For here or to go...?

Submitted by Adm on 30 September, 2008 - 19:04

अपर्णा वेलणकर ह्यांचे For here or to go ? वाचलं..
१९६५-७० च्या सुमारास देशांतर केलेल्यांचे अमेरीकेत आल्यापासून ते अगदी उत्तरआयुष्यापर्यंत चे सगळे टप्पे मांडलेले आहेत. प्रस्तावनेतच म्हंटल्याप्रमाणे मराठी मध्यमवर्गाला सॉफ्टवेअर ची लॉटरी फुटण्याच्या तब्बल ३५-४० वर्ष आधी देशांतराच्या अग्नीदिव्यातून गेलेल्या माणसांची थरारक कहाणी..
अर्थातच ह्या सॉफ्टवेअरच्या वाटेवर स्वार होऊन तिकडे गेलेल्यांचं विश्व ह्या पुस्तकात दिसत नाही.
विषयाचा अवाकाच एव्हडा मोठा आहे की माझ्यामते जमवलेली सगळी माहिती ही सुसंगत पध्दतिने मांडण हेच मोठं आव्हान ठरू शकतं... प्रकरणांमधली विभागणी चांगली आहे फक्त प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातिला दिलेली प्रस्तावना तिच ती वाटते.. ह्यात दिलेले अनूभव हे सुमारे ३०/४० वर्ष जूने असलाने काही काही गोष्टी relate करता आल्या नाहीत.. पण निर्णय घेण्यात होणारी द्विधा मनस्थिती, देसी लोकांचं फक्त डॉलर आणि डॉलर च्या पाठी धावणं, इथल्या गोष्टींशी (राजकारण, खेळ, भूगोल, पर्यटन इ.) अगदी एकरूप नाही पण निदान समोरच्याशी संवाद साधण्याइतपतही माहिती न करून घेणं, कधीही बाहेर पडून देसीच खाणं, अस्थानी आपली संस्क्रूती/ समाज ह्यांचा बडेजाव मिरवणं हे पाहिलं असल्याने अगदी जवळचं वाटलं.. तसेच भारतातल्या नातेवाईकांचे (धरलं तर चावतय.. सोडलं तर पळतयं) टाईप अनूभव ही अगदी वास्तववादी आहेत..
लेखिकेचे स्नेही अमान मोमीन ह्यांचे विचार मात्र पटले नाहीत.. ते अगदीच दुसर्‍या टोकाचे वाटले.. अमेरीकत किंवा परदेशी गेल्यावर आपल्या गोष्टींसाठी अगदी अश्रू ढाळत बसू नये पण अगदी दुसरे टोक गाठून सगळं सोडूनही देऊ नये.. थोडं practical होऊन best of both the worlds घेण्याचा प्रयत्न करावा..
एकूण मांडणी आणि प्रस्ताविकांमधली थोडी repetitions वगळता एक चांगला आणि खूपच अभ्यासपूर्ण प्रयत्न वाटला.
आपल्यापैकी अनेकजण परदेशात आहेत. काही आत्ता गेलेले तर काही अगदी १०/१५ वर्ष परदेशी असलेले.. तुम्ही कोणी हे पुस्तक वाचलय का? वाचलं असल्यास तुम्ही ह्यातल्या अनूभवांशी relate करू शकलात का? किंवा तसेच अनूभव किंवा feelings तुम्हाला कधी आली होती का? नक्की सांगा.. वाचायला आवडेल.. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी Happy
--------
चिन्मय,
मंगला खाडिलकरांच्या पुस्तकाचे नाव -- 'ही आपलीच माणसं'.

मी शोभा चित्रे, दिलिप चित्रे, अजिता काळे यांची पुस्तकं वाचली आहेत. पण मला सर्वाधिक संध्या कर्णिकांची दोन्ही पुस्तकं आवडली: १) कुणास्तव कुणीतरी २) दिवा कुणाचा तेवत राही. या पुस्तकांचा उद्देश देखील परदेशात राहताना असाच आहे पण त्यातील भाव खूप प्रामाणिक आहे. दोन्ही पुस्तकं छोटेखानी आहेत.

बी,
मला वाटतं, 'कुणास्तव कुणीतरी' यशोधरा पाडगांवकरांच आत्मचरीत्र आहे. चु.भू.दे.घे.

ही साधी माणसं अगदी "सुमार" पुस्तक आहे. केवळ त्या लोकांच्या घरी राहून आल्यावर एक ऑब्लिगेशन म्हणून लिहिलेलं वाटत. ना त्यात साहित्य आहे ना त्यात व्यक्तिरेखा खास आहेत. लेखकाने माझ्या गळ्यात मारल म्हणून घेतल गेल. आणि मला वाटायच की मला कोणी भरीस पाडू शकत नाही. -:P

अपर्णाने अर्धशतकापुर्वि अमेरिकेत आलेल्या मराठी माणसांच्या आयुष्यावर हे पुस्तक लिहिल आहे. लेखिकेने पुस्तकाचा फ़्लो कमालीचा सुंदर ठेवला आहे. तिने विविध चॅप्टरस मधुन अमेरिकेतील मराठी माणसाच्या आयुष्यातले सर्वेच पैलु कव्हर केले आहेत. लेखिकेने पुस्तकात खालील विषयांवर कहाण्या लिहिल्या आहेत:

१. मराठी माणस इथे का व कधी येउ लागलीत
२. त्यांना इथे येण्याकरता आणी इथे आल्यावर सहन करावे लागलेले त्रास
३. इथे धड्पड करुन धंदा/ जॉब मध्ये प्रचंड यश मिळालेंच्या आणि धडपड करुन सुध्दा हाती निराशा आलेल्यांच्या कहाण्या
४. इथे आलेल्या मुलांची भारतातल्या मुलिंबरोबरची लग्न आणी कधी त्यातुन झालेली फसवणुक
५. मिश्र विवाह - भारतीयांने निवडलेले अमेरिकन साथिदार
६. इथे येउन अमेरिकनाइझ्ड झालेले काही तर काही मराठी संस्क्रूती उगाळत बसलेले आणी काहि दोन्हिंमधिल मध्य साधण्याच्या झटापटीत गुंतलेले.
७. इथे पर्फॉम करायला येणारया कलावंतांच्या चांगल्या - वाईट वागणुकीचे कीस्से
८. अमेरिकेत निघालेल्या मराठी व्रुत्तपत्र, पुस्तक, मॅगझिनस आणी महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेचा इतिहास
९. अमेरिका व भारत ह्या दोन्हि देशात राहण्याचे फायदे व गैरफायदे
१०. एबीसीडीज ची व्यथा
११. अमेरिकेत येणारे सासु- सासरे/ आई- वडिल - काही सारखे कंटाळलेले तर काही एकदम उत्साही
१२. इथे लग्न करुन येणारया पण जॉब न करणारया मुलींची गोष्ट
१३. काही इथे राहण्याचा निर्णय घेतलेल्यांच्या, काही परत गेलेल्यांच्या, तर काही अजुनही 'पुढल्या वर्षी परत जाऊ' असे बेत आखणारयांच्या
१४. महाराष्ट्र मंडळाच्या चांगल्या वाईट बाजुंच्या
१५. इथे आयुष्यभर राहुन इथेच निव्रुत्तीचे आयुष्य घालवणारयांच्या

लेखिकेने आनंदीवाई जोशींपासुन, येथील ग्रोसरि प्रॉब्लम ते देशापासुन-आपल्यांपासुन दुर राहण्यामुळे होणारा मानसिक त्रास नमुद केले आहेत. सर्व गोष्टी लेखीकेने इथे आलेल्या पिढीचा अभ्यास करुन स्वत:च्या ऑबझर्व्हेशनस वर आणी त्या पिढीतिल लोकांच्या मुलाखतींवर बेस्ड ठेवल्या आहेत.

मला हे पुस्तक खुपच आवडले, तुम्हालाही नक्कीच आवडेल अस कॉंफीडंट्ली सांगते...

आणखी एक. जेव्हा परदेशस्थ 'बुध्दीला मायदेशी मोल नाही' असं म्हणतात तेव्हा, बर्याचदा त्याचा अर्थ भारतात आरक्षणामुळे,भ्रष्टाचारामुळे उच्च शिक्षणाच्या संधी आणि नौकरी लवकर न मिळणे असा असतो. विशेषतः उच्च शिक्षणाच्या बाबतीत हे फार पटते. शिवाय,४-५ वर्षाआधी एवढ्या सहजासहजी नौकर्या उपलब्ध नव्हत्या हेही खरे आहे.
>>>> बरोबर. aaj open category madhalya dr lokansaathi phakta 1/2 jaaga asatat PG la.

हुश्श एकदाचं वाचवून संपवलं. अशा प्रकारातलं (परदेशस्थ भारतीय) हे पहिलच.

ऍडमाने म्हंटल्याप्रमाणे प्रत्येक लेखांचे प्रस्ताविकच नव्हे तर संपूर्ण पुस्तकभर त्याच त्याच उपमांनी आणि context ने भरलेली वाक्ये आहेत. "१९६० च्या दशकात उत्तर अमेरिकेत आलेल्या मराठी" हे वाक्य तर इतक्या वेळा येतं. त्यापेक्षा सुरुवातीलाच हे पुस्तक उत्तर अमेरिकेत बहुतेक करुन १९६० च्या दशकात येउन राहिलेल्या मराठी लोकांविषयी आहे असं सांगितलं असतं तर २-३ पानं कमी झाली असती.

दूसरे एक निरिक्षण असे की ह्यात ज्या काही गोष्टी आल्या आहेत त्या सर्व स्थलांतरीत मराठी सुपुत्रांच्या दृष्टिकोनातुन आहेत, म्हणुन मला फार एकांगी वाटतात. कोणाच्याच भारतात मागे राहिलेले आई-वडील, भावंडं, मित्रपरिवार ह्यांना आपले प्रियजन दूर गेले, बरीच वर्ष ताटातुट झाली ह्याबद्दल काय वाटले ते कुठेच आले नाहीये.

एका ठिकाणी असाही उल्लेख आहे की काही लोकांच्या मागे आई-वडिलांना आर्थिक मदत अथवा भावा/बहिणींच्या लग्नाशिक्षणाचा "लळालोंबा" नव्हता. कमावत्या मुलाने (आणि आजकाल मुली देखील करतात) आई-वडिलांचा सांभाळ करणे ही पद्धत भारतात सर्रास आहे. तुम्हाला ते आवडत नसेल तर तसे म्हणा, परंतु प्रस्तावनेत ज्या पुस्तकाला स्थलांतरीतांचा अभ्यास करणार्‍याला हे पुस्तक सोडुन पूढे जाताच येणार नाही अशा अर्थाचे मानपत्र मिळाले आहे त्यात भारतीय कुटुंबव्यवस्थेचा "लळालोंबा" म्हणुन उल्लेख मला खूपच खटकला.

ह्या लोकांनी आजच्या पीढीच्या मानाने खूप कष्ट काढले आणि त्याबद्दल त्यांच्याविषयी आदरही आहे. पण जे काही केले ते स्वतःसाठी, स्वतःच्या जबाबदारीवर केले ना. मग त्या भांडवलावर भारतातील नातेवाईकांपासून ते कलाक्षेत्रातल्या मंडळीपर्यंत सगळ्यांना जमेल तितकी नावे का ठेवता ? तो अधिकार ह्यांना कुणी दिला ?

अजून एक भलता विनोदी उल्लेख आहे तो भारतातील नातेवाईकांच्या अपेक्षांबद्दल. ह्या मराठी बांधवांनी आपल्या नातेवाईकांना म्हणे दुखः होउ नये म्हणून आपली खरी परीस्थिती कधी त्यांना सांगितलीच नाही. म्हणजे इथे सर्व काम घरी करावे लागते, बेबी-सीटर, कामाची ओढगस्त वगैरे. आई-वडीलांना जर कुणी तसे सांगितले नसेल तर एक वेळ समजु शकतो परंतु, "अमेरिकेत कामवाली बाई पण स्वतःच्या गाडीतुन येते (आमच्याकडे बाई नाही हे नाही कुणी सांगितले)", "शी: कसे काय रहाता इंडियात. जेव्हा बघावे तेव्हा वीज गेलेली", "इंडियात पाणी प्यायचे म्हणजे...", "आमच्या अमेरिकेत नै बै अशी धूळ..." अशा अर्थाची अनेक वाक्ये मी माझ्या, मित्र-मैत्रिणींच्या, शिक्षकांच्या, आई-बाबांच्या मित्रमंडळीत ज्यांना कुणाला अमेरिकेत गेलेले नातेवाईक आहेत त्यांच्याकडुन अनेकदा ऐकली आहेत. अमेरिकेत काही कमी कष्ट नव्हते, पण मग इथे येउन असं बोलायचं आणि वर कोणाला वाईट वाटु नये म्हणुन आम्ही खरी परीस्थिती सांगितली नाही म्हणायचे. नातेवाईकांचे टोमणे ऐकुन आमची भारत-वारी नुसती मनस्तापाची व्हायची अशा उलट्या बोंबा. तसेच मुलीला अमेरिकेतील स्थळ किंवा मुलाला जॉबसाठी लकडा लावणार्‍या नातेवाईकांचा उल्लेख आहे. जर तुम्ही नाजूक,पातळ पार्‍यांचे उकडीचे मोदक खायला हक्काने आत्याकडे जाउ शकता (आणि ते तसे खाउ न घातल्याबद्दल तक्रारही करता), तर ती आत्या काही काम घेउन आली तर लगेच पुस्तकात छापणार काय. एकुणात बाकी लेखकांनी आपल्या मनासारखं लिहिलं नाही म्हणुन ह्या बाईंकडुन लिहुन घेतलं असं अधुन-मधुन वाटतं.

अर्थात पूस्तक पुर्णत्वाला नेण्यात लेखिकेने पुष्कळच कष्ट घेतले असावेत असे त्यात आलेली बाकी माहिती आणि शेवटी दिलेली रेफरन्स लिस्ट बघून कळते.

दूसरे काही वाचण्यासारखे नसेल आणि अमेरिका व अमेरिकेत आलेली लोकं ह्यांच्याविषयी अती पुळका असेल तर जरुर वाचा असे मी म्हणेन.

एकुणात वर्णन वाचून शंका आलीच होती पण शिंडीबायचं वर्णन ऐकून खात्री झाली काय राग आळवलाय या पुस्तकात तो. ३ वर्षात असे नमुने भरपूर भेटलेत त्यामुळे पुस्तक वाचायची गरज उरली नाही. धन्स गो शिंडे!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

एकूण मांडणी आणि प्रस्ताविकांमधली थोडी repetitions वगळता एक चांगला आणि खूपच अभ्यासपूर्ण प्रयत्न वाटला. >> एकदम बरोबर बोललास. अगदी संदर्भ ग्रंथ म्हणून नाही पण ह्या विषयाशी जि काही पुस्तके वाचली आहेत त्यात हे अधिक उजवे वाटले. एका त्या अनुभवातून न गेलेल्या व्यक्तीने केलेले compilation असल्यामूळे जास्ती balanced वाटते. "आहे हे असे आहे" नि "आहेत ती मते अशी आहेत." (चुकीची कि बरोबर ते ठरवण्याचा अधिकार माझ्या मते लेखिकेला नि मलाही नाही) अशा प्रकारचे स्वरूप धरून पुस्तक वाचले कि खटकण्याजोगे मला फारसे काही सापडले नाही. ह्याउलट एक माहित नसलेली पिढी कळली. मराठी मंडळाच्या कार्यकारणीमूळे ह्या पिढीतल्या ज्या काही लोकांशी संबंध आला त्यांची विचार करायची पद्धत आपल्यापेक्षा (पक्षी : गेल्या दहा बारा वर्षांत इथे आलेल्यांपेक्षा किंवा in general देशी लोकांपेक्षा) एव्हढी वेगळी का ह्याचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले Happy

आणि घरकामांबद्दलचा, कष्टांबद्दलचा एकूणच उदो उदो मला प्रचंड खटकतो. इथे राहणारे घरी सगळी कामे करतात हे अगदी मान्य आहे, पण भारतातले काही घरी नोकर चाकर असणारे सोडले तर बरेचसे लोकं प्रचंड कष्ट करतात. सकाळी ४-४.५ ला उठून, डबे करुन, कुकर लावून गाडीत उभ्या राहून कामाला जाणार्‍या, येताना भाजी निवडणार्‍या बायका नाहीत का? जिवापाड
काम उन्हातान्हात करूनही पुरेसे अन्न नसणारे मजूर, शेतकरी नाहीत का?

आपण परदेशात राहतो ते तिथल्या चकचकीत राहणीमानाचे, सुखसोयींचे आणि पैशाचे आकर्षण असते म्हणून, आणि घरी सगळी कामे करणे हे त्यासाठीच पत्करतो. मग त्याचा उदो उदो कशाला?

असाम्याला अनुमोदन.

बाकी मला दोन्ही बाजूंनी गळे काढणार्‍यांचा राग येतो. 'तुमचं बरं आहे हो!' याच्याइतकं वैताग आणणारं दुसरं विधान नसेल. प्रत्येकच राहणीमानाचे काही फायदे काही तोटे असतातच आणि त्यांपैकी एक निवडण्याचा निर्णय आपलाच असतो. मग तक्रार कशाला?

भाग्यश्रीला पूर्ण अनुमोदन.
बाकी हे पुस्तक वाचलं नाहीये. इथली चर्चा वाचून वाचण्याची इच्छा झालीय.

अर्थातच ह्या सॉफ्टवेअरच्या वाटेवर स्वार होऊन तिकडे गेलेल्यांचं विश्व ह्या पुस्तकात दिसत नाही.
कारण त्यांचे विश्व व खूप आधी (३०, ४० वर्षांपूर्वी) आलेल्या भारतीयांच्या विश्वात जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रत्येकच राहणीमानाचे काही फायदे काही तोटे असतातच आणि त्यांपैकी एक निवडण्याचा निर्णय आपलाच असतो. मग तक्रार कशाला?
अनुमोदन. उच्च शिक्षणासाठी आलेल्या, व अनेक वर्षे इथे काम करून परत गेलेल्या माझ्या मित्राने मला हेच सांगितले. तो म्हणाला, अडचणी सगळीकडेच आहेत. त्याला इथे वेगमर्यादा ओलांडण्याबद्दल अनेकदा दंड झाला भारतात होत नाही(!?), इथे नोकर नाहीत, भारतात अनेक. इथे लाच द्यावी लागत नाही, कामे भराभरा होतात, तिथे नाही. पण हे सगळे समजून यातील जिथे आपल्याला योग्य व सोयीचे वाटेल तिथे रहावे, उगाच नावे ठेवण्यात वेळ घालवू नये.

सिंडी, पटलं लिखाण. असामीचंही मत पटलं. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने त्या काळात आलेल्या पिढीचं जास्त जवळून दर्शन झालं इतकंच.
अज्जुका, एकदा वाचून बघायला काहीच हरकत नाही.

सायो,
मी लिहिलं वाचणार नाही तरी हातात पडलं पुस्तक तर वाचेनच गं. फक्त पुस्तकासाठी आटापिटा करणार नाही इतकंच गं! Happy
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

परवाच वाचुन संपले हे पुस्तक. अगदी सतत त्या पिढीने किती कष्ट केले हे सतत लिहिलेले आहे अगदी शुन्यातुन जग निर्माण केले हे कितीही खरे असले तरी पुस्तक एकतर्फीच वाटले. सिंडरेला म्हणते तसे त्यांच्या भारतात राहिलेल्या प्रियजनांशी अजिबात न बोलता एक्तर्फी अनुमान काढलेय असे वाटते. तरी पुस्तक एकदा वाचावे असे नक्कीच आहे.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मीपण वाचलं हे पुस्तक या भारतवारीत. वरील मतांशी सहमत. लिखाणात एकप्रकारचा तोचतोचपणा जाणवतो.

शेवटी काल वाचून संपवलं.
लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे.
वाचणारा स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.
मी गोठलेल्या वाटा वाचलं नाहीये त्यामुळे तुलना करता येणार नाही.
तसेच रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले या लेखिकेच्या म्हणण्याबद्दल जरा शंका आहे.

एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे आणि काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.
३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.

वरती सिंडीने लिहिलेल्या मुद्द्यांबद्दल अगदी अगदी. हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्‍याटोमण्यांनी घायाळ होणार्‍यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?

अनेकांना खटकला तसा अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन मला अजिबात खटकला नाही उलटं जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.

शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.

एकुणात 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.

>>अनेकांना खटकला तसा अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन मला अजिबात खटकला नाही उलटं जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी. <<
१००% सहमत. चार वर्षांपूर्वि पुस्तक वाचलेलं असतानाहि फक्त मोमीनच लक्षात राहिलेले. खरं पाहाता त्यांनीच दोन्ही जगांचा सुंदर मेळ घालुन एक चांगलं उदाहरण घालुन दिलंय. अशीच माणसं खर्‍या अर्थाने अमेरीकेत "जगतात", सुख उपभोगतात; बाकि सगळे "टुरिस्ट"...

एकुणात 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही. >>>> हे लिहूनच घेतलेलं पुस्तक आहे. बीएमएम किंवा ठाणेदार किंवा दोघांनी वेलणकरांची सुमारे चार महीन्याची अमेरिका आणि कॅनडा ची संपूर्ण ट्रीप स्पॉन्सर केली होती. तरी सुद्धा पुस्तकातला ७० ते ८० टक्के भाग पूर्वप्रकाशित साहित्या वर आधारलेला आहे. या संदर्भात मीच अनुभवलेला एक किस्सा--
पुस्तकात एके ठिकाणी सुमारे पाऊण पानभर , एका बाईंची मतं, त्यांचे काही अनुभव यांचा उल्लेख आहे. त्या माझ्या ओळखीच्या आहेत.त्या बाई ' एकता ' मध्ये नियमीत लिहीतात. ऊसगावात राहतात. पुस्तक वाचल्या नंतर एकदा त्या बाई प्रत्य़क्ष भेटल्या. मी त्यांना सहजच विचारलं की " वेलणकर बाई कशा आहेत हो ?" त्या म्हणाल्या, कोण वेलणकर ? मी थक्क ! मग मी त्यांना ' टू बी... ' आणि त्यांचा पाऊण पानभराचा ऊल्लेख वगैरे सांगितलं. आता थक्कं व्हायची पाळी त्यांच्यावर आली. त्यांना अपर्णा वेलणकर ही व्यक्ती आणि त्यांनी लिहीलेलं ( सो कॉल्ड ) पुस्तक दोन्हीचा पत्ता नव्हता. त्या एव्हढंच म्हणाल्या की ' अरे इकडे येऊन गेली, पुस्तकात नावानिशी उल्लेख करते, मग एखादा फोन करायला काय हरकत होती ?'

तेव्हा वेलणकरानी इथल्या लोकांची माहिती, त्यांचे प्रश्न किती आत्मीयतेनी (? ) पाहिले आसतील बघा.

.

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले त्यामुळे मोमीनांचे सगळे विचार लक्षात नाहीत.. पण एक ठळक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे घरातल्या कार्पेटची काळजी वाटण्यामागची (म्हणे) देसी मानसीकता... !
अमेरीकेत आलं की म्हणे घरातल्या कार्पेटची काळजी न करता शूज घालून घरात आलं तरी चालतं आणि कार्पेटची खराब बिराब व्हायची काळजी करू नये... आणि तसं न करणारे किंवा कार्पेट खराब होणार नाही हे पाहणारे म्हणजे देसी मेंट्यॅलिटी वाले !! इथे मी गेलेल्या बहुतांशी अमेरीकन लोकांकडे जर वावर घरात होणार असेल (म्हणजे लॉन, डेक इ ठिकाणी न बसता सगळे घराच्या आत बसणार असतील) तर लोकांना बाहेरची पादत्राणं काढताना बघितलं आहे...
मी माझ्या किंवा इतरांच्या घरात बाहेरच्या चपला / शूज घालून वावरत नाही आणि दुसरं कोणी माझ्या घरात तसं करत असेल तर शूज काढायला सांगतो.. (आत्तापर्यंततरी घरी आलेल्या देसी किंवा फिरंगी लोकांनी त्याला आक्षेप घेतलेला नाही.. ) आणि असं केल्याने दोन्ही जगांचा सुंदर मेळ न घालण्याचं महापातक माझ्या हातून घडलय असं किंवा मी "जगतच" नाहीये अथवा सुख उपभोगतच नाहीये असं मला अजिबात वाटत नाही.. Happy
असो.

पराग, मला वाटतं तो किस्सा/ उदाहरण हे एक मेटॅफोर म्हणून आलंय. असं मला वाटलं.

शुगोल, खरंच? म्हणजे हा फारच गंभीर प्रकार आहे. इथे नाव सांगितलं नाहीत तरी लेखिकेपर्यंत हा प्रसंग नावानिशी पोचवावात असं मला वाटतं.

अरेरे, मोमीन यांच्या उदाहरणातलं फक्त "कार्पेट" लक्षात राहीलं; त्याच प्रकरणात आलेला रोखठोकपणा, "थ्यंक्स्गीविंग" इ. रजीस्टरच झालं नाही. ठीक आहे, झेपेल तेव्हढंच घेतलंत. असो.

मोमीनसाहेबां सारखे "स्ट्रेट शुटर" खुप कमी आढळतात. अशी माणसं, उगाच ताकाला जाउन भांडं लपवायचा प्रकार करत नाहित आणि कुठेहि गरज नसताना शब्दबंबाळ होत नाहित. विनाकारण लहानसहान गोष्टींचं (कार्पेट क्लिनींग :)) अवडंबर माजवत नाहित; म्हणुनच इतरांपेक्षा जास्त सुखी असतात, लाइफ एंजॉय करतात.

मला वाटतं, मोमीनसाहेबांच्या उदाहरणातुन वेलणकरबाईंनी हेच मांडलं होतं. बट, यु मिस्ड द बस ऑर शुड आय से, इग्नरन्स इज ब्लिस... Happy

अमन मोमीन यांची " आम्ही कोल्हापुरी" कार्यक्रमाची एक लिंक सापडली आहे ती खाली देत आहे. त्यांची बोलण्याची लकब खुप आवडली . ( मी दिलेली लिंक प्रताधिकाराचा भंग करणारी तर नाही ना ? )
http://www.esnips.com/doc/855fcc1e-06ca-447f-8a22-aa9a297591d4/Part-I

श्री , मी ती सिडी बरेच (विकत घेण्यासाठी )दिवसापासून शोधलेली. खर सापडली नव्हती. धन्यवाद इथे लिंक दिल्याबद्दल.

Pages