देव माझा - दिनेशदा

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:03

देव माझा...

जसं जसं वय होत जातं, तसं आमच्यावेळी हे असे नव्हते हो, असे सूर आळवायची सवय लागते, नाही का ?
आता मुंबईतल्या गणेशोत्सवाचेच बघा ना. मी असे म्हणू शकतो कि पुर्वी थर्मोकोल नव्हते, रोंबा सोंबा नाच
नव्हता, रासायनिक रंग नव्हते, नवसाला पावणारे बाप्पा नव्हते कि राजे ही नव्हते... पण नाही, एक गोष्ट
मात्र, इतक्या वर्षात बदलली नाही, ते बाप्पाचे रुप.

अगदी लहानपणापासून बाप्पाचे जे रुप मनात ठसलेय, त्याला आजही कुणी विचलीत केलेले नाही, करु
शकणारही नाही. आणि हा बाप्पा असतो तो फक्त या उत्सवातलाच. देवळात हा भेटत नाही. देवळातल्या
मूर्तींचा कसा, धाक वाटतो. एक अंतर कायम असते. पण या मूर्तींचे तसे नसते.

शाळकरी वयात, बाप्पा म्हणजे कुणीतरी आपला वाटायचा. लाडका शिक्षक वाटायचा. आपल्याला बुद्दी देणार,
परिक्षेत उत्तम गूण मिळवून देणार, असा विश्वास वाटायचा. पण त्याचा धाक नाही वाटायचा.
येई हो विठ्ठले आरतीतला, सूर लांबवताना. प्रसादासाठी पुढे पुढे करताना, आवडलेला प्रसाद परत परत घेताना,
मूर्तीसमोर खेळताना, बाप्पा रागावेल असे कधी वाटलेच नाही.

अगदी डोळ्याला डोळा भिडवून बघत बसायचो. त्या डोळ्यांची कधी भिती वाटली नाही, उलट ते डोळे
कायम आश्वासक वाटत आले आहेत.

इतर देवांचा देवळातील मूर्ती, त्या त्या देवांचे भाव दाखवतात. श्री दत्तात्रेय नेहमीच वडीलधारे दिसतात. तर
मारुतरायाच्या अनागर रुपातही, एक धीरोदात्त मित्र दिसतो. देवीच्या रुपात कधी आई दिसते तर कधी
अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री. श्रीरामाच्या मूर्तीत सोसता न येईल असा आदर्श दिसतो तर श्रीकृष्णाच्या रुपात,
एखादे लहान मूल.

पण या बाप्पाचे तसे नाही. वरील सर्व देवदेवता किंचित मानवीरुपात असल्याने, भाव वाचता येतात. पण
गजाननाच्या चेहर्‍यात मानवी चेहरा नसूनही, एक प्रेमळ भाव दिसतात. बाकी सर्व देवतांच्या मूर्तींचे ओठ
किंचीत विलग दाखवल्याने, स्मितहस्याचा भास होतो, पण बाप्पाला ओठ नसले तरीही, एक मिश्किल हास्य
अनुभवायला येते.

या मूर्तीकारांचे कसब जितके वाखाणावे तितके थोडेच, या अमानवी रुपाला इतके मंगलमय करण्याची किमया
ते सहज साधतात. मूर्तीकडे बघून कधी असे वाटतही नाही कि एका मानवी शरीरावर, गजाचे मुख आहे, हे.

बाकीच्या मूर्ती, या सुघटीत शरीराच्या असल्यामूळे अतिआदर्श आणि म्हणूनच थोड्या परक्या वाटतात
तर बाप्पा हे तुंदीलतनू असले तरी, घरातलेच कुणीतरी आहेत, असे वाटतात.

आणि या आखणी कलाकारांचे कौतूक करावे तेवढे थोडेच. अत्यंत नेमके रंग आणि वळणे यातून बाप्पांचे डोळे
एवढे जिवंत करतात कि, बाप्पा कायम आपल्याकडेच बघत आहे, असे वाटत राहते.

एखाद्या मूर्तीशी एवढी मानसिक जवळीक, केवळ बाप्पाशीच होऊ शकली. आजही मूर्तीचे विसर्जन करताना,
कुणीतरी आपले माणूस, दूर निघाले असे वाटते.

देव म्हणजे ती मूर्ती नाही, ते रुप नाही... ते सर्व या पलिकडे आहे. हे तत्व मनावर बिंबवण्यासाठीच बहुदा
आपल्याकडे विसर्जनाची प्रथा आहे, पण गणेशमूर्तीच्या बाबतीत, हे स्वीकारणे फार अवघड जाते.
विसर्जन झाल्यावरही, त्या ठिकाणी तेच रुप असल्याचा, भास होत राहतो.

आज, जीवनाच्या या वळणावर बाप्पाकडे काही मागावेसे वाटत नाही, पण त्याने कायम सोबत असावे, असे मात्र
वाटते, घरातल्या एखाद्या वडीलधार्‍या माणसासारखे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, कित्ती छान लिहीलंत!! Happy
खूप सोपं, थेट आणि मना-मनातलं!
खरंच तुम्ही म्हणता तसं मानवी स्वरूप नसतानाही त्या चेहर्‍यावर आश्वासक भाव दिसतो, असतोच Happy
मूर्तीकारांना दंडवत!

बाप्पा बेस्ट फ्रेंडच्या यादीत अगदी अपल्या लहानपणापासूनच जाऊन बसतो, अगदी अग्रस्थानी... आणि लहानपणापासूनच कुठल्याही कार्याच्या सुरूवातीच्याही आधी गणेशाचे पूजन असल्याने, तो नाही तर "सुरूवातच" नाही हे आत ठसलेलं असतं... मग साध्या सुपारीतही 'तो' आहे असे समजून विड्याच्या पानावर त्याला प्रतिस्थापून त्यात पाहिलेला बाप्प्पा असो, एखाद्या पोस्टरवरचा असो, देवघरातला असो, फोटोफ्रेम वरचा असो याच्याकडे पाहिले की कुठूनसे स्मितहास्य आपल्या चेहर्‍यावर उमटतेच... हीच त्याची महती की नई? Happy

सही

दिनेश, पूर्ण लेखालाच अगदी-अगदी.
खूप सच्चं, आपल्यातलं लहानपण जागवणारं लिखाण.

पण नाही, एक गोष्ट
मात्र, इतक्या वर्षात बदलली नाही, ते बाप्पाचे रुप.
>>>>>>>>>>

+७८६
भिडले अगदी.. Happy

दिनेशदा, तुमचं लिखाणहि त्या गणपतीबाप्पासारखंच आहे. इतकं सरळ, साधं लिखाण तुम्ही अगदि सहजपणे लिहिता. आणि म्हणूनच सगळ्यांना आपल्या मनातलंच लिहिलंय असं वाटतं. खूप छान लिहिलंय !!

Pages