असं नाही काही!

Submitted by अमेलिया on 27 September, 2012 - 02:29

सगळं ऐकलंच पाहिजे तुझं
असं नाही काही
असतील तुझी मतं, म्हणणी, गार्हाणी
मी ऐकेनच मान डोलावत
असं नाही काही.

घालशील मग तू वाद
भांडशील, रागावशीलही भरभरून
मी देईन उत्तरं सगळ्याला तश्शीच
किंवा देणारही नाही
पण ऐकून घेईन मुकाट्याने
असं नाही काही.

रुसून बसशील, अबोला धरशील,
वाट बघशील मी मनवेन म्हणून
सोडून माझं मी पण
येईन तुझ्या मागे मग
असं नाही काही.

मग येशील हळूच
रेंगाळशील माझ्या अवती भवती
एखादा शब्द बोलत स्वतःशी
अंदाज घेशील.. मी ऐकतोय का..
मी बघेनच तुझ्याकडे
असं नाही काही.

मग अचानक
हात माझा हातात घेत
हळूच माझ्या कुशीत शिरशील
टेकवत अलगद गालावर ओठ
हलकेच काही पुटपुटशील..

खरं सांगू,
तुला त्रास द्यायचा असतो मला
असं नाही काही...
पण तुझं हे लाडात येणं...
याचसाठी सारं काही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं सांगू,
तुला त्रास द्यायचा असतो मला
असं नाही काही...
पण तुझं हे लाडात येणं...
याचसाठी सारं काही!

वोव क्या अदा है !