास्त discounts देता येतात.

तसेच mSauda चे काही logistics partners आहेत. सध्या सम्पूर्ण महाराष्ट्रात व राज्या बाहेर mSauda वस्तू supply करत आहे.

समीरजी, मायबोलीवर स्वागत!!

आपली मुलाखत वाचून तसेच आपण दिलेल्या प्रतिसादामधून बरीच माहिती मिळाली.

ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त रीत्या पोचण्यासाठी आपण कशा पद्धतीने मार्केटिंग करत आहात तेदेखील जाणून घ्यायला आवडेल.