कहाणी - पुस्तक परिक्षण - बी

Submitted by संयोजक on 14 September, 2012 - 12:40

कहाणी
--------

कहाणी कशी? सरिता जशी
वाहात जाय निर्मळ पाणी
पाण्याला बांध घालता फुटे
आसवांना ही समर्थ वाणी

... एका पुस्तकाच्या मागील बाजुस मी ह्या चार ओळी एका दमात वाचल्या आणि त्यातील पहिल्या दोन ओळींनी माझ्या मनात लगेच घर केले. वाटले होते हे पुस्तक एखादे काव्यसंग्रह असेल पण ते एक छोटेखानी पुस्तक निघाले. दिवसाच्या तीन चार तासात रमतगमत सहज वाचून पूर्ण होईल इतके हलकेफुलके आणि रसरशीत पुस्तक! मी हे पुस्तक दोन तीनदा वाचले तशी मला ह्या पुस्तकाची गोडी आणखी आणखी कळत गेली.

पुस्तकाचा विषय अतिशय सोपा आहे पण संशोधन करायचा प्रयास केला तर जन्म अपुरा पडेल इतकी मोठी त्याची व्याप्ति आहे. ह्या व्याप्तिचा एक अंश का असेना, मला ह्या पुस्तकातून मिळाला. आपल्या भारतीय भाषेतील जुन्या व्रतकथा, पौराणिक कथा, लोककथा, दैवत कथा आपण जेंव्हाकेंव्हा ऐकल्यात तो काळ आपल्या बालपणीचा असण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय ह्या कथा आपण स्वतःहून वाचण्यापेक्षा त्या इतर कुणीतरी पोथी वाचून सांगितल्या असतील किंवा गोष्टीरुपाने कुणाच्या तोंडून आपण ऐकल्या असतील. एकदा नाही अनेकदा त्या ऐकल्या असतील. कधी मन लावून ऐकल्या असतील तर कधी ऐकाव्याच लागतात म्हणून बळजबरीने ऐकल्या असतील.

आठवा... पौष महिन्यातील रविवारचे पहाटेचे गारठलेले दिवस, श्रावण महिन्यातील सोमवारी शंकराच्या मंदिरातली गर्दी, नवरात्रातील मंगळवारचा दिवस, मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरूवारी संध्याकाळची महालक्ष्मीची पूजा, संतोषीमातेचे शुक्रवारचे कडक व्रत, शनिवारी मारुतिच्या देवळातली आरती, घरी किंवा शेजारी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजा, हरतालिका-वटपौर्णिमा-महाशिवरात्रीचे व्रत! ह्या सर्व धार्मिक पूजाविधींमधे पोथी वाचून त्या त्या देवतांचे आणि त्यांच्या दिवसांचे माहात्म्य त्यातील कथा-कहाण्या वाचून सांगितले जायचे. त्या कथा पूर्णपणे ऐकून आणि नंतर प्रसाद घेऊन मगच तुम्हाला घरी जाता येत असे. नाहीतर मध्येच काहीतरी विपरीत घडेल हे कथेत आधीच बजावून सांगितलेले असायचे.

लहाणपणी ऐकलेल्या ह्या कथा भाकड-कथा म्हणून कदाचित तुमच्या विस्मृतीच्या अडगळीत जाऊन पडल्या असतील. तरीपण त्यातल्या सहजसुंदर बोलीभाषेचं, वाक्यांना असलेल्या यमकांच्या तालाचं सौंदर्य मनात राहिलं असेल. "आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याच्या दोन राण्या होत्या. एक होती आवडती. दुसरी होती नावडती. आवडतीचं कौडकौतुक होई. नावडतीला गाईच्या गोठ्यात ठेवी." इतकी सहजसोपी पद्धत कथा सुरु करण्याची. अगदी छोटी छोटी वाकयं. कुठेच किचकट वाटणार नाही इतकी सुमधुर शैली. कळतील इतके साधेसोपे शब्द. भावतील इतक्या रम्य कल्पना. चटकन स्पर्श करतील अशी त्यातील सुखदु:खे. मोजकीच पात्रं आणि कथेचा विस्तारही मोजकाच! बर्‍याच कथांची सुरुवात अशी आटपाट नगरानेच व्हायची की ते नगर जवळच कुठेतरी हरवलं आहे असे वाटत राहायचे.

डॉ. विद्युल्लेखा अकलूजकरांना ह्या कथा परत एकदा भेटल्यात त्या कॅनडामध्ये! परकीयांना आपल्या दैवत-कथा, मिथ्य-कथा आणि साहित्य शिकवताना त्यांनी आपल्या कहाण्यांचा अधिक डोळसपणाने अभ्यास केला. त्यातील पात्रांच्या व्यक्तिरेखा अधिक जिवंत, अधिक अर्थपुर्ण नजरेने शोधल्या. आपल्या रुढी, परंपरा, श्रद्धा आणि व्रतवैकल्यांची गरज यांची चिकित्सा करताना त्या कहाण्यांतील कार्यकारण-भावाचा आविष्कार त्यांना समजला. व्यक्ती आणि समष्टी यातला परस्परसंबंध त्यांनी मनमोकळेपणानी त्यांच्या 'कहाणी' ह्या पुस्तकातून सांगितला. मला तो फार रोचक वाटला. आपल्या कथा किती अर्थघन आहेत, त्यातली काही सत्य किती शाश्वत आहेत याचं भान आलं.

'कहाणी' ह्या पुस्तकात एकीकडे लेखिकेच्या कॅनडामधील मित्रमैत्रिणींच्या जीवनातल्या आणि काही लेखिकेच्या जीवनातल्या खर्‍याखुर्‍या कथा येतात आणि त्यासोबत येतात आपल्या ह्या जुन्या कथा. पुस्तकाच्या सुरूवातीलाच लेखिकेने बाईच्या पोटशुळाची एक कन्नड कथा मराठीत अनुवाद करुन रसाळ पद्धतीने सांगितली आहे. वेळीच कथा सांगितली गेली की बाईचा पोटशूळ कसा बरा होतो असा जरी वरवर
विनोदी अर्थ ह्या कथेचा निघत असला तरी त्यामागचा खरा उद्देश मात्र वेगळाच काहीतरी असतो.

आठवड्याचे सात दिवस तसे ह्या कहाण्यांचे सात दिवस. साती दिवशी वेगळ्या देवतेची, वेगळ्या वाराची कहाणी असते. म्हणून ह्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाचे नाव कुठला तरी वार आहे. अर्थात प्रकरणे फक्त सातच आहेत. पहिली कथा शनिवारी सुरु होते आणि शेवटची कथा शुक्रवारी संपते. मला हा आकृतीबंध फार गमतीशीर वाटला. पण हा आकृतीबंध पुस्तकाच्या आशयाची तंतोतंत जुळला हे दोन तीन वेळा पुस्तक वाचून झाल्यावर कळले. लेखिकेचा अभ्यास किती खोलवर आहे हे पुस्तकाच्या साधेपणावरुन लक्षात येते. कारण ज्याला एखाद्या विषयाचे खोलवर ज्ञान आहे तोच तो विषय सोपा करुन सांगू शकेल. शनिवारची कथा सुरजीत, दलजीत, शिवानी, सिमरन ह्या पात्रांची आहे. त्यांची कथा सांगता सांगता लेखिकेला सुभद्रेची वाणवशाची कहाणी आठवते. रविवारची कथा कावेरी, कृष्णन, कृष्णनची पहिली बायको, शिवानी, लेखिका ह्यांच्यामधली आहे. ही कथा सांगता सांगता लेखिका आदितवारी झालेल्या मुलाची आणि तळ्याची गोष्ट सांगते. सोमवारची कथा ही 'मील्स ऑन व्हील्सची' आहे. ही कथा सांगताना लेखिका वेळूचं बेट आणि सोन्याच्या हाराची कहाणी सांगते. मंगळवारची कथा ज्योडीची आहे. ती सांगताना लेखिकेला तीन कहाण्या आठवतात. 'ब्राम्हणाच्या स्त्री'ची कहाणी, आवडती-नावडतीची कहाणी, ऋषी आणि फळाची कहाणी. बुधवारची कथा ही लेखिका तिच्या बिरबल नावाच्या बोक्याविषयी आणि पूर्वी पाळलेल्या मांजरांबद्दल सांगते. त्या सांगतांना दवंडीची कहाणी येते, मग कुत्रा आणि बैलाची पुर्वजन्माची कहाणी येते, त्यानंतर राज्याच्या पंगतीची कहाणी येते. गुरूवारची कथा ही सखुची कथा आहे. सखु ही लेखिकेची विद्यार्थिनी आहे. तिची कथा सांगताना लेखिका गौतमाच्या यशोधरेबद्दल सांगते. सर्वात शेवटची कथा 'शुक्रवार'. ही कथा मेंदी रचणार्‍या ताहिराची आहे. ती सांगताना लेखिका आपल्याला कहाणी सांगते एका म्हातार्‍या बाईची.

आपल्या जीवनात अद्ययावत संदर्भात नव्या खर्‍याखुर्‍या कथा घडत जातात आणि भूतकाळातील ह्या जुन्या कथांशी त्याचा अन्वय लावणे जवळजवळ अशक्य वाटायला लागते. 'कहाणी' हे पुस्तक वाचून मात्र लेखिकेने भूत-वर्तमानाची 'कहाणी'तली सांधेजोड किती सहजपणे केली हे लक्षात येते. वर म्हटले तसे एक हलकेफुलके सहज रमतगमत वाचता येईल असे हे पुस्तक आहे - कहाणी.

कहाणी
लेखिका: विद्युल्लेखा अकलूजकर
किंमत: १०० रुपये
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
IMG_4934.JPGIMG_4937.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हं...............छान लिहिलंस बी! वाचलं पाहिजे.
तसंही अकलूजकरांचं लिखाण फार पूर्वीपासून ....त्या मिळून सार्‍याजणी"च्या दिवाळी अंकात लिहायच्या तेव्हापासून आवडतं!

सुरेख परीक्षण.
पुस्तकही मनोरंजक दिस्तेय.
मिळवून वाचायलाच पाहिजे आता.
धन्यवाद बी.