तंदूरी चिकन

Submitted by अवल on 3 September, 2012 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन १ किलो
वाटणासाठी :
आलं १ इंच
लसून २०-२५ पाकळ्या
मिरच्या ४
हळद १ चमचा
तिखट २ चमचे
मीठ १ चमचा
लवंग ४
दालचिनी मोठे ५-६ तुकडे ( हे जास्तच हवेत)
मीरे ५-६
खसखस १ चमचा
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
शहाजिरे १ चमचा
दही पाव किलो
लाल रंग २ चिमुट ( ऑप्शनल पण मजा आणणारा )
ओवा ( ऑप्शनल, कधी घाला कधी घालू नका, जरा व्हरायटी )
सजावटीसाठी :
लिंबू हवे असल्यास वरून
२ कांदे उभे चिरून व्हिनिगार, मीठ घालून + थोडा उभा- पांतळ चिरलेला कोबी

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. सर्व तुकड्यांना सुरीने मध्ये मध्ये हाडापर्यंत छेद द्यावेत. सर्व फ्रिजमध्ये ठेवावे. (फ्रिजर नाही)
वाटणासाठीचे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटुन घ्यावेत. खसखस वाटायला जरा वेळ लागतो. त्यामुळे जरा जास्त वेळ फिरवावे.
आता हे सगळे वाटण चिकनला चोळावे. छेद दिलेल्या ठिकाणी आत पर्यंत जाईल असे पहावे. हे सर्व फ्रिजमध्ये ६-८ तास ठेवावे.

ओव्हन १५० तपमानाला ५-७ मिनिटे प्रिहिट करत ठेवा. आता प्रत्येक तुकडा फॉईलमध्ये गुंडाळून ट्रे मध्ये ठेवा. आता ओव्हनमध्ये १५० तापमानावर साधारण २० मिनिटे शिजवा.
वाढताना प्रत्येक तुकडा फॉईलमधून काढून त्यावर १ छोटा चमचा ( भातुकलीतला) अमूल बटर टाकून चिमट्यात पकडून गॅसवर धरा. मस्त धूर झाला, तुकडा जळकट दिसायला लागला की ताटलीत घ्या. सोबत लिंबू, कांदा घ्या, फस्त करा Happy

वाढणी/प्रमाण: 
माझा लेक अन त्याचे तीन दोस्त फस्त करतात. पण किमान सहा जणांना पुरावी.
अधिक टिपा: 

१. मॅरिनेट करण्यासाठीचा वेळ यात धरलेला नाही
२. चिकन बाहेर ठेवणार असाल तर ४ तास ठेवावे. भारतात शक्यतो बाहेर ठेऊ नये. हवा बदलती असल्याने उगाच टेन्शन नको. मी शक्यतो रात्री लावून फ्रिजमध्ये टाकते. दुसर्‍या दिवशी ९ वाजता बाहेर काढून १२ वाजता करायला घेते.
३. फॉईलमध्ये गुंडाळल्या मुळे चिकन सुके होत नाही, रबरीही होत नाही.
४. दही घातलेले असल्याने लिंबू वरून पिळताना सांभाळून. दही किती आंबट आहे याचा अंदाज येत नाही, म्हणून.
५. हे सर्व प्रमाण झणझणीत खाणा-यांसाठी आहे, कृपया नोंद घ्यावी. त्यातून कोणी हे लक्षात न घेता केले अन तिखट लागले तर मला फोन करावा. मी अन माझा लेक हाजीर होऊ Proud
६. माझ्याकडे हॉकिन्सचे इन्फ्रामॅटिक्स असल्याने त्यात फार भारी अन भराभर होते तंदुरी Happy

माहितीचा स्रोत: 
फार फार पूर्वी एका ढाब्यावरचे खाऊन त्याची चव आठवून आठवून तयार केलेली माझीच पाककृती :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा... खासच.. धन्यवाद.. Happy

दिलेल्या शब्दाला जागून
व्हेजवाल्यांना फोटो त्रासदायक वाटू शकतात, क्षमस्व>> Lol

अ॑वल तुझी रेसीपी वाचुन आणि वापरुन काल तंदूरी पनीर केलं (आम्ही शाकाहारी अहोत).
मस्त झालं होतं. पुढच्या वेळी करीन तेव्हा जस्त मसाला बनवुन फ्रीझ करुन ठेवेन....
मी टोस्टर ओवेन वापरुन बनवलं आणि सर्व पनीर प्यान मधे पसरुन त्यावर फोइल झाकाली.
रेसीपी बद्दल धन्यवाद.....
paneer tandoori.pdf (42.81 KB)

Pages