झगमगाटात हरवलेले...!! ______________ गणपती

Submitted by तुमचा अभिषेक on 9 September, 2012 - 04:36

परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मला ही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवर मला तसे कळवण्यात आले. ऑफिसमध्येही नेमके त्याच दिवशी जरा जादा काम असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते. त्यानंतर पुन्हा मंदीर. वैताग नुसता डोक्याला. पण नकार देण्याचा पर्याय नव्हताच. मी आत नाही येणार बाहेरच थांबेन एवढ्यावर काय ती मांडवली केली.

आमच्या येथील भायखळ्याच्या मंदीरातच जायचे होते. डॉकयार्डला उतरल्यावर टॅक्सी त्या मार्गाने घेतली. भलेमोठे आणि प्राचीन मंदीर असले तरी आडवाटेला असल्याने तिथे तुलनेत गर्दी कमीच असते. अर्धा तास तो काय एक्स्ट्रा जाणार होता. तरी देवासाठी म्हणून माझ्या नास्तिक मनाला तो ही जड झाला होता.

टॅक्सीतून उतरल्या उतरल्या बायकोने आपला मोर्चा हारवाल्याकडे वळवला. आता हे लोक हिला लुबाडणार हे लक्षात येताच मी देखील पटकन टॅक्सीचे भाडे देऊन तिच्या मागे मागे हजर झालो. तिने एक थाळी उचलली तसे मी पहिला किंमत विचारली. तुमच्याकडून काय जास्त घेणार भाऊ, फक्त पन्नास रुपये, समोरून उत्तर आले. पाहिले तर एक छोटासा हार, नारळ आणि दोनचार फुले. हिशोब काही पटला नाही. दोन दिवसापूर्वीच टिटवाळ्याच्या गणेश मंदीरात जाऊन आलो होतो. तिथे शंभर रुपयाला थाळी पडली तरी त्यातील हार या हाराच्या वजनाने दसपट होता. मी जवळच एका पानावर ठेवलेला छोटासा हार आणि एखादुसरे फूल कसे विचारले. तर ते सात रुपयांचे होते. त्याच्या बरोबरीलाच एक नारळ घे बायकोला म्हणालो तर नशीबाने कबूल झाली. नारळाचे पंधरा रुपये पकडून बावीस रुपये झाले आणि मी मंदीराच्या दारातच अठ्ठावीस रुपयांची बचत झाली म्हणून देवाचे आभार मानले.

ठरल्याप्रमाणे बायको आत आणि मी तिच्या चपलांवर नजर ठेऊन बाहेर उभा राहिलो. त्या आधी तिला लवकर काय ते आटोप अशी ताकीद देण्यास विसरलो नाही. मंदीराला प्रदक्षिणा घालणार्‍या एका आजोबांनी मला सहज उगाचच विचारलेही, का रे बाळा, आत नाही जात का.. देवाचे दर्शन घे.. आज चांगला वार आहे. वाटले, फिल्मी स्टाईलमध्ये अमिताभसारखा खास ठेवणीतील आवाज काढत उत्तर द्यावे, इनसे मेरी पुरानी दुश्मनी है... पण आवरला तो मोह.. वास्तवाचे भान ठेऊन..

जवळच एक टेबल लाऊन दक्षिणा घेण्याचा कार्यक्रम चालू होता. वीस-बावीस वर्षांची पोरेच होती टेबलवर. मंदीराच्या दारापाशीच बसली असल्याने येणार्‍या जाणार्‍यांना अगदी हाका मारून बोलवत होते. हा काय दक्षिणा घ्यायचा प्रकार म्हणून सवयीप्रमाणे मनातल्या मनात थोडासा चिडणार तोच नजर त्यांच्या डोक्यावर लावलेल्या बॅनरवर पडली. माणकेश्वर मंदीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि अचानक मूड चेंज झाला. ती दक्षिणा नसून गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची वर्गणी होती. ही तर दिलीच पाहिजे म्हणत झरझर स्वताचे सारे दिवस आठवले जेव्हा मी त्यांच्या भुमिकेत होतो.. सार्वजनिक सण साजरे करायची आवड असायची, काम करायची ताकद असायची, देण्यासाठी वेळ असायचा, अडीअडचणींचा सामना करायची हिंमत असायची पण नसायचा तो फक्त पैसा.. आणि मग तो जमेल तितका कमीच वाटायचा.. पण धमाल मात्र फुल्ल टू यायची.. त्याचा वर्गणी किती जमते याच्याशी जराही संबंध नसायचा.

माझे बालपण सारे मुंबईच्या चाळीतच गेले. आमचे माझगाव, त्याला लागूनच असलेले भायखळा आणि लालबाग ते परेळ पर्यंतचा विभाग म्हणजे दर तिसर्‍या गल्लीत गणपती मंडळ. सर्व गणपती बघायचे म्हणजे दोन-अडीच रात्री तरी पूर्ण खर्ची पडायच्या. पण हे सारे दर्शन घरचे गणपती विसर्जित केल्यानंतरच.. कारण तोपर्यंत आमच्या चाळीचेच वातावरण असे असायचे की बाहेर पाऊल ठेवू वाटायचे नाही. घरगुती म्हणाल तर सर्वांचे मिळून एकूण तेरा ते चौदा जणांकडे गणपती यायचे पण प्रत्येक गणपती हा आपल्या स्वताच्या घरचाच असल्यासारखे वाटायचे. खूप आधी, मी लहान असताना आमच्या घरीदेखील गणपती यायचा. चारपाच दिवस, नव्हे चौदापंधरा दिवस आधीपासूनच घरातील आणि चाळीतील सारे वातावरण बदलायचे. मुर्ती कशी, डेकोरेशन कसे इथपासून विसर्जनाच्या मिरवणूकीला बेंजो कोणाचा ठेवायचा इथपर्यंत सार्‍या चर्चांचा फड रंगायचा..

आमच्या घरातील गणपतीची मुर्ती दरवर्षी थोड्याफार फरकाने एकसारखीच असायची पण डेकोरेशन मात्र न चुकता कंपलसरी बदलायला लागायचे. हो कंपलसरीच बदलायला लागायचे कारण एके वर्षी वडिलांनी वेळेच्या (की पैशाच्या?) अभावापायी आदल्याच वर्षीचे डेकोरेशन वापरले होते तेव्हा मी रडून गोंधळ घातलेला आठवते. अर्थात माझाही नाईलाजच होता. आम्हा मुलांमध्ये कोणाच्या गणपतीची सजावट भारी याची स्पर्धा लागायची आणि अश्याने त्या स्पर्धेतून मी मागच्या वर्षीचेच डेकोरेशन वापरल्यामुळे बाद झालो होतो ना..

बरे, ज्यांच्या घरात गणपती नाही यायचा त्यांचा उत्साह देखील काही कमी नसायचा, उलट ते सर्वांच्या घरी जाऊन सजावटीला मदत करत असल्याने जरा जास्तच असायचा. गणेशचतुर्थीची आदली रात्र तर ठरलेले जागरण असायचे. रात्रभर आम्ही एकेकाच्या घरात जाऊन कोणाचे डेकोरेशन कसे झाले आहे हे चेक करायचो, तसेच वयानुसार जमेल तेवढी, झेपेल तशी मदत करणे, थर्माकोलच्या शीट कापणे, पेपर चिकटवणे, चमकी लावणे, हे एवढे आणि बरेच काही त्यात असायचे. काम करून झाल्यावर बोटाला चिकटलेला सुकलेला फेवीकॉल काढण्यासारखी दुसरी मजा नाही आणि पुर्ण मकर तयार झाल्यावर ते डोळे भरून बघण्यासारखे दुसरे समाधान नाही. काम करून थकल्यावर थोड्यावेळची विश्रांती.. आणि त्यात पाठीतून येणारी कळसुद्धा समोर बाप्पांचे केलेले डेकोरेशन बघताना विरून जायची.. खाण्यापिण्याची फारशी अशी सोय नसायची पण रात्रीच्या वेळी चिवडा-फरसाण आणि चहा सुद्धा खूप भारी वाटायचे. थेट पहाटेच मग आपापल्या घरी जाऊन झोपणे व्हायचे. उद्या आपल्याही घरात गणपती येणार आहे आणि मी उशीरा आलो म्हणून शिव्या ठरलेल्याच असायच्या पण जाताना मात्र कधी घरच्यांनी अडवले नव्हते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळीच, अर्थात माझ्यासाठी दुपार झाली असायची, पण जाग यायची ती गणपतीच्या मंगल गाण्यांनीच. इतरवेळी मी मराठी गाण्यांचा फार मोठा चाहता नसलो तरीही गणपतीची गाणी मात्र अफलातूनच.. मग ते "सुखकर्ता दुखहर्ता" आरती असो वा माझे फेवरेट "चीक मोत्यांची माळ" असो.. "गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया" किंवा "ओंकार स्वरूपा" यांसारखे भक्तीगीत असो वा "सनईचा सूर कसा वार्‍याने धरला" यासारखे उडत्या चालीचे असो... चाळीच्या प्रत्येक मजल्यावर एकमेकांशी आवाजाची स्पर्धा करत मोठमोठाल्या स्पीकरवर लागणारी ही गाणी.. सणाचे वातावरण तयार झालेच म्हणून समजा. हळूहळू एकेक करत आम्हा मुलांचे ग्रूप आपापल्या मजल्यावरच्या स्पीकर जवळ जमा व्हायचे. सकाळी गणपतीची गाणी वाजवून झाली की मग दुपारी हिंदी गाण्यांचा टर्न यायचा. एकापेक्षा एक लेटेस्ट हिंदी गाणी मोठ्यातला मोठा आवाज करून लावायची स्पर्धा सुरू व्हायची ती कोणीतरी शिव्या घालून, "सणाच्या दिवशी कसली रे ही गाणी लावतात" असे सांगेपर्यंत चालायची...

दुपारचे गोडधोड जेवण मस्त भावंडांच्या संगतीने व्हायचे. दिवस मावळता मावळता जरा उदासीनता आली असायची.. पण काही काळापुरतीच.. घरादारांसमोर केलेली रोषणाई आपल्या रंगात येताच मूड पुन्हा उजळवून जायची आणि त्या नंतर सुरू व्हायचा तो आरतीचा कार्यक्रम. तेरा-चौदा जणांच्या घरी जाऊन आरती करायची म्हणजे चांगला तीनचार तासाचा कार्यक्रम असायचा. या आरतीमध्ये जी दंगामस्ती चालायची त्याचीही एक आपलीच मजा होती. कधी तालासूरात टाळ वाजवा तर कधी मोठ्यात मोठा आवाज कसा निर्माण होईल याचा विचार करून टाळावर टाळ आपटा.. आरतीच्या सूरांचेही तेच.. मोठ्या आवाजात आरती गाणार्‍यांना "आरतीसम्राट" तर तल्लीन होऊन गाणार्‍या एखाद्याला "सुरेश वाडकर" अश्या पदव्या देऊन चढवून ठेवलेले असायचे. त्यामुळे प्रत्येक जण अश्या काही चेवात गायचा की शेवटच्या दिवसापर्यंत घसा बसला नाही असे कोणत्या वर्षी झाले नसावे.

आमच्यापैकी एखाद्याच्या तीर्थरूपांचे नाव शंकर असायचे, कोणाचे ज्ञानदेव तर कोणाचे बाबा विठ्ठल, पांडुरंग असायचे. त्यामुळे ते ते नाव आरतीत आले की सारेजण मुद्दाम मोठ्याने हेल काढून गायचे. विठ्ठलाची किंवा दशावताराची आरती संथ चालीत घेताना लांब सूर खेचायला जी मजा यायची ती दुसर्‍या कशात नसावी. यातही काही जणांना मग मस्ती सुचायची, म्हणजे समोरच्याला टपली मारा, तर कोणाचे केस खेचा, आणि त्याने मागे वळून पाहिले की याच्या त्याच्याकडे बोट दाखवा. कधी ही मस्ती जास्त झाली आणि आरतीचा तोल ढळू लागला की मग मोठी मंडळी आम्हाला पकडून पकडून खवड्यांचा प्रसाद द्यायची. पण त्यामागेही आमच्या मस्तीचे कौतुक होतेच.

या मध्येच कधीतरी रात्रीची जेवायची वेळ व्हायची. मग दोन आरत्यांच्या मधल्या वेळेत घरी जाऊन घाईघाईत कसेबसे दोनचार घास खाऊन परत पळायचे की त्यापुढची आरती चुकायला नको. तसेही डबल-टीबल प्रसाद खाऊन पोट अगोदरच भरलेले असायचे.

कालांतराने मी मोठा झालो, पण आरतीची मजा तसूभरही कमी झाली नाही. पण आता आमच्या घरी गणपती येणे बंद झाले होते. आजोबा वारल्यामुळे तो मोठ्या काकांच्या घरी येऊ लागला होता. तरी चाळीतील इतर गणपती आपलेच वाटायचे. कॉलेज संपून ऑफिस सुरू झाले तरी मुले माझ्यासाठी आरतीला थांबून राहायची. कारण मोठ्या आवाजात गाणार्‍या आरतीसम्रांटांमध्ये एक मी देखील होतो. त्यामुळे मी सुद्धा ऑफिसमधून दमून भागून आलो असलो तरी त्याच जोमाने आरतीचे पुस्तक हातात घ्यायचो. पुस्तक हे लागायचेच कारण आरत्या पाठ झाल्या असल्या तरी कडवे मात्र हमखास पुढे मागे व्हायचे. अर्थात त्यातही एक मजा असायची. ज्याने कडवे चुकवले त्याला एक टपली पडलीच म्हणून समजा. पण खरी मजा यायची ती विसर्जनाच्या वेळी भाऊच्या धक्क्यावर आरती करताना. सर्व मोठ्या माणसांना बाप्पांना निरोप देऊन घरी परतायची घाई असायची कारण दुसर्‍या दिवशी आपापल्या कामधंद्याला जायचे असायचे पण आम्ही मुले मात्र त्या दिवशी शोधून शोधून आरत्या काढायचो आणि बरेच लांबन लावायचो, ते शेवटी कोणीतरी वैतागून "घालीन लोटांगण वंदीन चरण" ही समाप्तीची आरती चालू करेपर्यंत..

आमचे चाळीचे सारे गणपती गौरी विसर्जनाच्या दिवशी जायचे. आदल्या दिवशी स्पेशल आरती व्हायची, जी वेळेचे सारे बंधन तोडून चालायची. त्या रात्री कोणाला झोपायचे नसायचे. आरत्या संपल्यावर रात्री चाळीच्या दादरावर सर्व जण जमून मस्त भजन करायचो. आमच्यात प्रॉपर भजन येणारे एक-दोघेच. त्यामुळे एकदा ते आटोपले की हिंदी गाण्यांचा राऊंड सुरू व्हायचा. आमच्या साथीला वडीलधारी मंडळी देखील जागे असायचे, पण त्यांचे भजन नाही तर पत्त्यांची मैफिल जमलेली असायची.. तीन पत्ती आणि रमीचे धडे आम्ही इथूनच गिरवले..

गणपतीने माझ्या अंगातील आणखी एक गुण बाहेर काढला ते म्हणजे नृत्यकला. संध्याकाळी सहाला निघालेली मिरवणूक रात्री दहा-अकराला भाऊच्या धक्क्यावर पोहचायची ती फुल्ल वाजतगाजत. तीनचार तास न थकता एका वेगळ्याच धुंदीत नाचायचे. गणपतीसमोर वाजणार्‍या त्या बेंजोच्या तालावर आम्ही एवढे बेभान व्हायचो की दुसर्‍या दिवशी चाळीत अफवा उठायच्या, पोरे दारू पिऊन नाचत होती. अर्थात तसेही महाभाग असायचे, पण त्यांना जरासे नाचवून शक्यतो आम्ही दूरच ठेवायचो. उत्सवाला गालबोट लागावे असा प्रकार एवढ्या वर्षात कधी घडला नाही ना कोणी घडू दिला.

गेले ते सारे दिवस... पुन्हा अशी मजा आयुष्यात अनुभवायला मिळणे कधी होणार नाही... कारण आता आम्ही चाळसंस्कृतीतून फ्लॅट सिस्टीम मध्ये स्थलांतरीत झालो आहोत. गणपती आणनारे बरेच जण आपापली घरे विकून दुसरीकडे गेलेत तर जे दोन-चार उरलेत ते आपापल्या फ्लॅटचा दरवाजा बंद करून गणपतीच्या सजावटीत मग्न असतात. माझ्या मुलांना, पुढच्या पिढीला सांगायला आठवणी उरल्या आहेत पण त्यांना ही चाळीतली मजा अशी तोंडी सांगून समजणार नाही. कदाचित ते हसण्याचीही शक्यता आहे की चाळीतील मध्यमवर्गीय राहणीमानात कसली आलीय मजा म्हणून.. बायकोला हा अनुभव निदान एखाद वर्ष तरी मिळेल असे वाटले होते, पण लग्नानंतरचे गणपतीचे पहिलेच वर्ष म्हणून आमचे सहकुटुंब गावी जाणे झाल्याने तिने देखील हे मिस केले. आपण काय गमावले आहे हे ही आता तिला कधी समजणार नाही.

आज या वर्गणी जमा करणार्‍या मुलांना बघून सार्‍या आठवणी उगाळल्या गेल्या. कधीकाळी आम्ही देखील सार्वजनिक गणपती आणायचे ठरवले होते याची आठवण झाली. पण आश्चर्यकारकरीत्या तेव्हा आम्हाला वडीलधार्‍या मंडळींकडून विरोध झाला होता. गणपतीचे सोवळे फार कडक असते आणि ते न चुकता सारे पाळणे म्हणजे काही लहान मुलांचा खेळ नाही असे कारण पुढे करण्यात आले होते. तरीही आम्ही बाळगोपाळांनी न जुमानता स्वबळावर आणि स्वखर्चावर सलग तीन वर्षांसाठी गणपतीची स्थापना केली होती. पण त्यानंतर तिसर्‍या वर्षी मात्र बंडखोरी न करता मोठ्यांच्या विनंतीला मान देऊन हा उत्सव तिथेच थांबवायचे ठरवले.

तरीही.... पॉकेटमनी नावाचा फारसा प्रकार नसताना पहिल्यावर्षी कुठून कुठून पैसे जमवून आणलेली बाप्पांची छोटीशी मुर्ती, तिच्यावर रोज नवीन हार घातला जाईल याची घेतलेली काळजी, आपापल्या घरांतून प्रसाद म्हणून आणलेली फळे, हाताला लागलेल्या थर्माकोलच्या तुकड्यांपासून आणि मिळेल त्या टाकाऊ-टिकाऊ वस्तूंपासून बनवलेले मकर, आमचा बाप्पा सुद्धा कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून देण्यासाठी त्याची त्याच उत्साहात केलेली आरती, पूजा-अर्चा सारे सारे काही डोळ्यासमोरून तरळून गेले. पण आजही ते दिवस आठवले की राहून राहून असेच वाटते की त्या वेळी आम्हाला पुरेसा पाठींबा आणि सहकार्य मिळाले असते तर कदाचित आज ही ती परंपरा कायम असती. आजही आम्ही आमच्या चाळीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असतो. त्या निमित्ताने का होईना मुंबई सोडून इथेतिथे विखुरलेले सारे चाळकरी काही दिवसांसाठी पुन्हा एकत्र आले असते...

चांगल्या आठवणी आठवताना शेवटी नेहमी एक खंत मनात दाटून येतेच.. तसेच माझे झाले..

इतक्यात बायको दर्शन घेऊन बाहेर आली आणि तिने ते टेबल पाहिले. स्वताहूनच म्हणाली की शंभरएक रुपये देणगी देऊया का?? तिची स्वताची लाख इच्छा झाली आणि ती स्वता कमावती असली तरी देवाच्या नावावर खर्च करताना ती माझी अशी परवानगी घेतेच.. धाकच आहे माझा तसा..

मी म्हणालो, "अग्ग ते दक्षिणावाले नाहीत तर गणपतीची वर्गणीवाले बसलेत.."

तसे ती ओह्ह म्हणून आपला दक्षिणा द्यायचा प्लॅन कॅन्सल करू लागली तर मीच तिला तिथे बळेबळे नेले आणि पावती फाडायला लावली.

बायको पैसे देत असताना सहज संवाद साधायला म्हणून त्या मुलांकडे विचारणा केली, "कुठे बसवता रे गणपती?"

"हे काय इथे समोरच, त्या गाड्या लागल्या आहेत त्यांच्या पलीकडे..." मंदीराला लागून असलेल्या मोकळ्या जागेकडे हात दाखवत एकाने उत्तर दिले.

मी लहानपणापासून दरवर्षी आमच्या विभागातले तसेच लालबागपर्यंतचे लहानमोठे सारेच गणपती न चुकता बघायचो. पण या मंदीराकडे कधी येणे झाले नव्हते, इथे गणपती बसतो हे देखील मला माहीत नव्हते. नवीनच बसवायला सुरुवात झाली का म्हणून मी चौकशी केली तर समजले की यंदाचे त्यांचे ३४ वे वर्ष होते.. म्हणजे माझ्या जन्माच्याही आधीपासूनचा गणपती होता तर..

मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितले की मी जवळच राहतो, पण आज पहिल्यांदाच तुमच्या गणपतीबद्दल ऐकतोय..

त्यावर त्यातील एकजण जे उत्तरला ते खरेच नकळतपणे मनाला दुखावून गेले..

तो म्हणाला, "तुम्ही मोठमोठ्या मंडळांचे गणपती बघत असाल, जिथे भारीतले डेकोरेशन, भलीमोठी मुर्ती असते... आमच्या छोट्या गणपतीला कशाला याल..?"

खरेच खूप वाईट वाटले हे ऐकून, वाटले त्याला तडकाफडकी उत्तर द्यावे की असे नाहिये रे बाबा. सजावट रोषनाई ही असतेच बघण्यालायक, पण दर्शनाला शेवटी देवच खेचून आणतो. दर्शनानंतर त्याची लोभस मुर्तीच लक्षात राहते. डोळे दिपवायचे काम रोषणाई नाही तर त्या मुर्तीच्या चेहर्‍यावरचे तेज करते. मी स्वता नास्तिक असलो आणि कोणा देवाचा भक्त नसलो तरी गणपती या देवाचा फार मोठा चाहता आहे. विभागातील सारे गणपती वेचून वेचून बघतो. दुर्दैवाने तुमचा गणपती इतरांच्या झगमगाटात हरवला आहे पण माझे न येण्यामागचे कारण ते नव्हते जे तू समजत आहेस....... पण हे सारे त्याला ऐकवून पटणार नव्हते.

त्या मुलांना त्यांच्या गणपतीला यंदाच्या वर्षी आणि यापुढची सारी वर्षे न चुकता भेट द्यायचे कबूल केले आणि तिथून निघालो. जाता जाता मनात एकच विचार येत होता की असे बरेच गणपती आणि गणपती मंडळ असतील जे या झगमगाटात हरवले असतील जे शोधायला हवेत. त्यांना भेट द्यायला हवी. चार लोकांना त्यांच्याबद्दल सांगायला हवे. यांनाही गरज आहे कोणाच्या तरी पाठींब्याची, कोणाच्या तरी सहकार्याची. पुरेशी वर्गणी जमवून कदाचित त्यांचा उत्सव साजरा करायचा प्रश्न मिटेल पण भक्तांची वाढलेली रांग पाहून त्या मुलांचा हुरूप नक्कीच वाढेल नाही का..!!

... तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक, तुझे शब्द झगमगीत नसले तरी लेख छान लखलखीत पणे मांडलायेस..
गोड आहेत तुझ्या लहानपण च्या आठवणी.. Happy
शेवटचा पॅरा खूप आवडला..

धन्स वर्षूदी.. माझे शब्द कधीच झगमगीत नसतात, फारसे आलंकारीक लिहावे अशी माझी प्रतिभा नाही, साधे सोपेच लिहितो..

शेवटचे एकदोन पॅरा आणि त्याला संबंधित असे हाच खरा लेख लिहायचा होता.. पण त्यानिमित्ताने आठवलेल्या लहाणपणाच्या आठवणी मध्ये घुसवायचा मोह आवरला नाही.. Happy

लेख छान वाटला. पण शिर्शका वरुन जे वाटल होत तसा नहिय. मी पण तुमच्या सारखिच नास्तिक आहे. माझा आज काल होनर्या गनपति उत्सवालाच विरोध आहे. कारन सार्वजनिक गनपतिन्सठि अत्तपर्यन्त जबरदस्ति १००० र् भरौन झालेत आनि अजुन किति जन मागायल येतिल त्याचा हिशोब नहि.

छान लेख पण

१) नास्तिक असताना इतका सहभाग का घेतला ? मनात श्रद्धा नसताना जोरात आरत्या म्हणून काहीच उपयोग नाही.
२) बायकोला धाक वगैरे पार १८५७ ची अ‍ॅटिट्यूड हं

बाकी पुलेशु. Happy

अश्विनीमामी -

माझ्या नास्तिकच्या व्याख्येनुसार मी देवाच्या आहारी जात नाही, किंवा आपल्या आयुष्यात जे काही बरेवाईट घडते ते त्याच्यामुळेच असे काही मानत नाही. गणपतीबद्दल बोलाल तर मला त्याच्यात एक मित्र दिसतो, एखादा मित्रच घरी राहायला आला आहे यानुसार मी गणेशोत्सवाकडे बघतो. त्यामुळेच त्याची सेवा फार श्रद्धेने किंवा कडक सोवळे पाळून केली पाहिजे असेही मी मानत नाही. बस मी आणि माझा गणपती त्या दिवसांमध्ये मजा करतो. म्हणून आपण म्हणता तशी श्रद्धा मुळीच मनात नाहिये. आरत्या ओरडून करतो ते त्याला खुश करून त्याच्याकडून काही मागायचे असते या हेतूने नाही करत.. आणि म्हणूनच मी मंदीराच्या दारापर्यंत जाऊन बाहेर उभा राहू शकतो. आईच्या हट्टापायी मध्यंतरी वर्षभर मंगळवार पाळून झाले, पण आता मात्र मिळेल त्या वाराला मस्तपैकी नॉनवेज खातो.. Happy

असो, इथेही मी गणपतीबद्दल नाही तर गणेशोत्सव साजरी करणारी मंडळे, तेथील सभासद मुले आणि त्यांचा उत्साह याबद्दल आस्था दाखवली आहे. Happy

आणि, हो, ते बायकोला धाक वगैरे.. मस्करीत घ्या हो..
बाकी मला खरेच देवाच्या थाळीसाठी दोन-अडीचशे रुपये खर्च करायला नाही आवडत.. आणि माझ्या आई-वडीलांप्रमाणेच बायकोही मला अशी मिळालीय की देवाच्या नावावर चार पैसे खर्च करायला जराही मागेपुढे न बघणारी.. म्हणून असा धाक ठेवावाच लागतो बाबा.. Happy

सीमि,
जर आपल्या दारात खूप गणपती मंडळे येत असतील तर आपण त्यानुसार वर्गणी कमी देऊ शकता, त्याचप्रमाणे आपल्या विभागातील मंडळ नसेल, लांबचे असेल तर नाही दिली तरी चालते.
बाकी आपल्याला शीर्षकावरून काय वाटले ते माहीत नाही, पण मला खरे म्हणजे शेवटचे २-३ पॅरा आहेत आणि थोडीशी सुरुवात एवढाच लेख आधी डोक्यात होता आणि शीर्षक त्यानुसार दिले.

@ श्रीमत
धन्यवाद,
कथा सध्यातरी खरेच नाहीये काही डोक्यात, गेल्या महिन्या-दोन महिन्यात बिजी शेडुलमधून वेळ काढून लिखाणाची आवड म्हणून गाथाचित्रशती स्पर्धेसाठी दोन लेख लिहिले होते. आणि आता हा लिहिला.. पण काही सुचले तर नक्की लिहेनच. Happy

अभिषेक मस्तच. लिहिलेले आवडले. माझ्या घरी ही ५ दिवसांचा गणपती उत्सव असतो .मोठ्या आरतीला तर आम्ही शोधून शोधून कुणाला माहिती नसलेल्या आरत्या म्हणतो. 'प्रदक्षिणा' म्हणताना आवाज टिपेला आणि मंत्र पुष्पांजली म्हणताना पूर्ण बसलेला असतो. एकदा मोठ्या आरतीला सगळ्या आरत्या संपल्या पण आरती संपू नये असे वाटत होते. तेव्हा "येई हो विठ्ठले .." ही आरती ३ वेळा म्हटली होती ती पण वेगवेगळ्या चालीत.

छान लिहीलेत:):) आमच्या पण काहीश्या अश्याच आठवणी आहेत. चाळीच्या जागी गल्ली वाचा फक्त . कारण आमच छोट गाव, मुंबई नव्हे. Happy

अभिषेक छान लिहिलयस !
पण त्यापेक्षाही तुझी नास्तिक पणाची व्याख्या आवडली .
आपल्या आयुष्यात जे काही बरेवाईट घडते ते त्याच्यामुळेच असे काही मानत नाही
बस्स . मग त्या आरत्यांमध्ये आनंद मिळाला तर बोनसच Happy
आणी हे जोवर आहे तोपर्यंत आई किंवा आजीला बरे वाटते म्हणून कधीतरी देवासमोर हातही जोडायला काय अडचण आहे .

सामी __ क्या बात है.. तुमच्या घरी गणपती येतो.. चल मग याला मी आमंत्रणच समजतो.. Happy
बाकी एखादी अपवादात्मक आरती वगळता प्रत्येक आरती दोन ते तीन चालीत म्हणता येते.. आम्हीही प्रत्येक घरात आरती चाली बदलून बदलूनच घ्यायचो पण असे एकाच गणपतीला एकच आरती तीन चालीत म्हणायचा अनुभव नाही .. Proud

अनघा ___ गावच्या गणपतीचेही दोन अनुभव आहेत मलाही.. कोकणातले.. पैकी एक तर मागच्या वर्षीचा लग्नानंतरचा होता, पण त्याआधी सातवीत असताना गेलो होतो तेव्हा तेथील चालीरीती, डेकोरशन करायची पद्धत, रात्र-रात्र भर चालणारी भजने, ते झाल्यावर मिळणारे कांदेपोहे आणि फरसाण, गौरीपूजन आणि तिचा प्रसाद, जवळच्या नदीवर केले जाणारे विसर्जन.... आणि या सार्‍याच्या पार्श्वभूमीला कोकणचे सौंदर्य.... या आठवणींवर एक वेगळे प्रकरण बनेल. Happy

रोहीत __ धन्स.!

केदार __ +१ .. Happy

छान आठवणी.. मुंबईतल्या चाळीचं अफलातून जग अगदी सहज रंगवणार्‍या. खरंच तो काळ,ती माणसं आता आठवणींच्या जगातच उरलीत. ले.शु.

छान लेख आहे...... लहान पणी कॉलनी मधे राहताना सगळ्यांच्या घरी आरती ची वेळ वेगवेगळी असायची (मुद्दामुनच) . एकी कडची झाली की लगेच दुसरी कडे पळत जायचे सगळ्यांना घेउन... किमान २-३ तास तरी निघुन जात असे आरामात... Happy

लहानपणीचे दिवस आठवले..

तिची स्वताची लाख इच्छा झाली आणि ती स्वता कमावती असली तरी देवाच्या नावावर खर्च करताना ती माझी अशी परवानगी घेतेच.. धाकच आहे माझा तसा..
.
खास नजरेत भरलेले.... इतरांना दिसेल अशी सोय करुन ठेवतो. Wink .. Lol

भारती.. धन्यु.. Happy

असामी.. धन्स.. Happy

उदयन.. Proud
तुला तू पुरुषांची सोय केली म्हणायचे आहे का, कारण तसेही बायका अशी वाक्ये शोधून शोधून वाचतातच रे.. Happy

लेख आणि विचार, दोन्ही आवडले.

मला रुईया नाका मित्रमंडळाचा गणपति, खास समाजिक संदेश देणार्‍या सजावटीसाठी आवडतो.

छान लेखन. अगदी भोळं भाबडं, कुठलाही आवेश न आणता, काहिसं नॉस्टॅल्जिक होत केलेलं लेखन मनापासून आवडलं. असंच लिहीत रहा.

मला वैयक्तिक रित्या पुण्यातले गणपती फार आवडत. पण आता आवाजाची आणि वेळेची मर्यादा अल्याने सगळी मजा हरवल्यासारखी वाटतेय. हे फक्त स्वतःच्या मजेखातर मनात 'स्वार्थी' विचार केल्यावरच. पण पुण्यातले त्या आवाजाला सहन करुन, जीव मुठीत धरुन रहाणारे लोक आठवले की मात्र हा स्वार्थी विचार कुठल्याकुठे पळून जातो.

तरिही पुर्वी कित्येक वर्षे गणपती पहाण्यासाठी मित्रांबरोबर जागवलेल्या रात्री आणि विसर्जनाच्या मिरवणूकीत पायात गोळे येईपर्यंत केलेला 'गणपती डान्स' आठवला की नॉस्टॅल्जिक व्हायला होतेच.

अरे अभिषेक.........मी एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली आहे... .धागा कसा उठुन दिसला पाहीजे.. Wink .. Biggrin

लहानपणीची सोसायटीमधल्या गणपतीची आठवण झाली. आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचो. १० दिवस मस्त मजा यायची.

फेवीकॉलबद्दल +१

दिनेशदा, अविकुमार, नताशा, स्वाती, रंगासेठ, माधव...
माझ्या आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद सार्‍यांचे.. Happy

अविकुमार, पुण्यातले गणपती बघायला म्हणूनही दोन वर्षे जाणे झाले होते.. मुंबई असो वा पुणे असो वा कोकण.. प्रत्येक ठिकाणच्या गणेशोत्सवाची आपलीच एक परंपरा असते.. त्या शहराच्या संस्कृतीला धरून..