मला आठवतं आहे की एके रविवारी आम्ही सगळे एक चित्रपट पहायला गेलो. थेटरात नाही तर बाबांच्या मित्रा कडे प्रोजेक्टर वर सिनेमा बघायला गेलो. मी खूपच लहान होते बहुदा ६-७ वर्षांची. त्या वेळी प्रोजेक्टर वर सिनेमा पहायचा म्हणजे अगदी नवलाई होती.
सिनेमा सुरु झाला आणि आम्ही मुलं जाम कंटाळलो. काहीच समजेना. जास्त जण न्हवतो. तरी हळूच दंगा सुरु झाला. मोठे लोक वैतागले आणि आम्हा सगळ्यांना जवळच्या बागेत पिटाळले. आम्ही खूप गम्मत केली. भेळ खाल्ली, आयस्क्रीम खाल्लं. मग परत घरी आलो. सिनेमा संपला होता आणि सगळे मोठे गंभीर चेहेरे करून सिनेमाचीच चर्चा करत होते. आम्हा मुलांना मजा यावी म्हणून त्या प्रोजेक्टर वाल्या काकांनी चार्ली चापलीन चा सिनेमा लावला. मोठे लोक दुसर्या खोलीत बसून सिनेमा वरच चर्चा करत होते. मी थोडेसे ऐकले त्या वरून, 'जब्बार' 'निळूभाऊ' अशी नावे ऐकू आली. काहीच समजले नाही.
घरी येताना पण आई बाबा सिनेमाचीच चर्चा करत होते. मी शेवटी रागावले " काय सारखे तेच बोलता" बाबा हसले आणि माझ्याशी चार्ली चापलीन बद्दल बोलायला लागले.
नंतर समजलं की तो सिनेमा होता "सिंहासन" !!! मराठी चित्रपटांचा एक मैला चा दगड!!!
ही आठवण इतक्या प्रकरशाने लक्षात अशा करता आहे, की त्यावेळेस, न आवडलेला तो सिनेमा, पुढच्या आयुष्यात माझ्या अत्यंत आवडत्या कलाकृती मध्ये सामील झाला. तो माझ्या भाव विश्वात कधी सामावला ते कळलेच नाही. आम्हाला ८वी का ९वी मध्ये दत्ता भटांचा एक धडा होता " मी माणिक राव" तो धडा वाचुन तर ह्या सिनेमा बद्दल त्यातिल कलाकारान्च्या मनात काय भावना आहेत ते समजलं.
सिंहासन नुसता सिनेमा नाही. ती एक " कलाकृती" आहे. एक परिपूर्ण कलाकृती. अस्सल देशी विषय. बांधीव पटकथा. दोन सशक्त लेखणी मधून उमटलेला हुंकार. अरुण साधुं सारखा प्रतिथयश पत्रकार लेखक ज्याच्या "सिंहासन" आणि "मुंबई दिनांक" ह्या दोन अति सशक्त कादंबर्यां वरून बेतलेला परिपूर्ण अनुभव. संवाद आणि पटकथा तेवढ्याच ताकदीच्या माणसाने लिहिलेली. "विजय तेंडूलकर" बस नाम ही काफी है.......
एखाद्या दिवशी आमटी किंवा भाजी एवढी सुंदर जमून येते की खाणारा समाधानाने भुरका मारतो, तसं ह्या सिनेमाचं झालं. सगळ्या गोष्टी चपखल.जेवढ्यास तेवढ्या. एखाद्या नटाने वा नटीने सिनेमा "खाल्लाय" वगैरे .. छे अजिबात चान्स नाही. प्रत्येकाची भूमिका जेवढ्यास तेवढी. आणि विषय तरी काय जो आपण रोज पेपर मध्ये वाचतो तो. जसा काही पेपरच वाचतो आहे. एखादा अग्रलेख वाचावा तसा अनुभव.
ह्या सगळ्या किमयेच्या राजाचं नाव जब्बार पटेल!!! ह्या माणसाने मराठी सिनेमाला एक वेगळी दृष्टी दिली. ह्याचा प्रत्येक सिनेमा ही वेगळी कलाकृती आहे. गाडी सामना पासून सुरु झाली ते अनेक वळसे घेत उंबरठा, जैत रे जैत, एक होता विदुषक, करत मुक्ता पर्यंत येऊन थडकली. पण सगळ्या सिनेमा मध्ये सगळ्यात क्रांतीकारी ठरला तो "सिंहासन".
हा सिनेमा नाहीच मुळी!!! हा अनुभव आहे. जशी तेन्डुलकारांची पटकथा, तसाच जब्बारच पात्र नियोजन. बारीक सारीक बाबींचा अगदी बारकाव्याने विचार केला आहे.
पात्र संयोजनाने सिनेमा किती उच्च प्रत गाठू शकतो त्याचं "सिंहासन" हे उत्कृष्ट उदाहरण. अगदी मुख्यमंत्री ते मुथा शेट पर्यंत परफेक्ट फ्रेम. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत चपखल. बरं नट /नटी म्हणावेत तर सगळी मराठी चित्रपट सृष्टीच लोटली आहे असं म्हणाव लागेल. निळूफुले, डॉ. लागू, दत्ता भट, अरुण सरनाईक, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, माधव वाटवे, अरुण जोगळेकर, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर, सुषमा तेंडूलकर, रीमा लागू, शेखर नवरे, चंद्रकांत काळे, श्रीकांत मोघे, रेखा कामत, जुईली देऊस्कर, लालन सारंग, हुश्श!!! सगळे छोटे मोठे, नाटक , सिनेमा, प्रायोगिक, ....कसलाही मतभेद न ठेवता ह्या कलाकृतीत सामील झालेले रंगकर्मी!!!
एकाही भूमिका, पात्र फालतू नाही. अगदी मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या छोट्याश्या भूमिकेतही "रेखा कामत" ह्यांच्या सारखी जुनी जाणती अभिनेत्री. मिसेस चंद्रात्रेन्च्या भूमिकेत सेक्सी लालन सारंग. इतक्या अप्रतिम पात्र योजने मुळे, सिनेमाचे अर्धे काम होवून गेले आहे. बाकी प्रत्येक भुमिके बद्दल लिहिण्यासारखे आहे. त्या साठी एक एक स्वतंत्र लेख होईल!!!!!
आता पात्रांचा विषय निघालाच आहे तर तीन नावे मुख्य भूमिकेत आहेत, निळू फुले, डॉ. लागू आणि अर्थातच अरुण सरनाईक !!!!!
अरुण सरनाइकान्च्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका त्यांना मिळाली म्हंटले तर वावगे ठरू नये. डॉ. लागू नेहेमी प्रमाणेच अप्रतिम. आणि निळू भाउंचा तर जवाबच नाही. ती व्यक्तिरेखा लेखकानेच फार प्रेमाने रंगवलेली आहे. त्यात इतर कोणाचाही विचार आपण करू शकत नाही.
मुळात अरुण साधूंनी कादंबरीत जी पात्र लिहिलेली आहेत ती ती समोर जिवंत झाल्या सारख्या वाटतात.
ह्या सिनेमात एकमेव गाण आहे. " उषःकाल होता होता " आणि ते सगळ्या कक्षा मोडून पाडणार आहे. सुरेश भटांच्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांनी जी चाल दिली आहे त्याला तोड नाही. ते टोकदार शब्द, आशाचा टिपेचा आवाज,
रवींद्र साठे चा खोल गंभीर आवाज आणि मंगेशकरांचे संगीत . आणि हो ह्या गाण्यातल्या कोरस चा उल्लेख व्हायलाच हवा. जब्बार च्या चित्रपटातून ही गीतकार आणि
संगीतकाराची जोडी अगदी हिट झाली. ह्या गाण्याच टेकिंग ही त्या काळा पेक्षा खूपच वेगळं. गाणं पार्श्वभूमी वर वाजतंय, आणि कॅमेरा मुंबई भर सरसर फिरतोय. सगळी व्यथा अंगावर येते. ह्या गाण्यावर एक स्वतन्त्र लेख होवू शकतो.
ह्या सिनेमाचा वेगळे पणा म्हणजे पहिल्यांदाच खाऱ्या खुऱ्या विधानसभेत ह्याच चित्रीकरण झालं होत. विधान सभेत चालणार्या गमती, तिकडचं कँटीन, आमदारान्ची मस्ती, हेरगीरी, आमदार फोडण्याचे प्रकार, भोंदु युत्या .... सगळ अगदी यथार्थ चित्रण.
ह्या सिनेमाने मला काय दिलं?...... सिनेमा बघायची दृष्टी !!!!! खरच ह्या बाबतीत मी खूप सुदैवी आहे की ही भावना मला समजली. सिनेमा कोणताही असो. चांगला वा वाईट तो बघायला एक दृष्टी लागते. प्रत्येक सिनेमा हा एकदम चांगला आणि एकदम वाईट नसतो. प्रत्येक सिनेमात काहीतरी सापडतच. आपल्याला कोणत्या प्रकारचे सिनेमे आवडतात हा शोध लागणे महत्वाचे.
सिंहासन ने चित्रपट सृष्टीला काय दिलं? खूप काही तरी भरीव दिलं..... सिनेमा हे किती ताकदीच माध्यम आहे आणि असा क्लिष्ट विषय ही लोकप्रिय होवू शकतो हे ह्या सिनेमाने दाखवले. ह्या बाबतीत जब्बार आणि तेंडूलकर ह्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच. तेन्दुलाकारांचे लिखाण मला नेहेमी असे दूर ध्रुवा वरून केल्या सारखे वाटायचे. पण त्यांची पटकथा ह्या प्रकाराबाद्दलाची समज वादातीत आहे. मुळात अरुण साधूंनी दोन कादंबर्यात मांडलेला हा पसारा तीन तासात उरकणे म्हणजे खायचे काम नाही.....
मराठीतला मैलाचा दगड असलेल्या चित्रपटा बद्दल ह्या निम्मित्ताने लिहायला मिळाले हे माझे भाग्यच!!!!!
रीमा लागू ही श्रीराम लागू
रीमा लागू ही श्रीराम लागू यांची सून आहे?(चित्रपटात आहे पण प्रत्यक्षातही?)
मीरा, छान लिहिलंयस. अजून
मीरा, छान लिहिलंयस.
अजून सविस्तर वाचायला आवडलं असतं. (सिनेमा-रसग्रहण टाईप काहीतरी.)
मी कादंबरी आधी वाचली, की सिनेमा आधी पाहिला ते आठवत नाहीय. पण मनावर कादंबरीचा प्रभाव अधिक राहिलाय. 'सिंहासन' म्हटलं, की डोळ्यांसमोर ते पुस्तक, त्यातली प्रकरणं हेच उभं राहतं. ('मुंबई दिनांक' मात्र, का कुणास ठाऊक, अजून वाचलीच नाहीये
)
लोकहो धन्यवाद वरदा तुझा
लोकहो धन्यवाद
वरदा तुझा प्रतिसाद खुपच आवडला आणि पटला सुध्धा. बहुतेक लोकं आधी कादंबरी वाचुन मग सिनेमा पाहिलेले आहेत.
लले.. कादंबरी इतकी सशक्त आहे की तिचा प्रभाव पडणं अगदी सहाजिक आहे.
प्रतिसाद खुपच छान आहेत सगळ्यांचेच. खुप नवी माहिती मिळाली......
सेन्सॉर बोर्डचा खर्च कोण
सेन्सॉर बोर्डचा खर्च कोण करते? सरकारच ना? मग त्यांचे नियंत्रण असणारच की.
किस्सा कुर्सी का, नसबंदी या चित्रपटांवर सेन्सॉरने बंदी घातली होती.
आंधी मधे इंदिरा गांधीशी साम्य असणारी व्यक्तीरेखा होती आणि त्यावरही बंदी आणली होती जी नंतर उठवली.
दादा कोंडक्यांच्या राम राम गंगाराम ह्या सिनेमाचे नाव गंगाराम वीसकलमे होते पण ते सेन्सॉरने बदलायला लावले. सरकारचा प्रभाव नसता तर हे झाले असते का? १९७७ च्या सुमारास इंदिरा गांधिंचा २० कलमी कार्यक्रमाची जोरदार हवा होती आणि तेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सामना चित्रपटातील काही भाग जोरदार कापला होता. आजही तो सिनेमा बघताना कित्येक गोष्टींचा उलगडा होत नाही. श्रीराम लागूंची मुलगी म्हणून स्मिता पाटील दाखवली आहे. तिची कुठलीही पार्श्वभूमी दाखवली नाही. कुठल्याशा ट्रकखाली येऊन ती मरते असा संशय यावा इतकेच काहीबाही दाखवले आहे. पण तपशील नाही. हीही सेन्सॉरची करामत. एकंदरीत राजकारण्यांविषयीचा या सिनेमाचा दृष्टिकोन बघता हयात सरकारचा सहभाग नसेलच असे मी मानत नाही.
माझा असा दावा आहे की सरकारचे सिनेमात वादग्रस्त विषय दाखवता येईल का नाही यावर जोरदार नियंत्रण असते. कायद्याच्या कचाट्यात न सापडता असे नियंत्रण ठेवता येईल इतपत सरकारी यंत्रणा बिलंदर आहे ह्याची मला खात्री आहे.
सेन्सॉर बोर्डचा खर्च कोण
सेन्सॉर बोर्डचा खर्च कोण करते? सरकारच ना? मग त्यांचे नियंत्रण असणारच की.
अहो तालुक्यापासून सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पगाराचा खर्च सरकारच करते याचा अर्थ ते सरकारचे अंकित आहेत असा होतो काय? फारच अजब तर्कट आहे बुवा तुमचे. सदा सर्वदा विरोधात राहून सरकारी व्यवस्थेची कार्यालये ही सत्तारूढ पक्षाची कार्यालये आहेत असे तुम्हाला भास होऊ लागला आहे की काय न कळे !
आंधी वर कधीही बंदी आली नव्हती. सामना १९७४ चा चित्रपट आहे त्याचा आणि आणीबाणीचा काय संबंध? सामना हा जब्बारांचा पहिलाच चित्रपट होता. त्यावेळी त्याना लेन्सेसचे प्रकारही नीट ठाउक नव्हते असे त्यांनीच सांगितले आहे. त्यामूले एडिटिंगच्या घोळात असे होऊ शते. शोले मध्ये गब्बरसिंग जेलमधून पळून जातो हाप्रसंग मूळ फिल्ममध्ये होता पण फिल्म चा वेळ कमी करण्यासाठी तो प्रसंगच ड्रॉप केला गेला आणि केवळ एक हवलदार 'गब्बर जेलसे भाग गया.' असा एखादा उंदीर पळून जावा तशी पुळचट बातमी देणारा डायलॉग आहे. तेव्हाही हा अचानक कसा का पळून केला असे प्रश्न लोकाना पडलेच होते.(कदाचित गब्बर सत्तारूढ पक्षाचा असावा
म्हणून ते दाखवायला बन्दी असेल.)
माझा असा दावा आहे की सरकारचे सिनेमात वादग्रस्त विषय दाखवता येईल का नाही यावर जोरदार नियंत्रण असते. कायद्याच्या कचाट्यात न सापडता असे नियंत्रण ठेवता येईल इतपत सरकारी यंत्रणा बिलंदर आहे ह्याची मला खात्री आहे.
>>
तुमचा दावा असू द्या हो तुमच्या जवळ. सरकार ,झेंडा ,घाशीराम कोतवाल या कलाकृतीवर सत्ता नसताना केवळ झुन्डगिरी करून अघोषित सेन्सॉर कोणी आणले ते बोला आधी!
कृपया, इथे नेहेमीचे वाद नकोत.
कृपया,
इथे नेहेमीचे वाद नकोत. लिहिणार्या दोन्ही सदस्यांवर कारवाई करण्यात येईल.
अॅडमीन धन्यवाद
अॅडमीन धन्यवाद
मोहन की मीरा... स्पर्धा असो
मोहन की मीरा...
स्पर्धा असो वा नसो, पण त्या निमित्ताने तुम्ही खर्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीतील काही निवडक 'माईल स्टोन' ठरलेल्या एका चित्रपटाविषयी इतके भरभरून लिहिले आहे ते मला खूप भावले.
कोल्हापूरातील शाहू स्मारक भवनात डॉ.जब्बार पटेल यानी 'सामना' 'सिंहासन' व 'जैत रे जैत' वर एक सुरेख अभ्यासू व्याख्यान इथल्या चित्रप्रेमींसमोर दिले होते. त्यामध्ये 'सिंहासन' बद्दल बोलताना त्यानी त्याचे श्रेय राजकारणाबाबत अतिशय जागरूक असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना दिले होते....ते म्हणाले 'पोलिटिकल ईश्यू या राज्याशिवाय केवळ बंगालमध्येच इतक्या प्रखरतेने चर्चीले जातात. ही बाब सिंहासन दिग्दर्शनाच्यावेळी खूप लाभदायी ठरली.".....[भाषण जवळपास तासाइतके होते, पण सिंहासनचा हा उल्लेख आजही स्मरतो].
त्यामुळे झाले असे की, 'सिंहासन' मधील सारीच पात्रे....अगदी मुख्य मंत्र्यापासून ते कामगार पुढार्यापर्यंतची....चित्रपट रसिकांना कधीच नवखी वाटली नाही, हे या चित्रपटाचे एक मुख्य वैशिष्ट्य.
[वर एका प्रतिसादात म्हटले गेल्याप्रमाणे लेखक अरुण साधूनी मत व्यक्त केले ~ 'दिगूला वेड लागलेले दाखविणे म्हणजे दिग्दर्शकाने अकारण घेतलेले स्वातंत्र्य होय, त्याची काही गरज नव्हती.' पण असो, चित्रपटाचा शेवट असा प्रभावी दाखविण्याची गरज आहे असे डॉ.पटेलना वाटले तर त्याचीही काही कारणे असतीलच.]
तोरडमल, दत्ता भट, रीमा लागू, जयराम आदी दुय्यम तिय्यम भूमिकेत चमकलेले कलाकार त्या त्या भूमिका जगल्या असेच म्हणतो.
बाकी, अरुण सरनाईक हा कलाकार जब्बार पटेल स्कूलमधील नसूनही त्याचीच मुख्य मंत्र्यांच्या भूमिकेसाठी करणे यात पटेल यांची कल्पकता दिसून येते...इतके अरुण सरनाईक 'जिवाजीराव' म्हणून शोभले होते.
[अवांतर : रीमा लागू आणि डॉ.श्रीराम लागू यांचे कसलेही नाते नाही. पूर्वीच्या काळातील नाट्यअभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांची 'रीमा' ही कन्या, जिचा विवाह श्री.विवेक लागू यांच्याशी झाला होता... आता एकत्र राहात नाहीत. डॉ.श्रीराम लागू याना 'तन्वीर' हे एकच अपत्य, ज्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.]
अशोक मामा आपली प्रतिक्रिया
अशोक मामा आपली प्रतिक्रिया खुप आवडली. खरच किती नव्या नव्या गोष्टी कळत आहेत ह्या लेखाच्या निमित्ताने!!!!!!
<डॉ.श्रीराम लागू याना
<डॉ.श्रीराम लागू याना 'तन्वीर' हे एकच अपत्य, ज्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.>
तन्वीर हा डॉ. लागूंचा तिसरा आणि सर्वांत धाकटा मुलगा.
बा जो आताचे नाही, पण संजय
बा जो आताचे नाही, पण संजय गांधीच्या काळात, किस्सा कुर्सी का च्या बाबतीत असे घडले होते. नंतर तो पूर्णही झाला.
मी वर लिहिल्याप्रमाणे सिंहासन
मी वर लिहिल्याप्रमाणे सिंहासन मधली सगळीच पात्रे वास्तव वाटली होती. त्या काळातल्या राजकारण्यांची प्रतिबिंबं होती त्यात. पण तसे नेहमीच घडत नाही.
मराठी चित्रपटात, खुपदा साचेबंद पात्रे असतात. उदा. शेतकरी असला तर तो कर्जात बुडालेला, आभाळाकडे डोळे
लावून बसलेला असाच दाखवायचा. प्रत्यक्षात जरी तो पावसाकडे डोळे लावून बसलेला असला तरी त्याच्याकडे
अनुभवातून आलेले, व्यावहारीक शहाणपण असते. माणसे जोखायची एक कला असते, असा हाडामासाचा शेतकरी
क्वचितच दिसला. चित्रपटात.
बायको म्हणजे ती कजाग, मेहुणा म्हणजे बहीणीच्या घरी पडीक, सून म्हणजे सोशिक, सरपंच म्हणजे पाताळयंत्री... असे साचे. म्हणुन हे चित्रपट आपले वाटतच नाही.
शाहरुखच्या पहेली मधला बच्चनने साकार केलेला धनगर खुप अस्सल होता. तसा मराठी चित्रपटात का दिसला नाही.
मस्त! दिग्गजांची नावे अशी
मस्त! दिग्गजांची नावे अशी रांगेत बघून आणि पुन्हा आठवून खूप छान वाटलं.
सिंहासन अफाट. त्यानंतरही सिनेमे आले असतील अशा विषयावर. पण ही उंची नाही.
सिंहासन हा खरा आंतरराष्त्रीय
सिंहासन हा खरा आंतरराष्त्रीय तोडीचाच होता. एका परिसंवादात 'सिंहासन' हा एक 'साहसपट'आहे असे मत व्यक्त करण्यात आले होते. त्याचा रूढ चाकोरीतून बाहेर जाणारा विषय, त्याची स्टार कास्ट वगैरे. त्यानन्तर जब्बारनी राष्ट्रीय राजकारणावरही चित्रपट काढण्याचा मनोदय बोलून दाखवला होता पण तसे झाले नाही.....
सुरेख
सुरेख
कालच बघितला यु ट्युब वर.
कालच बघितला यु ट्युब वर. मस्त. फक्त दिगुला उगाचच वेडा केला. असो त्या काळात ते योग्य वाटले असेल...
अप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम
अप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम !!!
आज हा मराठी सिनेमातला माईल स्टोन पाहण्याची संधी मिळाली.
मला राहुन राहुन हाच प्रश्न पडतोय की आज असे सिनेमे मराठीत का बनु शकत नाही , नक्की आपण कुठे कमी पडतोय ?
मोकिमी, लेख आवडला. मला हा
मोकिमी, लेख आवडला. मला हा चित्रपट आवडतो, पण कादंबरी अधिक आवडते
>>आज असे सिनेमे मराठीत का बनु शकत नाही >> +१
अजुन बहुदा पाहिला नाही मी
अजुन बहुदा पाहिला नाही मी सिंहासन, किंवा खुप ओझरता पहिला असेन. लेख आणि प्रतिक्रीया वाचुन, आणि या आधीही याबद्दल बरेच वाचल्यामुळे आता आवर्जुन मिळवुन पाहिन!
लेख उत्तमच! शुभेच्छा!
काय सुर्रेख लिहिलंय......
काय सुर्रेख लिहिलंय...... अप्रतिम.....
उत्कृष्ट मराठी सिनेमांच्या यादीत पहिल्या ३-४ मधे मानांकन देता येईल (माझ्या मते) असा अतिशय सुंदर चित्रपट.....
वर कोणी तरी म्हटल्याप्रमाणे सिंहासन तो सिंहासनच....... पटकथा, मांडणी, व्यक्तिरेखा, अभिनय, पात्रनिवड - सर्व म्हणजे सर्व बाबतीत.......
<<<कोल्हापूरातील शाहू स्मारक भवनात डॉ.जब्बार पटेल यानी 'सामना' 'सिंहासन' व 'जैत रे जैत' वर एक सुरेख अभ्यासू व्याख्यान इथल्या चित्रप्रेमींसमोर दिले होते. त्यामध्ये 'सिंहासन' बद्दल बोलताना त्यानी त्याचे श्रेय राजकारणाबाबत अतिशय जागरूक असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना दिले होते....ते म्हणाले 'पोलिटिकल ईश्यू या राज्याशिवाय केवळ बंगालमध्येच इतक्या प्रखरतेने चर्चीले जातात. >>>> हे विशेष उल्लेखनीय ...
मोकिमी..छान लिहिलंयस.. या
मोकिमी..छान लिहिलंयस..
या सिनेमाची ताकद अशी आहे कि आपण अक्षरश: अवाक होतो पाहताना!!
कोरस चा उल्लेख व्हायलाच
कोरस चा उल्लेख व्हायलाच हवा
क्या ब्बात....
मी या कोरसचा प्रचंड चाहता आहे.. आलापात वापरल्या जाणार्या सगळ्या ताना यात आल्या आहेत... आणि हे खरेच एक दिव्य काम आहे.....
नतमस्तक... प्रती ( Hats off) हृदयनाथ मंगेशकर
........
शुभेच्छा!!
साजीरा +१.
साजीरा +१.
Pages