नाते : भक्तीचे आणि मातीचे - ललिता-प्रीति

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:39

गणपती आले. आता दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असेल. "गणपती बाप्पा मोरया" च्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून जाईल. भक्तीरसाला उधाण येईल. गणेशोत्सवाशी संबंधित काहीही लिहायचे झाले, तर त्याची सुरूवात अशीच करायची पध्दत आहे. पण multitaskingच्या जमान्यात केवळ भक्ती एके भक्ती करून भागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशभक्तीशिवाय इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. भर रस्त्यांत मांडव उभे करावे लागतात; मांडवाच्या अलिकडच्या-पलिकडच्या शंभर मीटरच्या परिसरात दिव्यांची रोषणाई करावी लागते; त्यासाठी राजरोस वीजचोरी करावी लागते; रोषणाईत उजळून निघतील असे स्थानिक राजकारण्यांचे चेहरे असलेले मोठाले फ्लेक्स टांगावे लागतात; परिसरातल्या नागरिकांकडून वर्गणी उकळावी लागते; त्याबदल्यात दहा दिवस लाऊड-स्पीकरवर आरत्या, भक्तीगीतं आणि अभक्तीगीतं जोरजोरात वाजवून त्यांना जेरीस आणावे लागते. यंदा तर दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या पेहरावाकडे लक्ष ठेवण्याच्या कामाचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर आहे. पण कार्यकर्ते ही सर्व जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यांवर हिमतीने पेलतील. समर्थ खांदे, भडक डोकी आणि शून्य सामाजिक भान असलेले कार्यकर्ते गणपतीला न चुकता ‘बाप्पा’ म्हणतात. पूर्वी घरातली चिल्लीपिल्ली तेवढी देवाला ‘बाप्पा’ म्हणत; तो देव म्हणजे गणपतीच हवा अशी काही अट नसे. पण आता मात्र ‘बाप्पा’ हा गणपतीचा unique-id झालेला आहे.
हा ‘बाप्पा’ multitasking आहे, म्हणून कार्यकर्तेही multitasking आहेत. मात्र गणपतीचे multitasking मर्यादित स्वरूपाचे असते. भक्तांना विघ्नांपासून दूर ठेवणे आणि विद्यार्थ्यांना आशिर्वाद देणे ही दोनच टास्के युगानुयुगे त्याच्या शिरावर आहेत. कार्यकर्त्यांना सोसाव्या लागणार्‍या भाराच्या तुलनेत हे तर काहीच नाही. पण एकापेक्षा अधिक म्हणजे ‘मल्टी’ या नियमाने त्याला multitasking म्हणण्याला कुणाचीच हरकत नसावी. कालौघात विद्यार्थ्यांचे परिक्षार्थी बनल्यामुळे गणपतीने आशिर्वादाव्यतिरिक्त सर्व संबंधित कारभार मंत्रालयातल्या शिक्षणविभागाकडे outsource केला. त्याला बिचार्‍याला काय ठाऊक, की त्यामुळेच विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर आपण एक मोठे विघ्न उभे करतो आहोत.
हे विघ्न निरनिराळ्या परिक्षांच्या, त्यांच्या सतत बदलणार्‍या पध्दतींच्या, काठिण्यपातळ्यांच्या, शाळा-कॉलेजप्रवेश आणि निकालांतल्या घोळांच्या रूपात विद्यार्थ्यांसमोर उभे राहते. त्याचे हरण करण्यासाठी ते पुन्हा गणपतीलाच साकडे घालतात. एकटा गणपती कुठेकुठे पुरे पडणार असा विचार करून पालक भरमसाठ पैश्यांच्या बदल्यात आपापल्या पाल्यांना ‘कोचिंग क्लास’ला पाठवतात. आता विघ्नाचे निराकरण दूर नाही या भाबड्या समजुतीत निर्धास्त राहतात. हे क्लासेस, कोचिंगचा बर्‍यापैकी देखावा उभा करतात. सरावाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भरपूर परिक्षांच्या चरख्यातून पिळून काढतात. विद्यार्थी रट्टा मारण्याच्या कामी हळूहळू तैय्यार व्हायला लागतात आणि तेवढ्यात...
तेवढ्यात सरकारला अवदसा आठवते. अभ्यासक्रम बदलल्याची किंवा परिक्षांची वा गुणांकनाची पध्दत बदल्याची घोषणा केली जाते. ‘जळ्ळं मेलं ते सरकार’ असं म्हणत पालक बोटे मोडतात. यंदा या ‘जळ्ळं मेलं’ जपाची शंभरी भरली असावी. कारण मंत्रालयाला आग लागून सरकारी कामकाजासंबंधित बरंच काही ‘मेलं' जळ्ळून गेलं. त्यात हमखास खाबूगिरी करता येण्याजोगे काही विभागही होते म्हणतात. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात या विघ्नाने होरपळलेलेही अनेकजण साकडेच्छुक असणार.
त्याव्यतिरिक्त निरनिराळ्या इच्छा-आकांक्षांसकट दरवर्षी नित्यनेमाने रांगा लावणारे इतर अनेकजण असतातच. कारण इच्छा काहीही असो, देवापुढे उभे राहण्याचा पर्याय सर्वांसाठी खुला असतो.
काहीजणांना या मांडवातला गणपती पावतो; काहींना त्या मांडवातल्या गणपतीची प्रचिती येते. काहीजण अनेक वर्षे या मांडवातल्या गणपतीची आराधना करूनही हाती काहीच न लागल्याने हळूच त्या मांडवात जातात. त्या मांडवातले काहीजण, जे हाती लागले आहे त्यापेक्षाही अधिक काहीतरी गवसावे, म्हणून नंतर या मांडवातही येतात. त्यांना हळूच येण्याची आवश्यकता नसते. या सगळ्या भक्त-रहदारीत गणपती बिचारा सर्वांची वर्गवारी कशी करतो, कुणाला पावायचे आणि कुणाला नाही, कोण फ्रेशर आहे आणि कोण रिपीटर, हे कसे लक्षात ठेवतो हे एक मोठे कोडेच आहे.
ज्यांना साकडे घालण्याचे काम नसते, असे लोक निव्वळ मांडवांची सजावट आणि तिथले हलते देखावे पाहण्यासाठी जातात. कारण नंतर आपण कुठे कुठे, कसकसले मांडव पाहिले, कुठले देखावे आपल्याला आवडले, कुठले मांडव फालतू होते, या विषयांवरच्या चर्चांमधे त्यांना अहमहमिकेने भाग घ्यायचा असतो.
‘अहमहमिका’ हा multitasking कार्यकर्त्यांचाही password आहे. पु.लं.नी लिहून ठेवले आहे, की जाज्वल्य अभिमानाचा निकष लावावा आणि पुणेकर ओळखावा. त्याच चालीवर, साध्या-साध्या गोष्टींसाठी अहमहमिकेवर (हे ‘हमरीतुमरी’ या चालीवर वाचावे) येण्याचा निकष लावावा आणि मंडळाचा उत्साही कार्यकर्ता ओळखावा असे म्हणता येईल.
हलते देखावे पाहण्यासाठी खूप गर्दी होते. दिवसभर गर्दीचे नियोजन करताकरता या उत्साही कार्यकर्त्यांच्या तोंडाला फेस येतो. मग गर्दी ओसरली, की रात्री उशीरा फेसाळत्या पेयाच्या ग्लासात तो तोंडचा फेस लयाला जातो. मांडवातले हलते देखावे विश्रांतीला जातात आणि मांडवाच्या मागे नशेतल्या कार्यकर्त्यांचे हलते देखावे सुरू होतात. त्यातला एक पुतळा सतत बाटली तोंडाला लावण्याची कृती करतो; एक सतत सिगारेटी फुंकतो; एक पानमसाल्याच्या पुड्या तोंडात सोडतो आणि त्याची रिकामी पाकिटे गणपतीच्या मूर्तीसाठी तयार केलेल्या भव्य चौथर्‍याखालीच भिरकावतो. पुढचे काही तास असे तीन-चार पुतळे तो सामूहिक हलता देखावा चालू ठेवतात. मांडवातल्या गणपतीला मागे वळून पाहण्याची मुभा आणि सवय दोन्ही नसते. त्यामुळे तो शांतपणे सकाळ होण्याची वाट पाहत बसून राहतो. विघ्नहरण आणि विद्याग्रहण दोन्हींसाठी शांत डोक्याने विचारपूर्वक काम करण्याची गरज असते हे त्याच्याइतके अन्य कुणाला ठाऊक असणार? त्यामुळे तो शांतच असतो.
ही स्थितप्रज्ञता वर्षानुवर्षे त्याच्या कामी आलेली आहे. कशी?
कोणे एके काळी या दगडांच्या देशातील भूमिपुत्रांच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाची एक निराळीच व्याख्या होती. हे दिवस असे असत, की शेतीच्या कामांची सुरूवातीची लगबग आटोपलेली असे; पेरण्या उरकलेल्या असत; पहिले एक-दोन जोमदार पाऊस झालेले असत; शेते-शिवारे पाण्याचिखलाने भरून गेलेली असत. थोडक्यात, सगळे कसे मनाजोगते घडलेले असे. मग शिवारातल्या त्याच चिखलाचा एक छोटासा गोळा उचलून त्याला विघ्नहर्त्याच्या मूर्तीचा आकार दिला जायचा, त्याची मनोभावे पूजा व्हायची आणि ‘आमच्या कष्टांचं मोल आम्हाला मिळू दे, रे, देवाऽऽ यंदा पिकं उत्तम येऊ देत’ असे त्याला साकडे घातले जायचे. चार-सहा दिवस सकलजन भक्तीरसात डुंबून जायचे. थकलेल्या शरीराला त्याने दिलासा मिळायचा; मनाला चार घटका विरंगुळा मिळायचा. पण हे सारे चार-सहा दिवसच. कारण, पुढली ढीगभर कामे नजरेसमोर दिसत असत. गणपतीचेही असे म्हणणे मुळीच नसायचे, की काम-धाम सोडून भक्तांनी आपल्या कच्छपि लागावे. त्यामुळे त्याचा मुक्काम जास्तीत जास्त दहा दिवसांचा. त्यानंतर जिथून तो यायचा, म्हणजे माती-चिखलातून, तिथेच त्याचे भक्त त्याला परत पोहोचवून यायचे. गणपती आणि भक्तांची association ही अशी खाजगी आणि मर्यादित होती. कष्टांना आणि कामावरील निष्ठेला मिळालेली भक्तीची जोड असे आणि इतकेच त्याचे स्वरूप होते. टिळकांनी त्या associationमागची छुपी ताकद ओळखली. तिचा ब्रिटिशांविरुध्द वापर करण्याचे ठरवले. खाजगी आणि मर्यादित स्वरूपात ते घडवून आणणे शक्य नव्हते. म्हणून त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. गणपतीला ते आवडले असणारच. पण त्याने चेहर्‍यावर काही दाखवले नाही. तो शांत राहिला.
तेव्हाच्या गणेशोत्सवातील मेळे, राजसत्तेविरुध्द आवाज उठवण्यासाठी मिळालेले हक्काचे व्यासपीठ, त्यामार्फत जनतेशी साधला जाणारा संवाद, नेत्यांमार्फत जनतेला दिले जाणारे छुपे पण कल्याणकारी संदेश, त्यातून होणारी जनजागृती, समूहाची ताकद ओळखून त्यानुसार आखले गेलेले अन्य लोकहितकारी उपक्रम, हे सगळे बघताबघता मागे पडत गेले. निव्वळ चकचकाटाने आणि दिखाऊपणाने त्यांची जागा घेतली. त्या चकचकाटात मूर्तीचे मातीशी असलेले नाते झाकोळून गेले. तरीही गणपती शांतच राहिला.
आजही तो वरकरणी शांतच असतो--काळाची गरज ओळखून खंबीरपणे ही सार्वजनिक उत्सवाची बाजारू पध्दत बंद कोण पाडतो याच्या प्रतिक्षेत. तो दिवस कधी ना कधी उजाडेल. त्याला आशा आहे. दिखाऊपणाचा मागमूसही नसलेल्या, पार अंतःकरणाच्या तळातून निघालेल्या "गणपती बाप्पा मोरया"च्या निखळ, निर्मळ, पवित्र गजराने अवघा आसमंत दुमदुमून गेलेला त्यालाही हवाच आहे. भक्तीचे नाते ना त्याला तोडायचे आहे, ना त्याच्या सच्च्या भक्तांना.
बाकी हे अधलेमधले हलते देखावे काय, आज आहेत, उद्या नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहिलंय. योग्य निरीक्षणं आणि टिपणी! Happy

साकडेच्छुक! .... Biggrin

सार्वजनिक गणेशोत्सव बंद पडेल अशी आशाच सोडा. इतक्या पैशांची उलाढाल होणारा धंदा कोण बंद करेल? आता तर परदेशी पर्यटकांना खास भक्ती टुरीझमकरता आकर्षित केले जाते. 'ब्रँड गणेश', 'ब्रँड वारी' दिवसेंदिवस पॉवरफुल होतायत. भक्ती, भाव असल्या किरकोळ गोष्टींना कोण महत्त्व देणार? Happy

फारच सुंदर लेख - सूक्ष्म निरीक्षण व अतिशय संयत स्वरात टिप्पण्या - खूप आवडला - अंतर्मुख करायला लावणारा लेख....

या सगळ्यावर उपाय काय ???? हे मोठ्ठेच प्रश्नचिन्ह सतत पुढे उभे रहाते....

ललिता-प्रिती - मनापासून धन्स...

लले, अजुन काही गोष्टींवर प्रकाश टाकायला हवा होतास - जसे पुण्यातील लक्षी रस्त्यावरील मिरवणुकीला लागणारा अनाठायी वेळ, त्यावेळी आजुबाजुच्या रहिवाशांना सहन करावा लागणारा गर्दीचा, आवाजाचा त्रास, एखादी अडलेली गरोदर स्त्री, म्हातारी आजारी माणसे किंवा अत्यवस्थ रुग्णांना त्या गर्दीमधून रुग्णालयात नेण्यासाठी त्या वेळी रुग्णवाहीका कशी येऊ शकत असेल ही विरोधी मते.

तसेच छोटे व्यावसायीक, मांडववाले, लाईटवाले, स्पिकरवाले, मुर्तीकार, आर्टीस्ट, गाड्यावरचे विक्रेते ई. मंडळींची वर्षाची बेगमी हा ऊत्सव करत असतो. त्यामूळे या उत्सवकाळाकडे ही मंडळी डोळे लाऊन बसलेली असतात. Happy

मामी>>+१ काल आमच्या सोसायटीत गणपती समोर दारु देसी न रावडी राठोड चालु होतं , गाणी लावणारे वय वर्ष २-१५ मधले लोक!! असं वाट्त होत की आता गणपती कान बंद करेल न , प्रार्थना पण एकणार नाही Sad

शशांक + १ . वाचताना अधि वाटल, कहि वाक्य हायलाईट करवित ! शेवटी शेवटी सगळा लेख हायलाईट करवासा वाटला !.मस्त Happy

प्रीति , सुंदर लेख. आवडला.

(तीन वेळा एडीटलं लले. प्रिती, प्रीती, प्रिति !!)

एकदम मार्मिक झाला आहे लेख.

>>>चिल्लीपिल्ली तेवढी देवाला ‘बाप्पा’ म्हणत; तो देव म्हणजे गणपतीच हवा अशी काही अट नसे. पण आता मात्र ‘बाप्पा’ हा गणपतीचा unique-id झालेला आहे. <<<

आणि

>>>त्या चकचकाटात मूर्तीचे मातीशी असलेले नाते झाकोळून गेले.<<<

अगदी माझ्या मनातले.

लेख आवडला.

उद्या नाहीत. > नविन पिढी समोर हे एक मोठं आव्हान आहे... जर बदल घडला तर गणपती पावला म्हणायचा. Happy

छान लिहिलंय.
इथे ख्रिसमस सेलेब्रेशन पहाताना हाच विचार येतो मनात - सार्वजनिक समारंभ अन ध्वनिप्रदुषण नाही सुदैवाने. पण हेअर ड्रेसर पासून सर्वांना गिफ्ट देणे घेणे , डील शोधणे , शेजार्‍यांपेक्षा जास्त झगमग डेकोरेशन करणे यालाच महत्व आहे. त्यात येशू ख्रिस्ताचा गोठयातला जन्म फक्त घरापुढच्या डिस्प्ले पुरताच उरलाय Sad

चांगले लिहीलय. मेधा अगदी, कुठलाही सण कमर्शिअल झाला की त्यातली मजा जाते.
ललिता तू म्हणतेस तसा अगदी साधा फारसा चकचकाट नसलेला गणेशोत्सव इथल्या बहुतांश महाराष्ट्र मंडळात होतो, याला इथल्या मराठी लोकांची (कमी) संख्या कारणीभूत असावी.

प्रीती, उत्तम लिहिले आहेस्...अगदी मनातले. आणि हे इतके खरे लिहायला धाडस लागते हे वरती दिनेशदा नी लिहिले आहे ते खरच आहे.
सार्वजनीक गणेशोत्सवाचे मूळची स्वरूप बदलून केव्हाच मागे पडले आहे. सध्याचा हा कल्लोळमय गोंगाटी भपका, त्याला उत्सव तरी कसे म्हणायचे? हा देवाच्या नावाखाली चाललेला बाजार बंद होईल तो सुदिन!