शिवगौरीच्या बाळा - सूरमाय (३)

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 13:45


गीत: शिवगौरीच्या बाळा (गीतकारः क्रांति साडेकर)

तुला अर्पिण्या पहा आणल्या शब्द-सुरांच्या माळा
स्वीकारुनि त्या आशिष देई शिव-गौरीच्या बाळा ||धृ||

गजवदना, ओंकारस्वरूपा नमितो नित्य तुला मी
तू गणनायक, वरदविनायक, रिद्धि-सिद्धिचा स्वामी
कार्यारंभी तुला पूजितो, देई सुयश दयाळा ||१||

वक्रतुंड, गणपती, गजानन तुझी अलौकिक नावे
मी अज्ञानी, अजाण बालक, कसे तुझे गुण गावे?
वाणीला दे तेज आगळे, विनवीत तुज वेल्हाळा ||२||

लय-तालाच्या धाग्यामधली स्वर-पुष्पे कमलांची
दुर्वांकुर गीतांचे हिरवे, ओंजळ भावफुलांची
तुला वाहतो विनम्रभावे, गौरीतनय कृपाळा ||३||

संगीतकार व गायिका: अगो (अश्विनी)

संगीत संयोजन/वाद्ये प्रोग्रॅमिंग: योग
अगो (संगीतकार/गायिका) चे मनोगतः


गणेशोत्सव जवळ येऊ लागला तसं सूरमायमध्ये पुन्हा एकदा लगबग सुरु झाली. जयवी, श्यामली, क्रांति, उल्हासजी, पेशवा असे अनेक दिग्गज गीतकार असल्याने गणेशस्तुतीच्या एक से एक रचना पेश होऊ लागल्या. त्यापैकीचं एक गीत म्हणजे क्रांति ह्यांचे ’शिवगौरीच्या बाळा’ हे गीत. सुरुवातीला श्यामलीने ह्या गीताच्या सुरुवातीच्या काही ओळी स्वरबद्ध करुन सूरमायमध्ये ऐकवल्या होत्या. त्या सगळ्यांना आवडल्या आणि त्यावर गाणे बनवू असे निश्चित झाले. पण त्यावेळी श्यामली भारत-दुबई अशा प्रवासात होती. सततची धावपळ, दगदग ह्याने तिची तब्येत बिघडली आणि पुढच्या गाण्याची चाल पाठवणे तिच्यासाठी अशक्य झाले. एकीकडे गणेशोत्सव पंधरा-वीस दिवसांवर येऊन ठेपला होता. हातात दिवस कमी उरले होते. ’शिवगौरीच्या बाळा’ ही कविता वाचताक्षणीच मला फार आवडली होती. ’तुला अर्पिण्या पाहा आणल्या शब्दसुरांच्या माळा, स्वीकारुनी त्या आशिष देई शिवगौरीच्या बाळा’ ही कल्पनाच किती सुंदर आहे. गाणं गाताना बरेचदा ह्या सुरांनीच देवाची पूजा करतोय, संवाद साधतोय, क्रांतिंच्या शब्दांत मांडायचं तर ’भावफुलांची ओंजळ विनम्रभावे वाहतोय’ असा प्रत्यय येत असतो. ती भावना शब्दांत मांडण्याची संधी क्रांति ह्यांच्या गीतामुळे मिळाली.

त्यामुळेच गाण्याला आपणच चाल लावून का बघू नये असा विचार मनात आला. आत्तापर्यंत भूपमधील एक बंदिश सोडली तर कधीच कुठल्या गाण्याला चाल लावण्याचा प्रयत्न केला नव्हता. तरीही एका दुपारी नेटाने बसले. ’शिवगौरीच्या बाळा’ ची धून आधी सुचली. अगदी सहज, एका मिनिटात सुचली. आणि मग त्याभोवती सगळे गाणे उभे राहिले. सुरावट बांधताबांधता जाणवत होतं की ही ’रागेश्री’ रागावर आधारित रचना आहे. मागे तानपुरा चालू होता आणि मनात चाल आकार घेत होती. जसजशी सुचत होती तसतशी ती रेकॉर्ड करुन ठेवत होते. तासाभरात सगळी सुरावट तयार झाली. मग लगोलग गाणे तानपुऱ्यावर रेकॉर्ड करुन सूरमायमध्ये सगळ्यांना फाईल पाठवून दिली. खूप धाकधूक वाटत होती पण सूरमायमधल्या सगळ्यांनी खूप कौतुक केले, प्रोत्साहन दिले.

गाण्याचा ट्रॅक तयार करणे, चालीला अनुरुप असा वाद्यमेळ निवडणे, त्याची सुरावट योजणे, नंतरचे मिक्सिंग ह्या सगळ्याची जबाबदारी योगने अगदी मनापासून उचलली. त्याने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे संगीतसंयोजन तो स्वत: करत होताच पण ’शिवगौरीच्या बाळा’ च्या संगीतसंयोजनाचा संपूर्ण भार मी त्याच्याकडे सुपूर्त केला आणि त्याने ’तू अजिबात काळजी करु नकोस.’ असे सांगत तो आनंदाने पेलला ह्याबद्दल मी योगची अत्यंत ऋणी आहे.

खरं तर संगीत देणे हा माझा प्रांत नाही ह्याची नम्र जाणीव आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात माझी माय जशी काहीतरी करावं म्हणून मला ढकलत असते तसं ह्यावेळी सूरमायने ढकलले आणि त्यामुळे माझ्या हातून काहीतरी छोटासा प्रयत्न केला गेला. मायबोलीकर तो गोड मानून घेतील अशी आशा करते. हे गाणं श्री गणेशाच्या चरणी अर्पण !

योग चे मनोगत:

अश्विनीने रचना "रागेश्री" रागातील आहे हे कळवले त्यामूळे माझ्याकडून (वाजवताना/बसवताना) ध चा मा होता होता वाचला... म्हणजे "रागेश्री" चा "बागेश्री" झाला नाही. रागेश्री म्हणली तेव्हा लगेच ध्यानात आले माझी काय चूक होत होती... बागेश्री नेहेमीचा व आवडीचा असल्याने बोटे कोमल गंधार वर पडत होती. रागेश्री म्हटल्यावर लख्ख गंधार चा ऊजेड डोक्यात पडला आणि मग बोटे बरोबर पडली.
असो. बागेश्री माझा जाम आवडता राग... अनेक अजरामर गीते आहेत पैकी "आजारे परदेसी..." मधुमती मधलं. किंवा "घनु वाजे घुण घुणा"... हेच डोक्यात येतं. पहिल्या मध्ये सलिलदांनी दिलेलं संगीत आणि शेवटपर्यंत तुम्हाला अक्षरशः हाँट करणारे त्या गाण्यातील सूर.. तर घनु मध्ये पं. हृदयनाथांच्या संगीताने त्या गीताला दिलेला एक ठेहेराव व लताबाईंच्या स्वरांनी त्यात ओतलेली सहज व्याकुळता..
दोन्ही गीतातील व्याकुळता काळजाला स्पर्श करणारी पण मधुमतीच्या गीतात त्याला शृंगार रसाची झालर आहे, घनु मध्ये अर्थातच संत काव्य असल्याने त्या व्याकुळतेला जीवा शीवाच्या मिलनाची एक अध्यात्मिक बैठक, भक्ती भावाची हुरहुर आहे. असो बागेश्री बद्दल लिहावे तेव्हडे थोडे.

आता रागेश्री मधली गीते... "कौन आया मेरे मन के द्वारे..." किंवा "देव माझा विठू सावळा"... (बरोबर ना?). गंमत पहा ना, पुन्हा दोन ऊदाहरणे अशी ज्यात पहिल्यात गूढ, आश्चर्य, शृंगार चे काँबो . दुसर्‍यात गूढ, आश्चर्य, शृंगार पण त्याला अध्यात्मिक बैठक!

मला नेहेमीच वाटत आले की फिल्म संगीत व निव्वळ शुद्ध संगीत यातला फरक ओशोंच्या शब्दात लिहायचे तर पहिले "संभोगातून समाधीकडे" आणि दुसरे "भक्तीतून समाधीकडे" असे म्हणता येईल. :)
ग्रेस हा एकच कवी असा आहे ज्याच्या कविता वाचल्यावर संभोग व भक्ती च्या दोन्ही बाजूस न जाता कुंपणावर बसून दोन्हीची काहीतरी ऊत्कट अनुभूती घेतली असे वाटते. त्यामूळे त्याच्या कवितांना विशेषतः जे संगीत हृदयनाथ ने दिलेले आहे त्यात अशा शृंगार+भक्ती चे विरळे कॉम्बो देखिल पहायला मिळते.
तर पुन्हा तुझ्या रचनेकडे वळूयात. तू म्हणशील अगदी एकाच पठडीतील, थोडक्यात आपल्या रागात चालणारी कुठेही ऊगाच इतरत्र न हिंडणारी, वा न डगमगणारी अशी ही साधी चाल आहे. पण खरे तर असे आहे की ही रचना ऐकताना असे वाटते की ही रचना "आतून" आहे... थोडक्यात "अंतर्मुखी" आहे. त्यामुळे अशा अंतर्मुखी रचनांच्या प्रकटीकरणात मूळ गाभ्याला धक्का न लागू देता संगीत सजावट करावी लागते. थोडक्यात अशा रचनांना मुळात "स्पर्श" करणे मला रिस्कीच वाटते... कारण अंतर्मुखी रचनांमध्ये सर्वच कसे "संयत" असते. "शरण गणनाथा" गीतात आहे तसे किंवा "गणा ये" च्या कजरीत आहे तसे सर्वच संपूर्ण ऊत्कटतेने प्रकट करू शकणारे संगीत नाही देता येणार/देवू नये असे माझे मत. तुझ्या रचनेची अभिव्यक्ती/मांडणी अशी आहे की एखादी घरंदाज सुंदर स्त्री निव्वळ सोवळ्यात देव्हार्‍यात बसली असून देवाचे कोड कौतूक पुरवते आहे. त्यात भक्ती आहे, आश्चर्य आहे, शॄंगारही आहे पण त्याला "मायेची" झालर आहे, वासनेची नव्हे. त्यामूळे मधूनच एखादा वरचा सा वा शुद्ध गंधार आला तरी त्याला प्रकाशाची (अंतःप्रकाश) सोबत आहे, उत्कटतेची नव्हे. त्या अनुशंगाने देखिल "स्विकारून त्या" आशिष देई हेच अगदी योग्य वाटते नाही? "भक्तांना आशिष देई" मध्ये काहितरी मागितल्याचा वास येतो. पण "स्विकारून" मध्ये कसं, सर्व समर्पण, विनंती सर्वच उतरतंय... (कवी ने जरा नोंद घ्यावी!)

तर, अशा रचनांना संगीत देताना मुळात या सर्व पार्श्वभूमीशी एकरूप होवून, अक्षरशः आपण त्या देव्हार्‍यात देवापूढे बसलो आहोत आणि त्या "मानसपूजेत" आपल्याला काय काय बरे वाटेल असा विचार करून तेच संगीतात द्यायचे असा विचार संगीतकार म्हणून मनात आला नाही/आणला नाही तर रचनेच्या सौंदर्याला गालबोट लावायची शक्यताच जास्त! थोडक्यात अशा रचनेत संगीत साज असा हवा की त्याचा फक्त प्रेझेंस जाणवेल, म्हणजे मुळात गीत आहे म्हणून बाकीचे संगीत आहे इतकेच. देव्हार्‍यात देवच नसेल तर समई चे महत्व काय? अगदी तसेच!

थोडक्यात... असा शांत वेळ, अशी मानसिक बैठक होईल तेव्हा काहितरी चांगले संगीत या रचनेसाठी "सुचेल"... तूर्तास डोक्यात घोळत आहेच पण घोळतय ते निव्वळ स्वर, सिक्वेंस, साज... ते सर्व एकत्रित करून त्याच रचनेची "अनुभूती" मीच घेतली की मग नेमके काय हवे काय नको ते मला ठरवता येईल. त्या अर्थाने लय "तळात" च शिरावे लागेल बहुदा नुसते लय"तालात" राहून चालणार नाही. :)

हे सर्व लिहीण्याचे प्रयोजन एव्हडेच की संगीतकार म्हणून अशा सर्व गोष्टींचा विचार मला करावसा वाटतो... आणि तेही प्रत्त्येक रचनेसाठी. त्यातल्या "तांत्रिक" बाबी जरा बाजूला ठेवल्या (कारण तो अजूनच मोठा विषय!) तर मुळात नेमके एखाद्या रचनेतून काय व्यक्त करायचे आहे हे १००% सापडत नाही, वा स्वता:ला पटत नाही तोवर हा खेळ सुरूच असतो. कधी कधी १०० वेळा अनेक प्रकारे संगीत देवूनही समाधानकारक होत नाही तर कधीतरी पहिल्याच फटक्यात सर्वच योग्य होते.
बाकी तुझी रचना मला इतकी का आवडली असावी बरे- कळलं. यातला "खमाज"... पंचम (आर डी. बर्मन) च्या किती किती रचनांमधून खमाज येतच येत रहातो... मनात पिंगा घालतच रहातो... ("खाली हाथ शाम आई है"!) आता आमच्या देवाने खमाज ला सोडले नाही तेव्हा आम्ही कसे सोडावे?
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी,
असंख्य वेळा ऐकलं तरी समाधान होत नाहीये. खूप सुरेख.
योग, तुझीही मेहनत दिसतेय गाण्यातून. अशीच छान गाणी अजून ऐकायला मिळोत हीच 'शिवगौरीच्या बाळा'कडे प्रार्थना!

फार फार सुंदर झालय अगो हे गाणं , वर ब-याच जणांनी म्हटल्याप्रमाणे एकप्रकारची शांतता आहे तुझ्या आवाजात. त्यामुळे गाणं अजूनच छान उतरलं आहे.

क्रांतीच्या शब्दांबद्दल काय बोलायलाच नको, हम तो पहेलेसेही आपके फॅन है Happy

योग, सूरमायकडून पुन्हा एकदा अतिशय सुंदर गाण Happy

अनेकदा ऐकलं Happy
अगो तू तर माझे लाडकी माबोकर गायिका आहेसच, क्रांतीताईची ही मी फॅन आहेच.... खुप आवडलं गाणं.. हे गाणं हवय मला. आईच्या मोबाईलमध्ये टाकून हवय आईला
कस घेता येईल?

आश्विनी सुंदरच गायली आहेस.....
"शब्दांचं अश्विनी आणि योग यांनी अक्षरशः सोनं केलं आहे" >>>
क्रांति यांच्या मताशी पूर्णत: सहमत.

अगो पहिल्या आलापातच जिंकलस.सुन्दर गित आणि सुंदर चालीच सार्थक केलस.पुनःपुनः ऐकतीय.

किती छान गाणं आहे... क्रांती, योग आणि अगो (तुझा आवाज सुंदर आहे) मस्त जुळून आलंय.
रिया, खूप थँक्यु हे गाणं शोधून दिल्याबद्दल.

अगोचा आवाज किती दिवसांनी ऐकला. धन्यवाद धागा वर आणल्याबद्दल. त्यानिमित्ताने त्या गणेशोत्सवातली सगळीच गाणी पुन्हा ऐकली.

धारा , जिज्ञासा Happy
सुरमायची सगळी गाणी ऐका Happy
सगळी मस्त आहेत Happy
हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. अनेकदा ऐकते मी हे गाणं Happy

मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना Happy

रीया, गाणं प्रकाशित झाल्यापासून तू वेळोवेळी तुला हे गाणं फार आवडतं असं सांगत आली आहेस. फार छान वाटतं दरवेळी तू केलेलं कौतुक वाचून. असाच लोभ राहू दे Happy

Pages