मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - झटपट नवरतन पुलाव - तिखट - मंजूडी

Submitted by मंजूडी on 26 September, 2012 - 03:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य घटक:

१) बटाटा - २ मध्यम आकाराचे
२) तांदूळ - २ कप बासमती किंवा आंबेमोहोर
३) सफरचंद - २ मध्यम आकाराची

पूरक घटक:
१) भोपळी मिरची - १ मध्यम आकाराची
२) गाजर - १ मध्यम आकाराचे
३) मटार - पाव कप
४) फरसबी - साधारण ७ ते ८ शेंगा

याव्यतिरीक्त:
१) तूप - ७ ते ८ टेबलस्पून
२)गरम मसाला पावडर - दोन टेबलस्पून
३) मिरी, दालचिनी, लवंग, वेलची प्रत्येकी साधारण ३-३
३) लिंबूरस - २ टेबलस्पून
४) हळद - १ टिस्पून
५) लाल तिखट - १ टिस्पून
६) चवीनुसार मीठ, साखर
७) पुलाव शिजवण्यासाठी पाणी - साडेतीन कप + अर्धा कप

सजावटीसाठी:
तळलेले काजूचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

१) तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावेत.
२) सफरचंदांचे 'सळी' आकारात जाडसर तुकडे करून त्यांना अर्धा टेस्पून लिंबूरस चोळून ठेवावा, म्हणजे ते तुकडे काळे पडणार नाहीत.
३) बटाटा, गाजर आणि भोपळी मिरचीचे चौकोनी आकारात तुकडे करून घ्यावेत. फरसबीचे लांबट उभ्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
४) भोपळी मिरची वगळून बटाटा, गाजर, फरसबी आणि मटार वाफवून घ्यावेत.
५) एका गॅसवर साडेतीन कप पाणी एका भांड्यात उकळण्यास ठेवावे.
६) एका पॅनमधे ३ टेबलस्पून तूप गरम करून त्यात मिरी, दालचिनी, लवंग, वेलची हा खडा मसाला किंचित परतून घ्यावा. त्यात निथळून घेतलेले तांदूळ चांगले परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ घालावे. तांदूळ चांगला हलका झाला की त्यात साडेतीन कप उकळीचे पाणी घालावे. व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून भात शिजण्यास ठेवावा. भात तयार झाला की एका मोठ्या परातीत हलक्या हाताने मोकळा पसरवून ठेवावा. गुठळ्या राहता कामा नयेत.
७) दुसर्‍या पॅनमधे उरलेले तूप घालावे. त्यात भोपळी मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे. नंतर सफरचंदाचे तुकडे घालावेत. एकदाच परतून त्यात वाफवलेल्या भाज्या घालाव्यात. उरलेला लिंबूरस घालून परतावे. मग गरम मसाला पावडर, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर घालून हलकेच व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. गॅसची आच मंदच असावी, नाहीतर गरम मसाला, तिखट इत्यादी खाली लागण्याची शक्यता असते.
८) ही भाजी तयार झाल्यावर त्याच भांड्यात शिजवून घेतलेला भात घालून हलक्या हाताने सगळे व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
९) अर्धा कप पाणी त्यावर शिंपडून झाकण पुलाव शिजण्यास ठेवावा.
१०) पुलाव तयार झाल्यावर त्यावर तळलेले काजू पसरून ठेवावेत.

वाढणी/प्रमाण: 
फक्त पुलाव, सूप आणि एखादे सॅलड असेल तर अंदाजे चार माणसांसाठी.
अधिक टिपा: 

हा पुलाव झटपट होतो, बिर्याणीसारखा वेळखाऊ पदार्थ नाही.
ह्या पुलावाबरोबर टोमॅटो सूप आणि काकडी, टोमॅटोचे दह्यातले सॅलड एकदम फक्कड लागते.

Navaratan Pulao MB.jpg

आमची आपली सरड्याची धाव Happy
तांदूळ म्हटल्यावर भातच आठवला. नवरतन पुलाव अनेक जण अनेक प्रकारांनी करत असतीलच, पण संयोजकांनी दिलेले साहित्य वाचल्यावर ह्याहून काही नाविन्यपूर्ण पाककृती करण्यासाठी डोकं चाललं नाही. एक गोड पदार्थ जमेल असे वाटले होते, पण ती कल्पना कुटुंबातील पाककला निपुणांसमोर मांडल्यावर ज्या तर्‍हेच्या प्रतिक्रिया आल्या त्याला मायबोलीवरच अतिशय गोंडस नाव आहे Wink त्यामुळे त्या पाककृतीचा प्रयोग करायला धीर झाला नाही. तर, उपलब्ध वेळेत केलेला हा प्रसाद (तिखट असला तरी) मायबोली गणेशबाप्पा आणि तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा आहे Happy
गणपती बाप्पा मोरया!!

माहितीचा स्रोत: 
विविध पुस्तकांतील आणि नेटवरील नवरतन पुलावाच्या विविध पाककृत्या :-)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसालेभातासारखा दिसतोय>>> पूनम, आधीच कबूली दिलीये सरड्याच्या धावेची Wink

त्यामुळे फोटोवरचं लक्ष तिथे जातंय.>>> तेच तर अपेक्षित आहे मामी आणि सावली Proud
फोटो मोबाईलमधून काढलाय, ट्यूबलाईटचा योग्य अँगल न पकडता, त्यामुळे फारसा छान आलेला नाही.

वत्सला Biggrin

तेच तर अपेक्षित आहे मामी आणि सावली >>>> Lol

मस्त वाटतोय. मी भात-रेस्पी-चॅलेंज्ड आहे! पण हा प्रकार मला जमेल बहुतेक असा विचार आला.. बिर्याणीसारखा वेळकाढू नाही या एका वाक्यावर आशा वाटतेय मला! Proud

मस्त पाककृती Happy काश्मिरी पुलावात सफरचंद खाल्ले होते ते आवडले होते. ह्यात भोपळीमिरचीमुळे वेगळी छान चव येईल. नक्की करुन बघणार Happy

मंजूडी, मस्त!! करून बघणार नक्की ..
बरय ह्या स्पर्धे मुळे खुप हटके आणि स्वादिष्ट पदार्थ पहायला/शिकायला मिळतायेत..
धन्यवाद Happy

सशल, हो! आणि मला अननसही आवडेल सफरचंदाबरोबर पुलावात घालायला, शिवाय टोमॅटोच्या ग्रेव्हीत भाजी करून त्यावर फेटलेली सायपण आवडेल, पण नियमांमुळे जिन्नसांमध्ये हात आखडता घ्यावा लागला Wink

भात, पुलाव, बिर्याणी आपले फारसे फेवरेट नाही... पण हॉटेलमध्ये शेजारच्या ताटात बिर्याणी दिसली की नेमकी तीच खावीशी वाटते.. इथेही तेच झाले.. बघून खावेसे वाटतेय.. Happy

अवांतर - फोटो आणखी छान काढून आणि छानपणे प्रेजेंट करता आला असता.

मंजूडे, आणखी एक फोटो चालला असता की.
पूर्वी असा पुलाव केला आहे. कॅन्ड फ्रूट्स घालून. जरा गोडुस होतो पण बरोबर एखादी तिखट करी असेल तर चांगला लागतो.