पालक मकई

Submitted by दिनेश. on 26 September, 2008 - 04:07
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची एक जूडी, एक टीन स्वीट कॉर्न किंवा ताजे स्विट कॉर्न दोन वाट्या, अर्धी वाटी काजू, अर्धी कप दुध पावडर, चार पाच ओल्या मिरच्या, एक मध्यम कांदा, एक मध्यम बटाटा, थोडी दालचिनीची पूड, मीठ व तूप

क्रमवार पाककृती: 

पालकाची पाने खूडून घ्यावीत. थोडे तूप गरम करुन त्यात हिरव्या मिरच्या टाकाव्यात व पालक घालावा. झाकण न ठेवता तो परतून घ्यावा. त्याचा रंग बदलला कि लगेच उतरुन घ्यावा.
कांदा उभा बारिक चिरावा. बटाटा सोलुन त्याचे छोटे चौकोनी तूकडे करावेत. थोडे तूप तापवून त्यावर कांदा परतावा, तो सोनेरी झाला कि बटाट्याच्या फोडी सोनेरी कराव्यात. मग मक्याचे दाणे घालावेत. टिन मधले पाणी किंवा साधे पाणी घालून ते शिजू द्यावेत.
तोवर पालक, काजू आणि दूधाची पावडर असे सगळे बारिक वाटून घ्यावे. लागलेच तर थोडे पाणी घालावे. ते मक्यामधे घालावे. मिठ घालुन झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवावे. मग गॅस बंद करुन दालचिनीची पूड घालावी. मग वाटलीच तर तूपाची जिर्‍याची फोडणी द्यावी. हव्या तर फोडणीत थोड्या लाल मिरच्या घालाव्यात.
हा प्रकार हमखास जमतो. उत्तम चव येते. बाकि कुठलाही मसाला वापरु नये.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

या भाजीचा हिरवागार रंग छान दिसतो. हवे तर थोडे मक्याचे दाणे वेगळे ठेवून वरुन घालावेत.

माहितीचा स्रोत: 
आस्मादिक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच वाटतेय रेसिपी. काजूं ऐवजी दुधात भिजवून वाटलेले बदाम आणि मिल्क पावडर ऐवजी हेवी क्रीम चालेल का? आज पॉटलक साठी भाजी न्यायचीय आणि काजू मिल्कपावडर सोडून बाकी सगळं आहे.
..............
'खाना खजान्या चरणी' कैसे जडले हो चित्त, वजनकाटा खवचट मज वाकुल्या की दावी!! Proud

बदाम थोडे कमी घेतले तरी चालतील. त्याच्या जागी चमचाभर मैदा आणि क्रीम घ्यायचे. मैदा जरा भाजून घ्यायचा.
या प्रमाणात आठ दहा बदाम, एक टेबलस्पून मैदा आणि अर्धाकप क्रीम चालेल.

दिनेश, आजच तुमच्या रेसिपीने भाजी केली. फारच छान झाली. मुख्यकरून मुलांना खूप आवडली कारण मसालेदार नाही पण तरिही मस्त चव. Thanks for the recipe.

दिनेश, एक सांगायचे राहीले;कालच ही भाजी केली. इकडून पण तारीफ झाली नी आवडली.:)
सध्या रोज रोज नवीन पदार्थ करायचे चालू आहे,नवीन प्रकारचे भाजी म्हणून मस्त आहे.धन्यवाद.
हो आणि मी fat free दूध नी काजूच घातले. बदामाची चव सेम नाही येणार जी काजू ने येते असे मला वाटते.
तूपात एखादे लवंग ने बडी वेलची पण घातली.

ही भाजी मी पण पॉटलकसाठी केली होती. फ्रेश कॉर्न वापरला. एकदम सही झाली आणि पार्टीमधे हिट! शिवाय करायला सोप्पी आहे. मोजून वीसेक मिनिटात झाली असेल. मी काजू, बदाम वगैरे काही घातले नव्हते. H&H दूध वापरले. धन्यवाद.

गोव्यात आणि आफ्रिकेत काजू स्वस्त आणि हाताशी असायचे, त्यामूळे सहज वापरले जायचे. गल्फमधे काजू महाग आणि पिस्ते स्वस्त, म्हणुन तिथे केळ्याच्या शिकरणात पण पिस्ते वाटून घालायचो.
इथे आपल्या मायाळूला स्पिनॅच म्हणतात आणि आपल्या पालकाला पालकच म्हणतात !!!

पालक कॉर्न भाजी बेस्ट झाली. फक्त आमच्या घरातल्यांच्या चवीनुसार मी मिल्क पावडर जरा कमी घालून (कारण ती खूप गोड असते.) काजू वाढवले.
मस्त झाली.
माझ्याकडे यंदा दिवाळ सण आहे. तेव्हा ही एक भाजी नक्कीच आहे.
थँक्स!

मी आज ही try केली. खुप छान झाली. मेथी मलाई मटर पण या पध्द्तीने छान लागते. मी काजु, heavy cream आणि , मैदा घालुन केली.

या पध्दतीने भाजी केली होती. पार्टीसाठी होती म्हणून थोडं पनीर शॅलो फ्राय करून घातलं आणि थोडा मटार घातला. अतिशय छान झाली. सगळ्यांना खूप आवडली. धन्यवाद दिनेश.

दिनेश, जमल्यास फोटो टाका.
मिल्क पावडर ऐवजी काय वापरता येईल? फ्रेश क्रिम किंवा वर चाफा म्हणाला तसं हाफ अँड हाफ चालेल का?

सायो, फ्रेश क्रीमच्या जागी मी फूल फॅट दूधच वापरायचा सल्ला देईन. क्रीम वापरले तर अगदी कमी वापरावे लागेल आणि ते पालकबरोबर न वाटता, भाजी उकळल्यानंतर टाकावे लागेल. क्रीम टाकल्यावर उकळी फुटायच्या आतच गॅस बंद करायचा.

आता परत केली, कि नक्की टाकेन फोटो.

मी काल केली पालक मकई .. मस्तच रेसिपी, चव छान आली आहे .. Happy

पण ओल्या मिरच्या, फोडणीतल्या लाल मिरच्या आणि दालचिनी ह्या सगळ्यांनीं तिखट आणि मसालेदार आहे चव .. इथे सगळे म्हणतायत त्याप्रमाणे सौम्य नाही लागत ..

हो, पण मी घातली .. जिर्‍याची फोडणी हा महत्वाचा फॅक्टर असावा माझ्या दृष्टीने .. इथल्या पालकाची चव बघता .. तसंच मी मिल्क पावडर ऐवजी दुध घातलं .. रंग छान आला आहे ..

तशीही पालक ला कुठे खास चव असते. माझ्याकडच्या हिरव्या आणि लालही मिरच्या, तिखट नसतात. नुस्त्या रंगाच्या कामाच्या !! त्याचसाठी वापरतो.

आज केली पराठ्याबरोबर. रेसिपी वाचहली तेव्हाही बटाट्याचं प्रयोजन कळलं नव्हतं आणि खाल्यावरही कळलं नाही. घातल्याने वाईट लागत नाही पण गरज नाही माझ्यामते.
तसंच कॅन्ड कॉर्न घालण्यापेक्षा ताजा घालावा त्याने रंगही छान दिसेल भाजीला.

सायो, बटाटा पनीरला पर्याय म्हणून. बटाट्याने भाजीला दाटपणा येतो. मला नूसताच पालक नाही खाववत !!
ताजा कॉर्नचा पर्यायही योग्यच.

>>>रेसिपी वाचहली तेव्हाही बटाट्याचं प्रयोजन कळलं नव्हतं आणि खाल्यावरही कळलं नाह>>><<

अजुन कळले नसेल तर आपल्या सिंधी,पंजाबी, गुजराती अश्या बांधवाना विचारा ते सांगतील. नाहीतर जमलेच तर इटालियन लोकांना विचारा. कारण ते ह्या पदार्थाचा(बटाटा) ज्यास्त उपयोग करतात इतर जमातींपेक्षा तसे म्हणून. झालेच तर आपल्या स्वतःच्या जिभेलाच विचारा(चवीसाठी हो..) नाहीतर 'पोट आहे साक्षीला'. Wink

गावाकडे एखाद्या आजीने सांगितले असते, गपगुमान खा.. डोकं कशापायी वापरतो रे बाबा.. Wink

दिनेश, पनीरला पर्याय म्हणून ठिक आहे. पुढच्या वेळी बटाटा , पनीर न घालता करुन बघेन. काजू, क्रिम, हि. मिरच्या आहेत म्हणजे नुसता पालक वाईट लागणार नाही.

ध्वनी , तुम्ही सगळीकडे एवढ्या फिरता ना, तर माझ्यावतीने वरच्या सगळ्या बांधवाना प्लीज विचारा नी उत्तराने मला उपकृत करा Wink

आज केली होती ही भाजी.. मस्त झाली..! वेगळी चव एकदम.. मिल्क पावडर ऐवजी हेवी क्रिम घातलं थोडं..
वरून फोडणी दिली.. पण लाल मिरच्या घातल्या नाही.. कारण ती ऑलरेडीच तिखट वाटत होती...
पुढच्यावेळी दालचिनी ऐवजी मिरपुड घालून करणार...

लालू म्हणत्ये तसं सार्वजनिक करा.. सापडवायला फार कष्ट पडले.. !

आजच केली ही भाजी. "वा, मस्तच" अशी खाणार्‍याची पही ली प्रतिक्रिया होती. पा.कृ. ला १०० मार्क.

वर लिहीले नसल्याने मी फोडणीत हळद-हिंग घालायचे टाळले. [बरोबर की चुक ? ]
पालका बरोबर परतलेल्या मिरच्या, पालका बरोबरच बारीक वाटल्या. [बरोबर की चुक ? ]
बटाटा घातला नाही पण पुरेसा दाटपणा आला होता.

एकुण भाजी मस्त झाली होती Happy

मस्त होते ही भाजी. मी बटाटा वगळला. वाफवलेले मक्याचे थोडे दाणे पालकाबरोबर वाटले- दाटपणा आणि चवीसाठी. दालचिनीची चव फार छान जाते ह्या भाजीला.

हो अमि, कांदा वगळला तर चालेल.
इथे सूचवत नाही, पण मी असे वाचले होते, कांदा न खाणारे, कलौंजी वापरून तो स्वाद आणतात.

Pages