बर्फी. .. . . मनावर रेंगाळणारी चव

Submitted by भुंगा on 17 September, 2012 - 23:35

बर्फी.......
गोड आवडणार्‍या प्रत्येकाला "बर्फी" हा तसा आवडणारा प्रकार...... अगदी बसल्याबसल्या खाण्यापासून ते मुखशुध्दीपर्यंत कधीही बर्फी चालते..... अनुरागची बर्फी मात्र अगदी पोटभर जेवलं तरी मन तृप्त झालय पण अजून खायची आहे असं वाटणारी आहे.
एकाच प्रकारचं दूध, साखर तेच जिन्नसांचं प्रमाण असं अगदी तयार करून वेगवेगळ्या आचार्‍यांच्या हातात जर बर्फी करायला दिली तरीही प्रत्येकाची चव "आचार्‍यागणिक" बदलतेच..... आपण त्याला अमुक-तमुक आचार्‍याच्या हाताची चवच वेगळी आहे असं म्हणतो....... अनुरागच्या हाताला वेगळीच चव आहे, आणि पुन्हा एकदा त्याने हे या "बर्फी"तून सिध्द केलेय.

सध्याच्या ट्रेंडपेक्षा थोडंसं वेगळं कथानक पहिल्यापासून उत्सुकता निर्माण करतं आणि आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो..... आजपर्यंत जेव्हाजेव्हा पडद्यावर घडणार्‍या कथानकात, ती कथा जिथे घडते ते शहर एखाद्या पात्रासारखं वावरतं, तो चित्रपट हमखास आवडतोच हा आपला माझा अनुभव. इथेही दार्जिलिंग आणि कलकत्ता एखाद्या पात्राप्रमाणेच वावरतात.... अप्रतिम लोकेशन्स.

"बर्फी" पाहिल्यावर पुन्हापुन्हा जाणवत राहातं ते एकच की सिनेमा हा दिग्दर्शकाचाच असतो..... कलाकारांचं श्रेय हिरावून घ्यायचं नाहीच पण प्रत्येक सीनमध्ये ज्या पध्दतीने सगळ्या कलाकारांनी काम केलेय, ते करवून घेताना अनुरागची त्यामागची थॉट प्रोसेस किती आणि काय असेल याचा विचार सारखा मनात येत राहातो...... चार्ली चॅप्लिनच्या फार फार जवळ पोचतो सिनेमा आणि कित्येक सीनमध्ये चार्लीची आठवण हटकून येते....

दिग्दर्शनामधल्या फरकाबद्दल बोलायचं तर एका सीनमध्ये ट्रेन सुटते आणि मिसेस सेनगुप्ता बर्फीबरोबर जाऊ की न जाऊ या विचारात हातात काढलेलं तिकिट घेऊन तशीच प्लॅटफॉर्मवर उभी असते....... आता म्हटलं तर तद्दन जोहर चोप्रा फिल्म्स मध्ये हे सीन इतके रंगवलेले असतात (पण पोचतील का बघणार्‍यापर्यंत याची शंका असते) इथे हा सीन येतो येतो आणि पटकन संपतो..... पण प्रभाव मात्र जबरी होतो..... सेनगुप्ता ट्रेनमध्ये चढणार हे आपल्याला माहित असतंच पण तरीही ती चढल्यावर आपल्याला पण आनंद होतो.........
बर्फी चिठ्ठी (प्रेमपत्र) घेऊन एलियानाच्या घरी जातो आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याला बघून बाहेर आल्यावर जो सीन आहे त्याने टचकन डोळ्यात पाणी येतं.... (इथे रणबीर आणि एलियाना दोघेही अशक्य खरे वाटलेत) .........
असे अनेक सीन्स आहेत...... अनेक फ्रेम्स आहेत की कौतुक दिग्दर्शकाचंच जास्त वाटत राहातं.

"फ्लॅशबॅक" मोडमध्ये कथा सांगण्याची हातोटी हे पुन्हा एक हुकुमाचं पान आहे. विशेषतः फ्लॅशबॅकमधला फ्लॅशबॅक असतानाही कथा कुठेही गोंधळात टाकत नाही.....

रणबीर हा आजपर्यंत ऋशीकपूरचा मुलगा म्हणून ओळखला जात होता, आता त्याला सगळे राज कपूरचा नातू म्हणून ओळखतील इतका सुरेख अभिनय आहे..... तो सुपरस्टार आहे, खराखुरा अभिनेता आहे... !
प्रियांका चोप्राला नॉन ग्लॅमरस भुमिकेत बघणं ही ट्रीट आहे....... खणखणीत.
नवा चेहरा एलियाना सर्वच लूक्समध्ये उत्तम अभिनय करते आणि दिसतेही गोड...... तिचे डोळे खूपच बोलके आहेत.......

चित्रपटात तीन कालखंड आहेत, त्यात बॅग्राऊंडला वाजणारं संगीत तर एक अविभाज्य घटक आहे चित्रपटाचा वातवरणनिर्मिती करायला...... प्रितमवर कितीही ट्युनचोरीचे आरोप केले तरी तो जी गाणी तयार करतो त्यात मेलडी ठासून भरलेली असते...... त्यात या गाण्यांचे शब्दही तितकेच वजनदार आहेत.....

सौरभ शुक्लाचा सुधांशु दत्त, आशिष विद्यार्थी आणि इतर सहकलाकार आपापल्या जागी परफेक्ट.

सरतेशेवटी ही "बर्फी" सर्वस्वी अनुराग बासूची आहे आणि त्याला सर्वच कलाकार, संगीतकार, गीतकार सगळ्यांनीच तोलामोलाची साथ दिलीये......... अजिबात चुकवू नका हा अनुभव.

अवांतरः
गेल्या काही महिन्यात कलकत्ता आणि बिहार पार्श्वभूमीच इतके चित्रपट येऊन गेलेत की आता डेस्परेटली "मुंबई" बघायची आहे चित्रपटातून. जी कधीकाळी सत्या मध्ये दिसली होती......... निशिकांत कामत (मुंबई मेरी जान) आणि प्रभृती नोंद घ्या कृपया आणि काहीतरी छान येऊद्या मुंबई पार्श्वभूमीवर..........
इतर शहरं बघून आनंद लुटताना नेहमीच वाटतं की मुंबई अपना नंबर कब आयेगा Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त लेख.
आज पाहणार आहे मी 'बर्फी.'

गेल्या काही महिन्यात कलकत्ता आणि बिहार पार्श्वभूमीच इतके चित्रपट येऊन गेलेत की आता डेस्परेटली "मुंबई" बघायची आहे चित्रपटातून.

"तलाश" येतोय नोव्हेंबरमधे. Happy

hmm.. अमिली, सिटी लाईट्स आणि मिस्टर बीन यांचा बराच प्रभाव (की कॉपी?) जाणवतो.
सिटी लाईट्समधला एक सीन तर जसाच्या तसा चोरलाय. (पुतळ्याचे अनावरण, त्याखाली झोपलेला रणबीर)

मुस्कानमधून हताश होऊन रणबीर आणि एलियाना परत निघतात, प्रियंका आवाज देते, तो नेमका एलियानाला ऐकू जातो आणि तिची घालमेल होते..! मस्त जमलाय तो सीन.

अगदी आवर्जून वगैरे पाहायला हवा असे काही नाही.
वरील तीन चित्रपट स्वतंत्रपणे अनुभवले असतील बसूची ही बर्फी फारशी रूचत नाही Happy

मस्त लिहीलयंस भुंगा खुप दिवसानंतर हा एकदम सरळ, सुंदर..नो आयट्म! नि अर्थपुर्ण गाणी असलेला चित्रपट.. म्हणुनच आवड्ला!

बर्फी चिठ्ठी (प्रेमपत्र) घेऊन एलियानाच्या घरी जातो आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याला बघून बाहेर आल्यावर जो सीन आहे त्याने टचकन डोळ्यात पाणी येतं.... (इथे रणबीर आणि एलियाना दोघेही अशक्य खरे वाटलेत) .........>>>> + १...

सिनेमा संपल्यावर सुद्धा हा सीन खूप वेळ लक्षात राहतो.

भुंग्या,

छान परीक्षण! कधी बघेन असे झाले आहे.

मुंबई दिसलीय की नुकतीच... फेरारी की सवारी मध्ये >>
सिनेमातील कथा जिथे घडते ते शहर एखाद्या पात्रासारखं वावरतं, असा अनुभव देणारा सिनेमा मुंबईच्या बाबतीत यायला हवाय, अशी अपेक्षा भुंगा व्यक्त करतोय. " फेरारी की सवारी"" मधे तो फील नक्कीच नाही. असे तर मुंबईचे दर्शन इतरही बर्‍याच सिनेमांमधे होतच राहते की!

सागर ला अनुमोदन!! अमेली चा प्रभाव अगदी ट्रेलर मध्ये पण जाणवतो.
आपल असा स्वत:हाच सिनेमा कधी बनवणार?

शॉर्ट बट स्वीट लि़खाण भुंग्ज..

खरे तर ह्या चित्रपटाबद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे, दार्जिलिंगचे शूटिंग अफलातून झालेय, थंड हवेच्या ठिकाणाचा 'फील गूड' लूक आहे त्यात... तू म्हणालास तसे एलियाना चे डोळे अर्धा संवाद साधतात.... रणबीर बद्दल लिहिलेला श्ब्द न शब्द खरा आहे... अभिनेता आहेच तो.. रादर बेस्ट एन्टरटेनर आहे तो... त्याचा स्क्रीन प्रेझेन्स अफलातून आहे... मला त्याची चित्रपटातली सुरूवातीची धावपळ पाहून 'चार्ली चॅप्लीन' च्या मुव्हस आठवत होत्या.. मस्तच

प्रेमभंगाचा इतका सुंदर "मूक अविष्कार" त्याने वठवलाय की, मान गये... कलाकार माणूस आहे रणबिर.
अश्या अनेक फ्रेम्स बद्दल बोलता येईल.. कथा उलगडत जाते हळूवार, आपल्याला सोबत घेऊन..

चित्रपटाच्या नायकाचा एकच निकष दाखवला "लॉयल्टी टेस्ट" .. संकटात त्याला टाकून पळून जाणारे कोण आणि आजन्म सोबत राहणारे कोण, हे ताडण्याची त्याची स्वतःची पद्धत दाखवली आहे, त्याच्या परि़क्षेत उतरणार्‍याला त्याने कधी अंतर दिले नाही, त्यांच्यावर जीव ओतून प्रेम केले.. हे सारं पाहताना, मनाच्या उलाढाली मूकपणे साकारताना बर्फी आवडत जातो, मनापासून आवडत जातो.

सतत आनंदी राहून सगळ्यांवर व्यवहाररहित, निर्व्याज प्रेम करणारी बर्फी ही व्यक्तीरेखा खरोखर विलोभनीय आहे...

भुंग्ज, तुझा टू दि पाँईंट लेख मनापासून आवडला... Happy

बर्फी बघून आल्यावर हा पिक्चर आपल्याला आवडला का असा स्वतःला प्रश्न केल्यावर अगदीच 'येस्स्स' असं उत्तर जरी आलं नसलं तरी कहानी नंतर पाहिलेला एक चांगला चित्रपट अशी नोंद मनात झाली मात्र.
सावरिया पिक्चर मधला नायक केवळ ऋषी कपूरचा मुलगा म्हणून वर्णी लागलेला असा वाटला होता पण सावरिया ते बर्फी च्या प्रवासात खुद्द राज कपूर अभिमानाने 'मी रणबीर चा आजोबा आहे' असं सांगेल इतका कमालीचा बोलका अभिनय या सिनेमातल्या मूकबधिर पात्राच्या माध्यमातून रणबीरने केला आहे. पूर्ण पिक्चरभर फक्त 'बर्फी' एवढाच एकमेव डायलॉग या पात्राला आहे पण आख्खा पिक्चर त्याने अक्षरशः घशात घातला आहे. दुसरं कोणीही, अक्षरशः कोणीही लक्षात रहात नाही चित्रपटगृहातून बाहेर आल्यावर. प्रियंका चोप्राची झिलमिल ही ऑटिस्टिक मुलीपेक्षा मेन्टली रिटार्डेड मुलगी जास्त वाटते. मैत्रीची पारख करण्याच्या पद्धतीत झिलमिल अजाणतेपणे पळून न जाता जागच्या जागी बर्फीचा हात धरून उभी राहते तरी तीच आपली खरीखुरी सखी असं मानतानाचा इनोसन्स आणि तोही फक्त फेशियल एक्स्प्रेशन्स्च्या साहाय्याने आजच्या काळात केवळ रणबीरच दाखवू शकतो.

फक्त आणि फक्त रणबीर साठी हा सिनेमा प्रत्येकाने पहायलाच हवा.

Physically / mentally Challenged अस्तित्वांचं जग अतिशय सखोलपणे, साचेबद्धतेतून बाहेर पडून चित्रित होणे खूप आवश्यक आहे. ज्या कुणी हे कथासूत्र लिहिले त्याला सलाम.
अन निर्माता- दिग्दर्शकांना. ती थीम संवेदना बटबटीत होत चाललेल्या जगापर्यंत पोचवण्याची हिंमत करण्यासाठी.

छान लिहिलंय भुंगा. अवांतरही आवडलं. मुंबई इतकी व्यामिश्र आहे की ती महाकाव्य/कादंबरीचाच विषय जास्त, 'मुंबई दिनांक' टाईप्स..
( तेही आता मुंबईबाहेरच अ‍ॅप्रिशिएट होईल! वेळ कुणाला आहे इथे :)) )
सिनेमामध्ये तिची अंशरूपं येतातच.

छान लिहिलंय भुंग्या.

तीन-चार सीन्स दिग्दर्शकाच्या थॉट प्रोसेससाठी वा कलाकारांच्या उत्तम अभिनयासाठी नेमके लक्षात राहिले. एक वर लिहिलेला प्रेमभंगाचा सीन. लाजवाब मूकाभिनय केलाय रणबीरनं. शिवाय मुस्कान मध्ये बर्फीला पझेसिव्ह होऊन आपल्या मागं श्रुतीपासून लपवणारी झिलमिल, कलकत्त्यात असताना श्रुतीला पाहिल्यानंतर घरी बर्फीचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्कर्टवर साडी नेसून बघणारी झिलमिल, झिलमिल घरी आरडाओरडा करत असताना तिचं तोंड दाबण्याचा बर्फी प्रयत्न करत असताना तिनं हाताचा चावा घेतल्यावर 'मूकपणे ओरडणारा' बर्फी, बर्फी घरी आल्यावर त्याला "भॉ" करून घाबरवणारी झिलमिल आणि तिनं घाबरवणं व तो घाबरणं यातली काही क्षणांची ती गॅपही लक्षात येते - यामागचा विचार चटकन कळून येईल इतकी. टाळ्याच.

बाकी हो तो पुतळ्याच्या अनावरणाचा सीन तर अगदी सिटी लाईट्स की हो! आणि म्हातारपणीचा मेकप खंप्लीट गंडलाय. त्यातल्या त्यात बर्फी वाटेल म्हातारा इतपत पण श्रुती आणि झिलमिल अज्जिबात म्हातार्‍या वाटत नाहीत. नुसते केस पांढरे केले की झालं की काय?

पण श्रुती आणि झिलमिल अज्जिबात म्हातार्‍या वाटत नाहीत. नुसते केस पांढरे केले की झालं की काय? >>>> हे मात्र बरोबरे हां! तीनं त्याचा हात धरून ठेवलेला दाखवतांना दोघांचे हात अगदी रसरशीत, सुरकुत्याविरहीत दाखवलेत. फक्त प्रियांकाचे तेवढे जरा सुरकुतलेले हात दाखवलेत.

मंजिरीच्या संपुर्ण प्रतिसादाला प्रचंड अनुमोदन
अगदी हेच आणि असच माझही मत आहे

Pages