गेट क्लोजर...
काय फंडा आहे...
नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा... म्हणून गेट क्लोजर?
कधीतरी अख्खं आयुष्यच झपाटून टाकणारं, काहीतरी गवसतं.... आयुष्यात आल्याचं कळतं. आपलाच एक भाग बनून जातं. त्याच्याविना आयुष्यं अधुरं, अपुरं वाटेल असं काहीतरी. त्याविना दु:खं अधिक गहिरं अन आनंदही कोमेजलेला असतो. त्याच्या मनातलं हसू आपल्या जिवणीवर झुळझुळतं, त्याची काळजी आपल्या काळजाचं पाणी होऊन भळभळते.... अन तिथं ओघळल्या सरीनं आपलं जग चिंब होतं.
नक्की कधी हे झपाटलेपण आयुष्यात आलं, कळतच नाही... आपण कुंपणं तयार करतो मनाच्या परिघांमधून... अगदी कवाडंही असतात. का कळत नाही मग हे अलवार, चाहुलीविना येऊन संगतीनं झुलणारं कुणी... आपल्याच मनाच्या मातीत कुणी रुजावं...
आपला अगदी कसलाच कंट्रोल कसा नाही?
स्वप्नं कधी सुरू होतं ते कळतं का? आपण एकदम स्वप्नातच असल्याचं लक्षात येतं... तसंच हे सुद्धा.
आपल्या हातातच नाही ह्यातलं काहीही.
स्वप्नं पडण्यावर आपला कंट्रोल नाही...
नको नको म्हणताना... स्वप्नं तुटतात... तसंच, हे ही.
निघून जातं... हे ही... तटकन तोडल्यासारखंच.
’चला... वेळ झाली, निघायला हवं’ असं दहा वेळा म्हणत, चौदा वेळा वळून निरोप घेण्याची तयारी नाही.
पुन्हा पुन्हा थांबून..., एकदा उठून उभं रहात, मग उंबरठ्यापाशी, मग कुंपणापाशी.... आपलं असलेपण असं कणाकणानं आवरत, हलके हलके जीव गोळा करून घेत नाही...
पुन्हा एकदा झपाट्यानंच...
आत्ता होतं आत्ता नाही असं. सट्टाकाकन... एकदम जातंच निघून.
आपल्या हातात नाहीच ह्यातलं काहीही. स्वप्नं पडणं नाही... ते धरून ठेवणं तर नाहीच नाही...
मग कुणी म्हणालं ना... "गेट क्लोजर... मूव्ह ऑन...." की... की...
कुणीतरी चारचौघात फाडकन कानफटात मारल्यासारखं झण्णं होतं... रक्ताचा कणन कण दाणदिशी डोक्याकडे धावतो, कानातून वाफा येतात, मुठी बळतात....
आपण मोठ्ठ्याने किंचाळतो... हाऊ? हाऊ कॅन आय? मूव्ह ऑन?... माझं.... माझं आयुष्यं होतं ते... जिवाच्या आकांताने आतडं पिळवटून, घसा खरवडून... आपण ओरडतो...
पण मनात!
अगदी बंद मुठींनी सगळं गच्चं आवळून, आवरून धरीत आपण किंचाळतो... पण मनातच.
चेहर्यावर मात्रं समजुतदारपणा लिंपून मान हलवतो... ’कबूल... खरंय...’ अशी...केविलवाणी.
अशा वेळी ’लेट गो’ म्हणजे काय? आपलं अस्तित्वं एक निव्वळ जडत्वं म्हणून उरलंय, त्यातलं चैतन्यं निघून गेलय... आता काय लेट गो?
विस्कटलेली रांगोळी बघितलीये? तसा प्रत्येक कणाला स्वत:चा म्हणून रंग असतोच... पण रांगोळीत्वं हरवून बसलेला कण... अर्थं नाही.
आपलं आयुष्यही तसंच... श्वास घेतो, भूक लागली की खातो, कामं करतो... आहोत आपले जिवंत...
अर्थं नाही.
अगदी हलक्या फुंकरीनंही... रांगोळी, कण कण विखरून विरून जाते... तसं विस्कटून जावं असं अत्यंत वाटूनही... आपण जगतो... जगत रहातो. आपलं विस्कटणं लिहिलेल्या त्या फुंकरीची हताश वाट बघत.
मग, मनाला लेपून राहिलेले त्याचे संदर्भं... वेढून राहिलेला त्यांचा सुगंध, त्यांचा रंग हे सगळं काळाबरोबर हल्लक होऊ नये, फिकटू नये म्हणून पुन्हा पुन्हा जगतो आपण... त्याच्याबरोबरचे आठवतील तितके, आठवतील ते ते क्षण... पुन्हा पुन्हा रेखतो आपण त्या आठवणींची रांगोळी.... मनातच.... पुन्हा पुन्हा...
प्रत्यक्षात मात्रं.... कणाकणानं विस्कटत रहातो आपण.... पुन्हा पुन्हा.
.... हलकट... हलकट आहे आयुष्यं.... कोलाज, सालं. कुठलेही तुकडे उचलून फेकले तरी बघणारा म्हणणार... "व्वा छान!"... किंवा "असूदे... चालेल!"... छान काय... चालेल काय?... काय कळतय ह्या चित्रातलं?
आभाळफाटल्या चित्राच्या मनाचा विचार केलाय कधी?
त्यानं रंगवलं म्हणून रंग,
त्याच्या चाहुलीनं गंध,
त्यानं गुणगुणलं म्हणून सुरेल,
त्यानं मांडलं म्हणून नीट...
त्यानं धस लावला तर तीट...
हो... असंच होतं... अगदी इतकच होतं..
हे हल्लक, हळवं, पोकळ, निरर्थक फोलपटाचं आयुष्यं... क्षणाक्षणानं अन कणाकणानं चिवडत बसलेल्याला कसं काय म्हणवतं?...
गेट क्लोजर...
आपल्या असण्याच्या प्रत्येक क्षणाला अन कणाला
नव्याने अर्थं देत बसावं लागतं तेव्हा होतात,
त्या, वांझोट्या प्रसुतीच्या वेदना...
अस्तित्वाचा हरेक कण अन जन्माला आलेला पुढला प्रत्येक क्षण
स्वत:च चाटुन-पुसुन स्वच्छ करतो... आपण नुक्ती चढवली अर्थाची चांबट कात...
अनर्थाचा चिखल होऊन बसतात कण अन क्षणही...
कशावर कंट्रोल आहे आपला?
त्यांचं चालूच... अजून एक कण... पुन्हा एक क्षण...
पुन्हा तेच रिकामं नासणं...
पुन्हा जन्मं...
पुन्हा... गेट क्लोजर!
जस्ट... गेट क्लोजर!
समाप्तं.
.
.
. . . . . वाचायला मी
. . . . .
वाचायला मी घाई केलेली दिसतेय.. शांतपणे वाचतो परत.
आपल्या हातात नाहीच ह्यातलं
आपल्या हातात नाहीच ह्यातलं काहीही. स्वप्नं पडणं नाही... ते धरून ठेवणं तर नाहीच नाही...
मूव्ह ऑन................!
एव्हढ आणि एव्हढच फक्त..
_/\_ केव्वळ जबरदस्त!
_/\_
केव्वळ जबरदस्त!
कुठून आलं हे सगळं मळभ दाद?
कुठून आलं हे सगळं मळभ दाद?
__/\__ काय लिहावं...
__/\__
काय लिहावं...
नव्हे नव्हे... आमच्याकडे सगळं
नव्हे नव्हे... आमच्याकडे सगळं सुशेगाद आहे... सुखरूप आहे.
(माझ्या एका सखीनं नुकत्याच चाललेल्या काटेभरल्या वाटेवर मनातूनच पाऊल टाकण्याचा एक प्रयत्नं... )
आयुष्य निरर्थक आहे हे आपल्या
आयुष्य निरर्थक आहे हे आपल्या मनाला/बुद्धीला न झेपणारे, न आवडणारे असते, आपण घाबरतो त्याला. त्यामुळे त्यातून काहीतरी, कसाही अर्थ लावणं, नसलेले रंग दिसणं, विखुरलेल्या ठिपक्यांना पाहिजे तसे जोडून हा असा आकार आहे अशी उगाच समजूत करुन घेणं हा खेळ आपण करतो.
आणि मान्य करा अथवा न करा; वी ऑल मूव्ह ऑन, एव्हरी मोमेंट, ऑल द टाईम! मग तक्रार कशाला?
खूप अंतर्मुख करायला लावणारा
खूप अंतर्मुख करायला लावणारा लेख......
हतबलता अगदी
हतबलता अगदी पोहोचली.प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी इतकं आणि असं असहाय्य,हतबल वाटतं का,असा प्रश्न पडतो मला नेहेमी...(वाटावं असं नाही,वाटतं का?असा प्रश्न)
मला वाटलं गेट क्लोजर टु समवन.
मला वाटलं गेट क्लोजर टु समवन. हे इमोशनल क्लोजर आहे ना? येतो हा अनुभव आणि मग छान आठवणी उरतात. रत्नजडित पेटीतली क्रिस्टलची अत्तर कुपी
दाद, पुन्हा एकदा __/\__ आगाऊ,
दाद, पुन्हा एकदा __/\__
आगाऊ, दुसर्या बाजूने विचार करता तुमचा प्रतिसाद पटला.
माझ्या मते, प्रश्न तक्रारीचा नाहीये..."वी ऑल मूव्ह ऑन, एव्हरी मोमेंट, ऑल द टाईम!" हे जरी खरं असलं (आवश्यक असलं) तरी "कर्मण्येवाधिकारस्ते..." इतकी अलिप्तता अंगी बाणणं आणि टिकवून ठेवणं शक्य नसतं..
ते जमत नाही मग अश्विनीमामी म्हणताहेत तसं त्यातही चांगली बाजू शोधतोच आपण...
आभारी आहे सगळ्यांची. आगाऊ
आभारी आहे सगळ्यांची.
आगाऊ काय किंवा आपण काय शुद्धीवर असल्यासारखं, अन शहाणपणाचं मनाच्या ज्या स्वस्थंसबल जमिनीवरून लिहितोय ती जमीनच काढून घेतल्या अवस्थेतल्या एकाचं/एकीचं हे स्वगत म्हणा ना... आहे.
उदा. डिप्रेशन असूच शकत नाही... डिप्रेशन कसं काय येतं कुणालाही? हे कुणीही स्वस्थं, स्वास्थ्यपूर्णं, सबल मनाचा माणूस जो अजून स्वतः कधीही डिप्रेशन मधे गेलेला नाही तो (कदाचित/नक्की) म्हणू शकेल.
जमीन नाही ही अवस्था संपते हो... हा आपणच निर्माण केलेला खेळ आहे... सगळेच जगतोच... मूव्ह ऑन होतोच... मग तक्रार कशाला करताय? हे ही खरच आहे.
पण आपल्या लेखाची नायिका... तिच्या दु:खाच्या पातळीला आपण गेलोच तर जे व्यक्तं होईल ते असंच असेल का? अशी असेल का ती तडफड? लॉजिक, रॅशनालिटी, रिअॅलिटी वगैरे सोडून असंच हतबल बोलेल का ती स्वतःशी?
इतक्याच पातळीवर तोलायचा (लायकीचा) हा लेख आहे.
तिला जे वाटतय ते बरोबर का चूक ही (अधिक गहन) चर्चा इथे होणं योग्यं होईल का?
अश्विनीमामी, आवडलं...
नाही झेपल !!! बहुतेक एवढी
नाही झेपल !!! बहुतेक एवढी विचारान्ची खोली नसावी..
पण एक प्रान्जळ मत आहे..दाद तुम्ही व्यक्तिचित्रण जास्त चान्गल लिहिता.....
उदा. डिप्रेशन असूच शकत
उदा. डिप्रेशन असूच शकत नाही... डिप्रेशन कसं काय येतं कुणालाही? हे कुणीही स्वस्थं, स्वास्थ्यपूर्णं, सबल मनाचा माणूस जो अजून स्वतः कधीही डिप्रेशन मधे गेलेला नाही तो (कदाचित/नक्की) म्हणू शकेल. >>> हे अगदीच पटलं... आणि अशा अनेक गोष्टी असतात......
आपल्या जीवनाचे चढ उतार हे ज्याचे त्यालाच पार करावे लागतात, जो तो त्याला आपापल्या परीने तोंड देतो..... ही/शी इज दी बेस्ट जज... समोरच्याला काय वाटते म्हणून कधीच नाही....
पण हे सगळं शब्दात उतरवणं फारच कठीण...
दाद, या सगळ्या लेखाचा संदर्भ जेव्हा तुझ्या दुसर्या प्रतिसादातून आला तेव्हाच मला तरी याचे थोडे फार आकलन झाले.....
केवढं संवेदनशील असावं,
केवढं संवेदनशील असावं, दाद...!! इतकं खोलवर आत पोहोचून कसं काय शब्दांत मांडता येतं जे काही धुमसतंय ते...
आगाऊ, सहमत. दाद, छान लिहिलंयस
आगाऊ, सहमत.
दाद, छान लिहिलंयस गं, पण आयुष्यात अशी कितीही कवाडे बंद केली तरी नविन दारे उघडतात.
संदर्भाशिवायही मला आवडलं
संदर्भाशिवायही मला आवडलं
मनाची घालमेल, भयंकर तरल शब्दात लिहून जातेस तू पुन्हा एकदा _^_
दादा, काही काळ मी हे अनुभवलं,
दादा, काही काळ मी हे अनुभवलं, पण मग एकदा स्वीकारलं कि आपल्याकडे कशाचाच कंट्रोल नाही, तर मग आहे तसे स्वीकारणे अवघड जात नाही. जबरदस्त संयम शिकलो, आणि मग तो कुठेही उपयोगाला येतो.
लेगॉस, नैरोबीच्या ट्राफिकमधे ४/५ तास अडकायचो, त्यावेळी गाडीतून बाहेर पडणेही शक्य नसायचे, पण मला
त्यावेळीही वैताग यायचा नाही.. रोज आपण इथून वेगात जातो, त्यावेळी रस्त्यावरच्या या गोष्टींकडे लक्ष जात नाही, आज अनायासे संधी मिळालीय, तर पाहून घेऊ.. असे म्हणत बसल्या जागी मस्त एंजॉय करायचो.
कित्येक विमानतळांवर मी रात्र रात्र बसून राहिलोय.. प्रत्येक क्षण अनुभवला !
आपण चिडलो कि त्रास आपल्यालाच होतो, जगाला काही फरक पडत नाही.
आवडेश...
आवडेश...
अगदी बरोबर... छान म्हणवत
अगदी बरोबर... छान म्हणवत नाही, चालेलही म्हणू शकत नाही. ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात येते, आणि इतक्या उत्कटतेने तर एकदाच. तेवढा एकच क्षण खरा जगण्याचा आणि शेवटचा. त्यानंतरचा प्रत्येक क्षण, हा उसना, पुर्वानुभवावर जोखून पाहिलेला आणि तरीही फसलं तर, आणखी एक लचका तोडून गेल्याचं दु:खही फार काळ न वाटू देणारा. तुम्ही अगदी योग्य शब्दांत मांडलीत.
सुंदर! धस लावला की तीट नुक्ती
सुंदर!
धस लावला की तीट
नुक्ती चढवली अर्थाची
हे शब्दप्रयोग जरा 'हटके' वाटले. त्या शब्दांची व्युतपत्ती please सांगाल का?
जी.एं. चं 'माणसे अर्भाट आनि चिल्लर' ची आठवण झाली! हा compliment घ्यायचा बरं का!
प्रभकर [बापू] करंदीकर.
yepp!
खुपच छान लिहलेय.... --^--
खुपच छान लिहलेय.... --^--
समोरच्या सिनेमातही गुंतून
समोरच्या सिनेमातही गुंतून जाणारी संवेदनशीलता स्वत;च्या आयुष्याशी कशी अलिप्त राहील ?
अटळ असे हे जगण्याचे भोग. द्वैती सृष्टीची व्यामिश्र रूपं.
अश्विनीमामी अन दिनेशदांचंही बरोबर,
तरीही.. शेवटी बोरकरांच्या शब्दात असंच काही शेष रहातं-
सुखद असो दु:खद वा
वरद तुझे स्मरण सखे
पाऊस वा ऊन असो
हृदयी कविताच पिके..
get closer की gate
get closer की gate closure?
=बापू
@दाद >पण आपल्या लेखाची
@दाद
>पण आपल्या लेखाची नायिका... तिच्या दु:खाच्या पातळीला आपण गेलोच तर जे व्यक्तं होईल ते असंच असेल का? अशी असेल का ती तडफड? लॉजिक, रॅशनालिटी, रिअॅलिटी वगैरे सोडून असंच हतबल बोलेल का ती स्वतःशी?
>इतक्याच पातळीवर तोलायचा (लायकीचा) हा लेख आहे.
>तिला जे वाटतय ते बरोबर का चूक ही (अधिक गहन) चर्चा इथे होणं योग्यं होईल का?
थोड्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहतोय.
इतर सगळ्या भावना, मनावरचे तरंग, आपण आपल्यापुरत्या एका चष्म्यातून पहात असतो आणि आपल्या नकळत आपले निष्कर्ष काढतो. पण त्या चष्म्याच्या काचेला तडे गेले असतील आणि ते आपल्याला कळालंच नाही तर त्या काचेतून दिसणार्या जगाबद्दल काय बोलणार कारण ते कुणालाच समजून घेता येणार नाही. आणि इतकंच नाही तर तुझा चष्मा फुटला आहे म्हणणारी व्यक्तीही आपल्या चांगल्यासाठी सांगते आहे हे ही कळणार नाही.
सगळ्यांना मनापासून
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
अजय,
<<थोड्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहतोय.
इतर सगळ्या भावना, मनावरचे तरंग, आपण आपल्यापुरत्या एका चष्म्यातून पहात असतो आणि आपल्या नकळत आपले निष्कर्ष काढतो. पण त्या चष्म्याच्या काचेला तडे गेले असतील आणि ते आपल्याला कळालंच नाही तर त्या काचेतून दिसणार्या जगाबद्दल काय बोलणार कारण ते कुणालाच समजून घेता येणार नाही. आणि इतकंच नाही तर तुझा चष्मा फुटला आहे म्हणणारी व्यक्तीही आपल्या चांगल्यासाठी सांगते आहे हे ही कळणार नाही.>>
आपल्या लेखातल्या नायिकेच्या चष्म्याबद्दल बोलताय असं गृहित धरून चालूया.
तिचा चष्मा फुटलाय हे अगदी लख्खं आहे. ते जग कुणालाच समजून घेता येणार नाही असं नाही. अपल्यापैकी कुणी ह्या प्रसंगांमधून गेले असतिल तर त्यांना नाही रिलेट होणार? किंवा प्रयत्नं केला तर काही अंशी तिच्या फुटक्या, हल्लक जगाची आपण कल्पना करू शकत नाही का?
अगदी जवळच्या कुणाच्या नशिबात आलेल्या अशा परिस्थितीत त्यांच्या जवळ जाण्याचा, त्यांना त्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमधली पहिली पायरी म्हणजे "सह-अनुभुती" नव्हे का?
मग त्या सह-अनुभूतीतून आलेला अनुभव मी लिहिलाय तसा असेल का? तो फुटका चष्माच काय तो खरा धरून चाललेल्या "तिला दिसणारं जगं असच धूसर, धुमसणारं, फुटकं, विखुरलेलं असेल का?"
ह्याच एका गोष्टीवर मापायला हवा हा लेख असं मी म्हणतेय.
तिला जे वाटतय ते चूक आहेच. माणसानं इतकं स्वत्वं गमावू नये हे, हरवू नये ह्याबद्दल शंकाच नाही.
पण तो मेसेज हा ह्या लेखाचा विषय नाही. ह्यावरच्या चर्चेला इथेही माझी ना नाही. पण ते लेखाच्या विषयाला धरून असणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
आता.... तुम्ही म्हणताय तो चष्मा माझ्याबाबतीत असेल तर प्लीज अधिक स्पष्टं
करून सांगाल का? मी फुटका चष्मा घालून वावरणं कुणालाच चांगलं नाही... मला नाही, इतरांनाही नाहीच. धक्कमधक्का होईल नाही तर काय?
छान...... विचारांना चालना
छान...... विचारांना चालना देणारं लेखन.
आगाऊ, अजय वगैरे म्हणतात -ते
आगाऊ, अजय वगैरे म्हणतात -ते सगळं बाहेर पडल्यानंतर. पडेपर्यंत काय? तेच दाद नं मांडलय.
No matter how strong you are/you are trying to be.. sometimes it can reach you..
ज्यांच्यापर्यंत ते कधी पोचलं नाही (ते समस्येपेक्षा जास्त कणखर असल्यानं असेल, झेपेल इतपतच सोसायला लागल्यानं असेल वगैरे) - त्यांना ते नाही कळणार..
we have to move on.. पण दु:ख, त्रास पचल्याशिवाय ते शक्य नसतं.
Pages