बर्फी. .. . . मनावर रेंगाळणारी चव

Submitted by भुंगा on 17 September, 2012 - 23:35

बर्फी.......
गोड आवडणार्‍या प्रत्येकाला "बर्फी" हा तसा आवडणारा प्रकार...... अगदी बसल्याबसल्या खाण्यापासून ते मुखशुध्दीपर्यंत कधीही बर्फी चालते..... अनुरागची बर्फी मात्र अगदी पोटभर जेवलं तरी मन तृप्त झालय पण अजून खायची आहे असं वाटणारी आहे.
एकाच प्रकारचं दूध, साखर तेच जिन्नसांचं प्रमाण असं अगदी तयार करून वेगवेगळ्या आचार्‍यांच्या हातात जर बर्फी करायला दिली तरीही प्रत्येकाची चव "आचार्‍यागणिक" बदलतेच..... आपण त्याला अमुक-तमुक आचार्‍याच्या हाताची चवच वेगळी आहे असं म्हणतो....... अनुरागच्या हाताला वेगळीच चव आहे, आणि पुन्हा एकदा त्याने हे या "बर्फी"तून सिध्द केलेय.

सध्याच्या ट्रेंडपेक्षा थोडंसं वेगळं कथानक पहिल्यापासून उत्सुकता निर्माण करतं आणि आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो..... आजपर्यंत जेव्हाजेव्हा पडद्यावर घडणार्‍या कथानकात, ती कथा जिथे घडते ते शहर एखाद्या पात्रासारखं वावरतं, तो चित्रपट हमखास आवडतोच हा आपला माझा अनुभव. इथेही दार्जिलिंग आणि कलकत्ता एखाद्या पात्राप्रमाणेच वावरतात.... अप्रतिम लोकेशन्स.

"बर्फी" पाहिल्यावर पुन्हापुन्हा जाणवत राहातं ते एकच की सिनेमा हा दिग्दर्शकाचाच असतो..... कलाकारांचं श्रेय हिरावून घ्यायचं नाहीच पण प्रत्येक सीनमध्ये ज्या पध्दतीने सगळ्या कलाकारांनी काम केलेय, ते करवून घेताना अनुरागची त्यामागची थॉट प्रोसेस किती आणि काय असेल याचा विचार सारखा मनात येत राहातो...... चार्ली चॅप्लिनच्या फार फार जवळ पोचतो सिनेमा आणि कित्येक सीनमध्ये चार्लीची आठवण हटकून येते....

दिग्दर्शनामधल्या फरकाबद्दल बोलायचं तर एका सीनमध्ये ट्रेन सुटते आणि मिसेस सेनगुप्ता बर्फीबरोबर जाऊ की न जाऊ या विचारात हातात काढलेलं तिकिट घेऊन तशीच प्लॅटफॉर्मवर उभी असते....... आता म्हटलं तर तद्दन जोहर चोप्रा फिल्म्स मध्ये हे सीन इतके रंगवलेले असतात (पण पोचतील का बघणार्‍यापर्यंत याची शंका असते) इथे हा सीन येतो येतो आणि पटकन संपतो..... पण प्रभाव मात्र जबरी होतो..... सेनगुप्ता ट्रेनमध्ये चढणार हे आपल्याला माहित असतंच पण तरीही ती चढल्यावर आपल्याला पण आनंद होतो.........
बर्फी चिठ्ठी (प्रेमपत्र) घेऊन एलियानाच्या घरी जातो आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याला बघून बाहेर आल्यावर जो सीन आहे त्याने टचकन डोळ्यात पाणी येतं.... (इथे रणबीर आणि एलियाना दोघेही अशक्य खरे वाटलेत) .........
असे अनेक सीन्स आहेत...... अनेक फ्रेम्स आहेत की कौतुक दिग्दर्शकाचंच जास्त वाटत राहातं.

"फ्लॅशबॅक" मोडमध्ये कथा सांगण्याची हातोटी हे पुन्हा एक हुकुमाचं पान आहे. विशेषतः फ्लॅशबॅकमधला फ्लॅशबॅक असतानाही कथा कुठेही गोंधळात टाकत नाही.....

रणबीर हा आजपर्यंत ऋशीकपूरचा मुलगा म्हणून ओळखला जात होता, आता त्याला सगळे राज कपूरचा नातू म्हणून ओळखतील इतका सुरेख अभिनय आहे..... तो सुपरस्टार आहे, खराखुरा अभिनेता आहे... !
प्रियांका चोप्राला नॉन ग्लॅमरस भुमिकेत बघणं ही ट्रीट आहे....... खणखणीत.
नवा चेहरा एलियाना सर्वच लूक्समध्ये उत्तम अभिनय करते आणि दिसतेही गोड...... तिचे डोळे खूपच बोलके आहेत.......

चित्रपटात तीन कालखंड आहेत, त्यात बॅग्राऊंडला वाजणारं संगीत तर एक अविभाज्य घटक आहे चित्रपटाचा वातवरणनिर्मिती करायला...... प्रितमवर कितीही ट्युनचोरीचे आरोप केले तरी तो जी गाणी तयार करतो त्यात मेलडी ठासून भरलेली असते...... त्यात या गाण्यांचे शब्दही तितकेच वजनदार आहेत.....

सौरभ शुक्लाचा सुधांशु दत्त, आशिष विद्यार्थी आणि इतर सहकलाकार आपापल्या जागी परफेक्ट.

सरतेशेवटी ही "बर्फी" सर्वस्वी अनुराग बासूची आहे आणि त्याला सर्वच कलाकार, संगीतकार, गीतकार सगळ्यांनीच तोलामोलाची साथ दिलीये......... अजिबात चुकवू नका हा अनुभव.

अवांतरः
गेल्या काही महिन्यात कलकत्ता आणि बिहार पार्श्वभूमीच इतके चित्रपट येऊन गेलेत की आता डेस्परेटली "मुंबई" बघायची आहे चित्रपटातून. जी कधीकाळी सत्या मध्ये दिसली होती......... निशिकांत कामत (मुंबई मेरी जान) आणि प्रभृती नोंद घ्या कृपया आणि काहीतरी छान येऊद्या मुंबई पार्श्वभूमीवर..........
इतर शहरं बघून आनंद लुटताना नेहमीच वाटतं की मुंबई अपना नंबर कब आयेगा Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणबीर हा आजपर्यंत ऋशीकपूरचा मुलगा म्हणून ओळखला जात होता, आता त्याला सगळे राज कपूरचा नातू म्हणून ओळखतील इतका सुरेख अभिनय आहे..... तो सुपरस्टार आहे, खराखुरा अभिनेता आहे... ! >>>>>>>

ऑब्जेक्शन मिलॉर्ड...... राज कपुर हा शोमन होता... एक उत्क्रुष्ट दिग्दर्शक.... पण अभिनेता म्हणुन त्याला प्रचंड मर्यादा होत्या... त्याच्या अभिनेत्या पेक्षा त्याचा दिग्दर्शक नक्कीच उजवा होता.

अत्ता पर्यंत कपुर खानदानात चांगला अभिनय असणारा फक्त ऋशी होता ( प्रुथ्वीराज होते, पण त्यांच्या अभिनयालाही मर्यादा होत्या)... बाकी नव्या पिढीत करीना आणि आर्थातच रणबीर..... रणबीर ने अतिषय समजुन ही भुमिका केली आहे.

रणबीर ने आपली चुणुक 'वेक अप सीड" पासुनच दाखवली. 'बर्फी' मधे तो खुप फ्रेश दिसला आहे.... फारच सुरेख सिनेमा.... कुठेही एक व्यक्तिरेखा दुसर्‍यावर कुरघोडी करत नाही.

प्रियांका चा वावर खुपच मस्त.... टेक्नीकली तिचा रोल ऑटीझम दाखवतो असे निदान मला तरी वाटले... मंदबुध्धी मुलं खुप वेगळी असतात. त्यांना काहीही शिकवणे शक्य नसते. ( खुप जवळच्या नातेवाईका कडे अशी व्यक्ती होती). इकडे प्रियांकाला सगळी समज दाखवली आहे. तिच बर्फीला अक्षर ओळख करुन देते. तिला अक्षरे समजतात, फोन नंबर लक्षात रहातात, चांगले स्पर्श आणि वाईट स्पर्श कळतात, निसर्गातल्या गमती जमती समजतात, नैसर्गीक गरजा समजतात, आपल कोण परकं कोण समजत, ही लोकं व्यक्त होतात पण खुप वेगळ्या तर्‍हेने. त्या मुळे मला तरी ती कुठेही मंदबुध्धी वाटली नाही. उलट काही काही जाणीवा जास्त सम्रुध्ध झालेली वाटली. ही लोकं समाजात मिसळत नाहीत, कारण समाज त्यांना वाळीत टाकतो. मंदबुध्धीं ना काहीच समजत नसल्याने ती लोकं वेगळीच दिसतात.

प्रियांकाने फार सुंदर रित्या हा सुक्ष्म फरक दाखवला आहे.

चित्रपटाची 'ऑस्कर" साठी निवड झाली.

चित्रपटाची 'ऑस्कर" साठी निवड झाली.

चित्रपट पाहिला, आवडला पण हे काही फारसे पटले नाही. यातली अनेक दृश्ये परदेशी चित्रपटांवरुन ढापलेली आहेत असे वर अनेकांनी लिहिलेय. अशा वेळी केवळ अभिनयाच्या जोरावर याला ऑस्करस्पर्धेत उभे राहता येईल?

पानसिंग तोमर ऑस्करसाठी जास्त लायक होता हे माझे अर्थातच व्यक्तिगत मत आहे. त्याला डावलताना कुठले निकष लावले गेले ते निवडसमितीलाच माहित.

ऑटिस्टिक लोक कसे असतात हे मला माहित नव्हते. मुद्दाम नेटवर शोधल्यावर प्रियांकाने ऑटिझम दाखवायचा पुरेपुर प्रयत्न केला असे वाटले. ती मंदबुद्धी अजिबात वाटत नाही चित्रपटात.

भुंगा,

आटोपशीर आणि नेमके तेच लिहीला गेलेला हा लेख तुझ्या अलिकडच्या लेखनापैकी एक उत्तम लेख.

लिहीत रहा, शुभेच्छा!

अशा वेळी केवळ अभिनयाच्या जोरावर याला ऑस्करस्पर्धेत उभे राहता येईल>> +१
अगदी हेच लिहायच होतं मलाही. Happy

म्हातारपणीचा मेकप खंप्लीट गंडलाय. त्यातल्या त्यात बर्फी वाटेल म्हातारा इतपत पण श्रुती आणि झिलमिल अज्जिबात म्हातार्‍या वाटत नाहीत. नुसते केस पांढरे केले की झालं की काय? >>>>>>>> +१

पण खरेच रणबीरने खुपच सुन्दर अभिनय केला आहे. अगदी अप्रतिम......

छान परिक्षण.

मस्त लिहिलंयस, भुंगा. Happy

आत्ताच बघून आले. आवडलाच. सगळ्यात आवडलेला सीन म्हणजे कलकत्त्यात झिलमिलला घेऊन आल्यावर बरफीला जेव्हा मिसेस सेनगुप्ता भेटते, तिला घेऊन तो घरी येतो आणि तिची झिलमिलशी ओळख करून देतो - तो. त्यात मिसेस सेनगुप्ता बरफीला विचारते की त्याने झिलमिलशी लग्न केलंय का? म्हणून. त्यावेळी केवळ हातवार्‍यांनी आणि चेहेर्‍यावरच्या अप्रतिम अभिनयानं त्याच्या मनातला आनंद बरफी आपल्यापर्यंत पोहोचवतो. सुपर्ब!

माझ्या मते राज कपूर हा एक अत्यंत ओव्हर रेटेड अभिनेता होता. मला ऋषी कपूर राज कपूरपेक्षा कैक पटींनी सरस वाटतो. रणबीरची राज कपूरशी तुलना करणे अन्यायकारक आहे, ऋषी कपूरशी करावी.

पण मला असं वाटतं, रणबीर इज द बेस्ट 'कपूर' सो फार.

Pages