चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)

Submitted by रसप on 15 September, 2012 - 02:55

एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

Barfi-watch-online.jpg

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/barfi-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुम्हाल आजोबांचे म्हणायचे आहे का ?<<

नाही. 'वडिलांचे'च म्हणायचं आहे.
माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या.. (वै.म.)

राज कपूर अभिनेता पेक्षा एक दिग्दर्शक म्हणून जास्त ग्रेट होता. त्याउलट ऋषी कपूर उत्तम अभिनेता आहे. पण दुर्दैवाने त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका फार कमी केल्या आहेत.

रणबीर कपूरने अल्पावधीतच वेगळ्या भूमिका स्विकारल्या आणि त्या उत्तम रीत्या सादर केल्या आहेत याबाबतीत त्याचं खरंच कौतुक.

माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या >> असे वाटणारा मीच एकटा आहे हा भ्रम होता तर Happy

अतिशय सुंदर चित्रपट.

काही प्रसंग तर कायम लक्षात राहण्याजोगे आहेत. बर्फिला आपल्यामागे करत आडव्या हाताने झिलमिल शृतीला तो माझा आहे हे ठसवते, शृती घडी घातलेले फोटो उलगडुन पाहाते हे प्रसंग कधीच विसरु शकणार नाही.

माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या
+१००००००००००००००००००००००००००००

माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या >>

अनुमोदान

मी परवा मैत्रिणींबरोबर बघितला. हा सिनेमा आपल्या आवडत्या माणसाबरोबर बघायलाच हवा म्हणुन काल नवर्‍याबरोबर पुन्हा बघितला. ज ब र द स्त सिनेमा!!!
रणबीरला तो शेवटी कपूर खानदानातला आहे इतकच म्हणुन कौतुक करणं हा त्याच्यावर अन्याय आहे. या माणसाला ती समज आहेच पण त्याच्या मेहनतीची पक्की जोड आहे. मला तो रॉकेटसिंगमधे आवडला. वेकप सिड मी पाहीला नाही. या सिनेम्यानी मी त्याची पंखी झालेय. तो घुसुनच गेलाय त्या कॅरेक्टरमधे.
ती नवी मुलगी पण गोड आहे. कामही मस्तच झालय तिचं.
आणि प्रियांकाबद्दल काय बोलावं? अप्रतिम! ती कधीच कुठेच प्रियांका वाटत नाही. हॅटस ऑफ!! जमलीय नुसती.

अनुराग बासु या माणूस जिनियस आहे. कै च्या कैच सही सिनेमे बनवतो. हॅटस ऑफ बॉस!
स्पॉयलर अलर्ट**************************************************************************************************

दिव्याचा खांब कापून मैत्रिची परीक्षा हे सगळे सीन मला खूप आवडले. तिला पटकन खिसा बाहेर काढुन धरायला देणं हे त्या दोघांनी खूप गोड केलय. बर्फीलाच असं सुचु शकतं. आणखी खूप लिहावसं वाटतय पण कुणी पाहीला नसेल तर नकोच लिहायला.

पाहिला सिनेमा.

आवडला...

रणबीर, प्रियांका व श्रुती सर्वाम्ची काम छान आहेत.

काही गोष्टी:

एक दोन सीन नोटबूक मधून तसेच्या तसेच उचलेत. ( नोटबूक माझा अतिशय आवडता चित्रपट)

काही सीन पाहून 'सदमा' ची आठवण झाली (कमाल हसन ची खास...)

म्हातार पणाचा मेकाअप पुर्ण गंडलाय एकदम..

तरीहे बघायाला छान आहे.

अवांतर : हिरोइन ला मात दिली काल सुद्धा. थियेटर मध्ये बर्फीला गर्दी हहोरिहिरोइन पेक्षा काल ही बातमी कळली.)

बर्फी पाहिला सगळ्यांची कामं आवडली पण इथे आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो "खेळ मांडला" ह्या मराठी चित्रपटाचा , ५~६ वर्षाच्या चिमुरडीने अंध मुक्या बहिर्‍या मुलीचा रोल केलाय , अगदी अफलातुन , हॅट्स ऑफ टु दॅट चिमुरडी.
लोक्स वेळ मिळाला तर नक्की खेळ मांडल बघा . अतिशय सुंदर चित्रपट आहे.

आज पाहिला. चांगला आहे पण संथ आहे. तिघांचीहि कामे सुंदर झाली आहेत. पण अद्वितीय वगैरे नाहि. अनेक चांगल्या हिंदी सिनेमातील एक!

मी पण खूप " गाजावाजा "झाला म्हणून गेले आणि खूपच बोअर झाला. खूप संथ पण आहे. आमच्या शेजारच कपल मध्यंतरानंतर उठून गेल . काय बकवास आहे म्हणून. आम्ही आपले पैसे वसूल करायचे म्हणून बसून राहिलो. अजिबात हसायला पण येत नव्हते. आत्ताच येऊन गेलेले "कहाणी" आणि "विकी डोनर " याच्यापेक्षा शतपटीने चांगले होते. हे माझ वैयक्तिक मत
"माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या " +१००००.
कमाल हसन च्या पुष्पक मध्ये पण तो मुका बहिरा होता ना. त्या सिनेमाची आठवण झाली Happy

ठीकच आहे. संथ आहे. मागे कोणी लिहिलेय वेगाने मान्ड्ता येणे शक्य नाही पण लोकाना गुंतवून ठेवता आले नाही तर बोर होणारच. स्क्रीन सोडून इकडेतिक्डे पहायला वेळ मिळाला म्हणजे सिनेमा गन्ड्ला.

कमाल हसन च्या पुष्पक मध्ये पण तो मुका बहिरा होता ना. त्या सिनेमाची आठवण झाली

पुष्पक हा एक मुकपट होता, बोलपट येण्याआधी जसे मु़कपट होते तसा.. त्यातले कुठलेही पात्र मुके किंवा बहिरे नव्हते.

एक दोन सीन नोटबूक मधून तसेच्या तसेच उचलेत. ( नोटबूक माझा अतिशय आवडता चित्रपट)
>>>
हेच लिहिलय मी वरती कुठे तरी Happy
अगदी अगदी!
ऑस्करला वैगेरे जावा इतका सुंदर नाहीच
आणि कहानी आणि बर्फीची तुलना करू नका लोकहो
कहानीच्या जवळपासही जात नाही हा सिनेमा

>> कहानीच्या जवळपासही जात नाही हा सिनेमा

Uhoh

इन अ गुड वे ऑर बॅड वे?

पहिल्याप्रथम ह्या दोन सिनेमांची तूलना फक्त तांत्रीक बाबींबद्दल होऊ शकते (सिनेमॅटोग्राफी,कॉस्च्युम्स्प, मेक-अप, पात्रयोजना वगैरे) पण कथाच मूळात इतकी वेगळी आहे दोन्हींची की तूलनाच होऊ शकत नाही ..

बाकी, मला वाटतं आपल्याला मसालामुव्हीज्, फास्ट-पेस्ड् सिनेमांची सवय झाल्यामुळे बर्फीसारखे सिनेमे खूप आवडणं, गल्लाभरू असणं हे शक्यच नाही ..

सशल एक तर जे तू म्हणालीस ते की कथाच एवढी वेगळी आहे की तुलना होऊच शकत नाही
तरीही तुलना केली गेलीच तर कहानी कधीही उजवाच ठरेल.
बर्फी खुप्प्प्प्प्प्प आवडला अस म्हणता नाही येणार अजिबातच.. कारण यातले काही प्रसंग आधी इतर सिनेमांतुन पाहिल्यासारखे वाटले, हाच रणबीर याआधी पाहिल्यासारखा वाटला ( अप्रेकिगक, रॉस्टा इत्यादींमधून)
प्रियांका बेस्ट !
इलिएना दिसायला मस्त आणि डोळे प्रचंड बोलके...
सिनेमा संपल्यावर एवढच फार लक्षात ठेवावस वाटलं

माझ्या मते सर्व कपूरांत ऋषी कपूर सर्वात चांगला अभिनेता आहे. राज कपूर तर जाम डोक्यात जातो माझ्या >>>> अगदी अगदी. पण शम्मीही आवडतो मला. Happy

हा सिनेमा ऑस्करला पाठवणे म्हणजे ह्याचंच द्योतक आहे की आपण ऑस्करला फारसं गांभीर्याने घेत नाही. सुंदर सिनेमा आहे पण 'ऑस्कर' टाईप नाही.

काल पाहिला.

रणबीर कपूर बघताना राज कपूर आणि चार्लि चाप्लिनची आठवण येत होती.

>>>>>> नंदिनी + १, बर्‍याचशा शॉटसमध्ये राज कपूरवर जसा चार्लि चाप्लिनचा प्रभाव होता तसा रणबीरवर त्या दोघांचाही स्पष्टपणे जाणवतो, काही काही सीन्स चार्लि चाप्लिनच्या मुव्हिजमधून जसेच्या तसे ऊचलले आहेत असे वाटते (उदा. रणबीर व पोलीस शिपायांचा शिडीवरील सीन किंवा पँटचे खिसे बाहेर काढून खिशात काही नाही हे दाखवतो तो सीन ई.). पण ओव्हरऑल एक मस्त सेन्सिबल डायरेक्टरचा चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळते.

>> ऑस्कर टाइप म्हणजे काय हो? <<

नीट सांगता येणार नाही... पण मला ऑस्करला पाठविण्यासारखं काही जाणवलं नाही. भारताचे प्रतिनिधीत्व करणार, तर ती सर्वोत्कृष्ट कलाकृती असायलाच हवी. माझ्या मते ह्याहून चांगले सिनेमे नक्कीच असतील.

उदा. - भारतीय सिनेमातील संगीत म्हणून जर 'प्रीतम'चं संगीत ऐकवलं जाणार असेल, तर काय बोलणार ! तो संगीत देत नाही, संगीत 'बनवतो'.

पण प्रीतमला ऑस्करसाठी नाही केलंय नॉमिनेट! Happy

बर्फीने १०० कोटी गल्ला ऑलरेडी जमवला आहे. ही बातमी वाचून मस्त वाटलं.

ऑस्करला पाठवण्यासारखं म्हणजे वेगळं काय असतं?
मी अजून बर्फी पाह्यलाच नाहीये पण ऑस्करयोग्य किंवा तत्सम बरेच शब्द वाचून खूपच कुतूहल जागृत झाले.

नीरजा ताई,

'श्वास'चा अनुभव गाठीशी असताना तुम्हीच ह्या विषयावर आधी अधिकारवाणीने बोलावं.
पूर्वी 'सागर' ऑस्करसाठी गेला होता. 'एकलव्य' गेला होता. इतर भाषांतील/ देशांचे सिनेमे आणि भारतीय सिनेमे ह्यांत काही फरक असतो का ? नक्कीच असावा.

ते अधिकार आणि वाणी आपापल्याजागी ठिकेत.

ऑस्करसाठी म्हणून वेगळा असा सिनेमा बनवणे किंवा वेगळा 'ऑस्करयोग्य' असा काही प्रकार किंवा तत्सम हे खरंच मला माहित नाही.

मला बर्फी एक सुंदर अनुभव वाटला..प्रत्येकाने अनुभवावा असा..चांगलं वाईट म्हणण्या पलिकडचा!

हा चित्रपट फार काहि चान्गला नाहिये. सद्ध्या खूप प्रसिद्धी करुन खूप काहितरी महान कलाक्रुती निर्माण केली असे दाखवतात. सर्व च गोश्टी सुमार पातळीच्या असल्या मुळे थोडी बरी कलाक्रुती फार ग्रेट असल्याचे भासवले जाते आहे.
प्रियान्का चे पात्र तर मेन्ट्ली रेटार्डेड वाटते.

Pages