चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)

Submitted by रसप on 15 September, 2012 - 02:55

एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

Barfi-watch-online.jpg

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/barfi-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिक्चर खूप आवडला. संथ आहे, कुठे कुठे कॉपी केलेला आहे (असं FB वर कळलं) पण मस्त आहे. थेटर मधून बाहेर पडताना एक मस्त फीलिंग आलं होतं. माझे तरी पैसे वसूल.

कहानी पण खूप आवडला होता. पण त्याच्याशी तुलना कराविशी वाटली नाही अजिबात.

रच्याकने : मधे मधे ती तीन माणसं वाद्यं का वाजवताना दाखवली आहेत ? life in मधे पण होती अशीच तीन माणसं. प्रीतम आणि त्यांचे सहाकारी आहेत का ते ?

एक हल्का फुलका चित्रपट म्हणुन आवडला. रणबीरने केलेली मेहनत जाणवते. प्रियांका ठीक आहे, म्हणजे ती प्रियांका आहे, तिच्याकडून काही विशेष अपेक्षा आहेत, त्या तिने पुर्‍या केल्यात. Happy
नवी हीरोईन मस्त आहे, सोज्वळ वाटते, डोळ्यानी अभिनय करायचे कसब छान साधलेय तिनी.

एकूणच प्लिझंट वाटावा असा आहे, खूप ग्रेट किंवा 'मी खूप रडले' असं काही जण म्हटले त्यांच्याशी सहमत नाही. रडावं असं काहीच नाही, नकळत कुठे कुठे गळा भरून येतो जरूर, पण 'ब्लॅक' सारखा करुणामय केलेला नाहिये चित्रपट.

>> एकूणच प्लिझंट वाटावा असा आहे, खूप ग्रेट किंवा 'मी खूप रडले' असं काही जण म्हटले त्यांच्याशी सहमत नाही. रडावं असं काहीच नाही, नकळत कुठे कुठे गळा भरून येतो जरूर, पण 'ब्लॅक' सारखा करुणामय केलेला नाहिये चित्रपट.<<

अ‍ॅग्रीड.

मधे मधे ती तीन माणसं वाद्यं का वाजवताना दाखवली आहेत ? life in मधे पण होती अशीच तीन माणसं. प्रीतम आणि त्यांचे सहाकारी आहेत का ते ?
>>
करेक्ट. life in Metro च्या गाण्यांतही जिकडे-तिकडे वाद्य वाजवणारी माणसं दिसतात. मलाही तेच आठवलं सिनेमा बघताना. प्रीतम आणि त्यांचे सहाकारीच असावेत.

प्रीतम आणि त्यांचे सहाकारीच असावेत>>>>> होय त्या केसाळ प्राण्याला स्वतःला स्क्रीनवर दाखवण्याची भारीच हौस/खोड आहे.

>> एकूणच प्लिझंट वाटावा असा आहे, खूप ग्रेट किंवा 'मी खूप रडले' असं काही जण म्हटले त्यांच्याशी सहमत नाही. रडावं असं काहीच नाही, नकळत कुठे कुठे गळा भरून येतो जरूर, .<<

मी रडले मात्र Sad रणबिर चिठ्ठी घेऊन तिच्या घरी जातो तेव्हा. Sad

पण 'ब्लॅक' सारखा करुणामय केलेला नाहिये चित्रपट >> ब्लॅक मला अजिबात आवडला नव्हता Sad

प्रीतम आणि त्यांचे सहाकारीच असावेत>>>>> होय त्या केसाळ प्राण्याला स्वतःला स्क्रीनवर दाखवण्याची भारीच हौस/खोड आहे. >>
याला सुभाष घई सिन्ड्रोम म्हणत असावेत.

दोन पात्रे जरा डिप्रेसिंग असूनही पिक्चर बघून डिप्रेशन येत नाही. सर्वांनी कामं अगदी अप्रतीमच केली आहेत. प्रियंकाचा ऑटिझम जरा जास्ती वाटला ...म्हणजे मेंटली रिटार्टेडपणाकडे झुकणारा........कदाचित ऑटिस्टिक व्यक्तीव्यक्तींमधेही काहीसा फरक असू शकेल.
एकूणात आवडलाच पिक्चर! रणबीर अफलातून फ्लेक्झिबल आहे ........कायिक वाचिक अभिनयात!

प्रियांका चा अभिनय सुपर्ब पण पिक्चर नाहि आवडला. आय मिन घरी बघितला असता तरी चालले असते असे वाटले. चार्ली चॅप्लिन चे आणि अनेक सीन ( नोट्बूक) जसेच्या तसे उचलले आहेत. बासू आता म्हणतोय कि " Barfi! isn't copied, it's a tribute ". पुन्हा बघावासा नाहि वाटणार .

दोन पात्रे जरा डिप्रेसिंग असूनही पिक्चर बघून डिप्रेशन येत नाही. > ++

चांगला घेतलाय , पण ५ पैकी ३ स्टार देण्या इतका आवडला..असा भरभरून आवडतोय इतर पब्लिक ला, तितका नाही आवडला, मे बी आय मिस्ड समथिंग !
पहिला पार्ट तर खूपच स्लो, बोरिंग वाटत होता.
कथानकाची मांडणी नाही आवडली ..फ्लॅशबॅक मधे अजुन पुन्हा उप फ्लॅशबॅक वगैरे फार विस्कळीत वाटत होतं.
बर्फीचं कॅरॅक्टर आपेक्षे प्रमाणे चार्ली चॅप्लिन -राज कपुर स्टाइल.. हसवताना कारुण्याची छटा दिलेले प्रसंग रणबीर ने चांगले केलेत.
पण समहाउ मला त्या रणबीर च मुकबधीर कॅरॅक्टर ज्या प्रकारे दाखवलय ते फारसं अपिल नाही झालं किंवा मी रणबीर चा अभिनय इंटरप्रिट नाही करु शकले.
दैनंदिन आयुष्यात तो फार्स, खोड्या आणि इमोशन्स व्यतिरिक्त 'व्हॉट हि ड्ज फॉर लिव्हिंग' हे दाखवलं नाहीये कि मलाच समजलं नाही माहित नाही.
प्रियांका विषयी त्याचा अ‍ॅटिट्युड फक्त 'केअरिंग' इतकाच आहे असं मला तरी त्याच्या एक्स्प्रेशन्स वरून वाटलं !
प्रियांका वर तो प्रेम करतो हे मला नंतरच्या त्या बंगाली मैत्रीणीच्या बोलण्यातून कळलं.
अ‍ॅक्टर्स मधे प्रियंकाचा अभिनय खूप आवडला.
रणबीर आवडतो पण या सिनेमात मी त्याला प्रियांका नंतर नंबर देइन
सौरभ शुक्ला आणि ती नवीन अ‍ॅक्ट्रेस पण चांगले वाटले.
प्रीतम चं म्युझिक, बॅग्राउंड स्कोअर आवडला.

bits n pieces मधे हा चित्रपट चांगला आहे. रणबीर चा अभिनय 'अति-आगाऊ' वाटला. प्रियांकाचा अभिनय छान.

चांगला घेतलाय , पण ५ पैकी ३ स्टार देण्या इतका आवडला..असा भरभरून आवडतोय इतर पब्लिक ला, तितका नाही आवडला, मे बी आय मिस्ड समथिंग ! >> ++१

@दीपांजली-

'व्हॉट हि ड्ज फॉर लिव्हिंग' हे दाखवलं नाहीये कि मलाच समजलं नाही माहित नाही.

दाखवलंय की !
दार्जिलिंगमधे असतांना- वडिलांकडून पैसे घेणे, अवैध दारू विकणे
कोलकातामधे असतांना- भिंतीवर पोस्टर्स चिकटवणे (प्रेस्टीज प्रेशर कुकर), भांड्याच्या दुकानात भांड्यांवर नावे टाकणे वगैरे किरकोळ कामे.

वरच्या अनेक पोस्टींमध्ये 'चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांतील प्रसंग उचलले आहेत', असं लिहिलं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच खुद्द चार्ली चॅप्लिन दाखवून दिग्दर्शकानं अगोदरच हा प्रभाव मान्य केला आहे. मॉडर्न टाइम्स चित्रपटातल्यासारख्या प्रसंगाने चित्रपट सुरू होतो, आणि मग चार्ली चॅप्लिन दिसतो. असं असताना 'प्रसंग चोरले' असं म्हणण्याला अर्थ नाही.

फेसबुकसारख्या काही ठिकाणी आणि अन्यत्र 'बर्फी' चे आणि चार्ली चॅप्लिन, नोटबुक, सिंगिंग इन द रेन वगैरे सिनेमांमधल्या एकसारख्या सीन्सचे फोटो शेजारी-शेजारी ठेऊन 'कॉपी-कॉपी' चा जो गलका सुरू आहे, तो हास्यास्पद आहे. ते सर्व सीन्स इतके प्रसिद्ध आणि लोकांच्या परिचयाचे आहेत, की 'बर्फी' बघतांना लोकांना त्या ओरिजनल दृष्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. (बासूसारख्या दिग्दर्शकाला हे कळणार नाही का?) किंबहुना लोकांना मूळ स्रोताची आठवण यावी अशाच पद्धतीने ती दृष्ये
कथानकात पेरली आहेत. सिनेमाच्या सुरूवातीचा शिडीवाला सीन बघतांना माझा टीनेजर भाऊही 'हे चार्ली चॅप्लीनचे आहे' असे म्हणाला. त्याने चॅप्लिनचे काम विशेष पाहिलेलेही नाही, तरी !
plagiarism म्हणजे लपतछपत केलेला प्रकार असतो. इथे सर्वच उघड आहे ! अर्थात, श्रेयनामावलीत तसा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे होता, की आम्ही अमुकतमुक कलाकृतींनी इन्स्पायर्ड आहोत म्हणून.
('अमेली' मी पाहिला नाही, किंवा त्याचे संगीतही ऐकलेले नाही. त्यामुळे प्रीतमने संगीत चोरले किंवा कसे ते ठाऊक नाही. तसाही तो याबाबतीत बदनाम आहेच.)

तरीही, तूर्तास Barfi! isn't copied, it's a tribute या बासूच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायला मी तयार आहे ! Happy

बर्फी, मुद्दाम सिडी घेऊन बघितला. आवडला. ज्या सीन्समूळे कॉपीचे आरोप झाले, ते नसले तरी चालले असते.
या सिडी सोबतच मेकिंग ऑफ बर्फी, सिडी मिळाली. त्यात बराचसा पाचकळपणा आहे तरी काही अनोखे ही आहे.
वगळलेले सीन्स आहेत. त्यात श्रुती आणि तिच्या नवर्‍याचा एक सीन आहे तसेच झिलमिलची केअरटेकर आणि मर्फी मधला एक सीन आहे. ती केअरटेकर त्याला कलिंगड देते, आणि झिलमिलला तिथे सोडून तो जातो. ( चित्रपटात तो असता तर नीट सांधेजोड झाली असती. )

तिघांच्या लूक्स बद्दल पण चांगली चर्चा आहे. श्रूतीचा तो अफलातून मॅरीड लूक, कसा मिळाला, ते बघण्यासारखे आहे. झिलमिलला तसे कपडे द्यायचे कारणही पटते.

सेटबद्दल पण अनोखी माहिती आहे. खुपसा भाग सेटवर चित्रित झालाय. ती टॉय ट्रेन पण खोटीच आहे. आत मारुती ८०० असते आणि वर थर्मोकोल वगैरे वापरुन गाडी तयार केलीय.

Pages