कुळथाचे आयते ( रेडी मिक्स ) पिठले

Submitted by दिनेश. on 27 August, 2012 - 00:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खरं तर पिठले हा पदार्थच आयत्यावेळी पटकन करायचा पदार्थ आहे. पण नाही म्हंट्लं तरी
तयारीला ( कांदा मिरच्या कापा ) ४/५ मिनिटे लागतात.
माझ्याकडे कुळीथाचे पिठ असतेच पण पिठले करायचा आळस करतो. आळसापेक्षा आणखी एक
कारण म्हणजे इथले कांदे भलेमोठे असतात. मला एका वेळच्या पिठल्याला पावभर फ़ारतर अर्धा
कांदा लागणार, मग बाकीच्या कान्द्याचे काय करू ?
माझ्यासारखी आळशी माणसे, आळशी राहण्यासाठी किती काम करतात, त्याचे हे उदाहरण.

१) पाव किलो कुळिथाचे पिठ
२) तीन मोठे कांदे. बारीक चिरून
३) ३/४ कोकमे ( आमसुले )
४) १ टेबलस्पून जिरे
५) २ टिस्पून हळद
६) १ टेबलस्पून लाल तिखट
७) १०/१२ लसूण पाकळ्या ( बारीक करुन )
८) १ टिस्पून हिंग
९) पाव कप तेल
१०) चवीनुसार मीठ ( खरं तर अंदाजापेक्षा थोडे कमीच घ्या, टिप पहा.)
११) १ टिस्पून साखर

क्रमवार पाककृती: 

१) मोठ्या कढईत १ टेबलस्पून तेल तापवून मंद आचेवर कोकमे तळून घ्या,
२) बुडबुडे यायचे कमी झाले कि, झाऱ्याने काढून टिश्यू पेपरवर काढा.
३) मग आणखी एक टेबलस्पून तेल त्यातच टाकून ते तापले कि जिरे टाका
४) जिरे तडतडले कि हिंग व लसूण टाका, व परता.
५) मग त्यात कांदा व मीठ टाका आणि मंद आचेवर परतत रहा.
६) कांदा परतायला बराच वेळ लागेल, पण तेल वेगळे दिसेपर्यंत परतणे गरजेचे आहे,
कांद्यात पाणी राहता कामा नये. लागलेच तर आणखी तेल टाका.
७) असे तेल वेगळे झाले कि, त्यात हळद व तिखट टाकून नीट मिसळून घ्या.
८) मग त्यात कुळथाचे पिठ टाका, नीट ढवळा. सर्व गुठळ्या मोडून, मोकळे होईपर्यंत
मंद आचेवर ठेवा. (झाकण ठेवायचे नाही. सर्व प्रकार कोरडाच करायचा आहे. )
९) मग आच बंद करुन त्यात साखर व तळलेली कोकमे चुरुन टाका.
१०) मिश्रण थंड झाल्यावर, डब्यात भरुन ठेवा.

आयत्यावेळी, अर्धा कप पाण्यात एक टेवलस्पून मिश्रण मिसळा, दिड कप पाणी
उकळून त्यात हा घोळ टाका. मिनिटभरात पिठले तयार होईल. मीठ कमी
वाटलेच तर घाला. हवे तर पाणी उकळताना त्यात १ टेबलस्पून ओले खोबरे टाका.
शेवग्याच्या शेंगा पण टाकता येतील, पण घोळ टाकण्यापुर्वी त्या शिजवाव्या लागतील.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी ( एका वेळचे प्रमाण )
अधिक टिपा: 

मीठ मुद्दाम कमी घालायला सूचवलेय कारण सगळ्या मिश्रणाचा अचूक अंदाज येणे
कठीण आहे. शिवाय कमी वाटलेच तर आयत्यावेळी घालता येईल, जास्त झाले तर
सर्व मिश्रणच खारट होईल.

कुळथालाच कोकणाबाहेर हुलगे म्हणतात. कोकणातच याचे पिक जास्तकरुन येते, पण
पूर्वापार कोकणी लोक हे घाटमाथ्यावर विकत आले आहेत.
कुळथाचे पिठ करणे, जरा जिकीरीचे असते. हे दाणे भाजून, जात्यावर भरडतात. मग
साले पाखडून टाकून, ते परत बारीक दळतात. कोकणात पातळसर पिठी आणि घाटावर
माडगं ( यात फ़क्त मीठ आणि गूळ, क्वचित ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालतात.)
लोकप्रिय आहे.
उत्तम चवदार पदार्थ असण्यासोबतच कुळीथ ( हॉर्स ग्रॅम ) औषधी पण आहेत. आजारातून
उठलेल्या माणसाला, माडगं दिले जाते. त्याने अंगात हुशारी येते आणि शक्ती येते.
गरमागरम भात, पिठी, तळलेली मिरची ( किंवा भाजलेला बांगडा ) म्हणजे कोकणी
माणसाचे मनपसंत जेवण.

वरचा प्रकार करायला, जरा मेहनत आहे खरी. पण आयत्यावेळी अगदी दोन मिनिटात
पिठले तयार होते. परत फ़ोडणी देखील करायची गरज नाही. मी पडताळले नाही, पण
फ़्रीजमधे, हे मिश्रण ३ महिने टिकेल, असे वाटते.

याबरोबरच, ट्रेकला जाणाऱ्या लोकांनी पण असे मिश्रण नेणे सोयीचे होईल. वेगळे पिठले
करायला भांडे नसेल, तर शिजत आलेल्या भातातच हे मिश्रण मिसळून पिठलेभात
करता येईल. वरून तूप घेतल्यास, झालेले श्रम भरुनही येतील.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे.. हा तर एकदम भूलाबिसरा पदार्थ दिलात की आज!!!!
इकडे यताना कुळथाचे पीठ घेऊन यायला विसरू नका.. Happy यादीत अजून एका नॉस्टेल्जिक गोष्टीची भर पडली!!!!

कुळथाच्या पिठल्यात अर्ध्या- चतकोर बटाट्याचे क्युब अगदी बारीक करुन घालायचे... खडीसाखरेइतके बारीक .. त्याने कडवटपणा थोडा कमी होतो.. छान घट्ट होते.

मस्त मस्त..... एकदम छान कल्पना दिलीत..... आताच इथे कुळथाचे पीठ मागवुन घेतले आहे..... हे नक्की करुन बघणार...... अरे पण माझ्याकडे आता कोकम नाही आहे.... आंबटपणासाठी दुसरे काय घालु.... चिंच अशी तळुन घालता येतील का.... चव बिघडेल का?

गरमागरम भात, पिठी, तळलेली मिरची ( किंवा भाजलेला बांगडा ) म्हणजे कोकणी
माणसाचे मनपसंत जेवण.>>>> +१०० हा माझा विक पॉइंट आहे पण सासरी कोणच खात नाही त्यामुळे एकट्यासाठी काय करणार म्हणुन बनवत नाही पण कधी आईकडे जेवायला जायचं असल की माझी हिच फर्माइश असते. ती पण चिडते माझ्यावर, कधीतरी जेवायला येणार आणि खाणार काय तर पिठी-भात. आता हा छान पर्याय दिलात तुम्ही नक्की करुन बघणार Happy

वर्षू, नक्की.
वर्षा, चिंच चालेल.
शेळी, त्यासाठीच कण्या घालतात.
मला नायजेरियात कुळीथ मिळाले होते. बहुतेक मोरोक्को मधून आले होते. पण घरी पिठ करणे जरा त्रासाचेच होते.

इथे शॉप राइट मध्ये नाहीतर ओन्ली कोकण मध्ये मिळते रेडी कुळीथ पीठ. आम्ही बेसन पिठले वाले. कुळीथ पचायला जड असते का?

वा!!! मी आठवड्यातुन एकदा तरी कुळथाचे पिठले करतेच. आमच्या गावात फक्त कुळीथच पिकतो. त्या मुळे पिठले आणि उसळ हे सारखे चालुच असते. आता असे कोरडे करुन ठेवते म्हणजे संध्याकाळी पटकन करायला बरे!!!

असा मी कोरड्या उपम्याचे किंवा शिर्‍याचे मिश्रण करुन ठेवते, आता ह्या पिठल्याचे ही ठेवीन. बेसनाच्या पिठल्याचे पण असे करुन ठेवता येइल का? बघायला पाहिजे.

छान आयडिया आहे.

विनार्च >>> गरमागरम भात, पिठी, तळलेली मिरची ( किंवा भाजलेला बांगडा ) <<< मी पण, मी पण Happy आता करशील तेव्हा मलापण बोलव Wink

अश्विनी,
बेसनापेक्षा कुळीथ पचायला सोपे. पण ऊष्ण.

मीरा, बेसनाचे पण असे करता येते, पण बेसन जरा भाजावे लागते. कुळीथ भाजूनच पिठ करतात त्यामूळे ते भाजावे लागत नाही.

ठाण्याच्या, धनश्री फुड प्रॉड्क्टस ची अशी बरीच उत्पादने आहेत. मी मूगडाळ शिरा, उपमा, उकड वापरुन बघितले. खरंच छान आहे चव. त्यांची अळूची भाजी, आंबाडीची भाजी असे पण मिक्सेस आहेत, असे त्यांच्या पॅकिंगवर वाचले , पण दुकानात दिसली नाहीत. आता पुढच्या वेळी बघितलीच पाहिजेत.

हो दिनेशदा धनश्री फुड चे सगळे पदार्थ छान असतात. मागे माझा नवरा ३ महिन्या साठी ब्रुसेल्स ला गेला होता तेंव्हा आम्ही ही सगळी उत्पादने आम्ही वापरुन पाहिली. त्याला तिकडे हे पदार्थ खुप उपयोगी पडले ( माझा नवरा पक्का शाकाहारी आहे). त्यान्ची मुगडाळ खिचडी, साबुदाणा खिचडी, तुरडाळ आमटी, हे सुध्धा खुप छान असते.

मस्त रेसिपी,दिनेशदा मी दही फेटून /आंबट ताक घालते,जिरे-खोबरे ताजे कुटूनही घालते,नुसत्या लसणीच्या पाकळ्या ठेचून,सुक्या लाल मिरच्या फोडणीत टाकूनही मस्त लागते!पाऊस पडत असताना गरम वाफाळता आम्बेमोहोराचा भात,कुळीथाचे पिठले अन् पापड! स्वर्गसुखच आहे.आज रात्रीचा मेन्यू ठरलातर!

गरमागरम भात, पिठी, तळलेली मिरची ( किंवा भाजलेला बांगडा ) म्हणजे कोकणी
माणसाचे मनपसंत जेवण.>>+++११११११११

कुळीथ पिठलं म्हणजे कंफर्ट फूड माझ्यासाठी. मुलुंडला "घरगुती प्रोड्क्ट्स" ह्या ब्रँडची तयार कुळीथ पिठी मिळते पिठलं किंवा पाटवड्यांसाठी. ए वन होतं पिठल

मामी सिटी ऑफ जॉयच्या समोर एक कोकण स्पेशल दुकान आहे तेच का "ओन्ली कोकण"? पुढच्या ट्रीपला बघायला पाहिजे.मागच्या ट्रीपमधे पाहिलं तर बरेचदा बंदच असायचं ते दुकान.

धनश्री फुडस, ३५/बी-१ वॄंदावन सोसायटी, ठाणे ४००६०१.
फोन नं ९८६९२००४४९

मी त्यांची उत्पादने दादरला रानडे रोडवर, स्रर्वोदय मधे घेतली होती, पण सर्व नाही दिसली / मिळाली.

दिनेशदा, खूप छान आयडिया आहे ही ! माझ्या सासरच्या लोकांपैकी माझा मुलगा व नवरा ह्यांना कुळथाच्या पिठल्याची मी आवड निर्माण केली. Happy

<< मस्त रेसिपी,दिनेशदा मी दही फेटून /आंबट ताक घालते, >> खरंय , असंही छान लागतं व पिठीला पोतही चांगला येतो. पिठीत नुसतं दही/ताक, थोडा बारीक चिरलेला कांदा व मिरची आणि मीठ घालून केलेलं डांगरही अनेकाना - मलाही- आवडतं. [ अर्थात, र्दिनेशदानी म्हटल्याप्रमाणे कुळीथ भाजूनच केलेली पिठी हवी; ]

दिनेशदा तुमच्या रेसिपीजचे क्रमवार फोटो मिस करतेय. नंतर जरूर टाका.

मला पण काहीवेळा भले मोठ्ट्॥ले कांदे मिळतात तेव्हा उगाच कापून तळलेले फ्रीज्मध्ये ठेवले जातात. त्यापे़क्षा ही रेस्पी मस्त आहे. फक्त मुदलातलं कुळथाचं पीठ पुढच्या वेळेस आठवणीने आणावं लागेल Proud
बेसन वापरून हाच प्रकार केला तर झुणका करता येईल का?

दिनेशदा, कुळथाचं पिठलं माझंही खूप आवडतं, उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात खाल्ल्यास अंगात लगेच ऊब संचारते.एखाद्या औषधाइतके बारीकशा अंगमोडीवर, अनारोग्यावर परिणामकारक उपचार.

वेळ नसेल तेव्हा अगदी शॉर्टकट म्हणजे सुचरिताने लिहिलंय तसं पाण्यात पिठलं व कोकमाच्या एकदोन पाकळ्या कालवून ठेचलेली लसूण,हिन्ग,लाल सुकी मिरची यांची फोडणी त्यात लाल तिखटही घालून द्यावी..गरमगरम छान लागते भाताच्या वाफाळत्या ढिगाशी :))

कुळथाच्या पिठल्यात जिरं , लसूण किंवा साखर कधी घातली नाहीये. कढीपत्ता मात्र घालतो पण हे try करून बघायला पाहिजे.