प्रकार १- सिंहासन- माझी आवड

Submitted by मोहन की मीरा on 23 August, 2012 - 05:45

मला आठवतं आहे की एके रविवारी आम्ही सगळे एक चित्रपट पहायला गेलो. थेटरात नाही तर बाबांच्या मित्रा कडे प्रोजेक्टर वर सिनेमा बघायला गेलो. मी खूपच लहान होते बहुदा ६-७ वर्षांची. त्या वेळी प्रोजेक्टर वर सिनेमा पहायचा म्हणजे अगदी नवलाई होती.

सिनेमा सुरु झाला आणि आम्ही मुलं जाम कंटाळलो. काहीच समजेना. जास्त जण न्हवतो. तरी हळूच दंगा सुरु झाला. मोठे लोक वैतागले आणि आम्हा सगळ्यांना जवळच्या बागेत पिटाळले. आम्ही खूप गम्मत केली. भेळ खाल्ली, आयस्क्रीम खाल्लं. मग परत घरी आलो. सिनेमा संपला होता आणि सगळे मोठे गंभीर चेहेरे करून सिनेमाचीच चर्चा करत होते. आम्हा मुलांना मजा यावी म्हणून त्या प्रोजेक्टर वाल्या काकांनी चार्ली चापलीन चा सिनेमा लावला. मोठे लोक दुसर्‍या खोलीत बसून सिनेमा वरच चर्चा करत होते. मी थोडेसे ऐकले त्या वरून, 'जब्बार' 'निळूभाऊ' अशी नावे ऐकू आली. काहीच समजले नाही.

घरी येताना पण आई बाबा सिनेमाचीच चर्चा करत होते. मी शेवटी रागावले " काय सारखे तेच बोलता" बाबा हसले आणि माझ्याशी चार्ली चापलीन बद्दल बोलायला लागले.

नंतर समजलं की तो सिनेमा होता "सिंहासन" !!! मराठी चित्रपटांचा एक मैला चा दगड!!!

ही आठवण इतक्या प्रकरशाने लक्षात अशा करता आहे, की त्यावेळेस, न आवडलेला तो सिनेमा, पुढच्या आयुष्यात माझ्या अत्यंत आवडत्या कलाकृती मध्ये सामील झाला. तो माझ्या भाव विश्वात कधी सामावला ते कळलेच नाही. आम्हाला ८वी का ९वी मध्ये दत्ता भटांचा एक धडा होता " मी माणिक राव" तो धडा वाचुन तर ह्या सिनेमा बद्दल त्यातिल कलाकारान्च्या मनात काय भावना आहेत ते समजलं.

सिंहासन नुसता सिनेमा नाही. ती एक " कलाकृती" आहे. एक परिपूर्ण कलाकृती. अस्सल देशी विषय. बांधीव पटकथा. दोन सशक्त लेखणी मधून उमटलेला हुंकार. अरुण साधुं सारखा प्रतिथयश पत्रकार लेखक ज्याच्या "सिंहासन" आणि "मुंबई दिनांक" ह्या दोन अति सशक्त कादंबर्‍यां वरून बेतलेला परिपूर्ण अनुभव. संवाद आणि पटकथा तेवढ्याच ताकदीच्या माणसाने लिहिलेली. "विजय तेंडूलकर" बस नाम ही काफी है.......

एखाद्या दिवशी आमटी किंवा भाजी एवढी सुंदर जमून येते की खाणारा समाधानाने भुरका मारतो, तसं ह्या सिनेमाचं झालं. सगळ्या गोष्टी चपखल.जेवढ्यास तेवढ्या. एखाद्या नटाने वा नटीने सिनेमा "खाल्लाय" वगैरे .. छे अजिबात चान्स नाही. प्रत्येकाची भूमिका जेवढ्यास तेवढी. आणि विषय तरी काय जो आपण रोज पेपर मध्ये वाचतो तो. जसा काही पेपरच वाचतो आहे. एखादा अग्रलेख वाचावा तसा अनुभव.

ह्या सगळ्या किमयेच्या राजाचं नाव जब्बार पटेल!!! ह्या माणसाने मराठी सिनेमाला एक वेगळी दृष्टी दिली. ह्याचा प्रत्येक सिनेमा ही वेगळी कलाकृती आहे. गाडी सामना पासून सुरु झाली ते अनेक वळसे घेत उंबरठा, जैत रे जैत, एक होता विदुषक, करत मुक्ता पर्यंत येऊन थडकली. पण सगळ्या सिनेमा मध्ये सगळ्यात क्रांतीकारी ठरला तो "सिंहासन".
हा सिनेमा नाहीच मुळी!!! हा अनुभव आहे. जशी तेन्डुलकारांची पटकथा, तसाच जब्बारच पात्र नियोजन. बारीक सारीक बाबींचा अगदी बारकाव्याने विचार केला आहे.

पात्र संयोजनाने सिनेमा किती उच्च प्रत गाठू शकतो त्याचं "सिंहासन" हे उत्कृष्ट उदाहरण. अगदी मुख्यमंत्री ते मुथा शेट पर्यंत परफेक्ट फ्रेम. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत चपखल. बरं नट /नटी म्हणावेत तर सगळी मराठी चित्रपट सृष्टीच लोटली आहे असं म्हणाव लागेल. निळूफुले, डॉ. लागू, दत्ता भट, अरुण सरनाईक, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, माधव वाटवे, अरुण जोगळेकर, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर, सुषमा तेंडूलकर, रीमा लागू, शेखर नवरे, चंद्रकांत काळे, श्रीकांत मोघे, रेखा कामत, जुईली देऊस्कर, लालन सारंग, हुश्श!!! सगळे छोटे मोठे, नाटक , सिनेमा, प्रायोगिक, ....कसलाही मतभेद न ठेवता ह्या कलाकृतीत सामील झालेले रंगकर्मी!!!

एकाही भूमिका, पात्र फालतू नाही. अगदी मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या छोट्याश्या भूमिकेतही "रेखा कामत" ह्यांच्या सारखी जुनी जाणती अभिनेत्री. मिसेस चंद्रात्रेन्च्या भूमिकेत सेक्सी लालन सारंग. इतक्या अप्रतिम पात्र योजने मुळे, सिनेमाचे अर्धे काम होवून गेले आहे. बाकी प्रत्येक भुमिके बद्दल लिहिण्यासारखे आहे. त्या साठी एक एक स्वतंत्र लेख होईल!!!!!
आता पात्रांचा विषय निघालाच आहे तर तीन नावे मुख्य भूमिकेत आहेत, निळू फुले, डॉ. लागू आणि अर्थातच अरुण सरनाईक !!!!!
अरुण सरनाइकान्च्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका त्यांना मिळाली म्हंटले तर वावगे ठरू नये. डॉ. लागू नेहेमी प्रमाणेच अप्रतिम. आणि निळू भाउंचा तर जवाबच नाही. ती व्यक्तिरेखा लेखकानेच फार प्रेमाने रंगवलेली आहे. त्यात इतर कोणाचाही विचार आपण करू शकत नाही.
मुळात अरुण साधूंनी कादंबरीत जी पात्र लिहिलेली आहेत ती ती समोर जिवंत झाल्या सारख्या वाटतात.

ह्या सिनेमात एकमेव गाण आहे. " उषःकाल होता होता " आणि ते सगळ्या कक्षा मोडून पाडणार आहे. सुरेश भटांच्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांनी जी चाल दिली आहे त्याला तोड नाही. ते टोकदार शब्द, आशाचा टिपेचा आवाज,
रवींद्र साठे चा खोल गंभीर आवाज आणि मंगेशकरांचे संगीत . आणि हो ह्या गाण्यातल्या कोरस चा उल्लेख व्हायलाच हवा. जब्बार च्या चित्रपटातून ही गीतकार आणि
संगीतकाराची जोडी अगदी हिट झाली. ह्या गाण्याच टेकिंग ही त्या काळा पेक्षा खूपच वेगळं. गाणं पार्श्वभूमी वर वाजतंय, आणि कॅमेरा मुंबई भर सरसर फिरतोय. सगळी व्यथा अंगावर येते. ह्या गाण्यावर एक स्वतन्त्र लेख होवू शकतो.

ह्या सिनेमाचा वेगळे पणा म्हणजे पहिल्यांदाच खाऱ्या खुऱ्या विधानसभेत ह्याच चित्रीकरण झालं होत. विधान सभेत चालणार्‍या गमती, तिकडचं कँटीन, आमदारान्ची मस्ती, हेरगीरी, आमदार फोडण्याचे प्रकार, भोंदु युत्या .... सगळ अगदी यथार्थ चित्रण.

ह्या सिनेमाने मला काय दिलं?...... सिनेमा बघायची दृष्टी !!!!! खरच ह्या बाबतीत मी खूप सुदैवी आहे की ही भावना मला समजली. सिनेमा कोणताही असो. चांगला वा वाईट तो बघायला एक दृष्टी लागते. प्रत्येक सिनेमा हा एकदम चांगला आणि एकदम वाईट नसतो. प्रत्येक सिनेमात काहीतरी सापडतच. आपल्याला कोणत्या प्रकारचे सिनेमे आवडतात हा शोध लागणे महत्वाचे.

सिंहासन ने चित्रपट सृष्टीला काय दिलं? खूप काही तरी भरीव दिलं..... सिनेमा हे किती ताकदीच माध्यम आहे आणि असा क्लिष्ट विषय ही लोकप्रिय होवू शकतो हे ह्या सिनेमाने दाखवले. ह्या बाबतीत जब्बार आणि तेंडूलकर ह्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच. तेन्दुलाकारांचे लिखाण मला नेहेमी असे दूर ध्रुवा वरून केल्या सारखे वाटायचे. पण त्यांची पटकथा ह्या प्रकाराबाद्दलाची समज वादातीत आहे. मुळात अरुण साधूंनी दोन कादंबर्यात मांडलेला हा पसारा तीन तासात उरकणे म्हणजे खायचे काम नाही.....
मराठीतला मैलाचा दगड असलेल्या चित्रपटा बद्दल ह्या निम्मित्ताने लिहायला मिळाले हे माझे भाग्यच!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही आवडता चित्रपट हा.
आणि आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याकाळच्या राजकारणी लोकांचे आणि राजकारणाचे, थेट प्रतिबिंब होते त्यात.

रविंद्र साठेचं कुठलं गाणं ? आठवत नाही. आशाचे उषःकाल होता होता पण यातच होते ना ?

कलाकारात, तारा पाटकर राहिल्या Happy

रविंद्र साठेचं कुठलं गाणं ? आठवत नाही. आशाचे उषःकाल होता होता पण यातच होते ना ?>>>

दिनेशदा एकच गाणं आहे "उषःकाल होता होता" त्यात रविंद्र साठे च एकच कडवं आहे " तिजोर्‍यात केले आम्ही बंद स्वर्ग साती" एकाच कडव्यात त्याचा जो अलिप्त गंभीर आवाज लागला आहे त्याला तोड नाही.

अफाट... केवळ एकच शब्द वापरता येइल या चित्रपटासाठी !
कसली बाप माणसं होती एकेक ! लेखात म्हटल्याप्रमाणे एकही पात्र अवांतर वाटत नाही हे जब्बार साहेबांचं यश ! (अगदी ५ मिनीटाची उषा नाडकर्णींची भुमिकाही याला अपवाद नाही)
अरुण सरनाईक अगदी शोभतात मुख्यमंत्र्याच्या भुमिकेत. त्यानंतर मला वाटते सरकारनामा मधील 'यशवंत दत्त' आणि 'वजीर' मधली अशोक सराफांचा मुख्यमंत्रीच काय तो बरोबरी करु शकला असेल या भुमिकेची !
दुभाषींचा डीकॉस्टा आणि दत्ता भटांचा 'माणिकराव पाटील' ही देखील या चित्रपटातील माझी आवडती पात्रे !
निळुभाऊंचा 'दिगु' तर निव्वळ अप्रतिम !

मोकिमी, मनःपूर्वक आभार या लेखाबद्दल. मला वाटते मराठी चित्रपटांवर जिवापाड प्रेम करणार्‍या प्रत्येकासाठी हा चित्रपट म्हणजे 'मर्मबंधातली ठेव' असावी, ठरावी ! शुभेच्छा Happy

अप्रतिम सिनेमा ! पण लेख त्रोटक वाटला. अजून बरच उलगडता आलं असतं सिनेमाबद्दल. या एकाच सिनेमात मराठी सृष्टीतील इतके दिग्गज होते की पहाणार्‍यासाठी पर्वणीच. आता हा सिनेमा पाहून इतकी वर्षे झालीत. बरचसं अंधूक आठवतय. पण एका गोष्टीबद्दल ठाम मत आहे. हा सिनेमा ग्रेट आहे. Happy

धन्स लोकहो !!!!

कौतुक.... बरच लिहायचं होतं पण आपल्याला खुप काय काय वाटत असतं ते काय लिहु नी किती लिहु असं झालं.

ह्यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे एक स्वतंत्र लेख आहे.

सग्ळा लेखच आवडला!
अरुण सरनाईक तर निव्वळ अप्रतिम. त्यामानाने मला दिगूच नीट जमला नाही असे वाटते. तसेच मूळ कादंबरीतले 'दत्ताजीराव जाधव-डोरोथी जाधव' ही पात्रेही असायला हवी होती.

त्यामानाने मला दिगूच नीट जमला नाही असे वाटते.>>>
कादंबरीशी तुलना करायला गेलो तर या वाक्याशी मी ही सहमत आहे. कारण लेखात वर म्हटल्याप्रमाणे (आणि कदाचित अरुण साधु हे देखील फ़्रीलान्स पत्रकार असल्यामुळे असेल कदाचित) कादंबरीत दिगुच्या पात्राला इतरांपेक्षा थोडे जास्तच महत्व दिलेले आहे. पण एक स्वतंत्र व्यक्तीरेखा म्हणून बघीतले तर चित्रपटातील ’दिगु टिपणीस’ क्लासच होता Happy

दत्ताजीराव जाधव->>>> मधुकर तोरड्मल..... हे पात्र आहे पण त्याचा आवाका मर्यादित ठेवला आहे.

गाजलेल्या कादंबर्‍यां वरुन जेंव्हा सिनेमा निघतो, तेंव्हा त्यात त्रुटी ह्या असायच्याच. पुस्तकात लिहिलेले सगळेच ३ तासात बसवता येत नाही.

वि.कु. +१

माझा अत्यंत आवडता सिनेमा. लहान असताना पाहिला होता, फारसा समजला नव्हता. पण आईबाबांना आवडला असल्याने जेव्हा कधी टि.व्ही.वर लागायचा तेव्हा हमखास चर्चा होत असत. त्यावरून हळूहळू कळला. आता तर घरी व्हि.सी.डी च घेऊन ठेवल्याने वर्षातून २- ३ पारायणे होतातच Happy

कौतुकला अनुमोदन. लेख त्रोटक वाटला. पण मला वाटतं ह्या सिनेमावर जितकं लिहू तितकं कमीच आहे Happy

आभार मीरा, आता आठवलं.

जब्बारांचा दबदबा असा होता कि त्यांना थेट मंत्रालयात शुंटींग करता आले. शिवाय दुभाषींच्या एका सीनमधे ज्यावेळी स्मगलर्स चा उल्लेख येतो त्यावेळी त्या नेमक्या तीन इमारती फ्रेममधे येतात !

मी थिएटरला जाऊन बघितलेल्या मराठी चित्रपटात हा एक आहे ( सरकारनामा, आत्मविश्वास हे पण असेच. )

सहीच्च. माझा ऑल टाईम फेवरिट सिनेमा...
किती लिहावं तेवढं थोडंच आहे. तरीही माझेही दोन पैसे
१. अरुण सरनाईक - केवळ जबरदस्त. माझ्या मते इतर सर्वांपेक्षा कांकणभर सरसच झालाय त्याचा अभिनय. मुळात मुंबई दिनांकातल्या सीएमची सांगड सिंहासनच्या सीएमशी घातल्याने त्या पात्राला एक फार तपशीलवार परिमाण मिळालंय. शिवाय सुरुवातीचा , टायटल्सच्या आधीचा सीन (पुस्तकात नसलेला) घालून त्याला आणखीच वास्तववादी केलंय

२. अचूक पात्रयोजना. गॉडफादर सिनेमा इतकीच. ते पात्र आणखी कुणी अन्य साकारू शकेल असं कधीच वाटू शकत नाही - अगदी शेखर नवरे, धर्मा महार आणि पानिटकरच्या बायकोसकट

३. अतिशय सशक्त आणि चटपटीत (क्रिस्प ला प्रतिशब्द?) पटकथा. शेवटपर्यंत कुठेही वेग कमी होत नाही. इतक्या पात्रांची गर्दी असूनही कुठेही गुंता नाही.

४. दत्ता भटांचा सत्यनारायणाचा सीन. इतका मद्दड बेरकीपणा दाखवणं तेच जाणे.

५. दिगंबर पितळेंनी साकारलेला मुख्यमंत्र्यांचा साडू. अफाट. मला त्यांच्यातले आणि मुख्यमंत्र्यांमधले भूकबळीविषयीचे संवाद आवडतात. अगदी फुटाण्यासारखे फुटत रहातात. सरकॅस्टिक ह्यूमर सहीच जमलाय.

६. सगळ्यात फसलेलं पात्र दिगूचं याबद्दल मीही सहमत. पुस्तकात जाणवणारी त्याची हुशारी, तो सर्वात अनुभवी पत्रकार, कधीकधी किंगमेकरही होऊ शकतो असा, हे सगळे पैलू पूर्ण हरवलेत. शेवटी त्याचा होणारा भ्रमनिरास म्हणूनच पटणारा नाही. कारण जरी श्रीपतरावांच्या मृत्यूमुळे तो हळहळण्याइतका ध्येयवादप्रेमी असला तरी कुठल्या बातम्या दाबायच्या-फिरवायच्या-आणि किती अलिप्त रहायचं हे ठरवण्याइतके त्याचे पाय वास्तवात नक्कीच ठाम रोवलेले आहेत.
पण हे सगळं पुस्तकाशी तुलना करताना. स्वतंत्रपणे सिनेमात बघितलं तर ते पात्र एका सर्वसामान्य जनता आणि राजकारणी जग यांच्यातल्या पुलासारखं. त्यामुळे त्याचा प्रवास ठीकच आहे आणि शेवटचा हताशेचा कडेलोटपण.

७. माझ्यामते जब्बारचा सर्वात उत्कृष्ट चित्रपट. सामनाचं खूप कौतुक होतं पण मला कधीच तो सिनेमा आवडला नाही. अतिशय दांभिक आणि कृत्रिम वाटला. सिंहासन तो सिंहासन!

हे सग्ळं आपण बोलतोय तेव्हा बहुतेकांनी पुस्तकं वाचून मग सिनेमा बघितलाय असं जाणवतं. पण ज्यांनी आधी (किंवा फक्त) सिनेमा पाहिलाय त्यांची मतं जाणून घ्यायला आवडतील

विशाल - यशवंत दत्त किंवा अशोक सराफ यांच्या क्षमतेबद्दल शंका नाही. पण अरुण सरनाईकच्या जवळपासही ते पोचू शकले नाहीत, शकले नसते असं मला वाटतं

सगळ्यात शेवटी - आज जवळपास तीस वर्षांनंतरही तो सिनेमा तेवढाच कालानुरूप (रिलेव्हन्ट) असणं हेच आपल्या समस्त जनतेचं दुर्भाग्य!!

खूपच सुंदर लिहीलय. शुभेच्छा !!

( सिंहासन हा जब्बार पटेलांचा जबरदस्त सिनेमा आहे. पण जैत रे जैत हा "सिनेमा" म्हणून ग्रेट आहे. वै. म.)

वरदा, मी पुस्तक न वाचता बघितला होता. त्यातला पत्रकार आम्हाला अगदी आपला वाटला होता, कारण त्या
काळातल्या राजकारणातून आम्हीही असेच निराश झालो होतो. आपल्यालाही आता वेड लागायची पाळी येणार,
असेच वाटत राहिले.

(रिमा आणि डॉ. लागूंचे गालाला गाल लावणे, बरेच काही सांगून गेले असे वाटले होते, त्यावेळी )

सुरेख लेख. माझाही आवडता सिनेमा आहे. Happy

या निमित्ताने मला बरेच दिवस पडलेला एक प्रश्न. डिकास्टाने दिगूला पत्रकार परिषद घेणार आहे अशी बातमी दिल्यानंतर दिगू विचारात पडलेला दाखवला आहे. नंतर लगेच डिकास्टावर हल्ल्याची बातमी. पत्रकारपरिषदेची बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत दिगू पोचवतो असं यातून सूचित होतं आहे का? मला प्रत्येक वेळी तसंच वाटत राहतं. मुंबई दिनांक आणि सिंहासन वाचून बरेच दिवस झाले त्यामुळे त्यात याबद्दल काही क्लू आहे का आठवत नाही.

-----

बदलांबद्दल. विद्यापीठात आमच्या फिल्म क्लबमध्ये सिंहासन दाखवण्याआधी अरूण साधूंना 'दोन शब्द बोला' अशी विनंती केली होती. त्यावेळी ते म्हणाले की सिनेमात बरेच बदल केले आहेत. उदा. दिगूसारखा मुरलेला पत्रकार भावनाप्रधान होऊन शेवटी वेडा होतो हे पटण्यासारखे नाही. कादंबर्‍यांची कल्पना त्यांना मुंबईच्या व्हिटी स्टेशनवर सुचली, पीक अवरमध्ये अथांग माणसांचा सागर बघून.

निव्वळ चित्रपट म्हणून बघितले तर मराठी सिनेमामधला मैलाचा दगड वगैरे सहज म्हणता येईल. पण कादंबर्‍यांशी तुलना केल्यावर प्रचंड भ्रम निरास झाला. विशेषतः दिगूच्या पात्राला अजिबात न्याय मिळालेला नाहि नि त्या कोनातून पुस्तक जेव्हढे effective वाटते तेव्हढा सिनेमा कधीच वाटला नाही. पण हा सिनेमाचा दोष म्हणण्यापेक्षा पुस्तकाचे यश म्हणायला हवे :). 'ज्या क्षमतेचे कलाकार नि जब्बार पटेल असल्यामूळे पुस्तकाची उंची गाठता आली असती तर' अशी चूटपूट नेहमीच लागून राहीली आहे.

वरदा नं. १ नि ४ बद्दल प्रचंड अनुमोदन.

आपला एकदम फेवरीट पिक्चर Happy
दिगु बद्दल काही कॉमेंट्स वाचल्या. लक्ष देवुन बघितल्यावर लक्षात येइल कि जे काही होते ते फक्त त्याच्या मुळेच. तो नसता तर कदाच्जित मुख्यमंत्री बदलेला दिसला असता. एवढे करुनही मुख्यमंत्री जे राजकारण करतात ते पाहुन त्याला वेड लागते. पिक्चर्मध्ये खरा किंगमेकर तोच. Happy

आणखी एक, आज सुधा राजकारणात काही फरक पडलाय असे वाटत नाही, अक्षरशः जैसे थे ....
म्हणुन एवरग्रीन. Happy

क्या बात है .. माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमाबद्दल लेख आहे!
प्रतिसाद म्हणून 'सिंहासन'वर मी पूर्वी लिहिलेल्या आणि माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केलेल्या लेखाचा दुवा देत आहे! http://www.atakmatak.blogspot.com/2008/06/blog-post.html

'गाथा चित्रशती'च्या नियमांनुसार पूर्वप्रकाशित लेख देता येत नाहीत.
अन्यथा हा लेख आणि माझा बच्चनवरचा लेख नक्की दिले असते Happy

मोकिमी,

सिंहासन अप्रतिमच आहे. आणि तुम्ही योग्य न्याय दिलात तुमच्या लेखात. अधिक विस्तारला असता तर (कदाचित) सर्व अंगांना समान उठाव देता आला नसता. हेमावैम.

चित्रपट पाहून खूप वर्षं झाली. आठवण अंधुक झालीये. खरोखरच हा मराठीतला एक मैलाचा दगड आहे. याची इंग्रजी आवृत्ती आरामात एखादे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय पारितोषिक खेचेल (असे वाटते).

बाकी दिगू टिपणीस हे नाव महान पत्रकार जगन फडणीस यांच्यावर बेतलं होतं असं ऐकलंय. खखोदेजा.

आ.न.,
-गा.पै.

सिंहासन बहुतेक बघितलेला नाही किंवा फार वर्षांपुर्वी बघितल्यामुळे विसरायला झाला असावा .. आता बघेन लवकर ..

पण वरचे डिटेल्स् बघून सरकारनामा चीही आठवण आली .. म्हणजे असं म्हणायचंय की दोन्ही चित्रपट अगदी एकाच धाटणीचे वाटतात ..

ह्या सिनेमाचा वेगळे पणा म्हणजे पहिल्यांदाच खाऱ्या खुऱ्या विधानसभेत ह्याच चित्रीकरण झालं होत
>>
हे बरोबर नाही. चित्रपटातली विधानसभा ही बी जे मेडिकल कॉलेजचे ऑडिटोरियम आहे.
इव्हन दिनेशदा यांच्या म्हनण्यानुसार मंत्रालयाच्या अंतर्भागात शूटिंग झालेले नाही. मात्र मुख्यमंत्री व डिकास्ता यांचा टेरेसवरचा संवाद मंत्रालयाच्या टेरेसवरचा असू शकतो. पुन्हा पहाताना बारकाईने बघायला हवे...

एक उत्तम चित्रपट. अनेक दिग्गज मंडळींना घेऊन प्रत्येकाला काहीतरी करुन दाखवायची संधी देणारा चित्रपट. अनेकदा बघितला तरी कंटाळा येत नाही. जब्बार पटेलांना मानले पाहिजे. श्रीराम लागू, त्याची सून रीमा लागू आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे कस्पटासमान बनलेला मुलगा हेही एक वेगळेच प्रकरण. सगळे नट आपली भूमिका अगदी जगले आहेत. तो डिकास्टा बनलेला सतीश दुभाषी, अरुण सरनाईक, दत्ता भट. नाना पाटेकरला एक किरकोळ गुंड दाखवला आहे पण तोही भाव खाऊन जातो. अभिनेत्यांची अशी मांदियाळी फार वेळा बघायला मिळालेली नाही. आता तर ह्यातले फारसे कुणी जिवंतही नाहीत :-(.

पण अर्थात आजच्या राजकारणाकडे बघितले तर ह्या सिनेमातील लफडी अगदीच किरकोळ वाटतात. सिंहासनमधे दाखवला आहे त्यापेक्षा कैक पटीने भ्रष्टाचार वाढला आहे. आज असे सिनेमे निघायला हवेत. पण बहुधा सरकार अशांना परवानगीच देणार नाही.

सही. बरं झालं तुम्ही आठवण काढलीत. Happy

वरदा, मी नाही वाचलेलं पुस्तक. मुंबई दिनांक वाचलं आहे फक्त. त्यामुळेच मला चित्रपट गोळीबंद वाटतो बहुतेक.

पण बहुधा सरकार अशांना परवानगीच देणार नाही.
>>

सरकारची कोणताही चित्रपट काढायला परवानगी लागत नाही. तयार झालेला चित्रपट प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून पास करून घ्यावा लागतो. त्याच्या गाईड्लाईन्स ते स्वतःच बनवते त्या सरकार देत नाही. त्यात राष्ट्रविरोधी विचार, हिंसा,अश्लीलता, सोशल ट्रांक्व्यालिटी, जेन्डर बायास अशा बाबी विचारात घेतल्या जातात. या बोर्डावर कला, समाज इ विविध स्तरावर्ची जाणकार मंडळी असतात..
सरकारने परवानगी नाकारलेला राजकीय विषय असलेला कोणता चित्रपट तुम्ही सांगू शकाल? उलट पक्षी गुंडगिरी करून चित्रपट बंद पाडून अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा गळा घोटण्यात व पॅरलल सेन्सॉर बोर्ड चालवण्यात तुम्ही ज्यांच्या गळ्यात गळा घालता ते विरोधी पक्षच आघाडीवर असतात. अशा चित्रपटांना उलट सरकारने पोलीस संरक्षण देऊन ते चालू ठेवले आहेत.
शिवाय सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर कोर्टात दाद मागून न्याय मिळवता येतो हे आणखी वेगळेच्..तसे अनेकदा झालेच आहे.

Pages